पायवाटा

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
8 Mar 2016 - 10:45 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

"तुम्हाला कसा प्रवास आवडतो? स्वप्नातल्या गाडीतून घाटातल्या अवघड रस्त्याने किंवा सहा-आठ पदरी मोठ्या महामार्गाने? ऐन पावसाळ्यात दुचाकीने घाटातले धबधबे बघत थांबत की रखरखत्या उन्हात डोंगर दर्‍यात भटकायला? बाहेर बर्फ पडत असताना रेल्वेत उबदार वातावरणात बसून ते क्षण टिपायला की तंत्रज्ञानाची निसर्गाशी सांगड घालत उंचावर नेऊ शकणार्‍या रोपवेने?" असे कितीही पर्याय दिले तरी त्यातून हमखास एक असा निवडणे कोणाच भटक्याला जमण्यासारखे नाही. कारण यातल्या प्रत्येक प्रकाराची वेगळी गंमत आहे. स्वतःच्या गाडीने प्रवास करताना अनपेक्षित स्थळांना भेट देणे हा सुखद अनुभव, पण त्यातला एकसूरीपणा नको असेल तर बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास हवा ज्यात लोक भेटतात, कधी त्यांच्या वागण्याचा वैताग तर कधी त्यातून उमगलेली माणसं! विमानाचे सततचे प्रवास कंटाळवाणे होतात तरीही पहिला विमानप्रवास हे आकर्षण असतंच. याच फिरण्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पायी भटकंती! मग ते जंगलात ट्रेक साठी असो, गावाबाहेरच्या लहानशा डोंगरातला ट्रेल असो की एखाद्या महानगराच्या उंचच उंच इमारती बघत गल्लीबोळा शोधत तुडवलेले रस्ते असोत. हिरवीगार वनराई, त्यात पक्ष्यांसाठी लोकांनी बांधून ठेवलेली घरं, त्यापलीकडे दूरवर डोंगरावर लपाछपी खेळणारा सूर्य, कधी अचानक ढग येऊन बरसलेल्या सरी आणि मग आडोसा शोधताना दिसलेल्या लाकडी झोपड्या, पक्ष्यांची किलबिल, पानगळीच्या ऋतूत आपल्याच पायांमुळे होणारा जमिनीवरच्या पानांचा आवाज आणि शरद ऋतूतले विविधरंगी झाडं, कधी 'साद घालती हिमशिखरे'ची आठवण करून देणारी पर्वतरांग, मधूनच उगवलेली रानफुलं, युरोपातील महानगरात तिथल्या इमारतींमधून डोकावणारा इतिहास, कडाक्याच्या थंडीत नाताळसाठी सजलेले शहर, नदीकाठच्या रस्त्याने प्रिय व्यक्तीसोबत केलेला वॉक असे अनेक क्षण या पायी फिरतीने आजवर अनुभवायला मिळाले ज्यांनी भटकंतीत पायी फिरती हवीच असं प्रत्येक वेळी मनावर ठसवलं. कूठल्याही नवीन ठिकाणी जाताना तिथल्या फिरतीच्या नियोजनात या पदभ्रमंतीसाठी काही वेळ/दिवस जमेल तसे राखून ठेवायला हवेत हे अशा प्रत्येक भटकंतीनंतर नव्याने वाटतंच आणि तसं केलंही जातं. अशाच काही क्षणांना उजाळा देताना पोतडीतून बाहेर पडलेल्या या आठवणी.

हायडेलबर्ग हे असंच एक जर्मनीतलं असंच एक अतीव सुंदर शहर, कुणीही प्रेमात पडेल असं. शनि-रवि कंटाळा आला तर सहज जाऊ शकू इतकं आम्हाला जवळ. तिथे अनेक वेळा नेकर नदीच्या काठाने चालत जायचं, तिथला प्रसिद्ध किल्ला बघण्यासाठी चढत जायचं, उन्हाळ्यात आईसक्रीम खायचं, तिथल्या जुन्या शहरात फेरफटका मारायचा, व्हायोलिन किंवा कुठलंही वाद्य वाजवत तिथे हमखास कुणीतरी असतं ते सूर ऐकतच सूर्यास्त बघून परत यायचं हा तसा नेहमीचा उद्योग झाला होता. तसं हे काही फार मोठं शहर नाही. पण इथे प्रत्येक वेळी फिरताना काहीतरी नवीन सापडायचं आणि त्यामुळे कितीही वेळा पाहिलं तरी तिथे जाण्याचा कधी कंटाळा आला नाही, अजूनही येत नाही. वर्षभर कुठल्याही ऋतूत हे पर्यटकांनी गजबजलेलं असतं. या शहराबद्दल खूप काही लिहिता येईल पण तो या लेखाचा विषय नाही. या शहरात असे पायी भटकताना टिपलेले हे काही क्षण - (यात शहरातली मुख्य प्रेक्षणीय स्थळं नाहीत)

.

