मेक इन इंडिया - इलेक्ट्रिक मोटारसायकल

मम्बाजी सर्वज्ञ's picture
मम्बाजी सर्वज्ञ in तंत्रजगत
8 Feb 2016 - 3:42 pm

लहान पणा पासून इतिहासातली आणि शास्त्राच्या पुस्तकातली व्यक्तिचित्रे शिक्षकांनी कोळून पाजल्यामुळे असे होते कि त्यांच्या 'मोठे'पणाचा अर्क निघून जातो आणि 'अभ्यासू' मन फक्त त्यांनी लिहिलेले नियम आणि आकडे लक्षात ठेवायला लागते. अशा वेळी लक्षात राहतात ते स्वतः ला पटलेले, याची देहा याची डोळ्या पाहिलेले आणि महत्वाचे म्हणजे अगदी आपल्यासारखे वाटणारे, सामान्य माणसातले एक असणारे 'नमुने'.

सेड्रिक लिंच - जन्म डिसेंबर १९५५, शिक्षण वयाच्या १२व्या वर्षी सोडून दिले. आवड/छंद : इलेक्ट्रिक/मेक्यानिकल मोटर्स. वागणे अतिशय विक्षिप्त, बोलण्याची पद्धत त्याहूनही विक्षिप्त, पण नाकासमोर चालणारा आणि छक्के पंजे न समजणारा माणूस. त्याचमुळे सुरुवातीला बर्याच लोकांनी तर उडवली. धंद्यात फसवणूक पण झाली. पण काम थांबवलेले नाही.

माझी या माणसाशी ओळख होण्याचे कारण म्हणजे Manx TT ची रेस. टी टी च्या रेस मध्ये भाग घेणे हे चार धाम किवा अमरनाथ च्या यात्रेला जाण्यासारखे आहे. भाग घेणारे बरेच लोक वर्ष दोन वर्ष पैसे जमवतात, कुणी स्पॉनसर मिळवतो, तंबूत आणि गाडीत राहतात आणि २ आठवडे फक्त मोटारसायकल पळवतात. थोडक्यात बहुतौंश लोक सामान्य आयुष्य जगणारे, रोजच्या पठडीतले आहेत. फक्त 'रायडींग ' च्या प्रेमापोटी आणि धाडसाच्या व्यसनापायी इथे येतात. स्पर्धा काही विशेष तयार केलेल्या स्टेडीयम मध्ये किवा track वर होत नाही, ती होते 'isle of man ' नावाच्या बेटावर, तिथल्या रोजच्या वापरात असणार्या रस्त्यांवर (अर्थात वाहतूक/वर्दळ थांबवून). हे सगळे रस्ते अगदी पुण्यातल्या रस्त्यांच्या लांबी-रुंदीचे आहेत - दोन कार्स एका वेळी जाऊ शकतील एवढे. स्पर्धेच्या वेळी गाड्यांचा वेग कधी कधी ताशी २०० मैल (तशी ३३२ किलो मीटर) इतका जातो.चूक झाली कि खलास! त्याहूनही वाईट म्हणजे शरीराचा भाजीपाला होऊन जिवंत राहणे - vegitative state. स्पर्धेचे बक्षीस काही अवास्तव नाही. फक्त पहिले, दुसरे आलेले खेळाडू त्यांचे खर्च केलेले पैसे परत मिळवतात. पण परत जाताना प्रत्येक जण जो अनुभव घेऊन जातो त्याला तुलना नाही. काही तरी 'भन्नाट' करायचे भूत डोक्यात घुसले कि पैसे, नोकरी, सुट्टी, आराम, दारू, मजा वगरे अपोआप मागे पडतात. अन मग सुरु होते स्पर्धा - स्वतःशी. कारण जिंकण्याचा तो एकच मार्ग आहे. स्वतःवर, स्वतःच्या भीतीवर - मरणाच्या आणि हरण्याच्या दोन्ही - विजय मिळवणे हा एकच मार्ग, दुसर्याला हरवणे हि अतिशय दुय्यम गोष्ट. स्पर्धा फक्त रायडर्स मध्ये नसते, सगळ्यात महत्वाची लढाई तर स्पर्धा सुरु होण्या अगोदर 'इंजिनीरिंग' टीम्स मध्ये होते. 'ब्लीडींग एज टेक्नोलॉजी' म्हणजे काय ते बघायचे असेल तर इथे येउन बघायचे. स्पर्धे पूर्वी २४ तास मोटारसायकल चे इंजिन ट्यून करून माउंट करू शकणे, आणि महत्वाचे म्हणजे त्या रायडरचा तुम्ही केलेल्या कामावर विश्वास असणे, आणि तुम्ही केलेल्या चुकीचे परिणाम तो भोगणार आहे हे तुम्हाला माहित असताना शेवटच्या काही तासात रस्त्याच्या, हवेच्या, वार्याच्या परिस्थिती नुसार त्या इंजिन मध्ये आणि मोटारसायकलच्या 'structure ' मध्ये (बहुतेक वेळा पूर्व निर्धारित नसलेले) बदल करणे, हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.

