सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

अमृतसर ५ - खादाडी

Primary tabs

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in भटकंती
30 Jan 2015 - 10:42 pm

1

पंजाबी खाणं म्हटलं की डोळ्यापुढे सरसो का साग, मकई रोटी, छोले भटुरे, आलु गोबी, तडका दाल, पनीर चे नाना चमचमीत पदार्थ, खुसखुशीत रोट्या, नान, पराठे, कुलचे डोळ्यापुढे येतात. जोडीला पंचरंगा आचार आणि मसाला पापड हवेतच. भरल्या पोटी हौसेनं लस्सी हाणणं आलच. त्यात अमृतसर हे कुलचा साठी प्रसिद्ध.

2

लस्सी ही पिण्याची चीज नसून खायची चीज आहे हे इथे समजते.

3

4

लस्सीमध्ये मलई नेहेमीच घालतात पण ग्यानचंदच्या लस्सीमध्ये मलई बरोबरच मस्तपैकी अंड्याएवढा ताज्या लोण्याचा गोळाही असतो. लस्सीच्या ग्लासाबरोबर चमचा का देतात ते इथे खरं समजतं. सकाळ दुपार संध्याकाळ लस्सी ही हवीच. इथली सुरेख हवा आणि रुचकर पदार्थ यामुळे चार घास जास्तीच जातात. खरतर सकाळी नाश्त्याला पराठे, कुलचा वगैरे खायची सवय नाही पण इथे येउन इडली डोसा खायचा म्हणजे हद्द झाली. मिठाया या साजुक तुपात बनतातच पण दाल माखनीमध्येही साजुक तुपाचा घमघमाट असतो. सरसोच्या तेलातल्या जवळपास पिकवलेल्या अगदी ताज्या भाज्या अप्रतिम.

इथे होटेलची आणि खाद्यगृहांची रेलचेल. मी जिथे जिथे गेलो ती सर्व ठिकाणे चविष्ट निघाली. फ्लॉवर ही सर्रास आणि सर्वत्र मिळणारी भाजी पण अमृतसरच्या बिग ब्रदर ढाबामध्ये आलु गोबी खाण्यातली मजा काही औरच. हिरवट देठ शिल्लक असलेले फ्लॉवरचे रस्रशीत तुरे आणि मोहरीचा झणका केवळ अद्वितीय. अमृतसरचा चना अमृतसरी तर लाजवाब. चमचमीत पण जळजळीत नाही असे रुचकर अन्न हे इथले वैशिष्ट्य. आपल्या कडे सर्वसाधारणतः छोले भटुरे मागवले की तेलात चपचपलेल्या भल्या मोठ्या पुर्‍या आणि लाल तवंगाचे छोले मिळतात. इथल्या चविष्ट छोल्यांवर तेलही तरंगत नसते आणि बटुरेही तेलकट नसून खुसखुशीत असतात. वर लोणी हवेच. जोडीला कांदा आणि मिरच्या. सरसो का साग आणि मक्याच्या रोट्या खरोखरच अप्रतिम. सरसोच्या भाजीवर आल्याच्या उभ्या कापांबरोबर ताज्या लोण्याचा गोळा असतो हे खासच. दालही नाना प्रकारची मां की दाल, दाल महारानी दाल माखनी सगळे दाट आणि सौम्य. पंजाबी थाळीही उत्तम होती. मात्र एका माणसाला संपवायला जडच. मी माझी पत्नी बहीण आम्ही पडलो तृणभक्षी. त्यामुळे मांसाहारा विषयी काय लिहिणार? मात्र चिरंजीव, भाची आणि मेव्हणा बोटं चाटत कोंबडीचा फडशा पाडताना दिसले. खासियत म्हणावी तर 'माखन' मधला बटर फिश. या लोकांना हा प्रकार फारच आवडला होता.

जेवण झाल्यावर आणि फिरता फिरता खायचे पदार्थ म्हणजे गुलाब जांब आणि त्याही पेक्षा जिलबी. कुव्याची जिलबी, लॉरेन्स रोडची जिलबी अशी नाना प्रसिद्ध ठिकाणं मात्र सगळ्याच जिलब्या उत्तम आणि अर्थातच साजुक तुपातल्या. मिठाई मध्ये पतीसा छान मिळत असं ऐकुन होतो. प्रत्यक्ष घ्यायला गेलो तेव्हा समजलं की पतीसा म्हणजे जवळपास सोनपापडीच, फक्त जरा पातळ आणि साजुक तुपामुळे मृदुमुलायम. वर बदाम पिस्त्याचे काप मुबलक लावलेले हे सांगायलाच नको.

