प्रवास

Primary tabs

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in दिवाळी अंक
2 Nov 2015 - 2:16 pm

.
.
हायकोर्ट जिल्ह्याच्या गावी होते. दोन चार दिवस राहण्याच्या हेतूने तयारी करून तो निघालेला. दोन वर्षे मोठ्या भावाबरोबर शेतजमिनीच्या भांडणात घरच्या सगळ्यांचेच मन:स्वास्थ्य बिघडलेले होते. कोर्टाच्या चकरा, वकिलांच्या डोक्यावर पैसे ओतणे ते सगळे त्रास एकवेळ सहन करता येतील. पण शेजारी राहणार्‍या भावाच्या कुटुंबाशी रोजच्या कटाकटी आणि हमरीतुमरी आता नको झाल्या होत्या. आज समोरचा काय नवे त्रांगडे उभे करेल ह्याच्या चिंतेमध्ये सगळा वेळ जायचा. लहानपणी जिवाभावाने गळ्यात गळे घालणारी भावंडे एका जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे गळेदेखील कापायला तयार व्हावीत?

बस एका थांब्यावर उभी राहिली, तेव्हा तो पाय मोकळे करायला खाली उतरला. त्याने पाहिले, मागच्या भागात बसलेला भाऊदेखील उतरायच्या तयारीत होता. खरे तर त्याला चहाची खूप तलफ आली होती. विचारांच्या वावटळीने डोक्यात भुगा उधळला होता. पण भाऊ खाली उतरतोय म्हणजे नक्कीच चहाच्या टपरीवर समोरासमोर तोंड पडणार. चहाचे टाळून तो दूर झाडाखाली जाऊन उभा राहिला.

ह्या भांडणाने त्याचे, त्याच्या कुटुंबाचे सगळे विश्वच गढुळले होते. इतका कडवटपणा, इतका द्वेष मनात साठला असताना नेहमीचे जीवन अशक्यच होते. वडील वारल्यानंतर भावाभावांत समझोता करावा असे कोणीच नव्हते. भांड्याला भांडी आपटीत सगळे प्रकरण केव्हा विकोपाला गेले ते कळलेच नाही. वडिलांनीच जाता जाता सगळा घोळ करून ठेवला होता. शेती त्यांची स्वकष्टाची मालमत्ता होती हे खरे. पण म्हणून मृत्युपत्रात ती सगळी मोठ्या मुलाच्या नावाने करून ठेवावी, यात काय अर्थ होता? त्याचेही भावानुबंध लहानपणापासून शेतात गुंतले होतेच ना? आणि त्याने मोठ्याच्या बरोबरीने, किंबहुना जास्तच कामदेखील पाहिले होते. असे असताना वडिलांनी त्याच्यावर हा अन्याय करावा?

पण अजूनही त्याला विश्वास वाटत नव्हता की वडिलांनी खरेच असे मृत्युपत्र केले असेल. आई गेली, तेव्हा शेतावर असलेले छोटेसे घरकूल सोडून शेवटची पाच सहा वर्षे ते मोठ्या मुलाकडेच राहत होते. त्याच काळात मोठ्याने आणि त्याच्या बायकोने वडिलांवर काहीतरी भूल टाकून जमीन स्वत:च्या नावावर लिहून घेतली होती, हे नक्की. एसटीने उडणारा धुराळा चुकवीत रुमाल तोंडावर धरताना त्याला वाटले, त्याचेच चुकले. किंवा खरे तर बायकोचे! वडिलांची तब्येत शेवटी खराब होती. मोठ्याला म्हणे काही अडचणी होत्या, म्हणून वडिलांना तुझ्याकडे ठेव असे मोठ्याने आपल्याला म्हटले होते. पण बायकोने त्याच्याजवळ खूप गहजब केला होता. आजारी म्हातार्‍याची सेवा करणे तिला मुळीच कबूल नव्हते. बायकोने छलकपट करून सासर्‍याचे आपल्या घरी येणे टाळले होते. आपणदेखील आजारपणाच्या श्रमांना घाबरून कळत नकळत तिला साथच दिली आणि मग वडील मरेपर्यंत मोठ्याकडेच राहिले होते. ह्या बायकापण नां! राहिले असते एक दोन वर्षे, तर असे काय मोठे संकट होते? पण नाही म्हणून आता हे मोठ्ठे नुकसान करून घेतले ना? आणि आता सासर्‍याने जमीन नाही ठेवली, तर हीच बायको त्याच्या नावाने शंख करते.

