भूssकंssप!!!!!

Primary tabs

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in दिवाळी अंक
21 Oct 2015 - 1:12 pm

.
.

प्रेषक : Sanjay Uwach
विषय : विनोदी कथा.
भूssकंssप!!!!!

कोल्हापुरातील शिवाजी पेठेत आम्ही त्या वेळी राहत होतो. विशेषतः हा भाग 'वरुणतीर्थवेश' या नावाने प्रसिद्ध होता. त्या काळातील ती जुनी वाडावजा घरे म्हटली की कौलारू घरे, पुढे मोठे अंगण, त्यानंतर बैठकीसाठी असणारा सोपा, मग माजघर, त्यानंतर असणारे स्वयंपाकगृह, त्यात असणारी ती कोठीची खोली व मागे असणारी नहाणी, असा हा सगळा घरांचा प्रकार होता. दुसरी गंमतीची गोष्ट म्हणजे आजूबाजूला जे १०-१२ शेजारी राहत होते, त्यांच्यातील बहुतेक सर्व पुरुष मंडळी मुलकी खात्यामध्ये नोकरीला होती. कोणी मामलेदार, तर कोणी कारकून अशा प्रकारे प्रत्येकाचा वेगवेगळा हुद्दा असणारे मुलकी खात्यातील हे लोक होते. माझे वडीलदेखील या खात्यात मामलेदार होते. बहुतेक सर्व पुरुष शांत स्वभावाचे व एकमेकांना मदत करणारे असे मध्यमवर्गीय होते.

त्या मानाने इथे स्त्रिया मात्र फार मजेत असायच्या. क़ुठलीही दारबंद संस्कृती त्या काळी नव्हती. एकमेकाच्या सुखदु:खाच्या वेळी स्वत:च्या घरीच काहीतरी घडले आहे, असे समजून प्रत्येक जण त्यामध्ये आपला मदतीचा वाटा पुढे करीत असत. एखाद्याच्या घरी काही दु:खद घटना घडली, तर त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागे. कोणाच्या घरी लग्न ठरले की एकत्र येऊन पापड, रुखवतात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे यांचे काम चालू झालेच. दिवाळीच्या आधीचे दहाबारा दिवस म्हणजे फार मोठ्या उत्साहाचे दिवस असत. त्या काळी फराळाचे पदार्थ विकत आणणे हा काही प्रकारच नव्हता. प्रत्येक जण एक एक दिवस ठरवून रोज एकेकीच्या घरी जमून करंज्या, चिरोटे, चकली, लाडू, चिवडा हे फराळाचे साहित्य करीत असत. फराळ तयार झाला की त्यांची पोळपाट लाटणी पोहोचवण्याचे काम आम्हा बालगोपालांचे असायचे. पोळपाटावर लाटणी बडवत मग आमचे बँड पथक जोरात असे. वास्तविक आम्ही शेजारी शेजारी राहणारे कोणी रक्ताचे नातेवाईक नव्हतो. मात्र सहवासाने निर्माण झालेले 'शेजारी' हे नाते, चार सदविवेकी लोकांमुळे फारच अतूट बनले होते. आमच्या घराजवळच आमच्या आत्याबाई राहत होत्या. आत्याबाई खूपच प्रेमळ स्वभावाच्या, सर्वांना मायेने जवळ करणार्‍या होत्या. त्यांच्या अवतीभोवती कायम गोतावळा जमलेला असे. लग्नानंतर मोठी झालेली दोन-तीन अपत्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा भितरा बनला होता. वृद्धत्वामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडलेली असायची. त्यांची औषधेदेखील भरपूर असायची. कुठेही बाहेर गेल्या की औषधाची पिशवी कायम बरोबर असायची. आमच्या आत्याबाईंच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जो समोर येईल, त्याला काही ना काही काम सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.

