मिपा संपादकीय - संगणक आणि मराठी साहित्य.

संपादक's picture
संपादक in विशेष
18 Aug 2008 - 12:42 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

संगणक आणि मराठी साहित्य.

फार फार काळापूर्वीची गोष्ट. अगदी साठी-सत्तरीच्या दशकातली! हल्लीच्या तरूण पिढीला अगदी पुराणातल्या भूर्जपत्रावरील वाटावी अशी कथा!!
मराठी तरूण तेंव्हा नुकतेच सीमोल्लंघन करून सातासमुद्रापार जायला सुरवात झाली होती. नाही म्हणजे, त्यापूर्वीही ते परदेशी शिकायला जात असत. पण ते म्हणजे इंग्लंडला, तांत्रिक शिक्षण असेल तर जर्मनीला. मराठी विद्यार्थ्यांनी कोलंबसाच्या देशात शिक्षणाला जायची सुरुवात प्रामुख्याने साठी-सत्तरीच्या दशकातच सुरू झाली. आयआयटीतून निघालेले ते बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरूण! सहस्ररश्मी सूर्याप्रमाणे जणू अवघं आकाश पादक्रांत करण्यास निघाले होते.... या नवीन जगात त्यांना सगळंच अपरिचित होतं. तत्कालीन सर्वसामान्य अमेरिकावासीयांना तेंव्हा भारत हा एक शांतताप्रिय पण मागासलेला देश आहे यापेक्षा फारसं अधिक काही माहिती नव्हतं. तेंव्हा मी इंडियन आहे असे सांगितल्यावर प्रश्न यायचा की कोणती जमात? (विच ट्राईब?) संदर्भ अर्थात रेड इंडियन लोकांचा.

त्या तरूणांच्या विद्यापीठांमध्ये जरी अत्युच्च पातळीवरचं शिक्षण दिलं जात होतं पण बहुतांशी पारंपारिक पद्धतीचं होतं. तसे संगणक होते पण ते पंचकार्डवाले किंवा अगदी पुढारलेले म्हणजे २८६, ३८६. "खिडक्या" नव्हत्या. आज्ञावली पाठ करायला लागायच्या (एफ१० = सेव्ह फाईल!). क्रे सुपरकॉम्प्यूटरवर तुम्हाला सीपीयू टाईम मिळणे ही तुमच्या संशोधनासाठी अभिमानाची आणि किंचित गर्वाचीही बाब असे. इ-मेल टेक्स्ट स्वरूपात होती पण भारतातील लोकांकडे ती नसल्याने तिचा मराठी घडामोडी समजून घेण्यासाठी काही उपयोग नव्हता. पाठवलेले पत्र भारतात पोचायला तीन आठवडे आणि दिलेले उत्तर (लगेच दिले असेल तर!) परत मिळायला आणखी तीन आठवडे सहज लागत. त्यामुळे कौटुंबिक खुशाली जरी समजली तरी सामाजिक चर्चा करणे शक्यच नव्हते. फोनही ट्रंक कॉल! एकतर ते परवडत नसत आणि ते भरवशाचेही नसत. कधी लाईन डिस्कनेक्ट होईल याचा नेम नसे...

खिडक्या (विंडोज) आल्या आणि चित्रच बदललं. पेंटियम टेक्नॉलॉजी आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज यामुळे सुशिक्षित पण सामान्य माणसापर्यंत संगणक जाऊन पोहोचला. ए-मेल्समुळे तात्काळ संपर्क साधता येऊ लागला. अटेचमँट पाठवायच्या सोईमुळे विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. त्यातच संकेतस्थळे आणि वैयक्तिक ब्लॉग्ज करता येऊ लागले आणि मराठी (आणि जागतीक) साहित्यविश्वात जणू क्रांतीच झाली. आधी आपली माणसे रोमन लिपी वापरून मराठी लिहू लागली. त्यानंतर काही बुद्धिमान मराठी मुलांनी इंग्रजी क्व्रर्टी कळफलक वापरून मराठी लिहिता येईल असे प्रोग्राम्स रचले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पब्लिक डोमेनमध्ये (विनामोबदला उपलब्ध) ठेवले. मराठी भाषेवर आणि साहित्यावर या मुलांचे अनंत अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे आजवर इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा अरसिक (?) व्यवसायात गुंतलेल्या अनेक मराठी माणसांची प्रतिभा जणू उफाळून आली. तीच गोष्ट संकेतस्थळांच्या मालकांची! पदराला तोशीस सोसून त्यांनी मायबोली, मिसळपाव, उपक्रम, मनोगत यांसारखी संकेतस्थळे चालू ठेवली आहेत. उद्या जर मराठी भाषेचा इतिहास लिहिला गेला तर या दोन गोष्टी देणार्‍या व्यक्तिंना तिथे मानाचं पान द्यावंच लागेल. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या उक्तीप्रमाणे घरोघरी मराठी माणसे ललित लिखाण करण्याचा प्रयत्न करू लागली. संकेतस्थळांवर जाऊन चर्चा, विचारविनिमय, आणि हो, कधीकधी भांडणेही करू लागली. आणि सर्व गोष्टींचा मराठी साहित्यावर बहुअंगाने परिणाम झाला.

