When Ratnagiri Calls अर्थात आमची रत्नागिरी वारी

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in विशेष
8 Mar 2016 - 12:14 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}व

रत्नागिरी, चिपळूण, पावस, गणपतीपुळे ही प्रसिद्ध ठिकाणे याआधीही पहिली होती. पण तरीही रत्नागिरीची ओढ कमी होत नव्हती, कदाचित आमची दोघांचीही पाळंमुळं तिथली आहेत म्हणून असेल. कोकणात जाणाऱ्या एसट्यांवरील (S.T. चे अनेकवचन) गावांची नावे पाहून ही सारी गावं आहेत कुठे, याचं माझ्या नवऱ्याला लहानपणापासूनच कुतूहल. माझ्या नवऱ्याचे पणजोबा रत्नागिरीच्या अश्याच एका गावातून पेणला राहायला आले ते आलेच. त्यानंतर कुणीही तिथे फिरून गेलं नाही. ते 'केळशी' गाव पण शोधायचं होत. तो योग यावर्षी आला आणि आम्ही निघालो.

तारीख ठरली, त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. दरवर्षी आम्ही पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला जातो. म्हणून या वेळीही प्रथम पालीला गेलो आणि कोकण प्रवासाचा श्रीगणेशा केला.

दिवस १:
पालीहून चिपळूणकडे निघालो, वाटेतच परशुरामाचे मंदिर आहे. परशुरामाने समुद्र मागे हटवून ही 'कोकण भूमी' निर्माण केली असं म्हटलं जात. परशुरामाची माता रेणुकादेवीचे सुद्धा मंदिर आहे. काळ्या पाषाणातल्या या सर्व मूर्ती अतिशय देखण्या आहेत. तिथून निघाल्यावर चिपळूणच्या आधी 'एकविरा' धाब्यावर जेवलो. जेवण चांगले होते.

चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना सावर्डे या गावाकडून एक रस्ता डेरवण कडे जातो. सर्कसवाले वालावकरांनी तिथे शिवरायांचे मंदिर आणि मठ बांधला आहे. तिथे शिवरायांच्या जीवनावर आधारित शिल्पे उभारली आहेत. लहान मुलांना आवडेल असे आहे.

तिथून पुन्हा मागे येवून रत्नागिरीकडे जाताना संगमेश्वर फाटा दिसतो तिथून आत संगमेश्वरमार्गे देवरुख लागते. हाच रस्ता पुढे कोल्हापूरकडे पण जातो. देवरूखला माझी मैत्रीण राहते, तिच्या अनेक वर्षाच्या आग्रहास्तव तिच्या मोठ्या चौसोपी कोकणी घरात रात्री मुक्काम केला. देवरुख मध्येही राहण्यासाठी लॉज उपलब्ध आहेत.

दिवस २:
सकाळी लवकर उठून मार्लेश्वरला जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या रस्त्यावरच झाडांत लपलेले एक 'बोंडे' नावाचे छोटेसे गाव आहे, हे माझ्या नवऱ्याचे आजोळ, पण आता तिथे त्यांचे कुणीही राहत नाही. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे सह्याद्रीच्या उंच कपारीत लपलेले शंकराचे स्वयंभू स्थान आहे. मारळ या गावातून मार्लेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता सृष्टी सौंदर्याने नटलेला, हिरव्यागार घनदाट जंगलातून जाणारा रस्ता आहे. मंदिरात पायऱ्या चढून जावे लागते. चढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. जसजसे वर चढू लागतो हवेतला गारवा जाणवू लागतो. चढताना अजिबात थकवा येत नाही. वर एका गुहेत शंकराची पिंडी आहे. तिथे विजेचे दिवे नाहीत. समईच्या प्रकाशात आतले वातावरण अतिशय धीरगंभीर होते. गुहेत खूप थंडावा आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला २०० फुट उंचीवरून पडणारा धबधबा आहे. बाराही महिने त्याला पाणी असते. आजूबाजूला नजर टाकल्यास वैष्णोदेवीला आल्यासारखा भास मला झाला. श्रावणात इथले निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे असते. मकर संक्रांतीला मार्लेश्वरला देवाचे लग्न असते, तेव्हा मोठा उत्सव असतो.

.

परतीच्या वाटेवर देवरुखकडे न जाता आंबव मार्गे रत्नागीरीकडे निघालो. साधारण एक-दीड तासात रत्नागिरी शहरात पोहोचलो. तिथे लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान स्मारकास भेट दिली. बाजूलाच असणाऱ्या एका ब्राम्हण खानावळीत जेवलो.