(मान्क्स टी टी हाच एक वेगळा आणि प्रचंड विषय आहे, त्यावर पुन्हा कधी तरी सविस्तर लिहीन.).

२०१० च्या TT च्या रेस मध्ये एक नवीनच प्रकार 'इंट्रोड्यूस' करण्यात आला - टीटी झिरो - इलेक्ट्रिक मोटारसायकलस ची रेस!. पेट्रोल वरच्या मोटारसायकल ची रेस बघायला खूप चाहते असतात. तशी २०० किलोमीटर च्या प्रवासाने जमिनीवरून उडणारे मिसाइल बघायला खूप चाहते येतात, पण इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या रेस ला फार चाहते नवते. त्याचे कारणही तसेच आहे - एक तर वेग फार नाही, त्यामुळे 'थ्रिलिंग' फ्याक्टर चा अभाव. 'स्मार्ट' आणि 'हायब्रीड' कार्स वापरात येउन बराच काळ झाला असल्या मुळे जनतेला त्यांचे 'विकनेसेस' चांगलेच परिचित होते. इलेक्ट्रिक गाड्या फार स्पीड घेऊ शकत नाहीत, पैसे वाचवण्यासाठी केलेले जुगाड, दुरुस्त करायला कटकटीच्या,चार्जिंग डीसचार्जिंग ची कटकट, ब्याटरी खराब होण्याची शक्यता, ती दुरुस्त करण्याचा खर्च इत्यादी, आणि मुख्य म्हणजे नवीन तंत्रज्ञानाला स्वभावतः येणारा विरोध. या सगळ्या समस्या समोर असल्या तरी 'झपाटलेले-येडे' लोक स्वतःचे संशोधन करून, इलेक्ट्रिक मोटार बनवून ते पेट्रोल च्या मोटारसायकलवर बसवून स्पर्धेसाठी हजार झाले.

तंत्रज्ञान मर्यादित असल्यामुळे फार कमी 'एन्ट्रीज' होत्या. स्पर्धेचे नियम होते -
१. गाडीचे वजन १०० आणि ३०० किलो च्या मध्ये असावे.
२. वोलटेज ५०० वोलट्स पर्यंत मर्यादित.
३. री-जनरेटीव ब्रेक्स चा वापर करणे ग्राह्य (फिरणाऱ्या चाकाची गती कमी करताना ती उर्जा साठवून ठेऊन परत वापरण्यासाठी यांचा उपयोग केला जातो - पेट्रोल गाड्यांच्या रेस मध्ये वापरता येत नाहीत.)
४. रायडर मोटारसायकल वर बसल्यावर दिसणे अपेक्षित (काही मोटारसायकलस वर फ़ेअरिङ्ग नावाचा प्रकार असतो त्यामुळे रायडर चे पाय, धड पूर्ण दिसत नाहीत).

