व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
25 Feb 2015 - 2:59 am

व्हिएन्ना आणि बुडापेस्ट ही दोन्ही शहरे बऱ्याच दिवसांपासून भटकंतीच्या यादीत होती. साल्झबुर्ग आणि जवळच्या परिसरात गेलो तेव्हा ऑस्ट्रियाची छोटीशी झलक बघायला मिळाली होती. डिसेंबरच्या नाताळच्या सुट्ट्या यावेळी अशाच गेल्या आणि त्याचदरम्यान सहज म्हणून आंजावर उंडारताना व्हिएन्नाचे विमानाचे तिकीट बघितले. फेब्रुवारी हा तसा पर्यटकांच्या दृष्टीने तेवढासा योग्य नसल्याने असेल कदाचित, पण अगदीच स्वस्तात तिकिटे दिसत होती. मग थोडी अजून माहिती काढली, व्हिएन्ना पर्यंत जातो आहोत तर जवळ कुठे जाता येईल असा विचार केला तेव्हा बुडापेस्ट सोयीचे वाटले. रेल्वेने साधारण ३ तास. आधी नाल आणि मग घोडा असे काहीसे झाले. दरम्यान मिपाकर मृणालिनी त्याच भागात राहात असल्याने तिच्याकडून अधिक माहिती मिळाली. एकूण ५ दिवस हातात होते. मग व्हिएन्नात किती आणि बुडापेस्टला किती यावर चर्चा झाली. शेवटी २ दिवस व्हिएन्ना आणि उर्वरीत बुडापेस्ट अशी विभागणी झाली. हॉटेल आरक्षित झाले, तिकिटे झालीं. म्हणता म्हणता जायचा दिवस उजाडला आणि आम्ही फ्रँकफर्ट विमानतळावर दाखल झालो. वेळेत विमान निघाले आणि अवघ्या तासाभरात व्हिएन्नाच्या विमानतळावर उतरले. रात्री उशीराने हॉटेलला पोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेवढी सोयीची नव्हती. त्यामुळे टॅक्सीचे आरक्षण करून ठेवले होते. रात्रीचे अकरा वाजून गेल्यामुळे व्हिएन्नावासी गाढ झोपेत होते. पंधरा मिनिटात हॉटेलवर पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी खऱ्या सहलीला सुरुवात झाली.

मध्य युरोपातील ऑस्ट्रिया या देशाची व्हिएन्ना (Viennaa) ही राजधानी. वीन (Wien) हे जर्मन भाषेतील नाव. पर्यटनासाठी शहरातील केंद्रस्थानी राजवाडे, तेथील इमारती, संग्रहालये, अशी काही ठिकाणे होती. यातील काही संग्रहालायांमध्ये चित्रकला किंवा मॉडर्न आर्ट्स सारख्या विषयातल्या आमच्यासारख्या महाभागांना काडीचेही काही कळले नसते. हॉटेलमध्येच शहराचा नकाशा आणि मेट्रो, ट्रामची माहिती देणारी पत्रके घेतली. पहिले कुठे जावे, कसे जावे लागेल यावर चर्चा झाली, निर्णय झाला आणि मग हॉटेलवर दणदणीत नाश्ता करून बाहेर पडलो. फेब्रुवारीत थंडी असेल हे गृहीत धरले होते. आठवडाभर आधीपासून हवामानाचे अंदाज घेत होतो त्यामुळे तशी कल्पना आली होतीच. पण तरीही उगाच वेडी आशा होती की हवामान बरे असेल. पण ती फोल ठरली. कानटोपी, हातमोजे सगळे अत्यावश्यक आहे असे लगेचच लक्षात आले. जवळच मेट्रोचे स्थानक होते. मेट्रोच्या स्थानकावर तुरळक गर्दी होती. इतकी कमी गर्दी जर्मनीच काय, अजूनही जवळच्या कुठल्याच देशात पाहिली नव्हती. विशेष म्हणजे राजधानीच्या शहरात. हे नंतर पुढेही सतत जाणवले. एका अर्थाने पर्यटक अगदीच कमी असल्याने काही ठिकाणी गर्दीचा त्रास न झाल्याचे समाधान होतेच.

