डब्यातलं तत्त्वज्ञान... १

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 12:18 am

आज तिला विचारायचंच, असं मी ठरवलं होतं.

अगदी घट्ट मैत्री झालेली नसली तरी ओळख बर्‍यापैकी झाली होती. एकाच ग्रुपात होतो दोघंही. एकमेकांशी बोलणं फारसं होत नसलं तरी कधी अवघडलेपण जाणवलं नव्हतं एकमेकांसोबत. शाळेत असल्यापासून मनावर बिंबवलं गेलं होतं की स्त्री-पुरुष हे दोघंही समान आहेत. जी वागणूक पुरुषांना मिळते ती स्त्रियांनादेखील मिळायला हवी. मला हे अगदी मनोमन पटलं होतं आणि मी अजूनही यावर ठाम आहे. म्हणूनच मी जसा माझ्या मित्रांशी बोलायचो तसाच मुलींशीही बोलायचो. शिव्या देणं, कमरेखालचे किंवा वरचे लैंगिक विनोद करणं, रस्त्यात दिसलेल्या एखाद्या मुलीच्या शरीरवैशिष्ट्यांचं तोंडभरून कौतुक करणं इत्यादी इत्यादी क्रिया, श्रोता स्त्री आहे की पुरुष हे लक्षात न घेता, किंवा लक्षात घेऊनसुद्धा मी निर्धास्तपणे पार पाडायचो. साहजिकच फारशा मैत्रिणी नाही टिकल्या माझ्याजवळ.

‘श्शी तो तुझा मित्र आहे? तो किती घाणेरडं आणि चीप बोलतो. मुलींसमोर कसं वागावं याचीही अक्कल नाहीये त्याला. मला तर सहनच होत नाही त्याची बडबड... वगैरे वगैरे’

मुलींच्या अशा मतप्रदर्शनानंतर त्यांच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी माझ्यापासून मैत्रीच्या बाबतीत विशिष्ट अंतर राखून राहणारे ‘मित्र’ही वाढले. वाढले म्हणजे, माझ्या दैनंदिन आयुष्यातून कमी झाले. आपोआप कचरा गाळला जाऊन माझा अर्वाच्य प्रामाणिकपणा आवडलेली काही मंडळी तेवढी उरली. त्यात ती सुद्धा होती. माझ्या चांगल्यातल्या चांगल्या पुचाट विनोदांवर तोंड वाकडं करायची, पण मी किंवा कोणीही उत्स्फूर्तपणे शिवी दिली की मात्र ही हसत सुटायची. कधी कधी तर वन्स मोअर म्हणायची. स्वत: मात्र शिवी अजिबात द्यायची नाही. इतर कोणीही अडचणीत सापडलेलं असलं की ‘माझी वाट लागलीये रे’ (अर्थातच वाट या शब्दाला अजून एक पर्याय होता) हे सांगताना त्यांचं तोंड हिरमुसलेलं असायचं. ही हसत हसत स्वत:समोरची अडचण किंवा स्वत:ची झालेली फजिती सांगायची. कोणी म्हणेल, एवढं हसायची म्हणजे नक्कीच कुठेतरी काहीतरी सैल असणार. नाही! लो-वेस्टच्या जमान्यात तिची पँटही सैल नव्हती, डोक्यातले स्क्रू तर राहूद्यात(हो माझी निरीक्षणशक्ती चांगली आहे मला माहितीये). तिला हसवणारे हे काही मोजकेच प्रसंग असायचे. इतर वेळी कोणीतरी तोंडात मारल्यागत चेहरा करून बसायची. उत्साह या भावाचा तिच्या चेह-यावर अभाव होता. तिला काहीही नवीन सांगा, मख्ख दगडासारखा चेहरा करून सांगणार्‍याकडे बघायची. चेहरा खुलणं असं म्हणतात ते कधी नाहीच. निदान, माझ्याच्यानं तरी फारसं कधी ते जमवता आलं नव्हतं. त्यामुळे तिच्या वाट्याला गेल्याने बर्‍याच जणांची बर्‍याचदा फजितीच व्हायची. बरं चेहरा काही सुंदर होता अशातलाही भाग नाही. तशी बरी होती, पण आमच्या कॉलेजातल्या एकापेक्षा एकींसमोर तर ही दिसण्यामध्ये तरी अगदीच थू होती. इतकं असूनही माणसं ओढली जायची तिच्याकडे, नकळत. मीही ओढला गेलो होतो, फक्त मला ते अजून जाणवायचा अवकाश होता. एकूणच अजब रसायन होतं.

कॉलेज सुटल्यावर किंवा आम्ही कॉलेजमधून आम्हाला हवं तेव्हा सुटल्यावर, सगळे एकत्रच चालत चालत स्टेशनापर्यंत जायचो. माझ्या दिशेने प्रवास करणारी फारशी मंडळी नव्हती याचं आधी मला वाईट वाटलं होतं. मात्र नंतर उ:शाप मिळाल्यासारखं वाटायला लागलं. कारण माझ्याबरोबर ट्रेन पकडणारे दोघेजण होते, आणि त्यातली एक ती होती. दुसरा कॉलेजात जास्त यायचा नाही, आणि क्वचित कधी आलाच तरी ट्रेनमध्ये असताना पुस्तक वाचत बसायचा ज्यामुळे मी बाजूला बसल्या बसल्या कंटाळून जायचो.