भाग घेणाऱ्या संघांमध्ये खरी चढाओढ होती ती मोटारसायकलचे इंजिन बनवण्यात. साधारणतः ६० किलोमीटरचे अंतर (डोंगराळ प्रदेशात, चढाव आणि उतार आहेत आणि वार्याचा अवरोध प्रचंड असतो) न थांबता पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्जा पैदा करू शकणारी battery बनवणे, तिचा आकार आणि वजन स्पर्धेच्या नियमांच्या चौकटीत बसवणे, स्पर्धे अगोदर कमिटी कडून सगळे डिझाईन अप्रूव करून घेणे, हीच एक मोठी लढाई होती. या स्पर्धेत एक एन्ट्री होती 'अग्नी मोटर्स'!!! सेड्रिक लिंच, अरविंद राबदिया आणि हसमुख राबदिया या तिघांनी मिळून उभी केलेली कंपनी. सेड्रिक चे सौशोधन आणि अरविंदने त्याचे भारतातले contacts वापरून मनुष्यबळ मिळवून उभी केलेली कंपनी.

रेस बघताना पेट्रोल आणि इलेक्ट्रिक गाड्यांमधला फरक जाणवत होता. जेवा ५०० किवा १००० सीसी चं रॉकेट आवाज करत धावायला लागते तेवा तुम्ही उभे असलेल्या ठिकाणावर, ते येण्या अगोदर आणि तिथून निघून गेल्यावर, जवळ जवळ १० सेकंद त्याचा आवाज येत राहतो. गाडी जेवा शेजारून जाते तेवा वार्याचा एक झोत फटका मारून जातो. दर्दी रायडर्सना नुसत्या मोटारसायकलच्या आवाजानेच झिंग चढते. चालवणारा रायडर आणि मोटारसायकल हे दोन अविभाज्य भाग असतात (जो पर्यंत सगळे 'मार्गावर' असते तो पर्यंत).
या उलट इलेक्ट्रिक गाड्या. अगदी जवळ येई पर्यंत पत्ता लागत नाही. वेग मात्र ७०-८० मैल. आवाज जवळ जवळ नाहीच. बेसावध बसलेले लोक अचानक खडबडून जागे होई पर्यंत गाडी गायब. काही प्रमाणात या कारणामुळे प्रेक्षकांचा अपेक्षा-भंग होत होता, background music शिवाय ऐकलेले गाणे असल्यासारखा प्रकार वाटत होता तो. कित्येक वेळा रायडर्स ना एक विचित्र समस्या त्रास देत होती - रस्त्यात बसलेली कबुतरे पेट्रोल च्या गाडीच्या आवाजाने उडून जात पण इलेक्ट्रिक मोटारसायकलचा आवाज अगदी जवळ येईपर्यंत जाणवत नसल्याने काही पक्षी शेवटच्या क्षणाला उडायचे. इतक्या वेगात कबुतर रायडरला हेल्मेट वर धडकले तर अपघात होण्याची शक्यता प्रचंड होती. आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे रस्ता बर्याच ठिकाणी कड्या जवळून जातो आणि तिथे वार्याचा आवाज प्रचंड येत होता. बहुतेक रायडर्स, टी टी झिरो मध्ये धावण्या अगोदर पेट्रोल-मोटारसायकल च्या रेस मध्ये धावून आले होते. त्यामुळे ६०-७० मैल्स च्या वेगात, शांत घोंगावणारा आवाज त्यांना बेचैन करत होता.

रॉबेर्त बार्बर ने आणि सेड्रिक च्या 'अग्नी' ने ३७ मैलांचे अंतर २५ मिनिटात कापून दुसरा क्रमांक पटकावला. सरासरी वेग ८९ मैल्स. पहिला क्रमांक आला होता अमेरिकन स्पर्धक मोटोझायीझ चा - ९६ मैल्स!. या कंपनीचा मालक होता मायकल झायीझ. थोड्या फार प्रमाणात हा माणूस सेड्रिक चा दुसरा अवतारच आहे. पण सेड्रिक मध्ये आणि बाकीच्यांमध्ये फरक आहे तो शिक्षणाचा आणि पाठीशी उभ्या असलेल्या पैशाच्या ताकदीचा. शिक्षण सोडून निव्वळ आवड म्हणून मोटर्स बनवणारा सेड्रिक कधीच पैशाच्या पाठी धावला नाही. या उलट तो ज्या ज्या स्पर्धेत उतरल्या तिथे त्याचे स्पर्धक मल्टी न्याशनल कंपन्यांचे प्रायोजक घेऊन येत होते.

