मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

परमसखा मृत्यू : किती आळवावा...

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
12 Aug 2008 - 10:20 am
गाभा: 

विशेष सूचना-
सदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे . या वरील प्रतिक्रिया या आजच्या सुधारक च्या संपादकांना कळविल्या जातील. मी फक्त वाहक आहे.
===========================================


परमसखा मृत्यू : किती आळवावा....


मंजिरी घाटपांडे

"तुला अगदी शंभरावर पाच वर्षे आयुष्य!" मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन सगळ्यांनी हे असे उस्फुर्त स्वागत केले माझे. ऐकले अन अंगावर सरसरुन काटा आला. मनात म्हटले, माणसाची ' अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणा-याला शंभर वर्षे आयुष्य बहाल केले जायचे, आता शंभरावर पाच!' साहजिकच चर्चा या शंभरावर पाच आणि त्यावरुन अंगावर उठणारा काटा अशीच सुरु राहिली.

नुकतीच वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगडया शेतकरी माणसाविषयी बातमी वाचली. त्यावरुन आपल्या पुराणकथांमधील सात चिरंजीवांची आठवण झाली. अमरत्वाची कल्पना खरोखरच एवढी आकर्षक आहे का! असली तर का! या सात चिरंजीवांच्या कल्पनेबाबत दुर्गाबाई भागवतांनी म्हटलंय, ``माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकूर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही पण ते फुलणार, फळणारही नाही, असाच इशारा, दयायचा असावा.``

मृत्यूविषयी माणसाला जेवढी भीती आहे तेवढंच आकर्षणही आहे. ११७ वर्षांच्या माणसाची बातमी जरी पेपरमध्ये छापून येण्याएवढी महत्वाची वाटली तरी बहुतेक वृध्दांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया ``नकोरे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!`` अशीच असते.

जगातील बहुतेक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर, सावरकर, सानेगुरूजी यांसारख्या आपल्या परिचयातील उदाहरणांमधील एक प्रकारच्या आत्महत्यांनाच आपल्याकडे उच्चतर दर्जा दिलेला आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे? ख््रािश्चॅनिटीचा पाया असणाऱ्या जेनेसिस नुसार मानवी जगातील पहिला मत्यू हा नैसर्गिक मत्यू नव्हताच. अॅडम आणि आिव्ह यांच्या केन आणि एबल या दोन भावाभावातील वैरातून केन हा एबलचा द्वेष करतो आणि रागाच्या भरात तो त्याला मारुनच टाकतो. ख््रािश्चॅनिटीनुसार हा जगातला पहिला मानवी मत्यू!

निसर्गाकडे पाहिलं तर काय दिसते? जिवितकार्य पूर्ण झाले की मत्यू! कोणा किटकाचा तीन दिवसात तर एखादया केळीचा प्रसवतांनाच! जन्म, वाढ, पुनरूत्पादन आणि विनाश ही खरं तर निसर्गाचीच साखळी आहे. पण मानवाने प्रगतीच्या नशेत या साखळीला खोडा घातला आहे. अर्थात काळाची पावलं उलटी कधीच जाउ शकणार नाहीत. काळाच्या सुरूवातीच्या पावलांत माणसाने जन्म घेण्याच्या नैसर्गिक हक्कात हस्तक्षेप केलेला आहेच पण मत्यू पावण्याच्या नैसर्गिक हक्कात मात्र तो हस्तक्षेप करण्यास कचरतो आहे, हे काय आहे?

