कण-भौतिकी आणि LHC

राहूल's picture
राहूल in काथ्याकूट
14 Sep 2008 - 7:15 am
गाभा: 

आगाऊ सूचना: जर कुणाला विज्ञानाची (विषेशतः भौतिकशास्त्राची) ऍलर्जी असेल तर हा लेख वाचून स्वतःचे डोके आपटून घेऊ नये. हे लिखाण विकिपिडिया तसेच इतर काही पुस्तकांच्या आधारे केले आहे. याच संदर्भातील 'मिपा'वरचा अजून एक धागा येथे सापडेल.

कण-भौतिकी

विषयाचे नाव वाचून धक्का बसला असेल... मलाही बसला. कारण 'Particle Physics' चे भाषांतर करताना नाकी नऊ आले; 'कण-भौतिकी' पेक्षा जर अधिक संयुक्तिक नाव कुणाला सुचले ('बिंदू-भौतिकशास्त्र' वगैरे!), तर जरूर कळवा. अजून एक विनंती: मी भौतिकशास्त्रज्ञ नसल्यामुळे मूळ इंग्रजी संज्ञांचे मराठी भाषांतर करण्याचा आचरट प्रयत्न काही ठिकाणी केला आहे. तसेच मराठीमधील समांतर शब्द न सापडल्याने बरेच 'विंग्रजी' शब्द खाली वापरले आहेत. चू.भू.द्या.घ्या.

तुम्ही शाळेत असताना भौतिकशास्त्र नक्कीच शिकला असाल (बहुदा मराठी माध्यमातून). पण बहुतेकांनी हा विषय फक्त परीक्षेसाठी घोकला असेल (मनातून शिव्या देत). खरेतर या विषयाची थोडी गोडी लागली तर आपले जग किती अद्भुत आहे याची जाणीव होते. विकिपिडियाच्या (विश्वकोश) आणि इतर पुस्तकांच्या रूपाने सामोरे येणारे आधुनिक भौतिकशास्त्र हे लहानपणी शिकलेल्या भौतिकशास्त्राच्या बरेच पुढे गेले आहे. तरीपण सगळ्यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूचे घटक माहीत असतील अशी आशा करतो.

कण-भौतिकी म्हणजे अणूच्या आत राहणार्‍या या बालगोपाळांचा आणि त्यांच्या लहान भावंडांचा (quarks, photons, neutrinos इ.) अभ्यास. थोडक्यात म्हणजे, विश्वातील अति-सूक्ष्म कणांची माहिती मिळवणे. शवविच्छेदन करण्याइतके हे 'कणविच्छेदन' करणे सोपे नाही; आणि म्हणूनच LHC (Large Hadron Collider) प्रयोगाचा हा प्रपंच!

लार्ज हॅड्रॉन कोलायाडर (LHC)

LHC हा आतापर्यंतच्या मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा, आणि तितकाच महत्त्वाचा, वैज्ञानिक प्रयोग. विश्वाची मुलभूत कोडी उलगडण्यासाठी, वेगवेगळ्या ८५ देशातील १०,००० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. LHC ची काही वैशिष्ट्ये: विश्वातील सर्वात थंड (-२७१से.), सर्वात उष्ण (सूयर्याच्या तापमानाच्या १लाख पट तापमान) आणि सर्वात 'पोकळ' (emptiest) जागांपैकी एक जागा...सर्वाधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली चुंबके (magnets).. पृथ्वीवरील सगळ्यात जटिल (complex) उपकरण!

या प्रयोगाची साधारण रुपरेषा अशी: सुमारे २७ किमी. लांब वर्तुळाकार नळीतून प्रोटॉन्सचे पुंजके (beams) फिरवले जातील. अशी कल्पना करा, की २ प्रोटॉन्स या नळीतून एकमेकांच्या विरूद्ध दिशेला सोडलेले आहेत; ते साधारण प्रकाशाच्या वेगाने जात आहेत; जेव्हा हे कण एकमेकांवर आदळतील, तेव्हा प्रचंड ऊर्जा तयार होईल. अर्थात ही ऊर्जा अत्यंत सूक्ष्म क्षेत्रापूतर्ती मर्यादित असेल. विश्वाची निर्मिती ज्या बिग-बँग पासून (महाविस्तार) झाली असा कयास आहे, त्यावेळच्या परिस्थितीची झलक या प्रोटॉन्सच्या टकरीमधून पहायला मिळेल. मिनि-बिगबँग म्हणा हवेतर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोटॉन्सच्या टकरी सूचकांच्या (detectors) मदतीने टिपून घेतल्या जातील. हे detectors म्हणजे अतिप्रचंड क्षमतेचे डिजीटल कॅमेरे! प्रत्येक टकरीतून बाहेर पडणार्‍या कणांचा परिपूर्ण अभ्यास केला जाईल - कणांचा वेग, दिशा, ऊर्जा वगैरे. अशा किती टकरी होतील? एका सेकंदाला ६०० दशलक्ष!! ('जबर्‍या'च ना!)

LHC चे विहंगम दृश्य

या सगळ्याची तंतोतंत माहिती गोळा करायची म्हणजे प्रचंड अशा प्रकारची साठवण क्षमता (storage capacity) हवी... एका वर्षामध्ये मिळणारी माहिती (data) साठवायला जवळपास ३० लाख CD's लागतील (सहीच...त्या CDs ची शिडी करता येईल - २० किमी. उंच!). याचा बंदोबस्तही आपल्या चतुर शास्त्रज्ञांनी केला आहे. जगातील वेगवेगळ्या ठिकाणचे संगणक आणि अति-जलद internet चा वापर करून एक जागतिक जाळे (LHC computing grid) बनवले आहे. ह्या grid ला जोडलेले सर्व संगणक LHC प्रयोगांची माहिती साठवतील तसेच परिक्षणासाठी (analysis) वापरले जातील. एका दिवसाला अंदाजे २७ TB (टेरा बाईट) इतकी माहिती गोळा होईल अशी अपेक्षा आहे.