आशा प्रकारे हे आयुष्याचे चक्र आनंदात चालू असताना, विधात्याच्या मनात काय होते कुणास ठाऊक? अचानक कोल्हापुरात भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली. 'भूकंप' हा प्रकार सगळ्यांना नवीनच होता. काही सेकंद धरणी कंप पावत असे व मग फळीवरील भांडी, डबे हादरून खाली पडत. प्रामुख्याने हा प्रकार एक दिवसाआड व रात्रीच फार घडत असे. प्रत्येक जण मग एकमेकाला जोरजोरात हाक मारून घराच्या बाहेर बोलवत होता. मग काय! भूकंप कसा झाला, मी कसा कॉटवरून खाली पडलो, तर कोणी घरात चोर शिरलाय म्हणून झोपेत काठी घेऊन शेजार्‍याच्या मागे कसा धावला, तर कोणी झोपेत पळत बंद दारालाच जाऊन कसा धडकला व कपाळाला कसे टेंगूळ आले, याची रसभरीत चर्चा रात्रभर चालत असे. कधीकधी घराशेजारून एखादा ट्रक जरी जोरात आवाज करीत गेला, तर लोक 'भूकंप झाला, भूकंप झाला' म्हणत घराच्या बाहेर पडत असत. तर काहींना आपला मोडकळीस आलेला कॉट हलला, तरी भूकंप झाल्यासारखे वाटे. एकदा तर एक काका रात्री भूकंप झाल्यावर, घाबरून पायजमा समजून पत्नीचा चक्क परकर घालून बाहेर पळत आले. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने 'भूकंप' या विषयावर नवनवीन काहीतरी माहिती रोज सांगत असे. लोकांनी केलेल्या पापामुळे ह्या गोष्टी घडत असल्याचे कोणी सांगत असे, तर कोणी वाढलेल्या लोकसंख्येमुळे हे भूकंप होत असल्याचे सांगू लागला. यात एकाने तर फार मोठी धक्कादायक बातमी सांगून मोठा भूकंपच केला - क़ोयना धरणाला भूकंपामुळे मोठे भगदाड पडले असून ते धरण लवकरच फुटणार आहे, क़ोल्हापूर, सांगली इथे कमीतकमी दोन पुरुष इतक्या उंचीचे पाणी साठणार आहे.. हे ऐकल्यावर सगळ्यांची झोपच उडाली. माझी तर भीतीने इतकी गाळण उडाली, काय सांगू! मला तर डबा बांधूनदेखील त्या वेळी चार हात पोहायला येत नव्हते. त्यात माझ्या वडिलांची नेमकी कराडला बदली झाली होती. भूकंपातील पीडित लोकांच्या पुनर्वसनाचे काम ते करत होते. ते काय करत असतील, याची घरातल्या आम्हा सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. माझ्या आईचे तर कशातही लक्ष लागत नव्हते. तिला माझ्या वडिलांची फारच चिंता लागली होती. एकमेकावर आसणारी श्रद्धा, सेवाभाव हाच त्या वेळच्या समाजरचनेचा आत्मा होता. तो कधी शब्दाने व्यक्त होत नसे, पण इतरांना तो निश्चितच जाणवत असे.

त्या वेळी व्हॉट्स अॅप, इंटरनेटचे युग नसले तरी एकमेकाच्या संवादातून माहिती फार जलदगतीने लोकांमध्ये पसरत असे. त्यात बातमी सांगणारादेखील आपल्या दोन गोष्टी त्यात भर घालून सांगत आसे. यात एकाने नवीनच बातमी आणून मोठा कहरच केला - आजपासून एक दिवसानंतर, म्हणजे बुधवारी संध्याकाळी चार वाजून सोळा मिनिटांनी कोल्हापुरात मोठा भूकंप होणार आहे. हा आत्तापर्यंतच्या भूकंपातील सर्वात मोठ्ठा भूकंप असणार आहे. चार सोळाचा मुहूर्त त्यांनी कुठल्या पंचागातून काढला होता कुणास ठाउक?

