जंगल बुक

गिरकी's picture
गिरकी in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

लहानपणीच्या प्रत्येक सुट्टीच्या अनेक उद्योगांपैकी एक उद्योग ठरलेलाच असायचा : ग्रंथालयातून पुस्तकांचा ढिगारा आणणे आणि रात्रंदिवस वाचनात बुडून जाणे. या ढिगाऱ्यात आधी चुकून प्रवेश केलेल्या जिम कॉर्बेट आणि चितमपल्लींनी सुट्टीगणिक अख्खा गठ्ठा कधी काबीज केला ते मला कळलं सुद्धा नाही. त्यांची अरण्य वाचने अगदी खुळावून टाकायची. नर-भक्षकांचा माग काढणे काय आणि झुंजूमुंजू झालं की पाखरांसोबत रान मेव्याची न्याहरी करणे काय, सगळंच कसं परीकथेतल्या सारखं वाटायचं. पुस्तक वाचता वाचता मनातल्या मनात सगळी जंगले फिरून सुद्धा झालेली, पण तेव्हा कधी प्रत्यक्ष या रानांची फेरी झाली नाही. हळू हळू शिक्षण पूर्ण झालं. गाडी संसाराला लागायच्या बेताला आली आणि कर्म-धर्म संयोग का काय म्हणतात त्यानुसार असाच जंगल वेडा पण कधी जंगलात न गेलेला जोडीदार लाभला आणि बुकातली जंगले आमच्या प्रत्येक सुट्टीचा खराखुरा भाग बनली :)

तीन वर्षांत भारतातली प्रसिद्ध जंगले जीप सफाऱ्या किंवा ३-४ तासांचे 'नेचर वॉक' करत फिरून झाली. वाघांचा शोध घेऊन झाला. एकेका जंगलात ५-६ सफाऱ्या अशी ४-५ जंगले करून सुद्धा ३ वर्षांत वाघोबाने एकदाही दर्शन दिले नाही. जंगलाचा वास, दाटपणा, गूढ शांतता, खूप आशा घेऊन कानाकोपऱ्यात भिरभिरणारी नजर, कॉल ट्रेस करण्यासाठी टवकारलेले कान ई. मध्ये आधी खूप थ्रिल वगैरे वाटायचं. वाघोबा सोडून खूप प्राणी भेटायचे, खूप छान आणि वेगळे पक्षी दिसायचे पण हळू हळू कंटाळा यायला लागला. काहीतरी मिसिंग होतं...उसमे वो पुस्तकवाली बात नहीं थी :( जिम कॉर्बेट, चितमपल्ली, माडगुळकर वगैरे लोक्स काही असे जीप मधून किंवा बफर झोन मधून नाही फिरायचे. आणि आमचे कोणी काके, मामे फारेष्ट खात्यात नसल्याने कुठला वशिला लागून पर्यटकांना मिळणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त काही मिळायची शक्यताच नव्हती. पण तरी ज्याच्या नशिबात 'वनवास' लिहिलेला असतो त्यांना तो मिळतोच!! तर त्याचं झालं असं, की कधीतरी बोलता बोलता एका मित्राने पेरियारच्या जंगलातले फोटो दाखवले. हे जंगल काही वाघोबांसाठी प्रसिध्द नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा काही विशेष पत्ता नव्हता. पण 'पेरियार' हे नाव 'कधीतरी जाण्याच्या जागा' या लिस्ट मध्ये जाऊन बसलं. हेच ठिकाण आमचं जिम कॉर्बेटचा चेला बनायचं स्वप्न पूर्ण करणार आहे हे आमच्या गावी सुद्धा नव्हतं.

एका मे महिन्यात 'चला...कुठेतरी जाऊया ना' चा धोसरा चालू झाला आणि अशात अचानक 'पेरियार' ची आठवण झाली. पेरियार फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पानावर २ आणि ३ दिवसांच्या जंगल ट्रेक्सची माहिती होती. पण हाय रे दैवा… त्यातले काहीही बुक करण्यासाठी किमान १५ दिवस आधी डिपार्टमेंटला 'डी.डी.' नेच पैसे पाठवणे गरजेचे होते. आणि 'शासकीय' असल्याने संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकाचा फोन उचलणे आणि उचललाच तर माहिती देणे हे त्यांच्या खात्याच्या धर्मात बसत नव्हतेच. या ठिकाणावर पाणी सोडण्यापूर्वी आम्ही एकदा गूगलबाबाला शरण जायचं ठरवलं आणि गूगल बाबाने प्रसाद म्हणून 'पेरियार टायगर ट्रेल्स' च्या पानावर आम्हाला नेऊन सोडले. यावर दिलेल्या फोनवर चक्क मनुष्यप्राणी अवतरला आणि त्याने आम्हाला या २ किंवा ३ दिवसांच्या जंगल ट्रेलची यथासांग माहिती दिली. आणि आम्हाला हव्या त्या तारखांना ट्रेल साठी शेवटच्या २ जागा शिल्लक असल्याचे सांगितले. तो खरं म्हणजे एक एजंट होता आणि त्याचे कमिशन म्हणून थोडे जास्तीचे पैसे मागत होता. शिवाय हा आधी पैसे घेऊन ऐनवेळी उगवलाच नाही तर वगैरे वगैरे शंका होत्याच. पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचे ठरवले आणि प्रत्येकी १००० रुपये आगाऊ रक्काम म्हणून त्याच्या खात्यावर भरून टाकले.

कार्यक्रम एकंदर असा होता:
एका ग्रूप मध्ये जास्तीत जास्त ६-७ जण असतील. पहिल्या दिवशी सकाळी साधारण १० वाजता फॉरेस्ट ऑफिस पासून ट्रेक चालू करायचा. साधारण ४ तास ट्रेक करून १० किमी आत जंगलात पोहोचायचे. तिथे २-३ तंबू टाकून आणि त्याभोवती चर खणून बेस कॅम्प बनवला आहे. तिथे सामान ठेवून जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन दुपारी पुढच्या ट्रेकला निघायचे. पुन्हा १० किमी किंवा साधारण ४ तास भटकायचे आणि अंधार पडला की मुक्कामी परत. दुसऱ्या दिवशी ज्यांना परत जायचे असेल त्यानी परत जायचे आणि बाकीच्यांनी असेच अजून २ ट्रेक करायचे. या लोकांनी तिसऱ्या दिवशी नाश्ता करून ट्रेक करत जेवायच्या वेळेपर्यंत पुन्हा फॉरेस्ट ऑफिसला यायचे. किंमत वगैरे खात्याच्या वेबसाईटवर आहेच.

आम्ही पैसे तर भरलेच होते. पण मोठा प्रश्न होता की जायचे कसे?
एजंट कडून कळले की फॉरेस्ट ऑफिस 'कुमली'(Kumily - केरळमध्ये) नावाच्या गावापासून ५ किमी वर आहे. तुम्ही कुमलीला पोहोचा. तिथून मी तुम्हाला पिक अप करेन. आणि कुमली म्हणजेच 'थेक्कडी' म्हणून प्रसिध्द असलेले पर्यटन स्थळ. आम्ही बंगळूरूवासी असल्याने तिथून कुमलीला पोचणे हा काही फार अवघड मुद्दा नव्हता. बंगळूरू पासून कुमली पर्यंत रात्रीच्या स्लीपर बसेस आहेत. कोचीन पासून सुद्धा खूप बसेस उपलब्ध आहेत. आम्ही बंगळूरू मधून रात्री ७ ला निघणारी आणि सकाळी ७ ला कुमलीला पोहोचवणाऱ्या बसची तिकिटे काढली आणि आमच्या प्रवासाची पाया-भरणी झाली.