प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी वृत्तपत्रे जालावर उपलब्ध झाली. एकाच एक वर्तमानपत्राची वर्गणी लावून तेच ते वाचण्याची सक्ती संपली. जर तुमच्याकडे जाल असेल आणि वाचनाची ताकद व वेग असेल तर तुम्हाला ८-१० वर्तमानपत्रे रोज वाचण्याची सोय उपलब्ध झाली. लोकसत्ता, मटा, सकाळ या आघाडीच्या दैनिकांबरोबरच लोकमत, पुढारी, गोमांतक वगैरे प्रांतिक (रीजनल) वर्ततमानपत्रे जालावर वाचायला मिळू लागली. त्यातून फायदा हा झाला की अग्रगण्य वृत्तपत्रांचे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाविषयीचे अज्ञान किती थोर आहे याची वाचकांना जाणीव झाली. महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे नागपूर व औरंगाबाद नव्हे आणि मराठी माणसाचा हुंकार हा तथाकथित आयटी/औद्योगिक उद्द्योगात काम करणार्‍या माणसाचे मनोगत नव्हे याची जाणीव झाली. विदर्भातल्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याची समस्या किती भीषण आहे ते मुंबई-पुण्यातल्या पोकळ चर्चेपेक्षा (जी चर्चा मानवी जीवांच्या आत्महत्या आणि एका मंत्र्याच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चाललेल्या कारवाया एकाच मापात मोजते!) किती भिन्न आणि गंभीर आहे ते समजलं.

दुसरे म्हणजे मराठी मनाचा आत्मविश्वास वाढला. मी काहीतरी रुटूखुटू का होईना पण लिहू शकतो. ते लोकांना आवडू शकतं हे समजल्यामुळे अजून लिहिण्याची, वैचारिक असो वा ललित, इच्छा निर्माण झाली. पूर्वी मराठी लिखाण म्हणजे विद्यापीठात हायर मराठी घेतलेल्या विद्वान प्राध्यापकांचे काम! ही आपली लाइन नव्हे हा जो काही न्यूनगंड सायन्स आणि कॉमर्सच्या मुलांमध्ये होता तो नाहीसा झाला. ही मुलं प्रथम आपल्या अभ्यासाच्या विषयावर आणि नंतर (हळूच! गुपचूप!! टोपण नावाखाली!!!) ललित लेखन करुन पाहू लागली. मुळात अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांनी लिहिलेलं लिखाण कसदार ठरू लागलं. मराठी साहित्याच्या दालनात एक अल्हाददायक, मोकळी हवा खेळू लागली. नवीन ताज्या दमाची जाल-लेखकांची फळी निर्माण झाली. वर्ड प्रोसेसिंगचा आणखी एक फायदा म्हणजे लिखाणात सुधारणा करण्यासाठी लिहिलेले कागद फाडून पुनःपुनः लिहिण्याची सक्ती संपली. वर्ड प्रोसेसरच्या स्क्रीनवर तिथल्यातिथे सुधारणा करता येऊ लागली. कागदी पुस्तक प्रकाशन व्यवसायातही छपाईचे खिळे जुळवण्याची गरज नाहीशी झाली. लिखाण संगणकावरच ऑफसेट करून थेट छपाईला पाठवायची सोय उपलब्ध झाली, प्रकाशनातली गुंतागुंत आणि खर्च कमी झाले.

तिसरे म्हणजे मराठीतील तथाकथित प्रकाशकांची मक्तेदारी संपली. पूर्वी लेखकाला प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढायला लागायच्या. नाही नाही त्या अटी सहन करायला लागायच्या. लोकप्रिय विषयांवरच लिखाण करायचं, समाजाला अप्रिय विषयांवर लिखाण केलं तर ते खपणार नाही म्हणूनच कोणताही प्रकाशक ते प्रकाशित करणार नाही ही भीती गेली. मला जे आवडतं आणि पटतं ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन मग त्याला कोणी वाचक नाही मिळाले तरी बेहत्तर ही एक अत्यंत आवश्यक असलेली कलंदरी लेखकांमध्ये निर्माण झाली. समाजाला न रुचणार्‍या (उदा. नास्तिकता, आदरणीय व्यक्तींच्या कार्याचे मूल्यमापन, समलिंगी संबंध) लेखनालाही प्रसिद्ध करण्याचं धैर्य लेखकांमध्ये आणि संकेतस्थळांच्या संचालकांमध्ये निर्माण झालं. त्यातून पूर्वापार चालत आलेली " मायबाप रसिक वाचक" ही भूमिका नाहीशी झाली. पूर्वीही ही भूमिका प्रामाणिक नव्हतीच, आपली पुस्तके लोकांनी विकत घेउन वाचावीत, आपण वाचकांच्या "गुड बुक्स" मध्ये असावं यासाठी पूर्वीच्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी वापरलेली ती एक क्लुप्ती होती. आता मी मला जे पटतं ते लिहीन, जर वाचकांना आवडलं तर वाचकांनी माझ्या साईटवर येऊन ते वाचावं अशी भुमिका काही कलंदर लेखकांनी घेतल्यावर पारंपारिक मराठी वाचक भांबावला, क्षणभर संतापलाही. पण त्याला लगेच जुन्या "मायबाप वाचक!" मधला खोटेपणा कळून आला आणि त्याने आपल्या आवडीच्या लेखकांच्या साईटसचे फेव्हरिट्स बनवले आणि वेळोवेळी तो तिथे चक्कर टाकू लागला. प्रकाशकांची सद्दी संपली. उद्या मराठीचं भवितव्य काय ही जी प्रचलित लेखक-प्रकाशकांकडून ओरड ऐकू येते आहे त्याचे मूळ हे आता आपलं कसं होणार या भवितव्याविषयीच्या चिंतेत आहे. आज अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात यांच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते आहे. उद्या त्या लोकांच्याही हाती संगणक आणि आंतरजाल गवसलं की आपलं काय होणार या भीतीतून ही ओरड होते आहे....

