रतीब

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 3:26 am

उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची.

आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती. त्यांच आणि खालच्या वाडीतल्या भाऊंच रान शेजारी शेजारी होत. दोन रानांच्या मध्ये बांध होता आणि बांधाच्या जरा अलीकड पाट काढलेला होता. धुण्याच घमेल खाली ठेऊन तिन पाटाच पाणी सुरु केल. जरा हातापायावर गार पाणी मारून तिन आजूबाजूला नजर टाकली. पेरणीसाठी रान तयार करण चालू होत. नांगरून झालेली रान छान आखीवरेखीव दिसत होती. शाळा सुरु व्हायच्या वेळी दिगुच्या नव्या वह्या असतात तशीच वाटली तिला ती जमीन. रानाच्या एका बाजूला खळ होत. चंद्री तिथ गवत वाढल होत ते चरत होती आणि दिगू मित्रांसोबत आज काय खेळायचं ते ठरवत होता. शांतान भराभर धुण धुतलं आणि ती घराकड जायला निघाली. तिन दिगुला हाक मारली, "दिगू ए दिगू, लांब जाऊ नग रे बाळा."

"व्हय व्हय" दिगुनही बेंबीच्या देठापासून ओरडून उत्तर दिल. शांता बांधावरन जात असताना तिच्या कानावर सगळी पोर दिगुला ए बाळा ए बाळा करून चिडवत असलेली तिला ऐकू आलं. तिच्या मनात आलं सुट्टी असली कि उधळतात नुसती मुलं, त्यापेक्षा शाळा बरी.

घरी येउन शांतान आधी धुण वाळत घातलं. तापलेल्या उन्हाने जीव कासावीस झाला होता तिचा. स्वैपाक घरात जाउन तिन डेर्यातल तांब्याभर पाणी घटा घटा पिल. छान छोटस कौलारू घर होत शांताच. मातीच असल्यान आत गेल कि गार वाटायचं. स्वैपाक घरात चूल होती आणि अगदी मोजकीच भांडी होती. स्वैपाक घराच्या बाजूला माजघर होत. तिथ धान्याच्या कोठ्या होत्या. कोठ्यांच्या मागे थोडी जागा होती आणि त्या जागेत शांतान देवघर मांडल होत. तिथच एक मोठी पेटी होती. त्यात शांता चुरमुरे फुटाणे असल काही बाही खायचं ठेवायची. आंबे उतरून आणले कि माजघरात एका बाजूला भरपूर चघाळ टाकून तिथे आंबे पिकत घालायचे. त्या दिवसात सगळ्या माजघरात आंब्याचा वास भरून राहायचा. माजघराच्या शेजारी गोठा होता. गोठ्यात दोन बैल आणि चंद्रीच रेडकू होत. घरासमोरच्या अंगणात मोठी मोठी झाड होती. त्यातल एक सगळ्यात मोठ झाड होत गुळभेंडीच. त्याच्या मोठ्या मोठ्या मुळ्या जमिनीतून वर आल्या होत्या आणि त्या झाडाची सावली अंगणभर पसरलेली असे. घरी कुणी आलं कि ती माणस ह्याच झाडाला टेकून विसावत. अंगणात दोन मोठे रांजण होते. त्यातल पाणी रोज विहिरीतून आणून भरलेल असायचं आणि शांता ते वरच्या कामाला वापरायची.

शांताचा नवरा सखा आज तालुक्याला गेला होता. तालुक्याच्या गावाला त्याची बहीण राहते. दरवर्षी ती मुलांना सुट्टी लागली कि गावी यायची आणि चार दिवस राहून मुलांना सुट्टीभर मामाकडे ठेऊन जायची. यंदा तिच्या सासुबाईंची तब्येत बरी न्हवती म्हणून तिन सखाला सांगावा पाठवला होता तूच येउन घेऊन जा मुलांना म्हणून. एक रात्र तिथच राहून सखा उद्या परत येणार होता. दिगुला येतो का विचारलं त्यान, पण दिगू नाही म्हणाला. आत्याच्या घरी दिगुला वेगळच वाटत. सगळ कस शिस्तीत असत तिथे. आत्याची मुलांशी मात्र त्याची चांगली गट्टी होती. ते दोघ लहान होते दिगुपेक्षा आणि त्यानाही मामाकडे राहायला आवडायचं. तिथ कितीही दंगा केला तरी चालायचा. मामी कधी हे करू नको ते करू नको म्हणून टोकायची नाही. शांतान जीव लावला होता मुलांना. उद्या सगळी आली की घर कस भरून जाइल शांता मनाशीच म्हणाली.