लगेच पावसकडे निघालो. पावसला स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी मंदिर आहे. तिथे खूपच शांती मिळते मनाला. याचा अनुभव पूर्वीही घेतला होता. तिथे भक्तनिवास आहे, विनामूल्य व खूप चांगली राहण्याची सोय होते. परंतु एका खोलीत १० माणसे असे रहावे लागते. आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे १-२ शाळेच्या सहली आल्यामुळे गर्दी होती. त्यामुळे तिथूनच जवळ 'मुळे' यांचे लॉज आहे, तिथे राहायचे ठरवले. तिथे जेवणाची सोय देखील आहे.

पावसहून पुढे साधारण ७ किमी वर पूर्णगड आहे. गावात खाली गाडी ठेवून पायऱ्या चढून गडाकडे जाता येते. पायऱ्या गावातूनच जातात. किल्ला उंचावर आहे त्यामुळे खाली दिसणाऱ्या समुद्राचे अथांगरूप स्तब्ध करते. या गावातूनच एक मोठा ब्रिज जैतापुरकडे जातो, तिथून गोव्याकडे जाता येते.

पूर्णगडहून पावसकडे परत येताना एक रस्ता कशेळी कडे जातो. तिथे ८०० वर्षापूर्वीचे कनकादित्य सूर्यमंदिर आहे. पण उशीर झाल्यामुळे आम्हाला तिथे जाता आले नाही. तिथूनच पुढे आल्यावर डाव्या बाजूस एक रस्ता गणेशगुळे इथे जातो. तिथे ४०० वर्षे जुने असे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिळारुपी गणेश आहे. "गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला" अशी वदंता आहे.

जसेजसे देवळाच्या जवळ वरवर चढू लागतो तसे एका बाजूला घनदाट झाडी आणि एका बाजूला खोलवर पसरलेला समुद्र, वातावरणातील शांतता आणि गारवा...एका वेगळ्याच दुनियेत गेल्या सारख वाटत. देवळासमोर मोठा सज्जा आहे. तिथून खाली पहिले तर खोल घनदाट झाडी असलेली दरी दिसते. ती दरी 'जावळीचे खोरे' असल्याचा भास मला झाला. तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते पण त्यामानाने खूपच काळोख होता. परतीच्या प्रवासात खुपच अंधारून आल होत. रस्ता अगदी निर्मनुष्य, दिवे नाहीत, वस्ती नाही फक्त समुद्राची गाज जोडीला. त्यामुळे मला मनातून थोडं घाबरायला झालं. तिथे कुणाला जायचं असेल तर पुरेसा उजेड असतानाच जावे. गणेशगुळेहून पावसला परत आलो.

दिवस ३:
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा रत्नागिरीकडे निघालो. वाटेत सुंदर असा भाट्ये बीच लागतो. तिथे झरी विनायक मंदिर देखील आहे. नंतर आम्ही रत्नागिरी शहरात फेरफटका मारला. पतित पावन मंदिर आणि थिबा पॅलेस (तिथे आता शासकीय तंत्रनिकेतन आहे.) बाहेरूनच पाहिले. तिथून रत्नदुर्ग (भगवती किल्ला) पाहण्यासाठी गेलो. थेट वरपर्यंत रस्ता असल्यामुळे गाडी जाते. तिथे भगवती मंदिर आहे. रत्नागिरी शहराचे विहंगम दृश्य वरून दिसते. गडाच्या खाली रस्त्यावरच सागरी जीव संशोधन केंद्र व मत्सालय आहे. पण फारसे पाहण्यासारखे नाही.

रत्नागिरीहून आरे-वारे मार्गे गणपतीपुळे कडे निघलो. समुद्राच्या सोबत जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आहे. हळूहळू निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत, फोटो काढत काढत आम्ही गणपतीपुळेला पोहचलो. (परदेशातील 'ओशियन साईड रोड' चे काय कौतुक असतं! पण हा 'आरे-वारे मार्ग, आणि पुढे उल्लेख केलेला 'दाभोळहून कोळथर' मार्गे दापोली' आणि असे बरेच समुद्राच्या बाजूने जाणारे रस्ते कोकणात आहेत. पण आपल्याला त्याच कौतुकचं नाही.)

.