चौथे म्हणजे अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही. मराठी मनाशी, महाराष्ट्रातील घटनांशी ज्याला आत्मीयता आहे तो मराठी माणूस ही नवीन व्याख्या रूढ झाली. पूर्वी महाराष्ट्रात रहाणारा पण जेमेतेम एक मराठी वर्तमानपत्र वाचणारा आणि क्वचित एखादे मराठी पुस्तक विकत घेणारा स्थानिक माणूसही अनिवासी मराठी माणसांना सहज हिणवू शकत असे. आता आयटी उद्योगाने बरीच पंचाईत केली आहे. आपण उगाच अनिवासी मराठी लोकांवर टीका करायची आणि आपलीच मुलगी/ मुलगा, भाचे. पुतणे पाश्चात्य देशांत असायचे!! त्यामानाने आमच्या पिढीने खूप सोसलं.!!!! आता ती सोय गेली. एखादा अनिवासी मराठी माणूसही सात-आठ वर्तमानपत्रे रोज वाचून महाराष्ट्रातल्या घटनांशी परिचित असू शकतो. स्थानिक मराठी माणसाप्रेक्षा त्याचे मराठी वाचन अधिक चौफेर असू शकते ही गोष्ट सिद्ध झाली. काही माणसांच्या ही वस्तुस्थिती पचनी पडायला अजून वेळ जातोय पण स्थानिक शहाण्या मराठी माणसांनी ही गोष्ट कधीच मान्य केलीय. भौगोलिक अंतरापेक्षा 'मराठी असणे' ही वृत्ती जास्त महत्त्वाची ठरते आहे. त्यातूनच मराठी साहित्यसंमेलन बे-एरियात भरवण्यासारखे प्रस्ताव पुढे येत आहेत.......

या सर्व बदलांचा भविष्यातील मराठी साहित्यावर काय प्रभाव पडेल? विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे धावत आहे की भविष्याबद्दल कल्पना करणंही कठीण आहे. एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल. छापील साहित्यावर विसंबून रहाणारी आज वयस्कर असलेली पिढी जसजशी काळाच्या पडद्याआड अस्तंगत होत जाईल आणि नवी आंतरजालावर वावरणारी पिढी निर्माण होईल तसतसे कागदावरच्या पुस्तकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. थोडक्यात प्रकाशक ही संस्था नामशेष होत जाईल. कागदविहीन साहित्य (पेपरलेस लिटरेचर!) ही नवी संकल्पना रूढ होईल. मराठी माणसांना निरनिराळ्या विषयांवरचे त्यांच्या आवडीचे लिखाण वाचायला मिळेल. मी आता "किर्लोस्करचा' दिवाळी अंक विकत घेतलाय त्यामुळे मला आता त्यातल्या आवडत नसलेल्या कविता आणि लेखही वाचायलाच लागतायत ही अगतिकता संपेल. मराठी मासिकांना जर जगायचे असेल तर त्यांना त्यांच्या अंकांच्या इ-आवॄत्या काढायलाच लागतील. लोकप्रभासारख्या साप्ताहिकांनी ही सुरवात आता केलीच आहे. वाचकांनाही आपल्याला आवडीच्या लेखकांचे नवीन लिखाण त्यांच्या साईटवर जाउन मोफत वाचायची मुभा मिळेल. लेखकांना प्रकाशकाच्या मेहेरबानीवर अवलंबून न राहता त्यांच्या मनातील विषयांवर लिहायची मोकळीक मिळेल. प्रचलित नसलेले अनेक विषय लिखाणात येतील. मराठीची दिवसेंदिवस दुर्दशा होतेय असा जो काही हितसंबंधी लोकांनी चालवलेला धोशा आहे त्यातला फोलपणा उघडकीस येईल. मराठी साहित्यसंमेलने महाराष्ट्राखेरीज अन्यत्रही होऊ लागतील. आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल. केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर सर्व जगभर पसरलेला समस्त मराठी समाज एकमुखाने गर्जेल!

येळकोट येळकोट, जय मल्हार!
आई अंबाबाईचा, उदो उदो!!
हर हर हर हर महादेऽऽव!!!

पाहुणा संपादक : पिवळा डांबिस.

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

18 Aug 2008 - 12:54 am | एकलव्य

पिडाकाका - धावता आढावा आवडला.

संगणक आणि मराठी साहित्य याचबरोबर "जागतिक मराठी" (ग्लोबल मराठी) असे काहीसे शीर्षकही अधिक भावले असते. तसेच विषय बराच मोठा आहे आणि इतरही अनेक अंगे तुम्ही आणखी एखादी लेखमाला लिहून मांडावीत ही विनंती.