वास्तविक फक्त भारतीय परंपरांचा विचार केला तरी समाजाचं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नेतत्व करणाऱ्यांनी नैसर्गिक मत्यूवर अवलंबून राहणं नाकारलेलंच दिसते. `अनादि मी अनंत मी। अवध्य मी भला ।` असं बजावणाऱ्या सावरकरांनी शेवटी वयाच्या ८३व्या वर्पी निर्धारपूर्वक अन्नत्याग करून मत्यूला मिठी मारली. त्यापूर्वी अंदमान बेटावर काळया पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी जे मनोबल दाखवले होते, त्याहून हे मनोबल निश्चितच तसूभरही कमी नव्हते. ज्ञानेश्वरांनी तर अगदी लहान वयात कृतार्थ मत्यू पत्करला तो समाधीच्या मार्गाने. पाश्चात्यांमध्येही सॊक्रेटिसने विष पिउन मृत्यु पत्करला तो पलायनवाद नाकारण्यासाठी. हॆम्लॊक हे विष पिउन तो अगदी स्थिर बुद्धीने मृत्युला सामोरा गेला. हा सगळा इतिहास काय सांगतो? अनैसर्गिक मरणाला पुर्वी मानवी समाजात मान्यताच नव्हे, तर प्रतिष्ठा ही होती. फक्त कायद्याचे पाठबळ नव्हते आणि ते अजुनहि नाही.
आणि अशा त-हेच्या स्वयंनिर्णयासाठी फार मोठ्या मानसिक बळाची गरज असते. जे सामान्य माणसाजवळ अभावानेच आढळते; आणि कोणतीही कठीण गोष्ट एकटादुकटा जेव्हा करु शकत नाही तेव्हा एकमेकांच्या सहकार्यांने ती पार पाडणे थोडेतरी सुलभ होते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामुळेच आज इच्छामरणाच्या कायद्याची जास्त गरज निर्माण झाली आहे. कारण एकमेकांना ज्या गोष्टीत मदत करायला जायचे ती गोष्ट तर आधी कायदेशीर असली पाहिजे. इच्छामरणाबाबत अनेकांनी वैयक्तिक पातळीवर ही गरज मान्य केलेली आहे. या पुर्वी आ. सु.च्या अंकात माझ्या प्रसिद्ध झालेल्या पत्रास पाठींबा देणारे दुरध्वनी अनेक मान्यवरांनी केलेले आहेत. खाजगी बैठकांमध्ये तर अनेकांनी 'इच्छामरणाची सोय असायला हवी' हे मान्यच केलेले आहे. या ही पुढे जाउन या विषयावर कोणी जनहित याचिका दाखल करणार असेल तर त्याला मी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत ( रु १०,०००/-) करेन असे ही कळविले गेले.

याबाबत पुन्हा दुर्गाबाई भागवतांचाच दाखला आहे. एका मुलाखतीत म्हणले आहे," आत्महत्या हे पाप आहे असे अनेक धर्मांनी ठरवलले आहे खरे, पण मला काही ते पटत नाही . ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असं मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला इच्छामरण हा शब्द अधिक योग्य. सावकरांचे मरण हे इच्छामरण होते. अशा मरणासाठी एक चळवळ चालवण्याची गरज आहे म्हणजे अन्नत्याग करुन मरण्याची वेळ लोकांवर येणार नाही."

अर्थात आक्षेप घेणा-यांजवळ पुष्कळ मुद्दे आहेत. भारतासारख्या देशात जिथे एका सिगरेट साठी आजीचा जीव घेणारे नातू आहेत, तिथे इच्छामरणाचा कायदा झाला तर लोकांना मोकळे रानच मिळेल. कायद्याच आधार घेउन घरातील वृद्धांचे सरसहा खुन पडु लागतील. वैद्यकीय पेशात भ्रष्टाचार माजेल. इ... शिवाय ज्याला खरोखरच मरायचयं त्याला कायद्याची काय गरज? हा तर विरोधकांच्या हातातील फार मोठा मुद्दा आहे. पण कायदा एवढ्यासाठी हवा आहे कि आयुष्यभर आम्ही कायदेशीरपणे जगतो, संपत्ती मिळवतो,तिचा उपभोग घेतो, तिचे दान करतो, मग अशा या प्रतिष्ठीत आयुष्याच्या शेवटीच आम्ही आत्महत्या करुन बेकायदा कृत्य का करावे?

कायद्याच्या आवश्यकतेबाबत तांत्रिक मुद्दे तर अनेक आहेत. वैद्यकिय तज्ञ मंडळी हे मुद्दे नक्कीच अधिक विस्ताराने मांडू शकतील. पण समजा अगदी माझ्या सारख्या चाळिस बेचाळीस वयाच्या बाईने तिच्या वृद्धापकाळासाठी असा इच्छामरणाचा निर्णय करुन ठेवला असला तरी तेव्हा तो अमलात आणण्यासाठी माझी शारिरीक स्थिती असेलच याची काय शाश्वती? वृद्धापकाळात साध्या दैनंदिन कृतींसाठीसुद्धा दुस-याची मदत घ्यावी लागते हे आपण हरघडी पाहतोच आहोत ना? मग इच्छामरणासारखा निर्णय अमलात आणण्याजोगी माझी शारिरीक स्थिती राहिल अस मी मानणं हा केवढा मुर्खपणा! म्हणुनच येथे मदतीची गरज आहे. ती जास्तीत जास्त सुरक्षीत कशी असेल याचा विचार नंतर करता येईल.

ही सर्व कहाणी स्वाभाविकपणेच जोडली जाते ती नियोजनाशी! जर भविष्यात मी कायम स्वावलंबीच राहणार आहे तर मला 'म्हातारपणची काठी' लागणारच नाही. मग माझ मूल मी जास्त निरपेक्षपणे, जबाबदारीच ओझ त्याच्यावर न लादता वाढ्वू शकेन. त्याचा विकास अधिक खुलेपणाने होउ शकेल. बालवयाच्या माझ्या परावलंबित्वाकडून, स्वावलंबित्वाकडे झालेला माझा प्रवास तिथेच पुर्णविराम पावेल. त्याला पुन्हा परावलंबित्वाची भीती उरणारच नाही या ठीकाणी अर्थातच माझ्या आर्थिक, मानसिक, शारिरिक जगण्याचा विकास उर्ध्वगामीच राहील. शिवाय या त-हेने वृद्धांची संख्या आपोआप नियंत्रित राहू लागली तर जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होतील हे अर्थतज्ञांनी जरुर सांगावे.