27
28

या सर्वांपेक्षा सवाई अशी रात्री हॉलगेट वर जाऊन खाल्लेली दाट चविष्ट मलई कुल्फी, बदाम कुल्फी, पान कुल्फी आणि अर्थातच माझी आवडती केशर पिस्ता कुल्फी, त्यावर रबडी आणि शेवया.

29
30
31
32

इथे दोन हॉटेल मला जरा विशेष आवडली ती म्हणजे अटारीच्या अगदी अलिकडचं सरहद आणि जालंदर जवळचं हवेली.

सरहद हे विस्तिर्ण आणि आल्हाददायक झुळुक देणार हॉटेल. या मालकाच्या डोक्यात हिंदुस्थान पाकिस्तान मैत्रीचं प्रचंड कौतुक. कदाचित त्याचे नातेवाईक तिकडे पलिकडे राहिले असावेत. आमचा सारथी सांगत होता की सिमेच्या आरपार जा ये करण्या साठी अनेक भुयारे होती. खलिस्तान पर्वात ती सर्व नष्ट केली गेली. असतीलही. देश विभागला गेला कुण्या इकडच्यांचे जिवलग तिकडे राहिले आणि तिकडच्यांचे इकडे. इथे प्रवेश करताच लक्ष वेधुन घेतात ते खास ट्रक शैलीत रंगवलेले टेम्पो. वाहतुकीचे आणि सामानाचे. त्या कलाकारानं आपलं नाव कलाकृतींवर लिहिलं होतं आडोश्यासाठी उभ्या केलेल्या पत्र्यांवरही त्याची कलाकारी दिसत होती. बाहेर ऐसपैस जागेत टेबल खुर्च्या मांडलेल्या. नुसताच परिसर नाही जेवणही उत्कृष्ठ होतं.

5
6
7
8
9
10
11
12
14

हवेली हे अमृतसर दिल्ली, अमृतसर चंदिगड मार्गावरचं 'थांबलच पाहिजे' अस हॉटेल. हॉटेल ला लागुन हवेली विलेजही आहे. वर्दळीची सहज व्यवस्था होइल अस प्रशस्त आवार. गाड्या उभ्या करायला बाजुलाच एक छोटं मैदान आणि जालंदरच्या अलिकडे अगदी महामार्गावरचं सोयिस्कर ठिकाण. इथे एका शाळेची सहलही आलेली होती, नाश्ता संपवुन त्यांना वहनात बसवायचं काम शिक्षिकांना लागलं होतं. प्रवेश करताच उजव्या हाताला एक विहीर आणि हीर रांझा स्टाइलमध्ये केलेले पाणी पिणारा आणि पाणी पाजणारी यांचे पुतळे. अगदी उथळ विहीर ही शोभेची होते. बाहेरुन विहीरीचा आभास आणि आंत पाण्याचा हौद. मात्र येणारे तमाम पर्यटक त्या विहीरीचं पाणी काढायला रहाटावर जात होते. पर्यट्कांच्या फोटोशूटची ती प्रसिद्ध जागा असावी. डाव्या अंगाला फरसाण, मिठाया, जिलब्या, असे अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल होते; पानाची गादी होती. हॉटेलची सजावट मोठी कलात्मक होती. मुख्य भोजनकक्षा बाहेर वरांडा होता. एका टोकाला सांझा चुल्ह्यावर रोट्या भाजणार्‍या युवती तर दुसर्‍या टोकाला म्हणजे प्रवेशद्वाराजवळ चोपडी घेउन बसलेले लालाजी. वरांड्यात शिवराय पसार झाले तसे भले मोठे पेटारे.