(मराठी) एकलव्य

इनोबा म्हणे's picture

18 Aug 2008 - 1:01 am | इनोबा म्हणे

लेख आवडला

विषय बराच मोठा आहे आणि इतरही अनेक अंगे तुम्ही आणखी एखादी लेखमाला लिहून मांडावीत ही विनंती.
हेच म्हणतो

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्राजु's picture

18 Aug 2008 - 1:36 am | प्राजु

व्याप्ती खूप मोठी आहे. तरिही अतिशय सुंदर मुद्दे तुम्ही मांडले आहेत.
आणि तुम्ही जसे म्हणालात की, भारताबाहेर राहूनही आपण उत्तम मराठी वाचक बनतो.. हे १००% खरं आहे. याचा मला अनेकदा प्रत्यय आलेला आहे. मी पुण्यात असताना म्हणजे मराठीच्या राजधानीत असतानाचा माझा मराठी साहीत्याशी आलेला संबंध आणि आता इथे अमेरिकेत आल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून साहीत्याशी येणारा संबंध पहाता "एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल" आपले हे वाक्य १००% पटते. लेख अतिशय आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

18 Aug 2008 - 2:07 am | मुक्तसुनीत

डांबिसखानचे आम्ही फ्यान आहोत हे या आधी वेळोवेळी नमूद केले आहे. त्यांच्या लौकिकाला डांबिस जागलेत. लेख प्रवाही , बांधून ठेवणारा झाला आहे. लिखाणातील सहजता, ठसठशीत मुद्दे , आणि एकेका मुद्द्याच्या सांगोपांग आढावा या गोष्टींमुळे त्यांचा हा फ्यान खूष आहे :-)

आता काही मुद्दे.

एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल. छापील साहित्यावर विसंबून रहाणारी आज वयस्कर असलेली पिढी जसजशी काळाच्या पडद्याआड अस्तंगत होत जाईल आणि नवी आंतरजालावर वावरणारी पिढी निर्माण होईल तसतसे कागदावरच्या पुस्तकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल.

वरील विधान मी जरा आताच्या परिस्थितीशी पडताळून पहातो तेव्हा मला जाणवते , की सर्वसाधारण संप्रेषण , मनोरंजन , "जोडले जाण्याच्या" भावनेचा परिपोष , या दृष्टीने उपरोक्त मुद्दे तंतोतंत लागू आहेत. पण कुठल्याही विषयाचा थोडा खोलात जाऊन करायचा अभ्यास, लागणारे संदर्भ , इतकेच कशाला उत्तमोत्तम ललित लिखाण - अगदी आजच्या घडीला तयार होणारे - या सर्व बाबींकरता मला माहितीच्या परंपरागत मूलस्त्रोतांकडे , म्हणजेच संदर्भग्रंथ, विविध विषयांवरची पूर्वसूरींनी आणि सद्यकाळातील लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कादंबर्‍या, काव्यसंग्रह यांकडे वळावे लागते. अजूनही आपल्या गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी , सकलसंतगाथा, बखरी, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, चिपळूणकरांपासून तळवलकरांपर्यंतचे लिखाण , आंबडकरांपासून नरेंद्र जाधवांपर्यंतचे , बाळकरामांपासून पुलंपर्यंत आणि कणेकर-प्रभावळकर यांसारख्यांचे लिखाण , आत्मचरित्रे, राजवाडे-शेजवलकरांपासून दुर्गा भागवत- विश्वास पाटलांपर्यंतचे लिखाण अशा अनेकानेक मिती कागदांमधे आहेत. या दृष्टीने सामान्य विधान करायचे तर , वी हॅवन्ट इवन स्क्रॅच्ड् द सरफेस !

थोडक्यात एकमेकांबरोबरचे आचारविचारांचे प्रदान, माहितीची आणि भावनांची देवाणघेवाण या गोष्टींमधे उत्तम प्रगती आपण केली आहे, पण गतकालातील हिरण्याचा खजिना आहे त्या ग्रंथांमधेच आहे.

माझे विवेचन डांबिसांच्या मूळ विवेचनाला छेद देणारे नसून , थोडी भर घालणारे आहे असे मी मानतो. चूभूद्याघ्या. !

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 11:25 am | विसोबा खेचर

लेख प्रवाही , बांधून ठेवणारा झाला आहे. लिखाणातील सहजता, ठसठशीत मुद्दे , आणि एकेका मुद्द्याच्या सांगोपांग आढावा या गोष्टींमुळे त्यांचा हा फ्यान खूष आहे

मुक्तरावाशी सहमत...डांबिसाचा अग्रलेख सुंदरच झाला आहे....

तात्या.

स्वांतसुखाय's picture

18 Aug 2008 - 4:31 am | स्वांतसुखाय

अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही.

हे एकदम पटले. पण ओरीजीनल पुणेकरांना कदाचित पटणार नाही.

भाग्यश्री's picture

18 Aug 2008 - 5:26 am | भाग्यश्री

पिडाकाका, अग्रलेख खूप आवडला.. आम्हाला माहीत नसलेला विंडोज्,इमेल्सपूर्वीचा काळ थोडक्यात उभा केलात..! मजा आली वाचायला..
आजकाल वेगवेगळ्या मराठी साईट्स्,ब्लॉग्स मुळे खरंच इतकं मराठीमधे वाचन होतं की बाहेर आहोत असं वाटतच नाही.. मराठीशी नाळ जोडून ठेवण्यात या सर्व साईट्सचा,ब्लॉग्सचा खूप हात आहे...