एका अर्थाने, आपण माणुस म्हणुन जन्मलो हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे.'रिटायर्ड लाईफ' ही संकल्पना फक्त मानव जातीतच आहे. अवती भवती जरा बघितले तर काय दिसते? ज्यावेळी प्राणी अन्न मिळवण्याची धडपड थांबवतो तेव्हाच त्याचा मृत्यु नक्की होतो. जेव्हा वनस्पतींची मूळं पाणी शोषण थांबवतात तेव्हा तिला नष्ट व्हावेच लागते. शत्रुपासून पळण्याची प्रेरणा आणि शक्ती संपली कि जिवाचा नाश अटळ रहातो. म्हणजेच अन्न व संरक्षण या दोन मूलभुत गोष्टींसाठी संघर्ष करण्याची ताकद संपली की निसर्गत:च त्या जीवाचा अंत होतो. यात कुठे 'रिटायर्ड लाइफ' आहे ? पण प्रगत मानवी समाजात काय आहे- पस्तीस वर्षे नोकरी करा आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन खा! हे लिहिणं कदाचित काही लोकांना फार क्रूरपणाचे वाटेल. पण ते सत्य आहे. उमेदीची निम्मी वर्षे माणूस म्हातारपणाची तरतूद करण्यात घालवतो आणि निम्मी वर्षे सेटल होण्यात. अर्थात हे थोडे विषयांतर झाले. पण मथितार्थ एवढाच की जेव्हा 'जनना' त माणसाने हस्तक्षेप केला तेव्हाच 'मरणा'तही तो करावा लागणार हे अटळ होते.

प्रगत शहरी समाजापुरतं निरिक्षण नोंदवायचे झाले तर, आसन्न मरण स्थितीतील रोग्यांचे प्राणवायु पुरवठा करणारे यंत्र चालू ठेवायचे कि नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या, असं नातेवाईकांना सांगणारी डॊक्टर मंडळी वेगळे काय करीत आहेत? 'तेरी भी चुप मेरी भी चुप!' असा कायदा व्यवहारात वापरात आहे. आणि या प्रकरणाचे भरत वाक्य ठरलेलं आहे. "डॊक्टर म्हणालेच होते, असं ठेवुन काही सुधारणा होणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायलाच लागेल. काय करावे अगदी सुचतं नव्हते. पण एवढ्यातच ते गेले. अगदी अवघड जबाबदारीतून सोडवल बघा त्यांनी आम्हाला!"

शेवटी आपल्या माणसाचा हात हातात असताना मृत्यू येणे , एका अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवायला मिळणे हे खरोखरच अहो भाग्य असणार. पण त्यासाठी स्वत:च स्वत:चा भाग्य विधाता व्हावे लागणार हे नक्की.! कारण असा रिझर्व्हेशनचा प्रवास नियोजनाशिवाय करायला मिळणे अशक्यच की.

'पुरेसे जगून झाल्यावर' मरणाचा हक्क जर माणसाला मिळाला तर नक्कीच त्याला आहे ते जगण अधिक हवसे वाटेल. ते अर्थपुर्ण करण्यासाठी तो अधिक धडपडेल. मृत्युची किंबहुना विनासायास मृत्यूची शाश्वती त्याच्या जगण्याला एक सकारात्मक बळ देईल.

[ लेखिका 'मृत्यु: स्वाधीन की पराधीन' या विषयाच्या सामाजिक, भावनिक, आर्थिक, जीवशास्त्रीय अशा अंगाने चर्चा व्हावी, असे सुचवतात. इच्छुकांचे लेख संपादित करुन छापले जातील.- सं.]

प्रतिक्रिया

सहज's picture

12 Aug 2008 - 12:14 pm | सहज

गेल्या आठवड्यात एका इस्पीतळात गेलो असताना तिथे रुग्णवाहीकेतुन स्ट्रेचरवर उतरवुन नेत असलेले जराजर्जर वृद्ध पाहून परमेश्वरा हे अस व्हायच्या आत उचलं हा विचार आलाच. [अगदी या वयात देखील] कदाचित "वाढत्या वैद्यकिय खर्चाच्या भितीपोटी आला असेल" पण परावलंबीत असलेले आयुष्य नकोच.

लेखिकेचे विचार पटत आहे. सद्य परिस्थितीत अशा समविचारी लोकांचे एकत्र येणे, संस्था होणे व त्यातुन विचारमंथन होणे इतकेच समजते.

