माझे फोटोग्राफीचे प्रयोग!

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in मिपा कलादालन
19 Apr 2015 - 12:42 am

पहिल्यांदाच गद्य लिहित आहे त्यामुळे जरा सांभाळून घ्या. काही चुका झाल्या असतील तर दुरुस्ती सांगा.

शिक्षण आणि नंतर नोकरी यामुळे घरापासून लांब राहायला लागत असल्यामुळे घरी जायची ओढ कायमच असते.
पण साताऱ्यात आल्यावर पाय घरात काही रहात नाही! लहानपणापासूनच अजिंक्यतारा, यवतेश्वर, जरंडेश्वर यासारख्या डोंगरांवर फिरण्याची जी सवय (किंवा आवड म्हणा!) लागली ती अजूनही कायम आहे! त्यामुळे घरी आल्यावर या डोंगरांना भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही…
यावेळी चांगला कॅमेरादेखील सोबत होता त्यामुळे आल्या आल्याच अजिंक्याताऱ्यावरून सूर्योदय पाहण्याचा बेत पक्का केला.

घरी जाहीर केल कि, मी आणि वैभव उद्या पहाटे ५ला उठून अजिंक्यताऱ्यावर सूर्योदय पाहायला जाणार आहोत! सुट्टीला घरी आल्यानंतर ज्याची १०-११ला सकाळ होते, तो पहाटे ५ला कसा उठणार आहे याची शंका आणि औस्तुक्य हे दोन्ही भाव घरच्यांच्या चेहऱ्यावर मला एकत्रच दिसले! पण मी सुद्धा चंग बांधला होता कि काहीही झालं तरी आता पहाटे उठायचं, इज्जत का सवाल है! आणि अगदीच झोप लागली तर वैभ्या फोन करून उठवेलच हि आशा होती…
पण सुदैवाने वेळेवर जाग आली आणि आम्ही दोघेही अजिंक्यताऱ्याच्या दिशेने निघालो.

किल्ल्यावर पोहोचल्यावर देवीच दर्शन घेतलं आणि फोटो काढायला बरी पडेल अशी जागा पाहू लागलो. एक जागा बरी वाटली म्हणून तिथे थांबलो. आकाशात थोडे फार ढग होते त्यामुळे सूर्योदय दिसेल कि नाही याची शंका वाटत होती. हळू हळू प्रकाशही वाढत चालला होता त्यामुळे कदाचित सूर्य उगवला आहे आणि ढगांमुळे आपल्याला दिसत नाहीये असे वाटू लागले. तेवढ्यात वैभ्या म्हणाला, "ती घार बघ किती जवळून उडत आहे, फोटो काढता येईल का?" हे वाक्य पूर्ण होतानाच घारीने त्याच्या डोक्यावर टोच मारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता! तो दोन्ही हात डोक्यावर ठेऊन जोरात ओरडला. त्यावरून घार आम्हाला पोज देण्याच्या नाही तर हल्ला करण्याच्या मुड मध्ये आहे हे स्पष्ट झाले. मग आम्ही दोघपण डोक्यावर हात ठेऊन पळत सुटलो. घारीने अजून एक दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला किंवा ती फक्त आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित तिचे घरटे तिथे जवळपास असणार. आम्ही काही अंतर पळाल्यावर तिने पाठलाग करणे बंद केले आणि सकाळी सकाळी आमचा पळण्याचा व्यायाम संपला.

या सगळ्या गडबडीने सुर्यादेवांची झोपमोड झाली आणि त्यांनी ढगांची चादर बाजूला सारून आम्हाला दर्शन दिले! आमची "मेहनत" सार्थकी लागली होती. आता मनासारखे फोटो मिळणार या विचाराने आम्ही दोघपण खुश झालो.

दर्शन!
darshan1

darshan2

हेच फळ खाण्याची छोट्या हनुमानाची इच्छा झाली असावी
fruit

कॅनवासवर काढलेल्या चित्राप्रमाणे सूर्य भासत होता, निसर्ग खरोखर फार मोठा कलावंत आहे हे जाणवत होत…
painting1

painting2

painting3

मनासारखे फोटो काढल्यानंतर मन तृप्त झाले होते पण काहीच खाल्ले नसल्याने पोटात कावळे ओरडू लागले होते. त्यामुळे लगेचच परत निघालो.
आता सूर्याचे फोटो तर मिळाले पण चंद्रावर अन्याय नको या उदात्त हेतूने मग एके रात्री चंद्रदेवांचेही फोटो काढले!

moon1

चंद्रावर असलेली विवरे त्याचे सौंदर्य कमी करतात असे काही लोकांचे म्हणणे असते पण खर तर ती त्याच्या सौंदर्यात भरच टाकतात असे माझे तरी मत आहे. नाहीतर नुसता सपाट पांढरा गोल पाहण्यात काय मजा आहे?

moon2

moon3

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

19 Apr 2015 - 4:55 am | संदीप डांगे

क्यामेरा आन नळकांडं कंचं भौसायेब?