http://4.bp.blogspot.com/-ideJJEIcYp8/VOuUzkwbReI/AAAAAAAAEOA/ByfOViBnCBA/s1600/DSC_0021.jpg

पहिल्या स्थळाकडे प्रयाण केले ते म्हणजे शोनब्रुन पॅलेस. (Schönbrunn Palace)

http://4.bp.blogspot.com/-zmkKMcW4-Sk/VOuS3GFU72I/AAAAAAAAEMA/l3t7G6gBsYQ/s1600/DSC_0022.jpg

http://2.bp.blogspot.com/-UeWyD3NrnIc/VOuS34-UkqI/AAAAAAAAEMI/M79ITyhMi1U/s1600/DSC_0026.jpg

http://1.bp.blogspot.com/-hlx3KfKot9M/VOuS4bHXHLI/AAAAAAAAEMM/jm3k_iSXGxo/s1600/DSC_0034.jpg

तिकीट खिडकीपाशी जेमतेम चार डोकी बघून, आता निवांत आत फिरता येईल म्हणून हायसे वाटले. ऑडीओ गाईड घेऊन आत शिरलो. राजवाड्याचा फक्त काहीच भाग प्रवेशासाठी खुला आहे. इथे छायाचित्रणाला परवानगी नव्हती, त्यामुळे छायाचित्रे नाहीत. एकेक भव्य दालने बघत, त्यामागचा इतिहास ऐकत तास दीड तास सहज गेला. असे काही बघताना त्या देशाची संस्कृती, काळानुसार होत गेलेले बदल आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना घेतलेली मेहनत या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने जाणवतात.

मूळ इमारत १६ व्या शतकात बांधली असली तरीही अनेक वर्ष ती राजे लोकांची काही दिवस सुट्टीसाठी, शिकार करण्यासाठी येउन राहण्याची जागा होती. विशेष करून एलेनोरा गोन्झागा या राणीने, तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर पुढाकार घेऊन राजवाडा बांधला. पुढे मारिया थेरेसा या राणीला ही वास्तू लग्नात मिळाली आणि तिने १७ व्या शतकात मूळ इमारतीचा विस्तार केला, जी आता शोनब्रून या नावाने ओळखली जाते. त्यानंतर फ्रान्झ जोसेफ आणि त्याची राणी एलिझाबेथ यांच्या काळात राजवाडा अधिक विस्तारला. १९१६ साली या राजाचे निधन झाले. त्यानंतर १९१८ साली ऑस्ट्रियात लोकशाही अस्तित्वात आली आणि हा राजवाडा नंतर संग्रहालयाच्या स्वरुपात लोकांसाठी खुला झाला.

एलिझाबेथ ऑफ ऑस्ट्रिया उर्फ सिसि अशी ओळख असलेली एलिझाबेथ ही त्याची राणी त्या काळातही प्रचंड ग्लॅमर आणि गॉसिपची धनी होती. त्यामुळेच कदाचित, पण राजवाड्यात सर्वत्र तिच्या बद्दल सर्वाधिक माहिती दिली जाते. ही मुळची जर्मनीतील बव्हेरिया प्रांताची राजकन्या. तिचा नवरा हा तिचा मावसभाऊ. तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजघराण्याचा विस्तार व्हावा या उद्देशाने हे लग्न लावले गेले. जेव्हा तिला पहिली मुलगी झाली, तेव्हा मुलगाच हवा असा अट्टाहास करणाऱ्या तिच्या सासूबाइंनी तिला त्या मुलीपासून तोडले. नंतरही पुन्हा मुलगीच झाली म्हणून तिला छळले गेले तर एका मुलीला गर्भात मारण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांच्या जाचानंतर मुलगा झाला आणि तात्पुरती तिची सुटका झाली. दुर्दैवाने या एकुलत्या एक मुलाने नंतर आत्महत्या केली आणि ती अजूनच खचली. सोळाव्या वर्षी झालेले लग्न, लगेचचे बाळंतपण, त्यात या त्रासांनी वैतागलेल्या या राणीला प्रचंड मानसिक तणावामुळे डिप्रेशन आले. अधिकाधिक सुंदर दिसण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी तिचे स्वतःवर अतिरेकी प्रयोग सुरु झाले. तिचे केस खुं लांबसडक आणि अतिशय सुंदर होते असे म्हटले जाते. रोज साधारण तीन तास तिच्या मदतनीस फक्त केसांची काळजी आणि केशरचना यासाठी नेमल्या होत्या. याच नैराश्याच्या गर्तेत, कुणाशी बोलायचे नाही, सगळ्यांसोबत राहायचे नाही असा प्रकार सुरु झाला. मनात आले की कुठेही फिरायला जायचे, मनात आले तर परत यायचे असे सुरु झाले. अशाच एका जिनेव्हा भेटीत तिचा खून करण्यात आला. हा इतिहास ऐकताना त्यात काही राजकन्यांच्या कहाण्या होत्या ज्यात "केवळ या राजघराण्यात असल्यामुळे आमची लग्न ही फक्त नवीन राज्य मिळवण्यासाठी केली जातात, आमच्या मनाप्रमाणे नवरा निवडीचा आमचा अधिकार इथे हिरावून घेतला जातो" असा त्यांनी खेद व्यक्त केला होता.

