'मिस्टरी' वाला 'गम्मत बॉक्स'!!!

Primary tabs

गिरकी's picture
गिरकी in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:26 pm

मुळातच आम्ही (मी आणि यजमान) खादाड म्हणून जन्माला आलेले. 'प्रेम म्हणजे एकत्र खाऊन एकत्र लठ्ठ होणे' हे आमचे सह-जीवन आणि सह-जेवण सूत्र! त्यामुळे एकत्र हिंडण्या फिरण्यासोबतच एकत्र स्वयंपाक हेसुद्धा आलेच. तर असे आमचे जेवण-जीवन सुखेनैव नांदत होते.

अशातच मध्यंतरी मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया वरून प्रेरणा घेऊन आपले अस्सल देशी मास्टरशेफ इंडिया सुरु झाले आणि आम्हा दोघांनाही स्वत: मास्टरशेफ बनण्याची स्वप्ने पडू लागली. दोघांनाही एकत्र स्वयंपाक करण्या ऐवजी एकमेकांशी स्वयंपाकघरात दोन हात करायची सुरसुरी आली. मग प्लान झाला की देशी जाऊदे निदान 'मास्टरशेफ - होम' स्पर्धा तरी होऊनच जाऊदे!! तशीही आम्हा दोघांनाही स्वयंपाकघरात जाऊन वेग वेगळ्या साहित्यावर हात साफ करायची सवय होतीच. तर या स्पर्धेचे खास हायलाईट्स खास मिपाकरांसाठी प्रक्षेपित करत आहे!

आता मास्टरशेफचा खेळ खेळायचा तर काहितरी अगदी मज्जेशीर पायजे. त्यामुळे स्पर्धेला टास्क काय हा प्रश्न जास्त विचार न करता आपोआप निकालात निघाला. 'मिस्टरी बॉक्स'!!
यापेक्षा भारी टास्क असूच नाही शकत. हे सगळ्यात आवडीचं टास्क असल्याने आम्ही तेच ठरवून टाकलं. आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी म्हणून इथं सांगते की, या टास्क साठी स्पर्धकांना कोणतेही असे ७-८ जिन्नस देतात की ज्यांचा एकमेकांशी काहिही संबंध नसतो. आणि त्यातले थोडे किंवा सगळे पदार्थ वापरून त्यांना काहीतरी सुरेख पदार्थ जन्माला घालायचा असतो. तिथले जज चित्र विचित्र पदार्थ एकत्र आणून देतात तर आता हेच आम्ही दोघे परस्परांसाठी करणार होतो. एकमेकाला मिस्टरी बॉक्स देणार होतो. दोघांना पण व्यवस्थित माहित होतं की प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठणारे पदार्थ कुठले. पण त्यात पण आम्ही जरा आमच्या सोयीने बदल केले.

आमचा नियम: प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीने ५ जिन्नस आणायचे आणि लपवून ठेवायचे. ऐन स्पर्धेच्या वेळी दुसऱ्या स्पर्धकाला दाखवायचे आणि दोघांनी आणलेल्या पदार्थांचा एकत्र मिस्टरी बॉक्स करायचा. घरातले इतर पदार्थ सुद्धा वापरले तरी चालतील पण मिस्टरी बॉक्स मधले सगळे पदार्थ वापरलेच पाहिजेत. आणि प्रत्येकी फक्त १ तास मिळेल.

रूल ठरल्यावर आम्ही एक रविवार सकाळ स्पर्धेसाठी मुक्रर करून टाकली. आणि शनिवारी रात्री दोघेजण २ वेगवेगळ्या सुपर मार्केट्स मध्ये धाड टाकायला गेलो. एकत्र जाऊन चाललं नसतं. दुश्मनला कळलं असतं ना आधी की काय काय पदार्थ मिळू शकतात. एकमेकांचे वीक पॉइण्ट लक्षात घेऊन खरेदी झाली. घरी आल्यावर व्यवस्थित लपवा लपवी करून झाली आणि आपल्या पदार्थांचा वापर करून काय काय करता येईल, दुसऱ्याने काय आणले असेल बरं याचा विचार करून झोपी गेलो.