आत प्रवेश करताच डावीकडे साक्षात टाटा ट्रकची आक्खी केबीन! मंद प्रकाश योजना. निवांत कारभार, उंच भव्य छत आणि बसायल ऐसपैस जागा. लख्ख पितळेची भांडी चकाकत होती. भिंतीवरच्या फळीवर जुना रेडीओ आणि बाजुला यंत्रावर चारा कापणारे सरदार दांपत्य. या सर्वाला साजेसं सुग्रास जेवण आणि दाट मलईदार लस्सी. कोचावर रेंगल्या वर जराशी डुलकी काढावी असा विचार प्रबळ होत होता.

15
15a
16
18
19
19a
20
21
22
23
24
25

खटकरकलांहून निघालो तेव्हा वाटेत उसाचे मळे लागले. आम्ही सारथ्याला विचारले की जवळपास गुर्‍हाळ असेलच? गुर्‍हाळ नाही पण आपल्या शेतावरचा गूळ विकणारी दिसली. उतरुन जवळ जाउन पाहतो तर काय, मस्त रवाळ पिवळा धमक गुळाचा बारिक भुगा. लाळ गळायचीच बाकी होती. पोळी वर साजूक तूप् चोपडायचं, त्यावर हा गूळ पसरयचा आणि गुंडाळी करुन हाणायची या कल्पनेनच भूक चाळ्वली. शेजारी आणखी एक प्रकार पाहायला मिळाला. 'गुळाची मिठाई' ताजा गुळ वड्या पाडण्या आधी त्यावर खोबर्‍याचे काप, धने, तीळ, बडिशेप असे पेरायचे आणि मेदुवड्या एवढे चपटे गोळे करायचे. हा प्रकार भरपेट जेवण झाल्यावर अन्नपचनास उत्तम असे त्या बाईने म्हणजे लक्ष्मीने सांगितले. ते खरे असावे. हवेलीमध्ये बडेशेपेबरोबर असे गुळाचे तुकडेही मुखवास म्हणुन दिले होते. तुम्ही मुंबईकर का असे लक्ष्मीने माझ्या पत्नीकडे - किंबहुना तिच्या पोशाखाकडे पाहुन विचारले. म्हणाली तुम्ही बरं काहीही मनाप्रमाणे नेसू शकता. आम्हाला ओढणी डोक्याव्रर घेउनच वावरावे लागते.

33
34
35
36
37

इथली जमीन सकस आणि भाज्याही रसरशीत. प्रवासात बंगा गावाजवळ एक शेतकरी त्याच्या वाफ्यातली पालेभाजी घेउन आला होता. कसले अजस्त्र मुळे! पण ताजे आणि रसरशीते. पाहिल्यावर याचा चट्का करुन कधी खातोय असे व्हवे असे. कोवळा पाला कोशिंबिर करुन खायला झकास. मग भरले तेही गाडीत.

39
40

सरहद मधुन बाहेर पडल्यावर उसाचा रस दिसला. आम्ही गाडी थांबवली मात्र नुकतीच लस्सी पिउन झाली असता त्यावर रस पिण्यास महिला वर्गाने सक्त मनाई केली आणि आमची अक्कल काढली. ती हौस राहुनच गेली.

38

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2015 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

अफाट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो आणि ओघवते लेखन.

फारच भारी ठिकाणं आहेत ही. वाखू ठेवलीय. त्या भागात फेरी झाली की जरूर शोधून काढणार !

मुक्त विहारि's picture

31 Jan 2015 - 12:04 am | मुक्त विहारि

झक्कास....

"सरहद मधुन बाहेर पडल्यावर उसाचा रस दिसला. आम्ही गाडी थांबवली मात्र नुकतीच लस्सी पिउन झाली असता त्यावर रस पिण्यास महिला वर्गाने सक्त मनाई केली आणि आमची अक्कल काढली."

घरोघर मातीच्या चुली.....आमच्या कडे पण हिच कथा.

असो,

अज्जुन एक समदु:खी भेटले.

(टका, जेपी, स्पा, अआ आणि इतर तमाम लग्नाळू मंडळी...ऐकतांय ना?

काय हो साक्षीजी, आज तुम्ही एकदम दणकेबाज लेखन व फोटू चढवलेत! अशा शांत गावांमध्ये जाऊन राहण्याची इच्छा होते. दोन्ही हॉटेलांचे रूप प्रेमात पडावे असे आहे. सुरेख फोटू, त्यात तिथल्या वातावरणाचा फील आलाय. आम्ही जाऊ असे वाटत नाही म्हणून तेथे हे बघूनच समाधान मानते. धन्यवाद.

