किकलीच्या मध्ययुगीन परिसरात

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
1 Sep 2015 - 3:55 pm

रेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो.

पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत. ह्या चंदन वंदन शिवाय ह्या परिसरातील इतर किल्ले म्हणजे केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, कमळगड, पाण्डवगड, अजिंक्यतारा, रोहिडा ही भोज शिलाहार ह्याची निर्मिती. ह्यांतील उंचीने कदाचित सर्वाधिक चंदन वंदनच असावेत.

चंदन वंदनला जाण्यासाठी किकलीतूनच पुढे ३ किमी असलेल्या बेलमाची गावात जावे लागते. ह्या बेलमाच्या पण दोन. एक खालची बेलमाची तर दुसरी किंचित उंचीवर असलेली वरची बेलमाची. आमचा उद्देश मात्र चंदन वंदन सर करण्याचा नसून किकली गावातले मध्ययुगीन मंदिर पाहण्याचा तसेच तिथले मोठ्या संख्येने असलेले वीरगळ बघण्याचा होता.

किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्‍या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.

चंदन- वंदन

a
मंदिर प्रवेशद्वार
a

प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर

a

प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्‍यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.

उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
a

गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
a

मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.

सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.

ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.

मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.

भैरवनाथ मंदिर, किकली
a

मुखमंडप
a

मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत.

मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल

a-a--a--a

गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल

a--a--a--a

मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक

a

मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
a

ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.

प्रसवा
a

चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.

सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.

सभामंडपाचे प्रवेशद्वार
a

प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.

प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
a

गज व शरभ
a

प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील नक्षीकाम
a

सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.

सभामंडपाची रचना

a

हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.

आभासी शिल्प
a

याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.

छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.

ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्‍या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.

वामनावतार
a

त्रिविक्रम

a

रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.

रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
a

राम हनुमानाची भेट
a

सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
a

रामहस्ते वालीवध
a

हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
a

हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
a

रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.

हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
a

हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.

a

शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.

शिवतांडव १

a

शिवतांडव २
a

कलशपूजन करणारे हंस
a

खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.

पौराणिक शिल्प
a

स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.

हरिहर

a

नर्तकी
a

अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट

a

दर्पणसुंदरी

a

सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.

छतावरील नक्षीकाम

a

ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार
a

गर्भगृहे
a

गर्भगृहे
a

मंदिराचा अंतर्भाग

a

ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागात फेरफटका मारायला निघालो. एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्‍याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.

मंदिराचा बाह्यभाग
a

इतक्यात पाऊस धूम धूम कोसळू लागला आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारत आलो.

कोसळता पाऊस
a

दिपमाळा
a

मंदिरातून बाहेर आलो. आता किकली गावाकडे निघालो. किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.

काही वीरगळ

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव.
पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली पाहूनच आम्ही पुढे निघालो.

आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

1 Sep 2015 - 4:06 pm | द-बाहुबली

सर्वच फोटो अन माहिती सु रे ख.

प्रीत-मोहर's picture

1 Sep 2015 - 4:14 pm | प्रीत-मोहर

मस्तच!!!. अश्या कोरीव काम असलेल्या ठिकाणांना भेट देतेवेळेस तुमच्या लेखांची आठवण येतेच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2015 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठे मंदिरं, शिलालेख, दगडं दिसली की या वल्लीची आठवण येतेच येते.
देवा वल्लीचं वेड असंच वाढु दे....!

वल्लीसेठ, लेख भारीच.आवडला.
(वल्लीच्या ऐवजी प्रचेतस कधीच म्हणनार नाही)

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2015 - 7:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

(वल्लीच्या ऐवजी प्रचेतस कधीच म्हणनार नाही)

ह्या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालं हो सर :)

सुबोध खरे's picture

2 Sep 2015 - 7:29 pm | सुबोध खरे

+१००
वल्ली शेठन कधी प्रत्यक्ष भेटलेलो नाही परंतु वल्ली म्हटल्यावर आपलेपणा वाटतो.
प्रचेतस म्हणजे कोणी तरी विद्वान वयोवृद्ध असा इतिहासाचा संशोधक असल्याचा भास होतो.
आमच्या माहितीत एका ५ वर्षाच्या मुलाचे नाव व्यंकटेश नितीन जोशी( आजोबांचे नाव ठेवले होते) असे होते. त्याच्या शिक्षिकेने त्याला नाव नितीन व्यंकटेश जोशी असे लिही सांगितल्याचा किस्सा आठवतो.
"प्रचेतस" नाव ठेवण्यात त्यांचा काहीतरी नक्की हेतू असणारच
असो. आपले लेख उत्तम असतात. ते एक आपल्या प्राचीन ठेव्याबद्दल दृष्टी देतात. भरभरून लिहित राहा.
नाहीतरी डोळे सर्वानाच असतात पण "दृष्टी" फार कमी लोकांना असते.

विद्वान वयोवृद्ध असा इतिहासाचा संशोधक

तीच इच्छा आहे पण दु दु मिपाकर्स पूर्ण होउ देत नाहीत =))

पगला गजोधर's picture

1 Sep 2015 - 4:15 pm | पगला गजोधर

सॉल्लीड मस्तच...

अजया's picture

1 Sep 2015 - 4:22 pm | अजया

मस्तच.पुलेप्र.

सुंदर लेख व सुंदर छायाचित्रे. तुमच्या लेखांच्या रूपाने एक अनमोल ठेवा संग्राह्य होत आहे.
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे. या प्रसंगाचा फोटो मात्र टाकायचा राहिला असावा असे वाटते.

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 4:37 pm | प्रचेतस

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

योग्य ते छायाचित्र तिथे अपडेट केले आहे.

बॅटमॅन's picture

1 Sep 2015 - 4:23 pm | बॅटमॅन

..............

देवळे छानच, पण वीरगळांनी खरेच पारणे फिटले.

बाकी काही निरीक्षणे म्ह. छतावरील कमळाचे डिझाईन होयसळ शैलीशी सिमिलर वाटते. मुखमंडप शैलीही तिकडचीच आहे खास.

इतके वीरगळ तेच्यायला, कोणीतरी ष्टडी केला पायजे यांचा. :(

इकडील मंदिरांची शैली मुख्यतः चालुक्य शैलीवरुनच प्रेरित आहेत. छतावरील असे कमळही इकडील बर्‍याच मंदिरांमध्ये दिसते.
होयसळांनी मात्र नंतर त्यांची खास प्रचंड अलंकृत अशी शैली निर्माण केली. यादवांची मंदिरे मात्र त्यामानाने खूपच कमी अलंकृत आहेत.

ओह रैट्ट. ते एक कन्फूजन झाले खरेच.

चिगो's picture

2 Sep 2015 - 1:11 pm | चिगो

इतके वीरगळ तेच्यायला, कोणीतरी ष्टडी केला पायजे यांचा. :(

इतके वीरगळ, म्हनजे त्या गावी कुठलेतरी मोठे युद्ध झाले असले पाहीजे. शेवटच्या फोटोत तर मार्बलवाल्याच्या दुकानात मार्बल मांडतात, तसे वीरगळ मांडलेले आहेत..

धागा आवडलाच, वल्ली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2015 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
नै नै लवकर टाका पुढील भाग.

