माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 4

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
3 May 2016 - 11:10 pm

भाग चौथा

आज लंडन मधील तिसरा दिवस . आज सकाळी पुन्हा एकदा Hyde पार्क मध्ये गेले. आज परत त्या तलावाच्या इथेच गेले होते. तिथे आजूबाजूला फिरून मग तासाभरात परत घरी आले कारण आज मी संग्रहालये बघायला जाणार होते. Science Museum आणि Natural History Museum. इथे जाण्यासाठी आपल्याला South Kensington या स्टेशन वरून बाहेर पडल्यावर थोडं चालत जावं लागतं. Science Museum, Natural History Museum, Victoria & Albert Museum हि सगळी संग्रहालये जवळपास आहेत पण इतकी मोठी आहेत की एका दिवसात बघून होणं कठीण आहे. ही संग्रहालये बघायला आपल्याला प्रवेश शुल्क भरावे लागत नाही पण Museum मध्ये काही प्रदर्शने भरवली जातात , काही कार्यक्रम असेही असतात ज्याला प्रवेश शुल्क आकारले जाते. तुम्हाला ती पाहण्यात रस असेल तर तुम्ही जाऊ शकता.

माझी शैक्षणिक पार्श्वभूमी ही शास्त्राची नसल्याने मला Science Museum बघायला फार वेळ लागला नाही. लहान मुलांसाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे हे. इतकं की लहान मुलं दिवसभर इथे रमू शकतात. त्यांच्यासाठी वेगवेगळे scientific खेळ, प्रश्नमंजूषा असं काय काय असतं. ५ मजली आहे हे संग्रहालय. या संग्रहालयामध्ये जुन्या काळच्या ४ चाकी गाड्या, रेल्वे ची इंजिनं ती सुद्धा जुन्या काळातली , विमानं ठेवलेली आहेत. एक विभाग असा आहे ज्यामध्ये स्पेस सेंटर , स्पेसशिप कशी असतात याची मोडेल्स दाखवली आहेत . अंतराळवीर काय खातात ,कसे राहतात , कसे कपडे त्यांना घालावे लागतात हे सगळं दाखवलेलं आहे. लहान मुलांच्या दृष्टीने हे सगळं खूप रोचक आहे. एक विभाग असा आहे ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती बद्दल माहिती दिलेली आहे, जगभरात कुठे काय झाले आहे त्याबद्दल चे चित्रीकरण टीव्ही वर दाखवले आहे. अजून एक रोचक गोष्ट म्हणजे एका platform वर त्यांनी भूकंपाचे एक मॉडेल तयार केले आहे. त्या platform वर ऊभे राहिल्यावर भूकंप प्रत्यक्ष कसा होतो हे आपल्याला अनुभवायला मिळतं.

हे संग्रहालय पाहून झाल्यावर आता मी जाणार होते Natural History Museum बघायला. काय अफाट बांधकाम आहे इमारतीचं. या सगळ्या संग्रहालयांच्या इमारती एक से एक आहेत. एकेका इमारतीची भव्यता आणि त्याचं दगडी बांधकाम पाहून अचंबित व्हायला होतं इतकं मस्त बांधकाम आहे. लंडन मधील सगळ्याच जुन्या इमारती बघण्यासारख्या आहेत.
बाहेरून ही इमारत बघितल्यावरच भारी वाटतं. हे संग्रहालय म्हणजे भूलभुलैया वाटला मला. इतक्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. या संग्रहालयामध्ये मुख्यत्वे खानिजविज्ञान, कीटकशास्त्र , अश्मीभूत अवशेषांचा अभ्यास , वनस्पतीशास्त्र आणि आणि प्राणीशास्त्र या ५ विषयांवरील संशोधन आणि माहिती, अवशेष ठेवलेले आहेत. मुख्य लक्ष वेधून घेतो तो म्हणजे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर ठेवलेला एका डायनासोर चा सांगाडा. हा प्रचंड मोठ्ठा सांगाडा आहे. मला एका गोष्टीची हुरहूर लागून राहिली ती म्हणजे मला तिथे डायनासोर च्या सांगाड्यांचे प्रदर्शन नाही पाहता आले कारण तो विभाग काही काळासाठी त्यांनी बंद ठेवलं होता पण बाकीच्या या पाचही भागांमध्ये बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या ज्या पूर्वी कधीच बघितलेल्या नव्हत्या. काही काही विभागांमध्ये लहान आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा क्विझ च्या स्वरुपात काही खेळ आहेत. हे संग्रहालय पूर्ण पहायला मला अर्धा दिवस लागला. आता अंधारही पडायला लागला होता आणि संग्रहालयाची वेळही संपत आली होती त्यामुळे तिथून निघाले, बाहेर आले आणि बघते काय तर पाऊस !! आता आली का पंचाईत :( माझ्याकडे छत्री सुद्धा नव्हती आणि अंधारही पडायला लागला होता. तसं स्टेशन ५ मिनिटे चालण्याच्या अंतरावर होतं म्हणून बरं, मग तशीच भिजत गेले घरी आणि आजच्या दिवसाची भटकंती संपली.