असंच एकदा आम्ही सगळे रमतगमत स्टेशनपर्यंत जाऊन पोचलो आणि मग सगळे पांगले. ती आणि मी नेहमीप्रमाणे दोघंच जिना उतरून आमच्या फलाटावर आलो. विषय नव्हता. तिच्याबरोबर असं एकटं असताना कधीच नेमका विषय वेळेत सुचायचा नाही. आज तर विषय सुचण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आज मला तिला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. त्यामुळे धीर एकटवेपर्यंत मी गप्पच होतो. मनात मात्र हलकल्लोळ उठला होता. इतका का घाबरत होतो मी? समजा, ती नाही म्हणाली, तर काय होणार होतं फारसं? आपल्याला तोंडात मारल्यासारखं होईल... आपण निराश होऊ, पण ते तात्पुरतंच असणार आहे ना. नाही तर नाही. पण मी आधी कधीच कुठल्याच मुलीला विचारलं नव्हतं. ट्रेनमध्ये कितीतरी युगुलं एकमेकांना खेटून बसलेली दिसायची. त्यामुळे एकूणच काळाशी सुसंगत प्रश्न होता. पण मी तिला विचारल्याशिवाय काहीही होणं शक्य नव्हतं. तिने स्वत:हून उत्साह दाखवण्याची तर शक्यताच नव्हती.

ट्रेन एका मिनिटात अपेक्षित आहे असं दिसलं.

चल विचारून टाक.

ट्रेन दिसली.

अरे काय घाबरतोस काय! मर्द बन! बी अ मॅन!

ट्रेन आली, ट्रेनची गती मंदावत गेली. माझी मती गुंगावत गेली.

लेडीज डब्याच्या दिशेनं तिची पावलं हलली. तिने मोबाईलमधून डोकं काढून माझ्याकडे पाहिलं.

चल विचार... पण एकदम सहज वाटलं पाहिजे... एक दोन तीन -

’जेंट्समधनं येतेस आज?’

ती थांबली. माझा आवाज मी शक्य तेवढा सहज ठेवला होता. पण चेहर्‍यावरची अगतिकता (हल्लीच्या मराठीत डेस्पो फीलींग) झाकता आली नाही. माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. खालच्या ओठाने वरच्या ओठाला आतमध्ये दाबलं होतं. तिने आधी प्रश्नाला उत्तर देण्याच्या उद्देशाने तोंड उघडलं आणि तेवढ्यात माझ्याकडे नीट पाहिलं. मग हसली आणि ‘चल’ म्हणाली. आम्ही एकत्र चढलो. फर्स्ट क्लास असूनही डब्यात बसायला जागा नव्हती. तिनं तोंड वाकडं केलं.

‘ए शी इथे बसायलाही जागा नाहीये. लेडीजमध्ये आडवं झोपायला मिळेल मला. मी जाते.’ ती पटकन उतरली. मला काही सुचलंच नाही. तिला अडवायला म्हणून तोंड उघडलं पण बोलू काय?

‘तू लेडीज डब्यात आडवी होतेस?’ - मला दुसरं काहीच सुचलं नाही.

‘नाही रे, वेडा आहेस का!’ तिने लेडीज डब्यात पाय ठेवत ठेवत म्हटलं. ट्रेनही सुटली. एकदा तिनं माझ्याकडे पाहिलं. हसली. त्या हास्यात ‘सॉरी’ होतं. मीही ‘आता काय बोलणार’ अशा अर्थानं हसलो. तिनं ते ‘इट्झ ओके’ या अर्थी घेतलं असावं. ती तिच्या डब्यात आतमध्ये गेली. मीही तोंड पाडून माझ्या डब्यात आत शिरलो. पुढच्याच स्टेशनावर दोघेजण उठले आणि खिडकीजवळची जागा मला मिळाली. कहर म्हणजे जिथे ती आत्ता बसली असती अशी मनात मी कल्पना करत होतो तिथे एक दिड माणसांची जागा व्यापणारे गृहस्थ येऊन बसले. मला खिडकीत चिणल्यासारखं वाटत होतं. उद्या काही केल्या तिला जाऊ द्यायचं नाही असं ठरवून मी कानात बोंडं घालून रोमँटिक गाणी लावून बसलो. खिसा थरथरला. मेसेज होता. आता व्यवस्थित सॉरी असं लिहून पाठवलं होतं. माझा मेसेज पॅक संपला होता. फारसा रस नसलेल्या मुलींच्या बाबतीत मी चिक्कू होतो. आणि हिला पटवायचा उद्देश नव्हता माझा. फक्त घरी जाताना थोडी कंपनी हवी होती इतकंच. नाही यायचंय तर नाही, गेली उडत. नाही घालवणार मी हिच्यापायी एक रुपया फुकट. असं मी मनातल्या मनात स्वत:ला समजावलं. स्वत:च्या या
तो-यावर खुश झालो. आणि त्या खुशीत ‘इट्झ ओके’ टायपून तिला पाठवूनही दिलं.

क्रमश:

- © कौस्तुभ अनिल पेंढारकर

कथा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Feb 2015 - 12:54 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

(एका बाजूला सस्पेन्स थ्रिलर आणि एका बाजूला लव्ह स्टोरी---आनंदीत) मुवि.

कंजूस's picture

1 Feb 2015 - 7:00 am | कंजूस

गोष्ट गेली उडत.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

भारी!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Feb 2015 - 7:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्ष-गफ ला पत्र वाली हिचं काय?

तशी बरी होती, पण आमच्या कॉलेजातल्या एकापेक्षा एकींसमोर तर ही दिसण्यामध्ये तरी अगदीच थू होती.

चांगलं लिहीताय पण हे काय?

खटपट्या's picture

1 Feb 2015 - 9:18 am | खटपट्या

आवडली !!