-दिलीप बिरुटे

अस्वस्थामा's picture

1 Sep 2015 - 4:35 pm | अस्वस्थामा

वल्ले भौ.. ग्रेट आहात. मी या परिसरात वाढलोय. लहानपणी वैराटगड आणि आसपासचे डोंगर म्हणजे नेहमीची फिरण्याची ठिकाणं. इतरदेखील बरीच पडकी मंदिरे पाहिली आहेत पण या परिसरात विशेषकरुन किकलीला एवढं काही असेल असं कधी वाटलं नव्हतं. भुईंज, वाई आणि एकंदर कृष्णेच्या या परिसरात अजून बरंच काही रोचक असेल असं वाटतं.

(कृष्णेच्या पाण्यावर वाढलेला)

[अवांतर : आमच्या शाळेत किकलीची टिकली लईच फेमस होती. या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या हो. ;) ]

मांत्रिक's picture

1 Sep 2015 - 5:15 pm | मांत्रिक

आयला सातारकर?

अस्वस्थामा's picture

1 Sep 2015 - 6:34 pm | अस्वस्थामा

पक्का सातारकर... :)

सस्नेह's picture

1 Sep 2015 - 4:45 pm | सस्नेह

पूर्वजांच्या अनमोल कलाकृतीचे तपशील किती बारकाईने टिपलेत !
कोणतेही शिल्प डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यापेक्षा तुमच्या कॅमेर्‍यातून पहावे !!

चित्रगुप्त's picture

1 Sep 2015 - 4:49 pm | चित्रगुप्त

व्वा, मस्तच. असे काही बघितले की आपण पुण्यापासून फार फार लांब रहात असल्याबद्दल खंत दाटून येते.

सुधांशुनूलकर's picture

1 Sep 2015 - 4:49 pm | सुधांशुनूलकर

फोटो आणि माहिती मस्तच.

एवढ्याचसाठी प्रचेतसबरोबर लेणी आणि पुरातन मंदिरं, शिल्पं बघायला जायचं...

कंजूस's picture

1 Sep 2015 - 5:10 pm | कंजूस

मिपाचा मलिक-ए-मंदिर

एवढंच म्हणतो.

( मलिक-ए-मंत्र यांच्याच गावचे ना?)

मुक्त विहारि's picture

1 Sep 2015 - 5:13 pm | मुक्त विहारि

झक्कास वर्णन.

प्यारे१'s picture

1 Sep 2015 - 5:21 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणे अभ्यासू लेख.
आमच्या गावाशेजारचं गाव पण जाणं नाही झालं कधी.

मस्त लिहिलं आहेस वल्ली. ते गर्भगृहातील खांबांचे रंग मूळ स्वरुपातील आहेत की आता कोणी फासलाय रंग?

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 5:46 pm | प्रचेतस

बहुतेक खांब मूळ स्वरूपातच आहेत. ज्या खांबांना रंग दिसतोय ते भैरवनाथाची मूर्ती असलेल्या गाभार्‍यातील आहेत. ती भैरवनाथाची मूर्तीशिवकालीन असावी.

माझीही शॅम्पेन's picture

1 Sep 2015 - 5:39 pm | माझीही शॅम्पेन

लेखकाच नाव न वाचाताच पूर्ण लेख वाचून काढला आणि वल्ली शिवाय इतका ताकदीचा लेख कोण लिहु शकतो हे पाहण्यासाठी लेखकाच नाव पाहील "प्रचतेस" ....
वल्लीराव काय झाल नाव बदलल तरी आम्ही वल्लीच बोलणार

स्वच्छंदी_मनोज's picture

1 Sep 2015 - 5:55 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्लीराव मस्तच लिहीले आहेस..
दिवसांगणीक तुझा मंदीरशिल्पाचा अभ्यास वाढत चालला आहे असे जाणवते (असाच अभ्यास वाढूदे आणी आम्हाला अजून लेखांची मेजवानी मिळूदे. अजून बरीच मंदीरे बाकी आहेत :))

ते विहीरीच्या लेखाचं मनावर घेच लवकर.

अरविंद कोल्हटकर's picture

1 Sep 2015 - 5:58 pm | अरविंद कोल्हटकर

लेख वाचून मी आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र श्री.मा.भावे अशा आम्ही दोघांनी ह्या दोन किल्ल्यांना आणि किकली गावाला सुमारे ४० वर्षांपूर्वी भेट दिली होती त्याची आठवण झाली. तेव्हा माझ्याकडे एक साधा बॉक्स कॅमेराच होता आणि ते फोटो कोठे आणि केव्हा गळबटले हेहि आता आठवत नाही.

तुमच्या चित्रातील पुण्याकडून पाहिल्यावर उजवीकडे दिसतो तो चंदन आणि डावा वंदन. दोनांमध्ये तो थोडा उंच आहे. आम्ही प्रथम चंदनवर चढलो पण तेथे काहीच उरले नव्हते. तेथून मधल्या खोलगटीतून वंदनकडे गेलो. तेथे मात्र एका वाड्याचे अवशेष, ब्राह्मण आळी नावाच्या एका भागाचे अवशेष - ही माहिती आम्ही तेव्हा किंवा नंतर कोठूनतरी मिळवली असणार कारण जागेवर दगडमातीच्य ढिगांव्यतिरिक्त असे काहीच निदर्शक उरलेले नाही - आणि एक शिवमंदिराचे स्पष्ट रूप असलेली पण आता मशिदीत बदललेली एक पडकी इमारत दिसली. जवळच एक गुहा होती आणि तुळाजी आंग्रे ह्याला तेथे कैदेत ठेवले होते हे नंतर वाचायला मिळाले. तेव्हा बांधल्या जाणार्‍या धोम धरणाचा थोडा फुगवटा अणि दक्षिणेस सातारा शहर हेहि वरून दिसत होते.

परतीसाठी वंदनच्या सोंडेवरून किकली गावात उतरलो. भैरवनाथाचे मंदिर पाहिलेच पण तेव्हा त्याचा जीर्णोद्धार झाला नव्हता. (तो अलीकडेच केला गेला अहे अशी माहिती.) खास ध्यानात आलेली गोष्ट म्हणजे गावाच्या चावडीजवळ अस्ताव्यस्त विखुरलेले १००-१५० वीरगळ. काही चावडीच्या चौथर्‍याला टेकवून उभे केले होते पण अन्य बरेच इकडे तिकडे अस्ताव्यस्त विखुरलेले होते. जवळच्या घरांच्या भिंतींमधूनहि काहींचा तयार घडीव दगड म्हणून मुक्तहस्ते वापर केला गेला होता. हा देखावा पाहून हळहळत आम्ही गाव सोडले.

(असे वीरगळ दुर्लक्षित पडलेले बर्‍याच जागी पाहिलेले आहेत. फार दूर कशाला, पुणे-पौड रस्त्यावर जेथे घाटी सुरू होते तेथे पिरंगुट (का भुगाव?) येथे एक देऊळ आहे. त्या देवळाच्या परिसरात असेच डझन-दोन डझन वीरगळ पडलेले आढळतील. काही वीरगळ घरांच्या भिंतीमध्येहि बसवलेले आहेत. 'वीरगळ' हा शब्द कन्नड असून कै.ग.ह.खरे ह्यांनी तो मराठीत रूढ केला असे कोणी बोलल्याचे आठवते. हा शब्द मोल्सवर्थमध्ये नाही.)

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 6:45 pm | प्रचेतस

धन्यवाद काका तुमच्या माहितीबद्दल.
वीरगळ हा शब्द कन्नड नसून तो वीरकल्लू ह्या कन्नड शब्दाचा अपभ्रंश आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा.

