छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ निकाल - व्यक्तिचित्रण

एस's picture
एस in काथ्याकूट
18 Jan 2015 - 1:24 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो!

सर्वप्रथम मी येथे, आज या ठिकाणी, आजच्या या दिवशी, आजच्या प्रसंगी (इत्यादी इत्यादी) सर्व मिपाकरांचे आभार मानतो. या स्पर्धेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, एकसे एक प्रवेशिका पाठवल्यात, त्यांना दादही दिलीत, आणि स्पर्धेच्या बदललेल्या स्वरूपाचे खुल्यादिलाने (बेशर्त??) स्वागत केलेत. त्याबद्दल धन्यवाद!

संपादक मंडळाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि तेवढा विश्वास दर्शवला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत! अर्थात्, 'संपादक मंडळ' या आयडीकडून व्यक्तिगत संदेश आल्याचा विरोप (इमेल) पाहिल्यावर आधी थोडा दचकलोच. त्यात मिपा उघडेना. मग अरेच्चा, आपलं काय चुकलंय बरं, आयडी उडतोय की काय अशा शंकाकुशंका वगैरेंनी बराच वेळ डोक्याचे रे-मार्केट केल्यावर प्रत्यक्ष मिपा उघडल्यावर पाहिले आणि जीव भांड्यात पडला. पण तोही थोडासाच वेळ. मिपाच्या पुढील छायाचित्रण स्पर्धेचे परीक्षक व्हाल का अशी विचारणा. अरे बापरे. मला छायाचित्रणातलं एवढं कधीपासून कळायला लागलं असा प्रश्न स्वतःलाच विचारून झाला.

विषय काय द्यावा हेही माझ्याच गळ्यात मारलं होतं, मग या संधीचा फायदा घेऊन व्यक्तिचित्रण ही माझ्या जिव्हाळ्याची बाब मी निवडली. यानिमित्ताने छायाचित्रणातल्या या प्रकारातले थोडेसे ज्ञान पाजळता आले. :-) आणि जास्तीत जास्त मिपाकरांना या स्पर्धेत भाग घेता यावा हाही महत्त्वाचा हेतू होता. व्यक्तिचित्रण हा छायाचित्रणातला सुपरस्पेशालिटी प्रकारातला भाग म्हणता येईल. तुम्हांला आश्चर्य वाटेल कदाचित, पण खरे व्यावसायिक व्यक्तिचित्रण हे अगदी फुलफ्रेम डीएसएलआरनेही केले जात नाही. त्यासाठी मीडियम फॉरमॅटसारखे भलेथोरले कॅमेरे वापरले जातात. कारण त्यासारखी 'डायनॅमिक रेंज' किंवा रंगछटाव्याप्ती ही कुठल्याच डीएसएलआरने मिळू शकत नाही. अलबत, शेवटी कॅमेरा कुठला का असेना, छायाचित्रकाराचे कौशल्य जास्त महत्त्वाचे.

स्पर्धेच्या निकषांबद्दलही असेच करायचे ठरले. तांत्रिकता आणि छायाचित्रणातील ज्या बाबी कॅमेरा-लेन्स इत्यादी उपकरणांच्या उत्कृष्टतेवर अवलंबून असतात, उदा. नॉइज कंट्रोल, इत्यादींपेक्षा तुम्ही छायाचित्रकार म्हणून तुमच्या विषयवस्तूंमध्ये काय वेगळं पाहता आणि ते कसे टिपून जगासमोर सादर करता (अभिव्यक्ती) याला जास्त महत्त्व दिले गेले. त्यामुळेच तुम्ही काढलेले फोटो हे डीएसएलआरने, प्राइमलेन्सने काढले आहेत की मोबाइलने हे बघत न बसता तुम्ही स्वतःतील छायाचित्रकाराच्या आणि कॅमेर्‍याच्या दृश्य मर्यादांच्या पलिकडे जाऊन कितपत प्रयत्न केलाय, एरवी सर्वचजण जसे फोटो काढतील त्यापेक्षा वेगळे काही करण्याचा प्रयत्न केलाय का, एखादा वेगळा कोन तुम्हांला साधलाय का, रचनाविचार कसा ठेवलाय, प्रकाशाच्या दिशेचा, तीव्रतेचा योग्य असा वापर केलाय का या आणि अशाच निकषांना मी इथे प्राधान्य दिले आहे. छायाचित्रण ही एक 'सब्जेक्टिव' स्वरूपाची कला आहे. एकाला जे आवडेल, रुचेल ते दुसर्‍यालाही तसेच आवडेल असे नाही. त्यामुळे ज्यांच्या प्रवेशिका पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवू शकलेल्या नाहीत त्या वाईट होत्या असे समजू नका.