राजघराण्याचा विस्तार या एका ध्येयाने पछाडलेली राणी सोफी आणि त्याची बळी ठरलेली सिसि, एकीकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी राजाच्या मृत्यनंतर पेलणाऱ्या काही स्त्रिया तर मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे घरातल्या वैभवशाली सुखातही आनंदी नसलेल्या काही स्त्रिया हे सगळेच ऐकताना या सगळ्या स्त्रियांची काय स्थिती होती हे सगळे विचारात पाडणारे आहे. या आताच्या प्रगत म्हणून गणल्या जाणाऱ्या देशात अगदी आता आता पर्यंत ही अशी परिस्थिती होती याचं नवलही वाटतं. आताही नेमके कुठे बदल झालेत, खरंच झालेत का, जे झालेत त्यामागे काय कारणे होती इत्यादी विषय फार मोठे आहेत. पण तो या लेखाचा विषय नाही. असो.

उंची वस्तू, उत्तमोत्तम रंगकाम आणि भित्तीचित्रे, त्या काळात शक्य तेवढी केलेली तंत्रज्ञानाची सोय, हे सगळे राजेशाही थाट बघण्यासारखे आहेत. वस्तूंच्या बाबतीत, एक संग्रहालय म्हणून बघायचे झाले, तर म्युनिक मधील Nymphenburg palace हा राजवाडा थोडा उजवा वाटला. पण अनुभव नक्कीच सुंदर, नयनरम्य होता. बाहेर येउन चारही बाजूंनी पसरलेल्या भव्य प्रांगणात एक चक्कर मारली. दोन दिवसांपूर्वी बर्फवृष्टी होऊन गेली असल्याने अजूनही काही ठिकाणी बर्फ दिसत होता. राजवाड्याच्या मागच्या बाजूचा परिसर. हिवाळा असल्याने बागेत फुले नव्हती. इथे उन्हाळ्यात आल्यास अजूनच सुंदर दृश्य दिसेल यात शंका नाही.

http://4.bp.blogspot.com/-PoM91yowY9M/VOuS7gQqzMI/AAAAAAAAEMg/WK7IYHDa4Ns/s1600/DSC_0040.jpg

http://4.bp.blogspot.com/-qNfqvKErGwk/VOzF_0Zz7CI/AAAAAAAAEP0/ks90laIeFv0/s1600/DSC_0043.jpg

कितीही लक्ष ठेवले तरीही लोक ऐकत नाहीच याचे एक उदाहरण या खालच्या रंगवलेल्या भिंतीतून दिसते.

http://3.bp.blogspot.com/-Y2h5jZUg624/VOy9muB5-JI/AAAAAAAAEOs/U64mgTjNr8A/s1600/DSC_0038.jpg