चित्तरंजन भट's picture

12 Aug 2008 - 1:57 pm | चित्तरंजन भट

माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकूर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही पण ते फुलणार, फळणारही नाही, असाच इशारा, दयायचा असावा.

किंबहुना आपण, आपले आई-वडील, सखे-सोबती हे अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेले आहेत असे जाईपर्यंत वाटत असते. भासत असते. आपण गॅब्रियल गार्शिया मार्क्वेजच्या शब्दा "लिमिटेड इमॉरटॅलिटी" जगण्याचा प्रयत्न करत असतो. असो.

लेख चांगला झाला आहे. कालच "सुधारका"त वाचला. इथे प्रतिसाद देतो आहे.

लिखाळ's picture

12 Aug 2008 - 2:12 pm | लिखाळ

नमस्कार,
लेखिकेने अनेक बाजू मांडल्या आहेत त्यामुळे लेख फार वाचनीय झाला आहे. अभिनंदन.

जपानमध्ये हराकिरी करुन मृत्यू पत्करणे सन्माननीय समजत असत. हा इच्छामरणाचाच प्रकार.

आपण जननामध्ये हस्तक्षेप करतो तर मरणामध्ये सुद्धा करावा हा विचार मान्य आहे. माझेसुद्धा तसेच मत आहे.

मरणार्‍या माणसावर असलेल्या सामाजिक, अर्थिक, कौटुंबिक जबाबदार्‍यांचा विचार करुन आत्महत्त्या योग्य की अयोग्य हा त्या विवक्षित घटनेच्या उहापोहाचा भाग झाला. प्रायोपवेशन, समाधी या बाबतीत सर्वंकष विचार करुन निर्णय घ्यायला तो मनुष्य त्या वेळी स्थिरबुद्धी असतो असे वाटते. पण नैराश्यापायी घेतलेला तातडिचा निर्णय अनेकदा अविचार असू शकतो. तो क्षण टळल्यानंतर 'बरे झाले मेलो नाही !' असे वाटणे सुद्धा शक्य असते.
पण जगायचा कंटाळा आल्यावर अथवा जगण्यातला वैयर्थ जाणवल्यावर जगणे थांबवावेसे वाटणे हे मला योग्यच वाटते.

कायद्याचा अयोग्य वापर होईल असे वाटल्याने इच्छामरणाचा हक्कच नाकारणे हे मला योग्य तर्‍हेने कायदा बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यांतील तृटींवर व अक्षमतेवर पांघरुण घालणे वाटते.

-- (पितामह भीष्म) लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2008 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जगातील बहुतेक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानलं आहे.
प्रश्न असा की धर्म माणसासाठी आहे का माणूस धर्मासाठी?
मी माझ्या लहानपणी आजोबांना म्हणायचे, "तुम्ही शंभर वर्ष जगा!" ते तेव्हा ८७-८८ वर्षांचे असतील. त्यावर ते एवढंच म्हणायचे, "मी किती जगेन मला माहित नाही, पण जेवढं जगेन तेवढे दिवस स्वाधीन, स्वावलंबी असेन." ९२ वर्षांचे असताना ते दिवाणावरून पडले, बरंच रक्त गेलं आणि अशक्तपणाही आला. एखाद महिना कळ काढली आणि नंतर खाणंपिणं सोडून दिलं. पाच दिवसांनंतर सकाळी सहाला फोन वाजला तेव्हाच आम्ही काय ते समजलो. आजोबांचा गतप्राण देह पाहून मला क्षणभर वाईट वाटलं, पण त्यानंतर नाही! मला जसे आजोबा हवे होते ते अजूनही माझ्याजवळ आहेत. आणि त्यांना जसे नको होते ते गेले!
पण मथितार्थ एवढाच की जेव्हा 'जनना' त माणसाने हस्तक्षेप केला तेव्हाच 'मरणा'तही तो करावा लागणार हे अटळ होते.....
'पुरेसे जगून झाल्यावर' मरणाचा हक्क जर माणसाला मिळाला तर नक्कीच त्याला आहे ते जगण अधिक हवसे वाटेल. ते अर्थपूर्ण करण्यासाठी तो अधिक धडपडेल. मृत्युची किंबहुना विनासायास मृत्यूची शाश्वती त्याच्या जगण्याला एक सकारात्मक बळ देईल.

सहमत!
कायद्याचा अयोग्य वापर होईल असे वाटल्याने इच्छामरणाचा हक्कच नाकारणे हे मला योग्य तर्‍हेने कायदा बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यांतील त्रुटींवर व अक्षमतेवर पांघरुण घालणे वाटते.
आणि लिखाळांचं हे म्हणणं पण पटतं.