स्पर्धेतील प्रवेशिकांबाबत - मला सर्वच प्रतिमांमध्ये काही-ना-काही चांगले शिकण्यासारखे सापडले. एकूण २२ वैध प्रवेशिका मुदत संपेपर्यंत आल्या. १६ तारखेलाही एक प्रवेशिका आली. एक अपवाद म्हणून तीही विचारात घेतली आहे. (चालतंय इतकं, होय ना? :-) ) प्रकाशाचा समाधानकारक म्हणता येईल अशा प्रकारे उपयोग खूपशा प्रतिमांमध्ये केला गेला. परंतु रचनाविचार ह्या निकषावर मला आवडतील अशा थोड्याच प्रतिमा दिसल्या. निदान जी गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात असते तिच्यावर प्रभुत्व मिळवायला हवे. तरच तुमचे तुमच्या कॅमेरा-लेन्स-प्रोसेसिंग या तंत्रावर असलेले कौशल्य उठून दिसेल.

प्रवेशिका कोणाची आहे ह्याचा अजिबात विचार न करता सर्व प्रतिमा मी आधी हार्ड-डिस्कवर उतरवून घेतल्या. प्रत्येक प्रतिमा एनलार्ज करून पुनःपुन्हा नीट पाहिली. कंपॅरिजन किंवा तुलना करण्याचे बरेच राउंड घेतले. प्रत्येक राउंडमधून थोड्याथोड्या प्रवेशिका गळत गेल्या. शेवटी उरलेल्या पाच-सहा प्रतिमांतून विजेत्या प्रवेशिका निवडणे फारच कठीण गेले आणि खूपच लहानसहान खुसपटे काढून झाल्यावर, प्रत्येक प्रवेशिकेची तुलना त्या-त्या प्रकारातल्या जगात नावाजलेल्या दिग्गज छायाचित्रकारांच्या तशाच उत्तमोत्तम प्रतिमांबरोबर करून मगच अंतिम विजेत्या प्रवेशिका निश्चित झाल्या. माझी निवड काही व्यावसायिक छायाचित्रकार मित्रांचे निष्पक्ष मत मागवून पारखून घेतली, आणि शेवटी आज, या ठिकाणी (वगैरे वगैरे) निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

सर्व एकत्रित प्रवेशिका खालीलप्रमाणे-
मला प्रत्येक प्रवेशिकेवर विस्तृत भाष्य करणे शक्य होणार नाही. काही निवडक प्रतिमांबद्दल एकदोन वाक्ये त्यांच्या खाली देत आहे.

1. दुर्लक्षामागचा दृष्टिकोन - ३_१४ विक्षिप्त अदिती
1. दुर्लक्षामागचा दृष्टिकोन - ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ह्यांनी घेतलेल्या ह्या प्रतिमेत सर्वात परिणामकारक काय असेल तर ती प्रकाशयोजना. अदितीने ज्याला 'रेम्ब्रा' लाइटिंग म्हणले जाते त्या प्रकाशयोजनेत 'इम्प्रोवाइज' केले आहे हे मला खूपच आवडले. रेम्ब्रा ह्या प्रख्यात चित्रकाराने वापरलेली ही नैसर्गिक प्रकाशशैली चटकन ओळखण्याची खूण म्हणजे चेहर्‍याच्या अप्रकाशित भागात गालावर प्रकाशझोताचा एक त्रिकोण तयार होतो. अदितीच्या प्रतिमेत ह्याच त्रिकोणावर फोकस केले आहे. अनावश्यक भागही व्यवस्थित कातरला आहे. अशा वेळी चेहर्‍याचा क्लोजअप शॉट घेताना थोडे लहान अ‍ॅपर्चर वापरले पाहिजे म्हणजे पूर्ण चेहरा फोकस होतो. प्रतिमेतील डोळ्यांचा भाग थोडा ब्लर आल्यामुळे परिणामकारकता थोडी कमी झाली आहे.