ही बातमी ऐकून सगळेच भीतीने व्याकूळ झाले. आता नेमके काय करायचे कुणालाच सुचेना. त्यात काही जाणकार मंडळींनी असा निर्णय घेतला की दुपारी साधारण एक ते दोनच्या दरम्यान सर्वांनी छ. शिवाजी पुतळ्याजवळ जमायचे. शिवाजी पेठेत मध्य भागात हा छत्रपतींचा अर्धपुतळा आहे. सभोवती मोठी खुली जागा असल्याने घरात बसण्यापेक्षा, मोकळ्या जागेत थांबल्याने जिवास धोका कमी असेल. आमच्या आत्याबाईंनी भूकंपाचा फारच धसका घेतला होता. तो बुधवारचा दिवस अखेर उजाडला. क़दाचित हा महाभूंकप झाला, तर आपण चार वाजून सोळा मिनिटांनी या जगात असणार नाही, या व्यथेने प्रत्येक जण व्याकूळ झाला होता. बायकांनी तर एकमेकाच्या गळ्यात पडून जुन्या आठवणी काढत डोळ्यातून पाणी काढायला सुरुवात केली. माझ्या जन्माच्या आधीपासून असणार्‍या कामवाल्या बाईने आमच्या आईला चक्क मिठी मारून "आवं वहिनी! आता कसं हुनार??" म्हणून हंबरडाच फोडला. आम्हा भावंडांना पदरात घेऊन त्यांनी गोंजारायला चालू केले. आमच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले. इतका वेळ तोंडावर रुमाल ठेवून मनातल्या मनात रडणार्‍या बायकांनी "लक्ष्मीबाई, रडू नका! स्वत:ला सावरा" असे सांगत स्वतःच मोठ्याने रडायला सुरवात केली. शेवटी मनातील दुख: व्यक्त करण्यासाठी यापेक्षा आणखी कोणती मोठी, भावनिक परिभाषा आसू शकेल?

दोनच्या दरम्यान सर्व मंडळी बसायला सतरंजी घेऊन शिवप्रभूंच्या पुतळ्याजवळ आश्रयासाठी निघाली. प्रत्येक जण आपापली पथारी मांडून ह्या चार सोळाच्या मुहूर्ताची वाट पाहू लागला. आमच्या आत्याबाई तर चक्क आईच्या मांडीवर डोके ठेवून आडव्या झोपूनच गेल्या. छत्रपतींच्या पुतळ्याशेजारी एक भलामोठा सिमेंटचा खांब आहे. क़धी काळी त्यावर भगवा झेंडा लावण्यात येत असे. त्या खांबाच्या तळाला एक सिमेंटचा कट्टा होता. मी व माझा दादा त्या कट्ट्यावर आधीच जागा धरून खांबाला टेकून बसलो होतो. प्रत्येक जण आपल्या घरातून येत होते व त्या मोकळ्या जागेवर आश्रय घेत होते.

अशाच परिस्थितीत कमळाआक्का एका हातात दोन म्हशींचा कासरा धरून व दुसर्‍या हाताने आपल्या अंथरुणावर खिळून राहिलेल्या नवर्‍याला आधार देत तिथे हजर झाल्या. "आहो! कमळाआक्का, म्हशींना एवढ्या गर्दीत कशाला घेऊन आलाय?" काही टवाळ मुले त्यांना विचारू लागली. "आरं लेका! माझा समधा परपंच ह्या म्हसरावर चाललाया नव्हं! अशा वक्ताला मी तेनासनी वार्‍यावर सोडू व्हय!" कमळाआक्का. "म्हशीचं ठीक आहे हो! पण तुमच्या मालकांना बसतादेखील येत नाही की दोन पावलं सरळ चालता येत नाही. अशा आजारी माणसाला कशाला आणायचं?" इति टवाळ मुले. "आरं! धनी अजारी असला म्हणून काय झालं? त्ये माझ्या कपाळाच कुकू आहे. त्येला आसा सोडीन होय मी? अन तुला रं भाड्या कशापाई ही चौकशी पाहिजे? ऑं? तू तुझं बघ की. बाच्या जिवावर एरंडासारखा वाढलायस, तेला आधी कुठ सोडलायस ते सांग? तेला आधी इथं घेऊन ये! मग मला प्रश्न इचार." इति कमळाआक्का. हे झणझणीत उत्तर ऐकल्यावर त्याची बोलतीच बंद झाली. निरक्षर माणसाला आपण अडाणी म्हणतो, पण कठीण वेळप्रसंगाला जितका अडाणी तितकाच तो स्वकीयांशी प्रामाणिक. जग आपल्याला काय म्हणेल याची त्यांना अजिबात पर्वा नसते.

