मुलींचा अनुशेष

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
17 Sep 2008 - 10:18 pm
गाभा: 

मागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्‍यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्‍या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे...
१. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु). बाकी मुलींच्या पालकांना एकतर या स्पर्धांचे महत्व नव्हते वा असूनही त्यांच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते येऊ शकले नव्हते.
२. जवळपास सर्वच सहभागी मुली मध्यम वा गरीब घरातल्या होत्या. ... कदाचित सर्व श्रीमंत घरातील मुलींना डॉक्टर-इंजिनिअर बनायचे असेल??
३. बर्‍याच फेर्‍या खेळाडू अनुपस्थित राहिल्याने उपस्थित खेळाडूंना विजेते घोषित करून आटोपण्यात आल्या. एका सूवर्णपदक विजेत्या मुलीला शेवटच्या चार फेर्‍या खेळव्याच लागल्या नाहीत... तिच्या गटात स्पर्धकच नव्हते!
४. बहुतांश विजेत्या मुली "चला शासनाची नोकरी पक्की" या विचारानेच सुखावल्या होत्या.

आमच्या पुतणीला गेल्या वर्षी सुद्धा बर्‍याच स्पर्धांमध्ये हा अनुभव आला होता. कब्बडी, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, मल्लखांब, दोर्‍यांवरच्या कसरती अशा अनेक खेळात जिल्हा पातळीवर एकदोन स्पर्ध येतात व विजयी होतात असे विदारक चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पहायला मिळते.

काय चालले आहे हे? अशा पद्दतीने निवडल्या गेलेल्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक आणण्याची आशा कशी करणार? आपण एक सुजान नागरीक म्हणून आपल्या आजूबाजूच्या मुलींना खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी काय करु शकतो? खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण पालकांना कसे पटवून देऊ शकतो?

मला वाटते मुलांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असावे. मुलांमध्ये खेळाची आवड असणार्‍या व पालकांचा पाठिंबा असणार्‍यांचा कल सुद्धा जास्त करून क्रिकेट वा टेनिस, फुटबॉल अशा आजकाल पैसा/प्रसिद्धि देणार्‍या खेळांकडे असतो.

शासन दरबारी तर सगळा आनंदी आनंदच आहे. ऑलम्पिक समितीकडून कसलीही मदत न झालेल्या सूवर्णबिंद्राने स्वकष्टाने/स्वखर्चाने यशशिखर गाठले आणी आपल्या पुण्यात "भव्य" सत्कार झाला तो कलमाडींचा! का, तर कमिटीचे अध्यक्ष म्हणून!! यश मिळवलेल्या त्रिमुर्तींनी दोन्-तीन आठवडे प्रसारमाध्यमे गाजवली. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात पण झाली. पण केवळ एक्-दोन महिन्यात आपली ही प्रसार माध्यमे, समाज व सरकार हे कदाचित या त्रिमुर्तींना विसरूनही गेले. येत्या काही वर्षात व पुढील पिढीत असे शेकडो अभिनव कसे तयार होतील याच्यावर कोणी काही केल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा अशा या नाकर्त्या शासनाकडून काही अपेक्षा न ठेवलेल्याच बर्‍या.

पण मग खेळातला हा मुलींचाच नव्हे तर मुलांचा तसेच आपल्या देशाचा अनुशेष कसा भरून काढता येईल??

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी एक:

मागच्याच आठवड्यात हा किस्सा ऐकला मी बाबांच्या एका मित्रांकडून! दोन वर्षांनी दिल्लीत ज्या राष्ट्रकूल स्पर्धा होणार आहेत त्यासाठी पूर्वपहाणी साठी काका उत्तरप्रदेशात फिरत होते. तिथे एका कॉलेजमधे खेळांच्या स्पर्धा झाल्या आणि पुढे पारितोषिक वितरण होणार होतं, तेव्हा काका तिथे पोहोचले. पारितोषिक म्हणून कोणाला जॅकेट्स देणार होते, कुणाला थाळ्या! एक मुलगा तिथे सातेक स्पर्धा जिंकला. तेव्हा पुरस्कार वितरणासाठी आलेल्या कोणा राजकीय नेत्यानी त्याला विचारलं, तुझ्या घरी तू सोडून किती मुलं? तो म्हणाला फक्त एक भाऊ आहे. तेव्हा त्याला म्हणे, तुला काय करायच्येत सात थाळ्या, दोन घेऊन घरी जा? पारितोषिक म्हणून आणलेलं एक जॅकेट एका नटव्या बाईनी असंच लंपास केलं, हे मला अगदी फिट्ट बसतंय असं म्हणत! कोणी भाषण देत होता तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला, तो तिथेच माईकसमोर फोनेवर बोलत होता, आणि बोलण्याचा रोख असा, त्या आजारानी लोकं मेले तर मेले, ते तर रोजचंच झालं. इथे स्पोर्ट्स झाले, ते सोडून मी काय मेलेले बघायला येऊ का?

हे लोक आपले नेते!

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 1:05 am | भास्कर केन्डे

आपण तर जबरा उदाहरण दिले आहे...

आपला,
(थक्क) भास्कर

यशोधरा's picture

17 Sep 2008 - 10:55 pm | यशोधरा

किती निराशाजनक आहे हे सगळं....
आणि चीड आणण्याजोगं..

बापरे अत्यंत निराशाजनक आहे हे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 12:53 am | भास्कर केन्डे

प्राजूताई,

परिस्थिती खालावलेली नव्हे. किंबहुना भारतात ती बर्‍याच शतकात अशीच आहे. आपल्या बालपणी आपल्यासकट आपल्या किती मित्र-मैत्रिणींना आपापल्या आई वडीलांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी करायला देऊन राष्ट्रीय संघात जाण्याचे स्वप्न दाखवले हे आठवा. कदाचित शुन्य. आता आपल्या किती मित्र-मैत्रिणींना डॉक्टर्-इंजिनिअर बनन्याचे स्वप्न दाखवले गेले वा अपेक्षा थोपवल्या गेल्या हे आठवा. कदाचित सर्वच... होय ना, मग हेच ते उत्तर.

माझी अशी खात्री आहे की पाच-सात वर्षाची दोर्‍यांवर कसरत कराणारी डोंबार्‍याची मुले उचलली व त्यांना जरा परिक्षा पद्धतीची माहिती दिली तरी ते भारतातल्या ऍथलेटिक्सच्या स्पर्धा आरामात जिंकतील. पण हे करणार कोण हा प्रश्न आहे.

आपला,
(भरडलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

रेवती's picture

18 Sep 2008 - 4:15 am | रेवती

त्यावरून असे वाटते.
जर बहुतेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे एकेकट्या आल्या असतील तर आपण हे सहज समजू शकतो की बरोबर आलेल्या एकाचा खर्च करणे शक्य नाही. सुदैवाने आपल्या पुतणीबरोबर तीचे वडील जावू शकले. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आईवडील आले नसतील तर इतर कारणे असू शकतात जसे, आजारपणे, लहान भावंडे व त्यांच्या परिक्षा इ. खेळाबद्दल असलेली अनास्था नाकारत नाहीये, पण सरसकट असेच असेल असे नाही.
क्र. ३ बद्दल नीटसा उलगडा झाला नाही. जर खेळाडू अनुपस्थित होते तर उपस्थित खेळाडूंमध्ये तरी स्पर्धा झाल्या कि नाही?
ज्या मुलीच्या गटात कोणीच नव्हते तर तीला सुवर्णपदक देणे धक्कादायक आहे. हे संबंधीत अधिकार्‍यांना माहीत असू शकले असते व आधीच स्पर्धा रद्द होवू शकली असते असे वाटते.
शासनाच्या नोकरीसाठी जर गरीब घरातील मुली खेळत असतील तर त्यात त्यांची चूक किती व परिस्थितीचा दोष किती?
काही पालक वयात येणार्‍या मुलींच्या तब्येतीस जपण्यासाठी त्यांना खेळू देण्यास नकार देत असावेत. माझी माहीती ऐकीवच आहे. मुलींच्या शारिरीक व मानसीक सुरक्षिततेचा प्रश्नही नाकारता येत नाही.