.

.

.

.

.

पण हे सगळं म्हणजे काही कुठले ट्रेल-ट्रेक नव्हते. इल्लुसे डोंगर चढायचे इतपतच माझी मजल होती. असंच एकदा र्‍हाईन (Rhein) नदीच्या काठावरच्या र्‍युडेसहाईम (Ruedesheim) या गावात गेलो होतो. टुमदार कौलारू घरं, नदीकाठाने जाणारा रस्ता आणि डोंगरावर द्राक्षांची शेती. या डोंगरावर जाताना केबल कार मधून खाली डोंगरात फिरणारे हे लोक असे चित्र दिसले आणि एकदम वॉव, सही, हे असं काही आपण केलं नाहीये असं वाटलं.

.

"आपण पुन्हा इथे येऊयात हे असं फिरायला?" या माझ्या अति उत्साहातल्या वाक्यावर नवर्‍याने 'हीच का ती, जी इतर वेळी ट्रेकला जायचं नाव काढलं की "नको, मी धडपडेन, मला जमणारच नाही, मला भीतीच वाटते" अशी अनेक कारणं देत असते' अशा आविर्भावात दुर्लक्ष केलं. हा उत्साह पुढे फार टिकेल असं त्याला अजिबात वाटलं नाही. पण मस्तपैकी शेतातून जाणारा साधा सरळ रस्ता आणि शिवाय माझ्यासारख्या कच्चा लिंबु व्यक्तीला सहज जमेल असं मला वाटत होतं. माझ्या डोक्यात हे दृष्य अगदी फिट्ट बसलं होतं. तसंही एरवी पुण्यात 'चल मेरी स्कुटी' म्हणत गावभर फिरायची जरी सवय होती, इथे येऊन गाडी हा प्रकार बंद झाल्याने धावत पळत जाऊन बस, ट्राम पकडणे, ग्रोसरीसाठी पायी जाऊन सामान घेऊन येणे आणि हायडेलबर्ग आणि अशाच काही गावातून दमत भागत का असेना थोडेसे डोंगर चढणे इतपत तरी पायी चालायची सवय मला लागली होती. आता प्रत्यक्षात मात्र असे रस्तेच असतील असं अजिबात नाही, व्यवस्थित चढ उतार असलेले डोंगर, दगड, माती हेही असणारच. पण तरीही ही 'किंचित' पळापळ सुद्धा मला मी मस्तपैकी डोंगरात चालू शकेन, ट्रेल्स करू शकेन असं निदान भासवत होती.

तर पुढच्या अशाच एका सहलीत पहिल्यांदाच ब्लॅक फॉरेस्टला जायचं ठरलं. जरा बघुयात तिथे काही ट्रेल्स असतील तर म्हणून शोधायला सुरूवात केली. तेव्हा आंतरजालावर जी काही माहिती दिली होती, त्यावरून बराच अंदाज आला. तरीही आपण सुरूवातीला जरा दमानं घेऊ म्हणून जमेल तसं एका तळ्याकाठी फिरूयात असं ठरलं. या ३ दिवसांच्या सहलीत ब्लॅक फॉरेस्टच्या कुठल्याही घाटातल्या रस्त्यात मध्येच जंगलात गाड्या पार्क करून मग पायी फिरायला जाणारे अनेक लोक दिसले. यात लहान मुलं, म्हातारी माणसं सगळे होते. आमच्या प्लॅन मध्ये इतका वेळ नव्हताच, पण ते सगळं दृश्य बघून उत्साह वाढला होता. मग शेवटच्या दिवशी ठरलेल्या जागी आलो ते म्हणजे श्लुकसे. आणि या तळ्याकाठच्या रस्त्याने निवांतपणे ३-४ तास फेरफटका मारला. अगदी तुरळक गर्दी, दूरवर पसरलेले हे सरोवर, त्यामागची डोंगर रांग, तळ्याकाठची फुलं, बाजूनेच धावणारी झुकझुकगाडी हे सगळं बघण्यासाठी, शांततेनी अनुभवण्यासाठी असा राखीव वेळ ठेवायलाच हवा यावर शिक्कामोर्तब झालं.