वैशाली हसमनीस's picture

18 Aug 2008 - 6:35 am | वैशाली हसमनीस

लेख आवड्ला.

सहज's picture

18 Aug 2008 - 6:40 am | सहज

मराठीची दिवसेंदिवस दुर्दशा होतेय असा जो काही हितसंबंधी लोकांनी चालवलेला धोशा आहे त्यातला फोलपणा उघडकीस येईल. मराठी साहित्यसंमेलने महाराष्ट्राखेरीज अन्यत्रही होऊ लागतील. आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल.

सहमत.

लेख गोषवारा/उहापोह आवडला.

बेसनलाडू's picture

18 Aug 2008 - 11:16 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मदनबाण's picture

18 Aug 2008 - 7:54 am | मदनबाण

काकाश्री मस्तच..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अनिल हटेला's picture

18 Aug 2008 - 8:20 am | अनिल हटेला

मस्तच !!!

अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही.

हे एकदम पटले. पण ओरीजीनल पुणेकरांना कदाचित पटणार नाही.

काय हे ?

समजल नाय बॉ !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

सर्किट ली's picture

18 Aug 2008 - 8:36 am | सर्किट ली (not verified)

ड्यांबीसकाका,

एक धावती नजर टाकली अग्रलेखावर. आवडला. फ्लो (मांडणी) सुंदर आहे.

उद्या नीट तपशिलात जाऊन मग योग्य तो प्रतिसाद देईन.

- सर्किट

यशोधरा's picture

18 Aug 2008 - 9:17 am | यशोधरा

अतिशय सहज, प्रवाही आणि निवडलेल्या विषयाला न्याय देणारे असे लेखन खूप आवडले.

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Aug 2008 - 9:21 am | श्रीकृष्ण सामंत

मला लेख आवडला.
संगणक नसता तर मी कदाचीत ह्या वयावर लेखन केलंच नसतं.आता दहा बोटं "की बोर्डावर" आणि " डोळे "स्क्रिनवर" ठेवल्यावर ,मेदुतून भन्नाड सुटणारी अक्षरं "दख्खनच्या राणी" च्या वेगाने अक्षरांच्या ओळी आणि ओळ्यांचे परिच्छद करून लेखन केव्हा संपलं हे कळतच नाही.(केव्हा पुणं आलं ते कळतच नाही)
नवीन फोल घ्यायला नको,शाई संपत नाही,रिफील बदलायला नको. मधूनच सुचलेला विचार दोन ओळीच्या मधे गिरपीटायला नको.
घेतला लेख, केला "कॉपी पेस्ट" आणि चढवला आपल्या "ब्लॉगवर".
"छापखान्यात" जायला नको,पब्लिशरच्या दाढीला हात लावयला नको.
वाचक,समिक्षक.टिकाकार,प्रतिक्रियाकार लागलीच हजर.
"हाय काय नी नाय काय"
वेळ मजेत जातो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मराठी_माणूस's picture

18 Aug 2008 - 9:21 am | मराठी_माणूस

विदर्भातल्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याची समस्या किती भीषण आहे ते मुंबई-पुण्यातल्या पोकळ चर्चेपेक्षा (जी चर्चा मानवी जीवांच्या आत्महत्या आणि एका मंत्र्याच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चाललेल्या कारवाया एकाच मापात मोजते!) किती भिन्न आणि गंभीर आहे ते समजलं.

अगदि बरोबर

ऋषिकेश's picture

18 Aug 2008 - 10:07 am | ऋषिकेश

वा डांबिसराव!
संपादकिय भाषा न वापरताही अतिशय मुद्देसुद अग्रलेख व तर्कशुद्ध मांडणी. खूप आवडला.

प्रचलित नसलेले अनेक विषय लिखाणात येतील. ......... आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल.

+++१

बाकी माझ्यामते जर यामुळे खरच छपाई-साहित्य बंद पडलं तर मात्र ती दुर्दैवी घटना असेल. भारतीय पुराणसाहित्य केवळ छापिल स्वरूपात / लिखित स्वरूपात नसल्याने लुप्त झाले. कसदार साहित्य काळात ओघात "वर्चुअल"दुनियेत लुप्त होऊ नये यासाठी जपून ठेवण्यासाठी तरी निदान छ्पाई चालू रहावी (निदान एकतरी हार्ड कॉपी असावीच :) )

बाकी मराठी जालविश्वाचा बांधेसुद धांदोळा घेणारा अग्रलेख खूप आवडला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2008 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे


मराठी मासिकांना जर जगायचे असेल तर त्यांना त्यांच्या अंकांच्या इ-आवॄत्या काढायलाच लागतील.


आमी कवापासुन हेच बोंबलुन र्‍हायलो.

तिसरे म्हणजे मराठीतील तथाकथित प्रकाशकांची मक्तेदारी संपली. पूर्वी लेखकाला प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढायला लागायच्या. नाही नाही त्या अटी सहन करायला लागायच्या.