उन्ह आता कललि होती. दिगुचा आणि चंद्रीचा अजून काही पत्ता न्हवता. रोज एव्हाना दिगू चंद्रीला घेऊन परत आलेला असायचा. बैलांना वैरण घालून ति संध्याकाळ साठी जळण गोळा करू लागली. जळण आणून तिन चुलीजवळ नीट मांडून ठेवलं आणि दिगुला बोलवायला जाऊया म्हणून ती बाहेर आली तोच तिला रडत रडत येणारा दिगू दिसला.
चटकन पुढे होऊन तिन दिगुला आधी कुठे लागलय का पाहिलं आणि म्हणाली, "दिगू बाळा, काय झाल रे? रडतोस कशापायी? पडलास का कुठ? आणि चंद्रीला ठेऊन आलास व्हय?"
दिगून मान वळवून शर्टाच्या बाहीला नाक पुसलं आणि सुं सुं करतच म्हणाला, "आये चंद्री घावना झालीया कुटंच".
त्याच उत्तर ऐकून कपाळावर हात मारून घेत शांता म्हणाली, "आर आसल तिथच कुठतरी, यील तिची ती. जा तोंड धून ये. रडू नको उगी."
तसा दिगू म्हणाला, "न्हाय कुठच! लय हुडकली म्या आन संज्यान!"
तशी त्याला समजावत शांता म्हणाली. "बर रडू नको. तिकड भाऊंच्या रानाकड हाय का मी येते बगून."
"मी बी येतो संग" खरतर उन्हात भटकून आणि रडून रडून त्याचा चेहरा मलूल झाला होता म्हणून ती त्याला घरीच ठेऊन जाणार होती पण घरी अजूनच रडत बसेल म्हणून ती त्याला चल म्हणाली.

बांधावरून दोघ चंद्री चंद्री हाका मारत चालले होते. भाउंची सुमी पाटाच्या पाण्यात खेळत बसली होती. "सुमे आमची चंद्री दिसली का ग कुट? इकडच खळ्याच्या बाजूला चरत होती." शांतान विचारल.
उत्तरादाखल तिन नुसतीच नाही म्हणून मान हलवली आणि पुन्हा खेळण्यात गुंग झाली. चौफेर नजर टाकूनही चंद्री कुठे दिसत न्हवती. आता धार काढायची वेळ झाली होती. शांतेची पावलं लगबग पडत होती. बरच लांब येऊनही चंद्री कुठे दिसना म्हणल्यावर शांता माघारी फिरली. तिला वाटत होत चंद्री येउन उभी असल गोठ्यात. घरी पोचली तशी तिन गोठ्याकड धाव घेतली. पण चंद्री न्हवतीच आली. रेडकू आता अस्वस्थ होऊन गोल गिरक्या घेत होत. मधूनच हंबरत होत. भूक लागली आसल शांतान ओळखल.

आता काय करायचं विचार करत ती गुळभेंडीच्या झाडाखाली टेकली. चंद्री व्याय्ल्यावर तिन चार घरी रतीब सुरु केला होता. आता सगळ्यांना काय उत्तर द्यायचं. रतीबाची काहीतरी सोय केली पाहिजे या विचाराने शांता उठली. रेडकू तोवर हंबरून हंबरून हैराण झाल होत. "दिगू बाळा त्याला जरा गवात घाल रे. आणि बैलांना पाणी ठेव बाळा. मी नानीला विचारून येते रतीबाच".