बघता बघता रविवार सकाळ उगवली आणि दोन्ही स्पर्धकांनी रणांगणात प्रवेश केला!

अस्मादिकांनी फ्रीज उघडला आणि आयुधे काढली: सफरचंद, संत्रे, गाजर, बेसिलची पाने आणि अंडी! आणि व्हेज पदार्थात फारशी अक्कल नसलेल्या शत्रूकडे अस्मादिक विजयी मुद्रेने पाहते झाले. पण हे काय्य … शत्रूपक्ष तर छद्मी हसत होता आणि माझ्याहून दुप्पट आनंदी मुद्रेने फ्रीज उघडत होता. त्याने डायरेक्ट तोफा बाहेर काढल्या - पुन्हा एकदा अंडी, चिकन खीमा, ब्रसेल स्प्राऊट्स, काकडी आणि लाल मुळा!! मी नॉन-व्हेज वापराबद्दल अत्यंत ढ, कोबी वर्गीय काहीही आपल्याला अज्याबात आवडत न्हाय आणि मुळयाच्या तर आपण वासाला पण थांबत नाय… वीरश्री गळून पडली की वो :( :(

पण आता काय, थोर थोर माणसे म्हणूनच गेलीत- आलिया भोगासी असावे सादर! तर झालो आम्ही सादर.

तर प्रेक्षकांसाठी एकत्रित साहित्य:

ingredients

१ तास सुरु झाला होता. खोल श्वास घेऊन दोघेही वीर पुन्हा एकदा मैदानात उतरायला सिध्द झाले. शस्त्रांचा खडखडाट चालू करायच्या आधी डावपेच आखण्यात पाचेक मिनिटे गेली. आणि अचानक खडखडाट सुरु झाला.

वीर १: म्हणजे आम्ही स्वत: -
फ्रीज मध्ये आयतेच मश्रूम दिसताहेत. शत्रूची नजर पडण्या आधी हस्तगत करूया. काहितरी चवीचे बनवता येईल. संत्रे सोलून तरी घेऊया. काय बनवायचं त्याचा विचार सोलता सोलता करू. खिमा खिमा खिमा … कितीवेळ शिजवायचा असतो बरं? … उम्म… मठऱ्या दिसतायत बरणीत. बघू वापरता येतात का.… असे करत करत साधारण बेत मनात तयार झाला!

१. संत्र्याचा ज्यूस करून टाकू सरळ. तसेही एक ब्रेकफास्ट टेबल ज्यूस शिवाय चांगले नाहीच दिसणार. ज्यूस करताना त्यात बेसिलची चार पाने चिरून टाकू. दोन्हीचे वेगळेच फ्लेवर एकमेकांना अगदी छान उठाव देतील.

२. सफरचंदाचे तुकडे, थोडा मीठ टाकून उकडलेला ब्रसेल स्प्राऊट आणि बेक केलेले मश्रूम वापरून चीजी फ्लेवरच्या स्टिक्स बनवता येतील. म्हणजे गोड, खारट आणि उमामी फ्लेवरचा ब्लास्ट! वाह!

३. खिमा मीठ आणि धणे जिरे पूड घालून शिजवावा. आणि त्याचे अजून एकदा बारीक वाटून स्प्रेड बनवावे. अंड्याची अगदी छोटी छोटी जरा जाडसर ओम्लेट बनवावीत. आणि क्रंची मठरी वर उग्र चवीचा खीमा पसरवून वर लुसलुशीत ओम्लेट ठेवून चटपटीत तिखट कांदा घालून बाईट साईझ क्यानोपीज सर्व कराव्या.

४. तोंडी लावायला गाजर, काकडी आणि मुळा खिसुन त्यात संत्र्याचा ज्यूस आणि थोडी साखर टाकून गोडसर सलाड करावे.