माझ्या मुलाच्या शाळेत अनेक पालक त्यांच्या मुलांना व मुलींना सॉकरच्या क्लासला पाठवतात ते केवळ त्या खेळाच्या वेडापायी (आपल्याकडच्या क्रिकेट्च्या वेडाशी याची तुलना होवू शकेल). माझी एक भारतीय मैत्रिण तिच्या मुलाला सॉकरसाठी पाठवते व त्याला जमत नाही म्हणून रागावते. त्या चार वर्षाच्या मुलाच्या पायात असलेले दोष डॉक्टरांनी सांगूनही त्यावर उपाय न करणारे हे लोक पाहीले कि त्यांच्या सुशिक्षित असण्याबद्दल शंका येते. काही जण तर दर वर्षी नवा खेळ ट्राय करतात व आपल्या मुलाला किंवा मुलीला त्यात गती नाही म्हणून सांगतात.

रेवती

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 8:16 pm | भास्कर केन्डे

जर बहुतेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे एकेकट्या आल्या असतील तर आपण हे सहज समजू शकतो की बरोबर आलेल्या एकाचा खर्च करणे शक्य नाही. सुदैवाने आपल्या पुतणीबरोबर तीचे वडील जावू शकले. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आईवडील आले नसतील तर इतर कारणे असू शकतात जसे, आजारपणे, लहान भावंडे व त्यांच्या परिक्षा इ. खेळाबद्दल असलेली अनास्था नाकारत नाहीये, पण सरसकट असेच असेल असे नाही.
-- ही सगळी कारणे गृहीत धरली तरी एक अब्ज लोकांच्या देशात दोन-चारशे विद्यार्थिनी खेळाडू म्हणून येऊ शकत नाहीत? चांगल्या(?) शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आठवड्याची सुटी घेऊन कितीतरी पालक शाळांत खेटे घालत असतात. हा केवळ इच्छाशक्तीचा भाग आहे असे वाटते. जर वातवरण निर्मिती पद्धतशीर पणे केली गेली तर हेच पालक आपल्या पाल्यांना अशा स्पर्धांना आणण्यान्यासाठी रांगा लावतील.

क्र. ३ बद्दल नीटसा उलगडा झाला नाही. जर खेळाडू अनुपस्थित होते तर उपस्थित खेळाडूंमध्ये तरी स्पर्धा झाल्या कि नाही?
--माझ्या माहिती नुसार परिक्षक मंडळ व प्रतिस्पर्धी तेथे होते परंतू स्पर्धक आलेच नाहीत. म्हणून मग उपस्थित स्पर्धक विजयी ठरवण्यात आले.

शासनाच्या नोकरीसाठी जर गरीब घरातील मुली खेळत असतील तर त्यात त्यांची चूक किती व परिस्थितीचा दोष किती?
--मला तरी चूक वाटत नाही. अनेक सुयोग्य तरुण्/तरूणींना डावलून आरक्षाणाच्या नावाखाली सुस्थापित घरातल्या नालायकांना नोकर्‍या मिळतात. तर मग खेळाडूंना का नको? स्पर्धक आले नसतील तर आलेल्या खेळाडूंचा दोष नाही. तसेच जर नोकरीच्या आशेने अनेकानेक मुले/मुली खेळावर लक्ष केंद्रित करु लागली तरी ते चांगलेच आहे. त्याने स्पर्धा वाढेल व चांगले नवीन खेळाडू देशाला मिळतील.