नानीच घर जवळच होत. शांता पोचली तेव्हा त्यांच्या म्हशीची धार काढत होता म्हादा. शांतान हाक मारून नानीला बाहेर बोलावलं आणि म्हणाली,
"नानी आवो चंद्री चरायला न्हेलेली आलीच नाय घरी परत. आजच्या रतीबाचा घोटाळा झालाय बगा. आजच्या दिवसाचा तुमीच घाला कि माज्या पण चार घरी. उद्याच्याला हे आलं की परत देतो बगा पैसे."
नानीच वय झाल होत पण ती थकली न्हवती. हिंडून फिरून होती आणि जमेल तस घरात मदत करत होती.
"हं! तर आता मी बंगलाच काढनार हाय न्हाव तुझ्या पैक्यान बांधायला!" नानी ठसक्यात म्हणाली.
तशी शांता म्हाणाली, "आवो तस न्हाय पर ते बरोबर दिसत न्हाय. माज्या वेळेला तुमी येणार आन म्या तसच कस पैस घ्यायचं रतीबाच."
नानी समजावत म्हणाली, "असू दे पोरी, मला कधी लागल तर मी घीन कि तुज्याकडन मागून. अग पर कशी कुठ नेलीवतीस चंद्रीला".
"म्या कशाला घेऊन जाते तिला लांब. खळ्याच्या बाजूलाच सोडलीवती दिगुन. खेळायच्या नादात विसरल पोर. कुठ गेली आसल कुणास ठाऊक?"
"आग यील परत तिची ती. नको जिवाला लावून घेऊ. रेडकू हाय न्हव घरीच. पान्हा फुटला कि यील तिची ती."
"बर मी येते नानी दिगू एकलाच हाय घरी. आता कुठ रडायचं थांबलाय. लय मनाला लावून घेतलं त्यान."
"पोराची जात, नकळत हाय ते. तू कावली न्हाइस न्हव"
"न्हाय न्हाय म्या कावले. बर येते बगा मी. रतीबाच तेवढ बघा बर का" अस म्हणून घाई घाईत शांता उठली आणि झपझप चालत घरी आली. सखा असता तर त्यान जंग जंग पछाडल आसत पण चंद्रीला शोधून काढल असत तिच्या मनात आल.

तिन्हीसांजेच्या वेळेला उदास बसायला नको म्हणून तिन रांजनातन पाणी काढून चूळ भरली, हात पाय धुतले आणि देवासमोर दिवा लावून आली. माजघरातल्या देवळीत कंदील लावून ठेवला. स्वैपाकघरात जाउन तिन आता पोराला भूक लागली आसल म्हणून भाकरी करायला घेतली. चुलीत जाळ पेटला आणि शांता पीठ मळू लागली. कुठ गेली आसल आणि अजून कुठ शोधायची चंद्रीला हाच विचार चालला होता तिच्या मनात. बाहेर रेडकू आता दमून शांत बसल होत आणि दिगू झाडाखाली मातीत रेघोट्या ओढत बसला होता. आता उद्या बा आल्यावर आपल्याला चांगला चोप बसणार या भितीन तो आता शांत बसला होता.

शांताने एक भाकरी तव्यात टाकली होती तोवर बाहेरून दिगू ओरडला, "आये ते बग आपली चंद्री."
शांता चुलीतला जाळ कमी करून बाहेर आली तर तिला भाऊ आणि सुमी चंद्रीला घेऊन येताना दिसले. भाउनि चंद्रीची दोरी धरली होती आणि सुमी त्या दोघांच्या पुढे पळत होती. चंद्रीच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज येवू लागला तशी रेडकू उठून उभ राहील आणि हंबरू लागल.