सुंदर लेख आणि उत्तम विषय आणि मांडणी. धन्यवाद या लेखाबद्दल लेखिका आणि पोस्टमननापण!

प्राजु's picture

12 Aug 2008 - 7:19 pm | प्राजु

अतिशय विचार करायला लावणारा आहे.
माणसाला जेव्हा उम्मेद असते तेव्हा तो नक्कीच मरणाची भाषा करणार नाही. पण जेव्हा हात पाय हलणार नाहीत , पूर्णपणे तो परावलंबी होईल तेव्हा त्याने इच्छामरण घ्यावे. आणि कायदा करायचा तर इच्छा मरण घेण्यासाठी काही वयोमर्यादा ठेवावी .. जसे वय वर्षे ६५-७० किंवा आणखी ..
लेखाची मांडणी अतिशय सुरेख आहे.
घाटपांडे सर, हा लेख आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

13 Aug 2008 - 8:41 am | मदनबाण

सहमत...

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विकास's picture

12 Aug 2008 - 9:23 pm | विकास

माझी मते वेगळी असली तरी लेख आवडला. तो आधी उपक्रमावर वाचल्याने तेथे भलामोठा प्रतिसाद दिला म्हणून येथे परत देत नाही.

प्रियाली's picture

13 Aug 2008 - 2:45 pm | प्रियाली

माझी मते वेगळी असली तरी लेख आवडला. तो आधी उपक्रमावर वाचल्याने तेथे भलामोठा प्रतिसाद दिला म्हणून येथे परत देत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2008 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इच्छा मरणाचा कायदा असावा असेच वाटते. आणि 'त्यांची आता सुटका करा'या जवळच्या नातेवाईकांच्या विचाराला अधिकृत मान्यता दिली पाहिजे असेही वाटते. जगून घेतल्यावर मरणासन्न अवस्थेत पडून राहणे, म्हणजे जीवंत मरण भोगणे. कितीतरी देह नुसते पडून आहेत, ते जीवंत आहेत इतकाच त्याचा तो अर्थ. अर्थात त्याही अवस्थेत जगण्याचे वेड हे नैसर्गिक असेल. अशा वेळेस डॉक्टरांनी अगोदरच डिक्लेर केले असते तर तर बरे झाले असते, असा विचार प्रिय माणसाच्या डोक्यात येण्यापेक्षा इच्छामरण केव्हाही चांगलेच. असो...

सुंदर लेख आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आपले आभार !!!

अवांतर : 'अंधश्रद्धा - प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' चाळतोय, मस्त पुस्तक हं

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 10:14 pm | यशोधरा

ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असं मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला इच्छामरण हा शब्द अधिक योग्य.

अगदी खरं आहे. लेख खूप आवडला.

कशिद's picture

12 Aug 2008 - 11:46 pm | कशिद

लेख खूप आवडला.
marcy killing कड़े लेख जुकथो आहे . कायदा त्याला परवानगी देत नाही मग सामान्य माणुस काय करणार.

लोकमान्य तिलकं चे सुपुत्र नि सुदा हाच मार्ग पत्करला होता..कितपत जगण्या पक्ष हे बर ...

विकास's picture

13 Aug 2008 - 12:47 am | विकास

कधी तरी लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली: (विषया संदर्भात थोडी फार आहे. अवांतर वाटल्यास क्षमस्व!)

एक अतिशय पुण्यश्लोकी तरूण ब्रम्हचारी असतो. आयुष्यात कुठलेच काया-वाचा-मने पाप न केलेला. लोकांसाठी कामे केलेला, वगैरे... त्याला वाटते आपले आयुष्य चांगले झाले आहे, स्वर्गात प्रवेश मिळू शकेल. त्याच्या ज्ञानाप्रमाणे जर वैकुंठ चथुर्दशीस गंगेत उडी मारली तर स्वर्ग प्राप्ती होते. त्याने ठरवून तसे केले. आणि स्वर्गाच्या दारात पोचला. पण चित्रगुप्त म्हणाला की अरे बाबा तुझे अजून आयुष्य राहीले आहे, बर्‍याच गोष्टी तुला करायच्या आहेत. आणि परत पाठवतो.

मग त्याचे लग्न वगैरे होते. संसार थाटतो, मुले बाळे होतात. थोडी मोठी झाल्यावर तो परत एकदा उडी मारतो. परत चित्रगुप्त त्याला "खाली" पाठवून देतो. मग मुलांची शिक्षणे होतात संसार चांगला झाला असे वाटून परत प्रयत्न करतो. पण परत तेच.

मग वृद्धापकाळात "स्पेशल" देवदूत येतात आणि म्हणतात की तू आता आमच्याबरोबर चल. देहत्याग करून खूश होऊन तो जातो. चित्रगुप्त "चोपडी" उघडून बघतो आणि त्याला आधी काही काळ नरकात पाठवायची आज्ञा करतो. याला धक्काच बसतो आणि विचारतो: "मी आयुष्यात जर काया/वाचा/मने केवळ पूण्यच केले असले तर असे का? ".

