जुले चद्दर

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in विशेष
8 Mar 2016 - 12:08 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

प्रस्तावना - "ट्रेकला जायचं?" असा प्रश्न कधीही आणि कुठेही विचारला गेला तरी "चला, मी तयार आहे" असं हमखास उत्तर मिळतं ते या प्रकाराचं वेड असलेल्यांकडून. अशातलीच एक म्हणजे मुग्धा. गेल्या २.५ वर्षांपासून माझी आणि मुग्धाची ओळख झाली. एकत्र फिरणे, विकांताला ठरवून काहीतरी खादाडीचे बेत करणे, अशा अनेक निमित्ताने वरचेवर भेट होऊ लागली. आमच्या गप्पांच्या ओघात मुग्धाकडून तिचे अनेक ट्रेक्स, त्यातल्या गमती जमती याबद्दल खूप ऐकले होते आणि त्यातले काही कहर किस्से ऐकून मी गमतीने "यावर लिहायला हवे इतके महान किस्से आहेत हे" असेही म्हणाले होते. त्याच वेळी कधीतरी 'चद्दर ट्रेक' हा विषय सुद्धा झाला आणि हा ट्रेक करायचाच आहे, तोही येत्या २ वर्षात असेही ती म्हणाली होती. आणि एक दिवस "यावेळी भारतवारीत आम्ही चद्दर ट्रेक करतो आहोत" हे आम्ही ऐकले. मुळात भारतात कमी दिवस मिळतात, त्यात तुम्ही १०-१२ दिवस घरी नसणार ट्रेक मुळे हा आमचा पहिला प्रश्न होता. पण 'इच्छा तेथे मार्ग' या उक्तीप्रमाणे खरंच तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आणि सोबतीने तिचा नवरा कैलास, म्हणजेच आमचा मित्र हे दोघेही ट्रेकचे बुकिंग कन्फर्म करून पुढची माहिती काढत होते. म्हणता म्हणता त्यांचे जायचे दिवस आले, आणि त्याच वेळी एकीकडे भटकंती अंकाची तयारी चालू होती. त्यामुळे मग आता चद्दर ट्रेक बद्दल लिहुयात हा विचार मनात आला. मुग्धाला इथे स्टेशनपर्यंत सोडायला गेलो तेव्हा "माझ्या अंकासाठी तरी सुखरूप परत या" असे गमतीने म्हणत हॅपी जर्नी केले. आणि ठरल्या दिवशी "सुखरूप पोहोचलो" असा मेसेज आला. ट्रेक करण्याची मुग्धाची इच्छा किती तीव्र होती हे माहिती होते, त्यामुळे ट्रेक झाला याचा आम्हालाही तेवढाच आनंद झाला आणि अर्थातच अंकातल्या एका धाग्यावर शिक्कामोर्तब झाले. मग गप्पांमध्ये चद्दर हाच मुख्य विषय झाला. आणि त्यातूनच त्यांचा हा प्रवास उलगडत गेला. तर आता जाणून घेऊ तिच्याकडून या ट्रेक बद्दल -

ट्रेकिंगची तुझी सुरुवात कशी झाली?
मी पुण्यात असताना अनेक निमित्ताने विविध ट्रेक केले होते. यात मग जवळचा सिंहगड असो किंवा पुण्याजवळचे इतर नेहमीचे किल्ले, ट्रेकिंगची ठिकाणं हे सगळंच आलं. नंतर ट्रेक हा प्रकार खूपच जिव्हाळ्याचा झाला. काही दिवस झाले आणि कुठे डोंगर दर्‍यात गेले नाही तर मला करमत नाही. मग समान आवडीच्या काही मैत्रिणींसोबत महाराष्ट्राबाहेरचे ट्रेक केले. यात गोवा जंगल ट्रेक, उत्तर - दक्षिण भारतातले काही ट्रेक्स केले.तो वेगळा अनुभव मिळाला. आणि ट्रेकिंगचा हा छंद मग असाच वाढत राहिला.

चद्दर ट्रेक बद्दल माहिती कुठून मिळाली? तिथे जायलाच हवं असं का वाटलं?
सतत भारतातल्या आणि आता इथल्याही (जर्मनी आणि युरोप) ट्रेक बद्दल गुगल करत बसणे हा माझा आवडता टाईमपास आहे. वर म्हणाले त्याप्रमाणे भारतातले ट्रेक्स करताना हिमालयात ट्रेकिंग हा एक विचार नेहमीच डोक्यात होता. असंच कधीतरी चद्दर ट्रेक बद्दल वाचलं होतं. ते वाचतानाच 'इथे जायलाच हवं' हे सतत वाटायचं. पण काही वर्षांपूर्वी चौकशी केली तर अंदाजे खर्च ८०,००० रुपये - लेह ते लेह असा होता. ही किंमत बघूनच हे त्या वेळी परवडणारे नव्हते. पण तरीही चद्दर ट्रेक डोक्यात बसला होता. त्यात मागच्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग मुळे कदाचित येत्या काही वर्षात इथे ट्रेकिंग अवघड होईल असे वाचले. मग पुन्हा याबद्दल चौकशी केली. त्याच वेळी त्यांनी ट्रेकच्या स्वरुपात जे काही बदल केले, त्यामध्ये अंतर कमी करून खर्चही आता आमच्या आवाक्यातला होता. मग अधिक माहिती शोधायला सुरूवात केली.

