आमचीही एक 'स्वारीची तयारी'… चंद्रावर!!

Primary tabs

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in दिवाळी अंक
28 Oct 2015 - 7:21 pm

.
.

(या लेखातल्या नावाशी किंवा घटनेशी तुमचं कोणतंही साधर्म्य असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे ढिशक्लेमर उपचारापुरतंच… त्यातूनही काही तुमच्या जवळपास जाणारं सापडलं, तर तुम्हाला देवच तारो अशी सदिच्छा!!)

मुंबईत एकवेळ देव सापडेल, पण मनासारखं घर सापडणं महाकठीण!! रोजच्या वृत्तपत्रातल्या घरासंदर्भातल्या पानपानभर चकचकीत जाहिराती पाहून कोणालाही भुरळ न पडली तरच नवल बरं का…. घरांच्या किमती पाहून सध्याच्या आपल्या राहत्या घराबरोबरच आजूबाजूची अजून २-३ घरं विकली, तरी त्या चकचकीत इमारतीत घर घेणं शक्य नाही हे माहीत असूनही स्वप्नरंजन म्हणून का होईना, आपल्याला ते झेपतंय की नाही ह्याचा आर्थिक अंदाज मनातल्या मनात आपण कधी न कधीतरी घेत असतोच. आमचं कुटुंबही त्याला अपवाद नाही. प्रत्यक्ष घर घेण्यापेक्षा त्याच्या स्वप्नातच दिवस ढकलणं हेच त्यांना प्रिय!! घराचं आणि लग्नाच्या स्थळाचं तसं एका अर्थी सारखंच! जे आपल्याला आवडतं ते कधीच परवडत नाही आणि जे सहज मिळू शकेल त्याला मुळातच बाजारात किंमत नसते, त्यामुळे कितीही पारखून घेतलं तरी जे व्हायचं ते होतंच… असो.

तर मुद्दा असा की घराच्या मागच्या गल्लीपासून घर शोधण्याची सुरुवात करून त्याची व्याप्ती आजूबाजूचा परिसर, अलीकडचा परिसर, पलीकडचा परिसर, त्याच्या बाजूचा परिसर, स्टेशन, तालुका, जिल्हा, राज्य असं करत करत एक दिवस थंडावली, पण घर काही हाती लागलं नाही. कारण एकच… "पटलं नाही!!"

आमच्या घरच्यांच्या अपेक्षापण 'लय भारी'. दक्षिण नको… तळमजला नको… घरात कोणी अवेळी गेलेलं नको… एक न दोन, हजार कारणं. सगळीकडे फिरता फिरता आम्हालाच घरघर लागली. मोबाईलमध्ये मित्र आणि नातेवाइकांपेक्षा वेगवेगळ्या 'ब्रोक्रांचे' नंबर जेव्हा अधिक झाले, तेव्हा ही मोहीम थंडावत चालली आहे ह्याची जाणीव झाली आणि ह्या बापजन्मात आम्ही सगळ्यांना पटेल अशा प्रशस्त घरात जाऊ अशी शक्यता धूसर दिसायला लागली. मग मात्र मी घरच्यांना थेट सांगितलं की ह्या पृथ्वीतलावर तुमच्या योग्यतेचं एकही घर उपलब्ध नसून आता त्यासाठी पृथ्वी सोडायची वेळ झाली आहे. तुम्हाला बहुतेक चंद्रावर किंवा मंगळावर मनासारखं घर मिळेल. आता एक काम करा… तिथे जमीनजुमल्यात खरेदीविक्रीचे काम करणारा एखादा माणूस शोधा. मातोश्रींना मी नवीनच 'व्हाटस्याप' असलेला मोबाइल घेऊन दिल्यामुळे त्यांच्या ज्ञानात रोज बहुमोल भर पडत होतीच. त्यांनी लगेच श्री शरच्चन्द्रजी पवार ह्यांच्याकडे चंद्राचा सातबारा आहे ही विनोदी माहिती गंभीरपणे दिली. ह्यावर मला हसावे की रडावे तेच समजेना…

अरे हो… आधी तुम्हाला मुळात आमच्या घरच्यांची ओळख करून द्यायची राहिलीच. तर तुमच्यासाठी हा खास पात्रपरिचय…

घरातले सदस्य : पिताश्री, मातोश्री, आमची दारा आणि ह्या सगळ्यात पिचलेले अस्मादिक.

थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची, तर आधीच्या पिढीतल्या सगळ्या बायकांप्रमाणे मातोश्रींची ही ठाम समजूत आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न उरकावं म्हणून गाजरपारखी ह्या नात्याने हा पिताश्रीरूपी जावई शोधून आणला आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याची माती झाली आहे, अन्यथा त्यांचं आयुष्य खूप सुंदर आणि छान असतं. ह्या समजामुळे त्यांनी सध्या पिताश्रींना येता-जाता सतत त्याचा उल्लेख करून टिपं गाळणं, त्यांच्यावर करवादणं आणि यथोचित घालून पाडून बोलणं अशा अस्त्रांनी त्यांच्या पातळीवरचा सूड घ्यायचं ठरवलं आहे.

पिताश्री हे एकेकाळी हेकेखोर, हट्टी आणि 'हम करे सो कायदा' समाजाचे अध्यक्ष होते. परंतु वयपरत्वे त्यांची ती अध्यक्षपदाची खुर्ची त्यांना टिकवता आली नाही आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांची काही केल्या मातोश्रींपुढे कुठल्याच बाबतीत डाळ शिजत नाही आणि मातोश्रीही काही केल्या त्यांना सोडत नाहीत.
आमची दारा (सिंग ??) हे एक बडं प्रस्थ आहे. कुणालाच सुचणार नाहीत अशा गोष्टी तिला लीलया दिसतात. (पूर्वीचे शायंटिष्ट पण असेच होते हो…) पण तिचं एखादं साधं कामही बर्‍याच प्रयोगशील गोष्टींमुळे कधी बघता बघता घोळात रूपांतरित होतं, हे कुणालाच कळत नाही.

राहता राहिलो आम्ही…. आमचं एकूण जीवन म्हणजे 'ना घर का ना घाट का'. घरात चाललेले सगळे घोळ उघड्या डोळ्यांनी याची देही बघणं आणि एकेक गदाधारी भीमाला आलटून पालटून शांत करणं ह्यातच आमची सत्त्वपरीक्षा. (कुबलांच्या आणि आठ्ल्यांच्या) अलकाताईसुद्धा आमची श्टुरी ऐकून धाय मोकलून रडतील अशी परिस्थिती. पण आम्ही न डगमगता गाडा हाकतोय (सगळ्या पक्षांची मोट बांधलेलं सरकार कसं चालतं, हे आता मला पक्कं कळलेलं आहे!!)

तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आमची ही घरशोध (की धरसोड??) मोहीम चंद्र किंवा मंगळावर स्वारीच्या तयारीला लागली, याचं एकमेव कारण म्हणजे वृत्तपत्रातली ठळक बातमी होती की चंद्रावर किंवा मंगळावर पाण्याचा शोध लागलेला आहे….

अस्मादिक (कुत्सितपणे) : मग काय ठरतंय? कुठे घेऊ या घर? चंद्र की मंगळ?? आता तेच राहिलंय!!

मातोश्री : माझ्या मते चंद्र बरा पडेल… इथून जवळच तर दिसतोय समोर. पाणी पण आहे तिथे. उजेडही असतोच तिथे… चंद्र सूर्याच्या प्रकाशात चार्ज होतो म्हणे. बास झालं की. बाकी बघून घेऊ!

पिताश्री : अगं, इथे मला पलीकडे ऑफिसला जायला रिक्षा मिळत नाही. चंद्रावर आणि कशी जातेस तू? काहीही आपलं बोलायचं म्हणून बोलायचं??

