अंगूरी बासुंदी- रसमलाई !

खेडूत's picture
खेडूत in पाककृती
12 May 2015 - 7:23 pm

रसमलाईची पहिली ओळख झाली ती १९९४ च्या पहिल्या कोलकाता भेटीत. ईडन गार्डन स्टेडीयम जवळ के सी दास नावाचे मिठाईचे प्रसिद्ध दुकान आहे. रोज सकाळी तिथे एकदोन प्रकारच्या वेगळ्या मिठाया आणि त्यावर मिष्टी दोही असा ब्रेकफास्ट करून मग कामाला बाहेर पडायचे असा तिथला अलिखित नियम आहे. तिथल्या लक्षात राहिलेल्या मिठायांपैकी सर्वात वरती आहे रोसमलाई! त्याकाळी महाराष्ट्रात ही आताच्या इतकी रुळली नव्हती. चौधरी आणि बिकानेर नामक दुकाने अजून आली नव्हती.

दुकानातून नेहमी आणली जाणारी अंगूरी बासुंदी एकदा घरी करून पहावी असं बरेच दिवस मनात होतं. गेल्या वर्षी दिवाळीला परदेशात असल्याने 'करून तर बघू' म्हणून केली आणि जमली पण झकास! मुळात चवीनं खाण्याची आवड असेल पदार्थ करायला जमतोच, असा निष्कर्ष काढला. पाक चुकेल याची धास्ती होती पण सौ. खेडूत यांनी सांगितलेले साखर-पाणी प्रमाण वापरले. नेटावर जरा शोधले आणि कृती समजली . . ! मिपावरसुद्धा सापडली. एक नाही तर दोन तीन ! पण फोटू नुसतेच टाकण्याऐवजी थोडी कृती पण लिहीली आहे. गोड मानून घ्यालच!

साहित्य:
दूध, साखर, लिंबू, बदाम, केशर, वेलची, गाळणी, कढई , पातेले, मोठा बाउल, पंचाचे कापड,

कृती:
प्रथम दोन लिटर दूध उकळून घ्यावे, गरम असतानाच त्यात अर्धे लिंबू पिळावे. ढवळावे. दोन-तीन मिनिटांत दूध चांगले नासल्यावर खळखळ उकळू द्यावे. नंतर दूध उतरवून थोडे थंड होऊ द्यावे. आता गाळणीने गाळून पाणी काढून टाकावे. आता ही पनीरसदृश मलाई स्वच्छ कापडातून दाबून काढली आणि त्यातले पाणी पूर्ण निघून गेल्यावर आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे केले. त्यानुसार त्याला अंगूरी बासुंदी म्हणायचे का रसमलाई (काय फरक पडतो? ) हे ठरवता येते. मी अंगूरीच बरी असे म्हणून छोटे गोळे केले.

नंतर हे गोळे उकळण्यासाठी साधारण ७५० मि. लि. (तीन कप किंवा कॉफी मग्ज असतील तर दोनच ) पाण्यात दीडशे ग्रॅम साखरेचे मिश्रण करावे. ते उकळायला लागल्यावर आधी केलेले अंगूर त्यात उकळायला टाकावेत. झाकण ठेवून ३० मिनिटे वाट पहायची. हे सुरु असतांना एकीकडे मोबाइल अथवा अन्य कशावर तरी सुंदर गाणी लावावीत!

हो, पण त्या तीस मिनिटांत अजून एक लिटर दूध घेऊन आटवायला ठेवावं. कारण शेवटी बासुंदीच तर लागणार आहे!
तर असे तीस मिनिटे हे गोळे पाकात ठेवले, की साखर त्यात मस्त मुरते. मग हे गोळे काढून तयार झालेल्या बासुंदीत अलगद सोडावेत. मग त्यात वेलदोडे आणि बदामाचे काप, केशर टाकले, की झाली आपली डिश तयार ! !
फ्रीज मध्ये ठेवली तर तीन-चार दिवस टिकते म्हणे! पण छान झाल्यामुळे त्याच दिवशी संपली!

प्रकाशचित्रांमध्ये पाककृतीच्या विविध पायऱ्या कृतीच्याच क्रमाने :

१.
a

२.
b

३.
c

४.
d

५.
e

६.
f

७.
G

८.
H

९.
J

मग काय ! अजून करून पहिली नसेल तर करा सुरुवात ! :)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 May 2015 - 7:28 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

श्रीरंग_जोशी's picture

12 May 2015 - 7:52 pm | श्रीरंग_जोशी

अंगुरमलाई मला खूपच आवडते.
पुण्यात असताना सातारा रस्त्यावरील पद्मावती कॉर्नरजवळ बिकानेर स्वीट्समधून बरेचदा आणली जायची :-) .

चित्रे अन तपशीलवार कृती आवडली. शेवटचे तीन फटु पाहून तर तोंडाला पाणी सुटले.

