मराठमोळं पक्वान्न!! पुरणपोळी.

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
20 Apr 2015 - 10:14 am

सणांचे गाणे
काटून कुटून केली पंचमी| नेटकाच लागलाय डोळा
आला श्रावणी पोळा ||
पोळ्याची काढत होते चितर| आली वडलांची पितर ||
पित्रेची निसत होते डाळ| आली घटाची माळ ||
घटाच्या माळेला देत होते गाठी| दिवाळीने केली दाटी ||
दिवाळीची लावत होते पणती| संकरात आली निन्ति ||
संकार्तीचे पुजत होते सुगड|बीजेने पाडलं उघड ||
बीजेचा पाजाळीत होते ठ्ठम| शिवरात घीना दम ||
शिवरातीची फेडीत होते पारन| शिमग्याने घेतली धरण ||
शिमग्याची काढत होते सुजी| पाडवा झाला राजी ||
पाडव्याची उभारीत होते गुढी| अखीतीने मारली उडी ||
आखीतीची पूजित होते काराकेळी| जत्रा आल्या खेळोखेळी ||
जत्रेत वाहत होते पानफुल| दवणा अंबरास आला पाहुणा ||
अंबरास खाऊन झाले गार| दारी लागली पावसाची धार||

(उमा@मिपा यांच्याकडुन ऐनवेळी मदत मिळाल्याने हे गीत मी येथे देउ शकले.)

तर मंडळी आपल्या मराठी लोकांच्यात बारा महिन्यांचे बारा सण! गुढि उभारुन झाली, तोवर आकित्ती(अक्षयतृतिया) आली. हा साडेतीन मुहुर्ता पैकी एक मुहुर्त सुद्धा आपण गोडाधोडानेच साजरा करतो. तो पर्यंत आला बेंदूर! मग आला श्रावण, भाद्रपद यांच्या महतीबद्द्ल मी काय बोलावं? मग दसरा, दिवाळी, त्यातच आषाढी, कार्तिकी एकादश्या मग संक्रात अन शेवटाचा सण होळीचा!
या बर्‍याच सणांना अगदी अलिकडेपर्यंत कोल्हापुरात पोळ्या व्हायच्या घरोघरी. कोल्हापूर म्हणायच कारण अस की, पुण्यामुंबईचे लोक तेंव्हा पूरणपोळ्या खायला गावीच् जावं लागतं अस बोलुन दाखवायचे. (आळशी मेले)
गावी तर या सणांबरोबरच पावणा-रावणा, पूजा, समारंभ, लेक आली, जावाय आला, भाऊ आला अन मेव्हणा पाहूणा, अश्या झाडून सगळ्या गोष्टी पूरण घालायच निमित्त होउ शकतात. अगदी परवा परवा पर्यंत तेराव्या नंतर तोंडगोड करायला आलेल्या सगळ्या नातेवाईक स्त्रीया, कंबर कसून रात्रभर पोळ्या करुन घराच सूतक मोडून जायच्या.
तर अशी ही पूरणाची पोळी! जीवाभावाची! रांधायला जरा अवघड! अगदी सुगरणींचा सुद्धा कधी कधी कस पाहणारी!! पण आपल्या मातीची!! अन म्हणुनच अविट गोडीची.
खर सांगू का? ही पाककृती लिहायला बसले अन दोन पानं भरुन सणादिवशीच्या सकाळचच वर्णन लिहून काढलं. थांबेचना हात! मग पुन्हा नव्याने लिहायला घेतलं, तरी एव्हाना भाराभर लिहून झालच.

तर आता राहू दे बाकिच पुराण. चला घालुया शिजाया पूरण.

एक एक अ‍ॅडीशन हं. गुज्जू लोक्स ही पूरण्पोळी तूर डाळीची करतात, साउथ मध्ये आपल्या सारखीच हरभरा डाळ वापरली जाते, पण आपल्या सारखी तिकडे पूरण पोळी राजमान्य नाही! त्यांचे आपले पायसम!

तर घ्या साहित्य. माझ्या मते पूरण पोळी ही लेकूरवाळी आहे. ती नुसती करुन भागत नाही. तीचा थाट असतो तो तिच्याबरोबर पानात वाढलेल्या इतर गोष्टींमुळे. म्हणुन ही पाककृती पान भरुन (जेवणाचे पान्=ताट्=प्लेट) असणार आहे.

तर घ्या साहित्यः
१. पूरण पोळीचे
पाव किलो हरभरा डाळ. पाव किलो गूळ. सुंठ एक अर्धा बोटभर तुकडा. ६ वेलच्या. २ मिरे.
कणिक {गव्हाचे पिठ} ( कणिक घेताना आधी हरभरा डाळ वाटीने मोजावी. अन त्या मापाच्या दिडीने कणिक घ्यावी. मी येथे पावकिलो डाळ एका भांड्याने मोजली अन तेव्हढं भांड भरुन+ आणखी अर्ध भांड अशी कणिक घेतली)
मिठ. हळद. अन बक्कळ तेल.

साहित्यः-
२. कोशींबीरीचे
एक १०० ग्रॅम डाळ, हिंग, हळद, मिठ, मिरच्या, कोथिंबीर, चिमुट्भर जीरे.

साहित्यः-
३. बटाटा भाजी
चार मध्यम बटाटे, मिरची, कोथींबीर, कडीपत्ता, मिठ.

साहित्यः-
४. कटाची आमटी
कट, सुक्या खोबर्‍याचा तुकडा इंचभर, लवंग, दालचीन, जीरे, मिरे, कोथींबीर,लसूण पाकळ्या ४-५, भाजलेला कांदा (छोटासा), तिखट , मिठ, आमसूल.

फोडणीसाठी- लसूण पाक्ळ्या २-३, कढीपत्ता, हिंग, हळद.

साहित्यः-
५. घटलं वरण
मुठभर तूरडाळ, हिंग, हळद, गुळ, मिठ.

आधीच सांगुन ठेवते. जसा स्वयंपाक मी रांधते, तस तशी कृती येथे देणार आहे. उगा,"बाई सरमिसळ करते चारपाच गोष्टींची" हे ऐकून घेतले जाणार नाही.

कृती:-

हरभरा डाळ निवडुन,(त्यात हरभर्‍याचे वरचे साल असलेले, आणि हिरव्या रंगाचे डाळे काढुन टाका) धुवुन कुकरला लावा. चांगल्या पाच सहा शिट्ट्या येउ द्या.
तोवर कणिक भिजवायला घ्या. चाळलेल्या कणकेत मिठ, हळद अन दोन तीन चमचे तेल घालुन व्यवस्थीत मिसळुन घ्या अन पाणी घालून साधारण घट्ट्सर कणिक मळून घ्या. आता एक हा कणकेचा गोळा मावेल इतक आकाराचं भांड घ्या अन त्यात पाणी घालून त्यात हा कणकेचा गोळा सोडा. कणकेच्या वर पाणी आलं पाहिजे. झाकण ठेवा अन एका कोपर्‍यात हे भांड
ठेवुन द्या.