मातोश्री : तू गप्प बस. इतकी बडबड करतोस म्हणून एकही रिक्षावाला तुला पाहून थांबत नाही. तोंड आहे का गटारगंगा?? तुझ्यामुळे मलाही रिक्षा मिळायची बंद झाली आहे हल्ली.

(इथे विषयाला संपूर्ण कलाटणी.. पिताश्रींचं आजारपण, त्यामुळे आलेला चिडचिडेपणा, मातोश्रींची तीच ती तीस वर्षांपूर्वीच्या त्यांच्यावरच्या अन्यायाची सुरेल गझल वगैरे वगैरे विषय ऐरणीवर येतात.)

पिताश्री : प्रत्येक गोष्टीचं शेपूट माझ्याकडेच कसं आणता येतं गं तुला बरोबर? मी तुला किती वेळा सांगितलंय की तीस वर्षापूर्वी जे काही झालंय, त्याबद्दल मला माफ कर. वाटलं तर माझ्या मागच्या बत्तीस पिढ्या तुझ्या पायाशी आणून ठेवतो मी … अजून काय बोलू?

मातोश्री : इथे तूच झेपत नाहीयेस. बत्तीस पिढ्यांची उस्तवार कुठून करू?? हे बघ, आपला काही प्रेमविवाह नव्हता. तुला झेपत नव्हतं तर लग्न करायचं नाहीस. कुठून असल्या घरात येऊन पडले मी? अरे देवा ….

दारा: जे झालं ते झालं. आपण जरा सद्य परिस्थितीवर बोलू या का?

अस्मादिक : (लोकसभेच्या अध्यक्षासारखे… हताशपणे) अरे विषय काय, चाललंय काय?

मातोश्री : चंद्रावरचे फोटो इकडे पाठवायची सोय हवी होती. मग ते पाहून ठरवलं असतं तिथे जायचं की नाही ते!

पिताश्री : हो हो.. का नाही... माझे तीर्थरूप बसले आहेत न तिथे फोटो पाठवायला!!

दारा: आपण एक काम करू या का? आपण स्वतःच एक रॉकेट चंद्रावर पाठवू या आणि अमेरिकेलाही दाखवून देऊ या की आपण भारतीय पण काही कमी नाहीये.

अस्मादिक : (मनात) - अरे, इकडे साधं ड्रोन उडवायला एरोस्पेसची परवानगी लागते आणि ह्यांचं डायरेक्ट रॉकेट? दिसतोय आता आपला सगळ्यांचा फोटो पेपरात पहिल्या पानावर मुंबई पोलिसांबरोबर!!

दारा : मग ? काय म्हणता सगळे? पाठवू या का रॉकेट??

अस्मादिक : माझे काही प्रश्न आहेत.. बाळबोध म्हणा हवं तर. मी कुठे 'मेनसा'वाला तुमच्यासारखा… पण त्याची दिशा कशी ठरवायची? म्हणजे ते चंद्रावरच पोहोचेल याची काय खात्री? शेजारच्या इमारतीत घुसलं तर दिवाळीतच शिमगा होईल!!

दारा : हे बघ, तुला प्रश्नच फार पडतात. आपण आधी काम सुरू करू या, मग ठरवू हळूहळू. तुला तरी काही माहिती आहे का? त्या नासावाल्यांचीसुद्धा सगळी यानं काही पोहोचत नाहीत सगळ्याच वेळी योग्य ठिकाणी… जेव्हा पोहोचतात, तेव्हाच ते पेपरवाल्यांना कळवतात की 'पोहोचलं' म्हणून!!

आतापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं की ह्या मोहिमेची सगळी सूत्रं सौ. दारा हिच्यात हातात असणार आहेत आणि मातोश्री केवळ पिताश्रींची पिसं काढायची या एकाच उद्देशाने प्रेरित होऊन ह्या चर्चेत भाग घेत आहेत. वाद नको, म्हणून या मोहिमेला तत्त्वत: परवानगी मिळाली होती.