2. गोंधळी - वेल्लाभट
2. गोंधळी - वेल्लाभट

वेल्लाभट आणि मनरंग ह्यांच्या प्रवेशिकांमध्ये साधर्म्य म्हणजे पिकासामधील सेंटर ब्लरचा वापर. असे डीफोकसिंग तितकेसे नैसर्गिक वाटत नसले तरी प्रतिमेचा एकूण प्रभाव व्यक्त करण्यासाठी हा दृष्टिकोनही चांगला आहे. गोंधळी अगदी रंगात येऊन त्याची कला सादर करतोय हे खूपच छान पकडले आहे चौकटीत.

3. कर्जत स्टेशनचा वडेवाला - मदनबाण
3. कर्जत स्टेशनचा वडेवाला - मदनबाण

मदनबाण ह्यांचा हा मीडिअम शॉट पार्श्वभूमी इन्क्लूड केल्यामुळे परिणामकारक झाला आहे. नेहमीच्या उभ्या फ्रेमिंगऐवजी आडव्या फ्रेमिंगमुळे रेल्वेरूळ एक प्रकारचा बंदिस्तपणा आणतात. फक्त त्या वडेवाल्याच्या पेटार्‍यातील वडेही फ्रेममध्ये अजून घ्यायला हवे होते असे वाटले. प्रकाश तसा हार्श असल्याने अशा प्रकारचे फोटो घेणे अवघड असते.

4. अनामिक आजी - नांदेडीअन
4. अनामिक आजी - नांदेडीअन

स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे विषयवस्तूचा एकूण दृश्यपरिणाम हा कॅमेर्‍याच्या चौकटीत कैद करणे ही अभिव्यक्ती महत्त्वाची आहे, हे इथे पुरेपूर जाणवते. चित्रचौकट फारच उभट वाटली. डावीकडे थोडी निगेटिव्ह स्पेस सोडायला हवी होती, जेणेकरून आजीच्या उभ्या आयुष्यासारख्याच उभ्या प्रतिमेला बॅलन्स करणारा एक घटक चित्रात आला असता. दर्शकांच्या संवेदनशीलतेला स्पर्श करणार्‍या अशा काही गोष्टी आवर्जून वापराव्यात.

5. सुरवात - अत्रुप्त आत्मा
5. आमची(ही..) सुरवात - अत्रुप्त आत्मा

रचनाविचार चांगला आहे. किंचित हेडरूम क्रॉप करता आली असती. अगेन्स्ट द लाइट प्रतिमा घेतल्यामुळे चेहरा थोडा अंडरएक्स्पोज झाला आहे.

6. खरवंडी गावातला गाववाला - कंजूस
6. खरवंडी गावातला गाववाला - कंजूस

डावीकडे आणि डोक्याच्या वरच्या बाजूला अनावश्यक जागा सुटली आहे. तेवढी क्रॉप करून एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन थोडे वाढवता आले असते.

7. आई - विशाल कुलकर्णी
7. आई - विशाल कुलकर्णी

आईच्या एकसष्टीची प्रसन्न आणि समाधानी मुद्रा चांगली टिपली आहे. चौकोनी फ्रेमिंगऐवजी थोडे व्हर्टिकल फ्रेमिंग घेऊन मीडिअम क्लोजअप् शॉट घ्यायला हवा होता.

8. पडू दे बर्फ - जुइ
8. पडू दे बर्फ - जुइ

अशा फोटोंमध्ये एक करता येते, नेहमीसारखे आपण सरळ उभे राहून आपल्या आय-लेव्हलने फोटो घेण्याऐवजी थोडे कंबरेच्या लेव्हलने फोटो घेतल्यास चित्रचौकटीत अनावश्यक डिस्ट्रॅक्ट करणारे घटक टाळता येतात, चित्राला एक प्रकारची डेप्थही मिळते. मागच्या बाजूची बर्फ संपल्याची सीमा आहे ती व्हर्च्युअल होरायझन आहे. असे आभासी क्षितिज हे मॉडेलच्या गुढघ्याच्या आसपास येईल अशा बेताने फोटो घेऊन पहा.

9. नववधू - सौरभ उप्स
9. वधू - सौरभ उप्स

मॉडेलच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्या चेहर्‍यावरील भावना अचूक टिपणे हे फार खुबीने दाखवले आहे. प्रेक्षकांची नजर पहिल्याच फटक्यात मॉडेलच्या डोळ्यांवर स्थिरावते आणि पूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्या वधूचे आभासी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनःपटलावर कोरले जाते हे ह्या फोटोचे यश आहे. अतिशय वेगळा आणि कल्पक शॉट. थोडे डोळे शार्प आले असते तर अजून खुलून दिसले असते.