काही पालक वयात येणार्‍या मुलींच्या तब्येतीस जपण्यासाठी त्यांना खेळू देण्यास नकार देत असावेत. माझी माहीती ऐकीवच आहे. मुलींच्या शारिरीक व मानसीक सुरक्षिततेचा प्रश्नही नाकारता येत नाही.
--हा प्रश्न आहेच. हे हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. तसेच या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी खेळाचे वातावरण बदलायला हवे. तसेच जनजागरण सुद्धा व्हायला हवे. जेणेकरून पालकांच्या मनातली भिती दूर होईल.

आपला,
(चिंताक्रांत पालक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रियाली's picture

18 Sep 2008 - 8:26 pm | प्रियाली

माझ्या मुलाच्या शाळेत अनेक पालक त्यांच्या मुलांना व मुलींना सॉकरच्या क्लासला पाठवतात ते केवळ त्या खेळाच्या वेडापायी (आपल्याकडच्या क्रिकेट्च्या वेडाशी याची तुलना होवू शकेल).

अमेरिकेत सॉकर इतका प्रसिद्ध आहे हे मला माहित नव्हते. मला वाटत होतं की फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉल हेच खेळ अमेरिकेत प्रसिद्ध आहेत.

रेवती's picture

18 Sep 2008 - 4:17 am | रेवती

आपल्या पुतणीचे कांस्यपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन!

रेवती

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 8:17 pm | भास्कर केन्डे

आपले "अभिनंदन" तिच्यापर्यंत पोचवतो.

आपला,
(कबूतर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रियाली's picture

18 Sep 2008 - 8:32 pm | प्रियाली

भास्करराव,

परिस्थिती वाईट आहे हे माहित होतेच परंतु अनुभव वाचून आणखीच वाईट वाटले. खेळांतील अनास्था चीड आणण्याजोगीच आहे. भारतात ही परिस्थिती लवकरच बदलेल असे म्हणणे धारिष्ट्याचे वाटते. परंतु अधिक विचारांती असे वाटते की -

खेळात प्रावीण्य मिळवणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी लागणारे कष्ट, पैसे आणि वेळ भारतासारख्या देशाला आणि त्यातील मध्यमवर्गाला परवडण्यासारखा नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एखादा सचिन तेंडुलकर बनतो हे मान्यच आहे पण सचिन तेंडुलकर एखादाच असतो हेही लक्षात घेण्यासारखे आहे. दुर्दैवाने असेच म्हणावे लागेल की भारताची परिस्थिती अद्याप खेळांना पोषक नाही, त्यामुळे वाईट वाटले तरी अचानक बदलापेक्षा हळू हळू परिस्थितीत बदल होणे योग्य वाटते.

आपल्या पुतणीचे अभिनंदन, तिला म्हणावं की खेळ सुरू ठेव. नोकरी वगैरे चांगलेच आहे पण ऑलिम्पिक्समध्ये जाण्याची मनिषा ठेव.

देशात दोन-चारशे विद्यार्थिनी खेळाडू म्हणून येऊ शकत नाहीत? चांगल्या(?) शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आठवड्याची सुटी घेऊन कितीतरी पालक शाळांत खेटे घालत असतात.

दोन्ही गोष्टींत खूप तफावत आहे. खेळ आणि खेळाडू, त्यांचे खाणे-पिणे, वेळा सांभाळणे, त्यांच्यासाठी आपला वेळ देणे, त्यांचे टाईमटेबल ठेवणे, वक्तशीरपणा (खेळाडू आणि पालक दोघांचा), पैसे खर्च करण्याची तयारी या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. भारतातील मध्यमवर्गाला न परवडणार्‍या. खेळाडूचे आयुष्य ते किती? परदेशांत त्यांना अनेक सोयी, सुविधा, नोकरीच्या संधी आहेत. भारतात काय? शिक्षण सोडून आणि क्रिकेटचा खेळ सोडून इतर खेळ खेळत राहणार्‍या मुलांचे भविष्य काय? त्यांना उपलब्ध संधी कोणती? असे अनेक प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यास मुले किंवा पालक पुरेसे नाही. संपूर्ण यंत्रणा बदलण्याची गरज आहे आणि ते सहजी शक्य वाटत नाही.

