प्रेममयी

मांत्रिक's picture
मांत्रिक in जे न देखे रवी...
29 Sep 2015 - 12:31 pm

पार्वती
पाहिले मी प्रथम तुला
उतारावरती हिमालयाच्या
गणांसोबत तुझ्या
नंदीच्या गळ्यातील
घुंगरू वाजताना
उन्मुक्तपणे तुला चालताना
विश्वविजयी पौरुषपूर्ण चाल तुझी
मम हृदयात धडधडले
भरदार छाती तुझी पाहताना
श्मश्रू जटा वाढलेल्या
वार्‍यावरती भुरभुरताना
त्रिशूळावरील पकड तुझी
बाहू स्फुरण पावताना
भरदार चाल मर्दानी
व्याघ्रांबर ते ताणताना …१
*****
मम नजरेतील भाव
सख्यांनी ओळखले
त्या कुत्सितांना हसूच फुटले
प्रेमशरांनी घायाळ मला केले
कर्ण कपोल आरक्त झाले
मंदाकिनीच्या प्रवाहात ओलेती
काया माझी शहारली
आत खोल खोल मला
कुणी स्पर्श केले
प्रेमाच्या प्रबळ अग्निने
वेडेपिसे मला केले …२
*****
कुलीन स्त्रियांनी माझी
निर्भर्त्सना केली
दरिद्र्याच्या प्रेमपाशात
म्हणे फसली
काय मी सांगू त्यांना
तनामनात जी आग लागली
भस्मांकित त्याच्या तनुला
आलिंगन द्यावयाला
मी आतुरलेली
कर्पूरगौर त्या जोग्याच्या
अधरांवर ओठ टेकलेली
प्रेमाची मदिरा त्याची
प्यावयास आतुरलेली
प्रेमाच्या कठोर बाणांनी
मी बावरलेली …३
*****
मम मातापित्यांनी
मज बोल लावले
द्वारावरील रक्षकांनी
मला हटकले
तरीही मी धावत सुटले
झुगारुन सारी बंधने
शोधात त्याच्या
नीळकंठ माझ्या प्रियकराच्या
वृक्षवेलींनी मज पाहिले
झर्‍यानिर्झरांनी माझे आक्रोश ऐकिले
एकांतात मी अश्रू ढाळले
भूमीवरी माझे शरीर
झोकून दिले …४
*****
कितीएक ऋतु निष्प्राण गेले
किती सूर्य उगवून
क्षितिजापार बुडाले
रात्रीचे तारेही
मम एकांताला हसले
कितीएक पाऊस
विरहाची आग
भडकावून गेले
शिशिराच्या थंड हवेत
मी पहात तुझ्या मिठीतील स्वप्ने
व्यर्थ शहारुन गेले …५
*****
(महादेव)
ऊठ माझ्या प्राणप्रिये
मी प्रियकर तुझा
जन्मोजन्मीचा
उभा तुझ्याच जवळी
ये मिठीत माझ्या
तत्काळ धावूनी
का करिशी हे क्लेश सखे
मी तो तुझाच
अनंत जन्मिचा
विसर आता हे झुरणे
विरहाने तळमळणे …६
*****
(पार्वती)
हे स्वप्न की सत्य?
मी मनात शंकित झाले
डोळ्यातून अश्रू आले
धावत मी तेथे गेले
माझ्या प्राणप्रियाच्या मिठीमध्ये …७
*****
चंद्र सूर्याचेही
भ्रमण थांबले
देशोदेशीचे वात
स्तब्ध झाले
गात्रागात्रात
रोमांच फुलून आले
डोळे माझे का जडावले?
श्वास का ते ही उष्ण झाले?
लाव्हारसाचे आत
कुठुनी फुटले उमाळे?
ओठ माझे का थरथरले
माझ्या प्रियाच्या
उबदार मिठीतही
मी, का सरसर शहारले? …८
*****
हे वनोवनीच्या श्वापदांनो, पक्ष्यांनो,
हे चंद्र सूर्य, तार्‍यांनो,
निघून जा तुम्ही इथून
माझ्या प्रेमात व्यत्यय आणू नका
हे वृक्षवेलींवरील फुलांनो,
तुमचा मादक सुगंध दरवळू द्या
माझ्या मंगल प्रणयाला
तुमची साथ असू द्या
हे पावसा,
तू असाच दिवसरात्र कोसळत रहा
म्हणजे माझा सखा, माझा वल्लभ,
घराबाहेर जाणार नाही
मला एकटे क्षणभरही
सोडणार नाही
हे उत्तरेकडील थंड वार्‍या
तू असाच बेभान वाहत रहा
म्हणजे माझा प्रियकर
माझी उबदार मिठी सोडून
कुठेच जाणार नाही
कुठेच जाणार नाही …९

(प्रेरणा – होली बायबलमधील राजा सॉलोमनचे गीतरत्न)

प्रेम कविताधर्म

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

29 Sep 2015 - 12:34 pm | भिंगरी

+१

मांत्रिक's picture

29 Sep 2015 - 12:50 pm | मांत्रिक

बायबलमधील राजा शलमोनाचे गीतरत्न माझं अतिशय आवडतं. काहि दिवसांपूर्वी शुचि यांची हरितालिका व्रतावरील अत्युत्तम कथा वाचली आणि अचानक हे काव्य मनात आकार घेऊ लागलं. मूळ काव्यात राजा आणि प्रेयसी यांचा अल्टरनेट संवाद आहे. तीच कल्पना इथे वापरली आहे. मूळ काव्य अगदी बिनधास्त आहे. मी मात्र धार्मिक विषय असल्याने सौम्य वर्णनच केलेले आहे.

मांत्रिक's picture

29 Sep 2015 - 3:45 pm | मांत्रिक

शुचि यांच्या धाग्याची कुणी लिंक देऊ शकेल काय?

विवेकपटाईत's picture

29 Sep 2015 - 7:59 pm | विवेकपटाईत

कविता आवडली.

पद्मावति's picture

29 Sep 2015 - 9:50 pm | पद्मावति

छान! कवितेची कल्पना आणि रचना दोन्हीही आवडले.

पैसा's picture

30 Sep 2015 - 12:19 am | पैसा

दीर्घकविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Sep 2015 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

दीर्घ काव्य आवडले.
लिहिताना हात आखडता घेतला आहे हे वाक्यावाक्याला जाणवत होते.
उत्स्पुर्तपणे जसे सुचते तसे लिहिले असते तर जास्त मजा आली असती.
पैजारबुवा,

कविता१९७८'s picture

30 Sep 2015 - 4:06 pm | कविता१९७८

मस्त कविता

वेल्लाभट's picture

30 Sep 2015 - 4:29 pm | वेल्लाभट

चांगली आहे !

गौरी लेले's picture

30 Sep 2015 - 7:09 pm | गौरी लेले

खुपच सुरेख कविता :)

शिव कन्या's picture

1 Oct 2015 - 9:46 pm | शिव कन्या

छानेय. दीर्घ असूनही वाचनीय.