आता ३ दिवस ट्रेक करायचा म्हणजे तयारी करणे गरजेचे होते. खाण्या-पिण्याची सोय तेच करणार होते. पण ऐनवेळेस लागलं तर असुदेत म्हणून घेतलेल्या अगणित गोष्टी आणि आमच्या मालकांची लाडकी बासरी वगैरे वगैरे जामानिमा तब्बल ४ बॅगा भरून झाला. आणि मग लक्षात आले की आपले सामान आपले आपण पाठीवर घेऊन फिरायचे आहे. आता सामानाला कात्री लावणे आले! या कामात आमचे मालक एकदम वाकबगार असल्याने त्यांनी आम्हाला हाताची घडी आणि तोंडावर बोट एका कोपऱ्यात बसवले आणि आमचे सामान प्रत्येकी १ पाठीवर लावायची बॅग येवढेच झाले.

फायनल सामान: प्रत्येकी ३ पँट्स-शर्ट, ४ अंतर्वस्त्रे, ५-६ जोड मोजे, दोघांत मिळून १ टॉवेल, टोप्या, इमर्जन्सी लाईट, प्रत्येक दिवसासाठी मोजून घेतलेला एनर्जी युक्त लहान आकाराचा खाऊ, कॅमेरा आणि त्याचे सोबती आणि मालकांची लाडकी बासरी येवढेच होते. तरी मी हळूच रात्री घालायचे कपडे, पेन बाम आणि २-४ क्रीमच्या बाटल्या घुसवल्याच.

येवढे करता करता तयारीचे दिवस संपले आणि आम्ही कुमलीला जाणाऱ्या वाहनात स्वार झालो. खूप घाट रस्ते ओलांडत ओलांडत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास कुमलीला जाऊन धडकलो. एक प्रसाधनगृह असणारे उपहारगृह शोधले. आन्हिके उरकून तेथेच ट्रेकचे कपडे चढवले आणि एजंटला फोन केला. तो खरेच येईल की पैसे खड्यात गेलेत याचा विचार चालू असतानाच तो भला माणूस येउन हजर देखील झाला. त्यालाच विचारून जवळचे एटीएम गाठले आणि पैसे काढून उर्वरीत रक्कम त्याच्या स्वाधीन केली. त्याने स्वत:च्या गाडीतून आम्हाला फॉरेस्ट ऑफिसला पोहोचवले. ज्या लोकांकडे इतर प्रवासाचे सामान असेल त्यांच्या साठी जास्तीचे सामान ठेवायला या ठिकाणी लॉकर्स उपलब्ध आहेत. तिथे पोहोचल्यावर आम्ही रीतसर फॉर्म वगैरे बघून नोंदणी केली. आणि आम्ही खरोखरच ट्रेकला जाणार आहोत यावर शिक्का-मोर्तब झाले. आता बाकीच्या ग्रूपची वाट पहायची होती.

तोपर्यंत त्यांनी आम्हाला मोज्यांच्या आणि पँटच्या वरून घालून गुडघ्यापर्यंत येणारे खाकी मोजे घालायला दिले. आणि त्याच्यावर भरपूर तंबाखू चोपडली. त्यामुळे जळवांच्या पुर्वानुभावाने पुरेपूर जळलेले आम्ही 'या जळवानो...बघुया तुमचं काय होतंय' अशा आवेशात इतरांची वाट पाहत उभे राहिलो. थोड्या वेळात एक एकटी बेल्जियन मुलगी आणि एक ऑस्ट्रेलियन जोडपे येउन आमच्या ग्रूपमध्ये सामिल झाले. आणि आम्हाला अगदीच 'लकी' वगैरे ठरवण्यासाठी एक प्रसिध्द नॅचरलिस्ट आणि डॉक्युमेंटरी मेकर या ट्रेकचे चित्रीकरण करण्यासाठी एका पत्रकार बाईंच्या सोबतीने आमचे सोबती झाले. अशा प्रकारे आम्ही ७ जण आणि ३ बंदुकधारी गार्ड अशी एक ओळ पेरियारचे जंगल तुडवायला सज्ज झाली! माझं लहानपणी पासून जपलेलं स्वप्न चक्क खरं होणार होतं!

९.३० - १० वाजता आम्ही ट्रेकला सुरवात केली. मलबार स्क्विरल तथा शेकरू, वेगळ्याच प्रजातीचा कोळी, २-३ पक्षी, फणस खाणारी माकडे असे बघत आम्ही रमत गमत निघालो होतो. इतक्यात एका गार्डने शूक शूक करून तोंडावर बोट ठेवले आणि दुसरे बोट कुठेतरी झाडा झुडपाकडे रोखून धरले. आम्ही डोळे ताणून ताणून काय आहे ते बघायचा प्रयत्न करू लागलो पण काहीच दिसेना. मग तो दबकत दबकत पुढे जाऊ लागला आणि आम्ही त्याच्या मागे मागे. आणि अचानकच अगदी १० फुटांवर डोळ्यासमोर २ डोळे आणि २ शिंगे दिसली. आमचा गाईड पुटपुटला 'इंडियन गौर!! तो आडदांड प्राणी आमच्या पासून १० फुटांवर उभा होता आणि त्याच्या मागे त्याचा अख्खा कळप. खरं तर घाबरायची वेळ आमची होती पण आमच्यापेक्षा हजार पट शक्तिमान प्राणी आम्हाला घाबरून श्वास रोखून स्तब्ध उभा होता. आम्ही काय करू शकतो याचा अदमास घेत होता. २-३ मिनिटे अशीच स्तब्धतेत गेली आणि आम्ही त्या कळपाच्या आणखी जवळ सरकू लागलो. आणि मग अचानकच खळबळ झाली आणि तो कळप उलट दिशेला गायब झाला. आमच्या ट्रेकच्या पहिल्या १५ च मिनिटांत त्या जंगलच्या मूळ वासियांपैकी एकाच्या झुंडीने आमचं स्वागत करून शुभ शकुन केला होता. आमची ही ट्रीप अविस्मरणीय होणार यात आता शंकाच उरली नव्हती :) पेरियार मधल्या हत्ती, अस्वले (स्लॉथ बेअर), वाघोबा, बिबट्या यापैकी उरलेल्यांच्या ओढीने आम्ही पुढे कूच केले.

Indian Gaur

थोड्या वेळात एक प्रचंड मोठे पण पोकळ बुंधा असलेले झाड लागले आणि त्या झाडाच्या ढोलीत आम्ही प्रवेश केला. मिट्ट काळोख होता आत. गाईडने काड्यापेटीची काडी पेटवली आणि शोधाशोध केली. ३-४ काड्या खर्ची घातल्यावर तो उत्साहाने जवळ बोलावून बुंध्याला घट्ट चिकटून लोंबणारी छोटीशी गोष्ट दाखवू लागला. नीट दिसेना म्हणून लोकांनी फोनच्या दिव्याचे झोत पाडायला सुरु केले तेव्हा आमच्या सोबतचे 'डॉक्युमेंटरी काका' रागवले. मग शिस्तीत एकेकाला बोलावून काडी पेटवून दाखवली तर समोर एक पिटुकलं वट-वाघूळ होतं. बारीकशा लुकलुकत्या डोळ्यांनी इकडे-तिकडे बघत मजेत लोंबकळत होतं. 'हॉर्स शू बॅट' चं पिल्लू होतं ते. काका रागावले कारण दिव्यांमुळे घाबरून जर ते ढोलीबाहेर उडून गेलं असतं तर त्याला कुणीतरी खाऊन टाकलं असतं. ते स्वत:चं रक्षण करण्याएवढं मोठं झालं नव्हतं. वट-वाघूळाच्या क्यूटपणानी हरखलेले आम्ही पुढे चालायला लागलो.