कंडक्टरने घंटी वाजवली. मोठा भाऊ आत जाऊन बसल्याची खातरी झाल्यावरच तो आपल्या जागेवर जाऊन बसला. कोर्टात जातानादेखील हा नेमका ह्याच बसमध्ये? त्याचे तोंडही पाहण्याची इच्छा नव्हती. पण इलाज नव्हता. येत्या दोनचार सुनावण्यांनंतर केसचा निकाल लागेल असे वाटत होते. पण आत्तापर्यंतच्या कामकाजानंतर आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमीच वाटत होती. मृत्युपत्रात अगदी स्वच्छ उल्लेख होता की सर्व जमीन स्वकष्टाने खरीदली होती आणि ती मोठ्याच्या नावाने केली आहे. वकिलांच्या सांगण्यावरून त्याने बळेच हे खोटे मृत्युपत्र आहे आणि तसेही त्याचा शेतीच्या कष्टात भाग होता म्हणून शेतजमिनीत वाटादेखील हवा इत्यादी इत्यादी दावे ठोकले होते. पण त्यात अर्थ नव्हता. हे आपल्या वकिलालादेखील माहीत आहे. पण फी वाढविण्यासाठी उगाचच तारखा घेऊन आपल्याला लुबाडीत असावा! छे! सगळेच चुकले. ठेवायला पाहिजे होते बापूंना दोन वर्षे घरी.

बस एका मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन उसळली आणि विचारांच्या तंद्रीत ह्याला गच्चकन धसका बसला. बसमधले धक्के, विडीच्या धुराने भरलेली कडवट हवा त्याला आणखीनच कडवट बनवून गेली.. मोठ्या भावाविषयी वाटणारी मळमळ थुकण्यासाठी खिडकीबाहेर त्याने एक कचकचीत पिंक टाकली. हा वरचेवर करावा लागणारा धूळखाऊ प्रवास, आपल्याला लुबाडू पाहणारा भाऊ, ह्या सगळ्याला मनोमन शिव्या देत राहिला. रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्यासोबत बस चांगलीच वरखाली डोलत होती. भावाच्या द्वेषाचे घुसमटणारे पांघरूण ओढत ढकलत असताना केव्हा डुलकी लागली, ते कळलेही नाही............

.................................................................................................................

सुर्र सुर्र वर वर. आणि लगेच वेगाने भुर्र भुर्र खाली खाली. कितीतरी वेळ तो लोंबकळतच होता. एखाद्या झोपाळ्यात एकसारखे वर-खाली करीत. अजून गाव आले नाही का? किती वेळ हा कंटाळवाणा प्रवास चालणार आहे? पापण्या एवढ्या जड जड झालेल्या होत्या की जणू डोळ्यांवर चिकटूनच बसल्या होत्या. मध्येच डोळे उघडल्यासारखे वाटले, पण लगेच मिटले गेले. सुर्र सुर्र वर वर. आणि लगेच वेगाने भुर्र भुर्र खाली खाली सुरूच राहिले. आता त्या भिंगरीसारख्या लयीने मळमळ सुटली. कडूशार लोट उन्मळून बाहेर येतील की काय असे वाटू लागले. ते जहर बाहेर टाकायला घशातले स्नायू ताणले गेले. पण घसा एकदम कोरडा पडलेला. कडवट एक थेंबदेखील बाहेर पडू शकला नाही. घशाची कोरड जाणवून त्याने सहजपणे घशावरून हात फ़िरविला. पण काय आश्चर्य! तेथे घसाच नव्हता. डिगाचे पाट लावून चिकटलेल्या डोळ्यांनी त्याने भांबावून पाहिले.... त्याचे हातदेखील नव्हते! होती फक्त घशावरून हात फिरविल्याची जाणीव! तो अतिशय घाबरला....

