कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात. असे हे कुळीथ जन्मापासून आवडीचे असल्याने विविध प्रकारांनी आहारात वापरले जातात.
कुळथाचे पिठले सर्वांनाच माहित आहे, रूची विशेषांकातही याची कृती आली आहे. हे पिठले तर आठवड्यातून एकदा होतेच. शेजार पाजारचा कोणी माणूस गेल्यावर घरच्यांना पिठलं भात दिला जातो. म्हणून शक्यतो कुळथाचे पिठले दिवसा करत नाहीत. ज्यानी कुळीथ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो:
कुळथाचे लाडू:
साहित्यः कुळीथ पीठ दोन वाट्या, किसलेला गूळ पावणे दोन वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, वेलची पावडर.
कृती: कुळीथ खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावीत. ही डाळ दळून आणावी. कुळीथ पीठ कोकणात प्रत्येकाकडे असतेच. हे तयार पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करावा, नीट मिसळून तूप घालावे. थोडी वेलची पावडर घालावी. खरंतर कुळथाचा वासच इतका खमंग असतो की वेलचीची गरजच नाही. तूप घालून मिश्रण एकत्र करून आवडीनुसार लाडू वळावेत. थंडीच्या दिवसात हे लाडू उत्तम!
माझी आजी जेव्हा ताजे तूप कढवले असेल तेव्हाच हे लाडू करायची, आणि तुपाची बेरी त्यातच घालायची.
कुळथाची उसळः
साहित्यः दोन वाट्या कुळीथ, तीन चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, दोन चिमुट हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबिर.
कृती: कुळीथ सकाळी भिजत घालावेत. रात्री उसपून चाळणीवर काढावेत. घट्ट झाकण ठेवावे. सकाळी छान बारीक मोड येतील. निवडून घेऊन कुळीथ कुकरला शिजवून घ्यावेत. शिजताना पाणी थोडे जास्त घालावे. कुळीथ शिजले की हे जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सगळे पाणी गाळू नये. ह्या पाण्याचे कळण करणार आहोत. आधी उसळ करून घेऊ. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. शिजलेले कुळीथ घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. कोथिंबिर घालून पोळीबरोबर खावी. मला ही उसळ नुसतीच खायला आवडते.
कळणः
साहित्यः कुळीथ शिजल्यावर गाळलेले पाणी ३ वाट्या, नारळाचे दूध ४ वाट्या, ताक ४ वाट्या, ७/८ लसूण पाकळ्यांची पेस्ट, एक चमचा मिरचीचे वाटप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जीरे, हळद.,कोथिंबिर, मीठ, साखर.
कृती: गाळलेले पाणी जेवढे असेल त्याच्या अडीच पट नारळाचे दूध आणि ताक मिळून घ्यावे लागते. हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात नारळाचे दूध आणि ताक मिसळावे. लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार घालावी. मिरची पेस्ट चवीनुसार मिसळावी. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी, हिंग व्यवस्थित असावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. कळण जेवण्यापूर्वी अगदी थोडे गरं करावे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते.
कळणाची चव अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान वाटते.
प्रतिक्रिया
12 Dec 2015 - 1:33 pm | कविता१९७८
छान रेसिपीज
12 Dec 2015 - 1:57 pm | पिलीयन रायडर
Arey wa!! Me kadhich kulith khalla nahiye. Ata karun pahin nakki.
12 Dec 2015 - 2:25 pm | जातवेद
आणि पाककृती.
12 Dec 2015 - 3:34 pm | पद्मावति
वाह, मस्तं पाककृती आणि फोटो.
12 Dec 2015 - 5:22 pm | एस
वा! हुलग्याचे शेंगदाण्याचा कूट घालून कोरड्यास केले जाते. ते बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते.
12 Dec 2015 - 5:27 pm | स न वि वि
मोड आणून वाफवलेली कुळीथ वजन कमी करण्यास उपयुक्त असे वाचले आहे. बाकी पाक्रु मस्तच … कुळथाचे पिठले करते मी . गरमागरम भट सोबत छानच लागते. सोबत पापड :-)
12 Dec 2015 - 5:27 pm | स न वि वि
मोड आणून वाफवलेली कुळीथ वजन कमी करण्यास उपयुक्त असे वाचले आहे. बाकी पाक्रु मस्तच … कुळथाचे पिठले करते मी . गरमागरम भातासोबत छानच लागते. सोबत पापड :-)
12 Dec 2015 - 7:09 pm | अजया
अरे वा.सर्वच करुन बघण्यासारखं आहे.तुझ्यामुळे आज कुळीथ बघितलं. माहित नव्हतं कसं दिसतं.