सुरुवातीला नुसतीच जागा पाहायला काय करायचाय ब्रोकर, म्हणून ह्या आमच्या कुटुंबाने स्वतःच चंद्रावरची जागा बघायची ठरवली आणि रॉकेटची तजवीज करण्यात आली. आता एक असं रॉकेट तयार होणार होतं की जे चंद्रावर जाऊन तिथले फोटो परत आमच्या घरी पाठवणार होतं! दुसर्‍या दिवसापासून सौ. दारा भलत्याच उत्साहात सगळी सामग्री गोळा करू लागली. रिकामे प्लास्टिकचे आणि पत्र्याचे डबे, सुया, पिना, जुने कपडे आणि त्यांचे बोळे, तुटक्या छत्र्या, फेव्हीकॉल वगैरे साहित्य पाहून माझं डोकं गरगरू लागलं. नक्की रॉकेट बनवलं जातंय की भंगार आणि कचरा विकायची मोहीम आहे, तेच लक्षात येईना. पण म्हटलं बघू या काय करतात ते… मातोश्री आणि पिताश्री सतत टॉम आणि जेरीसारखे एकमेकांच्याच उखाळ्या पाखाळ्या काढत होते आणि ह्या संगीताच्या साथीने आमचे शायंटिष्ट रॉकेट बनवत होते. बघता बघता एक विचित्र आकार तयार झाला आणि त्यालाच रॉकेट म्हणतात असं मला सांगण्यात (की धमकावण्यात?) आलं.

अस्मादिक : अगं, हे इथून शेजार्‍यांच्या घरी तरी उडेल का?

दारा: तू गप रे! बघ, ह्यात काय काय सोयी केल्यात ते… हे रिमोट कंट्रोलवर चालतं (???) फोटो काढायला त्यात एक क्यामेराही बसवलाय. बटण दाबायला एक सेल्फी स्टिक बसवायची बाकी आहे. आता फक्त एकच प्रश्न उरलेला आहे… ह्यात इंधन म्हणून काय घालायचं??

मातोश्री : एक काम करा. दिवाळीसाठी घालायला तेल आणलंय परवाच १ किलो, तेच ओता त्यात चालत असेल तर…

पिताश्री : अगं, चंद्रावर वडे नाही तळायचे आपल्याला… तेल कसलं घालताय??

मातोश्री : तू गप्प बस… तुला तरी माहीत आहे का रॉकेटात काय घातलात ते? साध्या भाजीच्या फोडणीत तरी काय घालतात ते तरी माहीत आहे का तुला? ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर करण्यात आयुष्य गेलंय तुझं! मी मरमर मेले… तुला कसली तोशीस लागली का?

पिताश्री : मी तुझी माफी मागितली की नाही मघाशी? मग किती बोलतेस? सुप्रीम कोर्टसुद्धा माफी मागितल्यावर माफ करतं गं… आता तरी गप्प बस माझे आई!!

दारा : आपण ह्यात काय घालायचं ते सांगा. पाल्हाळ नको उगीच.

अस्मादिक : अरे, नका रे असले उद्योग करू…. आहे ते घरही सोडायला लागेल ह्याच्यापायी. मग झाडाखाली बसायचं का आपण सगळ्यांनी??

दारा : एक काम करू… आधी रॉकेट बनवू, मग इंधनाचा विचार करू. दिवाळीच्या रॉकेटमध्ये साधारण ५० ग्रॅम फटाक्याची दारू असते, त्यामुळे ते खूप उंच जातं. आपण एक काम करू. साधारण १० किलो दिवाळीची दारू खरेदी करू आणि त्यात ठासून भरू. रॉकेटला एकदा चंद्राची दिशा दाखवली आणि ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडलं की झालं आपलं काम!!