तोवर कुकर जरा थंड व्हायला आला असेल. उघडू नका इतक्यात. बाजूला पूरण आटवायला एक जरा मोठ्ठ तपेलं घ्या. त्यात साधारण दिड-दोन लिटर पाणी घाला चार मिर्‍याचे दाणे टाका अन ते पाणी उकळायला ठेवा.
तोवर इकडे आणखी जरा एक छोटी वाटीभर हरभरा डाळ घ्या आणि धुवुन पुन्हा पाण्यात घालून ठेवा भिजायला.
कुकर उघडुन त्यातुन डाळ काढुन घ्या अन त्याच कुकर मध्ये हातोहात वरणाची डाळ आणि बटाटे घाला. गॅस सुरु करा अन येउदेत आणखी पाच शिट्ट्या.

आता इकडे जे मोठ्या तपेल्यात पाणी उकळायला ठेवले आहे त्याकडे वळा. पाणी जर कडकडीत होउन उकळायच्या बेतास असेल, तर त्यात शिजवलेली हरभर्‍याची डाळ घाला. एक चार पाच मिनीटात पाणी उकळू लागेल. आता हे पाणी नुसत पाणी नाही तर कट आहे. याला आता पासून कट म्हणायच. काय?

तर हा कट अगदी काळजीपूर्वक दुसर्‍या पातेल्यात ओतून घ्या. हव तर एखादी चाळ्ण ठेवा डाळ पडू नये म्हणुन. सगळ पाणी निचरलं, की हे डाळीचे भांडे पुन्हा गॅसवर ठेवा आणी एका उलथन्याने अथवा चपट्या डावाने तळापासून हलवायला सुरु करा. [अशी डाळ पुन्हा उकळत्या पाण्यातुन काढल्याने पूरण चिकट न होता खुसखुशीत होते. वर आणि आमटीला रॉ मटेरियल मिळते ते वेगळच.] पूरण साधारण घट्ट होत आले की मिरे दाणे काढून टाकुन आता या डाळीत गूळ मिसळा. पण पाव किलो जो गूळ आपण घेतलाय, त्यातला एक बारकासा खडा बाजूला काढा. जेव्हढ्यास तेव्हढ्या गूळाने पोळी खूप गोड होते. गूळ हवा असेल तर बारिक फोडून अथवा चिरुन घालू शकता. चिमटभर मिठ पण यावेळेस घालुन घ्या. गूळ घातला की हे पूरण पुन्हा पातळसर होउ लागते. जर पूरण मिक्सरवर करायचे असेल तर; असे पातळ्सर असतानाच ते गॅस वरुन उतरवा आणि मिक्सरच्या भांड्यात घालुन बारिक करुन घ्या, अथवा पुन्हा जाडसर होइ पर्यंत हलवुन मग पूरण यंत्रातुन अथवा पाट्यावर वाटायला घ्या. जर मिकसरवर बारिक करायचे असेल, तर फिरवुन झाल्यावर पुन्हा गॅसवर ठेवुन घट्ट होइतो आटवुन घ्या. आता हे पूरण थंड व्हायला बाजूला ठेवुन द्या. हव असेल तर आता पूरणाचे शिजवणे संपले असल्याने पूरण एखाद्या बाऊलमध्ये काढुन, पूरण आटवलेल्या भांड्यात कट ओतून घ्या. त्यामुळे कट घट्ट आणि गोडसर होतो. एक भांडे घासायचे वाचते.
आपण आमटीसाठी जे खोबरं घेतलं आहे, तो तुकडा तसाच डायरेक्ट गॅसवर धरा. खोबर्‍यातल्या तेलाने तो पेटून उठेल. पेटू द्या जरा. मस्त काळा रंग आला, आणि खरपूस वास सुटला की आग विझवा आणि या खोबर्‍याचे तुकडे करुन घ्या. एक बारकासा कांदा जर मावे असेल तर १ मिनीट मावेत घालून घ्या. चुर्र्र्र्र्र असा आवाज येइल. काही ऐकू नका त्याची कागाळी. काढा बाहेर अन ठेवा त्यालाही डायरेक्ट गॅसवर!! तो ही तितकाच पेटून उठेल! जरा पेटू द्या. वरची दोन आवरणं जळाली अस वाटलं की गॅस बंद करा. अन वरची जळकी आवरणं काढुन कांदा सोलून घ्या. आता यात चमचाभर जीरे, दोन लवंगा, अर्ध बोट दालचीन, चार मिरे, दोन काड्या कोथींबीर अन चार पाच पाकळ्या लसूण घाला. हे सगळ एकत्र मिक्सरवर वाटुन घ्या. जरा जाडसर राहिलं तरी चालत. तोवर कटात एखाद दुसरं आमसूल टाकुन द्या.
फोडणी साठी गॅसवर एक छोटं भांड ठेवा अन त्यात तेल घाला जरा मोकळ्या ढाकळ्या हाताने. एव्हाना तूर डाळीचा अन बटाट्याचा कूकर झाला असेल. तो उघडून थंड व्हायला ठेवा अन त्या दुसर्‍या गॅसवर कटाचे भांडे चढवा. फोदणी साठी लसूण ठेचून घ्या. तेलावर लसूण, कढीपत्ता, हिंग,हळद घाला. आता त्यावर तिखट घाला. जरा परता आणि आपण खोबर्‍याचे जे वाटण वाटले आहे ते घाला. मस्त ठसका आला की ही फोडणी मोठ्या कटाच्या भांड्यात ओता. कटाला मस्त उकळी येउ दया. मिठ घाला. हवी असेल तर वरुन चिरलेली कोथींबीर पेरा अन आमटीचे भांडे खाली उतरवा. हवा असल्यास आणखी एखादा गूळाचा खडा यात टाकावयास हरकत नाही. पोळीच्या स्वयंपाकातलं एक व्यंजन तयार!

आता जरा कोशींबीरी कडे वळू. काय नाही जास्त काम. भिजवलेली डाळ निथळायला चाळणीवर टाका. तोवर इकडे जीरे, हींग, मिठ, मिरच्या आणि कोथींबीर साधारण बारिक वाटुन घ्या. (पेस्ट करायची नाही) त्यात डाळ घाला आणि हळु हळु फिरवत पुन्हा एकदा साधारण बारिक करुन घ्या. यात हवं असेल तर दही मिसळ अथवा लिंबु पिळा नाहीतर कच्ची हिरवीगार कैरी खिसून घाला. (काहीजण या कोशींबीरीला जीरे मोहरीची फोडणी देतात, आम्ही नाही) दुसरं व्यंजन तयार!