12 Dec 2015 - 9:34 pm | स्रुजा
अरे वा.. मी पण कधीच कुळीथ खाल्लेलं नाहीये. पण ऐकलं मात्र बरंच आहे. सगळ्याच पाकृ नेहमीसारख्याच छान. मी उसळ करुन बघेन.
12 Dec 2015 - 9:51 pm | पैसा
कुळिथाचे लाडू पहिल्यांदाच बघितले. इतर पाककृती छान आणि फोटो सुरेख आलेत!
स्रुजा, कुळीथ शिजल्यावर मसुरासारखे मऊ होत नाहीत. जरा कडक रहातात.
13 Dec 2015 - 9:57 pm | स्रुजा
ओह्ह, बरं झालं सांगितलस. मी बसले असते शिजवत नाही तर , मऊ का होत नाहीये असा विचार करत.
12 Dec 2015 - 10:58 pm | विशाखा राऊत
अरे वाह मस्तच
12 Dec 2015 - 11:38 pm | रेवती
कुळथाचे लाडू करतात हे पहिल्यांदाच पाहिले. छान पाकृ, अगदी पौष्टिक!
कुळथाची पिठी पंधरा एक दिवसात एकदा तरी करते. असे वाचले आहे की जास्त दमणूक झाल्यादिवशी, आजारातून उठल्यावर जर कुळीथ आहारात ठेवले तर सर्व शारिरिक व्यय भरून निघतो.
आमच्यायेथे दुकानात हॉर्सग्राम म्हणून कुळीथ मिळते. त्याचे पीठ करण्याची सोय नसल्याने अनेकजणी त्याचे सूप करतात व तेही चांगले लागते. कळणाचा फोटो पाहून त्या सुपाची आठवण झाली.
13 Dec 2015 - 2:03 am | प्रभाकर पेठकर
कुळीथ (हॉर्सग्रॅम) हे निकृष्ट अन्न नसून अत्यंत पौष्टीक आणि माणसांनी आवर्जून खावे असे अन्न आहे. कुळीथाचे पिठले मला आवडते. मसूराचे कळण ऐकून माहित आहे कुळीथाचे प्रथमच पाहिले आणि पाककृतीही मिळाल्यामुळे लवकरच करण्यात येईल.
13 Dec 2015 - 5:45 pm | इशा१२३
मस्त रेसिपिज.लाडु मी हि पहिल्यांदाच ऐकले.
13 Dec 2015 - 6:31 pm | यशोधरा
कुळीथाचे सगळेच खाद्यपदार्थ आवडतात!
कुठीथपिठीचे पिठलेही भारी होते! ते नाही लिहिलेस ते अनन्या?
13 Dec 2015 - 9:50 pm | अनन्न्या
म्हणून परत नाही दिली.
13 Dec 2015 - 10:48 pm | यशोधरा
ओह, अच्छा :)
13 Dec 2015 - 8:55 pm | पियुशा
पहिल्यांदाच पाहिलंय हे कुळीथ प्रकरण ,पौष्टिक दिसतंय :)
13 Dec 2015 - 9:17 pm | चांदणे संदीप
हुलग्यालाही रेसिपीत जागा मिळाल्याचे पाहून खूप आनंद झालाय मला. :))
बऱ्याच जणांना हुलगे माहीत नसतात असा अनुभव आहे!
मला स्वत:ला हुलग्याची उसळ प्रचंड आवडते! आमच्या घरात हुलगे घालून सुके मटण/चिकन करतात.
हुलग्याची पाककृती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद,
Sandy
13 Dec 2015 - 10:01 pm | अभ्या..
च्यामारी सॅण्डी, हे हुलगे हायेत व्हय?
मी उगी इचार करीत बसलो सगळ्यांना म्हैत हे कुळीथ अन आमालाच कस्काय नाय माहीत.
ब्येस्ट ब्येस्ट. हुलगे एकदम फेवरीट भाऊ.
13 Dec 2015 - 10:03 pm | अभ्या..
हा पाकृचे नुसते फोटो बघल्याचा पर्णाम हाये. करायची नसल्याने आम्ही वाचत नस्ताव.
पण पैल्या वाक्यात खुलासा है. सॉरी आणि थॅन्कू बर्का.