पेरियार तलावाचा एक प्रवाह आम्हाला आड आला. फारतर गुढघ्यायेवढे पाणी होते. त्यामुळे बूट वगैरे हातात घेऊन आम्ही मजेत तो प्रवाह पार केला आणि दुसऱ्या काठावर फतकल मारून बसलो. एक दोन एनर्जी बार आणि २ लिटर पाणी संपवून पाठीवरचे ओझे कमी केले आणि त्या मस्त गार हवेत पुढे जायला लागलो. वाटेत रानातच राहणाऱ्या मासेमार लोकांच्या तुरळक झोपड्या दिसत होत्या. लहान सहान पोरी आणि आज्ज्या तलावात उतरून वेगळ्याच प्रकारे चिंगळे मासे पकडत असताना दिसल्या. चालता चालता दूर एका टेकडीकडे बोट दाखवून तिथे आमचा बेस असल्याचे गार्डने सांगितल्यावर दमलो असल्याची जाणीव वाढली. हळू हळू घसे कोरडे पडत होते. भूक लागायला लागली होती. पाय बोलायला लागले होते. तसेच पाय ओढत बरेच अंतर चालल्यावर गार्ड लोकांनी परत कल्ला केला आणि 'थांबा थांबा थांबा' सुरु केले. त्यातल्या एकाने काटकी घेऊन धुळीत गोल केला आणि सांगितले की 'टायगर पगमार्क'...वाघाच्या पायाचे ठसे!! हा प्रकार आमच्यासोबत आधी एकदा घडला होता आणि तेव्हा आमच्या पुढच्या जीपला वाघ दिसून पण आम्हाला या मार्क्सवरच समाधान मानावे लागले होते. यावेळी पण गाईडच्या मते वाघोबाला शोधणे खूप अवघड होते कारण त्या जंगलात वाघ खूप कमी आहेत, जंगल खूप दाट आणि गर्द हिरवे आहे आणि एका वाघाला तेथे जवळपास २५ एकर प्रदेश भटकायला मिळतो. त्यामुळे वाघ सापडणे जरा अवघडच होते. आमचा जरी विरस झाला असला तरी जवळपास असलाच तर आपल्याला दिसलाच पाहिजे अशा निग्रहाने सतर्कतेने वाटचाल करायला लागलो. वाघोबा शोधता शोधता बेसकॅम्पचा रस्ता भर भर संपला.

बेस कॅम्प खरोखरच अगदी 'बेसिक' प्रकारचा होता. २ माणसे जेमतेम आत जातील असे ३ छोटुकले तंबू होते. चुलीचा प्रकाश बाहेर पडू नये अशा प्रकारे बांधलेले पत्र्याचे झोपडे आणि त्यात एका बाजूला चिमुकले डायनिंग टेबल असे छोटेखानी स्वयंपाकघर होते. आणि त्या डायनिंग टेबल वर गरमा गरम काळा चहा आमची वाट पहात होता. सगळेजण चहावर तुटूनच पडले. चहा संपता संपता टेबलवर पिकलेली सोनकेळीसुद्धा येउन बसली आणि फटक्यात अदृष्यपण झाली. गार्ड दादाने सांगितले की थोडे फ्रेश व्हा, तोपर्यंत जेवण होतंच आहे.

पोटात जरा धुगधुगी आली होती तेव्हा ईकडे-तिकडे लक्ष जायला लागले. आमचा बेस कॅम्प अत्यंत प्रेक्षणीय जागी वसला होता. पेरियार तलावाच्या काठावरील एका लहानश्या टेकडीवर तंबू घालण्यायेवढीच जागा रिकामी करून त्यात तंबू ठोकले होते. आणि बाजूने २० फूट खोल आणि ५-६ फूट रुंद चर खाणला होता. चर ओलांडायला एक ओंडका टाकला होता. चारी बाजूने गर्द झाडी, एका बाजूला जरा खालच्या उंचीवर मोठा माळ आणि उरलेल्या सगळ्या बाजूंना वेढून वळणे घेत पसरलेला, नदीचा धाकटा भाऊ वाटेल असा शांत, नितळ पेरियार तलाव! सगळीकडे किर्र शांतता आणि सुखद रंग. माणूस शांतवत नाही गेला तरच नवल...या शांततेची अनुभूती घेत पेरियार तलावाच्या स्वच्छ पाण्याने हात पाय धुवून सगळे तलावाकाठीच पसरले. अर्ध्या तासातच गार्ड दादा जेवायला बोलवायला आले. टेबलवर स्वच्छ ताटल्या मांडल्या होत्या. टॅपिओकाच्या कंदाचा उपमा आणि कांदा, टोमॅटोची कोशिंबीर असा साधा पण भरपूर कर्बोदक युक्त मेनू होता. पहिल्यांदाच खात होते सगळेच जण. चव भन्नाटच होती. सगळ्यांनी अगदी भरपेट खाल्लं आणि पुन्हा एकदा डुलकी काढायला सगळे तलावाकाठी जाऊन पसरले. केरळ आणि मे महिना असुनही उंचीवर आणि गर्द झाडीत असल्याने वातावरण सुखद थंड होतं. वाऱ्याच्या मंद झुळकी येत होत्या. झाडाखाली पडल्या पडल्या मस्त गाढ झोप लागली. दीड-दोन तासांत जरा उन्हे कलायला आल्यावर गाईडनं सगळ्यांना जाग आणली. डोळे उघडल्यावर कळलं की झोपेनी मस्त काम केलंय आणि मेंदूसोबत शरीरसुद्धा हलकं आणि ताजं तवानं झालंय. पुन्हा एकदा काळ्या चहाचे २-३ कप रिचवले. थोडे पाणी, एनर्जी बार्स आणि गार्ड काकांनी सोबत असुदेत म्हणून दिलेली थोडी सोनकेळी पाठीवर टाकली आणि आमच्या ट्रेकच्या पुढच्या टप्यासाठी मार्गस्थ झालो.

हा टप्पा थोडा लांबचा आणि अजून दाट जंगलातला होता. त्यासाठी पेरियार तलाव ओलांडून पलिकडच्या टेकडीवर जायचं होतं. त्यासाठी तराफा बनवून ठेवला होता. तराफ्यात बसून तलाव पार केला आणि तिकडच्या गवतातून, झुडपातून पक्षी प्राणी शोधत फिरत राहिलो. घोरपड तथा मॉनिटर लिझार्ड, लाल रंगाचे मुंगुस वगैरे बारीक सारीक प्राणी दिसत होते. मध्येच वरून कुठूनतरी फ़ाट्ट फ़ाट्ट फ़ाट्ट फ़ाट्ट असा जोरदार आवाज यायला लागला. आणि प्रचंड मोठ्या पंखांनी हवा कापत जाणारा ग्रेट हॉर्नबिल म्हणजे आपला धनेश दिसला. वेग-वेगळे रानटी मश्रूम, वेग-वेगळी झाडे बघत आम्ही हुंदडत होतो. पुढे एक आणि मागे एक बंदुकधारी गार्ड घेऊन आमची टोळी रानांत भिरभिरत होती. गाईड काका कसली कसली रानफळं काढून चाखायला देत होते. इतक्यात एक मोकळे माळरान लागले आणि तिथे एक प्रचंड मोठा सांगाडा पडलेला दिसला. गाईडने सांगितले की काही दिवसांपूर्वीच एका वाघोबाने एका हत्तीला तिथे लोळवले होते. वाघाने चाटून पुसून खाल्यावर उरलेला हत्तीचा सांगाडा तिथेच पडून होता. आम्हाला या प्रसंगाचे मोशन सेन्सर वर नाईट व्हिजन कॅमेरा वापरून केलेले चित्रीकरण सुद्धा बघायला मिळाले. पुढे पुढे वाटेत अनेक ठिकाणी आम्हाला असे गव्याचे, सांबरांचे वगैरे सांगाडे, देखणी शिंगे वगैरे पडलेले दिसले. वेगवेगळ्या पक्षांची रंगीत पिसे मिळाली. पण हे सगळे बघून, मनांत साठवून तिथेच सोडून जायचे होते. आता अंधार पडायला आला होता. झपझप पेरियार तलाव गाठायचा होता आणि तराफ्यात बसून मुक्कामी तंबू गाठायचा होता. कितीपण झपझप चालले तरी तलावाला पोचायच्या आधी किर्र काळोख झालाच. डोळ्यात बोट गेलं तरी दिसलं नसतं. दिवे लावायला परवानगी नव्हती. त्या अंधारात सुद्धा गाईड काका सफाईदारपणाने रस्ता तुडवत होते आणि आम्ही त्यांच्यावर हवाला ठेवून त्यांच्या मागे जात होतो. प्रत्येकानी हातात एकेक काठी घेतली होती आणि काठी आपटत पदयात्रा चालू होती. काठी आपटून जमिनीत होणाऱ्या कंपनाने साप आणि ईतर प्राण्यांना वाटेत न येण्याचा इशारा मिळतो म्हणे. जीव मुठीत घेऊन शक्य तितक्या जोरात काठी आपटत एकदाचे आम्ही ताराफ्याजवळ जाऊन पोचलो. त्यानंतरची १५-२० मिनिटे अक्षरश: 'तिलिस्मी' वगैरे होती. प्रचंड पसरलेला पेरियार तलाव काळोखात बुडून गेला होता. त्यावरून संथ तरंगत तरंगत आमचा तराफा चालला होता. वरती त्याच रंगाचे आकाश. तलावात आणि आकाशात फरक इतकाच की आकाशात असंख्य चांदण्या सांडलेल्या होत्या. अनादी अनंत काळ या तराफ्यात पडून हे चमचमतं आकाश बघत रहावं, कुणी कुणाशी बोलू नये, काही करू नये असं प्रत्येकालाच वाटत असावं. सगळेच जण चिडीचूप होऊन ते दृष्य डोळ्यात साठवून घेत होते. त्या तलावात कुठेतरी हरवून जावं अशी आमची लाख इच्छा असली तरी गार्ड काकांनी आम्हाला तंबू जवळ आणून सोडलेच.