अस्मादिक : कोण देणार तुला १० किलो दिवाळीच्या फटाक्याची दारू? आधीच मी संशयित अतिरेक्यासारखा दिसतो. त्यातून असली मागणी केली तर ती पुरवायला पोलीसच येतील!! आणि हे कुठून उडवणार? आपल्या गच्चीतून आभाळही दिसत नाही धड…. चंद्र कसा दिसणार? आणि ह्याच्या दिशादर्शनासाठी रडार कुठून आणायचं? इथेच स्फोट झाला त्याचा तर??

दारा: लागलास का रडायला? अरे, आपला डिश टीव्हीची ताटली आहे आपल्याकडे आणि तीही नाही चालली, तर साधी ताटली वापरू. मी पाहिलंय कित्येक झोपड्यांवर!!

पिताश्री : मी आधीच सांगतोय - ह्या प्रयोगातून जर काही बरंवाईट झालं आणि कोणी माझ्याकडे भांडायला आलं, तर मी त्याची जबाबदारी घेणार नाही!!

मातोश्री: नाहीतरी जमलंय काय तुला आयुष्यात? तू खमका असतास, तर आज ही वेळच आली नसती. नुसतं तिन्ही त्रिकाळ गिळायला पाहिजे… इथे काय नोकर आहेत का बाकीचे?

पिताश्री : बाबा, मी तुझ्या पाया पडतो बाई…. तोंड बंद ठेव. काही मला घर नको आणि दार नको. मी आहे तसा खूप सुखी आहे. आता बंद करा हे सगळं!!

दारा: चला, ठरलं तर मग! आपण रॉकेट पाठवायचं!!

असं म्हणून त्या विचित्र आकाराला सजवणं चालू झालं. आतमध्ये एक क्यामेरा आणि त्याचा रिमोट कंट्रोल बसवला गेला, जो फोटोचं बटण दाबून फोटो काढू शकेल. रेंजमध्ये असेपर्यंत हे सगळं ठीक होतं, पण त्यापुढे काय? "होऊ द्या खर्च…. रॉकेट आहे घरचं" म्हणत सगळं चाललं होतं वेड्यासारखं….

चंद्रावर राहायला जायचं ह्या कल्पनेनेच इथे इतका मोहोर फुटला होता, मग प्रत्यक्ष गेलो तर काय होईल ते भगवंतच जाणे… तरी मी एकदा-दोनदा आठवण करून दिली की 'तिकडे रिक्षा, वाणी, वीज आणि इतर सुखसोयी कुठून येणार?' त्यावर आमच्या दाराचं ठरलेलं उत्तर… "तुला दूरदृष्टीच नाही. अरे, आपला नवी मुंबईचा किंवा पुण्याचा भाग बघ... दहा वर्षांपूर्वी तिथे काहीही नव्हतं आणि आता काय नाहीये? सगळं बदलतं हळूहळू." तेवढ्यात पिताश्री बोललेच, "अरे, तिथे चांद्रमानव किंवा एलियन असतील तर?" त्यावर मातोश्रींचा षटकार : "तू चल तिथे आमच्याबरोबर आणि फक्त चार मोजक्या शिव्या दे… तुला पाहून चंद्रपण रिकामा करून देतील ते लोक आपल्यासाठी!!"

उडवण्याआधी निदान त्याची चाचणी करू या, असाही एक प्रस्ताव मी मांडला होता. पण हे रॉकेट उडालं, तर दुसरं बनवायला फार वेळ जाईल म्हणून तो रद्दबातल ठरवण्यात आला. हो ना करता करता "निदान दिवाळीच्या दिवशी हे रॉकेट उडवा, म्हणजे लोक प्रयोग फसला तरी छी:थू करणार नाहीत आणि नवीन फटाका होता असं तरी सांगता येईल" हा मी मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत झाला, कारण इथे शास्त्रज्ञ स्वतःच प्रयोगाविषयी साशंक होते, हे स्पष्ट होतं.. पण बोलणार कोण??