इथेच एक प्राणीसंग्रहालय देखील आहे जे प्रसिद्ध आहे. परंतु थंडी होतीच आणि एकूणच त्यात फारसा रस नसल्याने ते बाजूला सारले होते. पोटपूजा केली. दुपार होत असल्याने आता शहरच्या मध्यवर्ती भागात सिटीसेंटरला फिरून मग पुढचा बेत ठरवू असा विचार करून मेट्रोने सिटी सेंटर ला पोहोचलो. जर्मनी किंवा कुठल्याही युरोपातील देशात फिरताना प्रत्येक ठिकाणच्या इमारती, स्थापत्य यात काही साम्य असली तरीही एक वेगळेपण जाणवते. विशेष आवडली ती या वास्तूंवर केलेली कलाकुसर, प्रत्येक वास्तूचा कोपरान कोपरा लक्षवेधी होता. थंडीमुळे या संपूर्ण सहलीतच फोटो फार हातचे राखून काढले गेले. त्यात मग ते चांगले यावे म्हणून काही प्रयत्न करणे दूरच राहिले. :( जे प्रत्यक्ष पाहिले तेवढा चांगला न्याय फोटोतून देता आला नाही असे वाटते आहे. त्यामुळे जसे आलेत तसे देण्याला पर्याय नव्ह्ता.

http://3.bp.blogspot.com/-GXXX3KSOj1Q/VOy-U2HAnJI/AAAAAAAAEO4/6qklLLkXVnI/s1600/DSC_0045.jpg

http://1.bp.blogspot.com/-2xt8--Gmxsk/VOy-W8NGB3I/AAAAAAAAEPM/NLJIM5ktAqw/s1600/DSC_0055.jpg

http://3.bp.blogspot.com/-QYoG-ydj-lE/VOy-ZYoWl1I/AAAAAAAAEPY/9Rp_oo2DnPg/s1600/DSC_0056.jpg

http://3.bp.blogspot.com/-1n_56TuXqqw/VOy-ZLmVhYI/AAAAAAAAEPU/KiPGXFUdOgc/s1600/DSC_0062.jpg

http://1.bp.blogspot.com/-_P8dK9PKCQc/VOy-ZzukkwI/AAAAAAAAEPc/WMF7XyTAiFg/s1600/DSC_0066.jpg

या खास घोडेगाड्या शहरात ठिकठीकाणी दिसतात. The Illusionist या चित्रपटात अगदी जुन्या काळातील व्हिएन्ना आणि या अशाच गाड्या दाखवल्या आहेत त्याची आठवण झाली.

http://3.bp.blogspot.com/-MISEGBAv7mc/VOy-UW8F1zI/AAAAAAAAEO0/JdYkzxCAiJo/s1600/DSC_0050.jpg

अनेक लक्षवेधी इमारती, चर्चेस बघत बघत एका ठिकाणी हे दिसले.

http://1.bp.blogspot.com/-6GqcmCVW60U/VOy7A_aglAI/AAAAAAAAEOc/tGGfJuP9res/s1600/DSC_0069.jpg

http://2.bp.blogspot.com/-XKvPEi7_Cqs/VOy6_I2Pn3I/AAAAAAAAEOQ/eS5NlOO1IlA/s1600/DSC_0071.jpg

http://3.bp.blogspot.com/-ReS-Y59MkQk/VOzevXTApvI/AAAAAAAAEQo/RMEHg0GB_lM/s1600/DSC_0072.jpg

http://2.bp.blogspot.com/-yPZE8CUh3M0/VOy7AbF5sJI/AAAAAAAAEOY/58omkakAcOc/s1600/DSC_0075.jpg

डेमेल (Demel) ही व्हिएन्ना मधील १७८६ सालापासूनची बेकरी. हे सगळे सुंरेख प्रकार संपूर्णपणे मुख्यत्वे साखरेपासून तयार केले होते. अगदी ती फुले सुद्धा. तिथे लिहिलेले होते म्हणून निदान त्यावर विश्वास ठेवला, नाहीतर खरे वाटले नसते. जर एवढे सुंदर काही केले असेल तर आत जाऊन एक कॉफी व्हायलाच हवी याबद्दल दुमत होण्याची शक्यता शुन्य. त्यामुळे लगेच आत शिरलो. आत केक्सचे विविध प्रकार होते, ज्यातून एक काहीतरी निवडणे हे वेळखाऊ काम एकदाचे झाले आणि आत टेबल शोधायला गेलो. इथे एका बाजूला काचेच्या आत बेकरीतील लोक काम करताना दिसत होते.