आता हळू हळू सगळेजण त्या स्वप्नातून वास्तवात आले. ठणकून निघालेले पाय आणि पोटात उसळलेली भूकच त्याला जबाबदार असावी. बूट सुद्धा न काढता सगळे जेवायला बसले. मेणबत्तीच्या प्रकाशात वाढून ठेवलेला केरळी लाल तांदळाचा वाफाळलेला भात, खमंग सांबार, २ भाज्या, १ कोशिंबीर असं चारी ठाव जेवण बघून भूक अजूनच खवळून निघाली. इतक्या उत्कृष्ट चवीचं जेवण अख्खा केरळ पालथा घातला तरी परत कधीच मिळालं नाही. खोबरेल तेलात केलेल्या फोडण्या, जंगलातूनच गोळा केलेले ताजे ताजे मसाले, ओल्या आणि सुक्या खोबऱ्याचा सढळ वापर आणि पोटातली अमाप भूक. अर्धा तास फक्त हात आणि तोंडच काम करत होते. बाकीचे शरीर फक्त तृप्त होत होते. आमचे जगातले सगळ्यात रोमँटिक कँडल लाईट डिनर झाल्यावर चिमुकल्या तंबूत कसेबसे कपडे बदलले आणि नवरोबांनी पाच-सात मिनिटे बासरी वाजवली. त्या शांततेत तिचे सूर अजूनच गहिरे वाटत होते. त्या सुरावटीत हरवून जात सगळेच झोपेच्या अधीन झाले. स्लीपिंग बॅग मध्ये शिरल्यावर गुडूप झोप कधी लागली ते कळलं सुद्धा नाही.

दुसरा दिवस पहाटे पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने उजाडला. आन्हिके उरकायला 'होल वावर इज आवर' असल्याने आणि वावरात भरपूर प्राणी असल्याने सुरक्षेसाठी जोडीने जाऊनच सगळे उरकले. तलावाच्या काठावर तोंड, दात वगैरे घासत असतांनाच त्याचवेळी एक हत्तीण तिच्या पिलाला घेऊन चूळ भरायला आली. ती जरा लांब होती तोपर्यंत तिचे फोटो बिटो काढले पण अचानकच तिनी आमच्या दिशेने यायला सुरुवात केली. ते पाहून गार्ड दादाने तातडीने तंबू जवळ चराच्या अलिकडे येउन थांबायला सांगितले. आम्ही चरापर्यंत पोचतो न पोचतो तेवढ्यात हत्तीण बाईंनी परत फिरण्याचा निर्णय घेतला आणि त्या उलट्या दिशेने चालू लागल्या. मग आम्ही पण त्यांना तलाव पार करताना पाहण्यासाठी मागे मागे गेलो. हत्तीणबै पाण्यात शिरल्या तसे पिल्लू सुद्धा आईची शेपूट सोंडेत पकडून हळूच पाण्यात शिरले. अलगद विहरत विहरत मायलेकराने तो प्रचंड मोठा तलाव पार करून दाखवून आमच्या डोळ्याचे पारणे फेडले. :) मग पहाटे सूर्योदय बघत बघत फक्कड काळा चहा झाला आणि आम्ही ताजे तवाने झालो. कपडे वगैरे आवरत होतो तेवढ्यात गार्ड काका पोहून आलेले दिसले. लागलीच आम्ही विचारून घेतलं की आम्ही पण पोहलो तर चालेल का हो? गार्ड काकांनी परवानगी दिली. पण तोवर नाश्ता करून ट्रेकला जायची वेळ झाली होती. 'दुपारी पोहायला नक्की जाऊ' असं नवऱ्याकडून कबूल करवून घेतलं आणि नाश्ता करायला टेबल वर जाऊन बसलो.

नाश्त्याच्या टेबलवर पहिल्यांदाच ग्रूप मधल्या इतरांशी बोलायला निवांत वेळ आणि उर्जा शिल्लक होती. 'डॉक्युमेंटरी' काकांशी आणि पत्रकार बाईंशी आधीच ओळख झाली होती. पण परदेशी पाहुण्यांशी पहिल्यांदाच बोलत होतो. त्यांना आमच्या आणि आम्हाला त्यांच्या गोष्टी ऐकून नवल वाटत होतं. ते ऑस्ट्रेलियन जोडपं त्यांच्या नोकऱ्या सोडून, घरदार विकून वर्ष-दोन वर्ष फिरायचं असं ठरवून त्यांच्या देशातून बाहेर पडलं होतं. 'आयुष्यात स्वत:चे घर, गाडी, मूल काहीही नको, फक्त जग फिरायचे आहे.' असं ठरवून ती जोडी मजल दर-मजल करत फिरत होती. पैसे संपले की असू त्या देशात नोकरी, मजुरी करू आणि पुढच्या प्रवासाचे पैसे जमवू अशा तयारीने निघाले होते. भारतात ४ महिने तरी काढायचा त्यांचा बेत होता. आणि या जग प्रवासासाठी सुद्धा त्यांच्याकडे फक्त एक एक सॅक होती. प्रत्येकी २-२ कपडे. एक अंगावर आणि एक सॅक मध्ये. हे बघून मलाच माझ्या २ दिवसाच्या सामानाची लाज वाटली. सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ते पण सगळ्यात स्वस्तातले वापरून फिरत होते. ट्रेनच्या जनरल क्लास मधून ३-४ दिवसांचे प्रवास करून विना आरक्षण भारत भ्रमण करत होते. हे ऐकून आम्ही अवाक झालेलो आणि आम्ही 'स्लीपर वोल्वो' बसने आलो हे ऐकून ते अवाक!! आमच्या लेखी सगळं विकून असं बेफिकीरीत मस्त मौला आयुष्य स्वीकारू शकणारे ते श्रीमंत होते तर 'वोल्वो' आणि 'एसी हॉटेल रूम्स' परवडणाऱ्या आमच्या तथाकथित श्रीमंतीने ते गुंगले होते. त्यातल्या त्यात त्या बेल्जियन मुलीनं आम्हाला जरासं माणसांत आणलं. ती भारतात कुठलासा कोर्स करायला आली होती. आणि सुट्टीत भारत फिरत होती. 'मुलगी', 'एकटी,, 'भार,,, 'भारतातील सुरक्षितता' वगैरेशी तिला काही देणं-घेणं नव्हतं. जगून घेत होती :) भारतातल्या मुलींना हे कधीतरी जमावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आम्ही नाश्त्याला सामोरे गेलो. चविष्ट गप्पा मारता मारता ब्रेड-जॅम, पुरी-भाजी आणि केळी असा भरभक्कम नाश्ता झाला. आता पुढच्या प्रवासात फक्त फिरंगी आणि आम्ही होतो. पत्रकार बाईंनी आणि 'डॉक्युमेंट्री' काकांनी तेथेच विश्रांती घ्यायचे ठरवले आणि आमचा उरलेला ग्रूप चालायला लागला.