युरोपीय आण्विक संशोधन संस्थेने (CERN) उभा केलेला हा प्रयोग स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमारेषेवर असून हा कोलायडर जमिनीच्या आत १०० मीटर खोलीवर आहे. आपण सध्या 'मिपा'चा आस्वाद ज्या माध्यमातून घेत आहोत त्या world-wide-web (www) चा उगम CERN मध्येच झाला. आता जमिनीच्या आत हा प्रयोग करायचे काय कारण? आर्थिकदृष्ट्या हे खूप कमी खर्चाचे आहे; जमिनीचे भाव किती वाढलेत हे तुम्हाला माहीत असेलच. आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ते योग्य आहे. LHC सारखे आणखी काही कोलायडर्स (particle accelerators) अस्तित्वात आहेत, पण LHC पेक्षा त्यांची क्षमता कमी आहे. LHC प्रयोगानंतर कदाचित शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राची पुस्तके पुन्हा लिहायला लागतील, कारण यानंतर 'नव्या भौतिकशास्त्राचा' (New Physics) अध्याय सुरू होईल.

पण हा सगळा अट्टाहास कशासाठी? एवढं काय नडलंय का?

पार्श्वभूमी

हे शास्त्रज्ञ ज्या अगम्य (म्हणजेच 'गणिती') भाषेत बोलतात ती भाषा सगळ्यांना समजणे अशक्य आहे (जरी तुम्हाला गणित आवडत असले तरी). पण सांगायचा मुद्दा हा: आजपर्यंतच्या इतिहासात माणसाने काही प्रश्नांचा पिच्छा नेहमी पुरवला आहे - 'आपण कुठून आलो?', 'आपण काय आहोत?'. (मला पु.लं.च्या 'असा मी असामी' मधली जुहूच्या बंगल्यातील गुरूदेवांची ओळ आठवली - 'हू ऍम आय?', 'हू आर यू?'). आत्तापर्यंत या गोष्टींची मक्तेदारी फक्त अध्यात्मिक, धार्मिक इ. कक्षेपर्यंत मर्यादित होती असे समजले जाई. पण विज्ञानालाही आपली बाजू मांडायचा हक्क आहे. LHC चा प्रयोग म्हणजे वरील प्रश्न सोडवण्याचा विज्ञानाचा एक प्रयत्न आहे.

विचार करा, रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात तुम्ही तारे बघत आहात. त्या तार्‍यांचा जो प्रकाश तुम्ही बघता, तो लाखो-करोडो वर्षांपूर्वीचा प्रकाश आहे. म्हणजे लाखो-करोडो वर्षांपूर्वी ते तारे जसे असतील ते तुम्ही आज बघताहात! मग तुम्ही डोके खाजवता... हे सगळे आले कुठून? विश्वामध्ये सगळ्यात सूक्ष्म अशा मुलभूत कणांपासून ते अतिदूर पसरलेल्या अजस्त्र आकाशगंगांपर्यंत कितीतरी गोष्टी आहेत. शास्त्रज्ञांनी या सगळ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष निरीक्षण केले. आणि विश्वाचा संपूर्ण इतिहास, ठराविक सिद्धांतांच्या आधारे पुन्हा उभा केला. अब्जावधी वर्षे चाललेल्या जगाच्या अव्याहत कोलाहलाचे स्पष्टीकरण मांडायचा हा प्रयत्न. हे संपूर्ण विश्व कसे तयार झाले आणि आजपर्यंतचा विश्वाचा प्रवास कसा झाला हे सांगणारा सिद्धांत म्हणजे बिग-बँग सिद्धांत.

या सिद्धांतानुसार, विश्वाची निर्मिती साधारण १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महाविस्तारामुळे झाली. तसेच, विश्व हे अनंत-अमर्याद (infinite) नसून ते मर्यादित आहे. यामागची संकल्पना अशी: जगातील सर्व पदार्थ आणि ऊर्जा हे एका बिंदूमध्ये (singularity) सामावले होते. या बिंदूचे अतिजलद प्रसरण (inflation) होऊन त्यापासून विश्व तयार झाले. काळ आणि स्थळ (time and space) हे बिग-बँगपासूनच सुरू झाले; त्यापूर्वी ते अस्तित्वात नव्हते. बिग-बँग झाल्यापासून विश्व हे एखाद्या फुगणार्‍या अतिप्रचंड फुग्याप्रमाणे सतत विस्तारत आहे, आत्तासुद्धा!

बिग-बँगपासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाची समयरेषा (timeline)

बिग-बँगच्या अगदी सुरवातीला विश्व हे अतिशय उष्ण आणि अतिघन होते ज्यावेळी फक्त क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्मा अस्तित्वात होता. जसजसे विश्व फुगत गेले आणि त्याचे तापमान कमी होत गेले तसतसे मुलभूत घटक तयार झाले उदा. photons, hadrons (प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स) इ. हे सगळे व्हायला साधारण ३ मिनिटे लागली! नंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉनच्या मदतीने हायड्रोजनचा अणू तयार झाला. त्यानंतर रेणू, मुलद्रव्ये, तारे, आकाशगंगा हे सगळे निर्माण व्हायला करोडो वर्षे लागली. खुद्द आपली सूर्य-मालिका तयार व्हायला ९ अब्ज वर्षे लागली (म्हणजे ती अंदाजे ५ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली). विश्वाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतचा धावता घटनाक्रम तुम्हाला येथे बघायला मिळेल. बिग-बँगपासून ते बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंतचा हा अद्भुत प्रवास हा 'साध्या'कडून 'गुंतागुंती'कडे अखंड चालू आहे - सर्वप्रथम मुलभूत कण, मग अणू, रेणू, तारे, ग्रह, पेशी, जीवाणू, जीवसृष्टी आणि विश्वाची सगळ्यात आधुनिक उत्पत्ती 'माणूस'! सगळ्या अवस्था कशा साखळीप्रमाणे सलग; उत्क्रांतीच्या धाग्याने बांधल्या गेलेल्या! आपण सगळेजण (सजीव-निर्जीव पदार्थ) या मुलभूत कणांपासून आलेले आहोत; आणि त्या कणांमुळेच चराचर विश्व अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. विश्व, जीवसृष्टी व मानवजात या सगळ्यांना विज्ञानाने एकत्र आणले आहे. त्या कणांची - म्हणजेच आपल्या उगमस्थानाची - पूर्ण ओळख करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे LHC चा प्रयोग.

आता या LHC प्रयोगातून काय-काय साध्य करता येईल ते पाहू.

अदृश्य पदार्थ (dark matter)

अवकाश-शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, विश्वामध्ये फक्त ४% दृश्य पदार्थ (visible matter) असून २२% अदृश्य पदार्थ (dark matter) आणि ७४% अदृश्य ऊर्जा (dark energy) आहे. या अदृश्य पदार्थाबद्दल जास्त माहिती सध्यातरी उपलब्ध नाही; LHC प्रयोगातून ती मिळण्याची शक्यता आहे.

