जानेवारी महिन्यात सुरवातीचे सलग तीन आठवडे मी अन स्वामी ने माहुलीगड, चावंड गड – शिवनेरी गड व इंदुरी व चाकांचा किल्ला असे लगातार तीन ट्रेक केले. हे सलग ट्रेक पाहून मात्र नंतरचे दोन आठवडे आईने ट्रेकसाठी घराबाहेर पायही ठेवू दिला नाही, त्यामुळे जानेवारीचा शेवट मात्र खूप कंटाळवाणा गेला. मागील आठवड्यात २ तारखेला मुकुंद चा मला कॉल आला बोलला या वीकेंड ला कुठेतरी बाहेर ट्रेक ला जावूया, मी तर लगेच तय्यार झालो तशी पैशाची तंगी माझ्याकडे अन त्याच्याकडे होती त्यामुळे कमी खर्चात होईल असा किल्ला मी शोधायला सुरवात केली, शेवटी वसई समुद्रकिनारी असलेल्या किल्ल्यावर जायचा ठरवलं. मग या ट्रेक मध्ये माझ्या अन मुकुंदच्या (मुकुंद इतिहासाची आवड अन अध्यात्मावर प्रभुत्व असलेला पोरगा) बरोबर आम्हाला संतोष (हाडाचा ट्रेकर आणि एकदाच जॉली पोरगा), अमोल (हिंदीत येणाऱ्या चित्रपटातील संपादक) हे दोघे सामील झाले. मग रविवारी सकाळी दादरला भेटून ९ वाजताची विरार लोकल पकडायची ठरली.
ठरल्या प्रमाणे मी दादर ला येवून पोहोचलो, मुकुंद अन संतोष हे चर्नी रोड वरून फास्ट लोकल पकडणार होते अमोल हा आम्हाला अंधेरी स्टेशन ला भेटणार होता. मी दादर ला पोहचल्या नंतर अचानक पाहुनी ट्रेकर म्हणून अमृता हि आम्हाला जॉईन झाली. संतोष ला थोडासा उशीर झाल्यामुळे (नेहमीसारखाच) आम्ही ९:३२ ची विरार लोकल पकडून निघालो. ट्रेन मध्ये संतोष ने त्याचा रायगड ट्रेक च्या गमतीजमती सांगितल्या, तो बोलला रायगड ट्रेक हा यावर्षीचा माझा अविस्मरणीय ट्रेक असेल. १०:४० ला आम्ही वसई रोड स्टेशनवर पोहचलो. स्टेशन च्या पश्चीम बाजूला जे बस स्टेशन आहे त्याबाजूने आम्ही बाहेर पडलो, तिथेच बाहेर खाजगी रिक्षा मिळतात वसई गडाकडे जायला, आम्ही बरोबर पिण्याचे पाणी आणि खायला थोडफार घेऊन स्टेशन पासून रिक्षा करून किल्याकडे जायला निघालो, स्टेशन पासून किल्ला साधारण १५ मिनिटाच्या अतरावर आहे.
Trekshitiz
किल्ल्याजवळ पोहचल्यानंतर आम्ही समुद्रकिनारी गेलो, तीथे संतोष आणि अमृताने बोटीमध्ये बसून थोडे फोटो काढले. व नंतर आम्ही किल्याकडे वळलो.
उजवीकडेच किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार जवळ थोडे फोटो काढून आम्ही किल्यात प्रेवेश केला,
आत प्रेवेश केल्यानंतर समोरच तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहे. त्या पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो, वरती गेल्यावर तिथल्या बांधकामाची किल्याची रचना लक्षात येते. त्या तटाची उची साधारण ३० ते ३५ फुट उंच आहे.
किल्याला एकूण १० बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज.
त्याच तटबंदी वरून किल्ल्याचे दर्शन करत आम्ही पुढे पुढे सरकत गेलो. थोड पुढे जाचून आम्ही बरोबर आणलेली रसद बाहेर काढून पोटाची शांतता केली आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा गडदर्शन चालू केल. थोडे पुढे गेल्यावर आम्ही सभेच्या ठिकाणी गेलो.
सोर्स - rajeshivchhatrapati
तिथे आता पुरातत्व खात्याने नवीन बांधकाम करून जुनी ओळख कशी मिठवली हे त्यांनी सांगितले. तिथे चार गोलाकृती चौथरे दिसले ते चौथरे नसून एका ठिकाणी विहीर होती. एका ठिकाणी रांजण होत पण आता ते बंद करून त्याठिकाणी चौथरे उभारले होते. तेथूनच मागच्या बाजूने पुढे येताच एक चर्च आहे त्याच्या प्रेवेश द्वारावरील नक्षीकाम फारच सुंदर आहे.
