मेक्सिको: भाग ४ : चिचेन ईत्झाची आश्चर्यनगरी

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
13 Feb 2015 - 10:59 pm

भाग १: प्रस्तावना, भाग २: मेरिदा, भाग ३: ऊश्माल व कबाह

या भागात युकेतान प्रांताच्या मध्य भागाची सफर... मेरिदाहून चिचेन ईत्झा तासाभरावर आहे, त्यामुळे एका दिवसात सहज ईथे भेट देता येते. जाताना वाटेत 'इक्-काल सिनोते' नावाची एक अद्भुत जागा आहे.

सिनोते: युकेतान प्रदेशात अनेक भूमिगत तळी व नद्या आहेत, काही ठिकाणी जमिन धसल्यामुळे विवर तयार होऊन हे भूजल दृश्यमान होते त्याला इथे सिनोते म्हणतात. थोडक्यात हे एक प्रकारचे सिंकहोल आहे. आणि येथील बरीच सिनोते अंतर्गत गुहांनी जोडलेलीही आहेत. एकमेकींना जोडलेल्या प्रचंड विहिरी अशी याची कल्पना करू शकतो. अथांग अशी ही जलप्रणाली बह्वंशी गुप्त असल्याने अतिशय शुद्ध आहे. यात पोहण्याचा आनंद अनुपमेय.
इक-काल चे सिनोते: चिचेन ईत्झा च्या मार्गावरच हे ठिकाण आहे. येथील नैसर्गिक विहीर हे संरक्षित क्षेत्र असून पोहण्यासाठी बरेच नियम केलेले आहेत. जमिनीवरून आत डोकावणा-या वेली आणि मूळे, कवडशातून येणारा सूर्यप्रकाश यामुळे इथे वेगळ्याच दुनियेत आल्यासारखे वाटते.

सिनोते: वरून मध्यभागी पाण्याची धार, शुद्ध निळे पाणी

वरून डोकावणारी मूळे व वेली

खोलवर जाणारा सूर्यप्रकाश

अजून एक दृश्य

चिचेन ईत्झा : त्या काळातील एक महानगर; मंदिरे, वेधशाळा, क्रिडांगण, राजमहाल, सिनोते या सर्वांनी सुसज्ज. येथील 'एल कॅस्तिय्यो' हा स्टेप पिरॅमिड ही सर्वात प्रसिद्ध वास्तू. शिखरावरील 'कुकुलकान' या सर्पदेवतेला समर्पित मंदिरास चारी बाजूंनी वर जाण्यास जिने आहेत. प्रत्येक जिन्याच्या दोन्ही बाजूंस सापाच्या शिल्पाकृती आहेत. आधीच्या जुन्या लहान वास्तूवर ही आज दिससणारी ३० मिटर उंच इमारत बांधण्यात आली. पिरॅमिडची रचना अतिशय खास व सूक्ष्म गणितावर आधारित आहे हे वसंत व शरद संपातदिनी (सध्या २१ मार्च/सप्टेंबर) अनुभवण्यासारखे असते. या दोन दिवशी सूर्यकिरणे एक खास कोनातून पडल्याने जिन्याच्या सर्पाकृती जणू जिवंत झाल्याचा भास होतो. जसजसा सूर्य कलतो तसे हे सर्प पुढे सरकल्याचा भास होतो. हे दृश्य बघण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी खासकरून मार्च महिन्यात इथे येतात. स्थानिक लोकांसाठी धार्मिक दृष्ट्याही हा दिवस महत्वाचा असतो. विवीध प्रकारच्या पूजाही संपन्न होतात.

वाटेतील एक पारंपारिक घर

जुनाट प्रवेशद्वार

वेधशाऴा

शुक्रमंदिर

देवता शुक्र: एक महत्वाची देवता, माया पंचांगावर शुक्रगतीचा विशेष प्रभाव आहे.

योद्ध्यांचे मंदिर

मध्यभागी बलिवेदिका

चिचेन इत्झाचे सिनोते: गावाचे नावच मुळी या विहिरीवरून पडले आहे.

पिरॅमिड प्रथम दर्शन

कुकुलकान

पिरॅमिड: एल कॅस्तिय्यो

आता येथून पुढे चित्रांमध्ये बरेच अवांछित घटक, विशेषत: माणसे आहेत, पण ते टाळणे केवळ अशक्य होते. कारणण कऴेलच... पण तरिही, क्षमस्व...