७० च्या दशकात जेव्हा शिक्षण सोडून मोटर्स शी खेळ सुरु केला तेव्हा पहिली 'इलेक्ट्रिक मोटर' बनवण्यासाठी सेड्रिक ने पत्र्याच्या डब्यांचा वापर केला होता (इथल्या लोकल स्टोर्स मध्ये या डब्यात अन्न भरून हवाबंद करून विकतात). १९७९ मध्ये इन्सटिट्युट ऑफ मेकानिकल इंजीनिअर्स ने ठेवलेल्या स्पर्धेत ५० जनांत दुसरा क्रमांक पटकावला. या वेळी सेड्रिक चे वय होते जेमतेम २५. आणि बाकीचे ९०% स्पर्धक कुठल्या न कुठल्या नामांकित कंपनीने पाठवलेले इंजीनिअर्स होते!!

जे बहुतेक जिनियस लोकांच्या बाबतीत घडते तेच सेड्रिक च्या वाटेला आले. २००२ च्या दरम्यान तो काम करत असलेल्या कंपनीने त्याची डिझाइन्स घेऊन, मोटर्स बनवून, त्यांना त्याचेच नाव दिले (लिंच मोटर्स) आणि त्यांचे तांत्रिक हक्क स्वतः कडे ठेवले (अशी अनेक उदाहरणे आहेत, निकोला टेस्ला ला त्याच्या डी सी करट च्या शोधत असाच लुबाडला होता). कंपनी बुडाल्यानंतर सेड्रिक ला हे सगळे घोटाळे समजले. मग दावे-प्रती-दावे यातून येणाऱ्या कटकटी वगरे झाल्या आणि शेवटी सेड्रिकने अरविंद बरोबर काम करायला सुरुवात केली. अरविंद स्वतः सेड्रिक ने बनवलेल्या मोटार वर चालणारी गाडी रेस मध्ये चालवत असे. त्यातूनच त्यांची एकमेकांशी ओळख झाली.

स्ट्रीमलायनर

साधारणतः ४ महिन्यांपूर्वी ऑफिस मधून घरी येताना 'सर्विसेस' ला एक वेगळीच मोटारसायकल दिसली. दिसायला पाणबुडी सारखी, खालून दोन लहान चाके बाहेर आलेली, विचित्र. सेड्रिक ची स्ट्रीमलायनर!!! इंग्लंड मध्ये मोटारसायकल रस्त्यावर आणण्यासाठी कडक नियम आहेत. वर्षातून एकदा गाडीचे कडक inspection करून घ्यावे लागते. फेल झालेल्या गाड्या रस्त्यावर आणायला परवानगी नाही. सेड्रिक ची हि पाणबुडी रस्त्यावर बघून येणाऱ्या जाणार्यांना वाटायचे कि हा प्रकार बेकायदेशीर असावा, पण वस्तुस्थिती हि आहे कि तो हि गाडी कायदेशीर पाने १० वर्षांपेक्षा जास्त काल चालवतोय.
सर्विसेस मध्ये दिसला तेवा गाडीची कॅनोपी उघडून बाहेर येत होता. पायात चप्पल सुधा नवती (बहुतेक वेळा पायात काहीही न घालता गाडी चालवतो). बोलताना विचित्र आक्सेनट मध्ये बोलत होता. आजू-बाजुच्यांपैकी कुणालाही माहिती नवते कि हा एक मल्टी मिलिअनेर आणि प्रचंड हुशार प्राणी आहे. बोलता बोलता म्हणाला गेली १०-१२ वर्षे तो हि गाडी सौर उर्जेवर चालवतोय, आणि एकदा चार्ज केली कि ती ४००-५०० किलोमीटर धावते.