चित्रगुप्त त्याला शांतपणे उत्तर देतो, की त्या पुण्याईचे फळ म्हणून तुला स्वर्गसूख मिळेलच, पण त्या आधी तू स्वतःची कर्तव्ये पूर्ण करण्यापासून जो पलायनवादाचे पाप केलेस त्याची पण फळे भोगावीच लागतील. :-)

रेवती's picture

13 Aug 2008 - 5:05 am | रेवती

गोष्ट छानच. धडधाकट असताना सर्व कर्तव्ये नीट पार पाडायचा प्रयत्न करावा. परावलंबी झाल्यावर काय होईल हे आपल्या हातात नाही.
रेवती

विकास's picture

13 Aug 2008 - 9:50 am | विकास

>>धडधाकट असताना सर्व कर्तव्ये नीट पार पाडायचा प्रयत्न करावा. परावलंबी झाल्यावर काय होईल हे आपल्या हातात नाही.

मी गोष्ट इच्छामरणासंदर्भात अर्थात ज्यांची तब्येत धडधाकट आहे त्या संदर्भात सांगीतली. दया मरण म्हणजे जे मरणावस्थेस पोचलेत त्यांना मरण देऊन मोकळे करण्याच्या संदर्भात सांगितली नाही.

लेख खुप सुंदर आहे,
त्याच्या विषयही असा आहे की त्यातुन कोणीही सुटलेले नाही आणि सुटणार नाही.
पण मला वाटते व्यक्ती तितक्या प्रकृती तसे, प्रत्येक जण आपापल्या आयुष्याकडे पहातो तसेच मरणाकडे ही.
पण इच्छा मरण असावे, कदाचित ते पाप असेल ही ,पण आपल्या शारिरीक व्याधीनी जर आपल्या आप्त लोकांना त्रास होत असेल आणि आपण नकोसे झालो आहोत असे जेव्हा वाटते तेव्हा ते खुप क्लेशदायक असते त्यामुळे इच्छा मरण असावे असे मला वाटते.

मन's picture

13 Aug 2008 - 5:05 pm | मन

मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन.
लेखातील बरीचशी मतं पटली.
माझं वैयक्तिक मतः-
हो . असा कायदा असावा.
कुणी यासाठी जनहित याचिका टाकली तर य्थाशक्ती आर्थिक मदत करीन.
सध्यातरी लांबलचक आयुष्य जगण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

आपलाच,
मनोबा

लेख खूप विचार करुन लिहिला आहे ह्यात शंका नाही.
दयामरण/इच्छामरण ह्या संकल्पना बहुआयामी आहेत त्यातली वैयक्तिक/सामाजिक/भावनिक/व्यावहारिक/कायदेशीर अशा सर्व प्रकाराची गुंतागुंत विलक्षण आहे. प्रत्येक केस ही एक विशिष्ठ परिस्थितीची चौकट असलेली असल्यामुळे सरसकट कायदे आणि सोपी सूत्रे लावून मार्ग शोधणे अवघड आहे.
धडधाकट रहाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे, तसे असतानाच महत्त्वाची कर्तव्ये पार पाडणे, जीवनाचा समरसून उपभोग आणि आनंद घेणे /देणे आणि त्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यूची मानसिक तयारी करुन ठेवणे. ह्याच मार्गाने आयुष्य जास्तितजास्त सुकर होऊ शकेल असे वाटते.
सुंदर लेखाबद्दल आणि तो इथे दिल्याबद्दल मंजिरी आणि प्रकाश घाटपांडे दोघांचे अभिनंदन आणि आभार!

ह्या सुंदर लेखातली काही वाक्ये मात्र जराशी खटकली जसे -
या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर, सावरकर, सानेगुरूजी यांसारख्या आपल्या परिचयातील उदाहरणांमधील एक प्रकारच्या आत्महत्यांनाच आपल्याकडे उच्चतर दर्जा दिलेला आहे.

ह्यातल्या ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, सावरकरांचे प्रायोपवेशन ह्या दोन आत्महत्या नव्हेत. ह्यांना आत्मत्याग म्हणणे जास्त योग्य आहे.