हाजीर है - क्रंची एग-चिकन क्यानपीज, स्टिक्स ऑफ फ्लेवर, सिट्रस सलाड आणि बेसिल ऑरेंज सिप!/em>

dish 1

वीर२: अर्थात आमचे पतीदेव -

आता स्पर्धक असलेल्या बायकोला इम्प्रेस करायचे म्हणजे तिच्या आवडीचे काहीतरी वापरून हटके बनवायला पाहिजे. अनायासे ब्रेड दिसतोय ड्रावर मध्ये. बैसाहेबाना आवडतोच. बघू वापरता येतो का. आता मी बनवणार म्हणजे सादरीकरण सुरेखच पाहिजे. एकदम रंगीत संगीत. आणि चीज तर पाहिजेच. येस्स … आहेच ते फ्रीज मध्ये. चला कामाला लागूया …

१. ब्रेड मस्त हनी घालून टोस्ट करूया आणि काकडी, गाजर, मुळा, सफरचंद आणि संत्रे घालून मस्त स्वीट ब्रेड डिश करूया.

२. या खिम्याला मस्त आकार देऊन घरटे बनवूया आणि तव्यावर शालो फ्राय करूया आणि घरट्यात हाफ फ्राईड अंडे विराजमान करूया. क्या बात है! आपल्या कल्पना झकासच असतात.

३. ब्रसेल स्प्राऊट आणि गाजराचे तुकडे मस्त ग्रिल करूया आणि चीजी व्हाईट सॉसचं बेसिल फ्लेवर डिप बनवून खायला घेऊया.

तर सादर करत आहे: फ्रूटी साल्सा ऑन हनी टोस्ट, खिमा नेस्ट सर्व्हड विथ चीजी बेसिल डिप!

dish2

अशा प्रकारे दोन्ही स्पर्धक आपल्या आपल्या डिश घेऊन दिमाखात एकमेकांना सामोरे गेले. दोन्ही स्पर्धकांनी जीव तोडून (की डोकं फोडून?) कल्पनाशक्ती वापरल्यामुळे असेल पण प्रत्येकच पदार्थ रुचकर झाला होता. आता स्पर्धा कोण जिंकलं आणि कोण नाही हे काय आम्ही ठरवत नै बसलो. समोर आलेले नवलाईचे पदार्थ खुणावत होते. अशी स्पर्धा पुन्हा पुन्हा भरू दे अशी त्या अन्नपूर्णेस प्रार्थना केली आणि तुटून पडलो.

हे 'सह्जेवण' इतकं हिट झालंय की आता वरचेवर आमचं किचन दणाणून उठतं आणि त्यातून एकसे एक आविष्कार जन्माला येतात. तर अशी ही आमच्या गमतीच्या पेटाऱ्याची कहाणी साठां उत्तरी सुफळ संपूर्ण !!

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 10:12 am | प्रीत-मोहर

वाह!!! आवडली ग ही कल्पना. आणि तुझी किचनदेवाची आराधनासुद्धा.
नॉनवेज खात नसल्याने टेस्ट चा अंदाज नाही. पण दिसायला कहर झाले आहेत दोन्ही वीरांचे पदार्थ एवढेच म्हणेन.
मान गये.

गमतीदार, रंगतदार आणि चवदार अशी ही युद्धकथा आवडली.

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 11:01 am | पिलीयन रायडर

पयल्यांदा आमचा साष्टांग दंडवत घ्या!!!!! हे असं करायला तुलाच सुचु शकतं..!

फोटो गजब ढा रहे है बाबा... काय फोटो आहे की गम्मत??
अत्यंत ओघवतं लेखन.. सुप्पर झाला आहे हा लेख!!

आणि हो.. नवर्‍याच्या पाककौशल्याबद्दल अभिनंदन! मागल्या जन्मीचे पुण्य.. आणखीन काय!

अहाहा ...फोटो बघून निर्वाण .. आयडियाची कल्पना भारीच

इशा१२३'s picture

16 Oct 2015 - 7:47 pm | इशा१२३

मस्त भन्नाट आयडिया.काय ते वर्णन न काय ते पदार्थ.भारिच दिसताहेत सगळे फोटो.कोणत व्रत केलस ते असा नवरा मिळवलास.माझ्याकडे आधिच पांढरे निशाण फडकवले जाते किचनमधे याच्याकडुन.काहीच येत नाहि धड.

