व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग २

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
1 Mar 2015 - 6:06 pm

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १

आधल्या दिवशी मेट्रोने जाताना संयुक्त राष्ट्रसंघाचे व्हिएन्नातील मुख्यालय दिसले होते. हे आधीपासून भेट देण्याच्या यादीत नव्हते, पण मग रात्री याबद्दल माहिती काढली तेव्हा भेट द्यावी असे वाटले. सकाळी उठून हॉटेलवर भरपेट नाश्ता केला आणि या मुख्यालयाच्या स्थानकावर उतरलो.

'Vienna Internation Centre' च्या या परिसरात 'संयुक्त राष्ट्रसंघ' आणि 'International Atomic Energy Agency' या संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत असलेल्या संस्थेची कार्यालये आहेत. हा परिसर ऑस्ट्रियाच्या प्रशासकीय अखत्यारीत येत नसून तो स्वतंत्र परिसर म्हणून गणला जातो. पोलिस सेवा, टपाल सेवा आणि इतरही प्रशासकीय कार्यालये ही देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत येतात. इथे दिवसातून दोन वेळा, दीड तासाचा माहिती देणारा कार्यक्रम असतो, ज्यात संयुक्त राष्ट्रसंघाचा इतिहास, व्हिएन्नात चालणारे काम, जागतिक पातळीवर चालणारे काम याबद्दल थोडक्यात माहिती दिली जाते. सुरक्षा तपासणी झाली, ओळखपत्रांची तपासणी झाली, थोड्याच वेळात अजून काही लोक जमले आणि फिरतीला सुरुवात झाली.

बाहेरून दिसणारी इमारत आणि सभोवतालचा परिसर. संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असणाऱ्या सर्व देशांचे झेंडे इथे सभोवताल फडकतात.

http://1.bp.blogspot.com/-FYzGhXNw1uM/VPIcZwsF-cI/AAAAAAAAEUM/L4ZFXhHwvRE/s1600/DSC_0078.jpg

http://1.bp.blogspot.com/-tKzkDSF9Nc4/VPDYxuCVFdI/AAAAAAAAERE/U3xy2rTppqo/s1600/DSC_0079.jpg

http://3.bp.blogspot.com/-LjruakPPBKs/VPDYxZ-HHxI/AAAAAAAAERA/2nUe9THamoE/s1600/DSC_0082.jpg

अनेक देशांकडून युएनला भेटवस्तू म्हणून मिळालेल्या कलाकृती ठिकठीकाणी बघायला मिळतात.

http://4.bp.blogspot.com/-M71Wu0NYXIs/VPDb9ny49nI/AAAAAAAAERc/o-58jtPSLk0/s1600/DSC_0087.jpg

http://2.bp.blogspot.com/-zmgB7QMQxxs/VPDb_fdmCqI/AAAAAAAAERk/Ca990MAODeg/s1600/DSC_0088.jpg

"वुमन फ्री" असा संदेश देणारी अमेरिकेची कलाकृती.

http://3.bp.blogspot.com/-9lyKDjI9Ng4/VPDb_nG9wkI/AAAAAAAAERo/E2gEGpn7ruQ/s1600/DSC_0102.jpg

Internation Atomic Energy Agency याबद्दल देखील ओळख करून देण्यात आली. अणुउर्जा हा सगळीकडेच नेहमीच वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. या उर्जेचा उपयोग जसा अणुविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जानिर्मिती साठी होतो तसाच शस्त्रनिर्मिती, पर्यायाने युद्धासाठीही केला जाऊ शकतो. Atoms for Peace हे या संस्थेचे ब्रीदवाक्य त्यांच्या कार्यावर अचूक भाष्य करते. विध्वसंक कार्यासाठी अणुउर्जेचा होणारा वापर थांबवणे आणि त्याचवेळी ऊर्जानिर्मितीसाठी फायदा जगासमोर आणणे, त्यावर संशोधन करणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे. कुठल्या देशांनी आजवर अणुचाचण्या घेतल्या, त्यामागे काय कारणे होती आणि आता या संस्थेच्या मार्फत आंतराराष्ट्रीय पातळीवर त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काय काम केले गेले, त्यात काय करार केले गेले इत्यादी माहिती देणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली.