एकही माणूस नसलेलं हे एकच चित्र; याची विशेषता पुढील गर्दी पाहिली की कळेल ;-)

पुढील दोन परिच्छेद 'हेमांगीके' यांच्या लेखातून साभार...
या पिरॅमिडचे नऊ टप्पे आहेत. पिरॅमिड्च्या चारही बाजूंना मधून छेदणार्‍या पायर्‍या या नऊ टप्प्यांचे २ भाग करतात. त्यामुळे एकूण भाग झाले अठरा. हे वर्षाचे १८ महीने. या चार जिन्यांना प्रत्येकी ९१ पायर्‍या. त्यामुळे एकूण पायर्‍या झाल्या ९१ X ४ = ३६४ आणि वरची १ धरुन ३६५ पायर्‍या. हे झाले वर्षाचे ३६५ दिवस. पिरॅमिडच्या दर्शनी भागात ५२ फरश्या बसवल्या आहेत. मायन्स दर ५२ वर्षांनी नवी कालगणना करीत असत. दर ५२ वर्षांनी आधीच्या पिरॅमिडवर नविन पिरॅमिड बांधला जाई.

या पिरॅमिडचे चार कोपरे पुर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अशा चार दिशा अचुकपणे दाखवतात. या अशा रचनेमुळे दर २१ मार्च आणि २१ सप्टेंबर या दोन दिवशी (१२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र) इथे दिसणारा छाया-प्रकाशाचा अद्भभुत खेळ बघायला मिळतो. चित्रात दिसाणार्‍या जिन्याची कड नीट पाहीली तर ती सरळ नसून उतरत्या जिन्यासारखी असल्याचं आपल्याला दिसेल. तसंच पिरॅमिड्च्या पायथ्याशी सापाचं तोंड कोरलेलं दिसेल. वर उल्लेख केलेल्या दोन दिवशी प्रकाश जेव्हा इथे पडतो तेव्हा ही रचना नागिण असल्यासारखा भास होतो. ऊन जसंजसं खाली येत तसंतसं ही नागिण सळ्सळ्त खाली आल्याचा भास होतो. (खरंतर हा नजारा प्रत्यक्षात पाहिला तर जास्त स्पष्ट होईल) हे खालचं चित्र सळसळत खाली येणार्‍या नागिणीचं. या रचनेचा वापर धर्मगुरू करित. नागिण पहिल्यांदा खाली आली की पेरणी सुरु होत असे आणि दुसर्‍यांदा खाली आली की कापणी.

'ती' सावली पडायला आता सुरुवात होते आहे, आणि गर्दी जमायलाही...

सळसळत जमिनीत शिरू पाहणारा सर्प...

त्या दिवशी जमलेला विशाल जनसमुदाय

बॉल कोर्ट: हे क्रीडांगण एका जगावेगळ्या स्पर्धेचे ठिकाण आहे. खेळाचे नियम: दोन संघातील सामना, एक मोठा रबर व तत्सम वनस्पतीजन्य पदार्थापासून बनलेला चेंडू, हात व पाय चेंडूला न लावता केवळ कमरेने किंवा खुब्याच्या हाडाने चेंडू उडवत पोलोच्या गोळिसारख्या दिसणा-या छिद्रातून पार करायचा. जो संघ जिंकेल त्याच्या नेत्याचा बळी दिला जाई आणि तो ही हसत हसत तयार होत कारण ही अतिशय प्रतिष्ठेची बाब असे.

वरीलप्रमाणेच एक भिंत समोरील बाजूस, व मध्ये ही पंचांसाठीची जागा

चेंडू व जॅग्वार

राजाची खेळ बघण्याची जागा

कुणा जेत्याची/राजाची मूर्ती

अवांतर
घोरपडींचा येथे मुक्त वावर असतो.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चाललीय लेखमाला.

सिनोते चे फोटो केवळ अप्रतिम !

सिनोते चे फोटो केवळ अप्रतिम

+१००
किती सुंदर ठिकाणे पेरलेली आहेत निसर्गात.

रेवती's picture

13 Feb 2015 - 11:55 pm | रेवती

छान माहिती.

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2015 - 1:18 am | श्रीरंग_जोशी

पर्वणी आहे ही लेखमालिका म्हणजे.

चित्रे अप्रतिम आहेत.

खटपट्या's picture

14 Feb 2015 - 7:59 am | खटपट्या

खूप छान.

गणेशा's picture

16 Feb 2015 - 1:56 pm | गणेशा

अतिशय सुंदर लेखमाला

मदनबाण's picture

16 Feb 2015 - 3:07 pm | मदनबाण

सुरेख फोटो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }

सुधीर कांदळकर's picture

18 Feb 2015 - 11:22 am | सुधीर कांदळकर

लेखमाला आवडते आहे. हाही भाग मस्त.

कधीतरी बघायचंच आहे हे अप्रूप!मस्त लेखमालिका.पुभाप्र.