अँटी-मॅटर

अँटी-मॅटर (अ-पदार्थ?) म्हणजे मॅटरचा (पदार्थ) जुळा भाऊ - पण विरूद्ध (opposite charge)! उदा. इलेक्ट्रॉनचा जुळा भाऊ पॉसिट्रॉन (+ve charge असलेला इलेक्ट्रॉन), प्रोटॉनचा जुळा भाऊ अँटीप्रोटॉन (-ve charge असलेला प्रोटॉन). दिलीप कुमारच्या 'राम और शाम' मधला राम जर गोरापान आणि शाम जर काळाकुट्ट असता, तर त्यांना 'मॅटर और अँटीमॅटर' असे म्हणता आले असते :-).
जग जर व्यवस्थित, निटनेटके असते तर आपल्याला ५०% मॅटर व ५०% अँटीमॅटर दिसले असते. खरेतर, बिग-बँगच्या अगदी सुरवातीच्या क्षणांत अशी परिस्थिती होती. आपल्या सुदैवाने, निसर्गाचे माप 'मॅटर'च्या दिशेला झुकले ('मॅटर'ने कदाचित वशिला लावला असेला :)) आणि विश्वात 'मॅटर'चा प्रभाव वाढला. आजपर्यंतच्या निरिक्षणावरून असे दिसते की विश्व हे मुख्यतः पदार्थापासून (matter) बनले आहे. अशी विषम विभागणी का? बिग-बँगच्या वेळी अस्तित्वात असणारे विश्वातील सगळे अँटी-मॅटर गेले कुठे? या जुळ्या भावाचा शोध LHC प्रयोगात घेतला जाईल. अगदी "आपण यांना पाहिलंत का?" श्टाईलमध्ये!

हिग्ज बोसॉन्स

कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण शास्त्रज्ञांना साधीसरळ आणि सुंदर असलेली समीकरणे आवडतात. आइन्स्टाईनचे E=mc^2 हे सुप्रसिद्ध समीकरण सगळ्यांना ठाऊक असेल. ऊर्जा (E) म्हणजे वस्तुमान (mass) गुणिले प्रकाशाच्या वेगाचा (c) वर्ग! शास्त्रज्ञांना पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे 'हे वस्तुमान किंवा वजन आले कुठून?'. आत्तापर्यंत आपल्याला विश्वाचे जे आकलन झाले त्याला वैज्ञानिकांनी "कण-भौतिकीचे स्टँडर्ड मॉडेल" म्हटले आहे. याबद्दल थोडक्यात सांगायचे तर, विश्वातील सर्व प्रकारचे पदार्थ आणि ऊर्जा ज्या नियमांनी कार्य करतात त्या सर्व नियमांना एकत्र करून काही मोजके सिद्धांत मांडले आहेत. तात्विकदृष्ट्या, हे सिद्धांत अतिसूक्ष्म कणांपासून (quarks, electrons इ.) ते आकाशगंगेच्या समूहापर्यंत (galaxy superclusters) सगळ्या गोष्टींना लागू पडतात. विचार करा, या विश्वाच्या भयानक पसार्‍यातील सर्व पदार्थांचे, घटनांचे आणि त्यामागील नियमांचे वर्णन फक्त मोजक्या सिद्धांतांच्या आधारे करणे ही गोष्टच किती रोमहर्षक आहे.

या मॉडेलनुसार, असे कण विश्वामध्ये अस्तित्वात असावेत की ज्यामूळे काही गोष्टी (उदा. प्रोटॉन्स) जड बनतात तर काही गोष्टी (उदा. फोटॉन्स) वजनरहित बनतात. या अतिसूक्ष्म कणांना हिग्ज बोसॉन्स (Higgs bosons) म्हणतात. यांना God particles असेही म्हटले जाते, कारण स्टँडर्ड मॉडेलमध्ये हे कण महत्त्वाची भूमिका बजावतात, विशेषतः मुलभूत कणांच्या 'वस्तुमाना'चे समर्थन करतात.

याची संकल्पना थोडक्यात अशी: संपूर्ण विश्व हे हिग्ज क्षेत्राने म्हणजेच हिग्ज कणांनी व्यापलेले आहे (जसे विद्युतचुंबकीय क्षेत्र असते तशा प्रकारचे हे हिग्ज क्षेत्र). मुलभूत कण जसजसे या हिग्ज क्षेत्रातून प्रवास करतात तसतशी त्यांची हिग्ज कणांबरोबर आंतरक्रिया होते. आणि त्यामुळे कणांना वस्तुमान प्राप्त होते. एक उदाहरण देतो. समजा, आपण 'मिपा'चे सगळे कलंदर एका हॉलमध्ये जमलो आहोत (स्नेहसंमेलन म्हणा हवेतर). सगळेजण हॉलमध्ये विखुरलेले आहेत, आपापल्या गप्पांमध्ये दंग आहेत. तेवढ्यात हॉलमध्ये 'सचिन तेंडुलकर' आला तर काय होईल! त्याच्याभोवती माणसांचा घोळका तयार होईल, सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाईल. तो जसजसा पुढे जाईल, तसा तो घोळकाही त्याच्याबरोबर जाईल. जरी 'सचिन' आणि त्याच्याभोवतीचा 'घोळका' एकाच गतीने पुढे जात असले तरी घोळक्याच्या केंद्रस्थानी असल्याने 'सचिन'ला जास्त 'वजन' प्राप्त होईल. तो एकदा चालू लागला की त्याला थांबवणे कठीण जाईल; आणि एकदा थांबला की पुन्हा चालणे कठीण जाईल. याच न्यायाने एखादा प्रोटॉन जर हिग्ज क्षेत्रातून जात असेल तर त्याच्याभोवती हिग्ज कणांचा घोळका तयार होतो. या घोळक्यामुळेच प्रोटोनला जडत्व म्हणजेच 'वस्तुमान' प्राप्त होते असे या सिद्धांतात म्हटले आहे. याची छोटीशी झलक येथे पहायला मिळेल.

इतर सर्व मुलभूत कणांचे अस्तित्व हे प्रत्यक्ष निरीक्षणाने सिद्ध झाले आहे; पण हिग्ज बोसॉन्सचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आलेले नाही. कारण त्यासाठी असामान्य प्रकारची ऊर्जा असणारा कोलायडर आवश्यक आहे. LHC मुळे हिग्ज बोसॉन्सचे निरीक्षण करता येईल.