हळूहळू पुतळ्याच्या सभोवती असणारी सर्व जागा भरू लागली. प्रत्येक जण एकमेकाकडे आशाळभूतपणे पाहत होते. या वेळी माझी बहीण मला सारखी हाताने खुणावू लागली. "इकडे या, इकडे या" म्हणून हाक मारू लागली. मला वाटले, त्या बाईंचे नक्कीच काहीतरी काम असणार. ती काय सांगते हे ऐकण्यासाठी मी तिच्याजवळ गेलो, तर ती सांगू लागली, "आरे भाऊ! त्या खांबाखाली तुम्ही कशाला बसलाय? भूकंपाने तो मोठा खांब तुमच्या डोकीत पडला तर तुम्ही काय करणार, सांग बघू? इथे मुकाट्याने आईजवळ येउन बसा बघू." तिचे म्हणणे मला अगदी पटले. इतक्या कष्टाने मिळवलेली ती कट्ट्यावरील जागा आम्ही दोघांनी सोडून दिली. तीनशे साठ डिग्रीत तो खांब कुठे पडणार होता कुणास ठाऊक?

मी आईच्या जवळ जाऊन बसलो, तोच आत्याबाईंची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मला जवळ घेऊन गोंजारायला सुरुवात केली. यांचे काहीतरी काम असणार हे माझ्या लक्षात आले. त्यांनी लगेचच सुरू केले, "राज्या! सोन्या! माझ एक काम करतोस काय? माझी कोर्‍यामीन औषधाची बाटली मी घरात विसरून आले आहे, तेवढे औषध व पाण्याचे भांडे घरातून घेऊन येतोस काय?" आत्याबाई म्हटले की काम हे आलेच. आता चार सोळानंतर आपण सगळेच मरणार आहोत, मग ह्यांना कोर्‍यामीन औषधाची बाटली कशाला पाहिजे कुणास ठाऊक? अर्थात मी हे सर्व मनातल्या मनात म्हणालो. "ठीक आहे" असे म्हणत मी आत्याबाईंच्या घराच्या किल्ल्या घेतल्या व त्यांची कोर्‍यामीन औषधाची बाटली पळत जाऊन आणून दिली. थोडा वेळ मी बसतो न बसतो, तोच आत्याबाईंचा पुढचा प्रश्न. "घराला कुलूप व्यवस्थित लावलं आहेस ना? म्हणजे ओढून बघितलं आहेस ना?" मला वाटले, आता ह्या अशा प्रसंगीसुद्धा मी कुलूप व्यवस्थित बसवले आहे की नाही, हे पाहायला मला ह्या परत घरी पाठवतात की काय? मीही चिडून म्हणालो, "हो! हो! आत्याबाई, काहीसुद्धा काळजी करू नका. कुलूप मी व्यवस्थित लावून आलो आहे. अगदी ओढून, कडी तुटेपर्यंत मी त्याला लोंबकळून पाहिले आहे." हे उत्तर ऐकल्यावर आत्याबाईंना राग आला. "सुमन, तुझा धाकटा पोरगा फारच आगाऊ आहे बघ" आत्याबाई म्हणाल्या. "वा रे वा! मघाशी राजा सोन्या म्हणत होतीस की, आता काम झाल्यावर मी आगाऊ काय?" मी म्हणालो, अर्थात मनातल्या मनात.