.

.

.

आता यात काही फार मोठे तीर मारले नव्हते. किमान १०-१२ किलोमीटर तरी हवे आणि थोडा तरी चढ उतार असावा तर याला काहीतरी पायी फिरणे म्हणता येईल. पण निदान एका जागी न बसता किंवा हे ठिकाण बघून लगेच न निघता या ३-४ तासांनी दिलेला अनुभव छान होता, अर्थातच सवय नसल्याने थकवणारा सुद्धा. मग विकांताला जवळच्या काही ३-४ किलोमीटरच्या छोट्या ट्रेल्स वर जायला सुरूवात केली. ही काही प्रेक्षणीय स्थळं नव्हती. पण निसर्गाशी जवळून संवाद साधायला ही किती चांगली संधी आहे हे कळलं. लोकांना घराबाहेर पडून चालायला, सायकल चालवायला अशा अनेक जागा सरकारने राखीव ठेवल्या आहेत, त्या मेंटेन केल्या आहेत आणि लोकांनीही त्याचा पुरेपुर फायदा घेतला आहे हे यानिमित्ताने लक्षात आले. त्यात हिवाळ्याचे ४-६ महिने बाहेर पडणं इतकं कमी होतं की जरासा सूर्य दिसला की बाहेर पडा असं हे जर्मन लोक का करतात हेही इथल्या वर्षभराच्या वास्तव्यात उमगलं.

मग अशा नवनवीन जागा शोधून फिरायला जाणं हा छंद झाला. त्यात समान आवडीचे मित्र मैत्रिणी मिळाले आणि उत्साह अजून वाढला. आता हिवाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येक शनी–रवि हवामान बघून काही ना काही बेत आखले जातात. कदाचित इतक्या सुंदर सूर्यप्रकाशात फिरायला जाण्याची ही शेवटची संधी असं म्हणत हे बेत पटापट पक्केही होतात. शिवाय चांगला व्यायाम होतो हा एक तेवढाच महत्वाचा फायदा. सुरुवातीला ६-८ किलोमीटर हा आकडा बघूनच दमायला व्हायचे, आता सवयीने १५ किलोमीटर सुद्धा सहज पार करता येतात. ज्या सरळसोट रस्त्याने मला भुरळ घातली होती, तसे रस्ते नकोसे होऊन मातीच्या पायवाटा आणि डोंगर चढ उतार जास्त आवडायला लागलेत.

