बिशी बेले भात

आरोही's picture
आरोही in पाककृती
28 Jan 2015 - 11:04 pm

साहित्य : १ वाटी तांदूळ, १ वाटी तुरडाळ ,वांगे १ ,टोमाटो १,कांदा १,फरसबी ,गाजर,वाटाणा,लाल भोपळा आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता .तेल ५-६ चमचे ,मीठ चवीनुसार ,चिंचेचा कोळ १ चमचा ,शेंगदाणे आवडीप्रमाणे ,४-५ कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर,सुक्या लाल मिरच्या २,पाणी आणि सर्वात महत्वाचे एम .टी.आर चा बिशी बेले मसाला ३ चमचे .

1

माझ्याकडे मातीचे भांडे असल्याने मी काही पदार्थ बनवताना आवर्जून यात बनवते त्यातच हा भात हि येतो कारण मातीच्या भांड्यात बनवलेल्या या भाताची चव फारच अप्रतिम असते .पण मातीचे भांडे नसल्यास साध्या कढाई मध्ये हि बनवू शकता .

कृती :
१) सर्व प्रथम डाळ तांदूळ वेगवेगळे धुवून ते नेहमीप्रमाणे डाळ भाताचा जसा कुकर लावतो तसा लावून घ्यावा .४-५ शिट्या होऊ द्याव्यात .
२)एकीकडे भाज्या धुवून त्यातील गाजर ,लाल भोपळा ,वांगे ,बटाटा चौकोनी आकारात कापून घ्या .टोमाटो बारीक चिरून घ्या .कांदा उभा चिरून घ्या .फरसबी चे एक इंचाचे तुकडे करावेत .
३)एका भांड्यात ३ चमचे तेल घालून ते तापले कि कांदा टोमाटो टाकून परता.

2

४)मग त्यात चिरलेल्या भाज्या टाका आणि वर झाकण ठेवून त्यात पाणी टाकून टाकून वाफेवर शिजू द्या .१० मी .भाज्या शिजतील .पूर्ण गाळ होता कामा नये .अक्ख्या फोडी दिसल्या पाहिजेत अशा बेताने शिजवावे ,आणि त्यात ३ चमचे बिशी बेले मसाला टाकावा

3

५) एकीकडे कुकर गार झाला असेन तर शिजलेली डाळ जरा घोटून घ्यावी.
६) डाळ भाज्या शिजत असलेल्या भाड्यात टाकावी ,नीट मिक्स करावे .त्यात शिजवलेला भात मोकळा करून टाकावा .
4

5

७)त्यात चिंचेचा कोळ ,मीठ टाकून नीट एकजीव करावे .अर्धा पेला पाणी घालून ५-७ मी. शिजू द्यावे .

6
तयार भात असा दिसेल .

८)एकीकडे एका छोट्या भांड्यात फोडणीसाठी २ चमचे तेल तापवावे .त्यात कढीपत्ता पाने ,लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे यांची खरपूस फोडणी करावी आणि त्या तयार झालेल्या भातावर टाकावी,कोथिम्बिर टाकावी .

7

बिशी बेले भात तयार .

हा भात थोडा मऊसर असतो यात डाळीचे प्रमाण भाता इतकेच असते .भाज्यांमध्ये अजून फ्लॉवर ,शिमला मिरची अशा भाज्या घेऊ शकता .

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Jan 2015 - 11:19 pm | पैसा

मी पण हा तयार मसाला वापरते. पण भात पळीवाढा नाही करत.

कोणीतरी या मसाल्याची कृती सांगेल का?

एका कन्नड मित्राने सांगितलेली कृती खालीलप्रमाणे:

२ टेबलस्पून चणाडाळ
२ टेबलस्पून उडीद डाळ
दालचिनीचा तुकडा
सुके खोबरे (अर्धी वाटी)
८ काश्मिरी मिरच्या
३ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून तेल

तेलामध्ये खोबरे सोडून बाकी पदार्थ परतून घ्या आणि वाटून घ्या. सुके खोबरे वेगळे वाटून घ्या आणि दोन्ही पावडर एकत्र करा. झाला तुमचा मसाला तयार..