खटपट्या's picture

31 Jan 2015 - 12:21 am | खटपट्या

जबराट फोटो आणि वर्णन. पराठा जरा करपलेला वाटतोय..
फोटो पाहून अम्रुतसरची सफारी करावीशी वाटतेय.

जुइ's picture

31 Jan 2015 - 3:19 am | जुइ

जायचा प्रयत्न करु आम्ही.

निमिष ध.'s picture

31 Jan 2015 - 3:50 am | निमिष ध.

तुम्ही अमृतसर सुरू केल्यापासून याच भागाची वाट पाहत होतो. खाणे हा एक वीक पॉइंट आहे आणि खास करून अमृतसरी म्हणजे क्या केहेने!

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2015 - 5:31 am | कैलासवासी सोन्याबापु

विलक्षण लोकांचा प्रदेश!! इथल्या हवेत घी मख्खन प्रचंड पचते!!! आपल्या चुका ही मानणारा कदाचित एकमेव दिलखुलास प्रदेश!!!, आम्ही आमच्या पंजाबी मित्र/यजमाना कड़े जेव्हा जेव्हा जात असू अमृतसर किंवा जलंधर ला तेव्हा तेव्हा "ओये इ देख्खो मराठेयासी, इन्नानु कोई चोचले नहीं रहेंदे!, लेकिन ओये कक्के मैनु इक्को गल दस, तुस्सी माराठेया इन्नी मिर्च कैसे खा लेते हो?"

थोडक्यात, काटक अंगचणीचे प्रचंड तिखट खाणारे लाल डोळ्याचे "मराठे" उर्फ़ महाराष्ट्रियन लोकं ह्यांना कुतुहलाचा विषय वाटतात! , नॉर्थ इंडिया मधे महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असे साधे सुटसुटीत गृहीतक आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2015 - 5:33 am | कैलासवासी सोन्याबापु

बाकी आपले लेखन मला सहज उचलून अमृतसरांत परत घेऊन गेले हे वेगळे सांगणे नलगे सर्वसाक्षी!! :)

आता खादाडीसाठी अमृतसरला परत जाणे आले!!

जबरदस्त! एक लंबर. काही फोटो पाहून foodgasm या शब्दाची याद आली.

बॅटमॅन's picture

31 Jan 2015 - 4:46 pm | बॅटमॅन

ऐवेइ कहिदा!!!!

पिंपातला उंदीर's picture

31 Jan 2015 - 9:28 am | पिंपातला उंदीर

अजून एक शब्द म्हणजे Food Porn *pardon*

अनुप ढेरे's picture

31 Jan 2015 - 10:19 am | अनुप ढेरे

जबर्‍या... कुल्फीचे फोटो पाहून खपलो!!

मृत्युन्जय's picture

31 Jan 2015 - 11:12 am | मृत्युन्जय

अरारारारारर. जीव गेला. कुल्फी पाहुन तर पोटात जळजळ व्हायला लागली. कुठुन हा धागा उघडला असे झाले. आता अमृतसरला जाणे आले.

सुहास झेले's picture

31 Jan 2015 - 1:15 pm | सुहास झेले

प्रचंड प्रमाणात इनो घेतले गेले आहे... कुल्फीचे फोटो तर पार जीवघेणे आलेत. वाचनखुण साठवली आहे :)

आनंदराव's picture

31 Jan 2015 - 3:26 pm | आनंदराव

जळफळाट फक्त !

ਇੰਨਾ ਸੋਣਾ ਧਾਗਾ ! ਜਦ ਵੇਖੀਆ ਤੇ ਮਰ ਗਿਆ !!!!

३८ नंबर दे फोट्टो विच 'गन्ने दा ताजा रस' लिखिआ सी.

सव्यसाची's picture

1 Feb 2015 - 1:58 pm | सव्यसाची

आता तू पंजाबी पण शिकून राहिलास कि काय? :)

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 3:36 pm | बॅटमॅन

लिपी येते फक्त. :)

बाकी भाषा तर हिंदीचीच एखादी डायलेक्ट म्हणावी इतकी हिंदीला जवळची आहे.