चद्दर ट्रेक बद्दल थोडक्यात माहिती सांग.
झंस्कार नदी हिवाळ्यात पूर्ण/काही प्रमाणात गोठते आणि त्यावेळी या भागातले इतर सगळे रस्ते हिमवर्षावाने बंद असतात. गोठलेली ही नदी हा या भागात राहणार्‍या लोकांना लेहला जाण्यायेण्याचा एकमेव मार्ग आहे. तिथले निसर्ग सौंदर्य बघणे, अनुभवणे आणि आपल्याला अशा ठिकाणांची अजिबात सवय नसल्याने तिथे राहणे हा सगळा भाग आपल्यासाठी ट्रेक म्हणून एक अ‍ॅडव्हेंचर आहे. तर तिथल्या लोकांसाठी हा रस्ता आहे, त्यांच्या जीवनमानाचा एक भाग आहे. याच खडतर मार्गाने इथली शाळकरी मुलं हिवाळ्यात ये-जा करतात. गोठलेल्या नदीवर जणू ही बर्फाची चादर पांघरली जाते, म्हणून चद्दर हे नाव. जेव्हापासून पर्यटकांसाठी हा 'चद्दर ट्रेक' म्हणून प्रसिद्ध होऊ लागला, त्यानंतर आता इथल्या झंस्कारी लोकांचा हा हिवाळ्यातला रोजगाराचा हा एक महत्वाचा पर्याय आहे. साधारण जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अशा ठराविक कालावधीतच हा ट्रेक करता येतो.
३ प्रकारे हा ट्रेक करता येतो.

* लेह ते नेराक (Neyrak) - ९ दिवस
* लेह ते लिंगशेड (Lingshed) - ११ दिवस
* लेह ते पाडम (Padum) - १५ दिवस

पूर्वी फक्त लेह ते पाडम हा एकमेव पर्याय होता. त्यात खर्च जास्त, वेळ जास्त आणि प्रवास जास्त खडतर यामुळे प्रचंड शारिरीक तयारी लागायची. अशा प्रकारच्या ट्रेकिंगची सवय असलेले लोकच सहसा इथे यायचे. नंतर इतर २ पर्याय असल्याने आता पर्यटकांची गर्दी वाढली. आम्ही यातला ९ दिवसांचा ट्रेक निवडला होता.

बुकिंग कसे केले? खर्च किती आला
जानेवारी आम्हाला एकंदरीत जमेल असं वाटत होतं. माहिती शोधताना एका मुलीचा ब्लॉग वाचण्यात आला. तिच्या ब्लॉग मध्ये तिने तिच्या ऑर्गनायझरची माहिती दिली होती. त्याच्याशी संपर्क केला, तेव्हा मग त्याने सविस्तर माहिती आणि तारखा कळवल्या. आम्हाला आधी इथून भारतात जायचं बुकिंग बघायचं होतं, तसं सुट्ट्यांचं नियोजन केलं. आणि लेह ते लेह असं बुकिंग पक्कं केलं. आमचे दोघांचेही कुटुंब पुण्यात असल्याने ट्रेकच्या तारखा बघून पुणे-लेह-पुणे असे विमानाचे बुकिंग केले. आणि शेवटी इथून भारतात जायचे केले. अर्थात कुठल्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती किंवा हवामान अयोग्य असेल तर रद्द होऊ शकतो याचीही कल्पना होती आणि त्यामुळे थोडी भीती होतीच. पण सतत मनातून सकारात्मक विचार करत होतो की असे काही होणार नाही आणि आम्हाला ट्रेकला जाता येईल. लेह ते लेह असा ९ दिवसांचा खर्च प्रत्येक माणशी २०,००० रुपये होता. यात तिथली सगळी व्यवस्था ते करणार होते. आम्हाला लेह मध्ये राहायचं असेल तर तो खर्च आमचा करायचा होता.

यासाठी तुम्हाला तुमच्या भारतातल्या सुट्टीची तडजोड करावी लागणार होती. मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होत?
वर्षातून एकदा आम्ही तिथे जाणार आणि त्यातलेही १०-१२ दिवस ट्रेकला जाणार हे कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा मला अंदाज आला होता. त्यातही हा ट्रेक इतर ट्रेक पेक्षा बराच कठिण आहे, त्यामुळे भीतीपण होती. त्यातून माझी नोकरी नवीन असल्याने मला ट्रेक वगळता घरी फक्त ५ दिवस मिळणार होते. हे ऐकल्यानंतर तर घरच्यांनी "आता तुला जे करायचंय ते कर, आम्ही काही बोलतच नाही" असेच ठरवले. मलाही घरी राहायला, भारतात अजून वेळ घालवायला आवडतंच, पण हा ट्रेक काही सहजासहजी इतर वेळी होणार नव्हता. त्यामुळे घरच्यांसोबत राहणे, भारतातली खाद्य भ्रमंती, मित्र-मैत्रिणींना भेटणे, शॉपिंग यावर थोडी तडजोड केली, घरच्या सगळ्यांना समजावलं आणि अखेर ट्रेक पूर्ण झाला.