पैसा's picture

16 Oct 2015 - 9:50 pm | पैसा

काय धमाल लिहिलं आहेस! आणि फोटो तर फारच सुरेख!

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 10:06 pm | मधुरा देशपांडे

पहिले म्हणजे ही संकल्पना अशक्य जबराट आहे, तु मागे याबद्दल बोलली होतीस तेव्हापासुन डोक्यात आहे, पण आता धागा आलाय तर प्रत्यक्षात आणले जाईल. आणि या लेखात लेखनशैली आणि आणि फोटोंनी बहार आणलिये. अप्रतिम झालेले दिसताहेत सगळे पदार्थ.

स्रुजा's picture

16 Oct 2015 - 11:04 pm | स्रुजा

आईशपथ खतरनाक कल्पना आहे !! आणि सादरीकरण तर जबरदस्त .. काय सुपीक डोकं आहे तुझं , वाह मजा आली :)

मस्त कल्पना आहे. तुमचे पदार्थ चांगले दिसतायत. ऐनवेळी पदार्थ ठरवताना काय काय विचार करावा लागेल याचा अंदाज घेतिये. अशी एखादी स्पर्धा अधूनमधून का होईना घरात घ्यावी असे वाटतेय.

एस's picture

17 Oct 2015 - 11:00 am | एस

साष्टांग _/\_

भन्नाट आयडिआ! फोटो तर अगदी सुपर्ब!

प्रश्नलंका's picture

17 Oct 2015 - 3:47 pm | प्रश्नलंका

मला तर माहित असलेल्या इंग्रेडीयंत पासून नेहमीचेच पदार्थ बनवणे मुश्किल असले मिस्ट्री box च्यालेंज कधी करावं. बाकी जोडीवालं (पती-पत्नी ) मास्तरशेफ जर सुरु झाले तर गिरकी आणि तुझे यजमान तुम्हीच विजेते होणार हे मी आताच सांगते ;)

सस्नेह's picture

17 Oct 2015 - 6:58 pm | सस्नेह

काय ती कल्पकता !
आणि एक तासात एवढे पदार्थ ! __/\__

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 7:32 pm | नूतन सावंत

गिरकी,प्रश्नलंकेशी सहमत.किचनदेवाची आराधना अशीच चालू ठेवा,तो तुमच्या नात्यातली गोडी,खमंगपणा कायम ठेवेलच,याबद्दल शंकाच नाही.कांटेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहेच म्हणूनच इतक्या कमी वेळात इतके पदार्थ तुम्ही बनवू शकता.

सानिकास्वप्निल's picture

17 Oct 2015 - 9:34 pm | सानिकास्वप्निल

क्लास आयडिया गिरकी :) खूप आवडले हे मिस्ट्री बॉक्स चॅलेंज.
इनोव्हेटिव्ह पाककृती आणि तेवढेच देखणे फोटो.

आरोही's picture

21 Oct 2015 - 9:25 pm | आरोही

असेच म्हणते गिरकी !! फोटो आवडले ...

आरोही's picture

21 Oct 2015 - 9:25 pm | आरोही

असेच म्हणते गिरकी !! फोटो आवडले ...

आरोही's picture

21 Oct 2015 - 9:26 pm | आरोही

असेच म्हणते गिरकी !! फोटो आवडले ...

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 2:48 pm | प्यारे१

सगळ्यात मह्तवाचं म्हणजे उत्साहाबद्दल ___/\___

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 4:31 pm | मांत्रिक

अगदी भन्नाटच झाली स्पर्धा. डिश सुद्धा एकदम उत्तम बनवल्या गेल्या आहेत.