बटाटे सोलायला घ्या. तोवर इकडे वरण करण्यासाठी डाळीत मिठ, हळद, हिंग अन गुळाचा तुकडा टाकुन ते बारिक आचेवर उकळायला ठेवा. बटाटे सोलुन त्याचे तुकडे करुन घ्या. मिकसरवर हिरवी मिरची, कढीपत्ता अन कोथांबीर जरा एक दोन गिरक्या मारुन घ्या. (चर्नर जास्त उपयोगी या साठी, अन कोशींबीरी साठी सुद्धा) आता हे मिरची, कढीपत्ता कोथींबीर मिश्रण हवं तर बटाट्याच्या फोडींना लावुन घ्या, नाहीतर कढईत तेल गरम करुन त्यात टाका. (येस्स!! नो मोहरी, नो जीरे नायदर हींग) बटाटे मिसळा अन मिठ घालुन चांगले परतवुन घ्या. वरणं उकळलं असेलच. जरा घटलल्या सारख करा अन उतरवा गॅस वरुन!! तिसरं अन चौथं व्यंजन तयार.

त्याच गॅसवर दुसर्‍या कढईत तेल गरम करुन, पापड पापड्या कुरडया सांडगे तळुन घ्या. फिफ्थ वन इज रेडी ऑलरेडी!!
पुन्हा एकदा कूकरला साकडे घाला अन पांढरा भात शिजवायला ठेवा याच गोंधळात. काय तीन शिट्ट्या! झाला.
आता जरा घोटभर पाणी प्या. तयार झालेला सगळा स्वयंपाक व्यवस्थीत बाजूला मांडुन ठेवा. गॅसवर जरा सगळं रिकामं करुन घ्या. अब हाजीर है क्विन ऑफ महाराष्ट्रा!
एव्हाना पूरण थंड झालं असेल. त्यावर सुंठ वेलचीची पूड टाकून चांगले मिसळुन, साधारण एका पोळीला लागेल एव्हढ्या आकाराचे मुटके करुन घ्या.

कणिकेवर जे पाणी आहे, ते ओतून द्या अन त्याच भांड्यात कणिक जरा तिंबुन घ्या. हे तिंबण जरा जोरकस व्हायला हवं. आठवा तो ऑफीसातला कलीग! साला प्रमोशनसाठी माझं काम स्वतःच्या नावावर खपवुन गेला. आठवा तो शेजारी, उठल सुठल भिंतीवर धडक्या मारत असतो, आंधळा! कालच रस्ता ओलांडताना ती बाईक अश्शी धडकून गेली....बास. झाली असावी कणिक तिंबुन. त्या कणकेचे एक टोक धरुन वर उचल्ले तरी न तुटता ती एक सारखी तार धरुन ओघळते ना खाली? झाली कणिक तिंबुन. आता हनीमुन आठवा.

हात स्वच्छ करुन घ्या. कणकेला जरा चांगल वाटीभर तेल ओतून ठेवा. गॅसवर तवा चढवा अन गरम होउ द्या. एकदा चांगला गरम झाला की आंच् मध्यम करुन घ्या. पोळपाटाला जरा अर्धी पळी तेल लावुन घ्या. लाटण्याचं पण अभ्यंग यातच होउ दे. मग याच तेलाच्या हाताने कणकेचा एक साधारण लिंबाएव्हढा तुकडा तोडा. तो गोळा सारखा करुन घ्या. कणिक चोहोबाजूने ओढत ओढत मध्ये रिचवायची म्हणजे अगदी गुळगुळीत गोळा तयार होतो. आता त्यात पूरणाचा मुटका भरा. सगळी कडुन फिरवत फिरवत तो मुटका कणकेच्या गोळ्याच्या आत गायब झाला की हा तयार झालेला गोळा पोळपाटावरचे तेल एकत्र करत त्यावर ठेवा अन हाताने दाबुन चपटा करा. यामुळे पूरण सगळीकडे सारखे पसरेल. अगदी तळहाताएव्हढा गोळा चपटा करत न्या अन मग लाटन्याला पुन्हा तेलाचा हात लावुन बोटांच्या चिमटीत लाटणे पकडुन पोळी पसरवायला सुरवात करा. साधारण आपल्या चपाती पेक्षा थोडा मोठा आकार झाला की तव्यावर तेल टाका सगळीकडे व्यवस्थीत.

लाटलेल्या पोळीवर पण एक तेलाची धार गोलसर फिरवा, पोळीच्या एका बाजूला लाटणे ठेवुन त्यावर पोळीची एक कडा टाका आणि हळुवार लाटण्याभोवती गुंडाळत पोळी पोळपाटावरुन उचला आणि तव्यावर टाका. तव्यावर टाकताना पोळीची गुंडाळेली आतली बाजू, जीच्यावर आपण शेवटी तेल टाकलयं, ती तव्यावर गेली पाहिजे. साधारण आंच मोठी करा. पोळी पचली की मस्त फुगायला लागते. मग तीला पुन्हा वरच्या बाजुने तेल लावुन उलथण्याने पलटी करा. मस्त खमंग भाजून घ्या.

बास बाई! दमले!
पोरासारांना हाका मारा! नैवेद्याची मूद काढा म्हणावं. ताटाला पापड कुरवडी, भाजी कोशींबीर लावायला सांगा. अन अश्या भरगच्च भरलेल्या राजदरबारात ही तव्यावरची पोळी अगदी हळुच घडी घालत ठेवा. वरुन जायफळ खिसा ठिपकाभर. त्यावर तूपाची धार घसघशीत. बाजूला दुधाची वाटी!


अन मनोभावे त्या अन्न्पूर्णेला नमस्कार करा, अन म्हणा "देवा असाच गोडाधोडाचा नैवेद्य तुला मिळु दे! भरल्या ताटाचा आशिर्वाद माझ्या घराला लाभू दे!"

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Apr 2015 - 10:21 am | ज्ञानोबाचे पैजार

वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे,
जीवन करी जिवित्वा अन्नहे पूर्ण ब्रम्ह,
उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म,
जय जय रघुवीर समर्थ,

झाले म्हणुन आता करतो सुरुवात,

पैजारबुवा,

देवा असाच गोडाधोडाचा नैवेद्य मला मिळु दे!
अप्रतीम........

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2015 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भुक लागली.

नंदन's picture

20 Apr 2015 - 10:43 am | नंदन

तर घ्या साहित्य. माझ्या मते पूरण पोळी ही लेकूरवाळी आहे. ती नुसती करुन भागत नाही. तीचा थाट असतो तो तिच्याबरोबर पानात वाढलेल्या इतर गोष्टींमुळे. म्हणुन ही पाककृती पान भरुन (जेवणाचे पान्=ताट्=प्लेट) असणार आहे.

तंतोतंत!

पण हा असा अष्टावधानी स्वैपाक करणे येरागबाळ्याचे काम नोहे! (खरं तर, याला फक्त पाककृती म्हणणं अन्यायाचं आहे.)
घरी बनणारी पुरणपोळी (निम्मी साखर, निम्मा गूळ) आणि तेलपोळी यांच्या रेशिप्या जरा निराळ्या आहेत, पण हा भरगच्च राजदरबार आणि त्याची पेशे-खिदमत एकदम खास!