जाण्यापूर्वी काय तयारी केली?
तयारी खरं तर अजून करायला हवी होती. म्हणजे आम्हाला ट्रेक मध्ये त्रास काहीच झाला नाही, स्टॅमिना व्यवस्थीत पुरला. पण जेवढं जास्त तुम्ही शारीरीक मेहनत घ्याल, अधिक सक्षम व्हाल तेवढं चांगलं. २-३ वेळा इथे असताना जवळचे ट्रेक केले, पण तेव्हा इथलाही हिवाळा चालू व्हायचा होता. त्यामुळे थंडीत दिवसभर बाहेर राहण्याची सवय नव्हती झाली.
तयारीतला महत्वाचा भाग म्हणजे थंडीसाठी कपडे आणि इतर साहित्य. तिथले तापमान -३५ पर्यंत देखील जाऊ शकतं. त्यादृष्टीने लेयर्स मध्ये कपडे घालावे लागतात. काही सामान त्या लोकांनी आम्हाला दिलं. तरीही आमच्याकडे लेयर्स मध्ये घालता येतील अशी जॅकेट्स, हातमोजे, पायमोजे, शुज, औषधांचा साठा, आणि वरचेवर खायला चालेल असा खाऊ असं एका बॅकपॅक मध्ये बसेल एवढं सामान होतं. ऑक्सिजन कमतरतेमुळे ईतक्या उंचीवर जो त्रास होऊ शकतो, त्यासाठी काही गोळ्या, कापूर हे देखील होतं. मी स्वतः होमीओपॅथी डॉक्टर असल्याने होमीओपॅथीच्या गोळ्या घेतल्या होत्या. आमच्यापैकी कुणालाही त्रास झाला नाही. तळपाय गरम राहण्यासाठी मोज्यांना चिकटतील असे हीटपॅक्स मिळाले होते तेही घेतले. आम्ही लेह मध्ये गम बुट घेतले. बाकी बरंचसं सामान जाताना घेऊन गेलो होतो. खाण्याची सोय ते लोक करणार होते. स्लिपिंग बॅग, त्यातले लायनर्स, तिथले तंबू हे सगळं त्या लोकांनी दिलं होतं.

आता सुरुवातीपासून ट्रेक बद्दल सांग. कुठून सुरुवात झाली? रोजचा दिवस कसा असायचा? हवामान कसं होत?
आम्ही पुण्याहून आधी दिल्लीला गेलो. तिथून पुढे लेह ला जायचे होते. आणि लेह्ला आधी एक दिवस राहून मग ट्रेक चालू करायचा होता. लेह मधला मुक्काम मुख्यत्वे उंची आणि थंडीशी जुळवून घ्यायला. इथे आम्हाला आमचा टुर ऑर्गनायजर भेटला. आम्हीही पहिल्यांदाच लेह पाहिले. लेह फार फार सुंदर आहे आणि आपल्या लष्कराने उत्तम ठेवले आहे. पण आम्हाला तिथे फारसा वेळ मिळाला नाही. आम्ही तिथल्या मार्केट मध्ये जाऊन थोडी खरेदी केली, जी ट्रेकसाठी आवश्यक होती. आमच्यासोबत माझी पुण्यातली एक मैत्रीण आणि तिचा नवरा हे दोघं होते. नंतर तिथेच एक दिल्लीची मुलगी आणि एक साठीचे काका भेटले. तिथे एक दिवस घालवून मग सगळे लोक सोबत आधी मिनीबसने निघालो.

.

लेह पेक्षाही तापमान हळूहळू कमी होऊ लागलं. आमच्या ग्रुप मध्ये आम्हा ६ जणांसोबत अजून १० मदतनीसांची टीम होती. खरं वाटणार नाही पण हो, दहा लोक होते. यातले ७ जण सोबत पोर्टर्स म्हणून, १ आचारी, २ गाईड, त्यापैकी एक मुख्य आणि एक मदतनीस असे लोक होते. सर्वसाधारणपणे एका ट्रेक ग्रुप मध्ये १०-१६ लोक असतात. पण आमच्यातल्या काहींनी ऐन वेळेवर बुकिंग कॅन्सल केलं. त्यामुळे आम्ही फक्त ६ जण होतो. काही तासांच्या प्रवासानंतर झंस्कार नदी दिसू लागली. नंतर काही वेळाने मग ठरलेल्या ठिकाणी उतरून पुढे खरा ट्रेक चालू झाला.

.

.

त्या लोकांनी आम्हाला खबरदारीच्या सूचना दिल्या. पूर्वी जशी पूर्ण पात्रात चद्दर तयार व्हायची आणि अक्खं पात्र गोठायचं, ते गेल्या काही वर्षात कमी झालं आहे. त्यामुळे बाजुने बर्फ असतो त्यावरून चालायचं आणि जर एखाद्या ठिकाणी बर्फ नसेल तर बाजुने डोंगरावरून जायचं. रोज साधारण १०-१५ किलोमीटर चालावं लागायचं. पहिल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी आलो. अंधाराच्या आत तिथे पोहोचणं आवश्यक होतं. खरं तर त्यांनी रोजच्या मुक्कामाची त्या खेड्यांची नावं दिली आहेत, पण प्रत्यक्षात ती लोकवस्ती तिथून बरीच लांब असायची. त्या लोकांना हे सवयीचं असतं. त्यामुळे जिथे तंबू बांधायला योग्य जागा असेल तिथे ते बरोबर थांबायचे.

.

.