अस होउ नये म्हणुन स्वतःच प्रकाशित करणे हा उद्योग करावा लागला.आमचा हा प्रतिसाद आठवला. तेव्हा मला टंकन अजिबात येत नव्हते.
पासंपिडा नी आमच्या मनातल लिवलय.या बद्दल धन्यु.
प्रकाश घाटपांडे

जालावर ज्याचे आस्तित्व नाही तो अस्तित्वातच नाही.
असे होणार आहे.
मराठी भाषा त्यातल्या खरेतर लिहियला सोप्या टंकखिळ्या मुळे जालावर जर उशीराच आली.
पण ती दिमाखात नान्देल.
जालावर प्रकाशन हे तसे सोपे आहे पण त्याचा वाचकवर्ग मर्यादीत आहे.
आजही कॉलेजमधल्या कित्येक प्रा ना इमेल पाठवता येत नाही. जालावरच्या वेगवान प्रकाशनामुळे ज्याला चंगले टंकता येते तो ज्येष्ठ असे होउ लागले तर ते भाषा लिहिता न येणार्‍या कित्येकाना त्यांचे विचार लोकांपर्यन्त पोहोवायचे कसे हे एक कोडेच होईल.
पण एक आहे प्रस्थापित /विस्थापित आणि नवखे हा भेद जालामुळे लवकरच सम्पुष्ठेल

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मुक्तसुनीत's picture

18 Aug 2008 - 10:40 am | मुक्तसुनीत

विजुभाऊ ,
जालावर लिहीण्याच्या बाबतीत गुजराती समाजामधे कितपत प्रगती आहे ? व्यापारउदीमात पुढे मानला जाणारा हा समाज ब्लॉगिंग आणि गुजराती भाषेतल्या आंतरजालीय देवाणघेवाणीच्या (विचारांच्या, अर्थविषयक नव्हे !) बाबतीत कुठल्या टप्प्यावर आहे ?

संजय अभ्यंकर's picture

18 Aug 2008 - 10:59 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सुनील's picture

18 Aug 2008 - 12:40 pm | सुनील

लेख उत्तम.

उद्या जर मराठी भाषेचा इतिहास लिहिला गेला तर या दोन गोष्टी देणार्‍या (मराठी टंकलेखनाची सुविधा देणारे आणि संस्थळ चालक) व्यक्तिंना तिथे मानाचं पान द्यावंच लागेल.
सहमत.

जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल.
असहमत.

आज जगात संगणकावर (महाजालावर) सर्वाधिक वापरली भाषा आहे इंग्रजी. पण तरीही इंग्रजी छापील मजकूराचे (वृत्तपत्रे तसेच पुस्तके) यांचे महत्व आणि खप अबाधित आहे. मराठीचेही तसे का होणार नाही?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष's picture

18 Aug 2008 - 12:46 pm | मनिष

मला वाटते, आंतरजालीय मराठी साहित्याची दखल जास्त घेतली जाईल, उत्तरोत्तर त्याला महत्वही प्राप्त होईल; पण छापील साहित्य उपलब्ध राहिलच. नुकतेच काही ऑर्कुट कवींनी त्यांच्या कवितांचे पुस्तक 'छापले'.

बाकी अग्रलेख मुद्देसुद, आणि रेखीव! अभिनंदन!

सर्किट ली's picture

18 Aug 2008 - 1:13 pm | सर्किट ली (not verified)

डांबिसकाका,

अग्रलेख उत्तम आहे.

इतका उत्तम, की हा लेख वाचताना, अरे हे तर आपलेच विचार, असे जाणवले.

परंतु पेपरावर छापलेल्या साहित्याला जालावरच्या साहित्याने धुळीला आधीच मिळवले आहे, असा कुठे तरी सूर जाणवतो. तुम्हाला तसे म्हणायचे नसावे.

पुढे असे घडणार आहे, हे नक्की. पण अद्याप मराठी लेखकांनी झाडांविषयी आपले प्रेम व्यत करून कागद वाचवण्यचे धोरण स्वीकारलेले नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. तो सुदिन भविष्यात फक्त मराठीसाठीच नव्हे, तर सर्वच भाषांसाठी येईल, हे नक्की.

- (आय बी एम ११३० वर पंचकार्डांतून संगणन शिकलेला) सर्किट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डांबिसकाका,

मलाही तुमचा लेख आवडला आणि सर्किटराव, तुमची झाडांवरच्या प्रेमाबद्दलची भविष्यवाणी (का आशावाद का ठोकताळा?) आवडली!

(त्या सुदीनाची वाट पहाणारी) यमी

सर्किट ली's picture

18 Aug 2008 - 11:08 pm | सर्किट ली (not verified)

जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे दुकान, ऍमेझॉन डॉट कॉम, ह्यांनी किंडल नावाचे यंत्र बाजारात आणले आहेच. अर्धा मिलियन एका वर्षात विकले गेलेले आहेत. २००८ मध्ये १ मिलियन किंडल विकले जातील, अशी आशा आहे. (आय पॉड च्या पहिल्या वर्षात देखील एवढे आयपॉड विकले गेले नव्हते, हे येथे लक्षात घ्यावे.)

किंडल सारखी यंत्रे, छोटे आणि स्वस्त घडीचे संगणक, वाय मॅक्स सारखे जाळे ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर ही वेळ लवकरच येणार हे नक्की.

कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या पद्धतीवर गेल्या ५ वर्षांत किती बदल झालाय. हल्ली कॉन्फरन्स प्रोसीडिंग्ज कुणी छापत नाही. सीडी वर देतात, अथवा जालावर प्रकाशित करतात.

वैश्विक तापवृद्धी, झाडांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी महत्वाची ठरली आहेच. आता तरी कागदांचा खप कमी व्हावा. (इंटरनॅशनल पेपर सारख्या कंपन्यांचे समभाग शॉर्ट करा ;-)

- सर्किट

हे सुभाषित संगणक आणि मराठी साहित्य यांनाही कसे लागू पडते, हे सांगणारा हा अग्रलेख आवडला. संगणकामुळे भौगोलिक मर्यादा नष्ट होत आहेत, हा फारच मोठा फायदा आहे. प्रकाशक, वितरक, पुस्तक-विक्रेते यांचे जाळे मुंबई-पुण्यात अधिक असल्याने महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात राहून लेखन करणार्‍या लेखकाला पुरेशी प्रसिद्धी, वाचकवर्ग सोडाच, पण पुस्तक प्रसिद्ध करण्याची संधी मिळणे कठीण होते. ती परिस्थिती आता बदलेल, असे म्हणायला हरकत नसावी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ.प्रसाद दाढे's picture

18 Aug 2008 - 6:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

अग्रलेख आवडला, चा॑गला लेखाजोखा आहे.

रामदास's picture

18 Aug 2008 - 7:22 pm | रामदास

मराठी भाषा .मराठी माणूस. मराठी अस्मिता.मराठी साहित्य.मराठी वाचक . मराठी लेखक .या सगळ्यांना व्यापणारे आणि तरीही अंगुष्ठभर उरणारे आंतरजाल व संगणक यांचे विश्वरूप दर्शन करून देणारा हा संपादकीय लेख सर्वांगसुंदर झाला आहे.
प्राप्त काल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका.
केशवसुतांच्या या ओळीची राहून राहून आज आठवण येत होती.आणिक ग्रंथोपजिविये ...लिहीताना ज्ञानदेवांना काय म्हणायचे होते ते कळले.वाक् यज्ञे तोषावे..असा भविष्यकाळ दाखवून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.
मायक्रोसॉफ्ट विंडोजनी आपल्या घरात विश्व आणूनउभे केले यात शंकाच नाही परंतू आंतरजालाने दुनिया बदलून टाकली.कालच नीलकांत यांच्या नविन लोकायत ची घोषणा वाचली आणि आज हा अग्रलेख.आंतरजालीय साहित्याच लेखाजोखा लिहीला जाईल तेव्हा अशा प्रत्येक प्रयत्नासाठी पान राखले जाईल यात शंका नाही.
न्यूनगंड मक्तेदारी असे संकुचीत शब्द इतिहास जमा करण्याची ताकद या माध्यमांची आहे.
अर्थातच आयआयटीतून निघालेले ते बुद्धिमान . हा उल्लेख इथे फार महत्वाचा आहे.जोखीम घेऊन परदेशी गेलेल्या या आधुनीक सुधारकांनी जगाची दोन टोके एकत्र आणली.
की हा लेख वाचताना, अरे हे तर आपलेच विचार, असे जाणवले
होय मलाही अशीच एकरूपता वाचताना जाणवली.
मा. पिवळा डांबीस बरेच काही लिहावेसे वाटते आहे.असा सुंदर लेख घोट घोट घेत प्यावासा असतो.
परत लिहीणार आहेच .तूर्तास मिपा आणि पाहुण्या संपादकाचे अभिनंदन.

धनंजय's picture

18 Aug 2008 - 7:39 pm | धनंजय

प्रवाही आणि मुद्देसूद.

चतुरंग's picture

18 Aug 2008 - 8:44 pm | चतुरंग

नेटकी मांडणी, स्पष्ट विचार, ठसठशीत मुद्देसूद लिखाण!