LHC प्रयोगाचे महत्व

पण समजा, हे हिग्ज कण दिसले नाहीत तर? वैज्ञानिकांसाठी ही गोष्ट जास्त कुतूहलदायक असेल; याबाबत एक शास्त्रज्ञ म्हणतो,"कोलंबस जेव्हा प्रवासाला निघाला तेव्हा त्याला माहीत होते की तो काहीतरी शोधणार. त्याला जे हवे होते त्याचा शोध लागला नाही; पण त्याला ज्याचा शोध लागला ते नक्कीच महत्वाचे होते". जर आत्तापर्यंतच्या सिद्धांतांना अपेक्षित असलेले काहीच सापडले नाही तरीही LHC प्रयोग महत्वाचा मानला जाईल; कारण ४०-५० वषर्षांपासून मांडलेले सगळे सिद्धांत शास्त्रज्ञांना पुन्हा पहिल्यापासून तपासावे लागतील.

आणि हेच विज्ञानाचे बलस्थान आहे. कोणताही सिद्धांत तार्किकदृष्ट्या खरा आहे असे मानून चालत नाही. प्रात्यक्षिकरित्या तो पुन्हापुन्हा तपासून - चांगला तावून सुलाखून - मगच सिद्धतेस पात्र होतो. प्रयोगातून जर तो अपुरा वाटत असेल तर त्याजागी नवे तर्कसुसंगत सिद्धांत मांडले जातात. "सिद्धांत - प्रयोग - निरीक्षण - अनुमान - नवे सिद्धांत" हे चक्र अखंडपणे चालू राहते. विज्ञानाची प्रगती ही 'सिद्धांत' (संकल्पना) आणि 'प्रयोग' (परीक्षण) या दोन्हींवर अवलंबून आहे.

भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा समावेश ज्यात होतो त्याला 'सैद्धांतिक भौतिकशास्त्र' (theoretical physics) असे म्हणतात. सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांची परंपरा न्यूटन, आईन्स्टाईन, फाइनमन पासून ते स्टीफन हॉकिंग्जपर्यंत चालू आहे. हे सिद्धांत मुख्यतः गणिती भाषेत असतात. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद तसेच क्वांटम मेकॅनिक्स (पुंज यामिक!) हे आधुनिक भौतिकशास्त्रातील महत्वाचे सिद्धांत. त्यामानाने नविन असणारे आणि प्रायोगिकरित्या सिद्ध न झालेले काही सिद्धांत आहेत उदा. स्ट्रींग थिअरी, सुपरसिमेट्री वगैरे. जागेअभावी यांचे स्पष्टीकरण इथे करणे योग्य होणार नाही. मात्र हे सिद्धांत जर खरे ठरले, तर "वास्तवता (reality) ही परिकथेपेक्षा (fiction) थक्क करून सोडणारी आहे" यात काही शंकाच उरणार नाही; उदा. आपण ज्यात रहातो ते जग 'त्रिमिती' (3-Dimensional) नसून ११ मितींनी (11 Dimensions) बनले आहे असे अनुमान निघेल. थोडक्यात म्हणजे, विश्वाची संपूर्ण रचना समजून घेण्यासाठी हे सिद्धांत आवश्यक आहेत. तर गेल्या काही दशकांपासून विकसित होणारे हे महत्वाचे सिद्धांत जर प्रात्यक्षिकातून पडताळायचे असतील तर त्यासाठी LHC सारखा मोठा प्रयोग होणे आवश्यक आहे.

व्यावहारीक फायदा

आता या सगळ्याचा सामान्य माणसाला काय फायदा? सध्यातरी या प्रयोगाचा व्यावहारिकदृष्ट्या काय फायदा होईल हे सांगणे कठीण आहे. पण काय सांगावे, दूरच्या भविष्यकाळात यामुळे जगाचा पूर्ण कायापालटही होऊ शकेल. इलेक्ट्रॉनचा शोध जेव्हा लागला तेव्हा सामान्य माणसासाठी ती एक "बाहेरून दिसणारी अलिबाबाची गुहा"च होती; त्याचा फायदा त्यावेळी दिसला नाही. पण त्याच इलेक्ट्रॉनने नंतर तांत्रिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे, LHC मधून एखादे संपूर्ण नवे तंत्रज्ञान उदयाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संशोधनासाठी वापरलेली अत्याधुनिक साधने, उपकरणे व्यावहारीकदृष्ट्या वापरता येतील.

अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. माणसाचे वेगळेपण जर कशात असेल तर ते त्याच्या जिज्ञासूवृत्तीत. जगाबद्दलचे ज्ञान जाणून घ्यायची ही दुर्दम्य इच्छाच विज्ञानाच्या मूळाशी आहे. या कुतूहलामुळेच वैज्ञानिक शोध लागतात आणि नंतर त्याचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान तयार होते. हेच तंत्रज्ञान मग सामान्य माणसापर्यंत संगणक, मोबाईल फोन यासारख्या माध्यमातून पोचते. LHC हे मानवातील अफाट जिज्ञासेचे एक उदाहरण आहे. आपण ज्या जगामध्ये रहातो त्या जगाची अधिक जवळून ओळख करून घ्यावी...आपण सर्वजण ज्या मुलभूत कणांपासून बनलेले आहोत त्या कणांना जाणून घ्यावे, हाच LHC प्रयोगाचा गाभा आहे. श्रीकृष्णाकडून विश्वरूप जाणून घेण्याची इच्छा असणारा अर्जुन आणि LHC साठी तळमळीने झटणारे शास्त्रज्ञ यांच्यात काहीतरी साम्य असले पाहिजे (अर्थात, हे दोघेही त्या मुलभूत कणांपासून बनले आहेत हे एक साम्य आहेच म्हणा).

प्रयोगाचे धोके!

काही जणांच्या मते, या प्रयोगातून कृष्ण-विवरे (black-holes) तयार होतील आणि त्यामुळे पृथ्वीचा नाश होईल. हे वाचून मला बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आठवली. LHC मुळे अतिसूक्ष्म कृष्ण-विवरे तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे (साधारण १%). आणि ती तयार झाली तरी क्षणार्धात नष्ट होतील; त्यामुळे कोणताही धोका उद्भवणार नाही. अशा प्रकारच्या घटना पृथ्वीच्या वातावरणात नैसर्गिकरित्या दररोज घडतात, आणि तरीही आपण अजून जीवंत आहोत. हां, आता माझे एवढे मोठे 'चर्‍हाट' ऐकल्यानंतर तुम्ही जीवंत आहात की नाहीत ते माहीत नाही!