तंबू बांधून ते लोक जेवणाच्या तयारीला लागायचे. सामानात त्यांनी स्टोव्ह, केरोसीन सगळं ठेवलं होतं. थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाणी किंवा चहा द्यायचे. मग एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालायची. त्यांच्यातलेच काही जण जाऊन लाकडं तोडून आणतात म्हणजे ती जाळून आजूबाजूला गरम वाटत राहतं. तिथेच तात्पुरती स्वच्छतागृह बांधायचे. कडाक्याच्या थंडीत जेवून मग स्लिपिंग बॅग मध्ये झोपायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून थंडीत कुडकुडत नंबर लावून प्रातर्विधी आटोपायचे. पुन्हा चहा नाश्ता व्हायचा. आंघोळीला स्कोपच नव्हता. आणि मग निघायचं. सकाळी त्या थंडीत त्या स्लिपिंग बॅग मधून बाहेर येणे, सगळीकडे जमलेला बर्फ झटकणे ही कामंच फार मोठी वाटायची.

.

.

.

.

.

एक गाईड नेहमी आमच्या पुढे आणि एक मागे असायचा. बाकीचे लोक सगळं सामान स्लेजवर टाकून ते ओढत पळत आमच्या पुढे जाऊन मुक्कामाच्या जागी पोचून तंबू बांधायचे आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागायचे. जिथे अवघड वाट असेल, चढ किंवा मोठे खडक असतील, तिथे हे लोक थांबून आम्हाला मदत करायचे. हे तर प्रचंड कौशल्याचं काम आहे. जिथे लहान कपारीतून मार्ग असेल आणि बर्फ किती ठिसुळ आहे याचा अंदाज नसेल, तर ते लोक आधी त्यावरून जायचे, मग आम्हाला सांगायचे की कशा प्रकारे येता येईल. तेव्हा भीतीही वाटायची, पण जीवनमरणाचा प्रश्न असेल तर आपोआप जमतात काही गोष्टी तसे आम्ही ते या लोकांच्या मदतीने जमवले.

.

.

.

रोज अंदाजे दिनक्रम हा ठरलेला होता. पहिले ४ दिवस झाले. नशीबाने हवामान खूप चांगले होते. थंडी रात्री -३० पर्यंत होती पण पाऊस नव्हता. पावसात किंवा स्नो झाला असता, एखादं वादळ आलं असतं तर वाट लागली असती. पाचव्या दिवशी मात्र आम्ही पुढे गेलो नाही. आमच्या ट्रेकमध्ये त्या दिवशी पुढे जाऊन मुक्काम करुन मग परतायचे होते. पण तिथे जातानाच आमच्यासमोर ठिसूळ बर्फावरून पाय घसरून लोक पडले, त्यात पाणी वाहत होतं आणि आम्ही थोडे घाबरलो. पाण्यात पडलो असतो तर काही खरं नव्हतं. पुढचा भाग बघण्यासारखा होता. बराच वेळ विचार केला, जे काही ठरवायचं ते अक्ख्या ग्रुपला ठरवावं लागतं, काही पुढे जातील काही थांबतील असं चालत नाही. त्यामुळे आम्ही बर्‍याच विचारानंतर एकमताने पुढे जायचं नाही या निर्णयावर आलो. आणि आधीच्या कॅम्पला परत गेलो.

मग तो दिवस तिथेच थांबून पुन्हा परतीचा प्रवास चालू झाला. गेलो त्याच रस्त्याने परत आलो. ठरल्या ठिकाणी आम्हाला पिकअप साठी मिनि बस आली आणि मग लेहला परत आलो. तिथून मग पुन्हा दिल्ली मार्गे पुणे आणि म्हणता म्हणता इथे जर्मनीत परत येऊनही महिना झाला.

तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था काय होती?
खाण्यापिण्याबद्दल खरं तर आम्हाला सुखद धक्का बसला. इतक्या थंड ठिकाणी आणि तेही एका गोठलेल्या नदीवरून लोकवस्ती नसलेल्या दुर्गम ठिकाणाचा ट्रेक. त्यामुळे आमची मानसिक तयारी तशीच होती की जे मिळेल ते खायचं. पण प्रत्यक्षात इतकं वेगळं घडलं की आमचा विश्वास बसत नव्हता. हा ट्रेक जेवढा इतर बाबींसाठी आठवणीत राहील तेवढंच लक्षात राहील ते या झंस्कारी लोकांनी खाऊ घातलेले पदार्थ. सकाळी गरम चहा, भरपेट नाश्ता, दुपारचे जेवण आणि परत रात्रीचं जेवण हे ते लोक करायचे. त्यासाठी सोबत स्टोव्ह, केरोसीन सगळं असतं. बरं फक्त वरण भात किंवा फक्त पोळी भाजी नाही, रोज २ भाज्या, डाळीचे प्रकार जे शिजायला वेळ लागतो, काहीतरी सलाड आणि गोड सुद्धा. शिवाय विविधता हवी म्हणून कधी पास्ता, खास लडाखी पदार्थही करायचे. यात रेडी टू कुक किंवा फ्रोझन सामान कमीत कमी. बरं छोले वगैरे शिजायला वेळ लागतो, पण त्यांनी तेही केलं. पोहे केले. ते असेच कुणी मराठी लोक आले होते त्यांना विचारून, शिकून ते करून खाऊ घालणे हे विशेष आहे. शेवटच्या दिवशी तर कहर होता. एका मडक्यात काहीतरी बांधलेलं दिसलं. म्हणून मी विचारलं "आज काय बिर्याणीचा बेत का?" तर तो म्हणाला "वो सरप्राईज है." आणि प्रत्यक्षात होता केक. त्यावर अगदी चद्दर ट्रेक असं लिहिलेलं सुद्धा. आम्ही रोज थक्क व्हायचो आणि शेवटच्या दिवशी तर आमच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. हे अगत्य कायम लक्षात राहील.

.