http://4.bp.blogspot.com/-h2rnrOX6_CE/VOzcfPgHHVI/AAAAAAAAEQQ/MJBsZGBFlG8/s1600/image.jpg

http://3.bp.blogspot.com/-oJ838_DFJGg/VOzeQ4u1VvI/AAAAAAAAEQg/b03AB74-O9I/s1600/vienna.jpg

ही बेकरी खासकरून वेडिंग केक्स साठी प्रसिद्ध आहे. लग्नासाठी वधुचा पोशाख असतो तसा आकार आणि सजावट असलेली बिस्किटे करणे सुरु होते. एक जण अशाच एका लग्नासाठीच्या केकची तयारी करत होती, त्यानुसार रंग तयार करणे, ते कुठे कसे दिसतात यावर प्रयोग करणे यात ती गुंग होती.
एका बाजूला 'काफे उंड कुखेन' अर्थात कॉफी आणि केक खाताना आम्ही काचेच्या पलीकडच्या टेबलवर बसून कुतूहलाने बघत होतो.

http://1.bp.blogspot.com/-y7Wa-GYA0yI/VOzce50nyPI/AAAAAAAAEQI/lrfVmG_dvFk/s1600/image%2B(2).jpg

व्हिएन्नात सगळीकडेच आवडलेली एक गोष्ट म्हणजे कॉफीसोबत एका छोट्या पेल्यात पाणी दिले जात होते. आजवर हे जर्मनीत आणि युरोपातील इतरही भटकंतीत हे कुठेच दिसले नाही, त्यामुळे कदाचित वेगळे वाटले असेल. केकच्या चवीत जर्मनी आणि जवळपास मिळणाऱ्या बेकरीपेक्षा फार काही वेगळे वाटले नाही. पण अशा ठिकाणी जे एक खास वातावरण अनुभवायला मिळते, त्यातून त्यांचे वेगळेपण दिसून येते.

इथून बाहेर पडलो आणि पुन्हा जवळच्याच भागात एक चक्कर मारली. अंधार पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळे लवकरच परतीचा रस्ता धरला. संयुक्त राष्ट्रसंघाचे व्हिएन्ना मधील मुख्यालय आणि शहरातील इतर काही प्रेक्षणीय स्थळे यासाठी दुसरा दिवस राखीव होता.
क्रमशः

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

25 Feb 2015 - 3:12 am | श्रीरंग_जोशी

वाह!
युरोपातील या भागांच्या भटकंतीविषयी प्रथमच वाचायला मिळत आहे.

तपशीलवार वर्णन व ऐतिहासिक माहितीमुळे या लेखमालिकेची सुरुवात एकदम रोचक झाली आहे. फोटोंमध्ये वास्तुरचना उत्तमपणे टिपली आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्रुजा's picture

25 Feb 2015 - 4:46 am | स्रुजा

झकास ! लिखाणाबद्दल वेगळं बोलायला नकोच. वाटच पाहत होते या लेखमालेची.

बाकी सिसी ची कहाणी ऐकून " the other boleyn girl" आठवला. बराच काळ मला पछाडलं होतं त्या सिनेमाने पण.

अनेक ठिकाणी ही अप्रतिम कलाकुसर बघताना त्याला छेद देणारा हा इतिहास अंगावर काटा आणतो. आपला इतिहास आठवून मग अभिमान वाटतो.

चौकटराजा's picture

25 Feb 2015 - 5:17 am | चौकटराजा

सगळे फोटो अगदी सुरेख आलेयत.युरोप मधील वास्तुकला व तेथील प्रशस्त चौक, प्रांगंणे हे खरे तर मुख्य आकर्षण.वेळ असेल तर असंख्य संग्रहालये. व्हिएन्ना हे वेस्टर्न क्लासिकल म्यूझिक चे माहेरघर आहे असे म्हणतात. आपली माहिती ही आवडली आहे. आता पुढच्या भागाची प्रतिक्षा.

रेवती's picture

25 Feb 2015 - 6:06 am | रेवती

माहिती चांगली आहे. छायाचित्रातील भव्य राजवाडा व इतर मोठ्या इमारती पाहून भारी वाटले.