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 9:40 pm | भास्कर केन्डे

त्यांना उपलब्ध संधी कोणती?
--प्रियाली ताई, भारतात खेळाडूंसाठी जेवढ्या संधी आहेत त्या सुद्धा खेळाडूंच्या अभावी रिकाम्याच राहतात. त्यामुळेच तर मी अनुशेषाबद्दल बोलतोय.

आपल्याला प्रत्येक वेळी ऑलम्पिक संघात पाठवायला चांगले खेळाडू सुद्धा मिळत नाहीत. कारण तिथे पाठवायला लायक असणारे खेळाडू त्यांच्या बालपणापासून हेरुन त्यांना तयार करण्यासाठी लागणारे भगिरथ प्रयत्न करणार कोण? खेळाडू घडवण्यासाठी पैसे देवून सुद्धा खेळाडू नाहीत हो अशा बोंबा मारणारे भ्रष्ट मंडळे?

आपला,
(अनुशेषी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रियाली's picture

19 Sep 2008 - 12:09 am | प्रियाली

अहो, खेळाडूंना सरकार नोकर्‍या देते हे खरे पण कोणत्या नोकर्‍या? फार उच्चपदस्थ नोकर्‍या नसाव्यात. त्यातून किती उत्पन्न मिळते कोणास ठाऊक. कदाचित, म्हणूनच नोकरीच्या अमिषाने आलेली काही गरीब खेळाडू तिथे असावेत पण अशा खेळाडूंना खेळाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न असावाच. मध्यमवर्गीयांत हल्ली तशीही सरकारी नोकरीत राम नाही म्हणण्याची फॅशन आहे. ;) त्यापेक्षा सरळसोट अभ्यास करून डॉक्टर-इंजिनियर झालात तर उत्तम असा मध्यमवर्गीय पालक विचार करतील नाहीतर काय!

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 12:20 am | भास्कर केन्डे

अहो प्रियाली ताई, असे काय म्हणताय? अगदी वर्ग एक पासून ते चतूर्थ श्रेणीपर्यंत सगळ्या सरकारी नोकर्‍यांत खेळाडूंना राखीव जागा असतात. आजकाल खाजगी कंपन्या सुद्ध अस्थापणात खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवतात.

किती डॉक्टर इंजिनिअरांकडे वयाच्या ३०व्या वर्षी शहरांमध्ये स्वत:चा (बँकेचा नाही) फ्लॅट असतो? मात्र भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूला मिळतो का नाही? आणी दर वर्षी शेकडो खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी असते.

या संधींची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचवली जात नाही हा भाग मात्र निराळा. पण श्रीमंत (पोटा पाण्याची चिंता नसलेल्या) वा गरीब (गमवायला आहे तरी काय अश्या) घरातील मुलांव्यतिरिक्त मध्यमवर्गाला सुद्धा आकर्षित करण्याची ताकद खेळांमध्ये आहे हे नक्की.

आपला,
(खेळ पुरस्कर्ता) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रियाली's picture

19 Sep 2008 - 12:24 am | प्रियाली

अहो प्रियाली ताई, असे काय म्हणताय? अगदी वर्ग एक पासून ते चतूर्थ श्रेणीपर्यंत सगळ्या सरकारी नोकर्‍यांत खेळाडूंना राखीव जागा असतात. आजकाल खाजगी कंपन्या सुद्ध अस्थापणात खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवतात.

प्रथमश्रेणीतील नोकर्‍या मिळत असतील तर उत्तम आहे. असे असेल असे मला वाटले नव्हते पण तरीही वशिल्याचे काय? त्या प्रथमश्रेणीच्या नोकरीत खरंच गरीबांच्या पोरांचा नंबर लागेल असं वाटत नाही हो. म्हणूनच मी उपलब्ध संधी म्हणत होते, नोकरी नाही.