बीचच्या जवळ हॉटेलमध्ये रूम घेतली. फ्रेश झालो आणि गणपतीच्या दर्शनाला गेलो. दर्शन झाल्यावर डोंगराभोवती प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा मार्ग खूप छान आहे. मग बीच वर धमाल केली आणि रात्री जेवूनच रूमवर परतलो. गणपतीपुळ्यापासून १ किमी अंतरावर 'प्राचीन कोकण' नावाचे संग्रहालय आहे. इथे ५०० वर्षापूर्वीच्या कोकणातील ग्रामीण जीवनाचा देखावा ३ एकर जमिनीवर उभारला आहे. आम्ही कोकणातच वाढल्यामुळे त्याबद्दल फारस कुतूहल नव्हते म्हणून आम्ही ते टाळले. याविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

दिवस ४:
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पटापट आवरून जयगडकडे निघालो. रस्त्यात मालगुंड लागले. तिथे कविवर्य केशवसुत यांचे स्मारक आहे. जयगड जवळ येताच लांबूनच JSW Power Plant दिसू लागला. JSW ने अतिशय सुंदर असे गणेश मंदिर बांधले आहे ते बघण्यासाठी तिथे पोहोचलो. तिथे सर्वांनाच प्रवेश आहे. मंदिर तर अप्रतिम आहेच पण प्रवेशद्वार आणि आजूबाजूचे गार्डन पण सुंदर.

.

तिथे थोडा वेळ रेंगाळल्यावर जवळच असणाऱ्या 'जयगड' किल्ल्यात गेलो. गडाची तटबंदी अजून मजबुत आहे. आधी पाहिलेला 'पूर्णगड' तसेच बाणकोटचा किल्ला आणि हा 'जयगड' हे रूढार्थाने किल्ले/गड वा जलदुर्ग नाहीत. गड हे नेहमी उंच ठिकाणी असतात तर जलदुर्ग भर समुद्रात. पण हे किल्ले समुद्र किनारी बऱ्यापैकी उंच जागा बघून बांधलेले आहेत. आकाराने फारसे मोठे नसलेले हे किल्ले 'कोट' या प्रकारातील आहेत. यांचा पूर्वी सागरी मार्गावर टेहळणी करण्यासाठी वापर व्हायचा. बाकीच्या ऐतिहासिक वास्तु प्रमाणेच हे किल्ले पण दुर्लक्षित आहेत. हे किल्ले इतके मोक्याच्या जागी आहेत विशेषत: 'पूर्णगड' अजूनही आपलं सागरी तटरक्षक दल त्याचा उपयोग करू शकते. त्यामुळे हे किल्ले सुद्धा सुस्थितीत राहतील असं मला वाटत.

.

जयगडहून फेरी बोटने 'तवसाळ' येथे १५ मिनिटातच पोहचलो. फेरी बोटने प्रवास करण्याचा हा पहिलाच अनुभव सुखावून गेला.

.

तिथून अर्ध्या तासात 'हेदवी' आले. येथे प्रसिद्ध दशभुजा गणेश मंदिर आहे.

.

मंदिरापासून साधारण ३ किमीवर हेदवी बीच आहे. तिथे 'बामण घळ' म्हणून निसर्गाचा चमत्कार दाखवणारे स्थळ आहे. समुद्राच्या लाटांनी खडकामध्ये चीर केली आहे. लाट आली की पाणी त्या चिंचोळ्या भागात शिरते आणि जोराने उंच उडते. भरतीच्या वेळेला खरी गंमत आहे.

हेदवीपासुन पुढे ६ किमी अंतरावर 'वेळणेश्वर' हे शंकराचे पुरातन देवस्थान व सुंदर समुद्र किनारा आहे. यापुढे १६ किमी अंतरावर गुहागर आहे. गुहागर येथील समुद्र किनारा सुंदर आहे. गुहागरला जेवलो आणि बीचवर सुरुच्या बनात बसून आराम केला.

.

तिथे 'व्याडेश्वर' हे शंकराचे पुरातन मंदिर आहे. पण आम्ही गेलो नाही.

गुहागर पासून जवळच असणाऱ्या 'धोपावे' हून दाभोळला जाण्यासाठी पुन्हा फेरी बोटचा आधार घेतला.
दाभोळपासून जवळचं चंडिका देवीचे नैसर्गिक गुहेमधील मंदिर प्रसिद्ध आहे. परंतु संध्याकाळ होत आली होती, तिथे उशीरा जाणे सोयीचे नाही. त्यामुळे तिथे जाता आल नाही. पण पुन्हा कधीतरी जाणार हे नक्की. दाभोळहून दापोलीस दोन रस्ते जातात त्यापैकी आम्ही 'कोळथर' मार्गे समुद्रकाठाने जाणारा रस्ता निवडला. रस्त्यात 'बुरांडी' लागले. तिथे पृथ्वीवर उभे असणारे 'परशुराम' यांचे मोठे शिल्प दिसले. ते पाहून थांबलो. ती पृथ्वी आतून पोकळ ठेवली असून आत दरवाजा बंद करून ध्यान करता येते. बाजूला छानसे गार्डन केले आहे.