हो ना करता करता दिवाळीच्या रात्री गच्चीवर तो विचित्र आकार घेऊन आम्ही पोहोचलो, तर आजूबाजूचे संशयाच्या नजरेने पाहू लागले. त्यात मध्यभागी मोठं नळकांडं घालून त्यात काहीतरी ठासून भरलं होतं. ते काय आहे हे विचारण्याच्या फंदात मी पडलो नाही, कारण तोंडी फटाके सुरू झाले असते. गच्चीच्या मधोमध तो विचित्र आकार ठेवून सौ. दाराने त्याला 'चंद्राची दिशा दाखवत' वात लावली!!

त्या गूढ भासणार्‍या आकारातून काही वेळ असंबद्ध आवाज आले आणि झपकन एक मोठा फटाका वर उंच हवेत उडाला. गमतीची गोष्ट म्हणजे तो विचित्र आकारही त्याबरोबर उडून वर जात जात अदृश्य झाला आणि त्याबरोबर प्रयोग यशस्वी झाला म्हणून घरातले टाळ्या पिटू लागले. मला मात्र ते धूड कुठे जाऊन पडणार याच्या काळजीने ऐन दिवाळीत अन्नपाणी गोड लागेना…. रात्रभर कशीतरी तळमळत काढली.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे पेपर वाचायला घेतला. पहिल्या पानावरची बातमी वाचून पोटात गोळा आला… माझे डोळे बाहेर यायचेच बाकी राहिले होते. त्याही अवस्थेत धावत जाऊन दाराला मी सांगितलं, "बाई, तुझा प्रयोग यशस्वी झालाय, पण थोडासा घोळ आहेच नेहमीप्रमाणे!! आपल्या 'रॉकेटने' पाठवलेला फोटो आपल्याला न मिळता आपल्याच 'रॉकेटचा' फोटो आपल्या पेपरात आलाय." त्या पानावर आमच्याच त्या विचित्र आकाराचा अर्धा पान फोटो आणि सोबत पोलिसांनी त्या विभागात केलेली संचारबंदी ह्याचं रसभरीत वर्णन होतं. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यांना ती स्पेसशिप वाटली होती. त्यात लावलेला क्यामेरा आणि ठासून भरलेली दिवाळीची दारू ह्यामुळे काहींना तो बॉम्बही वाटला होता. आता पोलीस ही विचित्र वस्तू उडवणार्‍याच्या शोधात होते... आता घर मिळणार हेही नक्की, पण सरकारी खर्चाने हे माहीत नव्हतं!!
.

दिवाळी अंक २०१५ललित/वैचारिक लेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Nov 2015 - 8:49 am | मुक्त विहारि

आवडला...

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:14 am | टवाळ कार्टा

खि खि खि....भारीये

महासंग्राम's picture

10 Nov 2015 - 3:33 pm | महासंग्राम

कितीही पुढारलेले झाले तरी कोणाचे आई-बाप एकमेकांना अरे-तुरे म्हणतील.

स्वतःच्या नवर्याला कोण असं बोलेल मातोश्रींचा षटकार : "तू चल तिथे आमच्याबरोबर आणि फक्त चार मोजक्या शिव्या दे… तुला पाहून चंद्रपण रिकामा करून देतील ते लोक आपल्यासाठी!!"

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Nov 2015 - 9:40 am | माम्लेदारचा पन्खा

एक म्हणजे आपल्याला वाटतं त्यापेक्षा जग खूप पुढारलंय...

दुसरे म्हणजे ही कथा ढिशक्लेमरवर आधारित आणि काल्पनिक आहे...

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:26 am | टवाळ कार्टा

+११११११११११११११११११

शेवटचे तीन चार पॅरा कहर झालेत! हसून हसून ठसका लागला!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Nov 2015 - 10:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

क ह र= कहर हसुन हसुन फुटलो!!!