हे काय चालले आहे? बस पोहोचल्याबरोबर आधी गरमागरम चहा घ्यायचा.

डोळे मिटले असतानाच समोरून मोठा भाऊ लगबगीने कुठे तरी जात असल्याचा भास झाला. अरेच्चा, गाव आले वाटते. पण मला हे काय झाले आहे? डोळे उघडत नाहीत. बहुधा तापाने ग्लानी आली असावी. तशातही त्याने नाइलाजाने भावाला मोठ्या कष्टानेच विचारले, “दादा, गाव आले का?” आपलेच शब्द एखाद्या खोल गुहेतून आल्यासारखे त्याला वाटले. उत्तर अपेक्षित नव्हते. काय दैव आहे! ज्याचे तोंडदेखील पाहण्याची इच्छा नवहती, त्याच्याशीच बोलावे लागते आहे! बहुधा हा न बोलताच तसाच निघून जाणार! पण तो थांबला! जवळून जाताना भावाने कसे कोण जाणे, पण आपले पुटपुटणे ऐकले होते.

त्याच्याकडे रोखून पाहत भाऊ म्हणाला “गाव आले का विचारतोयस? माझे तर नक्कीच आले. तुझे माहीत नाही.”
“अरे, असे काय करतोस? आधीच मी ह्या प्रवासाने खूप त्रासलो आहे. बहुधा तापदेखील असावा. मला खाली तर उतरव.”
“ते काही जमायचे नाही. मला गेले पाहिजे. ते बोलावताहेत.”
आणि त्याला एकट्या असाहाय्य अवस्थेत सोडून भाऊ लगाबगा गेलादेखील.