त्यानंतर पुढे Human Trafficking, यादवी युद्ध या संदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. यादवी युद्ध आणि त्यात अडकलेल्या स्थलांतरित लोकांच्या कहाण्या वाचताना अंगावर शहारे येत होते. अशा संस्थांच्या मार्फत त्यातूनही मार्ग काढून आज काही जण जरी स्थिरावत असले तरीही कित्येक जण या परिस्थितीत आहेत, त्यावर तोडगे काढताना काय आव्हाने समोर आहेत हे सगळेच सुन्न करणारे होते.

http://3.bp.blogspot.com/-tKqK3g0v1oI/VPDcY5IGS0I/AAAAAAAAESE/xuIFiauLIcs/s1600/DSC_0093.jpg

http://3.bp.blogspot.com/-nbRGlXYnkfE/VPDcYKS2yEI/AAAAAAAAER8/Kpj6-uDHYQM/s1600/DSC_0094.jpg

इथेच पुढे अंतराळ मोहिमांबद्दल एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. जिथे जिथे सगळ्या देशांबद्दल माहिती होती, तिथे प्रत्येकाला आवर्जून आपल्या देशाबद्दल बघण्यात रस होता. अर्थातच आमचे लक्ष प्रथम भारतीय झेंड्याकडे जात होते.

http://1.bp.blogspot.com/-mnj5JK3PnCA/VPLm61G_zqI/AAAAAAAAEVE/F625pDRYZB8/s1600/DSC_0096.jpg

http://4.bp.blogspot.com/-xavXjzMeoKQ/VPLm6_gZD9I/AAAAAAAAEVA/QIvpWk0qZKU/s1600/DSC_0097.jpg

यात आता भारताच्या मंगल यानाची भर पडली आहे. :)

http://3.bp.blogspot.com/-cRXgqcUNJO8/VPLm6g2jgXI/AAAAAAAAEU8/MRNwkB8dxBU/s1600/DSC_0099.jpg

इथून परत व्हिएन्नाच्या सिटी सेंटर परिसरात आलो आणि एकएक वास्तू बघत चालायला सुरुवात केली. ही शहरे पायी फिरण्यात खरी मजा आहे. कधी अनपेक्षित असे काही दिसते, आणि मनाप्रमाणे थांबून बघता येते. याच भागातून पुढे चालत आल्यास व्हिएन्नातील अनेक ऐतिहासिक वास्तू दिसतात. यापैकी काही ठिकाणी आता सरकारी कार्यालये आहेत, काही पंचतारांकित हॉटेल्स आहेत, काही ठिकाणी संग्रहालये. प्रदर्शने आहेत तर काही वास्तूंमध्ये संगीताचे कार्यक्रम, विविध प्रशिक्षणे होतात. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या बांधणीची चर्चेस दिसतात.

http://3.bp.blogspot.com/-QHVIOlz7DAg/VPIeOs8aP9I/AAAAAAAAEUg/zXmHsIwIJrQ/s1600/DSC_0058.jpg

http://3.bp.blogspot.com/-5WRmdGwjrc0/VPDcvKsXTlI/AAAAAAAAESM/5ICh9FeCsQk/s1600/DSC_0109.jpg

http://3.bp.blogspot.com/-2fGCe_7Ext0/VPDcvyIbfHI/AAAAAAAAESY/k36BNCVaHvw/s1600/DSC_0113.jpg

http://3.bp.blogspot.com/-LQ6Zv5rReVg/VPDcxJtmI3I/AAAAAAAAESk/mCuBJ810KkI/s1600/DSC_0114.jpg

http://3.bp.blogspot.com/-LQ6Zv5rReVg/VPDcxJtmI3I/AAAAAAAAESk/mCuBJ810KkI/s1600/DSC_0114.jpg

संगीत राजधानी अशी ओळख असलेल्या या शहरातील सांगीतिक कार्यक्रम, प्रशिक्षण, चित्रकला, शिल्पकला अशा असंख्य प्रकारातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम या Museums Quartier च्या भव्य इमारतीत होतात. जाणकार कलावंताना या शहरात कितीही दिवस कमी पडतील असे म्हटले जाते त्याची खात्री पटते.

http://1.bp.blogspot.com/-RNiRtlkHxPY/VPL5ndBh--I/AAAAAAAAEVc/NjScb1ysAV8/s1600/DSC_0130.jpg

http://2.bp.blogspot.com/-pq7aCIjPcDw/VPDcy6j8rfI/AAAAAAAAESs/A2yJ7144Xio/s1600/DSC_0123.jpg

http://1.bp.blogspot.com/-GtdIRlk79Vc/VPL50_uSzWI/AAAAAAAAEVk/lyTzz2NrRjE/s1600/DSC_0136.jpg