काय भारी लिहिलं आहेस स्पंदना !!! खूप आवडलं !!!

स्वीत स्वाति's picture

20 Apr 2015 - 10:53 am | स्वीत स्वाति

शेवटी टाकलेला केळीच्या पानावर भरलेले ताट पाहूनच तृप्त ..

उमा @ मिपा's picture

20 Apr 2015 - 11:08 am | उमा @ मिपा

अहाहा, राजमान्य राजश्री पुरणपोळीच्या थाटाला शोभेल असं राजस वर्णन! सुरेख.
अगदी डोळ्यासमोर आलं तुझं स्वयंपाकघर, निगुतीने, प्रेमाने रांधणारी तू, मस्त मस्त. फोटो बोलके आहेत.
पुराणाचे मुटके तयार झाले की, नवरा आणि मुलं स्वयंपाकघरात येणार, हमखास आणि दोन-तीन मुटके तरी मटकवणार, मग त्यांच्यावर लटकं रागवत आपण आपलं काम सुरु ठेवायचं, हे दरवेळी होतंच.

पुरणपोळी आवडत नाही. गर्दीचे ताट अजूनच आवडत नाही.
पण स्पंदनाताईचं लेखन आणि आणि दम दिल्याच्या आविर्भावात सांगितलेल्या रेसिप्या वाचायला लैच्च आवडते ! हे पण भारी वाटलं वाचायला...

यातली कटाची आमटी भारी प्रिय ! उद्या कटासाठी डाळ शिजवेन आणि उरलीच आहे म्हणून पुरणाच्या पोळ्या पण लाटेन !

बाकी हनीमुन का आठवायचा म्हणे ??? =))

(निरागस मितान)

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:10 pm | स्पंदना

अग बाई!!
आता कसं सांगू तुला?
हे बघ कणिक तिंबताना आपण रागात होतो की नाही? त्या जोषात आपली कणिक तिंबुन झाली, पण पोळ्या कश्या रेशमासारख्या मलमलीत व्हायला हव्या ना? म्हणुन गो बाय!!
काय ह्या निरागस पोरी! देवा! वाचव!

अन्नपूर्णे, सुखी भव! सण साजरा झाला नुसतं वाचुन आणि ताट पाहुन!!

पैसा's picture

20 Apr 2015 - 11:16 am | पैसा

अफाट अन अफलातून!!! _/\_

नगरीनिरंजन's picture

20 Apr 2015 - 7:09 pm | नगरीनिरंजन

तोंडाला सुटलेल्या पाण्यात शब्द वाहून गेले. अफाट लिहिलंय. फोटोंच्या दर्जावरही थोडी मेहनत घेतली असती तर दुधात साखर किंवा पुरणात गुळवणी पडल्यासारखं झालं असतं.
आई लक्ष्मीपूजनाला आणि आजी महालक्ष्म्यांना नेहमी पूरण करते. त्या दोन दिवशी वर्षभरात लागत नाही अशी भूक लागते.

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:08 pm | स्पंदना

धन्यवाद ननि.

त्याच काय आहे, मी स्वयंपाक करता करता फोटो घेते, अन त्या स्वयंपाकाच्या हाताने, एसेलार धरायला होत नाही.
हे फोटो मी माझ्या मोटोरोला या मोबाईल ने अन कॉटन बडने स्क्रीन टच करत काढलेत.

आहे हे असं आहे बघा! फोटोसाठी स्वयंपाक, की स्वयंपाकासाठी फोटो हे गणित सुटल की बरच काही जमेल.

नगरीनिरंजन's picture

23 Apr 2015 - 7:35 pm | नगरीनिरंजन

फोटोंसाठी स्वयंपाक नाही हे बाकी खरं आहे. पण आमच्यापर्यंत स्वयंपाक पोचायचा तेवढाच मार्ग म्हणून आम्हाला फोटोचं पडलंय ना! तुमचं काय, तुम्ही करुन, खाऊन तृप्त :-)

इरसाल's picture

20 Apr 2015 - 2:04 pm | इरसाल

आमी नाय ज्जा.
निस्त खायाचं दाकवुन्शिनी लोकं जळवतात आठी. खायाला कोणीबी देईना झालं !

हे बाकी बरयं....स्वतःच्या फोटोलाच स्टार द्यायचे ;)

दिपक.कुवेत's picture

20 Apr 2015 - 12:04 pm | दिपक.कुवेत

खाल्ल्यापासून आवडायला लागली आहे. मैद्यातली एवढी आवडत नाहि. बाकि लिखाण नेहमीप्रमाणेच फक्कड. घ्या पानं....बसुया जेवायला लगेच.

सानिकास्वप्निल's picture

20 Apr 2015 - 12:11 pm | सानिकास्वप्निल

काय जबरी लिहितेस गं तू ताई _/\_
पुपो आणि नैवेद्याचे ताट बघून तोंपासू

दिपक.कुवेत's picture

20 Apr 2015 - 12:12 pm | दिपक.कुवेत

निदान फायनल फोटो तरी सुस्पष्ट टाकत जा गं....सगळं उत्तम जमून उगा गालबोट लागल्यासारखं वाटतं.

साईझ मोठा केला आहे पण मूळचे रिझोल्यूशन कमी असल्यामुळे तितका स्पष्ट येत नाही.

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:13 pm | स्पंदना

अगो बाय!
फोटो मोबल्याने काढलेत! त्याला रिझोल्युशन कुटन असायला?
असू दे तिकड!!

हितन फुडं त्ये फोटो बी नगंत, त्या पाककृत्याबी नगंत आण त्ये बोलण बी नगं! कसं??????

हितन फुडं त्ये फोटो बी नगंत, त्या पाककृत्याबी नगंत आण त्ये बोलण बी नगं! कसं??????

आक्षी बरुबर, फकस्त "छानच गं, मस्तच गं, कसं ग जमतं बै" अशेच पर्तिसाद पायजेत नैतर ल्ह्यायचा तरास कशापाई घ्यायचा म्हंतो मी?

इरसाल's picture

23 Apr 2015 - 1:27 pm | इरसाल

तुमचं "प्यांट्वाल" मागे मदत करायचे ना म्हणे फटु साठी !

तुषार काळभोर's picture

20 Apr 2015 - 12:17 pm | तुषार काळभोर

पुरणपोळीचा स्वयंपाक अन् यात्रेला होणारा १५ किलोचा मटनाचा स्वयंपाक या गोष्टींमुळे माझ्या मनात स्त्रियांच्या पाककौशल्याबद्दल अगणित आणि शब्दातीत आदर आहे.
आमच्या घरातील या दोन गोष्टींची चव कित्येक वर्षे तशीच आहे. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत राहणारी. माझ्या आजीकडून माझ्या आई व चुलत्यांकडे, त्यांच्या कडून त्यांच्या सुनांकडे. जसंच्या तसं!!

(आमच्याकडे पुरणपोळीसंगे गुळवणीपण असते. गुळवणी + दूध + तूप)

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:19 pm | स्पंदना

पैलवान कोण गावचं?
न्हाय आमच्या कडं म्हायी असते.