.

तिथून पुढे तामसतीर्थ म्हणून प्रसिद्ध असणारे लाडघर लागले. समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. तिथे WATER SPORTS आणि डॉल्फिन दर्शनाची सोय आहे.

दापोलीला ४. ३० वाजता पोहचलो. शनिवार होता त्यामुळे 'कोकण कृषी विद्यापीठ पाहता आले नाही. खरं दापोलीत राहण्याचा विचार होता, पण सुट्टीचा एकच दिवस शिल्लक होता. कुठल्याही परिस्थितीत 'केळशी'ला जायचेच होते. आणि रविवारी संध्याकाळ पर्यंत घरी पोहचायचे असे ठरवले होते. त्यामुळे आसुदचे केशवराज मंदिर, मुरुड-कर्दे इत्यादी काही ठिकाणी जायचे रद्द करावे लागले. (आसुदला तर सकाळी लवकर जावे लागते कारण देवळाकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो आणि वाहन बाहेर ठेवून पायी जावे लागते.) परतून पुन्हा यायचे असे ठरवून हर्णे कडे निघालो.

हर्णे गावात शिरण्याआधीच उजवीकडे एक रस्ता आंजर्लेकडे जातो, तिथुन गाडी वेगात हाकली आणि 'सनसेट पॉइंट' वर धावत-पळतच पोहचलो. आणि तिथून दिसणारे दृश्य पाहून केलेल्या धावपळीचे सार्थक झाले. संपूर्ण हर्णे बंदर, गाव, सुवर्णदुर्ग, दीपस्तंभ तिथून दिसते. बंदरात उभ्या असणाऱ्या शिडाच्या मच्छीमार नौका खूपच सुंदर दिसतात, लाईट लागल्यावर तर जास्तच सुंदर दिसतात. आंजर्लेला रात्री राहायचे ठरवले होते. पण अंधारून आल होत आणि पुढील रस्ता खराब आहे अस कळलं, त्यामुळे पुन्हा खाली हर्णेकडे आलो. हर्णे माझ्या आईचे आजोळ, पण आता तिथे कुणी राहत नाही. त्यांच्या आंब्याच्या बागा असल्यामुळे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी येतात. बराच वेळ शोधाशोध केल्यावर एक बऱ्यापैकी हॉटेल सापडलं. रात्र झाली म्हणून नाईलाजाने राहिलो. त्यामुळे जर कुणाला हर्णेला जायचं असेल तर एकतर आंजर्लेला रहा किंवा मुरुडला. शाळेत असताना मी हर्णेला आजीसोबत आले होते. तेंव्हाचं हर्णे आणि आताचं हर्णे यात जमीन आसमानाचा फरक जाणवला. सगळीकडे गर्दी, अस्वच्छता, मासळीचा वास, लोकांच्या वागण्यातील तुटकपणा...मन खट्टू झालं हर्णेचं पालटलेल रूप पाहून. 'गारंबीचा बापू' या पुस्तकातल्या वर्णनाप्रमाणे भासणारं, माडांच्या गर्दीत लपलेलं, छोटी छोटी घर असलेल हर्णे गेलं कुठे? पण मासेप्रेमींसाठी हर्णे म्हणजे पर्वणी आहे. याचे कारण हर्णे बंदर, मासे व्यापार जोरदार आहे. दिवसाला ४ कोटीची उलाढाल आहे म्हणे. ताजे आणि स्वस्त मासे इथे मिळतात, इथल्या काही हॉटेलमध्ये किंवा काही घरात ते मासे शिजवून मिळतात. हर्णे हे उत्कृष्ट असे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तिथे 'सुवर्णदुर्ग' हा सागरी किल्ला आणि 'कनकदुर्ग' हा सागरी तटावरील किल्ला आहे. कनकदुर्ग मध्येच दीपस्तंभ आहे. दोन्ही किल्ले मी आधी पहिले होतेच शिवाय तिथे जाण्यासाठी नियमित बोट-सेवा नाही त्यामुळे वगळूनच पुढे ठरवले. त्या किल्ल्यात जायचं असेल तर स्थानिक कोळ्यांशी बोलून बोट घ्यावी लागते.