(प्रवेश द्वारावरील चंद्र आणि सूर्य मराठ्यांनी आपली विजय पताका फडकवल्यावर त्या चर्चच्या दर्शनी भिंतीवर चंद्र आणि सूर्य हि हिंदवी विजयाची निशाणे तिथे लावली होती पण ती काढून टाकण्यात आली होती. श्री दत्त राऊत यांनी स्वतः उपोषण करून ते निदर्शनात आणून दिले प मराठ्यांची विजयपताका पुन्हा तिथे लावण्यात आली – असे माझ्या वाचनात आहे) आम्ही आत चर्च मध्ये प्रवेश करून चर्चच्या गाभाऱ्यात वरती घुमटाकडे नक्षीकाम केलेय आणि अवजड पाषाणी दगड कसे लावले याची मी अन मुकुंदाने चर्चा केली.
तिथले थोडेफार फोटो कडून आम्ही चर्च च्या बाहेर पडलो. बाजूलाच असलेल्या गोळावाल्याकडून आम्ही गोळा खाल्ला आणि किल्याचा उर्वरित भाग पाहायला पुढे सरकलो.
पुढे येथून बालेकिल्ल्याकडे गेलो, बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात. बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे वळावे. समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलीकडे एक हॉस्पिटल आहे. तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्यापुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे. आम्ही सगळे पुढे नागेश्वराच्या मंदिरात गेलो, दर्शन घेऊन नंतर पुढे चिमाजी आप्पांची विजय मिळवल्याबद्दलचे प्रतीक उभारलेले आहे ते पाहायला गेलो. बाजूलाच असलेल्या बालेकील्यात कोठार, सैनिकांची वस्तिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. एका दगडावर कोरलेला शिलालेख सुद्धा आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहीर आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे. चिमाजी आप्पाच्या पतीकापासूनच आम्ही स्टेशन कडे जायला आम्ही रिक्षा पकडली. स्टेशन ला पोहचल्यावर आम्ही थोडी पोटपूजा केली अन मुंबई ला येणारी लोकल पकडली. अशा प्रकारे आमचा हा सुंदर असा छोटासा ट्रेक झाला.
वसई किल्ल्याचा इतिहास (थोडक्यात)
सन. १४१४ मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. १५३० मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरुज आहे. त्याची लांबी रुंदी एक एक कि.मी. आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडुन प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. एका बाजूस अथांग सागर व बाकी तिन्ही बाजु दलदलीने व्याप्त आहेत. सोपर व गोखरावा येथे पूल आहेत, असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे. मुंबई जवळील साष्टी म्हणजे सहासष्टी नावाचा प्रदेश होता. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते व्यर्थ गेलेल. त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पाच्या हातात सोपवली आणि इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पाने मोहिम आखली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ‘हरहर महादेवाच्या’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले. त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे मारली गेली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायकामुलांना सुखरुप जाऊ दिले.
पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यात सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भूमार्ग या दोन्ही बाजुंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिद्ध झाले. कर्नल हार्टले कल्याणवरून हल्ला करणार होता. तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रूला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या आठ कि.मी. गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होत. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरू झाली. मराठ्यांनी सुद्धा बुरुजावरून गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळेजण घाबरून गेले. ९-१० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला. १२ डिसेंबरला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 8:11 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच. पुढील ट्रेकला शुभेच्छा.
10 Feb 2016 - 8:13 pm | शान्तिप्रिय
मस्त ट्रेक आणि सुन्दर माहिति.
10 Feb 2016 - 8:28 pm | कंजूस
उत्तम फोटो आणि योग्य वर्णन.पूर्वी मुंबईथल्या शाळांचे सहलीचे हक्काचे ठिकाण होते.वज्रेश्वरी-गणेशपुरी-वसई किल्ला परत.ती किल्ल्यातलीच वज्रेश्वरी पोर्तृगिज काळात हल्लीच्या जागेवर आणली गेली.आमचे अनगावचे एक मास्तर सांगायचे तिकडे रानात आणखी बरेच गरम पाण्याचे झरे आहेत.
15 Feb 2016 - 4:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
तुम्ही अनगावचे?
10 Feb 2016 - 8:30 pm | पैसा
खूप छान लिहिलंय आणि फोटोही अप्रतिम!
10 Feb 2016 - 9:01 pm | विजय पुरोहित
सहमत...
लेखन पण छान आहे...
10 Feb 2016 - 9:50 pm | प्रचेतस
मस्त.
किल्ल्यातील वास्तूंचे अजून फोटो हवे होते. मिपाकरांसोबत केलेल्या वसई भ्रमंतीची आठवण आली.
11 Feb 2016 - 2:32 pm | sagarshinde
किल्ल्याचे आणकी काही फोटो
11 Feb 2016 - 12:26 pm | वेल्लाभट
क्लास.
हां ते किल्ल्याचे फोटो अजून खूप हवे होते.
11 Feb 2016 - 2:33 pm | sagarshinde
किल्ल्याचे आणकी काही फोटो
11 Feb 2016 - 2:34 pm | sagarshinde
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वाचे मनपूर्वक धन्यवाद :-)
11 Feb 2016 - 5:39 pm | संजय पाटिल
मस्त वर्णन अन फोटो बी झकास!!
बाकी ह्याला ट्रेक म्हणावं का? या विचारात असलेला..
पाटिल..
1 Dec 2016 - 12:47 pm | कऊ
Amruta Chavande /shinde ना त्या???