तर मंडळी, बिनधास्त रहा... आणि माझी अगम्य भाषेतली गिचमीड वाचून डोक्याला मुंग्या आल्या असतील तर मस्तपैकी झोप काढा! किंवा अजूनही उत्साह बाकी असेल तर खाली दिलेले संदर्भ तपासा.

सोप्या भाषेत लिहिलेले काही सुंदर लेख, पुस्तके (PDF files for downloads) आणि इतर:
Mysteries of the Universe
The First Three Minutes
A Brief History of Particle Physics
The Atlas Experiment
eTour of Physics

काही उद्बोधक चलचित्रे (YouTube 'तू-नलिका' आणि इतर)
LHC accelerator at CERN
CERN in 3 minutes
Brian Cox: What really goes on at the LHC
The Birth of the Universe, Big Bang and Beyond
The Atlas Animations

--
आईन्स्टाईनचा चेला
I have no special talents. I am passionately curious. - Albert Einstein

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Sep 2008 - 7:38 am | सहज

कल्पना जड [भारी वस्तुमान] असल्या तरी लेखाची भाषा अतिशय सोपी.

लेख अतिशय आवडला.

राहूल अजुन लिहीत रहा.

धन्यु.

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2008 - 9:13 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. असेच लेख लिहावेत अशी विनंती करतो.

धनंजय's picture

14 Sep 2008 - 8:41 pm | धनंजय

असेच लिहीत राहावे.

मदनबाण's picture

14 Sep 2008 - 7:46 am | मदनबाण

एकदम झकास लेख्,,,आपल्याला लयं आवडला बघा..
और भी आने दो...

(शाळेतअसताना periodic table मधे ८८ वा रेडिअम पाहणारा)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2008 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भौतिकशास्त्र आणि त्यांच्या गुंतागुंती प्रकरण जड वाटत असले तरी, लेखाची भाषा सोपी असल्यामुळे
लार्ज हॅड्रॉन कोलायाडर, त्याच्या प्रयोगाचे महत्व,व्यावहारीक फायदा, आणि प्रयोगाचे धोके समजून घेण्यासाठी, एक संदर्भासहित, अभ्यासपूर्ण लेख, सामान्य माणूस म्हणुन आमचे ज्ञान वाढविणारा असाच आहे. अप्रतिम माहितीपूर्ण लेखाबद्दल आपले अभिनंदन !!!

राहुल और भी आने दो !!!

आगाऊ सूचना: जर कुणाला विज्ञानाची (विषेशतः भौतिकशास्त्राची) ऍलजर्जी असेल तर हा लेख वाचून स्वतःचे डोके आपटून घेऊ नये.

स्वगत : हे बरं केलं !!! नाहीतर काही लोक शब्दबंबाळ प्रतिसाद वाचूच नये अशी अवमान करणार सुचना लिहितात आणि गम्मत अशी की, काही त्याचे समर्थनही करतात. अर्थात थोडी हुशारी असली की हे असे होणारच म्हणा :)

प्रकाश घाटपांडे's picture

14 Sep 2008 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

.

श्रीकृष्णाकडून विश्वरूप जाणून घेण्याची इच्छा असणारा अर्जुन आणि LHC साठी तळमळीने झटणारे शास्त्रज्ञ यांच्यात काहीतरी साम्य असले पाहिजे (अर्थात, हे दोघेही त्या मुलभूत कणांपासून बनले आहेत हे एक साम्य आहेच म्हणा).


खर आहे. लेख सुंदरच वाचायला भाग पाडणारा. धन्यवाद राहुल. हा लेख लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:34 am | विसोबा खेचर

राहूलशेठ,

इतक्या अभ्यासपूर्ण लेखाबद्दल आपले कौतुक वाटले!

अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन मिपावर येऊ द्या ही विनंती....

तात्या.

अवांतर - फार काही करू शकत नाही, परंतु "मिपाचा भौतिकशास्त्रज्ञ" ही पदवी मात्र आम्ही आपल्याला आदरपूर्वक बहाल करू इच्छितो! आमची यमी ही मिपाची "अंतराळ-शास्त्रज्ञ" आहे! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 8:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर - फार काही करू शकत नाही, परंतु "मिपाचा भौतिकशास्त्रज्ञ" ही पदवी मात्र आम्ही आपल्याला आदरपूर्वक बहाल करू इच्छितो! आमची यमी ही मिपाची "अंतराळ-शास्त्रज्ञ" आहे!

पहिल्या प्रस्तावाला १००% अनुमती.
दुसय्रा वाक्याला ०%!

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 11:29 am | यशोधरा

छान आहे लेख. आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 11:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

राहुल, मस्त आहे लेख, छान जमलाय. आणि बिग बँगसाठी महास्फोटापेक्षा महाविस्तार हा शब्दच जास्त योग्य वाटतो, अगदी बिग-बॅंगपेक्षाही जास्त योग्य.

धन्यवाद आम्हा काही लोकांच्या मागणीवरून तुम्ही लिहिलंत.

अदिती

अवलिया's picture

14 Sep 2008 - 6:23 pm | अवलिया

हेच म्हणतो

नाना

राहूल's picture

15 Sep 2008 - 12:22 am | राहूल

हो, बर्‍याच लोकांचा (काही शास्त्रज्ञांचाही) असा गैरसमज आहे की बिग बँग म्हणजे मोठा विस्फोट (explosion) होता. पण खरे तर तो विस्तार (expansion) होता.

असो. प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद; हो, आणी ज्यांनी हा लिहिण्यासाठी आग्रह केला, त्यांनाही!

राहूल

धनंजय's picture

15 Sep 2008 - 3:04 am | धनंजय

विस्तार आणि विस्फोट या संकल्पनांमध्ये नेमका फरक काय?

आजवर मला वाटत असे की "खूप कमी" कालावधीत विस्तार झाला तर त्याला विस्फोट म्हणतात. "खूप कमी" हा शब्द सापेक्ष असल्यामुळे विस्तार आणि विस्फोट या संकल्पनांमध्ये मला कुठला मूलभूत फरक माहीत नव्हता.

बिगबँगच्या जवळपास मोठ्या प्रमाणात विस्तार थोड्या काळात झाला, नाही का? तुमचे काय मत आहे?

