व्हिडीओ शूट

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
25 May 2016 - 8:50 pm

......आणि मग थोडं पुढे गेल्यावर
मला दिसला एक नेता
जो देत होता आश्वासन कसलेतरी
पाच वर्षापूर्वी तो हेच बोलला होता...असं मला पाच वर्षापूर्वी वाटलं होतं
ते आठवलं
.
.
पुढे जात होतो तसतसं बातम्या ऐकायला येत होत्या
रोज एक पुतळा पडल्याच्या
काही पुतळे बनले होते घाईघाईत
तर काहींना लोकांनी पाडले होते
काहीचे पायच तकलादू होते म्हणे
तर काहींची डोकी फार उंच गेल्यामुळे तोल गेला होता
काही मात्र पडले होते हकनाक
....माझ्या शहरात खूप पुतळे झालेत
.
.

थोड्या वेळाने एका डोंगरावर चढलो
तिथून दिसत होती ठिकठिकाणी भांडणारी लोकं
काहींकडे कारणं होती भांडायची
काही विसरून गेली होती कारणं भांडता भांडता
काहींना माहिती नव्हती
तर काहींकडे नव्हतीच काही
'भडव्यांनो काय भांडताय' असं हळू आवाजात म्हणून शेवटी मी खाली उतरलो डोंगरावरून
आणि पोलिस स्टेशनात गेलो
'तुम्ही भांडणं सोडवायला जात का नाही?', तिथे विचारलं
तर ते म्हणे, 'कोणी जायचं यावरून आम्ही भांडतोय.'
मग एक चांगला पोलिस आला
हात बांधलेले होते त्याचे
मला कानात घालायला कापसाचे बोळे दिले त्याने
मी जाता जाता पाहीलं,
त्याच्या टोपीवर 'सद्रक्षणाय' लिहीलं होतं
.
.
मला बरं वाटतच होतं तेवढ्यात
तीन पुडी डबा सायकलला अडकवून
एक जण तिथून जाता जाता,
'रस्ता कधी संपत नसतो' म्हणाला
त्यामुळे मग मी पुढे चालत राहिलो
एका चाैकात एका गाढवामागे खूप लोकं चालली होती
...मागे टाकला मी तो चाैक
जवळच शाळा दिसली एक
आत गेलो तर मुलं 239 चा पाढा पाठ करत होती
घाबरून बाहेर आलो तिथून
आणि पटकन नऊचा पाढा म्हणून बघितला
आजुबाजूची भटकी कुत्री पहात होती मला
.
.

चालत राहिलो मी
शहरांमागून शहरं तुडवत राहिलो
आजूबाजूची गर्दी वाढायला लागली होती
ईतकं की रेटा देऊन पुढे जायला लागत होतं
काही जणांनी आपल्या लहान मुलांनादेखील आणलं होतं
खूप गर्दी, गोंगाट होता
कापसाच्या बोळ्यांचा काही उपयोग होईना
काढायला गेलो तर कानाचाच भाग झाले होते ते
तितक्यात ऐकलं मी
एके ठिकाणी एक माणूस ओरडून सांगत होता सगळ्याना
आता विनाश जवळ आहे म्हणून
त्याचा बापही हेच सांगायचा
बापच काय, आजा-खापरआजा सगळे हेच सांगायचे
जसजसं मी पुढे आलो, त्याचा आवाज कमी कमी होत गेला
चालत चालत मी अजून एका शहरात आलो
तिथे दोन वस्त्या होत्या
एक खूप उंच माणसांची
आणि दुसरी खूप बुटक्या माणसांची
मला कुठल्या वस्तीत जायचंय तेच कळेना
शेवटी मग मी घरी आलो
आणि हातपाय धुवून झोपून गेलो

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

25 May 2016 - 10:18 pm | चांदणे संदीप

बऱ्याच गोष्टी 'कव्हर' केल्या की हो तुमच्या कॅमेऱ्याने!!

Sandy

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 May 2016 - 12:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अ‍ॅबस्ट्रॅक्ट!! जबरदस्त...

रातराणी's picture

27 May 2016 - 1:38 am | रातराणी

+१ कहर जमलीये!

प्रचेतस's picture

27 May 2016 - 6:16 am | प्रचेतस

जबरदस्त झालीय.

चाणक्य's picture

28 May 2016 - 9:52 am | चाणक्य

धन्यवाद.
हा एक नविन प्रयोग केला.खरं तर दोन प्रयोग. १- कुठलाही विशेष प्रसंग, थीम, मूड, नातं , टिप्पणी, मत , टिका, काैतुक , उपदेश वगैरे वगैरे काही काही न मांडता काहितरी लिहायचा प्रयोग. म्हणून मग 'शूट' निवडलं. आणि २. अॅबस्ट्रॅक्ट स्टाईलमधे लिहायचा प्रयोग. पहिल्यात जशी हवी होती तशी नाही जमली.म्हणजे कितीही 'शूट' आहे म्हणलं तरी त्यात एक काॅमन थीम दिसतीच आहे. . Anyway... 'निर्मिती'चा आनंद मिळाला...ते पुरेसं आहे. :-)

जव्हेरगंज's picture

28 May 2016 - 6:35 pm | जव्हेरगंज

हेच म्हणतो,

मला बरं वाटतच होतं तेवढ्यात
तीन पुडी डबा सायकलला अडकवून>>>>>

यानंतरच कवितेला एक abstract धार चढलीय! उत्तुंग झालीय!

और आंदो !

यशोधरा's picture

28 May 2016 - 6:38 pm | यशोधरा

आवडली. जबरदस्त जमली आहे.

अप्रतिम! अमूर्त कल्पना तरलपणे मांडण्याचे कसब भारी!