सतिश गावडे's picture

11 Nov 2015 - 10:39 am | सतिश गावडे

जबरा. हसून हसून फुटलो राव.
ते "मेनसा" काय प्रकरण आहे. नासाची तुमची घरगुती आवृत्ती का? :)

हेहेहे! मग काय? घेतला की नाही चंद्रावर एखादा प्लॉट मग? ;-)

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Nov 2015 - 11:10 am | माम्लेदारचा पन्खा

प्रथमग्रासे मक्षिकापातः

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 10:47 am | प्रीत-मोहर

=))

मितान's picture

12 Nov 2015 - 6:58 am | मितान

मग ! मेनसा म्हणजे कै गंमत वाटली का तुम्हाला ;)
खुसखुशीत गोष्ट !!!

बहुगुणी's picture

12 Nov 2015 - 8:19 am | बहुगुणी

आवडली गृह-शोधन आणि यान-बांधणी मोहीम! मस्त लिहिलंय!

पलाश's picture

12 Nov 2015 - 9:33 am | पलाश

व्यक्तिचित्रण फार आवडले. विशेषतः आईचे चित्रण मनापासून पटले. लग्नाला ३० वर्षे उलटली की सगळ्यांचेच थोडेफार असे होते की काय? ;) :)

shvinayakruti's picture

12 Nov 2015 - 12:47 pm | shvinayakruti

व्वा मस्त लिहीलय.आवडल.

अभ्या..'s picture

12 Nov 2015 - 12:49 pm | अभ्या..

च्यामारी मामलेदारा. काय लिहिलेयस बे. एकच लंबर.
त्या रॉकेटचे चित्र पण इमॅजिन करता येईना. काय काय सजवले असेल त्याल देवजाणे. ;)

पैसा's picture

12 Nov 2015 - 2:58 pm | पैसा

मजेशीर!

मधुरा देशपांडे's picture

12 Nov 2015 - 3:06 pm | मधुरा देशपांडे

आवडलं. :))

छान जमलंय ललित.आणि अस्मादिक पिचलेले!!!!कधी होणार सुदृढ?
आम्ही TMC जॅाइन झालो त्याला पंचवीस वर्षे झाली.
( ताटाखालचं मांजर क्लब )

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Nov 2015 - 4:29 pm | माम्लेदारचा पन्खा

बकरा स्वतः हलाल व्हायला तयार होतो ही मोठी मौजेची गोष्ट आहे...

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2015 - 4:44 pm | टवाळ कार्टा

TMC = ताटाखालचं मांजर क्लब

फुटलो =))

हेहेहेहे. कंजूसकाका. भारीय क्लब तुमचा. ताट साफ करुन निवांत मिशा साफ करणारा लट्ठ बोका आला डोक्यात. ;)

प्रभाकर पेठकर's picture

13 Nov 2015 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: मस्त.

चंद्रावर म्हणजे मला वाटलं शेजार्‍यांची मोलकरीण असेल 'चंद्रा' म्हणून तिच्या डोक्यावर जाऊन पडलं असेल. तो धोका तुम्ही टाळू शकलात म्हणजे प्रयोग जवळजवळ यशस्वीच झाला असे म्हणायला पाहिजे.

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Nov 2015 - 6:56 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही पण अगदी असे आहात ना !!

स्नेहांकिता's picture

14 Nov 2015 - 9:31 pm | स्नेहांकिता

खुसखुशीत काल्पनिका !
..बिच्चारा चंद्र !! =))

पियुशा's picture

27 Nov 2015 - 4:43 pm | पियुशा

वा खतरा , जबरा लिहिलय एकदम सगळी पात्र ड्वाल्यासमोर फेर धरुन " रॉकेट उडाल आकाशी " म्हणत
नाचताहेत अस वाटुण गेल ;)

बबन ताम्बे's picture

27 Nov 2015 - 5:14 pm | बबन ताम्बे

प्रचंड आवडली.
शेवटचा पंच "आता घर मिळणार हेही नक्की, पण सरकारी खर्चाने हे माहीत नव्हतं!! " भारी !!