पिरंगुट/भूगाव इथल्या वीरगळांबद्दल कधी ऐकले नाही पण हिंजवडीनजिकच्या माण गावात डझनावारी वीरगळ आहेत. अगदी पुण्यातही शनिवारवाड्यानजीकच्या कुंभारवाड्याजवळ असलेल्या एका मंदिराच्या दारात दोन पुरुषभर उंचीचे वीरगळ आहेत.

बॅटमॅन's picture

1 Sep 2015 - 7:17 pm | बॅटमॅन

अगदी पुण्यातही शनिवारवाड्यानजीकच्या कुंभारवाड्याजवळ असलेल्या एका मंदिराच्या दारात दोन पुरुषभर उंचीचे वीरगळ आहेत.

हे कुठले मंदिर?

मंदिराचं नाव नेमकं आठवत नाही. बहुतेक मांगिरबाबा मंदिर आहे. अर्थात मंदिर लै अलीकडचं आहे.

दिपस्तंभ's picture

8 Sep 2018 - 1:49 am | दिपस्तंभ

महादेव मंदिरात

पद्मावति's picture

1 Sep 2015 - 6:29 pm | पद्मावति

इतक्या सुरेख मंदिरांची माहिती/ फोटो पाहून नेहमी वाटतं की या अशा वास्तूंची, मंदिरांची देखभाल, संवर्धन, भग्न अवशेष रिस्टोर करण्याचं काम सरकार नीट करते का? पुरेशी आर्थीक मदत पुरवते का?
हे असे स्थळ युरोप मधे असते तर त्याला हेरिटेज साईट घोषित करून त्याला भलीमोठी आर्थीक मदत मिळाली असती आणि हा प्राचीन वारसा नीट सांभाळला असता. आपल्याकडे असे काही प्रयत्न होतात का?

भारतीय पुरातत्व खात्यांकडून काही महत्वाच्या वास्तूंची उत्तम देखभाल होते. मात्र अशा कमी माहिती असलेल्या ठिकाणांची देखभाल करण्यात पुरातत्व खाते निश्चितपणे कमी पडते. दगडांवरचे मार्किंग्स, फुटकळ कुंपण ह्यापलीकडे त्यांचे काम जात नाही.

मात्र वेरुळ अजिंठासारख्या लेण्यांची खात्याकडून उत्तम प्रकारे देखभाल होते असा अनुभव आहे.

अस्वस्थामा's picture

1 Sep 2015 - 8:58 pm | अस्वस्थामा

पुरातत्व खत्याचं विकेंद्रीकरण तसेच "हौशी संशोधक/अभ्यासक" यांच्या मार्फत जतनासाठीची व्यवस्था असा काही उपाय असू शकेल काय ?

(आधीच असल्यास कल्पना नाही म्हणून विचारतोय.)

अप्पा जोगळेकर's picture

1 Sep 2015 - 7:16 pm | अप्पा जोगळेकर

अप्रतिम. हा वल्ली यांचा आयडि आहे का ?

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 8:21 pm | प्रचेतस

होय. :)

अरविंद कोल्हटकर's picture

1 Sep 2015 - 7:43 pm | अरविंद कोल्हटकर

ह्या माहितीपूर्ण लेखातील एक तपशील दुरुस्त करू इच्छितो.

लेखामध्ये सातार्‍याच्या किल्ल्याला 'अजिंक्यतारा' असे संबोधले आहे. सध्या हेच नाव सर्वांच्या तोंडी असते असे जाणवते. मी सातार्‍यात आपले लहानपण घालवले आहे आणि आम्ही ह्या किल्ल्यास त्याच्या मूळच्या 'अजमतारा' ह्या नावानेच ओळखत होतो. त्याचे 'अजिंक्यतारा' असे नामान्तर मूळ नाव माहीत नसल्याने आणि 'अजिंक्य' असा किल्ला म्हणून 'अजिंक्यतारा' असा गैरसमज सहजगत्या निर्माण होऊ शकत असल्याने झाला आहे.

औरंगझेब आपल्या आयुष्याची शेवटची २५ वर्षे महाराष्ट्रामध्ये इकडच्या 'बंडाळ्या' मोडण्यासाठी जातीने उपस्थित होता हे आपणास माहीतच आहे. त्यामध्ये १६९९ साली त्याचा मुक्काम सातारच्या परिसरात होता. (सातारच्या उत्तर सीमेवर करंजे म्हणून गाव आहे. त्या गावात त्याचा तळ होता अशी माहिती आम्हास आमच्या शिक्षकांनी शाळेत दिली होती.) सातारचा किल्ला जिंकण्यासाठी त्याला वेढा घालण्यात आला पण किल्ल्याने बरेच दिवस झुंज दिली. अखेर बादशहाचा मुलगा आणि घोषित वारस मुहम्मद अझम शाह ह्याच्या मध्यस्थीने किल्लेदार सुभान ह्याने किल्ला खाली करून दिला आणि 'As the fort was captured through the mediation of the Prince, it was named 'Azamtara' पृ.२६३, भाग ४३ 'म’आसिर-ए-आलमगिरी'. ही घटना १८ एप्रिल १७०० ह्या दिवशी घडली.

औरंगझेबाच्या मृत्यूनंतर घोषित वारस मुहम्मद अझम शाह हा अहमदनगरमध्ये तख्तावर बसला पण त्याचा सत्ताकाळ दोनतीन महिनेच टिकला. त्याचा धाकटा भाऊ बहादुरशहा पहिला ह्याने तख्त त्याच्याकडून हिसकावले.

ह्याच मोहिमेमध्ये मुघल फौजेने सातार्‍याजवळचे वसंतगड आणि परळी (सज्जनगड) हे किल्लेहि घेतले. पैकी परळीच्या किल्ल्यामध्ये मुख्य दाराच्या आतमध्ये एक तत्कालीन संगमरवरी लेख पाहायला मिळतो. लेख (बहुधा) फारसी असावा पण त्याचे मराठी भाषान्तर जवळच लावले आहे. त्यातील एकच वाक्य आठवते 'ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवीत आहे' असे काहीसे तेथे लिहिले आहे. किल्ला आदिलशहाने बांधला होता आणि तो 'नवरस' हा शब्द आपल्या इमारतींच्या नावात वापरत असे म्हणून परळीचे नाव बदलून ते 'नवरसतारा' असे करण्यात अले अशी माहिती म'आसिर-ए-आलमगिरीमध्ये आहे. किल्ल्यातील मंदिर पाडण्यात आले आणि तेथील आदिलशाही मशिदीस रंगरंगोटी करून स्वतः बादशहाने तेथे नमाज पढला हा तपशीलहि उपलब्ध आहे. मशीद अजून उभी असून पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे पण वापर नसल्याने पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहे.

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 8:09 pm | प्रचेतस

आझमतारा हे नाव मोंगलानी किल्ला घेतल्यावर किल्ल्यास दिले हे माहीत होतेच. पुढे ताराबाईंनी किल्ला जिंकल्यावर ह्याचे नामकरण अजिंक्यतारा असे केले. भोजाच्या राजवटीत ह्या किल्ल्याचे नाव सप्तर्षी होते असे कुठेतरी वाचल्याचे आठवतेय.

अरविंद कोल्हटकर's picture

1 Sep 2015 - 9:27 pm | अरविंद कोल्हटकर

ताराबाईने किल्ल्याचे नाव 'अजिंक्यतारा' केले ह्यास काही आधार आहे काय?