विशाखा राऊत's picture

12 May 2015 - 7:54 pm | विशाखा राऊत

मस्तच

ईश्वरसर्वसाक्षी's picture

12 May 2015 - 8:24 pm | ईश्वरसर्वसाक्षी

बासुंदि नासणार तर नाहि ना? हा पदार्थ विकत आणुन खाल्लाय, पण जर नासलेल्या दुधाचे गोळे त्यात टाकले तर
दुध नासायचि भिति असते. तुम्हि केलेली रसमलाइ मस्त झालिय आणि फोटो पण जबरा आलेय.

द-बाहुबली's picture

12 May 2015 - 8:42 pm | द-बाहुबली

कातिल...!

पैसा's picture

12 May 2015 - 8:59 pm | पैसा

सादरीकरण, पाकृ सगळं कसलं सुंदर आहे!

तुम्ही स्वत: घरी केली आहे म्हणून उत्तम झाली आहे कारण खय्रा बासुंदीत पनीरचे गोळे सोडले आहेत. लग्न कार्यात एक पातेलंभर ठेवलेला "अंगुरी बासुंदी"नावाचा प्रकार कोणी खाल्ला असेल तो आयुष्यात कधी खाणार नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2015 - 7:47 am | अत्रुप्त आत्मा

+++++११११११ अत्यंत सहमत !
ही जितकी 1नंबरी झाल्ये,तश्या मंगल कार्या लयात नसतात. ते फ़क्त गोग्गोड ग्गार दुधात सोडलेले पांढय्रा थर्माकोलचे गोळे!

रेवती's picture

13 May 2015 - 7:31 pm | रेवती

अग्ग्गग्ग! काय वर्णन!

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

=)) खर्रच! मेस मधला सोडा मारलेला बचव भात जसा किसलेल्या थर्माकोल सारखा ,तसेच हे! :-D

सानिकास्वप्निल's picture

12 May 2015 - 9:28 pm | सानिकास्वप्निल

मस्तं दिसतेय अंगुर रासमलाई, फोटो पण सुरेख आहे :)
मी फक्त गोळे करताना खडीसाखर घालते त्याने रसगुल्ले / रसमलाई पोकळ व हलके होतात.

रुपी's picture

13 May 2015 - 12:34 am | रुपी

छान!

सुहास झेले's picture

13 May 2015 - 12:43 am | सुहास झेले

खल्लास... मस्तच पाककृती :)

छान दिसतायत बासुंदी गोळे!
कलकत्ता व नागपूर या ठिकाणचे बरेच काही ऐकून आहे.
जायला हवे असे नुसते वाटते.
कधी जमणार देवाला ठाऊक!

कंजूस's picture

13 May 2015 - 8:18 am | कंजूस

एक सिक्रेट:पनीरचे गोळे वळतांना त्यात १ )अॅरोरूट, २) बटाटा सत्व ,३)कॅार्न फ्लाउर मक्याचं पीठ ,४)मैदा टाकून वळल्यास गोळे फुटत नाहीत .लुसलुशित राहण्यासाठी नंबर १ उत्तम.

लग्नकार्यालयवाले थोड्या दुधास कस्टर्ड पाउडर लावून बासुंदी बनवतात.

रसगुल्ले , रसमलाइ ,छेनापुरी,संदेश हे सर्व पनीरचे पदार्थ ओडिशातून बंगाल्यांनी ढापले.

रसगुल्ले , रसमलाइ ,छेनापुरी,संदेश हे सर्व पनीरचे पदार्थ ओडिशातून बंगाल्यांनी ढापले.

करेक्ट...!!! आणि असे ढापले, की आता सगळं जग त्यांना बंगाली पदार्थच समजतं..!

इशा१२३'s picture

13 May 2015 - 9:14 am | इशा१२३

मस्त दिसतेय रसमलई!

इशा१२३'s picture

13 May 2015 - 9:14 am | इशा१२३

मस्त दिसतेय रसमलई!

नूतन सावंत's picture

13 May 2015 - 10:21 am | नूतन सावंत

सुरेख. मीही सानिकासारखेच करते.कारणही तेच.

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 10:37 am | विशाल कुलकर्णी

यम्मी....

छान दिसतेय अंगूर बासुंदी!

ते रसगुल्ले साखरेच्या पाकात सोडल्यावर ३० मि. झाकण लावून ठेवायचे असे तुम्ही लिहिले आहे, त्यावेळी पाकाखालचा गॅस चालू ठेवायचा की बंद करायचा?
आणि बासुंडी आटवताना त्यात साखर घालायची की नाही?

रेवती's picture

13 May 2015 - 7:34 pm | रेवती

दोन्हीचेही उत्तर हो.
पाकात गोळे खळाखळा उकळणे, बासूंदी होत आल्यावर साखर घालायची व पुन्हा आटवायचे.

पाकात गोळे खळाखळा उकळणे

खळाखळा नको, मध्यम असू दे आच.