यात काही वेळा गमतीशीर अनुभवही येतात. एकदा असंच आंतरजालावर वाचून एक ट्रेल शोधला. 'पॅनारोमा वे' असं या ट्रेलचं नाव होतं आणि जिथून सुरूवात होणार होती त्या जागेवर १०० लहान धबधबे आहेत असं लिहिलेलं होतं. धबधबे असं सांगितलं असेल आणि शोधून सुद्धा काही मोजके झरे सापडत असतील तर काय वाटेल? जगात कुठेही गेलो आणि तिथल्या कितीही गोष्टींची कौतुकं केली, तरी जेव्हा जेव्हा भारतातल्या आठवणी येतात, तेव्हा मात्र जिथे तिथे "मेरा भारत महान" असे वाटतेच हे आजवर अनेक वेळा अनुभवलं आहे. गप्पांमध्ये हळूहळू हे धबधबे(?) मागे पडले आणि चक्क मोठा रस्ता सुरू झाला. सहसा अशा ठिकाणी काहीतरी माहिती दिली असते. पण इथे काही दिसेना. थोडीशी नाराजी, चिडचिडही होऊ लागली की एवढ्या लांब येऊन प्रत्यक्षात वेगळेच दिसते आहे. तेवढ्यात एक आजी-आजोबा दिसले. त्यांना विचारले तर ते म्हणाले "जरा पुढे जा या रस्त्याने, मग पुन्हा डोंगरातला रस्ता चालू होईल, लिहिलेलं आहे तसं" आजोबांच्या सूचनेप्रमाणे गेलो आणि मग मात्र एकेक डोंगर चढायचा, परत उतरायचा, त्या डोंगरांवर असलेली द्राक्षांची शेती, विविध रानफुलांनी दिलेलं दर्शन, दूरवर दिसणारी तुरळक वस्ती, ती कौलारू टुमदार घरं, लपाछपी खेळणारा सूर्य, अगदी द्राक्षांच्या शेतातही मधोमध लावलेली फुलझाडं, काही ठिकाणी संपुर्ण डोंगरभर पसरलेली पांढर्‍या फुलांची झाडं हे सगळंच दृश्य अप्रतिम होतं. पॅनारोमा वे हे नाव सार्थ करणारा हा मार्ग होता. ब्लॅक फॉरेस्ट चा निसर्गरम्य परिसर अगदी जवळ असल्याने तिथल्या अशा अनेक पायवाटा तुडवता आल्या. आणि फक्त तिथेच नाही, तर जर्मनीत इतरही अनेक ठिकाणी फिरताना शोधले असता अशा जागा ठिकठिकाणी आहेत हे समजले. कुठेही असलो, तरी जवळच्या ५०-१०० किलोमीटर अंतराच्या आत अशा अनेक जागा असतात आणि त्या सगळ्याची माहिती आंतरजालावर दिलेली असते. त्यामुळे सहज जाता येतं.

सहज फिरताना अचानक कुठेतरी उगवलेली ही मश्रुम्स दिसतात.
.

बरेचदा तिथल्याच मोठ्या दगडांचा उपयोग दिशादर्शक म्हणून केलेला असतो.
.

हिवाळ्याच्या सुरुवातीला झाडांवर दवबिंदू असतात, तर पानगळीच्या ऋतूत जागोजागी पानांचा खच पडलेला असतो. प्रत्येक ऋतूप्रमाणे दिसणारे हे बदल आपल्याला निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जातात.

.

.

.

कधी या अशा चित्रातल्या जागा आपली वाट बघत असतात.
.

.

काही लोकांच्या प्रेम प्रदर्शनातून कुठलीच जागा, कुठलाच देश सुटत नाही याचं हे उदाहरण.

.

एकाच प्रकारच्या ट्रेलमध्ये विविध रुपांचा आस्वाद कसा घेता येईल याचा विचार करून, तसे मार्ग आखून त्याची काळजी घेणे, तिथे सगळीकडे दिशादर्शक लावणे, या सगळ्याची अद्ययावत माहिती आंतरजालावर उपलब्ध करून देणे ज्यात कुठला ट्रेल किती कठिण आहे, किती चढ उतार आहेत, जवळ बस, ट्रेन इत्यादीची काय सोय आहे हे सगळं, शिवाय या निसर्गाच्या सोबतीने अधून मधून बसायला केलेली जागा, त्यातही दाखवलेली सुबकता आणि तरीही शक्य तेवढा नैसर्गिक रुपांकडे दिलेला भर, वेळोवेळी दिसणार्‍या कचरापेट्या या सोयींमुळे हा प्रवास क्वचित काही अपवाद वगळता कुठेही वैतागवाणा होत नाही. जे बघायला आपण आलेलो आहोत, त्याचा पुरेपुर अनुभव घेता येतो. अगदी लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा अनेक जण फिरत असतात. लहान बाळांना स्ट्रोलर मध्ये ठेवून नेण्यासारख्या पायवाटा सगळीकडे असतात. ज्यांची मुलं चालू-पळू शकतात, त्यांना तर अशा ठिकाणी मनसोक्त खेळायला वाव असतो. याच अनुभवांमुळे स्वित्झर्लंडमधल्या भटकंतीत प्रवासी स्थळं बाजूला ठेवून त्याऐवजी असे दिवसभराचे ट्रेल केले आणि ते मनसोक्तपणे अनुभवले.