.

दिवस ५:
हर्णे गावातून आंजर्लेकडे जाणारा एक दुसरा रस्ता आहे तो पकडून आंजर्लेकडे निघालो. रस्ता खराब आहे. 'आंजर्ले' गावाची पाटी दिसली. एक रस्ता खाली बीचवर व गावाकडे जातो आणि दुसरा रस्ता वर कड्यावरच्या गणपती मंदिराकडे जातो. मंदिराकडे निघालो, रस्ता कच्चा आणि अरुंद आहे. तरीही छान वाटत होतं. मंदिर पेशवेकालीन आहे. मूर्ती देखणी आहे. परिसर सुद्धा मस्त आहे. आंजर्ले येथील समुद्रकिनारा सुंदर आणि स्वच्छ आहे.

आता फक्त मिशन 'केळशी' बाकी होत. आंजर्लेहून थोडे मागे फिरून केळशीकडे निघालो. रस्ता जंगलातून जाणारा, एकदम निर्मनुष्य, आमच्या खेरीज दुसरे कुठलेही वाहन नाही, कसला आवाज नाही. दूरदूरवर काही आहे की नाही याचा अंदाज पण येत नव्हता. एक क्षण असं वाटून गेलं की आपण रस्ता चुकलो. मग हळूहळू छोटी छोटी गावं दिसू लागली आणि जीव भांड्यात पडला. वाटेत वेगवेगळ्या प्रकारचे खूप पक्षी दिसले. एका झाडावर बसलेली खूप मोठी घार किवा तत्सम पक्षी जवळून पहिला.

.

अस्पर्शित रस्त्याने केलेला हा प्रवास खरंच खूप विलक्षण होता. आणि अखेर केळशीत महालक्ष्मीच्या देवळापाशी येवून पोहचलो. १८ व्या शतकातील हे मंदिर आणि याचा परिसर शांत आणि सुंदर आहे. महालक्ष्मी स्वयंभु आहे. देवीची खणानारळाने ओटी भरली. देवीचा आणि सोमनाथाचा आशीर्वाद घेवून बाहेर पडलो. देवळाच्या बाजूनेच एक रस्ता वर याकुब बाबा यांच्या दर्ग्याकडे जातो. याकुब बाबा हे शिवाजी महाराजांच्या जवळचे होते. त्यांच्या निधनानंतर महाराजांनी हा दर्गा बांधला. दर्गा थोडा उंचावर आहे. तिथून केळशीचा नितांत सुंदर, अथांग समुद्र किनारा दिसतो. केळशी छोटेसे सुबक कोकणी गाव आहे.

.

केळशीहून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. हा देव्हारे कडे जाणारा रस्ता खूप खराब आहे. जवळपास बॉक्साईटच्या खाणी आहेत. धूळ उडवत खडखडाट करत चाललेले अनेक ट्रक रस्त्यात भेटले. काही वेळाने केळशी फाट्याजवळ येवून पोहचलो. डाव्या बाजूचा रस्ता वेळास व बाणकोट कडे जाणारा होता. (वेळास हे आपल्या सुंदर असा समुद्र किनारा आणि तिथे होणारा 'कासव महोत्सव' यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच बाणकोट येथे किल्ला आहे.) आणि दुसरा रस्ता जातो देव्हारे व मंडणगडकडे, हा रस्ता आम्ही पकडला.

देव्हारे गावाच्या पुढे आल्यावर उजव्या बाजूला झाडात लपलेले रस्त्यापासून खाली असलेले एक शिवमंदिर दिसले. गाडी थांबवली आणि पायऱ्या उतरून खाली गेलो आणि एकदम गारवा जाणवला हवेत. मंदिर कौलारू सुबक होत. गाभारा आणखी खोलवर होता. तिथेच बाकावर बसून थोडावेळ आराम केला. बाजूच्या जंगलात झाडांवर माकडे उड्या मारत खेळत होती. उठावंसं वाटतच नव्हत. पण घड्याळाचे काटे म्हणत होते, 'चला उठा, सुट्टी संपली!'

.

पुन्हा प्रवास सुरु केला. मंडणगड, म्हाप्रळ, आंबेत, गोरेगाव अस पार करत मुंबई-गोवा हायवे वरून गाडी हाकली. माणगावला जेवलो आणि मग न थांबता पेण गाठलं. प्रवास संपला होता पण इतके दिवस सतत सोबत करणाऱ्या समुद्राची गाज मात्र कानात घुमत होती.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

7 Mar 2016 - 10:14 pm | नूतन सावंत

मी पयली.मस्त ग पूर्वा.रात्नागीली वडिलांचे गाव आणि गुहागर आजोळ त्यमुळे इथे खूप भटकंती झालीय.जयगडला एक शंकराचे मंदिर आहे.कराटेश्वर.तिथे समुद्र आहे मंदिराच्या कड्याला लागून.आणि त्या कड्यातून गोड पाण्याचा झरा आहे.जरा शोधून फोटो टाकते.