पैसा's picture

31 Jan 2015 - 6:06 pm | पैसा

धन्यवाद!

अजया's picture

28 Jan 2015 - 11:31 pm | अजया

मस्त पाकृ!

घरी गेलो की बर्‍याचदा करायला सांगतो आईला. गरमागरम भातावर तुपाची धार, मला आवडतो हा प्रकार.
यात शेंगदाणे पाहिजेतच. इतर काही डाळी घातल्या तरी चांगला होतो भात.
"बिसी बेळे भात" (गरम डाळ भात) असा मुळ कन्नड उच्चार आहे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 12:05 am | मुक्त विहारि

एम.टी.आर. मसाले वाले म्हणजे, बंगलोरमधलेच का?

कारण एम.टी.आर.चा "बिशी बेले भात" मस्त असतो.

पिंगू's picture

29 Jan 2015 - 12:56 am | पिंगू

ह्याची चव मस्त असते. आतापर्यंत घरी बनवून कधी खाल्ला नाही..

कविता१९७८'s picture

29 Jan 2015 - 1:04 am | कविता१९७८

माझी आवडती डिश

आवडता भात. बरेच दिवसात केला नाही. आता करते. तुझी रेसिपी छान आहे. तयार मसाला मिळतो हे माहित नव्हते. मी घरीच तात्पुरता करते. थोडी ह. डाळ, उ. डाळ, लवंग, दालचिनी, वेलची, मेथी दाणे, लाल मिरची सुकी. हे नुसतेच भाजून गार झाल्यावर पावडरीकरण करणे व शिजलेल्या भाज्या, डाळ, तांदळात मिसळणे.

हो रेवाक्का फक्त वेलची सोडून बाकी सेम पदार्थ घेऊन एकदा हा मसाला बनवून भात तयार केलेला ,छान झालेला त्यानंतर बरेच दिवस केलाच नव्हता .मग अचानक एम.टि. आर चा मसाला भेटला आणि तेव्हापासून महिन्यातून एकदा तरी करतेच .या मसाल्याने खरेच छान होतो भात .

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 1:21 am | मधुरा देशपांडे

पाकृ आवडली.

स्रुजा's picture

29 Jan 2015 - 2:11 am | स्रुजा

+ १ असेच म्हणते !

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2015 - 1:41 am | श्रीरंग_जोशी

हा भात मला खूप आवडतो.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2015 - 1:41 am | श्रीरंग_जोशी

हा भात मला खूप आवडतो.

स्पंदना's picture

29 Jan 2015 - 4:27 am | स्पंदना

मी केला होता एकदा!!
आता पुन्हा करुन पाहेन. रेसिपी मस्तच आरोही!!

सविता००१'s picture

29 Jan 2015 - 6:45 am | सविता००१

मस्त रेसिपी. आता नक्की करून पाहीन. मातीचं भांडं पण आहेच :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 7:03 am | अत्रुप्त आत्मा

धुबुक्क!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटच्या फ़ोटुतल्या मडक्यात-उडी मारलिये मी! =))

बरेच दिवसात केला नाहिये.मस्त पा़कृ.आरोहि.शेवटचा फोटो तर छानच.

जेपी's picture

29 Jan 2015 - 10:11 am | जेपी

मस्त..

अवांतर- ते भांड भारी दिसतय,मागच्या अनाहिता सरस कट्ट्याला घेतल का ? *biggrin* =))
(ह. घ्या.)

पिंपातला उंदीर's picture

29 Jan 2015 - 10:31 am | पिंपातला उंदीर

मैलार ला (बीदर जवळ ) हा भात खाल्ला होता . आत्मा तृप्त झाला होता . काय जबरी चव होती . पुण्यात कुठे authentic बिसिबेली भात मिळतो का यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे . बाकी पाक कृती फक्कड जमली आहे

त्रिवेणी's picture

29 Jan 2015 - 1:53 pm | त्रिवेणी

पुढच्या पुणे ट्रिपला तुच कर आणि मला खाऊ घाल.