अशा या प्रवासात अनेकदा फिरायला आलेले बरेचसे आजी आजोबा दिसतात. नवीन चेहरे बघून कधी कौतुकाने हसतात, कधी चुकून कुणी इंग्रजीतून देखील बोलतात. या लोकांचा ७०-८० व्या वर्षी हा उत्साह बघून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. या सगळ्यात थोडी खंत जाणवते की या शेतात, गावात माणसं क्वचित दिसतात. शेतातली बहुतेक कामे यंत्राने होत असली तरीही शेत म्हंटले की भारतातले शेतकरी आठवतात. या देशाच्या निसर्गाचं संवर्धन करणारी, जपणूक करणारी ही लोकं, त्याचं जीवनमान समजून घेणं हा देखील अशा प्रवासातला आनंदच भाग असतो जो इथे तेवढ्या सहज जमत नाही. पण या सगळ्या मागचे त्यांचे कष्ट मात्र नक्कीच दिसतात. गायी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यांच्याशिवाय आपली भारतातली शेती अपूर्ण आहे आणि ते आहे म्हणूनच कदाचित ते जास्त जीवंत वाटतं. माझ्या गावातून बाहेर पडताना दिसणारी तुरीची, कपाशीची शेतं आणि त्यात अजूनही दिसणारी बुजगावणी, भर पावसात कोकणातल्या लाल मातीत भातपेरणी करणारी माणसं, कुठे झाडाला झोळी बांधून एकीकडे काटक्या उचलणारी बाई आणि धोतर टोपी घालून बैलांना हाकणारे शेतकरी अशी अनेक दृष्य जी लहानपणापासून डोळ्यासमोर आहेत ती पुन्हा बघण्यासाठी मन हळवं होतं हेही खरं.

मार्च महिना आला की सगळीकडे वसंताची चाहूल लागते आणि कधी एकदा बाहेर भटकंतीचे दिवस सुरु होतील यावर बेत ठरू लागतात. सलग ५-६ महिन्यांच्या ब्रेक नंतर सूर्य आपली उपस्थिती ठळक पणे दाखवू लागतो. फुलांचा बहर जागोजागी लक्ष वेधून घेऊ लागतो. त्यात युरोपीयन लोकांचे फुलांवरचे आणि एकूणच निसर्गाबद्दलचे प्रेम जगप्रसिद्ध आहेच. गावातल्या प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर, घरात, खिडकीत जागोजागी फुले दिसू लागतात. आणि त्या फुलांप्रमाणेच लोकांचा उत्साह देखील ओसंडून वाहू लागतो. यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे चेरी ब्लॉसम. साधारण ३ ते ४ आठवडे फक्त ही फुलं बहरतात. अनेकांच्या घरासमोर, बागांमध्ये दुरूनही या फुलांचा गोड गुलाबी रंग लक्ष वेधून घेतो. या चेरी ब्लॉसम बद्दल जपानमधील साकुराच्या रूपाने वाचले होते, फोटो बघून 'अहाहा' असे उद्गार काढले होते. पण तेव्हा याची व्याप्ती जगभर पसरली आहे हे माहिती नव्हते. पण ही झाडे इतरत्रही पसरली आहेत. वसंत ऋतूच्या सुरुवातीला ही फिकट गुलाबी रंगाची नाजूक आणि सुरेख फुले चेरी च्या झाडांना दिसू लागतात. यातील काही झाडे ही बरेचदा केवळ सुशोभीकरणाच्या उद्देशाने लावलेली असतात, त्यांना चेरीचे फळ येईलच असे नाही. देशांप्रमाणे आणि दरवर्षीच्या हवामाना प्रमाणे बहर कधी येणार हे बदलते. अजून माहिती शोधली असता असे कळले की हा अशा प्रकारचा ब्लॉसम चेरी सोबतच बदाम, पीच, प्लम अशा इतरही झाडांना येतो. यातली चेरीची झाडं ही डेरेदार असतात आणि फुलं सारखीच दिसत असली तरीही तुर्‍यांमध्ये किंचित फरक असतो. याउलट बदामाची ही झाडं अगदीच लहान असतात. इथे साधारण मार्च महिन्यानंतर २ आठवडे हा गुलाबी रंग सर्वत्र पसरलेला असतो. बहुतेक ठिकाणी जवळच्या कुठल्यातरी बागेत ही अशी अनेक झाडं एकत्र बघायचा योग येतो. पण त्याशिवाय काही भागात असे काही 'गुलाबी रस्ते' आहेत जे जिथे दुतर्फा ही गुलाबी रंगात बहरणारी झाडं लावलेली आहेत. मधून चारचाकीसाठी रस्ता आणि त्यापालीकडून खास पायी चालणार्‍यांना म्हणून रस्ता आहे. बाजूला दूरवर दिसणारी छोटी छोटी गावं, त्यात उठून दिसणारे चर्च आणि पुढ्यात असलेली द्राक्षांची शेती हे विलोभनीय दृष्य. 'शाम गुलाबी, सेहेर गुलाबी' अशी गाणी इथे बसूनच सुचली असावीत का असा प्रश्न पडतो. हा प्रदेश वाईन साठी प्रसिद्ध असल्याने अधून मधून वाईनची दुकानं थाटलेली असतात आणि नितांत सुंदर वातावरणात एका हातात वाईन ग्लास घेऊन शेतात लोक बसलेले असतात. विशेष कौतुकास्पद हे की कुणीही ही फुलं तोडत नाहीत, मग ती अगदी लहान मुलं असोत की वयस्कर लोक.