13 Dec 2015 - 10:48 pm | यशोधरा
हुलगे घालून सुके मटण/चिकन करतात. >> कृपया रेसिपी द्यावी.
13 Dec 2015 - 9:54 pm | अनन्न्या
फक्त उष्ण असल्याने उन्हाळ्यात खाऊ नयेत.
आवर्जून प्रतिसाद देणाय्रा सर्वांचे आभार!
14 Dec 2015 - 6:14 am | मितान
मला स्वतःला हुलग्याचा वास आवडत नाही. पण घरात हुलग्याची उसळ सगळ्यांना प्रिय आहे.
हुलग्याचे कढण पण मस्त लागते.
अनन्या, लाडवांच्या रेसिपीसाठी धन्यवाद :)
14 Dec 2015 - 8:29 am | पलाश
छान माहिती आणि सुंदर सादरीकरण. लाडूची कृती आणि फोटो विशेष आवडला आहे.
14 Dec 2015 - 8:54 am | चतुरंग
कुळीथ पिठले अत्यंत आवडते. गरमागरम वाफळता भात, भरपूर साजूक तूप आणि कुळीथ पिठले....खल्लास!! :)
उसळ आणि लाडूही करतात हे माहीत नव्हते. परंतु मस्तच लागत असणार यात शंका नाही.
14 Dec 2015 - 10:17 am | अनन्न्या
पिठले अतिशय आवडीचे! मी माहेरी गेले की आई एकदा तरी उसळ आणि कळण करतेच. लाडू हे पूर्वीपासून केले जातात, खूपच सुंदर लागतात.
14 Dec 2015 - 12:44 pm | मीता
आमच्याकडे हुलग्याचे शेंगोळे होतातच थंडीमध्ये . ते पण मस्त लागतात
14 Dec 2015 - 1:21 pm | भुमी
मी आत्तापर्यंत पिठलंच खाल्लय कुळीथाचं,लाडू पहिल्यांदाच पाहिले.
14 Dec 2015 - 1:32 pm | पेरु
हुलग्याचे शेंगोळे हा अत्यंत आवडता पदार्थ आहे.
14 Dec 2015 - 1:37 pm | नाव आडनाव
हुलग्याची भाकर पण एकलेली आहे (खाल्ली नाही). ७२ च्या दुष्काळात काही लोक करायचे असं माझी आज्जी सांगायची.
14 Dec 2015 - 2:17 pm | चांदणे संदीप
येग्झॅट्ली!
14 Dec 2015 - 1:51 pm | दिपक.कुवेत
पण "कुळीथ पिठले" हा प्रकार अजीबात आवडत नसल्याने आपला पास...
14 Dec 2015 - 4:16 pm | सविता००१
फक्त लाडू सोडून.
14 Dec 2015 - 5:12 pm | अनन्न्या
कुळथाचे असेच आहे, आवडणाय्राना अतिशय आवडतात आणि नाही आवडत त्यांना वासही नको वाटतो.
@सविता, एकदा मी केलेले लाडू खाऊन बघ!
14 Dec 2015 - 5:26 pm | सविता००१
आलेच :)अग कुळीथ पिठाचा वास आणि गोड चव हे डोक्यात बसत नाही अजून.
आता डेरिंग करते एकदा ;)
14 Dec 2015 - 8:16 pm | सूड
भारी, पिठलं आणि भाजी मिस करतोय.
14 Dec 2015 - 9:06 pm | बाबा पाटील
वात कफघ्न,याचे माडगे - सर्दी,खोकला,दमा . नविन ताप यात अत्यंत उपयुक्त. मुत्राश्मरी(मुतखडा) याचे भेदन करण्याचे काम करते.,संधीवात विशेषतः आमवातमध्ये उपयुक्त. पित्तप्रकृतीच्या रुग्नांना मात्र अपथ्य.
14 Dec 2015 - 10:01 pm | रेवती
माहितीबद्दल धन्यवाद पण पित्तप्रकृती आणि किस्टो असे दोन्ही असणार्यांनी काय करावे हेही सांगा प्लीज.
15 Dec 2015 - 1:25 am | रुपी
हुलग्याची उसळ आणि बाजरीची भाकरी लहानपणीपासून फार आवडते.
पण शेंगोळे म्हणजे जीव की प्राण... ते कसे काय नाहीत या यादीत? असो, बाकी पाकृंसाठी धन्यवाद!
15 Dec 2015 - 5:19 pm | अनन्न्या
त्यामुळे मला माहित नाहीत.