बॅटॅ, मिपावर एखादी भाषा शिकव की. मुळाक्षरं, लहान लहान वाक्यं वगैरे. लेखमाला वगैरे सुरु कर अशी. आवडेल बर्‍याच जणांना शिकायला.

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 10:50 am | सविता००१

एकच नंबर.
बॅटॅ, एवढा हुशार आहेस तर शिकव की रे. घे मनावर.
शिकायला मी पयली :)

धन्यवाद. नक्की प्रयत्न करेन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2015 - 12:26 am | निनाद मुक्काम प...

भारत भ्रमण हा भारतात येण्याचा प्रमुख हेतू
नातेवाईकांना व आप्तांना भेटणे मग
दिल्ली अमृतसर व जयपूर हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा त्रिकोण जयपुर पाहून झाले आहे त्यामुळे ह्या दोन शहरात डेरा टाकायचा विचार आहे.

दिपक.कुवेत's picture

1 Feb 2015 - 12:14 pm | दिपक.कुवेत

फोटो, ते वर्णन आणि ती खादाडि....खुपच मिस करतोय विविधतेने नटलेला आपला भारत.

एकच नंबर. सध्या शाकाहारी जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने हे फोटो पाहून जळजळ झाली. अतिशय सुंदर प्रदेशाचे ओघवत्या भाषेत लेखन.

स्वाती दिनेश's picture

1 Feb 2015 - 3:44 pm | स्वाती दिनेश

मस्त मस्त मस्त!
अमृतसरला परत जावेसे वाटू लागले आहे..
स्वाती

बेकार जळजळ होतीय.कुल्फि;लस्सी फोटू अप्रतीम...फोटो मध्ये घूसता आल असत तर ?

विअर्ड विक्स's picture

7 Feb 2015 - 7:16 pm | विअर्ड विक्स

हवेली हॉटेल कर्नल जवळ आहे. रात्री ११.३० वाजता येथे थाळी हादडली आहे. असे ऐकून आहे कि येथील वेटर पगार घेत नाहीत कारण येथून तृप्त होऊन बाहेर पडणारा कितीही चीकट्या असला तरी दक्षिणा ठेवणारच ……

पंजाबला गेले होते त्याची आठवण येते आहे तुमच्या लेखमालेमुळे.

सर्वसाक्षी's picture

8 Feb 2015 - 6:03 pm | सर्वसाक्षी

सर्व मिपाकरांचे आभार.

या खाद्य यात्रेत राहुन गेलं ते अगदी घरगुती असं पंजाबी जेवण. आम्ही आमच्या सारथ्याला त्याच्या घरी जेवायला नेण्या विषयी सुचवले तेव्हा तो आनंदाने तयार झाला होता. मात्र त्या दिवशी आम्हाला फिरंती मुळे उशीर झाला आणि ते राहुन गेले.

नंदन's picture

8 Feb 2015 - 6:07 pm | नंदन

नेत्र-(आणि जिव्हा-)सुखद फोटोज! :)

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 10:51 am | सविता००१

किती सुंदर फोटो आणि तेवढंच सुंदर लिखाण.
नेत्रसुखद.

मागे एकदा जालंधरला आठ दिवस राहावे लागले होते .. त्यावेळी येथे भेट दिली आहे .. अप्रतिम जागा आहे. तुमच्या फोतो मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
उत्तम लेख ( फोटो ) माला !

विशाल कुलकर्णी's picture

9 Feb 2015 - 2:53 pm | विशाल कुलकर्णी

लै भारी...
तोंडाला पाणी सुटलं राव !

पैसा's picture

9 Feb 2015 - 3:21 pm | पैसा

काय जबरदस्त लिहिलंय! फोटो मस्स्स्स्त!!

एवढं सगळं खाल्ल्यावर आणखी प्रेक्षणीय स्थळं बघणं काय शक्य व्हायचं नाही!

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 1:48 pm | खंडेराव

मस्त! अम्रुतसरी कुलचे, भरवान दा धाबा ( हाच बहुधा बिग ब्रदर्स असावा )..एकदम उत्साहाने भरलेले शहर..