एव्हाना गाईडनं सांगितलं होतंच की ट्रेकचं नाव 'टायगर ट्रेल' असलं तरी इथं फारसे वाघ नाहीत. आपण अस्वले आणि हत्ती शोधूया. गवे भेटतीलच वाटेत. त्यामुळे आम्ही वाघ-बिघ दिसायची दिवास्वप्नं न बघता पक्षी, कीटक वगैरे बघत चालत होतो. मध्येच गाईडने त्याच्या काठीने रस्त्यात पडलेले काहितरी हलवले आणि तो अत्यानंदाने चित्कारला 'स्लॉथ बेअर फ्रेश ड्रॉपिंग'. अस्वलाची ती विष्ठा अगदी १५-२० मिनिटापूर्वीची असावी. म्हणजे अस्वल जवळपास असणार होतं. आमचा एक गार्ड अस्वलाच्या हल्यातला सर्व्हायव्हर होता. त्याने आम्हाला अस्वलाशी झटापटीचा किस्सा रंगवून सांगितला. त्याच्या जखमा सुद्धा दाखवल्या. आणि खूप जपून लक्ष देऊन चालायला सांगितले. हत्ती आणि अस्वले हे दोनच प्राणी माणसावर हल्ला करतात. बाकी सगळे माणूस पाहून पळून जातात. गव्यांचा अनुभव तर आम्ही घेतलाच होता. ते पळूनच गेले होते. आता अस्वल आपल्यावर हल्ला करायला जवळ येईल अशी आशा बाळगून आम्ही त्याला शोधत निघालो. कमरेपर्यंत उंच गवत कापत आम्ही चालत होतो. सापा-बिपांची भिती होतीच. पण थ्रिल सुद्धा वाटत होतं. आणि आमचा गार्ड 'या भागात साप नाहीत. मी बघा चप्पल घालून आलो आहे.' असा दिलासा द्यायचा प्रयत्न करत होता. अर्धा-पाऊण तास अस्वलाला शोधले पण ते पठ्ठे कुठं लपून बसले होते काय माहित. एकदा एका झुडपात खुसपूस झाली म्हणून नवरोबाने झूम लेन्सने फोकस करून २-४ फोटो काढले. पण काही नसेल असं वाटून काढलेले फोटो पाहिलेही नाहित. आम्ही तसेच पेरियारच्या सर्वोच्च टेकडीवर पोहोचलो आणि खूप टेकड्या उतरत परत सुद्धा आलो. आम्ही बेसवर पोहोचताच तिथे विश्रांती घेणाऱ्या पत्रकार बाईंनी सांगितलं की सकाळच्या हत्तीण बाई आपल्या पिलासह तंबू भोवती अर्धा तास चरून गेल्या. आधीच आमच्या या सेशनला काहीच चित्त थरारक झालं नव्हतं. दमणूक मात्र फारच झाली होती. आणि त्यात यांना बसल्या जागी हत्तीण बाई भेटून गेल्या म्हणून आम्हाला फार वाईट वाटलं. अजून २ दा ट्रेक आहे आणि काहितरी घडेलच याचं समाधान होतं त्यातल्या त्यात.

तसेच पाय ओढत तंबूत गेलो आणि फतकल मारून बसलो. अर्ध्या तासाने पाहिलं तर ऑस्ट्रेलियन जोडपं तलावात मस्त अंघोळ करून आलं होतं आणि तंबूवर किच्च ओले कपडे वाळत टाकत होतं. त्यामुळं मलापण नवऱ्याकडून सकाळी कबूल करून घेतलेलं आठवलं आणि आम्ही पण तलावात पोहायला गेलो. तासभर डुंबून, पोहून ताजेतवाने होऊन बाहेर पडतच होतो इतक्यात आमच्या शेजारीच पोहत पोहत घोरपड आली आणि समोरच्या काठावर त्या सकाळच्या हत्तीणबाई आणि पिलू. जीव मुठीत घेऊन आम्ही तर्राट तंबूत जाऊन पोचलो.

खोबरेल तेलाच्या फोडणीचा वास नाकात शिरलाच आणि भुकेची एकदम जाणीव झाली. पुन्हा एकदा सांबार, कालच्या पेक्षा वेगळ्याच चवीच्या २ भाज्या आणि वाफाळता भात खाल्ला आणि झाडाखाली जाऊन पसरलो. २ तास मस्त झोप झाल्यावर चहा झाला आणि आम्ही वेगळ्या भागाकडे जाण्यासाठी तराफ्यात स्वार झालो. खूप वेळ तराफ्यातून फिरत फिरत लांबवरच्या जंगलात उतरलो आणि एकदम सर सर पाऊस आला. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी 'बघ मी म्हणलं होतं ना रेनकोट लागतील म्हणून' हे म्हणून घ्यायची संधी सोडणं शक्यच नव्हतं. पण माझं वाक्य संपायच्या आत पाऊस थांबला सुद्धा. आता आम्ही जंगल तुडवत तलावाच्या काठाने फिरत होतो. रान डुकरे, सांबरे वगैरेना सळो की पळो करून सोडत होतो. येवढ्यात आमच्या समोर झुडपात खुसखुस झाली आणि ७०-८० गवे दबकत दबकत पाण्यात शिरले. छोट्याना आडोसा देत, एकमेकाला सांभाळत त्यांनी शिस्तीत एक ओळ बनवली आणि पोहत पोहत तलावातल्या एका बेटावर जाऊन ते गायब झाले. आम्हीपण पुन्हा तराफ्यात जाऊन बसलो आणि पुन्हा तलावातून लांब लांब जाऊ लागलो.

तराफा चालवतानाच एका गाईडला प्रचंड लांबच्या अंतरावर एक हत्ती दिसला. आम्हाला काहीही करून तो दिसतंच नव्हता. त्याला तो नुसता दिसत नव्हता तर तो टस्कर आहे हे सुद्धा दिसत होतं. आम्ही दिसत नाही म्हणून नाद सोडून दिला. पण तो गाईड पक्का चिवट होता. सरळ रेषेत त्या टस्करकडे नेता येत नव्हतं. आम्हाला पाहून तो बिथरला असता. त्यामुळे गाईडने आमचा तराफा टेकडीला वळसा घालून दुसऱ्या बाजूला नेला. आणि तिथून चालत टेकडी ओलांडून हत्तीला कळणार नाही असे लपत छपत आम्ही हत्तीच्या पाठीमागे जाऊन पोचलो. तो आडदांड टस्कर स्वत:च्याच मस्तीत अंगावर माती उडवून घेत होता. एकट्यानेच मजा करून खूष होत होता. त्याला आम्ही कंपनी द्यायला आलो होतो पण त्याला त्याचा पत्ता नव्हता. दगडाआडून लपून छपून त्याला डोळ्यांत आणि फोटोत बंदिस्त केलं आणि अंधार पडायला लागला म्हणून परत फिरलो. तराफ्याकडे जाण्यासाठी वळणे घेत टेकडी पार करत असतानाच अचानकच एका वळणावर आम्ही थबकलो. एक अजस्त्र गवा आमच्याकडे रोखून बघत उभा होता. एका उडीत आम्हा सगळ्यांना सपाट करेल येवढंच अंतर होतं. आमची चांगलीच तंतरली होती. पण तरी फोटो काढायचा मोह आवरत नव्हता. कुणाच्या तरी फोटोमुळे 'क्लिक' चा आवाज झाला तसा तो गवा बिथरला. त्याने जोरदार फुत्कार टाकून एक दणकून हंबरडा फोडला आणि तो दणकन उडी मारून जरासा पुढे आला आणि तसाच यू टर्न मारून झाडीत घुसून पळत सुटला. त्याच्या त्या उडीने हादरलेली जमीन आणि त्याच्या उलट दिशेने जाणाऱ्या दौडीच्या आवाज उनुभवत आम्ही कितीवेळ तेथेच खिळून उभे होतो. त्याने मध्येच यू टर्न मारला आणि म्हणूनच आपण अजून जिवंत आहोत हे कितीतरी वेळ पटतच नव्हते. त्या ट्रान्स मध्येच पावले ओढत गपचूप तराफ्यात येउन बसलो आणि कालच्यासारखेच झगमगत्या आभाळाखालून तंबूकडे परतलो.