आइ ग्ग कसल भारी दिसतय, करुन पाहनार न्क्क्की ! पन २ ली दुध नासवुन जमली नाही तर काय काय ऐकावे लागेल हा विचार करुन गप्प बसते सध्या :)

नितिन५८८'s picture

13 May 2015 - 11:50 am | नितिन५८८

पाकातले गोळे म्हणजे रसगुल्ला आणी तेच पाकातले गोळे बासुंदी मध्ये मिक्स केले कि अंगूर बासुंदी- रसमलाई.
मस्तच एकदम झकास……।

रायनची आई's picture

13 May 2015 - 12:04 pm | रायनची आई

शेवटचे ३ फोटो तर क्लासिक आले आहेत..सरळ खायला सुरूवात करावी अस वाटतय :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 May 2015 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण आता स्वयंपाक घरामधून जरा बाहेर निघा आणि गॅरेज मधे जा.
"चलती का नाम गाडी" चे पुढचे भाग लिहा बर पटापट.

पैजारबुवा,

कपिलमुनी's picture

13 May 2015 - 2:21 pm | कपिलमुनी

प्रेझेम्तेशन सुंदर

स्वप्नांची राणी's picture

13 May 2015 - 8:07 pm | स्वप्नांची राणी

३००+ चे पोटेन्शियल नसल्यामुळे धागा पाहिला नाही.....रसमलाई तर मला मुळ्ळीच आवडत नाही... Radubaai

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !

@ ईश्वरसर्वसाक्षी: नाही नासत - का माहीत नाही , पण चोथा कोरडा करून पुन्हा गोळे साखरेत उकळलेले असल्याने, त्याचा मूळचा गुणधर्म बदलत असेल. आणि गार झालेल्या बासुंदीला नंतर ते टाकल्याने फरक पडत नसेल.

@ सानिकातै : धन्यवाद -पुढच्या वेळी हे करून पहातो. पण खडीसाखरेची पावडर करून मिसळायची का?

@ हसरी: बारीक निरीक्षण..! :)
गॅस बारीक चालूच ठेवायचा . चित्र ५ आणि ६ मधला फरक त्यामुळेच होणार आहे .

वरती रेवती यांनी म्हटल्याप्रमाणे साखर आधी घातली तरी चालते . मी थोडे वेगळे केले. आटवत असताना साखर न घालता नंतर घातली. आधी घातल्यास दूध पात्तळ होऊन आटवण्याचा वेळ वाढतो . शिवाय दुधाच्या नैसर्गिक गोडीमुळे कमी साखर पुरते. नंतर हवी तशी गोडी अडजेस्ट करता येते .
हे मी गुज्जू चहावाल्याकडून ऐकलंय- मसाला दुधाच्या बाबतीत . मराठी अमृततुल्यवाले चहात आधी साखर घालतात. गुजराथी चहावाले चहा गाळून नंतर साखर टाकून पुन्हा चहा उकळतात! :) (चोथ्याला लागून साखर वाया जाऊ नये हाही त्यांचा उद्देश असतो म्हणे )

@ पैजारबुवा: होय - तेही आता मनावर घेतो ! :)

gogglya's picture

14 May 2015 - 12:36 pm | gogglya

खडा मध्यभागी ठेऊन गोळे बनवायचे...

सानिकास्वप्निल's picture

14 May 2015 - 12:41 pm | सानिकास्वप्निल

पावडर नाही खडीसाखर अख्खी पनीरमध्ये ठेवून गोळे वळायचे :)

दिपक.कुवेत's picture

13 May 2015 - 8:11 pm | दिपक.कुवेत

मस्त पाकॄ.

कविता१९७८'s picture

13 May 2015 - 9:45 pm | कविता१९७८

माझी फेव्हरेट स्वीट डीश

उगा काहितरीच's picture

14 May 2015 - 9:54 am | उगा काहितरीच

खलास!

विवेकपटाईत's picture

14 May 2015 - 10:05 am | विवेकपटाईत

अशी मिठाई खायची असेल तर दिल्लीत उत्तम मिळते. नागपूर मध्ये लग्नात मी अंगूरी बासुंदी खाल्ली आहे, विशेष चांगली कधीच लागली नाही. बाकी तोंडात पाणी आले.

स्वाती२'s picture

14 May 2015 - 10:28 pm | स्वाती२

मस्तच!

दूध फाडून केलेल्या छान्याचे चपटे गोल करायचे. कूकरच्या डब्यात साखर पाणी घेवून त्यात हे गोळे ठेवायचे. डबा कूकरमध्ये ठेवून कूकरच्या ३ शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करुन प्रेशर गेल्यावर डबा बाहेर काढायचा. गोळे तळहातावर थोडे दाबून जास्तीचा पाक काढून टाकायचा आणि ते गोळे बासुंदीत सोडायचे. त्या पाकाचा मग सुधारस करायचा.