ह्याचे वर खाली लोंबकळत झोके सुरूच. आणि प्रत्येक वेळी पोटात धक्का. बस थांबली आहे ना? मग हे धक्के कसले? मिटलेल्याच डोळ्यांनी आणखीही एकदोन जण वर-खाली झुलताना दिसले. “अरे, थांबा हो! हे काय सुरू आहे?” त्याने शेजार्‍याला विचारले.
“बहुधा आपण गेलेलो आहेत.” शेजारी वर उसळताना म्हणाला.
“गेलेलो? म्हणजे?”
“बसला खूप मोठा अपघात झाला. दुर्देवाने मी त्या वेळेस जागाच होतो. माझे तर डोकेच फुटले. शेवटच्या क्षणांचे असीम दु:ख अजूनही अंगावर शहारा आणते आहे. मघापासून मी त्या वेदना प्रत्येक झोक्याबरोबर अनुभवतो आहे.”
“गेलेलो म्हणजे आपण मेलो ह्या अपघातात?”
“तसे म्हणू शकता.”
“पण हे वर-खाली झोके हे काय सुरू आहे?”
“मला सांगा, तुमची काही इच्छा, राग-लोभ काही राहिला होता का?”
“म्हणजे काय म्हणायचेय काय तुम्हाला?” त्याने रागावून विचारले.
“नाही, तुम्ही सांगितले नाही तरी कळतेय मला! मीदेखील व्यभिचारी बायकोवर सूड उगविण्यासाठीच मागे राहिलो असेन असे मला वाटतेय.”
“म्हणजे तुम्ही भूत झालाय की काय?”
“तसे म्हणा हवे तर! आणि खरे म्हणजे तुम्हीदेखील! तुम्हाला कोणावर सूड उगवायचा असेल तर लवकर उगवून घ्या.”
“काहीतरी वात्रटासारखे बोलू नका. मला फक्त तापाने ग्लानी आलीय. मी माझ्या मुक्कामावर पोहोचलो आहे. लवकरच उतरूनही जाईन.”
“काहीतरी काय? तुम्ही काही मुक्कामावर वगैरे पोहोचला नाहीत. निदान अजून तरी नाही.”
“म्हणजे?”
“म्हणजे, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. मरताना तुमच्या मनात ज्या कोणाविषयी सूडभावना किंवा द्वेष होता, त्याला धडा शिकविल्यानंतरच तुमचा प्रवास संपेल.” लोंबकळताना खदाखदा हसत शेजारी म्हणाला.
“अहो, मग माझा मोठा भाऊ मघा येथून जाताना मी पाहिले.......तो.....”
“भारीच चौकशा करता बघा तुम्ही. मला लवकर गेले पाहिजे. माझ्या देहाला जाळण्याआधी मला बायकोच्या मानगुटीवर बसणे आवश्यक आहे.”
“अहो, काय काहीतरीच बोलता?”
“जाऊ द्या हो! तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? मग बसा इथे लोंबकळत. तुमच्या देहाला जाळण्याआधी तुम्हीही तुमचा कार्यभाग उरकला नाही, तर असेच लटकत प्रवास करीत राहा. अनंत काळासाठी...” शेजारी भरारी घेऊन दूर जाऊ लागला...
“अहो, थांबा थांबा, मला एकच सांगा, मघा मी भावाला लगबगीने जाताना पाहिले. मला जायचे आहे. ते वाट बघत असतील असे काहीसे म्हणत होता....”
“अच्छा.. म्हणजे तुमचा भाऊदेखील ह्याच बसमध्ये होता काय?”
“हो ना, अहो कोर्टात आमची एकमेकांविरुद्ध केस चालू आहे, म्हणून जिल्ह्याला जात होतो.”
“अच्छा.. आता आले लक्षात..... आणि केस चालू होती म्हणा हो. तुमचा भाऊ सुटला! त्याचा प्रवास संपला, आणि केसदेखील.
“म्हणजे? तोदेखील मेला?”
“अर्थातच. अहो केवढा भयानक अपघात होता.. जवळजवळ सगळेच मेले बहुधा. आपल्यासारखे लटकलेले चार पाच सोडले, तर सगळे प्रवास संपवून दूरवर निघूनदेखील गेलेत.”
“म्हणजे मी आणि तुम्ही... प्रवास संपला नाही? काय बरळताय काय तुम्ही?’
“हे बघा, मला उशीर करू नका. मी वेळेवर जाऊन बायकोला धरले नाही, तर तिच्यावर सूड उगवू शकणार नाही, अन मग माझा प्रवासदेखील कधीच संपणार नाही......”
“प्रवास संपणार नाही म्हणजे?...”
“एखाद्याची सूड घेण्याची इच्छा राहून गेली असेल, तर तो मरणानंतर भूतयोनीत येतो. त्याचा मृतदेह जाळण्याआधीच त्याने ज्याच्यावर सूड घ्यायचा त्याला पछाडले, तरच ते शक्य होऊ शकते, आणि मग तो पुढच्या मार्गाला लागतो. अन्यथा त्याला भूतयोनीतच कायम प्रवास अटळ आहे!”
“हे सगळे अजबच आहे. देह जाळण्याआधी पछाडायचे.. मग ज्यांचे दफन होते त्यांना काय?”
“त्यांना अर्थातच थोडा जास्त वेळ मिळतो. देह पूर्ण नष्ट होईस्तोवर! छ्या! मी काय बोलत बसलोय तुमच्याबरोबर! आणखी थांबलो, तर बहुधा तुमच्यासारखेच अखंड लटकत राहावे लागेल.”

“माझ्यासारखे लटकावे लागेल म्हणजे? काय म्हणायचे आहे काय तुम्हाला?”

“अहो, तुमचा राग भावावर होता ना? तो सुटला, गेला दूरच्या प्रवासाला! आता त्याच्यावरच्या रागाचा निचरा कसा करणार तुम्ही? बसा तुमच्या शेतात कुढत आणि येणार्‍या-जाणार्‍याला छळत. त्याचाही कंटाळा आला की झाडावर लटका, नाहीतर झोपा काढा!.... मी चाललो, मला मोकळे व्हायचेय!
माफ करा, मी गेलो..” सुर्र भरारी घेऊन शेजारी गेलादेखील.