तोपर्यंत कोणी आजीबाई म्हणाल्या, "आगं! रमे, तुझी सासू कुठं दिसत नाही?" हे ऐकल्यावर रमाबाई खाडकन जाग्या झाल्या. "मला वाटलं माझ्या आधीच इथे येऊन बसल्या असतील. मला मेलीला कधी काहीसुद्धा सांगत नाहीत." रमाबाई "आगं बघ, बघ! म्हातारीला घरात कोंडून आलीस वाटत. जा, जा तिला घेऊन ये." आजी म्हणाल्या. ऱमाबाईची एकदम तारंबळच उडाली.

इतक्यात उंचगावकर नावाचे एक गृहस्थ सायकला भलीमोठी ट्रकची इनर लावून जागेवर हजर झाले. लोकांनी त्यांना विचारलेदेखील, "अहो उंचगावकर, ही भलीमोठी इनर कशाला घेऊन आला आहात"? त्यावर ते म्हणाले, "आहो, कोयनेचे धरण फुटले, तर मग दोन पुरुष पाणी कोल्हापुरात येणार आहे. मग काय त्यात डुबक्या मारत बसणार वाटतं?" याला म्हणतात दूरदृष्टी. त्यांनी आणलेल्या इनरवर प्रत्येक जण टिकली मारून कुतूहलाने पाहत होता. कदाचित इनरमध्ये हवा योग्य आहे की नाही हे ते तपासत असावेत. शेवटी एवढ्या मोठ्या जलप्रलयानंतर, इतिहास सांगण्यासाठी कोणीतरी मनू जिवंत राहणे आवश्यकच होते. उंचगावकरानी पायात सोडलेल्या पिल्लामुळे बायकांची चिंता मात्र आणखीनच वाढली.

आता चार सोळाच्या मुहूर्ताला फारच कमी वेळ राहिला होता. काही लोकांनी आपल्या पिशवीतून आणलेल्या पोथ्या, धार्मिक पुस्तके आता बाहेर काढण्यास सुरुवात केली, क़ाहींनी संकटमोचन मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली, तर कोणी काही धार्मिक ग्रंथातील ठरावीक अध्याय वाचायला सुरुवात केली. काही बायकांच्या अंगात तर देवी संचारू लागली व तिने लोकांशी डायरेक्ट संवाद साधला होता. क़ांही स्थितप्रज्ञ लोक डोळे झाकून काय घडणार याची शांतपणे वाट पाहत होते. काहींनी तर 'दत्त गुरू, दत्त गुरू' हा जप चालू केला. उपस्थित काही वृद्धांनी तोंडात दाताच्या कावळ्या बसवलेल्या होत्या, त्यात मरणाच्या वाटणार्‍या भीतीमुळे त्यांची गाळण उडाली होती. त्यांच्या तोंडातून नेमका कुठल्या देवाचा जप चालू आहे, हेच कळत नव्हते.

आता फक्त पाचच मिनिटे भूकंपासाठी शिल्लक होती. एक एक सेकंदाचा ठोका, हृदयाचा एक एक ठोका चुकवीत होता. बस्स.. घटका भरली. एक बाजूने धाडss धाडss जोरात आवाज येऊ लागले. काही वृद्ध बायकांनी मोठ्याने हंबरडाही फोडला व लहान मुलांना मिठी मारून जिवाच्या आकांताने पळत सुटल्या. पण "खाली बसा! खाली बसा! तो खडीचा ट्रक आहे" असे सांगत लोकानी सर्व जमावाला शांत केले. नेमका ह्याच वेळी रंकाळ्याच्या बाजूने आवाज करीत तो आलेला एक खडीचा डंपर होता.