नक्की ग .पण आता पुण्याला कधी येईल ते माहित नाही त्यापेक्षा तूच ये इकडे लवकरात लवकर .

अरे वा.. मस्त पाकृ. एकदा करुन बघते.

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2015 - 3:08 pm | दिपक.कुवेत

अनायसा सर्व भाज्याहि घरात आहेत. पिंगू नी सांगीतल्याप्रमाणे ताजा मसाला बनवून उद्याच हा भात बनवला जाईल. फोटो टाकतो मग.

स्नेहल महेश's picture

29 Jan 2015 - 3:09 pm | स्नेहल महेश

आतापर्यंत घरी बनवून कधी खाल्ला नाही..एकदा करुन बघते.

धर्मराजमुटके's picture

29 Jan 2015 - 3:20 pm | धर्मराजमुटके

बिशी बेले म्हणजे काय ? कशामुळे असे नाव पडले ?

अवांतर : इंग्रजीमधे लिहिताना साऊथवालं पब्ळीक भात चे स्पेलींग बाथ असे का करतात ?

वर सांगितल्याप्रमाणेच- "बिसी बेळे भात" म्हणजे गरम डाळ भात.
बाकी, साऊथमधे 'भास्कर'चे 'बास्कर' आणी 'स्वाती'चे 'स्वाथी' होत असल्या कारणाने, 'भात'चे स्पेल्लिंग 'बाथ' असे करतात.
तसेच, 'श्री'चे 'स्री' होते. 'हेच्य' ;) कधी गाळतात, कधी अ‍ॅडवतात..

मस्त लागतो 'बिसी बेळे भात' (धन्यवाद यसवायजी :) )... एक-दोनदा कलिगच्या टिफीनमधून चव चाखलेली आहे. आता रेसीपी मिळालीच आहेतर घरी करून खाण्यात हरकत नाही.

बाकी, मस्त पाकृ व शेवटचा फोटो पाहून तोंपासू.

हापिसात खाल्ला एकदोनदा तेव्हाच आवडला होता. बंगलोर मध्ये मवाली का मावल्ली मध्ये खाल्ला तेव्हापासून विशेष आवडला आहे.

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2015 - 7:04 pm | स्वाती दिनेश

खूप छान!
खूप दिवसात केला नाहीये.. करायलाच हवा आता..
स्वाती

स्वाती२'s picture

29 Jan 2015 - 7:47 pm | स्वाती२

शिजवलेली डाळ आणि भात दोन्ही आहे. आज करुन बघेन.
पिंगू, मसाल्याच्या कृतीसाठी धन्यवाद.

प्रियाजी's picture

29 Jan 2015 - 9:24 pm | प्रियाजी

नेहमि करते. खुप आवडतो. हया प्रकारेही करून पाहीन.

hitesh's picture

29 Jan 2015 - 11:04 pm | hitesh

बिशी बेळे अन्ना

असे म्हणतात.

सानिकास्वप्निल's picture

30 Jan 2015 - 1:04 pm | सानिकास्वप्निल

बिशी बेळे अन्ना मस्तं मस्तं.
मला असा पळीवाढ भात खूप आवडतो पण नवर्‍याला फडफडीत भात आवडत असल्यामुळे कधीतरीच करणं होत.
आता लवकरच करेन, मस्तं पाकृ व फोटो :)

मनिमौ's picture

31 Jan 2015 - 5:57 pm | मनिमौ

मडके अगदी झकास. भात तयारीने जबरी

स्वप्नांची राणी's picture

31 Jan 2015 - 8:32 pm | स्वप्नांची राणी

हा...माझा अगदी आवडता प्रकार!! मस्स्त्त रेसेपी आरोही!! त्या मडक्यात माझाही जीव अडकला. पण तेवढ्यात आत्मू गुर्जिंनी त्यात उडी घेतली..त्रिवार निषेध..!!