विस्फोटात "ज्वलन" व्हावे लागत नाही - अणुबाँबातील युरेनियम "जळत" नाही. विस्फोटात रासायनिक बदल व्हावा लागत नाही. प्रचंड दाबाखाली असलेला वायूचा सिलिंडर फुटला, तर त्यालाही "विस्फोट" (एक्स्प्लोजन) म्हणतात - नाही का?

राहूल's picture

15 Sep 2008 - 4:38 am | राहूल

मुद्दा बरोबर आहे. तात्विकदृष्ट्या 'विस्फोट' व 'विस्तार' या संकल्पनांमध्ये फारसा फरक नाही. पण बिग बँगच्या संदर्भात 'विस्तार' ही संकल्पना जास्त योग्य ठरते.

'विस्फोट' या संकल्पनेत विस्तार अपेक्षित असला तरी त्यासाठी 'अंतराळ' (space) अस्तित्वात आहे हे गृहीत धरले जाते, मग ते रिकामे असले तरी चालेल. सर्वसाधारण (गैर)समज असा आहे की बिग बँग हा रिकाम्या अंतराळात (empty space) झालेला पदार्थाचा (matter) 'विस्फोट' असून नंतर त्या रिकाम्या जागेचा 'विस्तार' झाला.

मात्र, अंतराळ (space) व काळ (time) या संकल्पनाच मुळी बिग बँगपासून अस्तित्वात आल्या; बिग बँगच्या वेळी अंतराळ (space) हे पूर्णपणे पदार्थाने भरलेले होते; ते रिकामे नव्हते. बिग बँग झाल्यावर फक्त पदार्थाचाच विस्तार झाला नाही तर 'अंतराळ' हे स्वत: काळाबरोबर विस्तार पावले. त्यामुळे या विस्ताराला 'विस्फोट' म्हणणे तितकेसे बरोबर नाही.

माझ्या स्पष्टीकरणात कदाचित दोष असण्याची शक्यता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'विस्फोट' या संकल्पनेत विस्तार अपेक्षित असला तरी त्यासाठी 'अंतराळ' (space) अस्तित्वात आहे हे गृहीत धरले जाते, मग ते रिकामे असले तरी चालेल. सर्वसाधारण (गैर)समज असा आहे की बिग बँग हा रिकाम्या अंतराळात (empty space) झालेला पदार्थाचा (matter) 'विस्फोट' असून नंतर त्या रिकाम्या जागेचा 'विस्तार' झाला.

मात्र, अंतराळ (space) व काळ (time) या संकल्पनाच मुळी बिग बँगपासून अस्तित्वात आल्या; बिग बँगच्या वेळी अंतराळ (space) हे पूर्णपणे पदार्थाने भरलेले होते; ते रिकामे नव्हते. बिग बँग झाल्यावर फक्त पदार्थाचाच विस्तार झाला नाही तर 'अंतराळ' हे स्वत: काळाबरोबर विस्तार पावले. त्यामुळे या विस्ताराला 'विस्फोट' म्हणणे तितकेसे बरोबर नाही.

सहमत.

शिवाय धनंजय, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रचंड वेगात विस्तार झाला, त्याला inflation म्हणतात. असं मानलं जातं की सेकंदाच्या अतिशय छोट्या भागासाठी या विस्ताराचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त होता. पण तो क्षणिक होता. पण तरीही मला (च्यक्तिगत मत) राहुलचा तर्क योग्य वाटतो. आणि "स्फोटा"तून विध्वंसक अर्थ ध्वनित होतो. त्यामुळेही मला विस्फोटापेक्षा विस्तार हाच शब्द जास्त तार्किक वाटतो.

मुशाफिर's picture

16 Sep 2008 - 4:36 am | मुशाफिर

'बिग बँग' (ही घटना)कुठल्याप्रकारे स्पष्ट करता, यावरही बरेच काही अवलंबून आहे. कारण, 'स्ट्रिंग थियरी'नुसार, बहुमितीच (multiple-dimensions) नव्हेत तर बहुविश्वही (multiple-universe/multiverse) अस्तित्वात असु शकतात. समांतर विश्वांतील (parallel universe) परस्परक्रिया/टक्कर (interaction) हे 'बिग बँग'चे कारण असू शकते, असाही एक सिद्धांत/दावा आहे. त्यामुळे, टक्करीची परिणीती स्फोटात झाली असावी, हाही एक प्रवाद आहेच. अर्थात, याविषयी माझे ज्ञान फारच तोकडे आहे.

राहूल,
लेखाची मांडणी फारच चांगली आहे. आपल्याकडून भौतिक शास्त्राविषयी अजून काही लेख लिहिले जातील, अशी अपेक्षा आहे.

LHC चा एक उद्देश 'स्ट्रिंग थियरी'तील अनुमाने पडताळून पाहणे, हाही आहे. 'ग्रॅव्हिटॉन' (Graviton) 'पाहण्या'चा प्रयत्नही तेथे होणार आहे.

अवांतरः 'स्ट्रिंग थियरी'तील अनुमाने प्रयोगाने सिद्ध करता येत नसल्याने, एका भौतिक शास्त्रज्ञाच्या मते, 'There are physicists and there are string theorists' :).

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः 'स्ट्रिंग थियरी'तील अनुमाने प्रयोगाने सिद्ध करता येत नसल्याने, एका भौतिक शास्त्रज्ञाच्या मते, 'There are physicists and there are string theorists'

मी असंही ऐकलं आहे, "There are physicists, including astronomers and there are poets!" ;-)

तुम्ही म्हणताय तो विस्तार / महाविस्तार अजुनही अखंडीतपने चालू आहे. तेंव्हा विश्वनिर्मितिच्या सुरुवातिच्या काही क्षणांत जो काही विस्तार झाला त्याला महा विस्फोट म्हननेच योग्य आहे असे मल वाटते. आनी विश्वाचा विस्तार (प्रसरन) ही कल्पना मोठ्या कालखंडसाठी योग्य वाटते.

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

नाटक्या's picture

17 Sep 2008 - 2:47 am | नाटक्या

बिग बँग असे न म्हणता बिग एक्स्पॅन्शन असे का नाही म्हणत? एखादी गोष्ट जर एकदम प्रसरण पावली तर त्याला स्फोटच म्हणणार ना. उदा. फुगा, जेव्हा आपण तो फुगवतो तेव्हा प्रसरण म्हणतो, पण टाचणी लावल्यावर बंदीस्त हवा जेव्हा एकदम बाहेर पडते तेव्हा तो स्फोटच नाही का?