रवीवारी रात्री बळ पडतं मानाचं! त्यातल अर्ध बकरं घरात असत प्रसादाचं. ते सोमवारी दिवसभर रांधायच. ते सगळं प्रसादाचं म्हणुन यात्रेला आलेले पाहूणे खातात. आम्ही त्यातुन वेळ काढुन फेरा फेरान गावात कधी याच्या कधी त्याच्या घरात म्हाई खायला. ते झालं की मंगळवारी सकाळी दिवस उजडायला अंबाबाईला कधी १ कधी २ अन एका वर्षी ३ बकरी शिजवलेत. चुलीवर ५० -६० लिटरची भांडी, चुलवाणावर हंडेभरुन भात, चार पाच चुलीवर भाकर्‍या आणि परड्यात ह्ये मोठ्ठ भांडभरुन लाल्भडक रस्सा!!
हे सगळ रांधलय हं! नुसत वर्णन नाही.

तुषार काळभोर's picture

23 Apr 2015 - 11:58 am | तुषार काळभोर

चैती पुनव म्हन्जे हनुमान जयंती! त्याच्या आधी नऊ दिवस देवाचे घट बसतात. त्या नवरात्रात घरात कोन ना कोन उपास धरत्यात. (सद्ध्या माजी आई अन् २ चुलत्या उपास धरत्यात). हनुमान जयंतीला सक्काळी सक्काळी पुरणपोळ्यांचा स्वैपाक होतो. पोळ्या-गुळवणी-आमटी-भात-कुरडया-पापड्या-भजी. सगळ्यात आधी पुर्‍यांच्या एवढ्या पोळ्या बनतात ४२. त्याच्यावर उलसाक आमटी-भात-कुरडई-पापडी-भजी ठेऊन ४२ निवद बनत्यात. ते घरातल्या देवांना, शेतातल्या म्हसोबाला, मळ्यातल्या बाबदेवाला, गावातल्या अंबरिबाला (ग्रामदैवत अंबरनाथ), गावातल्या काळुबाईला-लक्ष्मीआईला-तुळजापुरच्या आईला-खोकलाईला-मारुतीला-अन् विठोबा-रुक्माईला दाखवले जातात.

मग घरातल्यांना दिवसभर हेच जेवण.
आमचा अंबरीबा शुद्ध शाकाहारी. त्यामुळं देवाला बकरी नाय पडत. दुसर्‍या दिवशी (हगाम्याला) पाव्हण्या-रावळ्यांसाठी अन् आमच्यासाठी पन मटन बनतं मग एखाद्या वर्षी थोडक्यात भागवायचं असंल तर घरगुती ४-५ किलो बकर्‍याचं मटन विकत आणून करायचं (जत्रा आमचं घर अन् ३ चुलते, अशी ४ घरांची एकत्र होते. आमची अजून ज्वॉईंट फ्यामिली आहे :) फक्त नोकरी-धंद्यासाठी वेगवेगळ्या ठीकाणी राहतो, सगळे कार्यक्रम गावाला एकत्रित!) .पाव्हण्यांना बोलवायचं असंल तर १ बकरं लागतंच.
पद्धत येकदम शेमः

चुलीवर ५० -६० लिटरची भांडी, चुलवाणावर हंडेभरुन भात, चार पाच चुलीवर भाकर्‍या आणि परड्यात ह्ये मोठ्ठ भांडभरुन लाल्भडक रस्सा!!
हे सगळ रांधलय हं! नुसत वर्णन नाही.

५ किलो असो नायतर २० किलो, असाच मटनाचा स्वैपाक दरवर्षी होतो.

(आणखी: जागरण-गोंधळाचं बकरं पन असंच होतं. शिवाय आमच्याकडे जावळाला बकरं लागतं. त्याचापन स्वैपाक असाच होतो)

आणि हो.. आमचं गाव मु पो लोणी-काळभोर, ता हवेली जि पुने..

ब़जरबट्टू's picture

20 Apr 2015 - 12:55 pm | ब़जरबट्टू

सुंदर लेखन व जबरदस्त मेन्यू... पण हा पुरणपोळीचा प्रकार कधी खाल्ला नाही बा.. गेलाबाजार पुण्यामध्ये साध्या गव्हाच्या पोळीत कोरडे नावापुरते पुरणाचा थर असलेल्या प्रकाराला पुरळपोळी म्हणतात हे बघून वारल्या गेलो होतो.. काय ती दळभद्री अवस्था..
बाकी खरा पुरणपोळीचा साज विदर्भातच... आहाहा.. असले ३ मुटके सहज मावतात एका पोळीत... आणि पुरणावर कणकेचा अगदी बारीक पुपुद्रा चालतो.. जाड असेल तर बाई सुगरण म्हणुन फेलच... :) सोबत वाटीभर तुप.. आहाहा.. अजुन काही सोबत खायची हिंमतच होत नाही....

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:20 pm | स्पंदना

असु दे!
आम्हाला ती पुपोची पद्धत बघौनच धडकी भरते!

चिगो's picture

23 Apr 2015 - 1:52 pm | चिगो

हेच आणि हेच आणि हेच.. बायकोमुळे बाकी सगळा पश्चिम महाराष्ट्राचा स्वयंपाक स्विकारला तरी "गव्हाच्या पोळीत कोरडे नावापुरते पुरणाचा थर असलेल्या प्रकाराला पुरळपोळी" म्हणून अजूनही स्विकारु शकत नाहीत.

बाकी खरा पुरणपोळीचा साज विदर्भातच... आहाहा.. असले ३ मुटके सहज मावतात एका पोळीत... आणि पुरणावर कणकेचा अगदी बारीक पुपुद्रा चालतो.. जाड असेल तर बाई सुगरण म्हणुन फेलच... :) सोबत वाटीभर तुप.. आहाहा.. अजुन काही सोबत खायची हिंमतच होत नाही....

ही असली पुरणपोळी तव्यावर पालटण्यासाठी उलथणी (आमच्याकडे 'सराटा') पण कामाचा नाही.. रुतून बसायचा! ;-) तेव्हा आई आणि इतर सुगरण बायका ती पुरणपोळी 'टॉस अँड फ्लिप' पद्धतीनं परततात. म्हणजे तव्यावरची पुरणपोळी हवेत उडवायची, आणि हवेतच ती पलटली की तव्यावर झेलायची.. लै भारी स्कील.. पुरण जर दोन-तीन दिवस मुरलेलं असेल तर मग तर आहाहा.. स्वर्गच !!

स्पंदनाताई, तुम्ही निगुतीनं केलेला चारठाव स्वयंपाक आणि वर्णनाची खुमासदार शैली आवडली.. लगे रहो..

स्पा's picture

20 Apr 2015 - 12:57 pm | स्पा

खपल्या गेले आहे

__/\__

कपिलमुनी's picture

20 Apr 2015 - 1:00 pm | कपिलमुनी

. त्यावर तूपाची धार घसघशीत.