या ठिकाणी जाताना आम्हाला जवळचा असा जो रस्ता होता तिथे जाताना मध्ये लागलेलं हे गाव -

.

सोबत नकाशे होतेच, शिवाय गुलाबी रंगाच्या फुलाचे चित्र असलेले स्टिकर्स अनेक झाडांवर लावले होते की जे दिशादर्शक म्हणून काम करत होते. साधीशीच गोष्ट, पण ज्या कलात्मकतेने, मूळ निसर्गाला कमीत कमी धक्का लावून ती केली की ती अजून आवडते हे नक्की.

ही काही चेरीची झाडं -

.

.

आणि ही बदामाची -

.

.

.

.

अशा आजवरच्या अनेक ठिकाणांनी कायमस्वरुपी मनात घर केलंय. या गावाबाहेरच्या डोंगरात, शेतात आणि निसर्गाच्या जवळ जाणार्‍या रस्त्यांसोबतच विविध शहरात फिरतानाही असे अनेक अनुभव या पायी फिरण्यातून मिळाले. नाताळच्या उत्सवी वातावरणात, कडाक्याच्या थंडीत बर्लिन मध्ये फिरताना अशी पायी भटकंती केली तेव्हा इतिहासाच्या खुणा सतत भेटत होत्या. व्हेनिस सारख्या शहरात तर तसेही फक्त लहान सहान गल्ल्याच सगळीकडे, अधून मधून पाण्याचे कालवे आणि त्यावरचे पुल, हातात नकाशा घेऊन पाय तुटेपर्यंत फिरून अनुभवलेलं ते शहर आजही तसंच आठवतंय. पॅरिसमध्ये फिरताना आलेली मुंबईची आठवण, लंडनमधला एकटीने केलेला प्रवास, अ‍ॅमस्टरडॅमला चुकलेले रस्ते, व्हिएन्नात फिरताना दिसलेले स्थापत्यशास्त्राचे उत्तमोत्तम नमुने आणि बुडापेस्टला नदीकाठाने चालताना ज्या ठिकाणी ज्युंना मारण्यात आले त्या जागेवर थबकलेले पाय, अशाच कुठल्याशा इमारतीच्या खिडकीतून डोकावणारी सुरकुत्या पडलेली आजी, तिथल्या खिडक्यांमधून डोकावणार्‍या फुलांमधून दिसलेली लोकांची आवड अशी न संपणारी आठवणींची यादी...

या प्रत्येक ठिकाणांच्या आठवणी अधिक प्रिय झाल्या त्या या पायवाटांनी. जुन्या घराचा रस्ता कसा आपुलकीचा वाटतो, तसं काहीसं नातं तयार होत असावं या रस्त्यांशी, डोंगरांशी. पुन्हा कधीही त्याच रस्त्याने जाण्याचा योग आला तर त्या मातीशी बहुदा जास्त जवळीक वाटत असावी, जणू काही आपलेच ठसे तिथे कायमस्वरूपी उमटलेत. अशाच क्षणांना आठवत त्यातल्या मोजक्या आठवणी या निमित्ताने कागदावर उतरल्या...अजून अनेक अशाच पायवाटांच्या प्रतीक्षेत...

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 11:49 am | सस्नेह

जर्मनीच्या पायवाटा अतिशय सुरेख आहेत. लेखनही छान.