कंजूस's picture

25 Feb 2015 - 6:15 am | कंजूस

फोटो आणि वर्णन आवडले.राजघराण्यातल्या मुलींची लग्ने ही एक नोंद विशेष वाटली. या लेखाचा विषय नाही म्हणालात तरीही आपण पाहतो त्या सुंदर दगडांमागे चिणलेली मने खूप काही सांगून जातात.

एस's picture

25 Feb 2015 - 11:25 am | एस

त्या सुंदर दगडांमागे चिणलेली मने खूप काही सांगून जातात.

अगदी असेच म्हणतो!

किती भव्य आहेत या इमारती!! पण इतिहास इतका भव्य नाही हे त्यांचे दुर्दैव!!
अतिशय विस्तार्पूर्वक लिहीलेली सहल आवडली.

विशाखा पाटील's picture

25 Feb 2015 - 9:50 am | विशाखा पाटील

छान वर्णन. भव्यदिव्य इमारतींच्या भितींमध्ये दडलेला इतिहास उलगडला, हे विशेष आवडले.

रुपी's picture

25 Feb 2015 - 10:45 am | रुपी

लव्कर बाकीचे भाग येउ द्या!

मदनबाण's picture

25 Feb 2015 - 11:11 am | मदनबाण

लिखाण आणि फोटु आवडले !
मला वाटतं व्हिएन्ना हे युरोप मधले सगळ्यात महागडे शहर आहे !

{कधी काळी व्हिएन्ना एअरपोर्टवर कनेक्टिंग फ्लाइटची वाट बघणारा}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

वेल्लाभट's picture

25 Feb 2015 - 1:07 pm | वेल्लाभट

सुपर्ब ! अप्रतिम! स्विस नंतर व्हिएन्ना. मेजवानीच टाकताय तुम्ही मिपावर. जबरदस्त.
येउदेत!

मितान's picture

25 Feb 2015 - 1:27 pm | मितान

छान लिहितेयस !
फोटो बघताना ब्रुसेल्स अँटवर्प बघत असल्याचा भास झाला :)

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

नंदन's picture

25 Feb 2015 - 1:42 pm | नंदन

वर्णन आवडले. फोटोही छान आलेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाह्, वाह् ! मध्य आणि पूर्व युरोप त्याच्या मध्ययुगीन राज्ये/सामाज्ये, राजवाडे आणि किल्ल्यांबद्दल प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सहसा भारतीय प्रवाश्याच्या यादीत नसलेल्या जागेच्या प्रवासवर्णनाचे स्वागत !!

ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याची आणि संगीताची राजधानी समजल्या जाणार्‍या या शहराच्या सहलीची सुरुवात मस्त झाली आहे. वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच ! राजेशाहीच्या भपक्यामागच्या मानवी शोकांतिकांबद्दलची माहिती पण खासच.

पुभाप्र.

Mrunalini's picture

25 Feb 2015 - 2:40 pm | Mrunalini

मस्त मस्त...
ह्या वेळे भेटायला जमलेच नाहि. :( पण नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करु भेटायचा. :)

आतिवास's picture

25 Feb 2015 - 2:54 pm | आतिवास

रोचक आणि माहितीपूर्ण लेख.

उत्तम माहिती व सुरेख फोटोंनी युक्त असलेले लेखन.

नेहमीप्रमाणेच उत्तम माहिती आणि फोटो।
तुझा साल्झबुर्गचा धागा कुठं गायबलाय?

सविता००१'s picture

25 Feb 2015 - 5:08 pm | सविता००१

पुभाप्र.
त्या राजकन्यांबद्दल खरच वाईट वाटतं गं...

आदूबाळ's picture

25 Feb 2015 - 5:58 pm | आदूबाळ

हा:! शैक्षणिक प्रवासात व्हिएन्ना विद्यापीठात जाताजाता राहिलो. :) पण व्हिएन्ना पहायची इच्छा आहेच.

बादवे - व्हिएन्ना आणि बुडापेस्ट सिस्टर सिटीज आहेत.