अजून या ट्रेकमधले इतर अनुभव?
या ट्रेक मध्ये आम्ही बरेचदा धडपडलो. पण आमच्यापैकी कुणालाही त्रास असा झाला नाही आणि काही दुखापत झाली नाही हे महत्वाचं. गंमत अशी की फार फोटो काढता आले नाहीत. जिथे आम्ही ब्रेक घ्यायचो, तिथल्या ठिकाणचे २ फोटो कसेबसे काढायचो. त्या थंडीत तो कॅमेरा बाहेर काढा, मग फोटो काढा वगैरे इच्छाच नसायची. आणि एका जागी जास्त वेळ उभं राहू शकत नाही, पाय गोठायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी नावाला काही फोटो आले. चांगलं लोकेशन बघून फोटो काढायचे असं न होता जिथे थांबलो ते आमचं लोकेशन आणि थरथरत्या हातांनी फोटो काढायचा असं झालं.

तिथून आकाश फार सुंदर दिसतं. रात्रीच्या वेळी चांदण्या बघणं हे सुख असतं. एकदा तर बहुतेक एक सॅटेलाईट दिसला असं वाटलं. रात्री झोपताना मध्येच दगडं पडल्याचे आवाज यायचे. नदीच्या पाण्याचा खळखळाट तिथल्या शांततेत अजून जाणवायचा. भीती वाटत नव्हती पण तरीही आपण कुठे झोपलो आहोत याची जाणीव झाली की थोडं वेगळं वाटायचं.

त्या भागात झाडी अजिबात नाहीत. आणि हिमालय हा मूळ ठिसुळ आहे खूप. ती माती वेगळीच आहे आणि तिथले लोकही. ते लोक निसर्गाच्या या अनेक आपत्तींना सरावले आहेत. ट्रेक जिथून सुरू होतो, तिथे जाताना एका ठिकाणी दरड कोसळून आम्हाला ४ तास थांबावं लागलं. पण त्यांच्यासाठी हे इतकं नेहमीचं आहे की त्यात त्यांना काहीच विशेष वाटले नाही. पुढेही ते लोक अक्ख्या ट्रेक मध्ये काधेही खंतावलेले दिसले नाही, कंटाळा तर नाहीच. सतत आम्हाला मदत करणार आणि त्यात मी काही विशेष केलं असं कुठेही दाखवणार नाहीत. त्यांनी आमचे खायचे किती लाड केले हे सांगितलंच. शिवाय एवढी मेहनत असूनही त्यामानाने त्यांना मोबदला कमी मिळतो. आम्हाला एवढं आग्रहाने खाऊ घालून ते लोक मात्र उरलेलं जेवण असेल तेवढंच खायचे. हे लक्षात आल्या नंतर आम्ही शक्यतोवर त्यानाही मिळेल असं बघायचो. पण तरीही त्यांचा 'आप खाओ पेटभर' म्हणून आग्रह चालूच असायचा. त्यांच्याकडे त्यांच्यासाठी असे विशेष साहित्यही नव्हते. आम्ही परत येताना जे आमचं सामान होतं ते सगळं त्यांना दिलं, तर ते म्हणे तेही आपापसात वाटून घेतात, ज्याला खरी गरज असेल त्याप्रमाणे. पूर्वी या भागात स्नो लेपर्ड्स दिसायचे. याच भागात या लोकांच्या मदतीने त्याकाळी काही प्रसिद्ध छायाचित्रणकारांना त्या स्नो लेपर्डने दर्शन दिले आणि नंतर ते छायाचित्र अत्यंत दुर्मिळ म्हणून प्रसिद्ध झाले. अशा कित्येक कलाकारांना हे लोक पडद्यामागे राहून मदत करतात.

ज्यादिवशी आम्ही परत फिरलो, त्यादिवशी त्यांना लाकडं शोधायला मदत करूयात म्हणून आम्ही पण सोबत गेलो. आम्ही २ तास चाललो तेव्हा मोजून ४-६ झाडं दिसली आणि त्यांच्या दृष्टीने ते जंगल होतं. रोज ते लोक किती जास्त खपायचे याची तेव्हा अजून कल्पना आली.

.

ही चद्दर अर्थात झंस्कार नदी ही त्यांची देवता आहे. रस्त्यात आम्हाला ठिकठिकाणी डाळ दिसली. मग कळलं की ही त्यांची या देवतेप्रती पुजेची पद्धत आहे. रस्ताभर जाताना ते अधून मधून डाळीचे दाणे वाहतात. नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत, ही नदी अशीच राहावी म्हणून प्रार्थना करतात. असं वाटतं की जणू काही आम्ही फक्त तिथे गेलो, त्या लोकांनी आम्हाला हात धरून फिरवलं आणि ट्रेक पूर्ण झाल्याचं सांगितलं इतकी त्या लोकांची साथ महत्वाची होती.

त्यांच्याशी बोलताना जाणवलं की हे लोक शिकलेले आहेत. त्यांच्यातल्या एकाची बहीण डॉक्टर आहे असे त्याने सांगितले आणि त्याच्या गावात प्रॅक्टिस करते. इतर वेळी हे लोक शेती करतात किंवा अशाच इतर ठिकाणच्या पर्यटकांना गाईड म्हणून जातात. सतत घरापासून दूर राहतात. पर्यटकांशी जुळवून घ्यायला ते लोक सतत तयार आहेत आणि सेवेत तत्पर आहेत.