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2016 - 11:46 am | पूर्वाविवेक

धन्यवाद सुरंगी ताई. कराटेश्वराचा बोर्ड पहिल्यासारख वाटत आहे. असो पुढल्या वेळेस, अजून बरीच ठिकाणे बाकी आहेत. आणि अजूनही मनातून रत्नागिरीचे आकर्षण संपलेले नाही.

नूतन सावंत's picture

7 Mar 2016 - 10:14 pm | नूतन सावंत

मी पयली.मस्त ग पूर्वा.रात्नागीली वडिलांचे गाव आणि गुहागर आजोळ त्यमुळे इथे खूप भटकंती झालीय.जयगडला एक शंकराचे मंदिर आहे.कराटेश्वर.तिथे समुद्र आहे मंदिराच्या कड्याला लागून.आणि त्या कड्यातून गोड पाण्याचा झरा आहे.जरा शोधून फोटो टाकते.

नूतन सावंत's picture

7 Mar 2016 - 10:15 pm | नूतन सावंत

रत्नागिरीला वडिलांचे गाव असे वाचावे

विवेकपटाईत's picture

7 Mar 2016 - 10:40 pm | विवेकपटाईत

वर्णन आणि चित्र दोन्ही आवडले.

बाबा योगिराज's picture

7 Mar 2016 - 11:08 pm | बाबा योगिराज

मस्त वर्णन. कामाचा धागा आहे. वाखुसा.

कोकण म्हणजे वेड लागण्यासारखी जागा आहे.
बाकी इनो च्या दोन पुड्या घ्याव्या लागलेल्या आहेत.

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2016 - 11:47 am | पूर्वाविवेक

धन्यवाद !! :)

रत्नागिरी शहराला नगण्य फुटेज मिळालंय की.

पण बाकीची भटकंती छान (रत्नागिरी जिल्हा या अर्थाने).

प्रचेतस's picture

8 Mar 2016 - 9:14 am | प्रचेतस

अगदी हेच मनात आलं.
बाकी भटकंती छानच.

पूर्वाविवेक's picture

8 Mar 2016 - 11:42 am | पूर्वाविवेक

@गवि, @प्रचेतस, रत्नागिरी शहराला नगण्य फुटेज मिळालंय हे अगदी खरय. यावेळी आम्ही अगदी काही तास तिथे घालवले कारण याआधीही रत्नागिरी शहरात जाण झाल होतं. आणि या भटकंतीचा उद्देशच मुळी अपरिचित, अस्पर्शित रस्त्याने भटकणे आणि फारश्या प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांना भेट देणे हा होता. त्यामुळे इथे 'रत्नागिरी' याचा अर्थ 'रत्नागिरी जिल्हा' असाच समजावा.

मितान's picture

8 Mar 2016 - 12:21 pm | मितान

कोकण झपाटून टाकतं !!
पूर्वा, लेखन आवडले.

सस्नेह's picture

8 Mar 2016 - 12:32 pm | सस्नेह

रत्नागिरी म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे रत्नागिरी.

सविता००१'s picture

8 Mar 2016 - 12:53 pm | सविता००१

केळशीला माझ्या बाबांचं आजोळ होतं आत्ता आत्ता पर्यंत.
कसलं झक्कास गाव आहे ते
एकूण कोकणच खुळावून टाकणारा प्रकार आहे. अत्यंत आवडता. कुठलंही खास ठिकाण नसेल तरी देखणाच रस्ता आणि मनमुराद निसर्ग.
मस्तच

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 4:42 pm | वेल्लाभट

हायला! ही सगळी ठिकाणं तर एकाहून जास्त वेळेला बघून झालीयत ! पण वर्णन मस्त. क्लास.

अगदी आजूबाजूचे वर्णन आहे माझ्या. गणेशगुळ्यासारखच आहे माझं गाव. चारही बाजूंनी डोंगर आणि मधे वस्ती. गावात यायचं झाल्यास घाटी उतरल्याशिवाय पर्याय नसे. आता हळूहळू रस्ते होऊ लागलेत. तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या लेखात भर घालते माझ्या एका फोटोची!
paus

पर्ह्या.. बुडलो बालपणात.

