ड्वोरॅक आराखडा

अभिनव's picture
अभिनव in तंत्रजगत
21 Jan 2016 - 3:06 pm

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.

या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी‌ झाले. संगणक आल्यानंतर सर्वात प्रचलीत आराखडा म्हणून संगणकाच्या कळफलकावही तोच वापरला गेला आणि आजही हाच आराखडा सर्वात जास्त प्रचलीत आहे.

परंतु, या क्वर्टी आराखड्यामधे ईंग्रजी भाषा टंकताना एकाच पंजावर जास्त ताण येणे ई. तोटे आहेत. यावर डॉ. ऒगस्ट ड्वोरॅक आणि त्यांचे मेहुणे डॉ. विलियम डेलेय यांनी संशोधन केले आणि कळफलकावरील अक्षरांच्या स्थानाची अदलाबदल करुन एक नवा कळफलक आराखडा तयार केला. यात ईंग्रजी भाषा टंकताना दोन्ही मनगटांच्या स्नायुंचा समान उपयोग केला जातो त्यामुळे एकाच पंजावर जास्त ताण येत नाही.

यालाच ड्वोरॅक लेआऊट असे म्हणतात आणि सिंपलीफाईड ड्वोरॅक लेआऊट खालीलप्रमाणे दिसतो:

विकीपिडीया वरुन साभार.

यातही काही किरकोळ बदल करुन वेगवेग़ळ्या उगयोगासाठी वेगवेगळे ड्वोरॅक आराखडॆ बनवले गेलेले आहेत. तसेच अमेरीकन व ब्रिटीश ईंग्रजीतील फरकाप्रमाणेही वेगळे ड्वोरॅक आराखडॆ आहेत.

मला या बद्दल सर्वात आधी २00९ च्या आसपास समजले. त्यानंतर या आराखड्याबद्दल अजुन वाचले असता असे लक्षात आले की, काही चर्चांमधे याचा प्रचार करताना टंकन वेग वाढतो असा फायदा सांगत आहेत. जे पुर्ण सत्य नाही. त्यामुळे अनेक जन निराश होऊन याच्या विरुद्ध मत प्रदर्शन करताना दिसतात.

याचा मुख्य उपयोग संगणकाची आज्ञावली लिहिणे आणि या सारख्या ईतर भरपुर वेळ सलग टंकन करण्याची आवश्यकता असण्या-या व्यक्तींना आहे. आणि हाच मुख्य मुद्दा लक्षात घेऊन अतिंमत: मी हा आराखडा शिकण्याचा निर्णय घेतला. आधीचा क्वर्टी आराखडा मी थेट टंकनयंत्रावरच शिकलो असल्यामुळॆ आधीच मला खाली न बघता वेगात इंग्रजी टंकन करता येत होते. त्यामुळे नवीन आराखडा आत्मसात करणे सोपे गेले.

आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्यातरी ड्वोरॅक आराखड्याचा सराव करण्याच्या संकेतस्थळावरुन मी सलग ३ दिवस बसुन हा आराखडा आत्मसात केला आणि मला तो लगेच जमला हे मला अजुनही आठवते आहे.

आपल्याला जर हा आराखडा वापरायचा असेल तर संगणकाच्या स्थापत्य मधे जाऊन कीबोर्ट सेटींग किंवा कीबोर्ड लेआऊट अशी‌ सेटींग शोधा आणि तिथुन तुम्ही हा आराखडा तुमच्या कळफलकाच्या यादीत समाविष्ट करुन शकता. एका वेळी एकापेक्षा जास्त आराखडे ठेवण्याची सोय आहे पण कोणत्याही एका वेळेला एकच वापरता येतो. क्वर्टी मधुन ड्वोरॅक आणि परत बदल करण्यासाठी तुमच्या ओपरेटींग सिस्टीम नुसार एक कीबोर्ड शॉर्टकड असेल तो वापरु शकता.

ड्वोरॅक का वापरावा याबद्दल समर्थन करणार्या काही चर्चांमधे कार्पेल टनल सिन्ड्रोम याबद्दल माहिती मिळाली. पण क्वर्टीच्या सलग खुप वापरण्याने याचा किती टक्के लोकांना अनुभव येतो अशी काही आकडेवारी वाचायला मिळाली नाही.

तुम्ही पण हा आराखडा वापरुन बघा आणि सलग खुप वेळ टंकताना मनगटांना जास्त आराम वाटतो का ते बघा. मी जेव्हापासुन हा आराखडा वापरायला सुरुवात केली तेव्हापासुन् क्वर्टी पेक्षा मला हाच जास्त चांगला आणि वेगवान वाटला म्हणुन मी हाच वापरत आहे

प्रतिक्रिया

मारवा's picture

21 Jan 2016 - 4:12 pm | मारवा

तंत्रजगत शिर्षक वापरुन येणारे लेख दुर्मिळच असावेत. मस्त तांत्रिक लेख घेतलाय.
असे पुर्ण तांत्रिक विषयावरचे लेख अजुन यायला हवेत.
तेच ते तेच ते सबजेक्टीव्ह इमोटीव्ह वाचुन कंटाळा येतो.
हा प्रकार एकदम छान
एखाद्या तांत्रिक विषयाचा खणखणीत शुद्ध तार्कीक उहापोह.
आवडत वाचायला

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jan 2016 - 4:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

उत्तम लेख अभिनव साहेब,

तुम्ही हा लेख विज्ञानलेखमालेत का दिला नाहीत प्रवेशिका म्हणुन? अख्खा जालीय अभिव्यक्तिचा डोलारा ज्याच्यावर आहे अश्या कीबोर्ड/कीपैड संबंधी लेख आवडला खुप जास्त! :)

अभिनव's picture

21 Jan 2016 - 6:32 pm | अभिनव

धन्यवाद सोन्याबापु.
ईच्छा होती पण त्यावेळेला वेळेअभावी लिखाण शक्य नव्हते.