अन्यथा १८८५ मध्ये छापलेल्या ब्रिटिश काळातील Gazetteer of Satara District मध्ये किल्ल्याचे नाव सर्वत्र 'सातार्‍याचा किल्ला' असेच दिले आहे. 'अझमतारा' हे नाव आणि त्याचा इतिहासहि नोंदवला आहे. (प्रू.५८६ च्या पुढेमागे पहा.)

अन्यहि दोन कारणांसाठी ताराबाईने हा बदल केला असण्याची शक्यता मला दिसत नाही. एकतर 'अस्मितेमधून नावे बदलणे' हा १९४७ नंतरचा विचार आहे. मराठेशाहीच्या काळात 'मुस्लिम आक्रमणाच्या आणि अन्यायाच्या खुणा नामान्तरातून पुसणे' ह्या विचाराचा उगम झाला नव्हता. हिंदु-मुस्लिम तेढहि स्थानिक पातळीवर विशेष नसे. दुसरे म्हणजे ताराबाई सत्तेमध्ये सातार्‍याला राहिली असली तरी ते फार थोडे दिवस असेल. १७०८ मध्ये शाहू सुटून आल्यावर सातार्‍याच्या परिसरातच दाखल झाला आणि ताराबाई पन्हाळ्याकडे गेली असा इतिहास आहे. इतक्या थोडया दिवसात आणि अन्य झगडे विसरून किल्ल्याचे नाव बदलणे ह्यावर तिने प्राधान्याने ध्यान दिले असेल हे विश्वसनीय वाटत नाही. तदनंतर तिचा सातार्‍यात प्रदीर्घ वास झाला पण तो नजरकैदेमध्येच. नाव बदलण्याची कसलीच सत्ता तिच्याकडे तेव्हा नव्हती.

सातार्‍याचा इतिहास 'असा घडला सातारा' ह्या नावाने सातार्‍यातील एक जुने शिक्षक कै.गो.रा.माटे ह्यांनी १९७०च्या पुढेमागे लिहिला आहे. त्यातहि किल्ल्याचे नाव 'अजमतारा' असेच मिळते. (नावाचा मूळ अर्थ माहीत नसल्याने आम्ही जुने सातारकर त्याला 'अजिमतारा' अथवा किल्ल्यातील मंगळाईच्या देवळावरून 'मंगळाईचा किल्ला' असेच म्हणत असू.)

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 11:13 pm | प्रचेतस

तसा ठोस आधार मजकडे नाही. ताराबाईने किल्ला घेतल्यावर नाव बदलले होते असे कुठेतरी वाचल्याचे नक्कीच आठवतेय. कदाचित आझमताराचा अपभ्रंश नंतर अजिंक्यतारा असा झाला असावा,

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 12:45 pm | प्रसाद गोडबोले

तसा ठोस आधार मजकडे नाही

सारे सातारकर , ठोस आधार नसल्या शिवाय बोलणार्‍यांचे लोकांचे घर सातार्‍याचा खुप बाहेरच्या एका गावात बांधत असत ... तेव्हा पासुन त्या गावाला ठोसेघर असे नाव पडल्याचा बखरींमध्ये उल्लेख आहे !

=))

मी-सौरभ's picture

2 Sep 2015 - 5:37 pm | मी-सौरभ

=))

वाईच्या पश्चिमेला भोगाव हे गाव आहे तिथेही एक शिव मंदिर आणि वामन पंडित यांची समाधी आहे

आम्ही बघीतलय पण तुमच्यासारख आम्हाला काय कळत नाय.

प्रचेतस's picture

1 Sep 2015 - 9:21 pm | प्रचेतस

त्याबद्दल पुढच्या भागात येणारच आहे.:)

अरविंद कोल्हटकर's picture

3 Sep 2015 - 9:00 pm | अरविंद कोल्हटकर

ह्या भोगाव - भुगाव ह्या गावी मी २००८-०९ सालच्या माझ्या भारतभेटीमध्ये गेलो होतो. तेथील जवळच्याच पांडववाडी - पांडेवाडी गावात आमच्या विस्तारित कोल्हटकर कुटुंबाची एक शाखा पेशवाईच्या दिवसात भरभराटीला आलेली अशी होती. (नंतरच्या सर्व पिढया नागपुरापासून सांगलीपर्यंत फैलावल्या आहेत.) आता भुगावात फक्त एक कोल्हटकर कुटुंब राहते. ते गाव आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी मी त्या कुटुंबप्रमुखांबरोबर आधीपासून संपर्क साधून मी मुद्दाम गेलो होतो. त्यांनी अतिशय आस्थापूर्वक आमचे स्वागत करून आसपासचा सर्व परिसर आम्हाला हिंडून दाखविला. (माझी धाकटी बहीण माझ्याबरोबर होती. ’माहेरवाशीण पहिल्यांदा घरी आली’ असे म्हणून त्यांनी तिला एक साडीचोळी भेट दिली.)

त्या समयी मी भुगावमधील कृष्णेकाठची वामनपंडिताची समाधि पाहिली होती. तिचा आणि तिच्यावरील लेखाचा असे मी तेव्हा काढलेले फोटो. ही समाधि धोम भागातील ’हरि’ नावाच्या वामनाच्या कोणी शिष्याने गुरुस्मरणार्थ उभारली आहे असे वि.ल.भावे म्हणतात. तेव्हा समाधीवरून वामनकवि भुगावचा असे म्हणता येत नाही असे वाटते. समाधीवरील लेखामध्ये ’यथार्थदीपिके’चा उल्लेख आहे असे दिसते.

समाधि
लेख

(वर उल्ल्लेखिलेली कोल्हटकर शाखा म्हणजे रघूजी भोसलेचा दिवाण आणि बंगालच्या स्वारीचा प्रमुख भास्कर राम ह्याची शाखा. बंगालमध्ये ’बार्गीं’च्या बरोबर प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध असलेला ’भास्करपंडित’ हाच. त्याच्याबद्दल, त्या शाखेबद्दल आणि पांडववाडी परिसरात मी घेतलेल्या अन्य छायाचित्रांबद्दल ह्या धागाकर्त्याचा त्या परिसराबद्दल लेख जेव्हा येईल तेव्हा पूर्णतेच्या हेतूने तेथे लिहीन. सध्या येथे इतकेच म्हणतो की यथार्थदीपिकाकार वामन, वामनपंडित, ’सुश्लोक वामनाचा’ मधला वामन, यमक्या वामन हे एक का अनेक ह्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतान्तरे आहेत.)

प्रचेतस's picture

3 Sep 2015 - 9:18 pm | प्रचेतस

धन्यवाद काका.
वामनपंडिताची मूळ समाधी साताऱ्या जवळ कोरेगाव येथे आहे असे वि.ल. भावे म्हणतात. सारस्वताच्या पुरवणीमध्येही तुळपुळे काहीसे असेच म्हणतात.
समाधीकडे येतानाच एक कसलीही कलाकुसर नसलेले एक यादवकालीन मंदिर आहे. स्तंभांवरुन त्याचे प्राचीनत्व सहज लक्षात येते. तेथे जवळच झाडाझाडोऱ्यांत एक वीरगळ आहे. ह्याची छायाचित्रे पुढच्या भागात देईनच.