मुद्दामून सर्विसेस मधून बाहेर पडलो तो त्याच्या मागेच. पठ्या ६० मैल्स (96km ) च्या वेगात धावत होता आणि आजू बाजूच्या गाड्यांमधून जाणारे लोक वळून वळून बघत होते. गम्मत म्हणजे त्यांना हा प्राणी कोण हा ठावूक नवते, भारतातल्या लोकांना सेड्रिक कोण हे माहिती नाहीच, अगदी तसेच जसे आपल्या सगळ्यांना स्टीव जॉब्ज कोण हे माहिती आहे पण स्टीव वाझ्नियक कोण हे माहिती नाही.....

असा हा जगावेगळा प्राणी सध्या भारतात गांधीधाम इथे 'अग्नी मोटर्स' चे काम करतोय. मेक इन इंडिया च्या ब्यानर खाली नवीन कंपन्या किती तयार होतायत आणि किती काल टिक्ताय्त ते बघायला मिळेलच. पण अजून ५० वर्षांनी, कदाचित भारतात इलेक्ट्रिक मोटारसायकलस मिळायला लागतील, बाहेरच्या देशातून 'इम्पोर्ट' केलेल्या, अव्वा च्या सव्वा किमतीत, प्रचंड कर आकारलेल्या.. जेवा इलेक्ट्रिक गाड्यांचा सूळसुळाट झाला असेल, तेवा आत्ता आपण न्यूटन आणि जेम्स व्याट चे धडे जसे शालेय पुस्तकात वाचतो, तसा सेड्रिक चा धडा बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.

(हा लेख लिहायला घेतला तेव्हा 'विज्ञान लेखमाला' चे टार्गेट ठेवले होते. पण वेळे अभावी लिखाण लवकर पूर्ण झाले नाही. Images टाकायच्या होत्या पण बरीच खटपट करूनही जमले नाही, शेवटी तसाच 'पब्लिश' करतो आहे.)

प्रतिक्रिया

पैसा's picture

8 Feb 2016 - 4:18 pm | पैसा

उत्तम ओळख. फोटो गूगल किंवा फ्लिकरवए टाकून त्याची लिंक द्या.

मोदक's picture

8 Feb 2016 - 4:39 pm | मोदक

उत्तम लेख.. फोटोंच्या प्रतिक्षेत.!

उगा काहितरीच's picture

8 Feb 2016 - 4:49 pm | उगा काहितरीच

२०० मैल (तशी ३३२ किलो मीटर)

Are you sure ? बापरे !

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 5:03 pm | मम्बाजी सर्वज्ञ

Kawasaki rider James Hillier is looking to claim the fastest speed ever recorded for a motorcycle on closed roads at the Isle of Man TT after registering over 206 mph on his Strava GPS app on the famous Sulby straight riding a Ninja H2R in a parade lap.11 Jun 2015

https://www.google.co.uk/search?newwindow=1&safe=active&site=&source=hp&...

विश्वास न बसण्या सारखे आहेच. बहुतेक जेट लाय्नर्सचा टेक ऑफ स्पीड २०० मैल्स च्या आस पास आहे. या वेगाने मोटारसायकल नुसती रस्त्यावरून चालवणे (स्पर्धा वगरे सोडून द्या) हेच एक आश्चर्य आहे. म्हणूनच टी टी ला फक्त माथेफिरू लोक येतात कि काय असे वाटते.

उगा काहितरीच's picture

8 Feb 2016 - 6:19 pm | उगा काहितरीच

अवघड आहे. (एकदा FC रोडवर रविवारी संध्याकाळी चालवा म्हणावं ४० ची स्पिड गाठली तर शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार करण्यात येईल. ) जोक्स अपार्टस् खरंच कमाल आहे . एकदाच संगमवाडी रोडवर १२० गाठलं होतं ! त्यावरून ३०० + वगैरे कसे असेल ते थोडेफार कळू शकते . Hats off त्या रायडर्सलाही आणी त्या इंजिनियर्सलाही.

बबन ताम्बे's picture

8 Feb 2016 - 6:36 pm | बबन ताम्बे

बापरे, घाबरून पळालो होतो बाजूला. तेंव्हा बीआरटी नव्हती संगमवाडी रोडवर. आता मुष्कील आहे १२० चा स्पीड.