प्रचेतस's picture

8 Mar 2016 - 8:40 pm | प्रचेतस

प्रचंड सुंदर छायाचित्र.

सुमीत भातखंडे's picture

8 Mar 2016 - 9:56 pm | सुमीत भातखंडे

मूळ लेख सुद्धा मस्त.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 3:46 pm | पूर्वाविवेक

हो खूपच शांत आणि निर्मनुष्य गावं आहेत तिथली. गणेशगुळेला मंदिराच्या परिसरात आमच्याशिवाय कुणी नव्हते. दोन्ही बाजूला दाट झाडी. ६ वाजताच काळोख झाला होता. खूप मनातून घाबरायला झाल होत. फोटो काढले मी तिथले पण अंधारामुळे चांगले आले नाहीत.
तुझा फोटो खूपच सुंदर, पावसाळ्यातला वाटतोय.

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2016 - 12:49 pm | पिलीयन रायडर

गार वाटलं फोटो पाहुन!!!!!

पुर्वा.. तुझा लेख वाचुन लगेच कोकणात जावं वाटतय.. कित्येक वर्ष झाले. हेदवी, चिपळुण, पावस, रत्नागिरी इ ठिकाणे लहानपणीच पाहिलेली आहेत. आता तुझ्या लेखाप्रमाणेच फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी जायचा बेत ठरवायला हवा.

लेख आणि फोटो दोन्ही खुप आवडले.

चौकटराजा's picture

8 Mar 2016 - 6:49 pm | चौकटराजा

आमचा अजोळचं आणि जन्म ग्रामाचं वर्णन येऊन बालपणात जाता येईलसे वाटले होते. 'रत्नाईरी' किंवा रत्नांग्री ला आता पुन्हा जावे असे वाटतेय पण मस्त मार्ग कंचा ?

भारी आहे.भटकंती आवडली.वाचता वाचता आपण कधी माडांच्या सावलीत शिरतो कळत नाही.मागच्या आठवणी येतात.तुमचा कोणी सगासोयरा राहात असेल तर कोकणची मजा आणखीच वाढते.रात्री भुतांच्या गोष्टी ऐकायच्या.दिवसा लाल मातीत भटकायचं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Mar 2016 - 7:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

मोठाच पल्ला मारलात कि!! मस्त झालेय ट्रिप आणि वर्णन पण मस्तच.
चला ,या उन्हाळ्यात भटकायला एक रुट मिळाला.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 3:39 pm | पूर्वाविवेक

खरय, हा खूप छान रूट आहे पण उन्हाळ्यात थोडा कंटाळवाणा होईल असे वाटते.

दे टाळी. लग्नानंतर माझेपण गाव रत्नागिरीमधे फणसोप. ३ वर्षांपुर्वी भारतात उन्हाळ्यात आलो होतो, तेव्ह खास मासे आणि आंबे खाण्यासाठी रत्नागिरीची ट्रिप केली होती. तेव्हाच मार्लेश्वरचे मंदिरहि बघितले होते. तिथल्या माकडांनी माझ्या आईची पर्स पळवली होती. त्यामुळे ते चांगलेच लक्षात आहे.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 3:38 pm | पूर्वाविवेक

घे टाळी, माझ्या मुलीचीही water-bag माकडांनी पळवली. मार्लेश्वराच्या इथे आम्ही खरेतर खूप फोटो काढले. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गुहा, तिथल्या माकडांचे असे अगदी सुंदर फोटो आलेत. पण सगळ्या फोटोत माझ्या मुली डोकावत आहेत, त्यामुळे ते इथे दिले नाहीत.

praful SAWANT's picture

8 Mar 2016 - 11:49 pm | praful SAWANT

ह्या लेखाच्या लेखिकेचे मनापासून अभिनंदन.

कोकण एक परीस, पावन आणि विविधतेने नटलेली कायम हिरवा गालीचा परिधान केलेली आपली भूमी.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यात व्यापलेली. आम्ही अमेरिकेतले कयालीफोर्नीया पहिले नाही, पण ते कोकणासारखेच आहे अस म्हणतात.

लेखिकेचे प्रवास वर्णन वाचताना स्वत: आपण कोकणात फिरत आहोत अशी जाणीव होते. हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभे राहते.लाल माती पायाखाली आल्याचे जाणवते. फेसाळलेला समुद्र, हिरवी आमराई, कोकणचे टेहळणी बुरुज महणजे माड आपली वाट बघत आहेत असे जाणवते. रोजच्या तणावयुक्त जीवनातून एकदा जरी ह्या भूमीला भेट दिली तर वर्षाची शिदोरी परत घेवून जाता येते.