गरम पोळीवर तुपाची धार !
अहाहा ...

मी तर तुपात कुस्करून खातो पोळ्या !

सस्नेह's picture

20 Apr 2015 - 1:24 pm | सस्नेह

देवी अन्नपूर्णे, अशीच मजवर प्रसन्न हो.
शेवटचा फोटो बघून आज्जीची आठवण झाली. हाच्च मेनू असायचा तिचा दर पोळी-वाल्या सणाला !
बाकी अधलं मधलं पुरण-पुराण जरा च्यानल मिक्स झाल्यासारखं वाटलं, पण फायनल प्रॉडक्ट 'अपू'र्बो !!

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:22 pm | स्पंदना

बाकी अधलं मधलं पुरण-पुराण जरा च्यानल मिक्स झाल्यासारखं वाटलं

सांग ना कुठे काही मिस झालयं का?

सस्नेह's picture

23 Apr 2015 - 12:54 pm | सस्नेह

मिस नाही मिक्स ! पुपो, वरण-भात, बटाट्याची भाजी, कुरड्या ही सगळी च्यानल्स एकदम लागली ना !

लेखाच्या सुरवातीला वॉर्नींग दिलेली आहे.
असल का ऐकून घेणार नाही अस सांगुन ठेवलयं.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2015 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे।...
यंतुनदयो वर्षंतु पर्जन्या: ...
नम: पार्वतीपते हरंहरं महादेव..

खुप मस्त... आता परत एकदा मला पुरणाचा घाट घालायला लागणार. :P

कविता१९७८'s picture

20 Apr 2015 - 4:35 pm | कविता१९७८

खुपच छान, ताट पाहुन तोंडाला पाणी सुटले अन तु बनवले आहेस तर चविष्टच असणार

आहाहा..काय लिहिलय....तोंपासू

पियुशा's picture

20 Apr 2015 - 6:39 pm | पियुशा

वाह !!! काय तो थाट पु. पो. चा मस्त दिल गार्डन गार्डन हो गया

किसन शिंदे's picture

20 Apr 2015 - 7:02 pm | किसन शिंदे

पुरणपोळ्या हा वीकनेस पाॅईन्ट! पाककृती आणि शेवटचा फोटो फार फार आवडल्या गेला आहे.

स्वाती२'s picture

20 Apr 2015 - 7:10 pm | स्वाती२

व्वा! ताट बघून मन तृप्त झाले! लेखन आणि फोटो दोन्ही सुरेख!

एस's picture

20 Apr 2015 - 7:15 pm | एस

चला, कोल्हापूरला गेल्यावर आधी तुमच्या हातची पुरणपोळी हादडून तृप्त व्हायचं आणि मग स्नेहांकिताताईंच्या घरचं गारेगार आईस्क्रीम खायचं! मग खाली रत्नांग्रीला उतरलं की हायेच ओल्या काजूंची उसळ (मिळाली तर. नायतर नुस्तंच झाडं झोडायला लागायची! :-P )

द्येवा मिपेश्वरा! पावलास ब्वॉ भरभरून! :-D

एस's picture

20 Apr 2015 - 11:29 pm | एस

पुणे टू कोल्हापूर व्हाया आष्ट्रेलिया अशी फ्लायिट नसल्याकारणाने आमचा वरील प्रतिसाद रद्दबातल समजावा! :-(

सस्नेह's picture

21 Apr 2015 - 11:35 am | सस्नेह

माहेरवाशीण कधी तरी येईलच की कोल्हापूरला !

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:23 pm | स्पंदना

इथेपण मिळेलच हो खायला. या निवांत! गप्पा बिप्पा मारू. पोटभर जेवू आणि मिळेल तेथे ताणुन देउ!

पैसा's picture

23 Apr 2015 - 11:43 am | पैसा

रत्नांग्री आपलीच आसां! यावर्षी काजूचा सीझन मे एंडपर्यंत चालणारे. या कधीपण!

मस्त झालय लेखन! एकदम चविष्ट!
आता मलाही पुपोचा घाट घालावा लागणार.
(त्याआधी गुलाबजाम घरी खवा करण्यापासून करण्याचा विचार आहे)
सगळे फोटू आणि विशेषत: पुपोचा भारी आलाय.
सणावारी स्वयंपाकघरात सकाळी जी गडबड असते ते वर्णन करणारा दुसरा लेख लिहि आता.
आपण सगळेच ते वातावरण मिस करतो.

भाते's picture

20 Apr 2015 - 8:09 pm | भाते

लेख, पाकृ आणि इतर माहिती सविस्तर लिहिल्यापध्दल धन्यवाद! शेवटचा फोटो तर मस्तच आहे.

उद्या अक्षय्य तृतीया आहे. आयती पुपो घरपोच मिळेल का? :)

जलपरी's picture

20 Apr 2015 - 9:17 pm | जलपरी

आहाहा... केळीच्या पानावर पोळी मस्त.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Apr 2015 - 10:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी

प्रचंड आवडणारा पदार्थ फार रसभरीत वर्णनानी समोर आला...

जुइ's picture

21 Apr 2015 - 12:23 am | जुइ

पुरणपोळी आणि कटाची आमटी खुप आवडता मेन्यु आहे. बाकी केळीच्या पानावरचे भरलेले ताट छान दिसत आहे :-)

सविता००१'s picture

21 Apr 2015 - 12:43 am | सविता००१

मी अशी पुपो कधीच नाही केली. आता पहाते करून.
पण भराभर, हाताला आणि गॅसला पण जराही उसंत मिळू न देता अप्रतिम टाईम मॅनेज्मेंट करून बरोब्बर वेळेवर नैवेद्याचं पान तयार करणारी आई आठवली गं तुझ्यामुळे.

जुइ's picture

21 Apr 2015 - 1:06 am | जुइ

हेच म्हणते आईची खूप आठवण आली.

बॅटमॅन's picture

21 Apr 2015 - 1:14 am | बॅटमॅन

तेजाला, कं लिवलंय!!!! एकच नंबर. _/\_

अशीच सुंदर मिळता खावया पुरणपोळी आयती
"आम्हीही तोषलो असतो", वदले कॅटपती.

रुपी's picture

21 Apr 2015 - 4:47 am | रुपी

फारच छान! भारी लिखाण!!

खटपट्या's picture

21 Apr 2015 - 6:51 am | खटपट्या

कैच्या कै वर्णन आणि फोटू.
काही पदार्थ बनवणे ही स्त्रीयांची मोनोपोली आहे. जेनु काम तेनु.
एकदम बुंगाट!!
शेवटचा फोटू पाहुन तीन चारदा आवंढा गिळला..

प्रचेतस's picture

21 Apr 2015 - 6:51 am | प्रचेतस

जबराट प्रेझेंटेशन. खतरा लिहिलंय.
मात्र पुरणपोळी आवडत नसल्याने खाण्याबद्दल आपला पास. कटाची आमटी मात्र जीव की प्राण.

