'च', 'ज' चा उच्चार

लई भारी's picture
लई भारी in काथ्याकूट
16 Mar 2015 - 8:18 am
गाभा: 

'च' या वर्णाचा उच्चार दोन प्रकारे केला जातो.
जसे 'चव', 'चौकशी' इ. मध्ये किंवा 'वाचन', 'चहा' यामध्ये 'च्य' सारखा.

चमचा चा उचार दोन्ही साधे 'च' प्रमाणे करत आलोय, पण काही ठिकाणी विशेषतः बोलीभाषेत 'चमच्या' किंवा प्रमाण भाषेत सुद्धा 'चमच्याने' असे ऐकले आहे.

तसेच 'ज' चे देखील दिसते. उदा. जवस/जनता,

यासाठी काही नियम आहे का? शालेय जीवनात असे काही शिकवले असल्यास निश्चित दुर्लक्ष झाले आहे :)
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

सुनील's picture

16 Mar 2015 - 9:56 am | सुनील

शालेय जीवनात असे काही शिकवले असल्यास निश्चित दुर्लक्ष झाले आहे

सहमत!

शालेय जीवनात आणि यांचे उच्चारदेखिल (शिकवले गेले असल्यास) दुर्लक्ष झाले असावे!! ;)

वाड्ग्मय (वांगमय) असा उच्चार आहे. नाकात फिरवायचा "आंग" .
नंतरच नुसतच अं. हे पण अनुस्वारिक न म्हणता नाकात फिरवायच.

माहितगार's picture

16 Mar 2015 - 9:56 pm | माहितगार

वाड्ग्मय (वांगमय) असा उच्चार आहे. नाकात फिरवायचा "आंग" .
नंतरच नुसतच अं. हे पण अनुस्वारिक न म्हणता नाकात फिरवायच

वाङमय च उच्चारण मला सहसा व्यवस्तीत जमतं, पण ऐका ऐन भाषणात ते मला जमलं नव्हत श्रोत्यांमध्ये माझ्या उच्चारणात अडखळण्यावरून एकच हशा पिकला :)

खटपट्या's picture

16 Mar 2015 - 10:20 am | खटपट्या

अरे च् च् मधला च कोणता ? च चादरीचा की च्य चहाचा ?

रमेश आठवले's picture

16 Mar 2015 - 11:09 am | रमेश आठवले

मी भाषा शास्त्र कोविद नाही.
माझ्या समजुतीप्रमाणे चव आणि जवस हे उच्चार हे मराठी भाषेवरील तेलुगु भाषेसारख्या दक्षिण भारतीय भाषांच्या प्रभावामुळे आले आहेत. बाकी सर्व संस्कृतोद्भव उत्तर भारतीय भाषांमध्ये यांचे उच्चार चहा आणि जनता असेच फक्त आहेत.

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 1:46 pm | पिशी अबोली

सोयीसाठी 'चमचा' मधील 'च' ला 'च' आणि चिकू मधील 'च' ला 'च्य' म्हणत आहे.

मराठी ही 'च' कडे जास्त झुकणारी भाषा आहे. सर्वसाधारण नियम हा, की इ,ए,य असे तालव्यास्थानी उच्चारले जाणारे स्वर/अर्धस्वर पुढे असता, किंवा त्या 'च' चे द्वित्त ('जेमिनेशन' चे हे भाषांतर बरोबर आहे का कल्पना नाही, दुसरे काही असल्यास सांगावे) झाले असता त्याचा 'च्य' असा उच्चार केला जातो. अन्यथा 'च' असा उच्चार होतो.

मराठीमधे हा नियम अगदी काटेकोर नाही. बोलीवैविध्यामुळे अनेक प्रकारचे उच्चार केले जातातच, पण सर्वमान्य उच्चारांमधेही च/च्य च्या 'मिनिमल पेयर' सापडू शकतात. चार/च्यार अशा. त्यामुळे हा नियम सर्वत्र लागू होत नाही. पण तरी त्यातल्यात्यात हा साधारण नियम आहे.

हुप्प्या's picture

16 Mar 2015 - 9:44 pm | हुप्प्या

जहाज, जरतारी, जबरदस्त, जोर, मजबूत असे शब्द जे फारसीमधून आलेले आहेत त्यातील ज चा उच्चार वेगळा होतो. जत्रा, जिवंत, ज्योत ह्या शब्दातील ज पेक्षा वेगळा. कारण फार्सीमधील त्या ध्वनीला सूचित करणारे अक्षर मराठीत नाही. ज + नुक्ता असे हिंदी देवनागरीत लिहिता येते पण मराठीत नुक्ता नाही. त्यामुळे एकाच अक्षराचे दोन ध्वनी आहेत.
च चे तसे नाही. पण ज आणि झ च्या बाबतीत फारसी शब्द हे कारण आहे.

लई भारी's picture

17 Mar 2015 - 8:15 am | लई भारी

थोडासा गोंधळ होतोय माझा.
'जत्रा' चा उच्चार मी शक्यतो 'जहाज' मधल्या 'ज' सारखा ऐकलाय. तुम्ही 'ज्यत्रा' असे सुचित करताय का?