बाकी ही पांडववाडी/ पांडेवाडी म्हणजे समोरच्याच पांडवगडाच्या पायथ्याचं गाव दिसतंय.

अरविंद कोल्हटकर's picture

3 Sep 2015 - 10:41 pm | अरविंद कोल्हटकर

वि.ल.भावे दोन्ही समाध्यांचा उल्लेख करतात आणि असेहि म्हणतात की दोन समाध्या असणे हे वामनहि दोन असण्याचा खात्रीलायक पुरावा मानता येत नाही.

हे तुम्ही उल्लेखिलेले देऊळ समाधीशेजारीच आहे आणि त्याचेहि छायाचित्र माझ्याकडे आहे. आमचे मार्गदर्शक कोल्हटकर ह्यांच्या सांगण्यानुसार देऊळ कोल्हटकर कुटुंब तेथे भरभराटीत होते तेव्हा त्यांनी बांधलेले आहे. (मी पुरावा मागितला नाही आणि त्यांच्याजवळहि आता नसावा.)

पांडववाडी पांडवगडाच्या पायथ्याशी आहे आणि पांडवगडाचा कोल्हटकर कुटुंबाशी 'इनाम/अधिकार' असा काही संबंध असावा. भास्कर राम ह्याचे वडील रामाजीपंत शाहू सुटून महाराष्ट्रात परतला तेव्हापासून त्याच्या बाजूचे होते. त्यातून त्यांना ही इनामे/अधिकार मिळाले असावेत.

देऊळ यादवकालीन आहे हयात काहीच शंका नाही. अर्थात त्या भग्न देवळाचा कळस आणि बाह्य बांधणी निस्संशय पेशवेकालीन आहे. कदाचित मूळच्या भग्न देवळाचा जीर्णोद्धार कोल्हटकर पूर्वजांनी केला असावा.

बॅटमॅन's picture

3 Sep 2015 - 1:20 pm | बॅटमॅन

वामनपंडितांची समाधी????????? मग तर जानाच पडता यारो!!!!!!!

- (वंशी नादनटीवाल्या 'टी' पार्टी प्रेमी) बॅटमॅन.

कंजूस's picture

1 Sep 2015 - 11:27 pm | कंजूस

आता ही एवढी माहितीची भर पडताना पाहून तिकडे वेळ कमी पडेल असे वाटते.

कोणी शनिवारी रात्री लोहगडावर येऊन लक्ष्मी कोठारात ( गुहा ) वस्ती करू असे ठरवेल तर बहुतेक ते शक्य होणार नाही कारण लोहगडवाडीचे गावकरी सहानंतर सर्वांस हाकलतात.पुर्वी एकदा राहिलो आहे.

सतिश गावडे's picture

2 Sep 2015 - 12:00 am | सतिश गावडे

अप्रतिम लेख प्रचेतस सर !!

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 5:44 pm | प्रसाद गोडबोले

प्रचेतस सर

मराठी भाषेतुन आदर दाखवण्याची पद्ध्दत नाहीशी होत असल्याने आम्ही लोकांना आदरार्थी उपनामे द्यायची ठरवली आहेत ... ,
गावडे सर , सर हे तुमच्या साठी राखुन ठेवण्यात आले आहे !
प्रचेतस ह्यांना वल्ली तात्या असे नामकरण सुचबत आहे .
बाकी ब्यॅटु अण्णा , लोटे बुवा , नाखु नाना वगैरे उपनामे कशी वाटतात ते कळवणे =))

- प्रगोपंत

नाखु's picture

2 Sep 2015 - 6:20 pm | नाखु

शंका

लोटे बुवा , यात आदरार्थी उपनाम काय आहे ???

सदागोंधळी नाखु.

जाताजाता अन्यासाठीचे नाव उशीरा जाहीर करणे ही विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2015 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा

आंम्हालाही येक णाव सुचलय..
गिर्जाधिपटी टणाटणपंट सातारकर म्हाराज!

उगा काहितरीच's picture

2 Sep 2015 - 1:01 am | उगा काहितरीच

सुंदर लेख,छायाचित्रे ! तुम्ही औंढा नागनाथ हे ज्योतीर्लिंग पाहीलेले आहे का ?

औंढा नागनाथ खूप पूर्वी पाहिले होते. आता त्याबद्दल काहीच आठवत नाही.

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2015 - 6:59 am | बोका-ए-आझम

ब-याच दिवसांनी वल्लींचा लेख आला आणि worth the wait आहे. फोटो आणि माहिती म्हणजे प्रश्नच नाही. सुंदरच!

नाखु's picture

2 Sep 2015 - 9:01 am | नाखु

अगदी आत्मीयतेने माहीती आणि तपशील.
एखादा मनुश्य आपल्या व्यासंगाच्या विषयात किती अभ्यासू आणि समर्पीत असतो ते "वल्लीदां" बरोबरच्या पाटेश्वर आणि इतर सहलीत अनुभवले आहेच.

काही किऱकोळ आणि बाल* सुलभ शंका.

  • ह्या खांबाची स्थापत्य रचना भीमाशंकर आणि घृष्णेशवरशी मिळती जुळती वाटतेय का?
  • रामायण व महाभारत घडलेच नाही तो फक्त एक कल्पना विलास आहे असा धागा प्रतीवाद फार पूर्वी बहुदा मिपावर आला होता. आता इतक्या ठिकाणी रामायण महाभारतातले प्रसंग आहेत म्हणजे ते खरेच घडले असावे असा अंदाज पक्का होतो.
  • वीरगळ नक्की नावानिशी नसून त्याचे प्रयोजन फक्त वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांची केलेली कृतज्ञताआठवण्+सन्मान म्हणून का आअखी काही प्रयोजन आहे.

"बाल" चा संबध केसाशी नसून शैशवाशी आहे ही नम्र नोंद.

ह्या खांबाची स्थापत्य रचना भीमाशंकर आणि घृष्णेशवरशी मिळती जुळती वाटतेय का?

अजिबात नाही. भीमाशंकर मंदिरातले खांब पेशवेकालीन (मराठा) शैलीत आहेत. घृष्णेश्वरच्या स्तंभांशी थोडीफार जुळते पण तिकडील स्तंभ हे मूळच्या चालुक्य्/यादव शैलीशी इमान राखत त्याबरहुकूम अहल्यादेवी होळकरांनी जीर्णोधार\रीत केलेले आहेत.

आता इतक्या ठिकाणी रामायण महाभारतातले प्रसंग आहेत म्हणजे ते खरेच घडले असावे असा अंदाज पक्का होतो.

रामायण हे पूर्णपणे काल्पनिक आहे असं माझं मत आहे पण महाभारतात अतिशयोक्ती वजा जाता तथ्यांश नक्कीच असू शकतो. अर्थात ही पुराणे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत त्याअर्थी त्यांचा प्रभाव इकडील शिल्पकलेवर पडणारच.

वीरगळ नक्की नावानिशी नसून त्याचे प्रयोजन फक्त वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांची केलेली कृतज्ञताआठवण्+सन्मान म्हणून का आअखी काही प्रयोजन आहे.

कर्णाटकातील काही वीरगळआंवर वीरांचे नाव आढळते. अगदी आपल्या महाराष्ट्रातील खिद्रापूरचा वीरगळ शिलाहार भोज (दुसरा) ह्याचा सेनापती बम्मेश ह्याचे स्मारक म्हणून घडवला गेला तसा शिलालेख त्यावर आहे. मात्र बहुतेक वीरगळ हे केवळ वीरांचे स्मारक म्हणूनच घडवले गेले. शिवकाळात वीरगळांची जागा थड्यांनी घेतली.