उगा काहितरीच's picture

8 Feb 2016 - 10:14 pm | उगा काहितरीच

होय आता अवघड आहे. तेव्हा चालू झाले नव्हते बिआरटी.

भंकस बाबा's picture

8 Feb 2016 - 5:18 pm | भंकस बाबा

उत्तम , लेख आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Feb 2016 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेख. संशोधनात झोकून देणार्‍या एका भारतियाची रोचक गोष्ट !

प्राची अश्विनी's picture

8 Feb 2016 - 6:31 pm | प्राची अश्विनी

+11

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 6:36 pm | मम्बाजी सर्वज्ञ

हा माणूस मुळचा ब्रिटीश आहे. पण काही लोकांना देशाच्या सीमा नसतात, त्यातला प्रकार आहे. गांधीधाम मधल्या कामाची सुरुवात करून ८-१० वर्षे झाली आहेत (अरविंद राबडिया ने पुढाकार घेऊन भारतातून काम चालू केले).

चाणक्य's picture

8 Feb 2016 - 6:21 pm | चाणक्य

भारीये.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 8:16 pm | मम्बाजी सर्वज्ञ

सेड्रिक ची स्ट्रीमलायनर - सेड्रिक सगळ्यात उजवीकडे.

StreamLiner

मोटो सैझ - २०१० ची विजेती मोटारसायकल.
MotoCzyze

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 8:19 pm | मम्बाजी सर्वज्ञ

अग्नी मोटर्स, सेड्रिक आणि अरविंद.

TeamAgni

मोटो सैझ स्पर्धेत...
MotoCzyzeRacing

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 8:23 pm | मम्बाजी सर्वज्ञ

टी टी रेस मधला एक क्षण
ManxTT

स्पर्धेच्या रस्त्याचा नकाशा
TTMap

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 8:26 pm | मम्बाजी सर्वज्ञ

सर्व चित्रे जालावरून साभार

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 8:28 pm | संदीप डांगे

थक्क करणारं आहे सगळं! (जमल्यास फोटो लेखात जोडुन घ्या)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

8 Feb 2016 - 8:43 pm | मम्बाजी सर्वज्ञ

'पब्लिश' केलेला लेख 'एडीट' करता येतो का?
पहिल्यांदाच लिहितोय त्यामुळे फार माहिती नाही.

संदीप डांगे's picture

8 Feb 2016 - 9:03 pm | संदीप डांगे

हो, संपादन असा टॅब येतो लेखाच्या शिर्षकाखालीच...

मुक्त विहारि's picture

8 Feb 2016 - 9:29 pm | मुक्त विहारि

बाइकचे वेड एकदा लागले की सुटत नाही.

मोदक's picture

9 Feb 2016 - 11:26 am | मोदक

+११११११

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Feb 2016 - 9:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

काय कमाल आहे लोकांची! धन्यवाद मंबाजी सुंदर ओळख करून दिलीत.
आमची दौड फकस्त फोटू पाहण्यापर्यंतच.

मस्त लेख. अशा गाड्या विकायला कधी येणार.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

9 Feb 2016 - 3:39 pm | मम्बाजी सर्वज्ञ

या सगळ्या कन्सेप्ट बाईक्स आहेत. इलेक्ट्रिक मोटारसायकलस च्या क्षेत्रात अजूनही बरेच शोध लागतायत. कार्स पेक्षा मोटारसायकलस 'अफोर्डेबल' बनवणे कठीण काम आहे कारण ब्याटरिज हा सगळ्यात महाग भाग असतो आणि निव्वळ एका माणसाच्या वाहतुकीसाठी परवडणारा नाही. शिवाय या गाड्यांना फारसे 'फ्यान फाल्लोअर्स' नाहीत कारण यांचा 'आवाज' नाही, फायरिंग नाही. 'स्पोर्ट्स' क्यातेगोरीत कदाचित फक्त कन्सेप्ट बाईक्सच येतील पण साध्या 'डे टू डे' वापरासाठी इलेक्ट्रिक गाड्या आल्या आहेत.
या सगळ्या प्रकारात महत्वाचा भाग आहे तो सौशोधनाचा. आपल्याला फक्त रेस दिसते पण एका रेस च्या मागे २-२ वर्षे खपणारे इञ्जिनॆर्स असतात. एफ वन हा प्रकार पण असाच आहे. निव्वळ एफ वन च्या रेसेस मुले नुसत्या कार्स च्या इंडस्ट्रीत नाही तर एरोनोतिक्स मध्ये वापरण्यासारखे बरेच शोध लागले आहेत.