आम्ही शेवटच्या दिवशी जे परत फिरलो, तर नंतर कधीतरी वाटायचं की पुढे जायला हवं होतं, पण तिथे पडलो वगैरे असतो कुठे तर काहीही होऊ शकतं हा विचार करून ते टाळलं.

आमच्यासोबत जो मैत्रिणीचा नवरा होता, तो व्हेगान आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची बंधनं आणि अगदी प्राण्यांपासून तयार झालेलं जॅकेटही नको असा त्याचा पहिले सूर होता. पण नंतर मात्र त्याने ट्रेक पुरते हे सगळे बाजूला ठेवलं आणि आम्हाला हायसं वाटलं. सोबत जे एक काका होते, ते गेली १५ वर्ष नेहमी लेहला येतात, महिनाभर राहतात. ते आर्टिस्ट आहेत, जगभरात फिरतात. पण या ट्रेकला पहिल्यांदाच येत होते. त्यांच्याशी बोलताना त्यांचेही विविध अनुभव ऐकायला मिळाले. त्यांनी सांगितलं की लेहच्याच अजून दुर्गम भागात काही खेडी आहेत जिथे मूळ आर्यन्स राहतात असं म्हणतात. तर एकदा एका जर्मन मुलीला हे कळलं आणि मग ती तिथे जाऊन राहिली. बाहेरून येणार्‍या लोकांमध्ये जर्मन्स, रशियन्स बरेच आहेत शिवाय इतर युरोपियन्स, अमेरिकनही आहेत. भारतातले अनेक तरूण मुलं मुली आहेत. एक तर ग्रुप दिसला जे सगळे सांगलीचे लोक होते आणि सगळे ज्येष्ठ नागरिक होते, बहुतांशी ६०-६५ वर्षांचे आणि उत्साहाने फिरत होते. अशा लोकांचं कौतुक वाटतं.

लेहमध्ये आणि इतरही भारतीय लष्कराचे काम हे निव्वळ महान आहे. त्या लोकांमुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या ठिकाणी फिरणे शक्य आहे. जिथे १० दिवस राहताना आपल्याला इतकं वेगळं वाटतं, तिथे हे लोक आपल्या कुटुंबापासून कितीतरी दूर, अनेक अडचणींचा सामना करत राहात आहेत. हे सगळं आधी माहिती असलं, तरीही तिथे जाऊन ते समोर दिसतं. त्यांनी ठेवलेली स्वच्छता दिसते. आणि त्यांच्याप्रती आदर अजून दुणावतो.

त्या लोकांचा पर्यटकांचा अनुभव कसा आहे याबद्दल काही बोलणं झालं का?
जसे नियम पाळणारे लोक असतात तसेच ते तोडणारे सुद्धा. त्यामुळे बरेचदा या लोकांना पर्यटकांचा त्रास सहन करावा लागतो. त्यातही आमचा गाईड म्हणाला की मराठी लोक सहसा व्यवस्थित असतात, दिल्ली किंवा उत्तर प्रदेशीय लोकांचा जास्त त्रास होतो. हे लोक तिथल्या अति थंड पाण्यात जातील. अनवधानाने अपघात होऊ शकतात, होतातच. पण स्वतःहून काही लोक त्यात जातात. जवळपास वैद्यकीय सुविधा काही नाही. मग लेह मध्ये जरी नेलं तरी तिथे लष्कराचा दवाखाना. तिथे नेहमीचे लोक गेले की त्या लष्कराच्या लोकांना अडचण वाटते. कारण त्यांनाही कमीत कमी सामानात, तिथल्या अवघड परिस्थितीत काम करायचे आहे. पण या गोष्टीला फारसा आपला इलाज नसतो. आपण नियम पाळणे, त्या लोकांच्या कौशल्याला समजुन घेऊन त्यांच्याशी नीट वागणे, भारतीय लष्कराच्या कामाची जाणीव ठेवणे एवढेच आपण करू शकतो.

तुम्ही युरोपातही फिरला आहात आणि भारतातला हा किंवा इतर ट्रेक. यात मुख्य फरक काय जाणवला?
या चद्दर ट्रेक बद्दल बोलायचं झालं, तर मुख्य म्हणजे या झंस्कारी लोकांच्या प्रेमानी आम्ही भारावून गेलो. इतक्या अवघड हवामानात, दुर्गम ठिकाणी त्यांनी ज्या प्रेमाने सेवा दिली ते विशेष आहे. इथे युरोपात वर्षभर फ्रोझन अन्न खाल्ले जाते आणि त्याला पूर्वीच्या थंडीच्या दिवसांची कारणं दिली जातात, बाहेर कुठे फिरायला गेलो तरीही कधीकधी खाण्याचे हाल होतात. पण त्या लोकांनी अशी कुठलीही कारणं न देता हे केले. बरं तिथे असे कळले की जेव्हा अमेरिकन, युरोपियन लोक येतात, तेव्हा त्यांच्यासाठी हे लोक पूर्वी त्यांच्या पद्धतीचे अन्न शिकून तेही करायचे. तिथले अनेक लोक जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषा शिकले आहेत आणि येणार्‍या पर्यटकांच्या सेवेसाठी खूप तत्पर आहेत. त्यामानाने युरोपात सगळं साचेबद्ध आहे. प्रेमाने, जिव्हाळ्याने पेक्षा 'व्यवसाय' म्हणून केले जाते. अर्थात भारतातही अशी ठिकाणं आहेतच जिथे लुबाडणूक होते, ते इथे युरोपात तसे कमी आहे.