10. रुबाबदार बी.एस.एफ. जवान - विनोद१८
10. बी.एस.एफ. जवान - विनोद१८

उभी चित्रचौकट घ्यायला हवी होती. फोटो छान सुस्पष्ट आला आहे. जवान रूबाबदार म्हणण्यापेक्षा थोडा विचारमग्न वाटतो आहे. हे आय-लेव्हलच्यावरून फोटो घेतल्याने झाले आहे.

11. कडकलक्ष्मीवाला - स्पा
11. कडकलक्ष्मीवाला - स्पा

विनेटिंग (vignetting) परिणाम नंतर पोस्टप्रोसेसिंगमध्ये दिला आहे. त्यामुळे मूळ विषयवस्तूचा भाव खुललाच आहे. कपाळावरील पट्टी आणि गंधपट्ट्याच्या फिकट रंगाला ते कॉम्प्लिमेंटरी वाटते आहे. फ्रेमिंगही अचूक आहे. उभ्या चित्रचौकटीऐवजी आडवी चित्रचौकट घेण्यात एक प्रकारचा धोका असतो. तो पत्करूनही रचनाविचार प्रभावी ठेवण्यात चांगलेच यश मिळवले आहे.

12. अंदमानची पंचायत सदस्य - आतिवास
12. अंदमानमधली पंचायत सदस्य - आतिवास

अगेन्स्ट-द-लाइट फोटो घेताना कॅमेर्‍याच्या मर्यादांमुळे फ्लेअर आले आहेत. विषयवस्तू काहीशी (कॅमेर्‍याच्या) डावीकडे पाहत असताना उजवीकडे जास्त मोकळी जागा सोडणे योग्य नाही.

13. सासवड चे आजोबा - येडाखुळा
13. सासवडचे आजोबा - येडाखुळा

काही प्रमाणात लॉन्गशॉट म्हणता येईल अशी विषयवस्तू आणि आजूबाजूचे दृश्य ह्या दोन्हींना सारखेच स्थान देणारी प्रतिमा. यात अजून काही प्रयोग करता आले असते. उदा. हॉरिझॉन्टल पर्स्पेक्टिवऐवजी वर्म-व्ह्यू पर्स्पेक्टिव इत्यादी.

14. मुलगा आणि लेडी डायनॅसॉर - मुक्त विहारि
14. मुलगा व लेडमुक्तविहारि - मुक्तविहारि

हा मजेचा क्षण छान पकडला आहे. फ्लॅश वापरताना विषयवस्तूच्या डोळ्यांतून तो परावर्तित झाल्यास ते तितकंस चांगलं दिसत नाही, म्हणून फ्लॅश एकतर बाउन्स करावा किंवा मॉडेल्सना थेट कॅमेर्‍याकडे पाहू देऊ नये.

15. अत्रुप्त आत्मा - वल्ली
15. अत्रुप्त आत्मा - वल्ली

प्रतिमाविचार चांगला आहे. दोन वेगवेगळ्या प्रतलांमधील विषयवस्तू एकाच वेळी शार्प फोकसमध्ये येण्यासाठी थोडे लहान अ‍ॅपर्चर वापरावे, तसेच शक्यतो मॅन्युअल फोकसिंग करून दोन्ही मॉडेल्स सुस्पष्ट येतील हे पहावे.

16. गानयोगिनी श्रीमती धोंडुताई कुलकर्णी - मोहन
16. गानयोगिनी श्रीमती धोंडुताई कुलकर्णी - मोहन

अतिशय छान प्रतिमा व रचनाविचार. साधासाच, परंतु प्रभावी. किंचित उजवीकडे जास्त जागा सोडून प्रेक्षकांच्या नजरेला व्यवस्थित गाइड करायला हवे होते.

17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक
17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक

प्रभावी प्रकाशयोजनेचे छान उदाहरण. मीडिअम क्लोजअप शॉट. योग्य दिशेला जास्त जागा मोकळी सोडली आहे. त्यामुळे प्रतिमेत चांगला समतोल निर्माण झाला आहे. 'की लाइट' आणि 'हेअर लाइट' यांचा खूपच प्रभावी वापर आहे.