दिवस चौथा -

नेहमीप्रमाणे सकाळी उठून hyde पार्क ला जाऊन चालत फिरून आले तासभर आणि आवरून बाहेर पडले. आज जरा ढगाळ वातावरण होतं बाहेर. आज सुद्धा मी Museum बघायला गेले होते. विक्टोरिया & अल्बर्ट संग्रहालय. हे संग्रहालय प्रचंड मोठं आहे. कला क्षेत्रातील लोकांसाठी हे संग्रहालय म्हणजे पंढरीच म्हणायला हवी. कलाक्षेत्राशी निगडीत कित्येक गोष्टी आहेत इथे बघण्यासाठी. अगदी जुन्या काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळात लोकं वेगवेगळ्या देशात कशी भांडी कुंडी, कपडे, दागदागिने, वापरत असत. फर्निचर , स्कल्प्चर्स ,फोटोस , चित्रकला, यांचाही वेगवेगळ्या देशातला संग्रह बघायला मिळाला. प्राचीन काळातील देव देवतांच्या मूर्ती , पुतळे , त्याकाळच्या संस्कृतीची माहिती यांचा संग्रह . हे संग्रहालय बघण्यात माझा अर्धा दिवस कसा गेला हे कळलंच नाही. या संग्रहालयाची इमारत सुद्धा खूप अप्रतिम बांधलेली आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे. बाहेरून या इमारतीचे फोटो काढले आणि South Kensignton स्टेशन वर आले. या स्टेशनच्या बाहेर खाण्या पिण्याची चंगळ आहे. विविध पदार्थांची restaurants आहेत. इथे Bens Cookies म्हणून एक छोटं दुकान आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या cookies खूप छान मिळतात. खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल नंतर सविस्तर लिहिणारच आहे. पण एक आहे, बाहेर खाणं तसं महाग आहे. स्टेशनच्या बाहेरची ही भटकंती झाल्यावर मी घरी आले. संध्याकाळी मंदार आल्यावर Marble Arch स्टेशन पर्यंत जाऊन एक फेरफटका मारून आलो. आता उत्सुकता होती ती उद्याची :)

दिवस पाचवा -

आज मी जाणार होते Horse Guards Parade बघायला.इथे जाण्यासाठी विक्टोरिया, ग्रीन पार्क आणि सेंट जेम्स पार्क या पैकी कुठल्याही ट्युब स्टेशन वर उतरून जाता येतं. स्टेशन मधून बाहेर पडल्यावर साधारण १० मिनिटे चालायला लागतं. माझ्यासाठी ग्रीन पार्क ला जाणं हा सगळ्यात जवळचा मार्ग होता म्हणून मी तिथे गेले. ग्रीन पार्क स्टेशन मधून बाहेर पडल्या पडल्या समोर नुसती हिरवळ आणि झाडं. ग्रीन पार्क हे पार्क सुद्धा ४ रॉयल पार्क्स पैकी आहे. Buckingham Palace कडे जाणारा रस्ता हा ग्रीन पार्क मधूनच जातो. हे पार्क सुद्धा अतिशय सुंदर आहे. मला लौकर पोहोचायचं होतं त्यामुळे पार्क न बघता मी आधी Buckingham Palace च्या दिशेने गेले. मी जरी लौकर निघाले तरी तिथे पोहोचायला मला सव्वा दहा वाजलेच, तोपर्यंत तिथे बऱ्यापैकी गर्दी जमली होती. कशी बशी दुसऱ्या रांगेत उभं रहायला जागा मिळाली. माझ्या पुढे ३ तगडी माणसं उभी होती त्यामुळे काहीच दिसत नव्हतं मला. मग थोड्यावेळाने नुसतेच उभं राहिल्यामुळे कंटाळून ते निघून गेले. माझं नशीब जोरावर होतं त्यामुळे मला अगदी पुढे उभं रहायला जागा मिळाली जेणेकरून मी सगळा सोहळा नीट पाहू शकले.