चक दे पाहून तर आणखीच वाईट परिस्थिती असावी असे वाटते.

भास्कर केन्डे's picture

19 Sep 2008 - 12:32 am | भास्कर केन्डे

हो, परिस्थिती वाईट आहे पण चांगले मार्ग पूर्ण बंद नाही झाले आजून. तसे तर मग डॉक्टर-इंजिनिअर होणे तरी कोणते सोपे आहे? आणि त्यातही यशाचे प्रमाण (शाळेपासून ध्यास धरणारे पाल्य-पालक ते सुस्थापित डॉक्टर-इंजिनिअर) किती आहे?

खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण लक्षात घेतल्यास खेळांची तयारी केल्यास डॉक्टर-इंजिनिअर बनन्यासाठी सुद्धा मदतच होते असे मला वाटते.

आपला,
(क्रिडाप्रेमी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

तिला खेळ चालू ठेवायला सांगा पण डोळसपणे मोठ्यांचे पाठबळ असू दे. पुढे खेळातून जाणार्‍या करियरच्या वेगवेगळ्या वाटा आतापासूनच बघून ठेवा (जसे फिजिओथेरपिस्ट).
सर्व फक्त खेळावर अवलंबून नको. अजून ती चैन भारतासारख्या ठिकाणी परवडणारी नाही हे कटू सत्य!

परिस्थिती अशीच होती आणि अजूनही फार बदललेली नाही! मी एकेकाळी ज्यूदो खेळायचो (१९८० च्या आसपास). त्यावेळी जिल्हास्तरावर निवड होऊन काही स्पर्धा खेळलो होतो. साधारणपणे तीनेक वर्षे खेळलो.
धडधडीतपणे चालणारी वशिलेबाजी (अगदी १२-१४ वर्षाच्या मुलांना सुद्धा लक्षात येईल इतके उघड उघड), मनाजोगे ड्रॉ काढून कच्चे प्रतिस्पर्धी हुडकून त्यांच्याशी वशिल्याचे खेळाडू खेळवणे, मुलांची खोटी वजने नोंदवून आडदांड मुलांना खालच्या गटात खेळवून पदकांची लूट असले प्रकार पाहून खेळायचे सोडले! दाद मागणे अशक्य असते. कोणीही ऐकून घेत नाही. अक्षरशः अरेरावी करुन गप्प बसवतात. कित्येकदा प्रशिक्षकांमधेच हातघाईची जुंपण्याचे प्रसंग अनुभवले आहेत.

कारणे अनेक. प्रचंड लोकसंख्या त्यामुळे एकाला थोडे यश मिळाले की शंभरजण तेच करायला धावतात आणि मग त्यात साम, दाम, भेद, दंड सगळे प्रकार होणे अटळ!
प्रशिक्षणाच्या नावाखाली मिळणार्‍या शासकीय सवलती आणि पैसे लाटण्याची चटक ही अधिकार्‍यांनाच असते. आपल्या नातलगांची वर्णी लावून वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रिपा घडवून आणणे हा मुख्य उद्देश असतो.
(प्रत्यक्ष बघितलेला एक अनुभव - जलतरणातला स्त्रियांचा संघ जिल्हास्तरावर निवड होऊन पुण्याला राज्य स्पर्धेसाठी जातो. स.प. कॉलेजच्या तलावावर सकाळी एंट्री देऊन संघ पहिले राउंड खेळतो. अर्थातच सगळे हरतात. सर्व किट गुंडाळून प्रशिक्षकासह सगळे 'खेळाडू' सरळ तुळशीबागेत! येण्याजाण्याचे पैसे आणि भत्ता जिल्हा क्रिडा समितीकडून पदरात पडलेला असतो. करा मज्जा! कसले ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पहाताय?)