आपल्या कालनियमाप्रमाणे जरी काही वर्ष लागली असतील तरी विश्वाच्या घड्याळात काही क्षणच गेलेत या प्रक्रियेत..

काय पटते का?

- नाटक्या...

>>बिग बँग असे न म्हणता बिग एक्स्पॅन्शन असे का नाही म्हणत?
वर म्हटल्याप्रमाणे, 'बिग बँग' ह्या घटनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही कुठले सिद्धांत वापरत आहात, ह्यावरही महाविस्तार / महाप्रसरण / महास्फोट ह्या संज्ञा अवलंबून आहेत. जेव्हा 'सिंगुल्यारिटी'चा विचार केला जातो, तेव्हा भौतिकशास्त्राचे बरेचसे नियम मोडुन पडतात (break-down). याला कारण म्हणजे, एकाच वेळी अतिसुक्ष्म आकार(मान) पण अतिप्रचंड वस्तुमान यांचा विचार करण्याची गऱज निर्माण होते.

भौतिकशास्त्रज्ञांना सतावणारा हा सर्वात मोठा प्रश्ण आहे. कारण, एकाच वेळी अतिसुक्ष्म जगासाठीचे नियम म्हणजे पुंज भौतिकी (Quantum Mechanics) आणि अतिविशाल जगासाठीचे नियम सामान्य सापेक्षतावाद (General Relativity)यांचा समन्वय (अजूनतरी) साधता आलेला नाही. त्याविषयी अधिक माहिती पाहता येईल :
http://www.science.psu.edu/alert/frontiers/AshtekarHandout2-2004.pdf
(यात अभय अष्टेकर यांनी मांडलेल्या काही संकल्पनाही वाचता येतील).

'बिग बँग' साठी (खरंतर विश्वाची सुरवात कशी झाली? हे समजून घेण्यासाठी)विविध प्रकारची स्पष्टीकरणं देण्यात आलेली आहेत. त्यातले एक स्पष्टीकरण म्हणजे दोन विश्वांमधील टक्कर हे होय. ते 'स्ट्रिंग थियरी'तील एक अनुमान आहे.

तसेच, बिग बँग आधीही विश्व अस्तित्वात होते आणि त्यापासूनच आपण पाहत असलेल्या विश्वाची उत्पती झाली, अशीही एक संकल्पना आहे. आणि त्यात 'सिंगुल्यारिटी' ही संज्ञा मान्य नाही. त्यात 'बिग बाउंस' ची कल्पना मांडलेली आहे. त्याविषयी इथे वाचता येईल.
http://www.science.psu.edu/alert/bojowald6-2007.htm

अवांतरः एका विश्वातून (Parent Universe) दुसरे विश्व (Baby Universe) निर्माण होते आणि नवीन विश्व हे जनक विश्वाशी 'नाळे' (Umbilical cord)ने जोडलेले असते, असेही एक अनुमान 'स्ट्रिंग थियरी' मांडते. त्यामुळे हे सगळं वाचल्यावर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!', असेच म्हणावे लागेल :)

नाटक्या's picture

17 Sep 2008 - 5:41 am | नाटक्या

तुम्ही म्हणता तो मुद्दा पुर्णपणे पटला:

> 'बिग बँग' साठी (खरंतर विश्वाची सुरवात कशी झाली? हे समजून घेण्यासाठी)विविध प्रकारची स्पष्टीकरणं देण्यात आलेली आहेत. त्यातले एक स्पष्टीकरण म्हणजे दोन विश्वांमधील टक्कर हे होय. ते 'स्ट्रिंग थियरी'तील एक अनुमान आहे.

> तसेच, बिग बँग आधीही विश्व अस्तित्वात होते आणि त्यापासूनच आपण पाहत असलेल्या विश्वाची उत्पती झाली, अशीही एक संकल्पना आहे. आणि त्यात 'सिंगुल्यारिटी' ही संज्ञा मान्य नाही. त्यात 'बिग बाउंस' ची कल्पना मांडलेली आहे. त्याविषयी इथे वाचता येईल.

मी या दोन्ही संकल्पना वाचल्या आहेत. या संदर्भात डॉ. मिचीयो काकू यांचे (Physics of the Impossible) पुस्तक बघा. पण माझा आक्षेप (हे म्हणणं खरतर चुकीचं आहे, मी आक्षेप घेणारा कोण?) हा महास्फोट कि महाविस्तार या संज्ञा/शब्दाला आहे. आणि जर "'सिंगुल्यारिटी'चा विचार केला जातो, तेव्हा भौतिकशास्त्राचे बरेचसे नियम मोडुन पडतात", तर मग विस्तार तरी कसला? सिंगुल्यारिटीमुळे जर स्फोट हा शब्द चपखल बसत नसेल तर विस्तार तरी कसा बसेल?

एक मात्र खरे कि या वेळेला 'नेमके' काय झाले होते (आणि या पुर्वी काय झाले? मुळात हे झालेच का?) हे आणि अशे बरेच प्रश्न आतातरी आपल्या आवाक्या बाहेरचे आहेत.

> त्यामुळे हे सगळं वाचल्यावर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!', असेच म्हणावे लागेल
क्या बोला, सही बोला. हा सिनेमा अगदी 'ट्रेलर' म्हणून जरी बघायला मिळाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन.

- नाटक्या..

राहूल's picture

17 Sep 2008 - 3:26 pm | राहूल

अगदी बरोबर.

आपल्या शास्त्रीय संगीतात जशी 'घराणी' असतात, तसेच सैद्धांतिक भौतिकशास्त्रात प्रत्येक सिद्धांताचे 'घराणे' आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

>>कारण, एकाच वेळी अतिसुक्ष्म जगासाठीचे नियम म्हणजे पुंज भौतिकी (Quantum Mechanics) आणि अतिविशाल जगासाठीचे नियम सामान्य सापेक्षतावाद (General Relativity)यांचा समन्वय (अजूनतरी) साधता आलेला नाही.

यालाच आपण Unified Theory म्हणू शकतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी, 'स्ट्रींग थिअरी' हा महत्वाचा उमेदवार आहे; पण हा सिद्धांत (व यासंदर्भातील इतर सिद्धांत उदा. m-theory) अजूनतरी प्रायोगिकरित्या सिद्ध झालेला नाही. LHC मधून जर 'बहुमिती'चे अस्तित्व सिद्ध झाले तर काही प्रमाणात या सिद्धांताला मान्यता मिळेल. या सिद्धांताबद्दलची काही शास्त्रज्ञांची मते येथे पहायला मिळतील.