लंडन मधील सगळ्यात चांगल्या आकर्षणानपैकी एक आहे हा सोहळा. मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की ही परेड खूप बघण्यासारखी असते. याच परेडला Change Of Guards Ceremony असेही म्हणतात. हा सोहळा Buckingham Palace मध्ये पार पडतो. Buckingham Palace आणि St. James Palace च्या संरक्षणासाठी तिथे रक्षक आहेत, तर त्या जुन्या रक्षकाच्या जागी दररोज नवीन रक्षक येतो या रक्षकांचा बदली सोहळा म्हणजेच Change Of Guards Ceremony. अगदी वाजत गाजत, ड्रील करत आणि घोड्यावर बसून हे रक्षक येतात आतमध्ये मुख्य दरवाज्यातून. या Palace समोर एक मैदानासारखी जागा आहे तिथे हा सोहळा पार पडतो. मैदानाच्या सर्व बाजूंनी सुंदर नक्षीकाम केलेले मोठ्ठे लोखंडी दरवाजे आणि रेलिंग आहेत जिथून आपण हा सोहळा पाहू शकतो. हा सोहळा पाहायला आपल्याला कुठलेही तिकीट काढावे लागत नाही. हां पण आपल्याला हा सोहळा पहिल्या रांगेतून पहायचा असेल तर मात्र तिथे किमान १ तास आधी पोहोचलं पाहिजे. जर तुम्ही खूप मागे असाल तर तुम्हाला नीट दिसणार नाही. हा दिमाखदार सोहळा पाहायला लोकांची झुंबड असते त्यामुळे लौकर जाऊन मला पुढे गेटपाशी जागा पकडायची होती म्हणून घरातून लौकर निघाले. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरु होतो. साधारण अर्ध्या तासाचा सोहळा असतो. एकाच रंगाच्या युनिफॉर्म मध्ये डोक्यावर त्यांची ती टिपिकल काळ्या रंगाची फरची टोपी घालून त्यांची ड्रील पाहण्यासारखी असते. मी जिथे उभी होते तिथे एक रक्षक कुत्र्याला घेऊन उभा होता आणि विशेष म्हणजे त्यालाही घातला होता तसाच युनिफॉर्म. एकदम सावधान उभा होता तो सुद्धा त्या रक्षकासारखा अर्धा ते पौण तास. रक्षकांची बदली झाल्यानंतर त्यांचं जे band पथक असतं ते लोकं खूप सुंदर म्युसिक वाजवतात आणि ते झाल्यावर सगळे आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत मुख्य दरवाज्यातून बाहेर पडतात.

Buckingham Palace च्या समोरच Queen Victoria Memorial आहे तिथे पण खूप गर्दी असते हा सोहळा पाहण्यासाठी. ही जागा जरा उंचावर आहे त्यामुळे इथूनही नीट दिसते परेड. इथे सुद्धा फोटो काढले आणि निघाले. परत जाताना सुद्धा ग्रीन पार्क मधूनच जायचं होतं. हे पार्क पण थोडं फिरले फोटो काढले आणि तिथून निघाले. ३/४ दिवस खूप चालणं झालं होतं. त्यामुळे पाय दुखत होते. आणि सततच्या थंडगार वाऱ्यामुळे डोकंही ठणकत होतं म्हणून मग आज पुढे कुठे जायचं नाही आणि घरी आराम करायचा असं ठरवलं आणि घरी आले. संध्याकाळी रोजच्यासारखा फेरफटका आणि थोडं सामान घेऊन आलो.उद्या कुठे आणि कसं जायचं हे ठरवून जेवण करून झोपलो.