जेवलो आणि तंबूत लोळत पडलो. अजून झोप येत नव्हती म्हणून सहज दिवसभराचे फोटो पाहत बसलो. फोटो पाहता पाहता सकाळच्या सेशन मधले झुडपांचे फोटो आले. नवऱ्याला २ मिनिटे आठवतच नव्हते कि हे फोटो का काढलेत? म्हणून झूम करून तो पूर्ण फ्रेम मध्ये भिरभिरला आणि अचानकच मध्येच जर्द पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे असा तुकडा दिसला. २ मिनिटे श्वास अडकलाच आमचा. ते तेच फोटो होते जे नवऱ्याने खुसपूस जाणवली म्हणून काढले होते आणि काही नसेल म्हणून न बघता सोडून दिले होते. पण यात फक्त रंगच दिसत होता. आकार सापडत नव्हता. आम्ही घाई घाईने तसेच गाईड काकांकडे गेलो आणि त्यांना ते फोटो दाखवले. त्यांनी मिश्किलपणाने सांगितले की तुमच्या कॅमेऱ्याला वाघोबा दिसला. आम्ही थोडे खट्टू, थोडे खजील, थोडे आनंदलेले. स्वत:च्या गमतीशीर नशीबाचे काय करावे याचा विचार करत झोपी गेलो. मध्यरात्री निसर्गाची हाक आली म्हणून मी नवरोबाला उठवले. अंधारात झुडपात एकटे जाणे शक्यच नव्हते. नवरोबा हातात इमर्जन्सी दिवा घेऊन सोबतीला आले. कार्यक्रम उरकतच होता तेवढ्यात एका फुटावर साळिंदर समोर येउन बसले. पटापट कार्यक्रम उरकला आणि आम्ही दोघे दिवा लावून ते फुललेले साळिंदर निरखत बसलो. आणि अचानकच दाणादाण आवाज आणि त्यामागोमाग गार्डच्या हाका यायला लागल्या. आमच्या दिव्यामुळे खूपच जवळ फिरत असलेली ती पिल्लूवाली हत्तीण बिथरली होती आणि ती झपाझप आमच्या दिशेने येत होती. आम्ही कसेबसे धडपडत चर ओलांडून तंबूजवळ आलो आणि दिवा बंद केला. केवढे काय काय होऊ शकले असते ते सुरक्षित जागेवर पोहोचल्यावर लक्षात आले. नंतर खूप वेळ ती हत्तीण तिथेच घोटाळत राहिली. आम्ही श्वासाचा सुद्धा आवाज होऊ न देता तिला चांदण्यात बघत राहिलो. पिलाला काही धोका नसल्याचे पटल्यावर ती परत चरत चरत पिलाला घेऊन हळू हळू लांब निघून गेली. इतका वेळ आमचे तंबूच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माळाकडे लक्षच गेले नव्हते. चांदण्याला डोळे सरावल्यावर पाहिले तर एक रानडुकरांचा आणि एक गव्यांचा मोठ्ठा कळप तिथे मुक्कामाला आला होता. त्या कळपाला खूप वेळ निरखून झाल्यावर आम्ही तंबूत आडवे झालो. आज २ वेळा थोडक्यात बचावलो होतो. गव्याने हल्ला करता करता माघार घेण्याच्या धक्यातून सावरत होतो न होतो तेवढ्यात हत्तीण बाईने चाल केली होती. एवढं होताना मन आणि मेंदू इतका खडबडलेला की झोप येणं शक्यच नव्हतं. तंबूचे पडदे उघडेच ठेऊन आम्ही बाहेर पाहत पडून राहिलो.

पहाट झाली. चहा झाला. आता शेवटचा ट्रेक. परतीचा. आम्ही त्या कालच्या वाघाच्या भागात परत जाऊ म्हणून विनंती केली. पण त्या लोकांना पण वेळ पाळायची होती. पण त्यांनी दुसऱ्या रस्त्याने परत घेऊन जायचं कबूल केलं. खरपूस भाजलेले आलू पराठे पोटभर खाल्ले. आणि आमचं सामान पाठीवर लादून चालायला लागलो. वाटेत परत एकदा वेगवेगळी मुंगसे, साळिंदर, माकडे, हरणे, रानडुक्कर वगैरे दिसत होते. पण कालचा न दिसलेला वाघ आम्हाला अजूनही टोचत होताच. चित्त-थरारक अनुभवाने खच्चून भरून पण तो वाघ असा वेड्यासारखा चुकल्याने मन निराश झालं होतं. 'आता काय संपलाच ट्रेक, याहीवेळी वाघोबा असा निसटला. आपल्या नशिबातच नाही.' असा विचार करत पाय ओढत होतो. एक पाणथळ जागा ओलांडता ओलांडता गाईड काकांनी धावत यायचा ईशारा केला. काय असेल याचा विचारही न करता आम्ही धावत जाऊन पोचलो तर समोरच चिखलात साक्षात वाघोबा लोळत होते. आम्ही ते दृष्य नक्की काय आहे आणि खरे-खुरे आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात वाघोबा डिस्टर्ब झाल्याने वैतागून उडी मारून झुडुपात निघून सुद्धा गेले. आम्ही येवढे स्तिमित होऊन ते दृश्य पाहत होतो की फोटो काढायचे सुचले सुद्धा नाही. अखेर आम्हाला याची देही याची डोळा व्याघ्रदर्शन घडले होते! जंगलचा देखणा प्राणी त्याच्या पूर्ण रुबाबासह त्याच्या स्वत:च्या अधिवासात भेटला होता. मन आणि डोळे भरून आले होते. सगळी पायपीट सार्थकी लागली होती. गाईडच्या मते आम्ही खूपच जास्त नशीबवान होतो. या जंगलात वाघ सहज दिसत नाहीतच. पण आम्हाला दिसला होता. फोटो काढायचे राहिलेच पण त्याचीपण फिट्टंफाट झाली होती. काल कॅमेऱ्याला वाघ दिसला-आम्हाला नाही. आज आम्हाला दिसला पण त्याला नाही. :) पण 'डॉक्युमेंटरी' काकांचे चित्त थाऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी हे सगळे चित्रित केले होते. आणि ते आमचे हे सगळे अनुभव सीडी बनवून आम्हांला पाठवून देणार होते. या वाघोबाबद्दल चर्चा करता करता आम्ही आमचे उरलेले अंतर बागडतच पार केले. ट्रेकचा याहून सुरेख शेवट शक्यच नव्हता.

केवळ ४८ तासांनी फॉरेस्ट ऑफिसला परत पोहोचणारे आम्ही ४८ तासांत केवढे काही अनुभवून आलो होतो. अफाट निसर्ग, अफाट ताकदीचे जीव आणि त्यासमोर अगदी खुजे खुजे असलेले आपण. गार्डस काय आणि फिरंगी काय आपल्यासारखीच हाडा-मासाची पण वेगळ्याच मातीची माणसं… या जंगल बुकात शिरताना अगदी लहानसे असणारे आम्ही दोघे केवळ ४८ तासांत त्याची थोडी पाने अनुभवून मोठे होऊन आलो होतो...अजूनही जंगल बुकाची कित्येक पाने बाकीच आहेत. आम्ही ती वाचायच्या संधीची आतुरतेने वाट पाहतोय!