असो. माझे आजोबा प्रायोपवेशनाने गेलेले मला माहीत आहे. त्यामुळे आत्मत्यागाचे थेट माहीत असलेले ते अगदी जवळचे उदाहरण.
जीवनातली सगळी इतिकर्तव्यता पार पाडल्यानंतर आता जगण्याचे काही प्रयोजन नाही असे त्यांनी निश्चित केले.
ते नेहेमी म्हणत "अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं असे असले पाहिजे. त्यापैकी माझे विना दैन्येन जीवनं तर झाले आहे आता अनायासेन मरणं व्हावे!"
आणि खरोखरच त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अन्नत्याग केला. खाणे पिणे हळू हळू कमी करीत नेले. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगून बघितले पण त्यांचा निश्चय ठाम होता. "मी जगून काय करु. माझे बघण्यासारखे, करण्यासारखे सगळे झाले आहे. मी समाधानी आहे. अजूनही स्वावलंबी आहे तेव्हाच गेलो तर ते योग्य आहे." मग आम्हीही ते ओळखले आणि त्यांना साथ दिली. साधारण तीन आठवडे ते होते. शेवटच्या आठवड्यात ग्लानीने त्यांना काही समजत नसे. आणि एके दिवशी ते अलगद गेले. त्यांच्या त्या मृत्यूने वाईट तर वाटले पण त्याचबरोबर एकप्रकारची वेगळीच आठवण मनात घर करुन राहिली, मला जसे ते धडधाकट माहीत होते जवळजवळ तसेच माझ्या स्मृतीत ते आहेत. फार आजारी पडलेले, परावलंबी, पंगु झालेले असे काही बघावे लागले नाही ही केवढी समाधानची बाब आहे असे आज मागे वळून बघताना वाटते.
प्रायोपवेशनाला मनाचा फार निग्रह लागत असावा असे वाटते. खरे काय, ते आपण म्हातारे झाल्यावरच कळणार बहुदा! तोपर्यंत म्हणूयात "अनायासेन मरणं, विनादैन्येन जीवनं!

चतुरंग

विकास's picture

13 Aug 2008 - 11:24 pm | विकास

प्रतिसाद आवडला. कदाचीत व्यक्तिगत उदाहरण दिल्यामुळे असेल पण तो निश्चितच पटू शकणारा वाटला. "प्रायोपवेशन करत आहे" इतके स्पष्टपणे सांगून नाही पण तसेच कृतीत वाटू शकेल असेच एक उदाहरण माझ्या देखील जवळून पाहण्यात आहे. फक्त शेवटी त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहून कुठल्याही जीवनाधार व्यवस्थेवीना केवळ हृदय आणि मेंदू शाबीत आहे म्हणून काही दिवस जगणे आणि बाळंतपणाच्या बाबतीत "लेबर रूम" च्या बाहेर जशी लोक वाट पहात तसे स्वतःच्या अतिशय आवडत्या व्यक्तीच्या जाण्याची वाट पहावी लागली होती ज्याचा असाच काहीसा मनावर खोलवर परीणाम झाला होता.

या संदर्भात मला एकदम अनुप जलोटाचे "इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले" हे गीत/भजन आठवले विशेष करून खालील ओळी:

श्री गंगाजी का तट हो, यमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो तब प्राण तनसे निकले
जब कंठ प्राण आये, कोई रोग ना सताये, यम तरस ना दिखाये जब प्राण तनसे निकले

फक्त हे भक्तीगीत असल्यामुळे शेवटी सर्वकाही इश्वरेच्छार्पण केले आहे म्हणून असे ही म्हणले आहे:

इक भक्तकी है अर्जी, खुदगर्जकी है गर्जी , आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तनसे निकले
चतुरंग's picture

13 Aug 2008 - 11:38 pm | चतुरंग

इक भक्तकी है अर्जी, खुदगर्जकी है गर्जी , आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तनसे निकले

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2008 - 8:49 am | प्रकाश घाटपांडे

उस्फुर्त व सुंदर प्रतिसाद
प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

13 Aug 2008 - 11:50 pm | लिखाळ

चतुरंगराव,
आपण लिहिलेत की .. आणि एके दिवशी ते अलगद गेले. ..
हे वाचून मला महामृत्युंजयाच्या मंत्राची आठवण झाली. त्यात म्हटले आहे, की देवा मी तुझे भजन-पूजन करतो, माझे जीवन सुगंधी आणि पुष्ट कर. आणि एखादा भोपळा जसा आतून पिकून वेलीपासून अलगद वेगळा होतो तसा मला जीवनवेलीपासून वेगळे कर.

माझे आजोबा कॅन्सर होउन गेले. एका ठराविक काळानंतर त्यांनी अन्नपाणी सोडून दिले. आणि त्यांचे अलगद जाणे मी त्यांच्या पायापाशी उभेराहून अनुभवले. याची आठवण झाली.
--लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2008 - 8:52 am | प्रकाश घाटपांडे


ह्यातल्या ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, सावरकरांचे प्रायोपवेशन ह्या दोन आत्महत्या नव्हेत. ह्यांना आत्मत्याग म्हणणे जास्त योग्य आहे.


