मला नेहेमी वाटायचे कि प्रत्येक म्हणीमागे किंवा वाक्प्रचारामागे काहीतरी संदर्भ, कोणती तरी गोष्ट असणार नक्की.
अशी काय घटना घडली कि "काखेत कळसा…" किंवा "वासरात लंगडी गाय…" जन्माला आले?
तर अशाच दोन घटना माझ्या समोर घडल्या व ज्यावर तिथल्या तिथे काही वाक्प्रचार जन्माला आले.
(खरेतर या आधी मी हे दोन्ही वाक्प्रचार ऐकले नसल्याने मला तरी विशेष त्या घडीलाच जन्मले असे वाटते.तसे नसल्यास भरचूक नो)
गावात एकाने तिसरा टेम्पो विकत घेतला व त्यावर (तो नसताना)चर्चा चाललेली.
पहिला :- आयला मस्त कमावतोय गडी.
दुसरा :- मग न्हाय तर काय? आधीचीच देणी दिली न्हाईत आन तिसरा बी कर्ज काढूनच घ्येत्लाय.
पहिला :- म्हंजी 'घरची लाकडं जाळून कोळश्याचा धंदा करतोय' म्हणायचं तर?
तर एका पंक्तीला एकाने खूप ढकलले व यजमानाने आणखीचा आग्रह करता आपली आधीच्या क्वाण्टीटी ची लाज वाटून बिचारा नाही नको म्हणत होता इतक्यात शेजारचा बोलला "घ्या राव,हेल्यावर पाचुंदा काय जड न्हाय."
इथे
पाचुंदा :- पाच ओंब्या किंवा पाच पेंढ्याचा बांधलेली मोळी.
हेला :- बैल गाडी(आता ट्रक किंवा टेंपो) वर रचलेली पाचुन्द्यांची रास.
तुमच्याकडे हि असले वाक्प्रचारमय किस्से असल्यास सांगा. बघू रंग जमतोय का.
प्रतिक्रिया
24 Feb 2015 - 11:33 pm | अंतु बर्वा
आमच्या ऑफीसमध्ये एकजण क्लायंटकडून उशिरा Requirement आली की म्हणायचां, "घ्या, आता डोक्याला ताप आणी पोटाला उपास". आणी खरच होतं, उशिरा आलेली Requirement म्हणजे घरी जाण्याची अनिश्चिती, हुकलेला लंच्/डिनर टाईम आणी निद्रानाश :-)
25 Feb 2015 - 3:08 am | बहुगुणी
उशिरा Requirement येण्याविषयीची म्हण आवडली; "डोक्याला त्रास आणि पोटाला उपास" हे आधिक जमलं असतं कदाचित.
@म्ह्या बिलंदरः 'हेला' या शब्दाचा अर्थ मला वाटतं 'रेडा' असा आहे, बैलगाडी नव्हे. (संदर्भः 'जन्मा आला हेला, पाणी वाहाता-वाहता मेला' ही बिनकामाच्या आणि बुद्धीचातुर्य नसलेल्या व्यक्तींसाठी वापरली जाणारी म्हण)
25 Feb 2015 - 12:30 pm | माम्लेदारचा पन्खा
दुसर्या कुणीतरी केलेल्या चुकीचे खापर भलत्यावरच फोडणे ;-)
25 Feb 2015 - 1:11 pm | मराठी_माणूस
ह्याच अर्थाची दुसरी म्हण आठवली "भरल्या गाडीला सुपाच ओझ होत नाही"