बॅटमॅन's picture

25 Feb 2015 - 6:45 pm | बॅटमॅन

व्हिएन्नाच्या क्लासिकल म्युझिकाबद्दलही लिवा की ओ जरा. फिलहार्मोनिक की काय म्हणतात ते अटेंड केले की नाही?
तदुपरि आमचा झालाय गणेशा, पण ते डेमेल बेक्रीचे वर्णन वाचून खुळावल्या गेले आहे.

सव्यसाची's picture

25 Feb 2015 - 7:28 pm | सव्यसाची

मस्त!
व्हिएन्ना म्हटले कि बीफोर सनराईज आठवतो.

सूड's picture

25 Feb 2015 - 7:43 pm | सूड

मस्त!!

दिपक.कुवेत's picture

25 Feb 2015 - 8:45 pm | दिपक.कुवेत

कॉफिचा विशेषकरुन खुप आवडलाय.

मधुरा देशपांडे's picture

25 Feb 2015 - 9:14 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार!!
@मदनबाण, सगळ्यात महाग असे नक्की म्हणता येणार नाही. म्युनिक, संपूर्ण स्विस आणि इतरही काही शहरे तुलनेत महाग आहेत. ऑफ सीझन असल्याने तर इथली हॉटेल्स पण नेहमीपेक्षा बरीच स्वस्तात होती.
@आदुबाळ, हो बुडापेस्ट व्हिएन्नाची सिस्टर सिटी आहे. बुडापेस्ट बद्दल पुढच्या भागात येईलच.
@मृ, हो पुढच्या वेळी नक्की. उन्हाळ्यात एकदा परत यायला हवे असे वाटले फिरताना.
@बॅटमॅन, व्हिएन्नातील प्रमुख ओपेराचे बुकिंग जेव्हा बघितले, तेव्हा तिकिटे काहीच्या काही महाग होती. त्यामुळे ते राहिले. त्यामुळे क्लासिकल म्युझिक बद्दल जेवढे ऐकले/वाचले आहे त्याबद्दल पुढच्या भागात लिहीन थोडे, पण खूप सविस्तर माहिती नाही मलाही :(
@यसवायजी, साल्झ्बुर्ग बद्दल इथे मिपावर लिहिले नव्हते. हा ब्लॉग चा दुवा.

उदय के'सागर's picture

26 Feb 2015 - 1:17 pm | उदय के'सागर

अफाट सुंदर... पुढचे भाग वाचण्यास जाम उत्सुक :)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Feb 2015 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

तो रेल्वे स्थानक फ़ोटो ,एकदम मस्स्स्स्स्त! :HAPPY:

मधुरा छान माहिती.ऑस्ट्रिया यादित आहेच.हे वर्णन आणि फोटो बघुन लवकरच जावे लागेल.
भव्य इमारतींचे फोटो अप्रतिम.पु.भा.प्र.

स्नेहल महेश's picture

26 Feb 2015 - 2:22 pm | स्नेहल महेश

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्वाती राजेश's picture

26 Feb 2015 - 8:56 pm | स्वाती राजेश

वर्णन छान...राण्यांविषयी..माहीती मिळाली...फोटो अप्रतिम...
वाट पाहत आहे.... पुढच्या लेखाची... :)

स्वाती दिनेश's picture

27 Feb 2015 - 3:04 pm | स्वाती दिनेश

मनाने परत विनला पोहोचले..
मला फार आवडलेल्या शहरांपैकी हे एक शहर!
स्वाती

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2015 - 5:05 pm | पिलीयन रायडर

उत्तम लेख.. सुंदर फोटो..!!!
पटापटा पुढचे भाग टाकशीलच..!

शब्दबम्बाळ's picture

27 Feb 2015 - 7:15 pm | शब्दबम्बाळ

खूप छान लिखाण आणि छायाचित्रे!
पण इतक्या भव्य इमारतींच्या मागे असलेल्या कथा मात्र खिन्न करतात… नुकताच "neuschwanstein castle" ला भेट देऊन आलो, इतका भव्य प्रासाद पण त्या मागेसुद्धा अशीच कथा… एकदा वेळ काढून लिहीन…

जुइ's picture

1 Mar 2015 - 3:43 am | जुइ

फोटो खूप छान!! प्रवास वर्णन तसेच ऐतिहासिक माहिती दिल्यामुळे परिणामकारक. पुढील भाग लवकर येऊद्या.