सस्नेह's picture

21 Jan 2016 - 4:31 pm | सस्नेह

माहितीपूर्ण लेख.

असे लेख अधिकाधिक येत जावेत मिपावर.
धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण. आवडला लेख.

सल्ला : सर्व वाचकांचे प्रतिसाद लिहुन झाले की मग एकाचवेळी एका प्रतिसादात सर्वांचे आभार माना.

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

21 Jan 2016 - 10:13 pm | उगा काहितरीच

पहातो ट्राय करून .

पैसा's picture

21 Jan 2016 - 10:57 pm | पैसा

पण इथे आपण जास्त देवनागरी फोनेटिक वापरतो. त्यामुळे या कीबोर्डाचा किती फायदा होईल बघावे लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2016 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख.

किबोर्डवरची व्दोराक मांडणी (लेआउट) नेहमीच्या वापरातल्या क्वेर्टी मांडणीपेक्षा जास्त शास्त्रिय, कार्यक्षम आणि जलद आहे. कारण, व्दोराक मांडणीत सर्वात जास्त वापरात असलेल्या अक्षरांपैकी ७०% हाताच्या बोटांची कमीत कमी हालाचाल करून वापरता येतील अशी आहेत; तर क्वेर्टी मांडणीत त्यांचे प्रमाण ३२% आहे. अर्थातच, हाताच्या पंजाची व बोटांची कमीत कमी हालचाल होऊन हाताचा शीण व झीज कमी होते.

हा फरक इतका जास्त आहे की, टंकन प्रतिस्पर्धांमध्ये व्दोराक किबोर्ड घेऊन भाग घेतलेले स्पर्धक सतत जिंकू लागले आणि "अयोग्य फायद्याच्या (अनफेअर अडव्हांटेज)" कारणाने त्या कीबोर्ड्सना स्पर्धांमध्ये वापरण्यावर बंदी आणली गेली.

हे सर्व खरे असले तरी, व्दोराक मांडणीचे किबोर्ड्स, १८७० पासून जनमनात आणि व्यापारी जगतात आपले स्थान बळकट केलेल्या क्वेर्टी मांडणीला तोंड देऊ शकले नाहीत. या वस्तुस्थितीचे "व्दोराक मांडणीचे अपयश आतापर्यंतचे तंत्रजगतातले सर्वात मोठे आणि सर्वात दु:खपूर्ण अपयश समजले जाते (Perhaps no technological failure is better known or more lamented than that of the Dvorak Keyboard.)".

==============

अवांतर : १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात व ९० च्या दशकाच्या पूर्वार्धात हाच प्रो व्दोराक पीसीमॅग या लोकप्रिय संगणक नियतकालिकामध्ये लिहिलेल्या लेखांत "पडद्यावरची चित्रे (ग्राफिक इंटर्फेस व एमएस विंडो) आणि कोणीएक उंदीर (सम रोडंट) संगणकिय जगतात क्रांती घडवून आणेल, असे एक विनोदी माणूस म्हणतो" अशी बिल गेटची खिल्ली उडवत असे. मात्र पुढच्या काही वर्षांतच, विषेशतः १९९२ मध्ये एमएस विंडोचे ३.१ व्हर्शन आल्यानंतर वर्षाभरातच त्याने त्याच मासिकातल्या एका लेखात त्याच्या आधीच्या वचनांतील चूक "आय इट माय वर्ड्स" या शब्दांत मोठ्या मनाने स्पष्टपणे मान्य करून बिल गेटची स्वतःहून विनाशर्त माफीही मागितली होती.

मदनबाण's picture

22 Jan 2016 - 6:59 am | मदनबाण

नविन माहिती मिळाली... असेच अजुनही लिहा. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Just Can't Get Enough... :- The Black Eyed Peas

डॉ. सुहास म्हात्रे छान माहिती दिलीत.

हा आराखडा शिकु इच्छिणा-यांनी इथे एकदा बघावे http://www.dvorak.nl/
यात मॉनीटरवर ड्वॉरॅक आराखडा दिसत राहिल्यामुळे आपल्या बोटांना अक्षरांच्या नविन जागांची सवय करणे सोपे जाते.

संगणकावर काम करतान बसण्याच्या आणि टंकन्याच्या योग्य पद्धती बाबत या काही लिंक्स आहेत. यातील सर्व छायाचित्रांमधे हाताचा किबोर्ड ठेवलेल्या फळीशी असलेला कोन ई. महत्वाच्या गोष्टी बघा:

http://www.wbmerriman.net/intro/pages/type/posture.php

http://www.wikihow.com/Sit-at-a-Computer

http://www.ergonomics.com.au/how-to-sit-at-a-computer/

एस's picture

24 Jan 2016 - 6:47 pm | एस

उत्तम माहिती!

उत्तम माहिती. प्रयत्न करतो. धन्यवाद.