यासंदर्भात रिचर्ड फाईनमन यांचे एक सुंदर भाष्य आहे: बुद्धिबळ खेळण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम त्याचे नियम शिकावे लागतील. पण तुम्ही सगळे नियम शिकलात तरी बुद्धिबळाचा खेळ 'समजला' असे होत नाही. ही तर खरी सुरुवात आहे. कारण, आता तुम्ही ते नियम वापरून तुमच्या वेगवेगळ्या योजना आखू शकता... खेळाची खरी मजा लुटू शकता. त्याचप्रमाणे, Unified Theory जरी आपल्याला सापडली, तर आपल्यासाठी ती एक नवी सुरूवात म्हणावी लागेल. कारण एकदा हे नियम समजले की मग बिग बँग, कृष्ण विवरे, तारे, आकाशगंगा हे सगळे कुठून आले त्याचा छ्डा लावता येईल.

'महाविस्तार': मी लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, इंग्रजी शब्दांचे मराठी भाषांतर करण्याचा 'आचरट' प्रयत्न केला आहे. त्यामुळे बिग बँगला 'महाविस्तार'च म्हटले पाहिजे असा माझा आग्रह नाही. यावर मुशाफिरांनी केलेले भाष्य बरोबर आहे.
बिग बँग हा शब्द फ्रेड हॉयल यांनी पहिल्यांदा वापरला; तोही कुत्सितपणे. कारण त्यांचा त्यावेळी या सिद्धांताला विरोध होता. बिग बँग हा विस्तार होता, या संकल्पनेला प्राधान्य देणारे संदर्भ पुढे देत आहे: Wikipedia Overview, Atlas of the Universe, Science - How Stuff Works?

--
take it easy

अभिज्ञ's picture

14 Sep 2008 - 11:55 am | अभिज्ञ

राहुलजी,
लेख अतिशय आवडला. साध्या सोप्या भाषेतील अभ्यासपुर्ण लेखन.
अभिनंदन.
अजुन येउ द्यात.

अभिज्ञ.

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 6:20 pm | ऋषिकेश

वा! अगदी माहितीपूर्ण लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

राघव's picture

14 Sep 2008 - 7:48 pm | राघव

खूप सुंदर लेख. एक संदर्भ म्हणून नक्की उपयोगी पडेल असा!

अवांतर:
मागे श्री. नारळीकरांचे "आकाशाशी जडले नाते" वाचले होते. त्यामुळे काही संकल्पना वाचून माहित होत्या. त्यांची वैज्ञानिक दृष्टीकोन सहज-सोप्या भाषेत समजावून सांगायची हातोटी खरंच खूप मस्त! :) तुमचीही सांगायची हातोटी तशीच छान आहे. त्यातून व्यक्त होणारे विज्ञानावरचे प्रेम लगेच नजरेत भरते. असेच लिहित रहा. शुभेच्छा!
बाकी "मिपाचा भौतिकशास्त्रज्ञ" ही पदवी मात्र आम्ही आपल्याला आदरपूर्वक बहाल करू इच्छितो" या तात्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत! :)

चतुरंग's picture

14 Sep 2008 - 8:07 pm | चतुरंग

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख! रंजक शैलीत आणि नर्मविनोदाची पखरण करीत विषय समजावून सांगितलास.
विशेषतः व्यवाहारिक फायदे, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण हे जास्त महत्त्वाचे वाटले.

चतुरंग

केशवराव's picture

14 Sep 2008 - 10:21 pm | केशवराव

राहूल,
लेख छानच लिहीला आहेस. अभिनंदन! ते सुद्धा तू शास्त्राचा विद्यार्थी नसून.
एक शंका आहे, या स्फोटात प्रचण्ड ऊष्णता निर्माण होणार हे तर नक्कीच. या ऊष्णता विरोधात काय उपाय योजना केली आहे?

राहूल's picture

15 Sep 2008 - 12:32 am | राहूल

कोलायडरमधले जे चुंबक आहेत (प्रोटॉन्सना गती देणारे) ते चुंबक अतिशीत (-२७१ से. तापमान) असतील. यालाच क्रायोजेनिक (cryogenic) तंत्रज्ञान म्हणतात. अशा पद्धतीने उष्णतेवर नियंत्रण ठेवले जाईल.
मी लेखात म्हटल्याप्रमाणे, LHC म्हणजे विश्वातील सगळ्यात थंड जागांपैकी एक जागा आहे.

राहूल.

रामदास's picture

15 Sep 2008 - 6:07 am | रामदास

कल्पना शक्य तितकी सोपी करून मांडली आहे.
अशाच लेखांची वाट पहात आहे. अभिनंदन.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

भाग्यश्री's picture

15 Sep 2008 - 9:22 am | भाग्यश्री

वा लेख फारच आवडला.. साध्या शब्दात खूप माहीती मिळाल्याने बरे वाटले..
अवांतर : डॅन ब्राऊनच्या Angels & Demonsया कांदबरीमधे अँटीमॅटर आणि बिग बँगबद्द्ल वाचलेले आठवते.. CERN मधेच तो प्रयोग होताना दाखवले आहे.. (बाकी, डॅन ब्राऊनच्या पुस्तकांमधली ऍक्युरसी वाखाणण्याजोगी आहे!.. )

http://bhagyashreee.blogspot.com/

ऋचा's picture

15 Sep 2008 - 9:30 am | ऋचा

खुप माहीतीपुर्ण लेख आहे राहुल!!
हा लेख खुप सोपा करुन मांडला आहे :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

भाग्यश्री's picture

15 Sep 2008 - 10:21 am | भाग्यश्री

याच विषयावर अजुन एक लेख.. माहीतीपूर्ण वाटला म्हणून लिंक देतेय..

LHC : एक मार्गदर्शिका

राहूल's picture

15 Sep 2008 - 2:13 pm | राहूल

मायबोलीवरचा वरील लेख उत्तम आहे. माहितीबद्दल धन्यवाद.

अवांतरः बाकी Angels and Demons बद्दलच्या मताशी एकदम सहमत. मला सगळ्यात जास्त आवडलेली ही कादंबरी; कुणाला eBook हवे असेल तर येथून download करता येईल.

राहूल

सुनील's picture

15 Sep 2008 - 11:38 am | सुनील

सोप्या शब्दात इतकी उत्तम शास्त्रीय माहिती देण्याचे कसब वाखाणण्यासारखे...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.