१९१८ साली ऑस्ट्रियात लोकशाही अस्तित्वात आली त्या स्मरणार्थ.

http://3.bp.blogspot.com/-HM1-A62ntWc/VPDc1z2JTwI/AAAAAAAAES8/eVu6vtwpiU8/s1600/DSC_0138.jpg

http://3.bp.blogspot.com/-IEeNBll1UDc/VPMG0CJmM8I/AAAAAAAAEV0/MuxjRLwQB1k/s1600/DSC_0146.jpg

http://3.bp.blogspot.com/-UO6evQOW9Kk/VPDc20yQiwI/AAAAAAAAETE/PjqkT2TpKQU/s1600/DSC_0147.jpg

या अशा ठिकाणांचे फोटो घेताना एकही मनुष्य त्यात आला नाही अशा तुरळक गर्दीचे क्षण फारच क्वचित मिळतात.

http://3.bp.blogspot.com/-aJylDTMTPIk/VPDc3qsz7WI/AAAAAAAAETM/DG84ygbfTJw/s1600/DSC_0149.jpg

थंडी वाढू लागली होती आणि पायी फिरणे आम्हाला त्रासदायक वाटू लागले. म्हणून मग या भागातून जाणाऱ्या एका ट्राम मध्ये बसलो आणि आत बसून व्हिएन्ना दर्शन घेतले. त्यामुळे फार काही फोटो घेणे जमले नाही. व्हिएन्नातील प्रमुख ओपेरा दिसला तेव्हा पुन्हा उतरलो. मोत्झार्ट सारख्या नावाजलेल्या संगीतकाराचा हा देश. इतरही अनेक संगीतकार या देशात, खास करून व्हिएन्ना शहराला लाभले. मोत्झार्टच्याच एका कार्यक्रमाने या ओपेराचे उद्घाटन झाले. खुद्द राजा फ्रान्झ जोसेफ आणि राणी एलिझाबेथ ऑफ ऑस्ट्रिया हे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. तेव्हापासून आजतागायत हे ओपेरा हाउस दिमाखात उभे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इथे अनेक हल्ले झाले, बॉम्बिंग झाले या अशा शोकांतिका देखील इथेच घडल्या. तरीही आज त्यावर मत करून जगातील सर्वोत्तम ओपेरापैकी एक असे हे व्हिएन्ना ओपेरा हाउस. जेव्हा आम्ही काही दिवस आधी तिकिटांच्या किमती पहिल्या, तेव्हा त्या फारच वाटल्या. कार्यक्रम नाही तर निदान आता वेळेवर उगाच डोकावून काहीआतून बघता येईल का म्हणून आम्ही फक्त प्रवेशद्वारा जवळ जाऊन बघून आलो. इथे अजून वेगळेच चित्र दिसले. हातात पत्रके घेऊन, कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी आठ दहा जण येणाऱ्या जाणार्यांच्या मागे लागत होते. अर्थात इथेही किमती पूर्वी पहिल्यापेक्षा जास्तच होत्या. अंदाज घेऊन मग या लोकांच्या अजून नादी न लागता लगेच पुढे निघालो. एकंदरीत बाहेरून बघूनच खरे तर आत फार सुंदर असेल याची खात्री वाटली पण नाईलाज होता.

http://1.bp.blogspot.com/-7PvV_EkXt6w/VPIcyk0pT6I/AAAAAAAAEUU/w20iFPlAFlE/s1600/DSC_0186.jpg

थोड्याच वेळात अंधार पडेल असे दिसू लागले. व्हिएन्नातील एक राजवाडा अजून बघायचा राहिला होता. Belverde Palace. आम्ही इथे पोहोचेपर्यंत प्रवेशाची वेळ उलटून गेली होती. या पद्धतीचे युरोपातील इतरही राजवाडे पाहिले असले, तरीही नवीन काही बघायला आवडले असते. पण ती संधी वेळेअभावी हुकली. बाहेरून फक्त एक फोटो काढला. संध्याकाळ झाल्याने वार्याचा जोर वाढला होता. अजून फार काळ तसेही बाहेर थांबणे कठीण वाटू लागले आणि हॉटेलवर परतायचे ठरवले.

http://4.bp.blogspot.com/-cIqzyEQunMI/VPDc9UD-qqI/AAAAAAAAETs/jJ-jzV1rowk/s1600/DSC_0194.jpg