जेपी's picture

2 Sep 2015 - 9:14 am | जेपी

मस्त लेख वल्लीदा.

सुहास झेले's picture

2 Sep 2015 - 9:44 am | सुहास झेले

सुंदर मेजवानी वल्लीशेठ....!!! :)

प्रशांत's picture

2 Sep 2015 - 9:54 am | प्रशांत

वल्ल्या लेख आवडला रे

स्पंदना's picture

2 Sep 2015 - 10:03 am | स्पंदना

तास झाला लेख वाचतेय.
संपला एकदाचा वाचून. अतिशय माहितीपुर्ण अन सुंदर सुबक फोटोजनी भरलेला लेख.
या मंदिरातली बरीच शिल्पे सुस्स्थीतीत वाटतात.

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले

मस्त छायाचित्रे :)
माहीतीपुर्ण लेख !
बरीचशी माहीती कित्येक सातारकर लोकांनाही माहीत नसेल !

महाराष्ट्रातील मंदिरे यावर. छायाचित्रे तर अप्रतीमच आहेत, पुस्तकामध्ये मुद्रीत करता येतील.

खटपट्या's picture

2 Sep 2015 - 1:24 pm | खटपट्या

खूप छान लेख. लेख वाचायला घेतला तेव्हा. एकही प्रतिसाद नव्हता. घरी जाउन प्रतिसाद द्यायला गेलो पहीला लंबर हुकल्याचे कळले

जे.पी.मॉर्गन's picture

2 Sep 2015 - 5:40 pm | जे.पी.मॉर्गन

माताय.... किकली म्हणजे आमच्या पाचवडच्या शेजारी. तिथं असं काहीतरी आहे हे आजच कळतंय. आता फुडच्या येळी जायालाच पायजे!

लै भारी फोटू आणि वर्णन !

जे.पी.

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 9:32 pm | प्यारे१

जे पी मॉर्गन, सातारकर काय???? गाव कंचं वो???

जे.पी.मॉर्गन's picture

3 Sep 2015 - 12:19 pm | जे.पी.मॉर्गन

तसा पुण्याचा... पण मूळ गाव पाचवड (भुईंज). मामा लोकं वाईची आणि आत्या सातार्‍यात. म्हणून परिसरात बर्‍यापैकी हिंडणं होतं

जे.पी.

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 1:57 pm | प्यारे१

अरे वा! जावईच की आमचे.
(तुमच्या मामांच्या गावचे आम्ही)

मी-सौरभ's picture

2 Sep 2015 - 5:40 pm | मी-सौरभ

वल्लिदा: या लेखात आपल्या उत्साही सहकार्‍यांचे आनी येता जाता केलेल्या खादाडीचे फोटो का नाहीत? णिषेध!!

खादाडीचे फोटू मी कधीच टाकत नै. मूळ विषयालाच प्राधान्य हवे. काय म्हणता?

मी-सौरभ's picture

4 Sep 2015 - 12:46 pm | मी-सौरभ

कमित कमी फोटो तरी टाक,

दगडांचे एवढे फोटो टाकतोस असे थोडे माणसांचे पण टाक बरं का प्रचेतस ;)

मस्त हो प्रचेतस साहेब. एकच नंबर.
एक जुनीच तक्रार परत करतोय. सगळेच फोटो पूर्ण साईज मध्ये देण्याएवजी थोडे थंबनेल्स देऊन किंवा अल्बम टाईप डिरेक्टरी देता नाई का येणार. धागा ओपन व्हायला खुप वेळ लागतो हो.
अवांतरः माढा (जि.सोलापूर) येथील माढेश्वरी देवीच्या मंदिराला आपण भेट द्यावीत ही नम्र विनंती. येथेही असंख्य असेच वीरगळ जागोजाग विखुरलेले आहेत. मंदीर तर हुबेहुब असेच आहे. (नवीन ऑईल पेंट ची कर्तबगारी झाला अस्ल्यास कल्पना नाही.)

फ़ोटोंशिवाय धाग्याला काहीच महत्त्व नै रे. थंबनेल्स किंवा डिरेक्टरी देऊन वर्णन करणे योग्यप्रकारे साध्य होत नाही. तरीही ह्यातील फ़ोटो बरेच आकुंचित केलेले आहेत.

बाकी सोलापुरात येईन तेव्हा तू तिकडील मंदिरे दाखवशीलच. तुमचा भाग म्हणजे यादव- काकतीय- होयसळ यांची सततची युद्धभूमी, त्यानंतर बहमनी राजवटीची प्रमुख ठाणी. साहजिकच प्राचीन अवशेष बऱ्याच प्रमाणावर असणार.

औरंगाबादचे दूर्लक्षीत वैभव
औरंगाबाद म्हटले की फक्त वेरुळ अजिंठ्याचे नाव समोर येते. जागतिक दर्जाच्या या वारसास्थळांबरोबरच औरंगाबाद जिल्ह्यात आणी आजूबाजूच्या जिल्ह्यातही अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांच्याकडे फारसे कोणी जात नाही कारण त्या पर्यटन स्थळांची ओळखच पर्यटन नकाशावर करुन देण्यात आलेली नाही. औरंगाबाद मध्ये आल्यावर पर्यटक फार फार तर बीबीका मकबरा विंâवा पानचक्कीला भेट देतो. पण वेरुळच्या आधी खोदण्यात आलेल्या औरंगाबाद लेणीकडे कोणी जात नाही. अजिंठ्याकडे जात असताना मुर्डेश्वर हे महादेवाचे निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. वेरुळला जाताना दौलताबादचा किल्ला, खुलताबादला सुफी संतांची अनेक ठिकाणे आहेत. येथेच औरंगजेबाची कबरही पहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे सरोवर निसर्गाचा चमत्कार आहे. तेथील मंदिरेही शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. पर्यटनाच्या नकाशावर या ठिकाणांना ठळक स्थान नसल्याने पर्यटक वेरुळ, अंजिंठा पाहून परत जातो. ज्यांना हटके पर्यटन करायची इच्छा आहे त्यांनी या स्थळांना आवर्जून भेट द्यावी.

माझीही शॅम्पेन's picture

2 Sep 2015 - 7:01 pm | माझीही शॅम्पेन

ज्यांना हटके पर्यटन करायची इच्छा आहे त्यांनी या स्थळांना आवर्जून भेट द्यावी.

तुम्ही काही धागे टाकून ह्या ठिकाणांची ओळख करून दिलीत तर फार बर होईल .. माहितीचा अभाव हे कारण आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम चित्रांनी भरलेला लेख.

हा माणूस अशी नजरेआड लपलेली देवळे आणि शिल्पकला ज्या खुबीने शोधून काढतो आणि अभ्यास्पूर्ण शैलीत सादर करतो यावरून वल्ली हे नावच जास्त शोभून दिसते ! आता, प्रचेतस या नावाचा उगा हट्ट (बरेच लोक अजून या शब्दाचा अर्थ काय असाव याच विवंचनेत आहेत ;) ) सोडून जुने वल्ली हेच नाव घ्यावे असा (इतर अनेकांसारखाच) प्रस्ताव मांडत आहे :)

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 12:27 pm | सौंदाळा

दोन्ही मुद्द्यांसाठी +१
आणि या निमित्ताने डॉ. सुहास म्हात्रे यांनीसुद्धा परत इस्पिकचा एक्का हे नाव घ्यावे असा उपप्रस्ताव मांडतो.