सहमत आहे
प्रकाश घाटपांडे

हर्षद आनंदी's picture

14 Aug 2008 - 7:56 am | हर्षद आनंदी

जीवन सुंदर आहे, मृत्यू परम सत्य आहे.

सुंदर जीवन हे अजुन सुंदर बनवा

मृत्यू हे सत्य धैर्याने स्विकारा.

|| मरावे परी किर्तीरुपी उरावे ||

|| निर्लज्जम् सदा सुखी ||

कापूसकोन्ड्या's picture

19 Oct 2013 - 5:56 pm | कापूसकोन्ड्या

अनुमती चित्रपट पहा. बरेच उलट सुलट विचार मनात येउन जातात

तिमा's picture

19 Oct 2013 - 7:59 pm | तिमा

जर इच्छामरणाच्या कायद्याचा दुरुपयोग होईल अशी भीति वाटत असेल तर स्वेच्छामरणाचे डिक्लेरेशन मॅजिस्ट्रेट आणि कुटुंबिय यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्याची कायदेशीर सोय करावी. इच्छामरणाचा कायदा झाला तर माझ्यासारखे अनेक त्याचा लाभ घेऊ शकतील.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 8:29 pm | मुक्त विहारि

+ १

५% गुन्हेगारांसाठी ९५% निरपराध माणसांना कशाला वेठीस धरायचे?

या अप्रतिम लेखापर्यंत आणून सोडल्याबद्दल मुक्तविहारींना तसेच प्रकाश घाटपांड्यांनाही धन्यवाद!

मुक्तविहारींचा याच विषयावरचा नवीन लेखही आवडलाच.

या लेखातले मंजिरी घाटपांडे यांचे मुद्देसूद विवेचन खूप विचारप्रवर्तक वाटले, तसेच प्रतिसादकांचे विचारही वाचून, इच्छामरणाचा कायद्याविषयी किंवा निदान स्वेच्छेने नियोजित केलेल्या आत्मत्यागाविषयी लोकजागृती व्हायलाच हवी याच जुन्या निष्कर्षापर्यंत पुन्हा एकदा पोहोचलो.

कापूसकोन्ड्या's picture

20 Oct 2013 - 8:55 am | कापूसकोन्ड्या

जीवनावर जर कायद्याचा अंकुश चालत असेल तर मरणावर का नाही? मुद्देसुद तोडगा. नको असलेला गर्भ जर स्त्री नाकारू शकत असेल तर नको असलेला जीव नाकारण्यात काय चुक?

आत्महत्या हे पाप आहे असे अनेक धर्मांनी ठरवलले आहे खरे, पण मला काही ते पटत नाही . ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असं मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला इच्छामरण हा शब्द अधिक योग्य.

ह्या वेदना , हि दीनवाणी अवस्था आपल्याच पुर्व कर्माची , आपल्याच संचिताची फळे असतात . त्यामुळे आपण त्याला इच्छा मरण हे नाव दिला तरी ती आत्महत्याच आहे . वेदनांतून सुटण्यासाठी इच्छामरणाची पळवाट शोधली तरी पुन्हा पुढच्या जन्मी
ते भोगावाच लागणार . मग पुन्हा इच्छा मरणाच्या नावाखाली आत्महत्या . recurring interest सारखा हा भार वाढतच जाणार आणि वेदनांची तीव्रतासुधा

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या वेदना , हि दीनवाणी अवस्था आपल्याच पुर्व कर्माची , आपल्याच संचिताची फळे असतात . त्यामुळे आपण त्याला इच्छा मरण हे नाव दिला तरी ती आत्महत्याच आहे . >>> __/\__/\__/\__ धन्य ती कर्म! आणी त्यांचा तो विपाक!

प्रभाकर पेठकर's picture

25 Nov 2013 - 7:34 pm | प्रभाकर पेठकर

मृत्यू पश्चात देहदान, अवयव दान करण्यासाठी जिवंतपणीच फॉर्म भरून द्यावा लागतो. तसे नसेल तरी जवळच्या नातेवाईकांनी तशी इच्छा व्यक्त केल्यास योग्य ती व्यवस्था केली जाते. तद्वत, इच्छामरणाचा फॉर्मही, साक्षीदारांच्या उपस्थितीत, तसेच सरकारी अधिकार्‍यांच्या सहीशिक्यानिशी करून ठेवण्याचे प्रावधान कायद्यात असावे.

प्रकाश घाटपांडे's picture

31 May 2016 - 1:25 pm | प्रकाश घाटपांडे

सरकारने आता इच्छामरण या विषयावर नागरिकांची मते मागवली आहेत. http://www.mohfw.nic.in/index1.php?lang=1&level=1&sublinkid=5960&lid=3871 इथे बिलाचा मसुदा आहे. नागरिकांनी passiveeuthanasia@gmail.com इथे आपली मते जरुर कळवावीत.