हिमालय हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे तो संवेदनशील भागही आहे. आपल्या लष्करामुळे आज निदान या भागात जाणं शक्य आहे आणि सोयी सुविधा करण्यात अजून वाव असला तरीही त्याला मर्यादा आहेत. इथे आल्प्स संपूर्णपणे टुरिजम साठी प्रसिद्ध आहे आणि फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करून या देशांनी तो प्रसिद्ध केला आहे. त्यांच्यावर इतर सुरक्षितता, परकीय आक्रमण हे धोके तेवढे नाहीत. शिवाय हवामान दोन्हीकडे थंड असले तरी हिमालयाएवढे खडतर नाही. त्याचा उत्तम फायदा या युरोपीय देशांनी घेतला आहे.

अजून एक महत्वाचा मुद्दा बाहेरच्या लोकांचा जो आपण शिकायला हवा तो म्हणजे पब्लिक मॅनर्स. इथे कुठल्याही पर्यटन स्थळी बहुतांशी इथले लोक अगदी व्यवस्थित वागतात, कुठेही कचरा फेकत नाहीत. मग त्या स्थळाचा मनमुराद आनंद सगळ्यांना घेता येतो. भारतातही हे लोक येतात तेव्हा मुद्दाम कचरा टाकतील असे होत नाही. पण आपल्याकडच्या पर्यटकांचा माज दिसतो. इथे चद्दर ट्रेकला येऊन इतकं उत्तम खाणं मिळत असताना तक्रारी करणारे लोक आहेत. अगदी गरम अन्नही तिथल्या थंडीत ५ मिनिटात थंड होतं म्हणून लोक तक्रार करतात. शाकाहारी जेवण दिलं तर मांसाहारीच का नाही, मग ते असेल तर कांदा लसूण विरहित जैन अन्नपदार्थ का नाहीत अशा लोकांच्या मागण्या असतात. तिथल्या लोकांना नोकर म्हणून वाईट वागणूक देणारे आपले भारतीय लोकच जास्त आहेत. पाश्चात्य देशातील लोक या अगत्याचं कौतुक करतात. आणि इतक्या किरकोळ तक्रारी करत नाहीत. आमच्यासमोर असे लोक दिसले की ज्यांनी गरम पाण्याचा अर्धा ग्लास प्यायला आणि उरलेलं फेकून दिलं. तिथे ते लोक रोज इतक्या मेहनतीने सामान उचलतात, दूरवरून लाकडं आणतात, गरम पाणी करून देतात आणि लोक निर्लज्जपणे ते फेकतात. कचर्‍याचं तर विचारायलाच नको. युरोपचं निसर्ग सौंदर्य आहेच, पण ते लोक उत्तम मेंटेन करतात. आपल्याकडच्या चांगल्या जागासुद्धा खराब करण्यात लोक फार पुढे आहेत. या अनवट जागेची हळुहळू लोक वाढलेत तशी दुरावस्था होत जाते आहे, तर मग प्रसिद्ध स्थळांबद्दल बोलायलाच नको. मी आधी केलेल्या ट्रेक्स मध्येही हे अनुभवलं आहे आणि लोकांना सांगूनही आपल्यालाच उलट उत्तरं मिळतात हे पण पाहिले आहे. इथे युरोपात जेव्हा फिरले त्यानंतर हा फरक अजून जास्त जाणवला.

आता ट्रेक पूर्ण झाल्यावर काय वाटतंय? तिथे जाण्याची इच्छा असणार्‍यांना काय सांगशील
ज्यांना मनापासून हा ट्रेक करायचा आहे त्यांनी अवश्य करावा. आमची पूर्वतयारी थोडी कमी पडली, त्यामुळे अजून थोड्या तयारीने जायला हवं. अर्थात आम्हाला त्रास झाला नाही ही चांगली गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं, केवळ थ्रिल म्हणून, जगाला दाखवायला म्हणून, ट्रेकिंगची खोटी आवड दाखवायला म्हणून, फक्त फेसबुकीय पोस्ट टाकण्यात, मिरवण्यात आनंद असणार्‍यांनी या अशा ट्रेकच्या वाटेला जाऊ नये. हा फक्त ट्रेक आहे, इथे कितीही सुंदर निसर्ग असला तरीही अशा भीषण थंडीत त्याचा आस्वाद घेता येईलच असं नाही. यासाठी मानसिक तयारी हवी. सरळ कुठेही न बघता, किलोमीटर किती राहिले याचा हिशोब न करता चालत राहायचं. ते पर्वत, बर्फ, तिथले लोक, निळं पाणी, निरभ्र आकाश हे बघून आपण स्तब्ध होतो, पण रोजचं लक्ष्य ठरलेलं असतं. शिवाय तिथल्या पर्वतांवर हिरवाई नाही, तशी कल्पना डोक्यात ठेवायची आणि मग 'इथे काय आहे बघण्यासारखं' असंही लोकांचं होतं. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन रुचत असेल तरच इथे जावं. अगदी शेवटच्या क्षणीही खराब हवामानामुळे ट्रेक कॅन्सल होणे, मधून परतावं लागणे असे काही होऊ शकते. शिवाय एकट्याने मध्येच मागे फिरायची संधी नाही. हे टीमवर्क आहे. सगळ्यांच्या सोबतीने नियम पाळून जायचं. अशा प्रकाराची आवड असेल तर हा ट्रेक तुम्हाला केवळ आनंद देईल आणि परत परत तिथे यावंसं वाटेल.