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 1:58 pm | प्यारे१

प्रस्ताव आणि उपप्रस्ताव दोन्हीला अनुमोदन.

मी-सौरभ's picture

4 Sep 2015 - 12:48 pm | मी-सौरभ

सहमत आहे

पैसा's picture

3 Sep 2015 - 2:11 pm | पैसा

सुंदर लेख आणि फोटो.

महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरूळशिवाय पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत; पण त्यांची माहिती नसल्याने फक्त पारंपरिक अजिंठा-वेरूळच्या लेण्या, दौलताबादचा किल्ला आणि शहरातील पाणचक्की, बिबी का मकबरा पाहिल्यावर पर्यटक औरंगाबादहून परततात. अनेकदा त्याव्यतिरिक्तच्या लेण्यांचा आणि पर्यटनस्थळांचा उल्लेख आल्यावर बाहेरचे पर्यटक स्थानिक लोकांशी संपर्क साधून "ते अमुक अमुक कुठे आहे? आमचे पाहायचे राहून गेले', "कसे जाता येईल?', "अरे, तिथपर्यंत गेलो होतो, अगदी जवळच होते रे...' असे म्हणताना दिसतात. असे अनेकदा निराश व्हावे लागते.
काय आहे पहाण्यासारखे?
औरंगाबादला पर्यटन करण्यासाठी येताना पर्यटकांना अजिंठा-वेरूळ या दोन ठिकाणची बऱ्यापैकी माहिती असते. त्यामुळे तेवढ्याच गोष्टींसाठी हे पर्यटक औरंगाबादला येतात आणि दोन दिवसांचा दौरा करून परततात. फक्त माहीतगार पर्यटकच उपेक्षित आणि दुर्लक्षित पर्यटनस्थळांपर्यंत पोचून पर्यटनाचा आनंद मिळवून देऊ शकतात. ही स्थळे पर्यटनाच्या नकाशावर असूनही तिथली व्यवस्थित माहिती नसल्याने पर्यटक तिथे पोचत नाहीत. औरंगाबादचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले, तर अजिंठा-वेरूळच्या लेण्यांशिवाय दौलताबादचा किल्ला, शहरात पाणचक्की, बिबी का मकबरा ही माहीत असणारी पर्यटन स्थळे आहेत. त्याशिवाय पाहण्यासारखे आणि पर्यटनाचा आनंद देऊ शकतील, अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यामध्ये औरंगाबादच्या लेण्या, शूलिभंजन, म्हैसमाळ, गौताळा, पितळखोरा, घटोत्कच, बनोटी, मुर्डेश्वर, घाटनांद्रा येथील लेण्यांचा समावेश होते.
कोणता महिना पर्यटनासाठी योग्य?
उन्हातान्हात होरपळण्याऐवजी थंडीत म्हणजेच सप्टेंबर ते फेब्रुवारी हे सहा महिने पर्यटनासाठी जास्त चांगले असतात. वातावरण थंड असते, उन्हाचा तेवढा तडाखा जाणवत नसतो. त्यामुळे सुटीच्या दृष्टीने विचार केला, तर दिवाळीची सुटी किंवा नाताळच्या सुटीचा काळ औरंगाबादेत पर्यटनासाठी जास्त चांगला असतो. फक्त पर्यटनस्थळे पाहण्यासाठीच लोक येतात असे नाही. तर पर्यटनाच्या सोबतच "फूड सफारी' व्हावी, अशीही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे या काळात शाकाहार आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी अशी चांगली खवय्येगिरी करण्याची ठिकाणेही आहेत. त्यामुळे येण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांतले चार किंवा पाच दिवसांचे नियोजन करून औरंगाबादला पर्यटनासाठी यावे, असाच खास मराठवाडी आग्रह असतो.
वेरूळ लेण्यांच्या परिसरातील स्पॉट
औरंगाबादला चार किंवा पाच दिवस राहून पाहण्यासारखे काय आहे, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. पण एका दिवसात वेरूळ, दुसऱ्या दिवशी अजिंठा, तिसऱ्या दिवशी औरंगाबादेत शॉपिंग करता करता लोकल स्पॉट पाहून परतता येईल. मग चौथा दिवस आणि पाचवा दिवस कशासाठी, असा प्रश्‍न असेल, तर वेरूळ लेण्यांपुरते पर्यटन करण्याऐवजी वेरूळला जाताना दौलताबादच्या किल्ल्याला भेट देता येईल. तसेच पुढे गेल्यानंतर खुलताबाद गावात मोगल बादशहा औरंगजेबाची कबर पाहण्यासारखी आहे. औरंगजेब स्वतः बादशहा असतानाही टोप्या विणत असे. त्यांच्या कमाईतून जी रक्कम शिल्लक राहिली होती, त्या रकमेतून ही कबर बांधण्यात आली आहे. बादशाह औरंगजेबाची मूळ कबर त्यामुळे अत्यंत साधी आहे. त्यावर छत नाही.
बाग बनी बेगम
खुलताबादचा परिसर हा सूफी संप्रदायाचे वास्तव्य असणारा परिसर आहे. याच परिसरात "हजरत जर जरी जर बक्‍श रहेमतुल्लाह' यांचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या उरुसासाठी जगभरातून सूफी संप्रदायातील लोक श्रद्धेने येतात. या दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक दरवाजा आहे. त्या दरवाजात प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या "पाकिजा' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटातील काही दृश्‍ये खुलताबाद शहरात प्रवेश करताना लागणाऱ्या "बाग बनी बेगम'मध्ये चित्रित करण्यात आली होती. मुगल पद्धतीची ही बाग रस्त्याच्या बाजूला असूनही पर्यटकांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. या दर्ग्याच्या परिसरात अभिषेक बच्चन आणि करिना कपूर यांच्या "रेफ्युजी' चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.
वेरूळच्या लेण्या
स्वतःचे वाहन असल्यास खुलताबादहून वेरूळला अगदी 15 मिनिटांत पोचता येते. पण स्वतःचे वाहन नसेल आणि गिर्यारोहणाचा आनंद घेत वेरूळच्या लेण्या पाहायच्या असतील, तर तोही मार्ग उपलब्ध आहे. दर्गा पाहिल्यानंतर तेथूनच खुलताबादच्या शासकीय विश्रामगृहाकडे जाण्याचा मार्ग विचारला तर पायी अंतरावर ते आहे. त्या विश्रामगृहातून वेरूळ लेण्यांकडे जाण्यासाठी घाटरस्ता आहे. वळणावळणाच्या या रस्त्यावरून जाणारी वाहनेही पाहण्यासारखी असतात. तेथून पाऊलवाटेने कैलास लेणे वरून पाहू शकतो. कैलास लेण्याला "आधी कळस मग पाया बांधला' असे म्हटले जाते. त्यामुळे तो कळस पाहण्यासाठी हा मार्ग योग्य आहे. तेथून टॉप व्ह्यूने आपल्याला ते मंदिर कसे बांधले असेल, याचा अंदाज येऊ शकतो. हाही माहीत नसणारा मार्ग आहे. या मार्गावरून वेरूळचे दोन्ही प्रसिद्ध पाण्याचे धबधबेही पाहायला मिळतात. पण त्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांतच यायला पाहिजे. वेरूळमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेण्या आहेत.
शूलिभंजन आणि म्हैसमाळ
वेरूळ लेणी पाहिल्यानंतर जो थकवा येतो तो घालविण्यासाठीची थंड हवेची दोन ठिकाणे याच खुलताबादच्या परिसरात आहेत. खुलताबादच्या दर्ग्याच्या समोरचा रस्ता म्हैसमाळला जातो. तिथे बालाजी मंदिर आणि टेकडीवरून खाली उतरल्यावर काही अधुरी शिल्पे असणारी गोरक्षनाथाची लेणी आहेत, तर औरंगाबाद वेरूळ मार्गावर खुलताबाद गावात न जाता, जो बायपास आहे त्या मार्गावरून शूलिभंजनला जाण्यासाठी मार्ग आहे. तिथे दत्ताचे मंदिर आहे. सूर्यकुंड आहे. हा परिसरही पर्यटकांच्या दृष्टीने उपेक्षित आहे.
वेरूळच्या पुढेही पाहण्यासारखी स्थळे
औरंगाबाद-कन्नड मार्गावर वेरूळची लेणी आहेत. त्याच्यापुढे कन्नडपर्यंत गेल्यानंतर तेथून गौताळा अभयारण्य आणि पितळखोरा लेण्यांकडे जाता येते. पण त्यासाठी स्वतंत्र एक दिवस आपल्याकडे हवा. कन्नड गावातून पुढे चाळीसगावाकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावरून उजवीकडे वळल्यावर गौताळा अभयारण्यात जाता येते. तिथेही काही आधी-अधुरी लेणी आहेत. गौतम ऋषींचे वास्तव्य या परिसरात होते. त्यामुळे त्याला गौताळा असे नाव देण्यात आले आहे. या अभयारण्यात नील गाय, माकडे, तरस, बिबटे आहेत, पण त्यांना बघण्यासाठी या जंगलात राहावे लागते. त्यासाठी औरंगाबाद येथील वन खात्याच्या वन्य जीव विभागाची परवानगी घ्यावी लागते. रात्री जंगलातील वन्य जीव पाहण्यासाठी पाणवठ्यांच्या ठिकाणी मचाणीही तयार आहेत.
पितळखोरा
ही लेणी वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्यांच्या पूर्वीची आहेत. पितळखोऱ्याला जाताना वाटेत काली मठ आहे. तेथील मंदिरही पाहण्यासारखे आहे. तेथून काही अंतर पायी गेल्यानंतर पाटणादेवीकडे जाता येते. तेथील एकवीरा देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. पण या सगळ्या परिसरात फिरण्यासाठी स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे. या परिसरात पावसाळ्यातही चांगले पर्यटन करता येते. म्हणजे वेरूळ आणि हा सगळा परिसर पाहण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळेच औरंगाबादचा परिसर पाहण्यासाठी चार किंवा पाच दिवस लागतातच.
अजिंठा लेणी आणि परिसर
अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी औरंगाबाद-जळगाव मार्गाने जावे लागते. स्वतःचे वाहन असेल तर वाटेत सारोळ्याच्या जंगलाला भेट देता येते. निसर्गरम्य वातावरण आणि शहराच्या लगतच असणारे दाट जंगल तेथे आहे. तेथून सिल्लोड गाव ओलांडल्यानंतर लागते ती "पारोची कबर'. ही कबर म्हणजे कविवर्य ना. धों. महानोर यांनी लिहिलेल्या "अजिंठा' चित्रपटाची नायिका पारो... तिची ही कबर आहे. ज्या व्ह्यू पॉइंटवरून पारोने रॉबर्टला अजिंठ्याची लेणी दाखविली, तो व्ह्यू पॉइंटही पाहण्यासारखा आहे. तेथून थेट लेण्यांपर्यंत पायी चालत जाता येते. हा परिसर पायी पाहण्यासारखाच आहे. अजिंठ्याच्या प्रत्येक लेणीमध्ये एक कथा आहे. ती कथा समजल्याशिवाय या लेण्यांच्या पर्यटनाचा आनंद घेताच येत नाही.
पाच दिवसांचे नियोजन
पहिला दिवस ः औरंगाबादमधून वेरूळकडे, सकाळीच दौलताबाद किल्ला. त्यानंतर खुलताबाद करून वेरूळच्या लेण्यांसाठी राखीव. लेण्या पाहिल्यानंतर संध्याकाळ एक तर म्हैसमाळ किंवा शूलिभंजनला घालविता येईल. मुक्कामासाठी वेरूळला एमटीडीसीचे रिसॉर्ट किंवा काही खासगी लॉजही उपलब्ध.
दुसरा दिवस ः कन्नडकडे प्रयाण. तेथून गौताळा अभयारण्य करून दुपारी पितळखोरा करून पाटणादेवी पाहून रात्री मुक्कामी औरंगाबादला.
तिसरा दिवस ः अजिंठा लेण्यांकडे प्रयाण. जाताना सकाळीच व्ह्यू पॉइंट आणि पारोची कबर पाहून लेण्यांसाठी संपूर्ण दिवस देता येतो. रात्री अजिंठा गावात किंवा मुक्कामी औरंगाबादला येणे शक्‍य.
चौथा दिवस ः पैठण आणि परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठीचा आनंद घेता येतो.
पाचवा दिवस ः स्थानिक पर्यटन स्थळे आणि शॉपिंग करून परत आपल्या गावी जाता येते.