चतुरंग

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 9:34 pm | भास्कर केन्डे

पुढे खेळातून जाणार्‍या करियरच्या वेगवेगळ्या वाटा आतापासूनच बघून ठेवा (जसे फिजिओथेरपिस्ट).
--आमचा याबद्दल विचार/अभ्यास चालू आहे. यातून आतापर्यंत निघालेले निष्कर्षः
सध्या इंग्रजी (पैसेवाल्या) तसेच इतरही श्रीमंत शाळांचे पेव फुटलेले आहे. त्यांना खर्‍या स्पर्धा खेळलेले कोच हवे असतात. व त्या जागा सध्या तरी बर्‍यापैकी रिकाम्याच आहेत.
--खेळाडू महिलांसाठी सैन्यात, पोलिसांत, सरकारी नोकर्‍यांत असणार्‍या जागा बहुतेक वेळा भरल्या जात नाहीत. तेव्हा आमच्या पुतणीच्या भविष्याची चिंता सुटलेली आहे.
--परंतू त्याही पुढे आमचा सध्या असा विचार आहे की जर तिने खरेच पुढेही अशीच प्रगती चालू ठेवली तर तिला एक मस्त ट्रेनिंग सेंटर सुरु करुन द्यावे. सुदैवाने कर्ज व खिशातले काही टाकून हे आजघडीला तरी शक्य वाटते आहे. ती मोठी झाल्यावर पाहू यात परिस्थिती कशी बदलत जाते ते.

धडधडीतपणे चालणारी वशिलेबाजी (अगदी १२-१४ वर्षाच्या मुलांना सुद्धा लक्षात येईल इतके उघड उघड), मनाजोगे ड्रॉ काढून कच्चे प्रतिस्पर्धी हुडकून त्यांच्याशी वशिल्याचे खेळाडू खेळवणे, मुलांची खोटी वजने नोंदवून आडदांड मुलांना खालच्या गटात खेळवून पदकांची लूट असले प्रकार पाहून खेळायचे सोडले! दाद मागणे अशक्य असते. कोणीही ऐकून घेत नाही. अक्षरशः अरेरावी करुन गप्प बसवतात. कित्येकदा प्रशिक्षकांमधेच हातघाईची जुंपण्याचे प्रसंग अनुभवले आहेत.
--- ही वा यापेक्षाही भयान वस्तुस्थिती खुद्द अभिनव बिंद्रानेच व्यक्त केली. त्याने आपल्या हालकट/पाजी/नालायक ऑलम्पिक समितीला खूप दोष दिले व त्याच वेळी पुण्यात निर्लज्जपणे कलमाडी नागरी सत्काराचा आनंद लुटत होते. पण या सगळ्या घाणेरड्या प्रकारांशी झुंजण्याची तयारी आम्ही करत आहोत. ईश्वराने तेवढे पाठबळ द्यावे हीच प्रार्थणा!

आपला,
(लढवय्या) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 10:55 pm | विसोबा खेचर

रंगाचा प्रतिसाद पटण्याजोगा...!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

18 Sep 2008 - 9:49 pm | प्रभाकर पेठकर

मागील पीढीत खेळाडू किंवा खेळांचे महत्त्व जाणणारे तुलनेने कमी होते. भविष्या बद्द्ल भीती आणि असुरक्षितता मनात बाळगणारे सर्वत्र होते. असे पालक त्याच मानसिकतेतून खेळाला कमी आणि अभ्यासाला, डिग्रीला, जास्त महत्त्व देतात. पालकांनाही त्या साठी विशेष दोषी मानता येणार नाही. ते 'त्या' मुशीत घडलेले आहेत.
जस जसे खेळाला महत्त्व येत जाईल, नव्या युगातील नव्या विचारांचे तरूण बंडखोर होऊन खेळाला समर्पित होतील तस तसे 'खेळाडू' वाढतिल, मानसिकता बदलेल, आणि त्याचा फायदा पुढच्या पिढ्यांना होईल.
सरकार कडून काही ठोस प्रबोधन होणे गरजेचे आहे. तसेच, तशा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे मला वाटते.