भाऊ जवळ आले तसे शांतान डोक्यावरचा पदर सरळ करत विचारलं, "भाऊ कुठ घावली ओ चंद्री तुमाला"
"आओ तुमी गेलासा शोधून आन सुमी घरला आल्यावर म्हणाली दिगुची चंद्री हरवली. आन मला दिस्लीवती चंद्री गावाकड जायच्या रस्त्यावर. मला वाटल दिगू खेळत आसल जवळ कुठतरी म्हणून म्या काय लक्ष दिल न्हाय.. आता घरी आलो तवा सुमीन सांगितलं तुमी शोधत फिरतायसा म्हणून. मग म्हणल परत बघून याव त्या रस्त्यावर तर तिथच झाडाखाली बसलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर काटा रुतलाय न्हव पायात. पाय दुखला आसल चालताना म्हणून बसली तिथच. काटा काढला बगा तिच्या पायातला आन फडक बांधून आणली बगा हळू हळू."

शांतान भाऊंच्या हातातून दोरी घेऊन चंद्रीला गोठ्यात बांधली आणि म्हणाली "लय बर केल बगा भाऊ. हे गेल्यात तालुक्याला आन म्या एकटी कुठ कुठ शोधणार. थांबा जरा चहा पिउन जावा." "नग नग, आता चहा बी काय नग. उशीर झालाय. घरी समदी थांबलीत जेवायची." अस म्हणून भाऊ परत जायला निघाले. आली तशीच सुमी त्यांच्या पुढे पुढे पळत घरी निघाली. तेवढ्या वेळात दिगुची चंद्रीला बघून कळी खुलली होती. शांतान चंद्रीच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हणाली, "तुज लेकरू भुकेल हाय आज. आशी जात जावू नगुस माझी बाय."

शांतान रेडकू सोडलं आणि त्यान चंद्रीकड धाव घेतली. रेडकू दूध प्यायला लागल तशी शांता आत जात दिगुला म्हणाली, "पिऊ दे बाळा आज त्याला. आज काय रतीब न्हाय घालायचा."

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

कथा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

8 May 2015 - 3:39 am | बहुगुणी

भाषा खूप आवडली. (गुळभेंडीचं झाड म्हणजे कुठलं?)

रातराणी's picture

8 May 2015 - 3:47 am | रातराणी

धन्यवाद! मला पण त्या झाडाच औपचारिक नाव माहित नाही. लहानपणी गावी गेल्यावर हेच ऐकल होत आजीच्या तोंडून.

'गुळभेंडी' हा हुरड्याच्या ज्वारीचा प्रकार असावा असं या शोधावरून वाटलं, माझं शेतीविषयक ज्ञान शून्याच्या आसपासच आहे, पण या दुव्यातली माहिती खरी असेल तर ते 'टेकून बसावं असं झाड' नसावं कदाचित. पण हे सगळं अवांतर, तुमच्या उत्तम कथालेखनात त्याने कुठेही न्यून येत नाही, केवळ नवीन शब्दाविषयीचं कुतूहल म्हणून विचारलं इतकंच. किंबहुना तुमच्यामुळे हा नवीन शब्द कळला त्याबद्दल आभार.

रुपी's picture

8 May 2015 - 4:27 am | रुपी

गुळभेंडी हा ज्वारीचा प्रकार आहे. हा हुरडा चवीला खूप छान लागतो. नगरच्या पांजरापोळमध्ये मिळणारा हुरडा याच जातीतला असतो. त्यामुळे माहिती खरीच आहे. अर्थात लेखातला संदर्भ वेगळा आहे..

रातराणी's picture

8 May 2015 - 5:13 am | रातराणी

माझ्या झाडाचे नाव ऐकण्यात किंवा समजण्यात चूक झालेली दिसते.
दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद! तिथे पिंपळ किंवा तत्सम झाडाचे नाव टाकून दुरुस्त करता येईल.

तुमची चूक नाहीये हो रातराणी, गूळभेंडीची झाडे तशी जास्त पहायला मिळत नाहीत बहुदा पण ती सातार्‍याच्या बाजूला पाहिली आहेत. सर्वसाधारण पिंपरण (वड आणि पिंपळाच्या मधला प्रकार, कदाचित वडाच्या फॅमिलीत येत असेल. ) या झाडाच्या आकाराचे झाड आणि भोवर्‍यासारखी फळे, हे त्याचे वैशिष्ठय. आम्ही भोवरा करुन खेळायचो म्हणून झाड पण लक्षात आहे. झाडाचे इतर भाषेतील अथवा शास्त्रीय नाव ठाऊक नाही.