एस's picture

21 Apr 2015 - 11:50 am | एस

कटाची आमटी मात्र जीव की प्राण.

+१११११११११११११११११११११११११११...........

अगदी, अगदी. मला आमटीभात खायला लय आवडतो. (लय हा शब्दच लय भारी आहे, 'खूप-बिप' सारख्या गुळचट शब्दांत 'लय' चा गोडवा नाही!) अगदी दोन-दोन दिवस आमटी पुरवून पुरवून ओरपली जाते. आणि ती जितकी शिळी होते, तितकी अधिकच भन्नाट लागते!

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:34 pm | स्पंदना

लय म्हणताना फार कौतुक वाटत मलाही, एफर्टलेस वर्ड आहे हा. मनातला भाव पटकन दाखवणारा.
आणि कटाच्या आमटीच्या शिळेपणाबद्दल धादा शमत!

(माझं पोरग कुटल खुळं जनमलयं देव जाणे. दोन दिवस पोळी असेल तर प्रत्येक ताटाला भाजी (पोटॅटो? अँड धाल) कोशींबीर अन पापड लागतात त्याला. खरं असच अधीमधी मी चपात्या करताना एकदम ओरडत येतो हा स्वयंपाक घरात, "आर यु प्रिपेरींग पुरन्पोली? मग मी आपली जवळपास कुठला सण आहे ते कॅलेंडरात पाहते आणि गपगुमान पोळ्या करते. मध्यांतरी बरं नव्हत बरेच दिवस, तेंव्हा एकदा हा असाच पळत आला स्वयंपाक्घरात! त्याच्या बाबाची सटकली! तो गुरगुरला," ए! डोन्ट बॉदर माय वाईफ! गो गेट युअर ओन वाईफ अ‍ॅन्ड आस्क हर टु प्रीपेर! असा सुखसंवाद झडला. थोड्यावेळाने आम्ही विसरुनही गेलो अन चहा पित बसलो होतो, तर हे चिरंजीव खाल मानेने तेथे आले अन म्हणाले" बट पपा, आय अ‍ॅम टू यंग टू गेट मॅरीड अँन्ड ब्रींग अ वाईफ! आय वोन्ट बे एबल टू सपोर्ट हर!! हर! हर!! हसून हसून पुरेवाट आमची!)

एस's picture

22 Apr 2015 - 8:21 pm | एस

शहाणे आहेत तुमचे बाळराजे. :-) किती तो समजूतदारपणा!

पुन्हा एकदा हिकडे येऊन वाचून गेले. तपेली, कुरवड्या वगैरे वाचून आज्जीची आठवण आली. कैच्याकै आवडलेले लेखन व बेत! कुणीतरी प्रत्यक्ष करतय असं वाटून गेलं. पुरणाच्या स्वयंपाकात मिरे, सुंठ वापरलेले पाहून मजा वाटली.

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:36 pm | स्पंदना

रेवाक्का!
मिरे फक्त पाण्यात असतात, त्यामुळे गॅस होतं नाही पुपो खाउन. पचनाला बरा पडतो मिरा.
अन सुंठ!! ती पण पचायला हलकी करते पुपो अन वर स्वाद सुद्धा अफलातून येतो पुरणाला. बघ करुन एकदा.

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 7:28 am | श्रीरंग_जोशी

बाप रे, कृतीचे वर्णन वाचून अन फोटोज पाहून धाप लागली.

मानलं तुम्हाला. तुमचा भावी जावई तब्बेतीने खाणारा हवा :-) .

जुन्या काळी माझी आजी महालक्ष्मयांच्या दिवशी चार पाच डझन पुरणपोळ्या करायची असे ऐकले आहे. तेव्हाच्या पंगतीत आठ-आठ पुरणपोळ्या खाणारे महाभाग असायचे (माणसं होती की जनावरं).

व्यक्तिशः मला पुरणपोळी एका कारणामुळे आवडत नाही. पुरणपोळीमुळे सणाच्या जेवणातल्या अनेक चविष्ट पदार्थांवर खूप अन्याय होतो. भाजा, चटण्या, कोशिंबिरी, कढी वगैरेंबरोबर खायला साधी पोळी नसतेच. पहिली अन आग्रहाची दुसरी पुरणपोळी खाल्यावर, इतर अनेक पदार्थ खायला पोटात जागा उरत नाही.

मी लहान असताना मुंज झाल्यावर मला अनेक लोकांकडे ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावले जात असे. तेव्हाही पुरणपोळीला नाही म्हणणे म्हणजे यजमानांचा अपमान करणे असे दाखवले जात असे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2015 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आठ-आठ पुरणपोळ्या खाणारे महाभाग असायचे (माणसं होती की जनावरं).

काही लोकं जगण्यासाठी खातात काही खाण्यासाठी जगतात. दुसर्‍या प्रकारामधे मोडत असल्याचा अभिमान वाटतो. बॉस जोपर्यंत खाता येतयं तोपर्यंत खाउन घ्याव आणि दणकुन व्यायाम करुन पचवावं. एवढं नको, हे खाल्लं की मला त्रास होतो किंवा उद्या त्रास होईल म्हणुन आज हात आवरुन जेवणार्‍या माणसांनाच त्रास होतो असा अनुभव आहे. शिवाय अशी चवीनी जेवणारी लोकं असली की जी माउली / अपवादात्मक परिस्थितीमधे माउला प्रेमानी स्वयपाक करते तिला समाधान मिळतचं. बाकी दुसर्‍या पदार्थांवर अन्यायाविषयी थोडासा सहमत. दुसर्‍या पद्धतीमधे मोडत असल्यानी ह्या पदार्थांवर अन्याय होउ देत नाही ;)

(चवीनी खाणार त्याला अन्नपुर्णा देणार) :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Apr 2015 - 12:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

जोपर्यंत खाता येतयं तोपर्यंत खाउन घ्याव आणि दणकुन व्यायाम करुन पचवावं.

+९८७६५४३२१

त्यात जेवायला जिलेबी, श्रीखंड पुरणपोळी सारखे पदार्थ असतील तर आडवा हात मारायला मजा येते.

(पंक्तीमधे मनसोक्त जेवणारा) पैजारबुवा,

नगरीनिरंजन's picture

23 Apr 2015 - 7:38 pm | नगरीनिरंजन

पाहिजे ते पाहिजे तेव्हढं खायचं नसेल तर जगायचं तरी कशाला?

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2015 - 7:48 pm | श्रीरंग_जोशी

खाली विदर्भातल्या पुरणपोळीबाबत वर्णन आले आहे. सणाचे इतर पदार्थ अन खाली वर्णन केल्यासारख्या आठ पुरणपोळ्या खाणे म्हणजे बकासुर म्हणवले जाण्याइतकाच प्रकार असायचा.