हुप्प्या's picture

17 Mar 2015 - 8:50 am | हुप्प्या

जत्रा हा अपवाद आहे. त्यातला ज हा दोन्ही प्रकारे उच्चारला जातो. मी जास्त करुन ज्य अशा प्रकारे वापरलेला पाहिलेला आहे. पण तुमचे खरे आहे. दुसराही उच्चार वापरतात. कदाचित यात्राचा अपभ्रंश असल्यामुळे दोन्ही प्रकार असतील.
पण जरूर, जमीन, जनावर ह्या सगळ्या बाबतीत फार्सी मूळाचा नियम लागू होतो.

लई भारी's picture

17 Mar 2015 - 9:31 am | लई भारी

जत्रा-यात्रा वरुन आठवले, या दोन्ही शब्दात काही फरक आहे की समानार्थी आहेत?
कोल्हापूर कडे 'म्हाई' असा शब्द पण आहे, तो विशेषतः 'मांसाहारी' भोजनाचा बेत असलेली 'जत्रा/यात्रा' अशा अर्थाने वापरतात. :)

लई भारी's picture

17 Mar 2015 - 8:12 am | लई भारी

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

विक्रान्त कुलकर्णी's picture

17 Mar 2015 - 11:19 am | विक्रान्त कुलकर्णी

माझ्या मते हिन्दी मध्ये बर्याच वेळा "य" चा उच्चार "ज" असा केला जातो. उदा. यादवचा जाधव, यमुनेचा जमुना, यात्राचा जत्रा. हा उच्चार जेव्हा केला जातो तेव्हा तो "ज्य" असा होतो. मराठी मध्ये सुद्धा तो जसा च्या तसा उच्चार केला जातो.

कानडाऊ योगेशु's picture

17 Mar 2015 - 4:55 pm | कानडाऊ योगेशु

अस्सल मराठी माणूस जाधव मधल्या ज चा उच्चार "जवळ" मधल्या "ज" सारखा करतो पण आजकाल ज्या काही सिरियल्स पाहण्यात आल्या त्यात जर "जाधव" असा उल्लेख असेल तर तेव्हा ज चा उच्चार "जय" मधल्या ज सारखा असतो. हाईट म्हणजे सी.आय.डी मालिकेतल्या इ.प्रद्युम्न च्या तोंडातुन ही असा उच्चार ऐकला तेव्हा खरोखरच चकित झालो.

जयन्त बाबुराव शिम्पी's picture

18 Mar 2015 - 12:04 am | जयन्त बाबुराव शिम्पी

मला सुद्धा असाच प्रश्न सतावतो आहे. ज्यांची मातॄभाषा मराठी आहे तो पुढील दोन वाक्ये सरळ वाचु शकेल म्हणजे त्याला काहीही अडथळा येणार नाही.
१) माझा मित्र पुण्यात रहातो.
२) आपण नेहमी पुण्य आणि पापाचा विचार करावा.
ज्याची मातॄभाषा मराठी नाही त्याला ' पुण्यात ' आणि ' पुण्य ' यातील फरक नेमका कसा ( उच्चार सोडून ) ओळखावा हे कसे समजवून सांगावे ? जाणकारांनी खुलासा करावा.

हुप्प्या's picture

18 Mar 2015 - 1:06 am | हुप्प्या

पुण्याचा नागरिक (सुप्रसिद्ध शहर) : उच्चार पुण्याचा नागरिक
पुण्याचा विचार (पाप पुण्य वाला) : उच्चार पुण्ण्याचा विचार.

तीच गोष्ट दिवा आणि दिव्य ह्याबाबतीतही लागू होते.
दिव्यातून (दिवा गाव) : उच्चार दिव्यातून
दिव्यातून (दिव्य विशेषण) : उच्चार दिव्व्यातून

जयन्त बाबुराव शिम्पी's picture

18 Mar 2015 - 5:12 am | जयन्त बाबुराव शिम्पी

उच्चार सोडून , इतर कोणत्या रितीने हे समजावून सांगता येइल हाच तर माझा प्रश्न होता .त्याचे उत्तर नाही मिळाले

हुप्प्या's picture

18 Mar 2015 - 9:02 am | हुप्प्या

प्रत्येक भाषेत संदिग्धता असतेच. शब्दाचा संदर्भ पाहून अर्थ लावता येऊ शकतो.
इंग्रजीचे स्पेलिंग अनेकदा असा गोंधळ करते. एकाच स्पेलिंगचे दोन उच्चार (रीड, रेड), एकाच उच्चाराचे दोन स्पेलिंग्ज (टायर). उर्दू लिहिताना अनेकदा वेलांट्या वा मात्रा वगळल्या जातात. मात्र वाचणारा योग्य ते वाचतो.
तसेच मराठीतही अपवादाने असे स्पेलिंगचे घोटाळे होतात. ते संदर्भानेच ओळखावे लागतात.