18. प्रवेशिका - बेमिसाल
18. माझी प्रवेशिका - बेमिसाल

अनावश्यक मोकळी जागा जास्त झाली आहे. चित्रचौकटीत प्रखर प्रकाशाचा स्रोतही आल्यामुळे कॅमेर्‍याने प्रतिमा अंडरएक्स्पोज केली. अशा वेळी फ्रेममध्ये प्रकाशस्रोत येणार नाही अशा कोनातून फोटो घ्यावा.

19. शेगावच्या देवळाबाहेरचे बाबा - मनरंग
19. शेगावच्या देवळाबाहेरचे बाबा - मनरंग

आडव्या चित्रचौकटीचा वापर व्यक्तिचित्रणात करताना रचनाविचारात समतोल साधण्याची कसरत करणे फारच अवघड होऊन बसते. येथे उभे फ्रेमिंग जास्त परिणामकारक ठरले असते असे वाटते. त्याचबरोबर डावीकडे जास्त जागा सोडायला हवी होती.

20. रसाळगडाच्या वाटेवर - शलभ
20. रसाळगडाच्या वाटेवर - शलभ

प्रतिमा किंचित धूसर आहे. डावीकडे अजून किंचित क्रॉप करता आले असते.

21. किल्लेदार - राघव
21. किल्लेदार - राघव

अ टिपिकल पोर्ट्रेट शॉट. हेडरूम आवश्यक तितकीच सोडली आहे. डावीकडची आउट-ऑफ-फोकस पार्श्वभूमी ही फिकट येईल याकडे मुद्दाम लक्ष पुरवले आहे हे लक्षात येते. येथे अगदीच 1x1 चौकट ठेवण्याऐवजी 4x6 या प्रमाणात फ्रेमिंग केले असते आणि उजवीकडे हाताच्या कोपरापर्यंतच फ्रेम ठेवली असती तर अजून वेगळा परिणाम मिळाला असता असे वाटले. पण अर्थात ही चौरसाकृती मीडिअम फॉरमॅटसारखी चित्रचौकटही चांगली दिसतेय.

22. आजी - चौकटराजा
22. आजी - चौकटराजा

अगदी सॉफ्ट लाइटिंग आणि तसाच मृदू चेहरा यामुळे हे पोर्ट्रेट परिणामकारक झाले आहे. चेहरा किंचित तिरपा असल्याने एकदमच ठोकळेबाज चित्रचौकट होण्याचा धोका टळला आहे.

23. द्रो-दुल-शोर्टेन - rahulvg
23. द्रो-दुल-शोर्टेन - rahulvg

लॉन्गशॉट चांगला आहे. पुन्हा एकदा, विषयवस्तूच्या डोळ्यांच्या पातळीत कॅमेरा ठेऊन अशा वेळी फोटो घ्यावा. बसायच्या बाकाच्या इतके समोरून फोटो घेण्याऐवजी बाक कॅमेर्‍याला समांतर येईल असा एका टोकाकडून फोटो काढून पहा. मस्त बोके मिळेल.

अ‍ॅण्ड द विनर्स आर...

तृतीय क्रमांक विभागून -

17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक
17. तबला नवाझ सुप्रीत देशपांडे - वाचक
21. किल्लेदार - राघव
21. किल्लेदार - राघव

द्वितीय क्रमांक -
11. कडकलक्ष्मीवाला - स्पा
11. कडकलक्ष्मीवाला - स्पा

प्रथम क्रमांक -
9. नववधू - सौरभ उप्स
9. वधू - सौरभ उप्स


सर्वांचे अभिनंदन! :-)

प्रतिक्रिया

आणि वेळात-वेळ काढून बिना मोबदला परीक्षकांची भुमिका पार पाडल्या बद्दल, स्पेशल थँक्स टू स्वॅप्स...

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

स्पर्धेअगोदरच्या आणि नंतरच्या विश्लेषणाने मजा वाढली !

सर्व प्रतिस्पर्ध्यांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन !

व्यक्तिचित्रण करताना { अनोळखी }व्यक्तीच्यासमोर कैमरा धरायचा आणि झटपट कंपोज करून क्लिक करायची एकच संधी आणि एकच सेकंद मिळतो. नंतर फक्त कापाकापी करता येते भाव कधीच बदलता येत नाहीत. त्यामुळे मला सर्वांचेच फोटो आवडले आहेत.