ही माहिती इथे पण दिलीत तर उत्तम.

मी अज्ञानी आहेच, पण अज्ञान दूर करायचा प्रयत्न मात्र जरूर करीन.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 4:53 pm | संदीप डांगे

निव्वळ एफ वन च्या रेसेस मुले नुसत्या कार्स च्या इंडस्ट्रीत नाही तर एरोनोतिक्स मध्ये वापरण्यासारखे बरेच शोध लागले आहेत.
>> +१०००००. असे डाय-हार्ड येडेच नविन नविन शोध लावत असतात. त्याचीच सोफिस्टिकेटेड वर्जन्स वापरणारे काही सामान्य जन अशा स्पर्धांना नाक मुरडत असतात. म्हटलं तर अगदी कुठल्याही प्रकारच्या भंगार मोटरस्पोर्टमधूनही काही ना काही उपयुक्त मिळतच आलेले आहे. कारण ह्या येड्या लोकांचं लक्ष्य कायम एक्सीलेन्स हेच असतं.

There is no space for perfection in real engineering world, only the quest for excellence...because perfection can not fulfill the unquenchable human desire.

खेडूत's picture

9 Feb 2016 - 6:45 am | खेडूत

मस्त ओळख.

एस's picture

9 Feb 2016 - 11:19 am | एस

लेख आवडला.

मास्टरमाईन्ड's picture

9 Feb 2016 - 3:57 pm | मास्टरमाईन्ड

खरंच छान लेख आहे.

Sunilpatil1111's picture

13 Mar 2016 - 12:34 am | Sunilpatil1111

मला असे लेख वचयला खुप आवडतात अणी य्हा पुधे देकिल नक्कि अवडेल.
आपला अभारी

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 12:18 pm | बोका-ए-आझम

आधी वाचला नव्हता पण आता वाचला आणि प्रचंड आवडला. एकदम सकारात्मक ऊर्जा देणारा लेख आहे. सेड्रिकचा आणि तुमचा परिचय आहे तर त्याची मुलाखत घेऊन मिपावर टाका असं सुचवतो.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

15 Mar 2016 - 4:26 pm | मम्बाजी सर्वज्ञ

धन्यवाद!!
माझी त्याच्याशी वैयक्तिक ओळख नाही (मी त्याला ओळखतो पण तो मला ओळखत असेल असे वाटत नाही :-)). एकदा टी टी बघायला गेलो होते तेवा आणि एक दोन वेळा रस्त्यात भेटला होता.
संधी मिळाली तर नक्कीच इंटरव्यू घेईन!

असाच एक विक्षिप्त वाटणारा पण भन्नाट प्राणी आहे गाय मार्टिन. त्याच्याबद्दल लिहिणार आहे पुढच्या लेखात.

बहुगुणी's picture

15 Mar 2016 - 5:15 pm | बहुगुणी

लिहा, वाट पाहू.

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 7:44 pm | भाऊंचे भाऊ

अन मग सुरु होते स्पर्धा - स्वतःशी. कारण जिंकण्याचा तो एकच मार्ग आहे. स्वतःवर, स्वतःच्या भीतीवर - मरणाच्या आणि हरण्याच्या दोन्ही - विजय मिळवणे हा एकच मार्ग, दुसर्याला हरवणे हि अतिशय दुय्यम गोष्ट.

वा...

हि लिंक बघा, आपल्या यामाहा एफ्झी ला इलेक्ट्रिक बनवली यांनी, कामाची गोष्ट आहे.
http://www.torkmotorcycles.com/
माहितीबद्दल धन्यवाद!