आंतरजालाने आणि मराठी टायपाने मोकळा श्वास घ्यायला उद्युक्त करणार्‍या अनेक खिडक्या उघडल्या यात शंका नही. (मी गूगलवरुन बर्‍याचदा ई-मेल्स सुद्धा मराठीतून करतो!)
मनात येणारे अनेक विचार, मग ते कोणत्या घटनेवरचे मत असेल, झालेला आनंद किंवा दु:ख असेल, जमलेली किंवा फसलेली एखादी पाककृती असेल, कविता असेल, विडंबन असेल, काढलेले फोटो असतील हे दर वेळी कोणाला तरी सांगावे, दाखवावे ही माणसाची भूक असते. त्याला लोकांनी बर्‍या-वाईट मताने गोंजारावे-टोकावे असेही वाटते. ते वेळीच झाले नाही की त्या उर्मी दाबून टाकल्या जातात. शिवाय प्रत्येकवेळी बोलून कोणाला आणि कुठे दाखवणार? विचार बोलून न दाखविता आल्याने येणारी घुसमट आणि कोंडमारा ह्या माध्यमाने व्यक्त करण्याची संधी दिली. प्रतिभेला व्यक्त व्हायला योग्य माध्यम मिळालं नाही तर ती बाटलीतल्या राक्षसासारखी कुठेतरी भलतीकडेच अराजक माजवते!
लिहिणारी प्रत्येक व्यक्ती ही अतिशय प्रतिभावान असेलच असे नाही (आणि व्यक्त करताच आले नाही तर व्यक्ती प्रतिभावान आहे की नाही हे तरी कसे कळणार?)
पण त्याला/तिला काय वाटते हे सांगण्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये ही मूलभूत अपेक्षा ह्या माध्यमाने पूर्ण केली ह्यात शंका नाही. आणि म्हणून एकप्रकारे हे माध्यम सौम्य स्तरावरती मानसोपचारचेही काम करते असे माझे मत आहे!
छापील साहित्य एवढ्यात नामशेष होणार नाही. मुक्तरावांनी वर म्हटल्याप्रमाणे अनेक मापदंड हे अजूनही आणि येणार्‍या बर्‍याच कालाकरिता छापलेल्या किंवा हस्तलिखित अवस्थेत असणार आहेत.
झाडांशिवाय कागद तयार करण्याचे शोध जेव्हा पूर्णत्वाला जातील तेव्हा कदाचित झाडांचे नुकसान न होता/करताही छपाई जमू शकेल. छापील साहित्य आणि जालावरचे साहित्य दोन्ही असावे ह्या मताचा मी आहे. दोघांची आपापली बलस्थाने आहेत आपापले कच्चे दुवे आहेत. मला संगणकावरती वाचायला जेवढे आवडते तेवढेच पुस्तक किंवा मासिक हातात घेऊन वाचायलाही आवडते. ई-मेल्स आणि हाताने लिहिलेले पत्र ह्यासारखे थोडेसे.

विविध क्षेत्रातल्या लोकांना साहित्यनिर्मितीचे आणि वाचनाचे योगदान देण्यास प्रवृत्त करणार्‍या ह्या माध्यमाचा वेध घेतल्याबद्दल डांबिसकाकांचे अभिनंदन!

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

18 Aug 2008 - 9:24 pm | स्वाती दिनेश

अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही.
पटले.
एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल
अगदी..
संस्थळावर लिहिलेल्या लेखाला लगेचच मिळणारे प्रतिसाद हे नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून लगेचच मिळणारी दाद असल्यासारखे असल्यानेही बरेच जण जालावर लिहायला प्रेरित होतात.हे एक कारणही आहेच की,:)

अग्रलेखात घेतलेला धावता आढावा आवडला.
स्वाती

सखाराम_गटणे™'s picture

18 Aug 2008 - 10:19 pm | सखाराम_गटणे™

अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही. मराठी मनाशी, महाराष्ट्रातील घटनांशी ज्याला आत्मीयता आहे तो मराठी माणूस ही नवीन व्याख्या रूढ झाली.

सगळ्यात महत्वाचे हे. आजकाल मराठी घरात सुदधा हिंदीत बोलायची फैशन आली आहे, म्हणे काय तर मराठी शब्द अवघड आहेत. (हा अनुभव नुकताच ऐका कांदे-पोह्यात घेतला आहे.) . ह्यांची मने मराठी उरली नाहीत.

आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील.
ह्यामुळे नवीन नवीन अचाट कल्पना साहीत्यात येतील. काय संगावे ऐकादी हैरी पॉटरच्या पातळी ची कथामालिका मराठीत येयील.
नवीन शब्द भाषेत येणे ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे भाषा चांगली संम्रुध होते. आणि महत्वाचे म्हणजे भाषेत जीवंतपणा राहतो.

सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

चित्रा's picture

20 Aug 2008 - 3:18 am | चित्रा

अग्रलेख आवडला, मुद्देही सध्याच्या परिस्थितीचा विचार करता पटण्यासारखेच आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2008 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबिसराव अग्रलेख आवडला.

लेखातील काही मुद्दे पटण्यासारखे तर काही न पटणारे. :)

आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील.

कला शाखेचेच लोक लेखक बनतात हे तितकसं पटत नाही, कोणत्याही शाखेचा माणूस प्रतिभा, व्यासंग, असेल तर उत्तम लेखन करु शकतो. त्यामुळे नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग हे शाखेच्या लोकांवर नव्हे तर प्रतिभेवर अवलंबुन असेल ....असे वाटते.

असो, उशिरा पण एक चांगला अग्रलेख वाचण्यास मिळाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

24 Aug 2008 - 7:14 am | श्रीकृष्ण सामंत

"कला शाखेचेच लोक लेखक बनतात हे तितकसं पटत नाही"
मी शंभर टक्के सहमत आहे.अहो,दूर कशाला माझ्या सारखाच माणूस क्लीष्ट सायन्स मधला,त्यातच इंजीनीअरींग मधला व्यवसाय म्हणजे
"स्कृड्राईव्हर घेऊन लूझ स्कृ टाईट करणं" स्कृ जास्त टाईट झाला तर त्याचं हेड तुटतं.पण मशीन आई गं ! म्हणून ओरडत नाही. म्हणजेच भावना विरहीत असणं.असली ही कामं.
लेखनाची प्रतिभा यायला मनात भावना लागतात.पण कला क्षेत्रातला नसलेला मी लेखन करीतच राहिलोय.आणि मी काय अपवाद म्हणून नाही.अनेक माझ्या सारखे लोक लेखन करीत असणार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com