ज्वारीच्या प्रजातीसही नाव आहे पण झाडदेखील आहेच तेव्हा बदल नाही केलात तरी चालेल.

रातराणी's picture

12 May 2015 - 12:48 am | रातराणी

thank you so much!! खरोखर त्याची भोवर्यासारखी अंगणभर पडलेली फळे पाहिली आहेत! पण मला तेवढा confidence नाहीये माझ्या ज्ञानावर म्हणून आधीच पांढर निशाण फडकवल :)

रेवती's picture

8 May 2015 - 4:41 am | रेवती

कथा आवडली.

फारच सुंदर लिहिली आहे कथा. अशी गाय स्वतःहून परत येण्याची कथा वाचली आहे आधीही, पण तुमची शैली आणि एकंदरीत वातावरणनिर्मीती फारच आवडली.

फक्त तेवढे अनुस्वार नसलेले खटकले.. "हलक झाल होत " या ऐवजी "हलकं झालं होतं" असं पाहिजे. असे खूपच शब्द आहेत यात :(

शिवोऽहम्'s picture

8 May 2015 - 6:23 am | शिवोऽहम्

छान लिहिलंय! तुमची लिहिण्याची शैली फार ओघवती आहे.

एक एकटा एकटाच's picture

8 May 2015 - 9:47 am | एक एकटा एकटाच

आवडली कथा

सस्नेह's picture

8 May 2015 - 11:04 am | सस्नेह

गावाकडच्या बोलीतली साधीसुधी गोष्ट आवडली.

एस's picture

8 May 2015 - 2:48 pm | एस

खूप छान!

भावना कल्लोळ's picture

8 May 2015 - 3:30 pm | भावना कल्लोळ

कथा छानच … आवडली.

अनुप ढेरे's picture

8 May 2015 - 3:46 pm | अनुप ढेरे

आवडली गोष्ट!

स्पा's picture

8 May 2015 - 3:53 pm | स्पा

खुप मस्त,

शेवट गोड झाला की बरं वाटतं

शेवट गोड झाला की बरं वाटतं

+१

बॅटमॅन's picture

11 May 2015 - 5:46 pm | बॅटमॅन

लयी न्हाई मागणं!

कपिलमुनी's picture

8 May 2015 - 7:45 pm | कपिलमुनी

कथा छान आहे.
ग्रामीण भागामधील वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. थोडी नाट्यमयता हवी होती असे वाटते.
पुलेशु

रातराणी's picture

9 May 2015 - 12:07 am | रातराणी

सर्वांचे आभार!

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2015 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा

खूप छान!
शेवट बरच काही सांगुन गेला.

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2015 - 1:53 am | श्रीरंग_जोशी

भावस्पर्शी आहे ही कथा एकदम. ग्रामीण जीवन छान रंगवले आहे.

बहुधा माझ्या धाकट्या भावाच्या चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकात अशीच कथा होती. फक्त त्यात गाय रात्री उशिरा स्वतःहून परतते असा काहीसा शेवट होता.

मिपावर स्वागत आहे. पहिलेच लेखन सुरेख झाले आहे. पुढील लेखनास शुभेच्छा!!

जुइ's picture

10 May 2015 - 10:29 pm | जुइ

खूप आवडली कथा!! पुढील लेखनास शुभेच्छा!!

पैसा's picture

11 May 2015 - 1:57 pm | पैसा

साध्या प्रसंगातून कथा खूप छान फुलवली आहे!

छान फुलवली आहे कथा,शेवट आवडला !

स्पंदना's picture

11 May 2015 - 4:24 pm | स्पंदना

लिखाण वाचताना आपोआप डोळ्यासमोर उलगडत जातं एखादं चित्र उलगडावं तस. मस्तच.
अन शेवटी एका आईला जाणवलेलं वात्सल्य तर अतिशय सुरेख.

रातराणी's picture

12 May 2015 - 12:49 am | रातराणी

सर्वांचे आभार!