शब्दबम्बाळ's picture

19 Apr 2015 - 2:14 pm | शब्दबम्बाळ

कॅमेरा : Canon PowerShot SX50 HS
नळकांडे त्याला आहे तेच पुष्कळ मोठे आहे! :)

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 5:46 am | श्रीरंग_जोशी

फोटोज अन वर्णन आवडले. चंद्राचे फोटोज तर खूपच खास आहेत.
वर संदीप यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. पोस्टप्रोसेसिंग केले असल्यास त्याबाबतही लिहू शकता.

सूचना - मिपावर फोटोज प्रकाशित करताना अपवाद वगळता फोटोची रुंदी ६४० पेक्षा अधिक ठेऊ नये. फोटोज लेखनसीमा ओलांडून उजव्या बाजुच्या दुव्यांच्या जागेत अतिक्रमण करतात.

अवांतर - सुर्याचे फोटो पाहून माझा जुना धागा आठवला - रवीतेज.

शब्दबम्बाळ's picture

19 Apr 2015 - 2:26 pm | शब्दबम्बाळ

पोस्ट प्रोसेसिंग केलेलं नाहीये. अपर्चर कमी जास्त करून फोटो काढले आहेत.
पोस्ट प्रोसेसिंगची कला अजून शिकलो नाहीये!
आणि सूचनेबद्दल आभारी, पुढे काळजी घेईन! :)

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 6:28 pm | श्रीरंग_जोशी

फोटो मोठ्या आकारमानात दाखवायचे असतील तर. लेखातल्या फोटोजवर मूळ फोटोचा दुवा ठेवावा. दुव्यामध्ये target = "_blank" असे जोडावे. म्हणजे वाचकांना फोटोवर क्लिक करून नव्या टॅबमध्ये मूळ आकारमानातला फोटो बघता येईल. लेखातल्या फोटोची रूंदी img width = "640" वापरून मर्यादीत करावी.

माझ्याकडेही याच पिढीतला जुना कॅमेरा आहे कॅनॉन एसएक्स ३० आयएस. ३५x झूम असल्याने ऐन वेळी कामात पडतो.

आमच्या या शेजार्‍याने काही दिवसांपूर्वी अचानक दर्शन दिले तेव्हा हाच कॅमेरा कामी आला.

Red Fox

शब्दबम्बाळ's picture

20 Apr 2015 - 8:43 pm | शब्दबम्बाळ

Canon PowerShot मस्त आहेत!
आता तर Canon PowerShot SX60-HS पण आलाय! :)

स्पंदना's picture

19 Apr 2015 - 5:42 am | स्पंदना

झकास फोटो हा भाऊ?
एकदम लंबरी!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Apr 2015 - 8:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेवटचे दोन फोटो कहर आहेत. :)

पॉइंट ब्लँक's picture

19 Apr 2015 - 10:56 am | पॉइंट ब्लँक

फोटो छान आहेत. ३ आणि शेवट्चे दोन सगळ्यात भारी :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2015 - 11:27 am | अत्रुप्त आत्मा

मस्ताड

नांदेडीअन's picture

19 Apr 2015 - 1:11 pm | नांदेडीअन

छान आले आहेत फोटो.

नांदेडीअन's picture

19 Apr 2015 - 1:13 pm | नांदेडीअन

१० डिसेंबर २०११ ला खग्रास चंद्रग्रहण होते.
त्या रात्री हा फोटो काढला होता.
Camera - Panasonic FZ18
moon

नांदेडीअन's picture

19 Apr 2015 - 1:19 pm | नांदेडीअन

माफ करा, अजून ३ फोटो टाकतोय तुमच्या धाग्यावर.
या फोटोसुद्धा ४ वर्षापूर्वी Panasonic FZ 18 या कॅमेर्‍याने काढल्या होत्या.

moon
moon
moon

शब्दबम्बाळ's picture

20 Apr 2015 - 8:12 pm | शब्दबम्बाळ

सर्वांचे आभार! :)