लेखिकेने प्रत्येकाला मग तो समुद्र, देवूळ जंगलातून जाणारा रस्ता, समुद्राशी वार्तालाप करणारा रस्ता, ऐतिहासिक स्थळे ह्या सर्वांना भटकंती करताना न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. त्यासाठी मनापासून अभिनंदन.

निसर्गरम्य कोकणाची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद. अशा अनेक लेखमालीकेंची माळ गुंफत रहा. आम्ही रसिक वाचक अशा लेखांना चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करूच.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 3:31 pm | पूर्वाविवेक

किती सुंदर प्रतिक्रिया. अश्या सुंदर प्रतिक्रिया मिळणार असतील तर आमच्यासारख्या नवोदितांचा लिहिण्याचा हुरूप नक्की वाढेल. खूप खूप धन्यवाद !

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 3:10 pm | मधुरा देशपांडे

कंटाळा आला की हे वाचून प्रसन्न वाटेल असं वर्णन आणि फोटो. खूप आवडली ही कोकण सफर.

पैसा's picture

11 Mar 2016 - 3:36 pm | पैसा

आपला गाव पर्यटकाच्या डोळ्यानी बघताना कसा दिसतो ते कळलं! :)

पूर्वाविवेक's picture

16 Mar 2016 - 9:50 am | पूर्वाविवेक

धन्यवाद पैसा ताई, तू रत्नागिरीची आहे का ? मला वाटल होत की गोव्याची?
कोकणात आणि गोव्यात फिरताना फरक असा जाणवतच नाही. मी मुरूडची आहे. गोव्यात गेलो होतो तेव्हा आतल्या गल्ल्यांत फिरताना कित्येकदा असं वाटायचं की आपण आपल्याच गावात फिरतोय.

गवि's picture

16 Mar 2016 - 11:16 am | गवि

एस ओ आर डबल ई..

आम्ही मुरुड अलिबाग डहाणू वगैरे कोंकणात धरत नाही.

कोंकण म्हणजे जुना रत्नागिरी जिल्हा. आमच्या लहानपणी मधेच त्यातून दुष्टपणे सिंधुदुर्ग असा वेगळा भाग तोडून जिल्हा बनवला गेला. पण तोही मूळ आपलाच. तळकोंकण आणि रत्नांग्री यातही फरक आहे, पण तो चालवून घेतो.

कारण तळकोंकणातल्या मुली.
;-)

नन्दादीप's picture

16 Mar 2016 - 10:53 am | नन्दादीप

+१. अगदी हेच म्हणतो...

गिरकी's picture

11 Mar 2016 - 4:05 pm | गिरकी

मस्त लिहिलंय पूर्वा :)
मी खूप लहान असताना या सगळ्या जागा फिरलेले. सगळं झरझर डोळ्यासमोरून गेलं :)

मुक्त विहारि's picture

11 Mar 2016 - 5:23 pm | मुक्त विहारि

"चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना सावर्डे या गावाकडून एक रस्ता डेरवण कडे जातो. सर्कसवाले वालावकरांनी तिथे शिवरायांचे मंदिर आणि मठ (अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा) बांधला आहे."

हे वालावलकर, सर्कसवाले नसून, मुंबईतले एक धनवान इसम होते.

जमल्यास इतका बदल संपादकांकडून करून घेतल्यास उत्तम.

किलमाऊस्की's picture

11 Mar 2016 - 8:54 pm | किलमाऊस्की

कोकण कसाही, कुठेही, कधीही भेटलेला आवडतोच. समुद्,माड बघून गावाची आठवण आली. अगदी होमसिक झालं.
:-( खूप वेळ फक्त फोटोच बघतेय.

पद्मावति's picture

12 Mar 2016 - 3:27 pm | पद्मावति

सुंदर वर्णन आणि फोटो. लेख आवडला खूप.

अजया's picture

12 Mar 2016 - 6:52 pm | अजया

लेख आवडला :)

गोंडस बाळ's picture

16 Mar 2016 - 12:39 pm | गोंडस बाळ

लेख झक्कास जमलाय :)

जेपी's picture

16 Mar 2016 - 1:42 pm | जेपी

लेख आवडला ,,ध्न्यवाद

कवितानागेश's picture

17 Mar 2016 - 7:25 am | कवितानागेश

आवडला लेख. :)

फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख.relax