गिरकी's picture

8 Mar 2016 - 2:08 pm | गिरकी

खूप आवडल्या पायवाटा !

पद्मावति's picture

8 Mar 2016 - 2:28 pm | पद्मावति

या पायवाटा पाहून चालण्याचा कंटाळा असणार्‍याला सुध्धा चालण्याचा मोह होईल. फोटो आणि लेख दोन्हीही मस्तं.

प्रशांत's picture

8 Mar 2016 - 3:01 pm | प्रशांत

लेख आणि फोटो मस्तच, हायडेलबर्ग सुद्धा

सुंदर लिहले आहेस.. तो castle किती छान आहे. स्वाती ताईने एक जागा शोधुन दिली आणि आता हि अजुन एक.. आम्हाला ह्या उन्हाळ्यात बरेच ऑपशन्स मिळाले आहेत. ;)

पिशी अबोली's picture

9 Mar 2016 - 5:03 pm | पिशी अबोली

सुपर्ब!
मला तर उंच, हिरव्या डोळ्यांचा, व्हायोलीन वाजवणारा आणि अशा पायवाटांच्या आसपास राहणारा जर्मन नवराच पाहिजे बुवा! ;)

पैसा's picture

9 Mar 2016 - 5:40 pm | पैसा

कसलं भारी लिहिलंय!

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 7:09 pm | नूतन सावंत

या पायवाटा पाहून चालण्याचा कंटाळा असणार्‍याला सुध्धा चालण्याचा मोह होईल.

असेच म्हणते.
"चराती चरतो भग:" म्हणतात ते काही खोटे नाही.पायी चालताना अशा काही अनवट जागा मिळतात की ते भाग्य फक्त चालणाऱ्याच मिळते.
लेख खूपच आवडला,पुढच्या मार्चमध्ये जर्मनीची सहल ठरवावी असे वाटायला लागलेय.

अजया's picture

9 Mar 2016 - 9:34 pm | अजया

खूप आवडली पायवाट.

कविता१९७८'s picture

9 Mar 2016 - 10:56 pm | कविता१९७८

छान लिहिलयस

कविता१९७८'s picture

9 Mar 2016 - 10:56 pm | कविता१९७८

छान लिहिलयस

अनन्न्या's picture

11 Mar 2016 - 6:34 pm | अनन्न्या

फोटो आणि लेख दोन्हीही मस्त!

एक एकटा एकटाच's picture

11 Mar 2016 - 6:52 pm | एक एकटा एकटाच

एकच वाक्य

जबरदस्त

मधुरा देशपांडे's picture

15 Mar 2016 - 2:32 pm | मधुरा देशपांडे

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार!!
पिशी, चालेल. शोध मोहीम चालू करते मी लगेच. :)

नीलमोहर's picture

15 Mar 2016 - 3:06 pm | नीलमोहर

सुरेख पायवाटा..
आनंद आणि हेवा दोन्ही एकाच वेळेस वाटले.

वैदेहिश्री's picture

15 Mar 2016 - 3:55 pm | वैदेहिश्री

अप्रतिम फोटो. लेख वाचला नाही पण फोटो बघून आधीच प्रतिसाद द्यावासा वाटला. लेख वाचून सविस्तर प्रतिसाद देईनच.

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2016 - 5:38 pm | स्वाती दिनेश

आता लवकरच हवा चांगली होईल, वसंताचे आगमन होऊ घातले आहेच.. अशा पायवाटांवरून फिरायचे दिवस आता जवळ येऊ लागले आहेतच, :)
लेख छानच!
स्वाती

सुमीत भातखंडे's picture

15 Mar 2016 - 5:42 pm | सुमीत भातखंडे

आवडलं हायडेलबर्ग.

रायनची आई's picture

16 Mar 2016 - 11:44 am | रायनची आई

वॉव मधुरा..आता मार्च चालू आहे.. आतापण तिथे असच असेल ना सगळ गुलाबी गुलाबी..प्रसन्न वाटल फोटो बघून..आपल्या मुम्बई च्या आसपास असे ऑप्शन नाहित फारसे पायी भटकंती ला जायचे :-(

जुइ's picture

17 Mar 2016 - 2:16 am | जुइ

त्यात चेरीच्या झाडांचा बहर विशेष आवडला Cherry spring

पायवाटा भारीच..फोटो सुरेख.