दोन दिवसांचा व्हिएन्नातील मुक्काम संपला होता. थंडीमुळे फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या, थोडे नियोजन कमी पडले कदाचित, त्यामुळे काही बघायचे राहिले असे वाटत होते. पण त्याचवेळी गर्दी नसल्याने जेवढे पहिले ते निवांत, मनाप्रमाणे बघता आले याचे समाधानही होते. या ऐतिहासिक आणि कलेच्या राजधानीत अजून थोडे भटकायला आवडले असते. त्याच वेळी हंगेरीची राजधानी आणि व्हिएन्नाचीच सिस्टर सिटी असलेले बुडापेस्ट खुणावत होते.

क्रमशः

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

1 Mar 2015 - 6:55 pm | स्वाती राजेश

फोटो आणि वर्णन... छान लिहिले आहेस..
बुडापेस्टचे रात्री रिव्हर क्रुस चे वर्णन आवडेल वाचायला... मस्त सिटी आहे...बुडापेस्ट... :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

:HAPPY:

रेवती's picture

1 Mar 2015 - 8:01 pm | रेवती

वाचतिये.

जुइ's picture

1 Mar 2015 - 8:12 pm | जुइ

हाही भाग छान झाला आहे :)

छान झालाय हा भागसुध्दा!पुभाप्र.

आनन्दिता's picture

1 Mar 2015 - 10:23 pm | आनन्दिता

मस्त् !!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Mar 2015 - 11:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो काय अप्रतिम आलेत हो....!!

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2015 - 1:10 am | श्रीरंग_जोशी

वर्णन व फोटो खूप आवडले.

स्नेहल महेश's picture

2 Mar 2015 - 11:00 am | स्नेहल महेश

अजून एक सुंदर लेखमाला
मस्त वर्णन आणि फोटो ……………. खरच तुझ्यामुळे इथे बसल्या बसल्या सगळ फिरून येता येत

इशा१२३'s picture

2 Mar 2015 - 2:55 pm | इशा१२३

हा भागहि छान.वाचतीये.

एस's picture

2 Mar 2015 - 4:05 pm | एस

लेख आवडला. छायाचित्रांमध्ये तेथील लोकजीवनाचेही प्रतिबिंब असू द्यात. केवळ इमारतींची छायाचित्रे पाहून एकसुरीपणा येतो.

सानिकास्वप्निल's picture

2 Mar 2015 - 4:22 pm | सानिकास्वप्निल

दोन्ही भाग एकदम वाचून काढले, छान वर्णन आणि फोटो :)
पुभाप्र.

मधुरा देशपांडे's picture

3 Mar 2015 - 2:02 am | मधुरा देशपांडे

सर्वांना धन्यवाद.
@स्वॅप्स, हो या लेखांमध्ये लोकजीवनाचे असे फार वर्णन आणि छायाचित्रे नाहीत हे मान्य आहे. २ दिवसच व्हिएन्नात होतो आणि त्यामुळे म्हणावे तसे काही टिपता आले नाही. बुडापेस्टलाही तेवढा वेळ मिळाला नाही. पण शक्य ते देण्याचा नक्की प्रयत्न करेन. :)

रुपी's picture

3 Mar 2015 - 2:53 am | रुपी

छान माहिती. हाही भाग आवडला.

सविता००१'s picture

3 Mar 2015 - 4:41 pm | सविता००१

दोन्ही भाग छान आहेत आणि फोटो पण. आत्ताच दोन्ही वाचले :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2015 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भागही सुंदर झालाय !

स्वाती दिनेश's picture

3 Mar 2015 - 8:02 pm | स्वाती दिनेश

परत एकदा विनमध्ये पोहोचले,
स्वाती

सांगलीचा भडंग's picture

4 Mar 2015 - 6:03 pm | सांगलीचा भडंग

मस्त माहिती आणि फोटो

जयंत कुलकर्णी's picture

5 Mar 2015 - 7:33 am | जयंत कुलकर्णी

फोटो मस्तच काढले आहेत...............

श्रीरंग_जोशी's picture

5 Mar 2015 - 8:40 am | श्रीरंग_जोशी

व्हिएन्ना शहराला राहण्यासाठी जगातले सर्वोत्तम शहर म्हणून सलग दुसर्‍यांदा गौरवले गेले आहे.

Vienna Tops Survey of World's Nicest Cities — Again