इतकं सुरेख विश्लेषण करुन निकाल लावल्याने विजेत्यांचा आनंद व्दिगुणित झाला असेल.आमच्यासारख्या फोटोग्राफी निरक्षरांना काही शिकायला मिळालं.धन्यवाद स्वॅप्स.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2015 - 8:39 am | अत्रुप्त आत्मा

@इतकं सुरेख विश्लेषण करुन निकाल लावल्याने विजेत्यांचा आनंद व्दिगुणित झाला असेल. >> ++++११११
विजेत्यांचे अभिनंदन!

पुन्हा एकदा मला अपेक्षित असलेला प्रथम - पहिला आला. सौरभ'क्लासिक ...मस्त एकदम! याला म्हणतात,फोटो-टिपणं! :HAPPY:

नंदन's picture

18 Jan 2015 - 12:28 pm | नंदन

इतकं सुरेख विश्लेषण करुन निकाल लावल्याने विजेत्यांचा आनंद व्दिगुणित झाला असेल.आमच्यासारख्या फोटोग्राफी निरक्षरांना काही शिकायला मिळालं.धन्यवाद स्वॅप्स.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

तंतोतंत!

मधुरा देशपांडे's picture

18 Jan 2015 - 2:14 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

बोका-ए-आझम's picture

18 Jan 2015 - 8:36 am | बोका-ए-आझम

काय फोटो काढलेत बाप्पा!लय भारी!सगळ्यांचे अभिनंदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2015 - 9:10 am | ज्ञानोबाचे पैजार

विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन.
आणि इतक्या तपशीलवार विश्र्लेषणासाठी स्वॅप्स यांचे मनापासुन आभार.

पैजारबुवा,

विशाखा पाटील's picture

18 Jan 2015 - 9:28 am | विशाखा पाटील

subjective कलेचं सुंदर विश्लेषण! विजेत्यांचे अभिनंदन!

स्पा's picture

18 Jan 2015 - 10:35 am | स्पा

नुसतेच निकाल जाहीर न करता, प्रत्येक छायाचित्राला सन्मान देऊन त्यातले प्लस आणि निगेटिव योग्य शब्दात सांगितल्याने स्वॅप्स गुरुजींचे लय कौतुक वाटल्या गेल्या आहे, दिलेल्या टिप्स फारच उपयोगी पडतील
पुढील विषयाच्या प्रतीक्षेत

- कडकलक्ष्मीवाला स्पा :)

Pic 1

pic 2

हे दोन फोटो स्पर्धेसाठी वेळेवर देत आले नाहीत …. पण मला याबद्दल तुमचे विश्लेषण आणि टिप्स मिळाल्या तर आवडतील

कहर's picture

18 Jan 2015 - 10:45 am | कहर

pic 2

चौकटराजा's picture

18 Jan 2015 - 10:45 am | चौकटराजा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन . महत्वावे म्हणजे स्वॅप यानीच खरे तर ही स्पर्धा जिंकली आहे. कदाचित स्पावड्याच्या चित्राला
दुसरा देताना त्याना क्षणभर पहिला द्यावा असे वाटले असेल ! तरीही सौरभ उप्स हाच शिकंदर. पांडुब्बा व सौरभ उप्स म्हन्जे एकाच घरांत दोन बक्षिसे. मस्त ! अलिकडे स्पा फोटोबाबतीत भलाच जोरात सुटलाय !

कहर's picture

18 Jan 2015 - 10:46 am | कहर

pic 1

फोटो स्पर्धेसाठी वेळेवर देत आले नाहीत …. पण मला याबद्दल तुमचे विश्लेषण आणि टिप्स मिळाल्या तर आवडतील

एस's picture

20 Jan 2015 - 6:30 pm | एस

उद्या किंवा परवा सविस्तर प्रतिसाद देतो.