Natural History Museum

Natural History Museum

Victoria & Albert Museum

Victoria & Albert Museum

V&A Museum Ek Kalakruti

Green Park

ग्रीन पार्क

Buckingham Palace

Buckingham Palace

Horse Guards Pared

Changing of guards Ceremony

Buckingham Palace Doors

Buckingham Palace Doors

Green Park Doors

ग्रीन पार्क doors

Queen Victoria Memorial

Queen Victoria Memorial

क्रमश:

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

4 May 2016 - 12:49 am | राघवेंद्र

फोटो पण टाका. पु. भा. प्र.

रेवती's picture

4 May 2016 - 1:38 am | रेवती

छान.

मुक्त विहारि's picture

4 May 2016 - 6:56 am | मुक्त विहारि

पण....

ह्या वेळी जरा फोटो हवे होते.

मेघना मन्दार's picture

4 May 2016 - 9:57 am | मेघना मन्दार

फोटो टाकते लौकरच !!

मुक्त विहारि's picture

10 May 2016 - 1:23 pm | मुक्त विहारि

प्रवासवर्णन म्हटले की फोटो मस्ट.

मेघना मन्दार's picture

10 May 2016 - 1:25 pm | मेघना मन्दार

हो मुविकाका.. आता पुढच्या भागांचे फोटो, जसे जसे लिहित जाईन तसे त्याच धाग्यामध्ये फोटो टाकत जाईन .

चौकटराजा's picture

10 May 2016 - 1:44 pm | चौकटराजा

सर्व फोटो दर्जाच्या बाबतीत उच्च आहेत. लंडनच्या प्रेमात मीना प्रभू वर्षन वर्ष का अड्कून राहिलेल्या आहेत याचा प्रत्यय आपल्या फोटोवरून येतो. त्यामाने टूर ऑपरेटर बरोबर जाउन मॅजिक आय, तुसा म्युझियम व कोहिनूर् हिरा पाहून परत येणे हा लंडन मधील वास्तुविद्येचा अवमानच ठरतो. लंडन मधील बर्‍यापैकी अनाकर्षक वास्तू - बकींगहॅम पॅलेस बरेचरे टूरवाले एक उत्तम नमूना म्हणून दाखवीत असतात.

किमान ७-८ दिवस तरी हवेतच.

आणे हे टूरवाले १०-१५ दिवसांत युरोप दाखवतात.

सुनील's picture

10 May 2016 - 1:53 pm | सुनील

लंडन बघण्याचा सर्वोत्तम मार्ग - दोन फेर्‍यात लंडन!!

पहिल्या फेरीत, हॉप-इन हॉप-ऑफ बसचे तिकिट काढून सर्व मार्गावरून फिरून यायचे (वरच्या टपावरून!) आणि आपल्याला भावलेल्या ठिकाणांची नोंद करायची. आणि मग दुसर्‍या फेरीत ट्यूबचा पास काढून ती ठिकाणे निवांतपणे पहायची!

मेघना मन्दार's picture

10 May 2016 - 1:58 pm | मेघना मन्दार

या हॉप इन हॉप ऑफ बस मधून प्रवास करायचा राहिलाच ओ :(

मेघना मन्दार's picture

10 May 2016 - 1:55 pm | मेघना मन्दार

धन्यवाद काका :) लंडन आहेच हो प्रेमात पडण्यासारखं .. आणि टूर वाले दाखवतात त्यापेक्षा बराच काय काय आहे इथे बघण्यासारखं . २१ दिवस कमी पडले मला लंडन पाहायला आणि तरी सगळं लंडन पाहून नाहीच झालं..

बदामची राणी's picture

10 May 2016 - 2:06 pm | बदामची राणी

चारीही भाग एकदम वाचुन काढले. छान वाटले. मनातले विचार अगदी सहजपणे मांडले आहेत. फोटो पण छान!

विलासराव's picture

25 Jun 2016 - 7:46 pm | विलासराव

मस्त चालली आहे लेखमाला.
पुढचेही वाचतो आता.