जर कुणी पहेलवान माणूस रोज असा आहार घेणार असेल तर काही आक्षेप नसणार. पण कुणाच्या घरचे आमंत्रण आहे म्हणून रोज चारचौघांसारखे खाणारा असा तुटून पडत असेल त्याबाबत मी लिहिलं होतं. तसंही हे माझे विचार आहेत. माझ्या आजीने जी इतर स्वयंपाकाबरोबर ४-५ डझन पुरणपोळ्याही करायची देवाघरी जाईपर्यंत याबाबत कधी तक्रार केली नाही.

व्यक्तिशः मला माझ्यापुरते तरी खाण्यासाठी जगणे काही पटत नाही.

इशा१२३'s picture

21 Apr 2015 - 8:42 am | इशा१२३

परवाच आईच्या हातच्या पुरणपोळ्या मनसोक्त खाल्ल्या आहेत.आणि पुरणहि घेउन आलेय.आज करतेच पुपोळि.आणि
त्या कटाच्या आमटीसाठी खास पुरण करते मी.जीव कि प्राण ती आमटि.
सुरेख फोटो ताई.तोपासु.

नाखु's picture

21 Apr 2015 - 2:22 pm | नाखु

सांगायची ष्टाईल आणी हा
"मिपा धर्म" वाढवावा अवघा हलकल्लोळ करावा !!
पोचवावा जागोजगी खिलवूनी गोडवा मर्‍हाठीचा !!
=====
यःकिंचित चारोळीकर
जागोजगी = नो टायपो जागो =जागे व्हा सर्वत्र जगी =जगाच्या कोपर्यात जिथे मराठी आहे तिथपर्यंत.

स्पंदना's picture

22 Apr 2015 - 2:38 pm | स्पंदना

आवर्जुन येथे येउन कौतुकाने पुपोचा आस्वाद घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद मंडळी.

हसरी's picture

23 Apr 2015 - 11:34 am | हसरी

मस्त!!
तोंडाला पाणी सुटलं.

तुम्ही केली आहे ती तेलपोळी आहे का? आमच्याकडे तांदुळाच्या पीठावर लाटतात.

पुरण करणे ही पायरी मी गाठलेली आहे. पुढची पायरी चढणे अजून काही जमत नाही :-( तयार कणकेत पुरण भरून पोळ्या लाटून भाजल्या आहेत, पण स्वतंत्रपणे पुरणपोळीची कणीक तिंबणे अजून जमत नाही, म्हणजे पोळी भाजल्यावर कडक होते :-(
तुम्ही कणकेचा उंडा पाण्यात घालून ठेवला आहे, ती खास टीप असावी असं वाटतंय. पाण्यात बुडवून ठेवल्याने काय होतं?
तश्या पद्धतीने कणीक भिजवून तिंबणे असा प्रयत्न करून बघायला हवा. पोळी जमली तर इथे कळवेनच.

पिलीयन रायडर's picture

23 Apr 2015 - 12:05 pm | पिलीयन रायडर

असा स्वयंपाक एकाच दिवशी, एकहाती आणि वेळेत जमेल तर क्या बात है!
तुला मी काय कॉम्प्लेमेंट देणार.. तुझ्या कडुन शिकुनच तर चाल्लय!!

बाकी पुपो मध्ये हळद घालतात हे पहिल्यांदाच पाहिलं!

जयंत कुलकर्णी's picture

23 Apr 2015 - 3:54 pm | जयंत कुलकर्णी

मी एकच पुरणपोळी खातो पण अशी....
पोळी चांगली तुपात परतून घ्यायची.
त्याची घडी घालून त्यात (घडीत) गुलकंदाचा एक हलकासा थर (जास्त नाही)
वर पातळ तूप व पिस्ते व केशराच्या दोनचार काड्या घालतो. मिठाची एक चिमुट...पसरुन.
मग हे सगळे प्रकरण एका पसरट भांड्यात दुधात (साईसकट) भिजवून (पोळी बुडेपर्यंत) फ्रिजमधे (खाली) ठेवायची
सकाळी जेवणानंतर बाहेर काढून त्यावर मध पसरायचा....
आणि मग ब्र्ह्मानंदी टाळी..........

खाऊन बघा...... :-)

स्पंदना's picture

24 Apr 2015 - 1:20 pm | स्पंदना

अनन्न्या's picture

23 Apr 2015 - 6:56 pm | अनन्न्या

मला पुरण पोळी बरोबर नारळाचे दूध आवडते, कटाची आमटी.. वा वा!

स्पंदना's picture

24 Apr 2015 - 1:21 pm | स्पंदना

नारळाच दूध? गुळ घालून?

मी पण खाऊन पहाते.

नूतन सावंत's picture

25 Apr 2015 - 10:52 pm | नूतन सावंत

स्पंदनाताई,तुझी पुरणपोळी तर आवड्लीच.पण ते सणाचे वर्णन करणारे गाणे माझी आई म्हणत असे.वाचताना तिचाच आवाज कानी येऊ लागलाआणि शब्द दिसेनासे झाले.

सूड's picture

27 Apr 2015 - 5:53 pm | सूड

तेलपोळ्या आठवल्या!! ;)

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2015 - 12:09 pm | स्वाती दिनेश

क्या बात! क्या बात! क्या बात!
अप्पु, अग ही पुपो आणि तिचे साग्रसंगीत वर्णन.. अहाहा.. केवळ सु रे ख!
सुंदर लिहिले आहेस आणि चवीबद्दल,पाक्रू बद्दल तर क्या केहने?
स्वाती

अहाहा कसले सही दिसतेय ताट!! आमटी साठी तर मी हि पुरणाचा घाट घालते ...माझी आमटीची कृती अगदी अशीच आहे अप्पुताई ....

पद्मावति's picture

9 Jul 2015 - 4:37 pm | पद्मावति

मिपा वर पाककृती चं पान पाहात होते. पुरणपोळी चं नाव बघून थांबले. रिसेपी वाचुनच अगदी मस्तं वाटलं. नुसती पुरणपोळी नाहीतर त्याबरोबर कोशीम्बीर, भाजी, आमटि छान अगदी साग्रसंगीत. सगळ्याची तपशीलवार कृती, फोटो आणि लिहिण्याची अतिशय रंगतदार शैली.......बढ़िया .....खरोखर अप्रतिम.

Sanjay Uwach's picture

11 Jul 2015 - 8:04 pm | Sanjay Uwach

स्पंदना ,तुझा पुरण पोळीचा बेत खुपच छान वाटला ,पुरण पोळी ,उकडीचे मोदक ही महाराष्टाची खास ओळख आहे . कोल्हापुरातील माझ्या गावी देखिल देवाला वाजत गाजत ,ढोल ताशाच्या गजरात पुरण पोळीचा गोडा नैवेध्य दाखवून आमच्या इथे जत्रा चालू होत आसे . सद्या पिझ्झा बर्गरच्या जमान्यात पुरण पोळीची ओळक विसरू नये असे वाटते

ऑ! संजय क्षीरसागरने डुआयडी घेतला की काय? तोही प्रत्येकाला अरे-तुरेच करायचा.