आता मात्र चार सोळाचा मुहूर्त टळला होता. देवाच्या कृपेने भूकंप काही झाला नाही. शेवटी सगळ्यांनी मनापासून केलेल्या देवाच्या प्रार्थनेमुळे कदाचित हे संकट टळले असावे. आता मात्र सर्वांचा चेहरा 'अगदी सुटका झाली' या आविर्भावाने फुलून गेला होता. आता पाठीमागून तावातावाने वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले. "तरी मी म्हणत होतो, भूकंप-बिकंप असले काही होणार नाही! हे सगळं थोतांड आहे! पण आमचे हे ऐकताय कोण?" तर कोणी "ये बायांनो, तुम्ही सगळ्या आमच्या घरी चला बघू! सगळ्यांना मस्तपैकी चहा पाजते."
"वा रे वा! आजी! जिवावर बेतलेले चहावर भागवता होय? चांगला जेवणाचा बेत करा, मग सगळे येतो."

इतर वेळी माणूस आपल्या मनात बर्‍याच चांगल्या-वाईट कल्पनांचा विचार करीत असतो. मात्र स्वत:च्या मृत्यूसंबंधी तो कधीच विचार करीत नाही. अगदी स्वकीयांच्या मरणानंतर त्यांना अग्नी देतानादेखील स्वत:च्या मृत्यूसंबंधी तो कधीच विचार करीत नाही. माणूस एकदा का जन्माला आला म्हटले की त्याचा मृत्यूदेखील अटळ आहे. मात्र शेवटच्या क्षणी आपल्याला कोणताही शारीरिक त्रास होऊ नये, कुणालाही आपली सेवा करावी लागू नये इतकी तरी प्रार्थना तो देवाला निश्चितच करू शकतो. भूकंपाच्या निमित्ताने सगळ्यांनी आज मृत्यूची अनुभूती घेतली होती.
.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

11 Nov 2015 - 12:04 pm | पद्मावति

वाह, मस्तं खुसखुशीत लेख. कथा खूप छान रंगवण्याची हातोटी आवडली.

असंका's picture

11 Nov 2015 - 12:08 pm | असंका

सुरेख!! फारच बारकाईने लिहिलंयत हो...अगदी डोळ्यासमोर उभं झालं सगळं वातावरण!!

मजा आली!

धन्यवाद!!

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा

खिक्क

अबबबब! चांगलाच भूकंप झाला म्हणायचा! ख्यिक्क!

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 2:56 pm | प्रीत-मोहर

हाहाहाहा मस्तच झाला की भूकंप

मस्त!! भारीच झाला की भूकंप!!

यशोधरा's picture

12 Nov 2015 - 7:10 pm | यशोधरा

सुलेखन भारी जमलं आहे.

संदीप डांगे's picture

12 Nov 2015 - 10:07 pm | संदीप डांगे

लय भारीए..... एकदम मालगुडी डेज ष्टाईल....

तुमचा अभिषेक's picture

15 Nov 2015 - 10:29 pm | तुमचा अभिषेक

हो, तसा मालिकेचा एपिसोड यावर भारी बनेल.. लेखही छान खुसखुशीत

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 7:27 pm | मुक्त विहारि

आवडला...

नितिन५८८'s picture

16 Nov 2015 - 12:28 am | नितिन५८८

वाह मस्तं झाला की भूकंप

अफ्रिकेचा मुम्बैकर's picture

23 Nov 2015 - 5:23 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर

छान !!!

नाखु's picture

26 Nov 2015 - 4:44 pm | नाखु

अगदी खुलवून सांगीतलीय ही कथा...

अभिजीत अवलिया's picture

27 Nov 2015 - 9:26 am | अभिजीत अवलिया

मस्त लिहिलेय.

पियुशा's picture

27 Nov 2015 - 5:16 pm | पियुशा

लय झ्याकं लिवल बगा तुमी :))

Sanjay Uwach's picture

4 May 2020 - 12:21 pm | Sanjay Uwach

सध्याच्या लॉक डाऊन या परिस्थिती वरून मला माझी भूकंप ही कथा आठवली. फरक एवढाच, भुंकपाच्या वेळी लोकांना घरा बाहेर रहाण्याची सक्ती करावी लागत असे तर लॉक डाऊन चे वेळी घरात रहाण्याची सक्ती होती आहे.