कहर's picture

21 Jan 2015 - 9:28 am | कहर

वाट पाहतोय

व्यक्तिचित्रणात रचनाविचार आणि प्रकाशयोजनेव्यतिरिक्त अजून एक गोष्ट महत्त्वाची असते. ती म्हणजे स्कीनटोन किंवा त्वचेची रंगछटा. व्यक्तीचा वर्ण जसा असेल त्याप्रमाणे उद्भासन बदलावे लागते. उदा. गौरवर्णासाठी एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन हे -१ पर्यंत खाली आणावे लागते जेणेकरून चेहर्‍यावरील रंगछटा नैसर्गिक वाटेल. त्याचबरोबर गडद वर्णाच्या व्यक्तींसाठी चेहरा काळसर येऊन चालत नाही. म्हणून उद्भासन समायोजन हे धनात्मक (+१) ठेवावे लागते. अशावेळी स्पॉट मीटरिंगचा वापर करून शक्यतो गालावर किंवा कपाळावर - जो भाग मध्यम प्रकाशित आहे त्यावर मीटरचे रीडिंग घेतात. आपल्या कॅमेर्‍याला तशी सोय नसल्यास कॅमेरा जिथे फोकस करतो आहे (फ्रेमच्या मध्यभागी) तो बिंदू फोटो घेण्याआधी अशा प्रकारे फोकस करावा. नंतर फोकस तसाच ठेऊन चित्रचौकट हवी तशी हलवून रचनाविचार पक्का करावा आणि मग शटर रिलिजचे बटन पूर्णपणे दाबावे. म्हणजे कॅमेर्‍याकडून आपल्याला हवी तशी प्रतिमा काढून घेण्यात आपण यशस्वी होऊ.

पहिल्या प्रतिमेत चेहर्‍यावरचे भाव फारच छान पकडले आहेत, परंतु चेहरा थोडा जास्तच प्रकाशमान झाला आहे. किंचित कमी एक्स्पोजर ठेऊन प्रतिमा अजून चांगली घेता आली असती असे वाटले. एक्स्पोजर कमी असते तर पार्श्वभूमीदेखील थोडी अंधारलेली आली असती व मुख्य विषयवस्तूला अजून उठाव मिळाला असता. लेन्स थोडी वाइड ओपन ठेवता आली असती तर त्याचाही ब्लर मिळवण्यासाठी उपयोग झाला असता. अशा छायाचित्रांमध्ये डोळे शार्प येणे महत्त्वाचे असते. मावशींचा चेहरा मनावर ठसतो, पण मागची पार्श्वभूमी जरा बदलता आली असती का किंवा ब्लर करता आली असती का असे वाटले.

दुसरे छायाचित्र छान आहे, काही अनावश्यक घटक चित्रचौकटीतून वगळता आले असते तर अजून प्रभावी झाले असते. फोटो घेताना थोडा तिरपा घेतला आहे. मुद्दाम असा रचनाविचार परिणाम दाखवायचा नसल्यास फोटो योग्य त्या पद्धतीने कातरणे आवश्यक असते, उदा. उजवीकडील भिंतीचा भाग. म्हणून फोटो स्ट्रेट तरी करायला हवा होता किंवा तो भाग क्रॉप करायला हवा होता.

आपण प्रतिमा घेताना विचार करून वेगवेगळे कोन साधायचा प्रयत्न करता आहात ही चांगली बाब आहे. एकदोन किरकोळ गोष्टी वगळता दोन्ही फोटो मला आवडले. शुभेच्छा!

सूचनेसाठी धन्यवाद … हे फोटो nikon L ८३० ने काढले आहेत … point to shoot असल्याने फारसे manual setting चे पर्याय नाहीत … exposure compensation मी आजवर फक्त background शार्प करण्यासाठी किंवा macro फोटोग्राफीत वापरायचो …। तुमच्या सूचनेनुसार इतरत्रही या setting चे प्रयोग नक्की करून पाहीन … मनापासून आभार

एस's picture

26 Jan 2015 - 10:25 pm | एस

मोस्ट वेलकम! :-)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)

प्रचेतस's picture

18 Jan 2015 - 12:56 pm | प्रचेतस

अतिशय मुद्देसूद आणि सखोल विश्लेषणाबद्दल स्वॅप्स यांचे मनःपूर्वक आभार.
चारही विजेत्यांचे अभिनंदन.

विश्लेषणातून शिकायला मिळाले. सर्वांचे अभिनंदन; परीक्षकांचे आभार !

वाचक's picture

18 Jan 2015 - 7:20 pm | वाचक

स्पर्धकांपेक्षा स्वॅप्स गुर्जींनीच अफाट मेहेनत घेतल्याचे जाणवते आहे, एवढा वेळ देवुन मूल्यमापन केल्याबद्दल खरच आभार. पुढील परिक्षक हा एक 'चांगला पायंडा' म्हणून स्वीकारतील अशी नम्र अपेक्षा.
सर्वच फोटो उत्तम, क्रॉपिंग ह्या तंत्राचा वापर अधिक करावा अशी माझी नम्र सुचवणी, अनेक फोटो अजून खुलून दिसले असते.
विजेत्यांचे अर्थात अभिनंदन.