भयाण शांततेत शेजार्‍याच्या विखारी शब्दांची आवर्तने त्याच्याभोवती भणभणू लागली.
“बहुधा तुमच्यासारखेच अखंड लटकत्या प्रवासात राहावे लागेल....”
आणि एका विचाराने त्याच्या पोटात गोळाच आल्यासारखे झाले.
“तुमचा भाऊ सुटला! त्याचा प्रवास संपला..”
हे शब्द त्याच्या कानावर पुन्हा पुन्हा आदळू लागले.
तो तर सुटला, गेला... प्रवास संपला त्याचा.....
आपला सूड उगवू शकण्यासाठी थांबला नाही! ... काय करावे? त्याच्याऐवजी त्याची बायको, त्याचा मुलगा?.... एकेक दृश्ये नजरेसमोरून सरकू लागली. आपल्या बायकोने जावेच्या अंगणात कचरा उपडा केला होता. भावाच्या बायकोने शांतपणे अंगण साफ केले होते. आणि पुतण्या तर आपल्या घरी सतत यायचा. नंतर भांडणे झाली तरी यायला बघायचा. किती गोड मुलगा! पण आपल्या बायकोला आवडायचे नाही, म्हणून तिच्या नकळत त्याला खाऊ पोहोचवायचो आपण! त्यांना छळायचे ही कल्पनाच सहन करवीत नाही! भाऊ असता तर सगळा राग काढता आला असता! आता तो तर गेला...

सततच्या आठवणींचे पीळ सोशीत.. शेतावरच्या चिडक्या कुत्र्यासारखे येणार्‍या-जाणार्‍यावर भुंकत, चावे घेत वेळ काढायचा?... काय गत झालीयं! कशाला त्या मातीचा लोभ धरला होता? न संपणार्‍या प्रवासात कुत्र्याचे जिणे नशिबी यायला? तशाही स्थितीत त्याचा भावावरचा द्वेष आणखीनच उफाळून आला आणि वेदनेची तीव्र बोच ऊर जाळीत खोलवर पसरली.
.

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Nov 2015 - 11:05 pm | पैसा

मानवी स्वभावाचे उत्तम दर्शन!

देश's picture

13 Nov 2015 - 10:53 am | देश

कथा आवडली

देश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2015 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा.

-दिलीप बिरुटे

एस's picture

13 Nov 2015 - 11:41 am | एस

'प्रवास' आवडला. एका अर्थाने मानवी स्वभावाच्या प्रवृत्तींचा हा प्रवास आहे. फारच छान लिहिलंय!

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2015 - 5:03 pm | प्रभाकर पेठकर

कल्पनाविस्तार आवडला. खरंच असं असू शकतं? माहित नाही. 'आप मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात' तसेच 'आप मेल्याशिवाय भूतयोनीचे नियम कळत नाहीत' असेही असावे.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 12:00 pm | मुक्त विहारि

मस्त...

नूतन सावंत's picture

15 Nov 2015 - 9:24 pm | नूतन सावंत

छान कथा.

जगप्रवासी's picture

18 Nov 2015 - 5:16 pm | जगप्रवासी

शेवट वेगळा असेल अस वाटत होत, वाटल होत की तो आता झोपेतून जागा होईल आणि गाडीतून उतरल्यावर भावाला हाक मारेल. तिथेच त्यांच्या भांडणाचा शेवट होऊन दोघे पण शेतात राबतील आणि सुखाने नांदतील.

असो छान कथा, मानवी भावनांचे वेगवेगळे धागे एकत्रित रित्या दाखवलात.

उगा काहितरीच's picture

18 Nov 2015 - 6:53 pm | उगा काहितरीच

थोडं जास्त होतंय ,पण जीए टाईप वाटली कथा !

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 7:11 pm | स्वाती दिनेश

छान कथा,
स्वाती

सौंदाळा's picture

19 Nov 2015 - 6:20 pm | सौंदाळा

कथा आवडली