तुम्हा दोघांचीही क्रिएटीविटी, उत्साह, पाकृबद्दलचं ज्ञान, मांडणी कौशल्य हे सगळं अप्रतिम. पण त्याही पेक्षा तुमचं सहजीवन खूप आवडलं, ते उत्तरोत्तर असंच बहरत राहो ही सदिच्छा.
तू नेहमीच मनापासून लिहितेस, हा लेख सुद्धा तसाच मनापासून लिहिलेला आहे त्यामुळे आवडलाच.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 10:53 am | वेल्लाभट

आईशप्पथ !
कडक्क्क्क्क फोटो. अन काय कल्पना आहे राव सॉलिड्ड्ड

विशाखा पाटील's picture

19 Oct 2015 - 2:56 pm | विशाखा पाटील

खुसखुशीत वर्णन! फोटो बघितले नाही... उगाच छळ :)

रातराणी's picture

20 Oct 2015 - 4:55 am | रातराणी

क ड क !
दंडवत घ्या माउली. तुमचं थोडं पुण्य आमच्या पदरात घाला आशिर्वाद म्हणून.

मितान's picture

20 Oct 2015 - 8:24 am | मितान

धम्माल !!! मला खूप भारी वाटतेय ही कल्पना !
तुझ्या पतीस्पर्ध्यालाही सांग ! उगाच टैमपास म्हणून करायचं काम नै हे !!!

इडली डोसा's picture

20 Oct 2015 - 7:28 pm | इडली डोसा

कसली इनोवेटिव स्पर्धा आहे, छानचं एकदम. तुम्ही दोघेही अगदी कलाकार आहात. काय मस्त सजावट आहे. आवडली ही कल्पना मला खूप.
आता नवरोबाला असं काहितरी करायल लावते. आमच्याकडे मला स्वयंपाक घरात जास्त प्रवेशच मिळत नाही. असली स्पर्धा केली तर तो माझा आणि त्याचा असा दोघांचा पदार्थ करुन मोकळा होइल अशी भिती वाटतिये मला.

हीहीही भन्नाट कल्पना. कल्पना लवकरच आमलात आणण्यात येईल. ;)

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 9:06 pm | बोका-ए-आझम

आमच्याकडे बायको फक्त चव घेण्यापुरती किचनमध्ये येऊ देते त्यामुळे ही अशी स्पर्धा होईल की नाही, माहित नाही. पण हे तिला वाचायला नक्की देईन. बघू, काही होतं का ते.

अनन्न्या's picture

23 Oct 2015 - 6:13 pm | अनन्न्या

लिखाणही विनोदी शैलीने छान जमलेय, पण हा उपाय काही माझ्या उपयोगाचा नाही, मीअसे काही ठरवले तर नवय्राला काहीही करावे लागणार नाही, मला मात्र मी कित्ती वाईट्ट आहे असे वाटू लागेल!

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2015 - 10:04 pm | स्वाती दिनेश

खरंच गंमत बॉक्स आहे.. तुझी लिहायची स्टाइल पण एकदम झकास!
स्वाती

स्नेहल महेश's picture

26 Oct 2015 - 2:46 pm | स्नेहल महेश

खतरनाक कल्पना फोटो तर अगदी सुपर्ब!

अदि's picture

27 Oct 2015 - 9:55 pm | अदि

मज्जा आली!!

पद्मावति's picture

28 Oct 2015 - 8:20 pm | पद्मावति

वाह, मस्तं लेख. कल्पकता, उत्साह, पाककौशल्य आणि सादरीकरण सगळ्याच आघाड्यांवर तुमची जीत झालीय. सुंदर आणि हटके लेख.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:30 pm | कविता१९७८

मस्तच

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:31 pm | कविता१९७८

फोटो आवडले.

सुचेता's picture

30 Oct 2015 - 7:11 pm | सुचेता

सुंदर आणि हटके लेख. आयड्यची भारी कल्पना

भिंगरी's picture

8 Nov 2015 - 5:14 pm | भिंगरी

मस्त आयडीया!

जुइ's picture

14 Nov 2015 - 11:52 pm | जुइ

अभिनव प्रयोग आवडला!नॉनवेज खात नसल्याने हे पदार्थ कसे लागत असतील त्याची कल्पना नाही.