जाता जाता: 'डॉक्युमेंटरी काका' म्हणजे दुसरे कोणी नसून केरळ मधले पक्षीतज्ञ आणि wildlife filmmaker सुरेश एलमन. David Attenborough च्या Life of Birds मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक! यांना केरळ जंगल आणि पर्यटन विभागाने पेरियारवर माहिती/जाहिरातपट बनवण्यासाठी आमंत्रित केले होते. यांच्याच कृपेनी आमचा हा सगळा प्रवास आयुष्यभरात पुन्हा पुन्हा अनुभवता येणार आहे. त्याचाच हा एक छोटासा भाग!

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

अप्रतिम लेख गिरकी ! कधीतरी हा अनुभव नक्की घ्यायचा आहे ही खुणगाठ अजून पक्की झाली आहे !! सुंदर !!

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 7:08 am | प्रीत-मोहर

सु रे आणि ख. आमच्याही बर्‍याच जंगल सफार्‍या बिन- वाघोबा दर्शनाच्याच झाल्यात. असा एक मस्त अनुभव मलाही मिळो पुढल्या वेळेस

नाखु's picture

8 Mar 2016 - 8:38 am | नाखु

आणि सूटसुटीत आटोपशीर.

भाग्य्वान अशासाठी कुणीतरी तज्ञ जाणकार बरोबर होते.
त्या भल्या मनुक्षाचा संपर्क क्रमांक दिल्यास मिपाकरांचा दुवा मिळेल.

अजूनही जंगलात कुठे आणि कधी जायचे याचे (फक्त) बेत ठरविणारा नाखु.

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2016 - 9:18 am | प्राची अश्विनी

+१

जेपी's picture

8 Mar 2016 - 10:38 am | जेपी

+११

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2016 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

स्मिता.'s picture

8 Mar 2016 - 10:07 am | स्मिता.

फोटोंची कमतरता शेवटच्या व्हिडिओने भरून काढली. बासरीचे सूर जंगलातल्या शांततेत कसे वाटले असतील याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतेय :)

सविता००१'s picture

8 Mar 2016 - 10:36 am | सविता००१

सुंदर आणि अप्रतिम लेख. अगदी नुसतं वाचूनच तिथे जायच पक्कं केलं मी...

तुमची सफर खुप खुप खुप आवड्ली :)

दिलखेचक वर्णन आणि मस्त लेख !

जंगल बुक वाचलं. छान लिहिलं आहे. खूप आवडलं.

कंजूस's picture

8 Mar 2016 - 11:22 am | कंजूस

वा्व!

अनुप ढेरे's picture

8 Mar 2016 - 11:30 am | अनुप ढेरे

सुंदर!

मृत्युन्जय's picture

8 Mar 2016 - 11:47 am | मृत्युन्जय

सुरेख सफर

व्वा. अक्षरशः श्वास रोखुन लेख वाचला.
अनुभव थ्रीलिंग आहेच पण तुमची लिहिण्याची श्टाईलही एकदम भन्नाट आहे.
मस्त. एकदम समाधान वाटले.
बघु असा ट्रेक आमच्या वाट्याला कधी येतोय ते.
रच्याकने.
तो वाघोबाचा फोटो टाका की

प्रश्नलंका's picture

8 Mar 2016 - 4:10 pm | प्रश्नलंका

+१

अप्रतिम लेख आणि फोटो. खुपच छान लिहिलयंस.

एकनाथ जाधव's picture

8 Mar 2016 - 4:26 pm | एकनाथ जाधव

थरारक व सुन्दर वर्णन!!!

बरखा's picture

8 Mar 2016 - 4:50 pm | बरखा

लेख वाचुन खुप छान वाटले. जंगल सफारीचे अनुभव खरच खुप छान असतात. फक्त आवड मह्त्वाची...., तरच अश्या अनुभवाची मजा घेता येते.

प्रमोद देर्देकर's picture

8 Mar 2016 - 4:58 pm | प्रमोद देर्देकर

२०१५ मध्ये केरळच्या ट्रिप मध्ये मी या पेरियारच्या त्या तलावात एक जंगल बोट राईड करताना फक्त संपुर्ण काळ्या रंगाची माकडे, विविध पक्षी, सांबर , गवा असे प्राणी दिसले तर हत्तींचा कळप खुप लांबवर होता.
त्या बोटीवरील माणसाने सांगितले की त्याला गेल्या १९ वर्षात फक्त ८ वेळा वाघाचे दर्शन झाले आहे.
त्यामुळे तुम्ही नशिवबवान की निदान पहिल्याच वेळी त्याच्या सहवासात काही क्षण तरी होतात.
त्याच तलावामध्ये असलेला हा केरळचा के दाखवणारा फटु.
1

शलभ's picture

8 Mar 2016 - 5:17 pm | शलभ

अप्रतिम!

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 5:31 pm | वेल्लाभट

अर्र्र!
सहीच. अप्रतिमच. आमचा पेरियार अनुभव अगदीच फुस्स होता.

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 5:31 pm | वेल्लाभट

अर्र्र!
सहीच. अप्रतिमच. आमचा पेरियार अनुभव अगदीच फुस्स होता.

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2016 - 6:15 pm | स्मिता श्रीपाद

वाह वाह...काय सुरेख अनुभव आणि लिहिलय्स त्याहुन सुरेख..
मनाने जाउन पोचलेच तिकडे...

अगं किती भन्नाट ट्रेल आहे.. माझा नवरा तर वेडाच झालाय. ह्या ट्रेलला जायचय हे त्यानि अत्ताच ठरवुन पण टाकले. तो व्हिडिओ सुद्धा सही आहे. तुझ्या नवर्याने काढलेला झाडा-झुडपावाला फोटो पण टाक ना.. म्हणजे आम्ही पिवळे-काळे पट्टे शोधायचा प्रयत्न करतो. :)

अजया's picture

8 Mar 2016 - 7:22 pm | अजया

जबरदस्त सफर.

मनिमौ's picture

8 Mar 2016 - 7:59 pm | मनिमौ

फारच सुंदर अनुभव आहे. मी नक्की जाणार

चैतू's picture

8 Mar 2016 - 10:52 pm | चैतू

निसर्गाच्या सहवासात गेल्यासारखं वाटतंय.

हि जंगल सफारी त्याच तोडीची वाटली.
हॅट्स ऑफ्फ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2016 - 7:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडला लेख. व्यनि करतोय.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 10:39 am | पूर्वाविवेक

जंगल सफारी खूप छान. खुमासदार लेखन आणि देखणे फोटो.
मारुती चितमपल्लींनी कोणे एके काळी मलाही वेड लावले होते. पण लहानपणी रोह्याला राहत असताना आमचे शासकीय निवासस्थान जंगलातच होते. त्यामुळे तिथेच माझी सगळी हौस भागली. तिथेच मी माकडे, कोल्हे, ससे, रानडुक्कर, जंगली कुत्रे, भेकर असे प्राणी पहिले. वाघ प्रत्यक्षात पहिला नसला तरी त्याचे अस्तित्व जाणवायचे, रात्री बरेचदा तो जंगलातून खाली आल्याची वर्दी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, पानांची सळसळ, माकडांचे चित्कार यातून मिळायची. दुसऱ्या दिवशी गायब झालेले कुत्रे आणि कधी मातीच्या रस्त्यावर दिसणाऱ्या त्याच्या पाऊल खुणांतून तो येवून गेल्याचे कळायचे. वेगवेगळ्या प्रकारचे साप आमच्या घराच्या ओटीवर आणि काही घरात मारले , काही पकडले. वेगवेगळ्या प्रकारचे किडे-पाखरे, डोंगरी घोणी, वेगवेगळे पक्षी अस खूप काही पाहिलं. त्या घरात असताना रात्री मी कधीही एकटी किचनमध्ये गेले नाही. सात नंतर टेरेसवर पण जायचे नाही. खूप भिवून पण खूप मजेत दिवस घालवले आहेत तिथे. कारण आजूबाजूला काजू, करवंद, बोर, जांभळ, आंबे इत्यादी खूप झाडे होती. त्या काळात विकत आणून फळ कधी खाल्लीच नाहीत.