ही मुलाखत प्रकाशित करायला परवानगी दिली त्याबद्दल मुग्धाचे आभार. तिच्या सोबत ट्रेक करण्यापासून तर या मुलाखतीत माहिती पुरवण्यापर्यंत सतत साथ देणार्‍या कैलासचेही आभार. तुमच्या पुढच्या अशाच अनेक यशस्वी ट्रेक्स आणि प्रवासासाठी तुम्हाला अनाहिता परिवारातर्फे शुभेच्छा!!
(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

मितान's picture

8 Mar 2016 - 7:28 am | मितान

हा लेख मुलाखत वाचताना जगण्यातली सकारात्मकता खूप जाणवली.कितीतरी अनुभवायचं राहिलंय.
मधुरा या लेखनासाठी आभार :)

यशोधरा's picture

8 Mar 2016 - 8:19 am | यशोधरा

हा ट्रेक लिस्टवर आहे. कधी जमतंय, पहायचं. तसा अन्नपूर्णा सर्किटही आहे लिस्टीवर.

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:39 am | जेपी

मस्त

गिरकी's picture

8 Mar 2016 - 11:54 am | गिरकी

सुरेख …. लेख वाचता वाचता पुन्हा तो हिमालय बोलवायला लागला.

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 6:16 pm | प्रीत-मोहर

हे नाव ही लिस्ट मधे अ‍ॅडलय.
सुरेख मुलाखत.
मुग्धा आणि कैलास ला हा अनुभव आमच्यासोबत शेअर एल्याबद्दल धन्यु :)

मुलाखत आवडली मधुरा.. जानेवारी महिन्यात माझी ननंद सुद्धा जाऊन आली चद्दर ट्रेकला. तिचा ९ दिवसांचा ट्रेक होता, पण हवामान बिघडल्यामुळे ७ दिवसातच त्यांचा ट्रेक संपला. मग तिने दिल्लीला येउन आग्रा वैगरे बघितले.

पैसा's picture

9 Mar 2016 - 1:28 pm | पैसा

सॉलिड! असे काही वाचले की बरं वाटतं!

पद्मावति's picture

9 Mar 2016 - 3:15 pm | पद्मावति

खूप सुंदर मुलाखत.
अशा मंडळींचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

मार्गी's picture

9 Mar 2016 - 3:38 pm | मार्गी

बाप रे! अतिशय जोरदार!!!!! आणि अहा हा!!!!

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2016 - 3:54 pm | प्राची अश्विनी

जितके फोटो सुंदर तितकाच ट्रेक कठीण वाटतोय. बहुतेक हे बकेट लिस्ट मध्ये जाईल
बाकी लेख आवडलाच!

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2016 - 4:33 pm | पिलीयन रायडर

खुपच सुंदर मुलाखत! जायला आवडेल नक्की.

सविता००१'s picture

9 Mar 2016 - 4:59 pm | सविता००१

भारी मुलाख्त

प्रियान's picture

11 Mar 2016 - 8:05 am | प्रियान

मधुरा फारच छान लिहितेस तू. जुले चद्दर ची खूप सुंदर ओळख करून दिलीस :)
मुग्धा आणि कैलास चे विशेष कौतुक !

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2016 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

चद्दर ट्रेकबद्दल प्रथमच ऐकले. सुंदर वर्णन आणि फोटो ! फिरायच्या यादीत एक भर पडली आहे :)

बोका-ए-आझम's picture

12 Mar 2016 - 9:32 am | बोका-ए-आझम

लय भारी वो मधुरातै!

जुइ's picture

13 Mar 2016 - 4:03 am | जुइ

मुलाखत आवडली. अशा काहीश्या वेगळ्या ट्रेकची माहिती आवडली आणि हा अवघड ट्रेक करणयार्‍याना मानले. तसेच त्यांच्याबरोबरच्या सपोर्ट ग्रुपचे काम प्रशंसनीय आहे. hiking

किलमाऊस्की's picture

13 Mar 2016 - 5:41 am | किलमाऊस्की

आणि तुझ्या सर्वच प्रतिसादातल्या स्मायलीज अफाट आहेत. स्मायलीजवर घेतलेली मेहनत दिसून येतेय. ;-)

अनन्न्या's picture

14 Mar 2016 - 6:18 pm | अनन्न्या

मुग्धाचे विशेष आभार !!आपले अनुभव फोटोंसह शेअर करून ट्रेकची सविस्तर माहिती दिल्याबद्दल!!

प्रथमच ऐकलं या ट्रेक बद्दल.अफाटच अनुभव..

विभावरी's picture

22 Mar 2016 - 4:12 pm | विभावरी

अतिशय वेगळा ट्रेक आहे हा , तितकाच अवघड आणि धाडसी पण !फोटो तर सुंदरच दिसत आहेत .

आरोही's picture

25 Mar 2016 - 3:02 pm | आरोही

अहाहा !!कसली सुंदर जागा ..नक्की जाणार एकदा ..एवढ्या सुंदर लेखासाठी आभार मधुरा..

सानिकास्वप्निल's picture

28 Mar 2016 - 2:53 pm | सानिकास्वप्निल

मुलाखत खूप आवडली, जुले चद्दर ट्रेकची माहिती आवडली. मुग्धाला अनेक धन्यवाद :)

या झांस्करच्या लोकांना, आपल्या लष्कराला व तुम्हांला सलाम!

चद्दर ट्रेक मिपावर गाजतोय.लेख वाचून करायची फार इच्छा होतेय.