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 4:51 pm | सौंदाळा

अप्रतिम माहिती.
संपादक मंडळ : हा प्रतिसाद वेगळा धागा म्हणुन काढता आला तर बेष्ट काम होईल.

पामर's picture

3 Sep 2015 - 5:05 pm | पामर

फोटो अप्रतिम आलेत बर का! ह्यात माझी थोडी भर घालतो..वर तुम्ही ज्या बैल व सिंहाच्या शिल्पाला शिवाचे म्हणले आहे ते सुर्यवंशी राजा दिलीपचे आहे.राजा दिलीपला मुल होत नव्हते,त्यावर उपाय म्हणुन त्याने राजगुरु वशिष्ठांच्या आश्रमात असलेल्या कामधेनु व तिची मुलगी नंदिनीची २० दिवस सेवा केली.त्यांना एके दिवशी राजा चरायला घेउन गेला असताना तिथे शिवानी पाठवलेला एक सिंह आला व त्याने गायींवर हल्ला केला.खुप लढुनही तो सिंह हार जात नाही अस बघितल्यावर राजानी 'नंदिनी ऐवजी मला खा' अस म्हणुन त्याच्या समोर गुड्घे टेकले. राजाचा हा त्याग बघुन कामधेनु ने त्याला पुत्र प्राप्तीचा वर दिला.वराच्या फलानी राजाला एक पुत्र झाला ज्याचे नाव राजानी 'रघु' ठेवले.ह्याच्याच वंशात पुढे अज्,दशरथ्,श्रीराम आदी राजे झाले.

ही कथा रघुवंशातिल फार प्रसिद्ध कथा आहे.बाकि सर्व शिल्प अप्रतिम!

प्रचेतस's picture

3 Sep 2015 - 5:55 pm | प्रचेतस

ओह्हो.
ही कथा अजिबातच माहीत नव्हती. वाल्मिकिरामायणात ती नाहीच.

माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

4 Sep 2015 - 9:14 am | प्रीत-मोहर

ही कथा कालिदास रचित रघुवंशातील आहे अस वाटत