नूतन सावंत's picture

9 Mar 2016 - 11:44 am | नूतन सावंत

लेख प्रकाशित झाल्या झाल्या वाचला होतो पण विडिओ पाहता आला नव्हता तेव्हा तो आता पहिला.अपूर्व,अपूर्व असे काहीतरी पहिले.ती हत्तीण आणि तिच्या पिल्लाचे फोटो तर पूर्वीच्या कॅलेंडरची आठवण ठेऊन गेले.असे जंगल ट्रेल करून ते मनोहारी शब्दात मांडले आहेस.व्हिडिओमुळे तर आपणही त्या ट्रेलचा घटकच आहोत असे वाटले.

पैसा's picture

9 Mar 2016 - 1:26 pm | पैसा

जबरदस्त लिहिलंय!

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2016 - 2:07 pm | मधुरा देशपांडे

तू हा लेख जेव्हा पाठवलास, तेव्हा वाचल्याबरोबर हा अंकात विशेष गाजेल याची खात्री होती. मी हा कितीदा वाचलाय माहित नाही, प्रत्येक वेळी छानच वाटतं वाचून. ओघवती लेखनशैली आणि शेवटी तो व्हिडीओ तर अप्रतिम! जियो. धन्यवाद गिरकी. :)

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2016 - 12:22 am | स्वाती दिनेश

मला जे लिहायचे होते ते मधुराने आधीच लिहिले आहे,
खूप छान!
स्वाती

सुमीत भातखंडे's picture

9 Mar 2016 - 3:19 pm | सुमीत भातखंडे

सुंदर अनुभव

सगळ्यांना खूप धन्यवाद :)

खूप जणांनी उत्सुकता दाखवली म्हणून आमचा पोपट करणारा वाघोबाचा फोटू टाकत आहे.
हा फोटो ६०० मिमी फोकल लेंग्थने काढून आणि शिवाय सोफ्टवेअर वापरून क्रॉप केल्यावर असा दिसत आहे. आमच्या डोळ्यांना काय दिसलं असेल म्हणजे काय दिसलं नसेल याची कल्पनाच केलेली बरी. :)

814

भुमी's picture

9 Mar 2016 - 4:08 pm | भुमी

फोटोही अतिउत्तम

मोहनराव's picture

9 Mar 2016 - 4:09 pm | मोहनराव

निवांत वाचला लेख. थरारक अनुभव. या आयुष्यातल्या टुडु लिस्टमध्ये अ‍ॅड केले आहे!!
विडीयोने फोटोंची कमतरता भरुन काढली आहे. वाघोबाचे दर्शन तर अप्रतिमच!!

जिन्गल बेल's picture

9 Mar 2016 - 4:46 pm | जिन्गल बेल

अप्रतीम अनुभव गिरकी !!! सुरेख शब्दचित्र!!!

विशाल चंदाले's picture

10 Mar 2016 - 7:06 pm | विशाल चंदाले

गिरकी, मस्त सफर. फोटो आणि वर्णन अगदी सुरेख.

जुइ's picture

11 Mar 2016 - 9:54 am | जुइ

जंगलाचा हा ट्रेक खासचं झाला! शेवटच्या व्हिडीयोने बहार आणली. tarafa

पूर्वाविवेक's picture

11 Mar 2016 - 10:29 am | पूर्वाविवेक

मला काल तुझा हा व्हिडीओ दिसत नव्हता. आज प्रयत्न केला तर दिसला. तुम्ही जे अनुभवलं आहे शब्दातीत आहे याची जाणीव झाली.
तुझ ओघवत लेखन, देखणे फोटो आणि हा व्हिडीओ मुळे तुझा लेख या अंकातील सर्वोकृष्ट लेख झाला आहे. असेच बहारदार अनुभव तुझ्या लेखातून आम्हाला वाचायला मिळावेत. चिअर्स !

स्वीट टॉकर's picture

11 Mar 2016 - 1:35 pm | स्वीट टॉकर

किती सुरेख लिहिलं आहेत! अगदी समोर बसून आम्हाला ते वर्णन सांगता आहात असा फील येतो वाचताना. आणि तुम्हाला आलेले ते दोन जबरी अनुभव!
फोटोंमुळे चार चाँद लागले आहेत. विडियो पाहू शकलो नाही पण नक्की पाहीनच.
अशाच दर वर्षी जात जा आणि आम्हालाही व्हर्चुअल ट्रेक घडवा.

पद्मावति's picture

11 Mar 2016 - 11:48 pm | पद्मावति

आहा, मस्तं सफर आम्हाला घडवलीस. खूप धन्यवाद या सुंदर अनुभवकथनासाठी.

खूप छान लिहिलं आहेस... अगदी सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
नवरोबालापण दाखवला व्हिडिओ आणि आपण इथे कधितरी नक्की जयचं अशी तंबीपण दिली.

आनन्दिता's picture

13 Mar 2016 - 1:13 am | आनन्दिता

विशेषांक आल्यापासुन हा लेख कितीतरी वेळा वाचला. परत परत वाचला. वाचुन झाल्यावर प्रत्येकवेळी इतकं भारावायला होतं की, प्रतिसाद द्यायला शब्द ही सुचत नाहीत. जियो गिरकी!! पेरियार अन तुझं लिखाण दोन्हींना स्टँडींग ओव्हेशन.

यानिमित्ताने तु खुप कमी वेळा लिहीतेस ही तक्रार मात्र कराविशी वाटतेय. तुझे आणखी लेख वाचायला खुप आवडेल.

सुबक ठेंगणी's picture

14 Mar 2016 - 5:34 pm | सुबक ठेंगणी

शब्दातीत अनुभव एवढ्या सुंदर शब्दात मांडलात तुम्ही!
तुमचा लेख वाचून प्राण्यांच्या मुक्या विश्वाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झालिये.
(मला प्राण्यांचा विशेष लळा नसूनही :( )

अस्वस्थामा's picture

15 Mar 2016 - 7:47 pm | अस्वस्थामा

लेख तर आहेच पण फोटू अप्रतिम..!!

विशाखा पाटील's picture

15 Mar 2016 - 11:03 pm | विशाखा पाटील

मस्त ! पेरीयारला एवढे प्राणी खरेच आहेत, याची या लेखाने खात्री पटली. आम्हाला हत्ती आणि पक्षांशिवाय काहीच दिसले नव्हते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Mar 2016 - 11:05 pm | निनाद मुक्काम प...

वाचन खुण साठवली आहे

बोका-ए-आझम's picture

15 Mar 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम

इथे नक्की जाणार!रच्याकने तुमचा travel blog आहे का हो? नसेल तर चालू करा. फार छान लिहिलंय.

खूप मस्त लिहिलय! अतिशय आवडला हा लेख!

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2016 - 12:08 pm | सानिकास्वप्निल

खत्रा अनुभव!! क्लास लिहिले आहेस, ओघवतीलेखनशैली कमालीची आवडली. व्हिडिओ तर बेस्ट आहे. माझी बाळं जरा मोठी झाली की मी ही ट्रेल नक्की नक्की करणार आहे, वाखु साठवलिये.

एक एकटा एकटाच's picture

20 Mar 2016 - 11:24 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

मोदक's picture

21 Mar 2016 - 1:44 am | मोदक

सुंदर लेख..!!!

Maharani's picture

22 Mar 2016 - 6:55 am | Maharani

Apratim lekh....apratim photo....