स्वाती राजेश's picture

31 Jan 2015 - 8:46 pm | स्वाती राजेश

मस्त रेसिपी....
मड्क्यात माझा पण जीव अडकला आहे.:)

बोका-ए-आझम's picture

1 Feb 2015 - 6:03 am | बोका-ए-आझम

माटुंग्याच्या कॅफे मद्रासचा आणि अर्थातच बंगलोरच्या MTR चा बिसी वेळे भात खाल्ला आहे. अप्रतिम! तो असा करतात हे माहित नव्हते! हे म्हणजे पूर्ण जेवणच आहे!

आरोही's picture

1 Feb 2015 - 3:51 pm | आरोही

पाककृती आवडल्याबद्दल सर्वांचे आभार .

आरोही ३ चमचे मसल्याने तिखटपणा कितपत येतो? लहान मुले खाऊ शकतील का?
बाकी पाककृती मस्त आहे.
एरवी ह्याचा मसाला घरी करते पण हा विकतचा वापरुन बघायचा आहे.

समिधा ३ चमचे मसाल्याने भात खूप तिखट नाही
झाला म्हणजे माझ्या साडेचार वर्षाच्या लेकाने हि खाल्ला
कारण त्यात इतर कुठलेही तिखट नव्हते आणि
चिंचेचा कोळ होता.पण तू आधी २ चमचे टाकून बघ
आणि चव हेऊन बघ गरज वाटल्यास वरून
अजून मसाला टाकू शकतेस .तसेही चालेल चवीत
फरक पडणार नाही.

नितीनचंद्र's picture

25 Feb 2015 - 12:27 pm | नितीनचंद्र

काही ठिकाणी बिसी ( गरम ) बेळी ( डाळ ) हुळी ( भाज्या ) अन्ना ( भात ) असे म्हणण्याचा प्रघात आहे

नितिन५८८'s picture

21 Mar 2015 - 3:56 pm | नितिन५८८

Do Say Idlicious
Address: ज्येष्ठ समाजसेवक केशवराव प्रवीणचंद्र श्रौफ पथ, Baner, Pune, Maharashtra 411045
Location
Baner › 16 To 18, Shroff Suyesh Building, Balewadi Phata, Baner, Pune

https://www.zomato.com/pune/idlicious-baner/menu

नितिन५८८'s picture

21 Mar 2015 - 4:06 pm | नितिन५८८

Mavalli Tiffin Rooms, known more popularly as MTR

नितिन५८८'s picture

23 Mar 2015 - 11:43 am | नितिन५८८

आरोही ताई मातीच्या भांडयातील मातीचा वास कसा गायब केला? कारण मी एकदा असेच मातीच्या भांड्यात भाजी केली आणि मातकट वासामुळे सगळी फेकून द्यावी लागली.

आरोही's picture

23 Mar 2015 - 4:04 pm | आरोही

नितीन भाऊ ,

मातीचे भांडे आणल्यावर आधी दोन दिवस भिजत ठेवले आणि मग कुठलाही पदार्थ करायच्या आधी त्यात आधी पाणी उकळवून घेते मग मातीचा वास जास्त येत नाही .पण थोडासा तर येणारच न आणि मातीच्या भांड्यात केलेल्या पदार्थाला एक वेगळी खरपूस अशी चव येतेच ...

नितिन५८८'s picture

31 Mar 2015 - 11:33 am | नितिन५८८

धन्यवाद आरोही

स्रुजा's picture

23 Mar 2015 - 9:48 pm | स्रुजा

आरोही, केला गं आज तुझा हा भात. काल एम टी आर चा मसाला मिळाला मग लगेच मुहुर्त लावला. मस्त घमघमाट सुटला घरभर आणि चव पण झकास आली. एक चांगला पर्याय मिळाला वन डिश मील च्या यादीत.