मित्रहो's picture

18 Jan 2015 - 7:50 pm | मित्रहो

सुरेख विश्लेषण
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2015 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वॅप्स गुरुजी, अभ्यासपूर्ण विश्लेषन केवळ ग्रेट. चित्र असंही समजून घ्यावं लागतं. एक नवी दृष्टी दिल्याबद्द्ल. तहेदिलसे शुक्रिया....! विजेत्यांचे अभिनंदन. सौरभने लक्षवेधक असंच चित्र डकवलं होतं यात काही शंका नाही.

अवांतर : विक्षिप्त अदितीचं चित्र पहिल्या नंबरवर दिसलं आणि माझं तोंड कडू पडलं होतं. :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

18 Jan 2015 - 9:14 pm | पैसा

सर्वच स्पर्धकांची चित्रे छान होती. स्वॅप्सने प्रत्येक चित्राचा अभ्यास करून मस्त विश्लेषण दिले. दोन्ही लेखांच्या निमित्ताने बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यासाठी आणि सगळ्या फोटोंचा अभ्यास करून निकाल लावणे तसेच दोन सुरेख लेख लिहिणे यासाठी स्वॅप्सचे आभार मानावे तेवढे थोडेच! तो मात्र त्याच्या स्वभावानुसार "त्यात काय एवढं!" म्हणेलच!

सर्व स्पर्धकांनाही धन्यवाद आणि विजेते ठरले त्यांचे अभिनंदन!

यानंतर साधारण ४ स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे होतील आणि मग पुन्हा मिपावरील एखाद्या अनुभवी आणि उत्तम छायाचित्रकाराला अशीच स्पर्धा घेण्याची विनंती करू! धन्यवाद!

_मनश्री_'s picture

18 Jan 2015 - 9:32 pm | _मनश्री_

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
स्वॅप्स यांचे मनापासुन आभार

किल्लेदार's picture

18 Jan 2015 - 10:58 pm | किल्लेदार

सर्वप्रथम स्वॅप्स गुर्जी यांचे मनापासून आभार. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
इथे एक कल्पना मांडावीशी वाटते. पुढच्या वेळी जी स्पर्धा होईल त्यात एक क्रिटीक्स रिव्ह्यू म्हणून स्वॅप्स गुर्जीनां विनंती करावी (अर्थात ते तेवढा वेळ काढू शकले तर आणि यावेळेसारखे परीक्षक म्हणून नसल्यास). स्वॅप्स गुर्जींचे अवलोकन वाचून फक्त इतरांच्या छायाचित्रांशी स्पर्धा न करता स्वतःच्याच छायाचित्राशी मिपाकर स्पर्धा करू शकतील आणि उत्तमोत्तम मेजवानी सगळ्यांना मिळेल.

बघा पटतंय का? *db*

एस's picture

19 Jan 2015 - 12:43 pm | एस

मला वाटतं मी आता थोडा ब्रेक घ्यावा. कुणाला छायाचित्रणाबद्दल काही प्रश्न असतील किंवा आपली छायाचित्रे रिव्ह्यू करून घ्यायची असतील तर माझी खरडवही आहेच की! :-) केव्हाही खरड करा.

राघव's picture

19 Jan 2015 - 9:52 pm | राघव

खूप मेहनत घेऊन रिव्यू केलाय. मनःपूर्वक धन्यवाद अन् एक मोठ्ठं काम इतक्या आनंदानं पार पाडल्याबद्दल अभिनंदन!!

बादवे, अहो तो किल्लेदार तुमच्या मेहनतीमुळे जरा बोलता [ आपलं लिहिता ] झालाय.. याबद्दल आणिक खास आभार! ;-)

मदनबाण's picture

18 Jan 2015 - 11:01 pm | मदनबाण

विश्लेषण आवडले ! :)

फक्त त्या वडेवाल्याच्या पेटार्‍यातील वडेही फ्रेममध्ये अजून घ्यायला हवे होते असे वाटले.
ओक्के, लक्षात ठेवीन ! :) मी हा फोटो रेल्वेच्या बोगीतुन काढला आहे, त्यामुळे हवा तेव्हढा कंट्रोल मिळवता आला नाही. ओ वडेवाले काका जरा थांबाल का ? असे विचारुन पटकर २ स्नॅप्स मारले. :) माझ्या विनंतीला मान देउन ते थांबले हीच माझ्यासाठी आनंद दायक गोष्ट. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Loot Liyo Mohe Shyam... { रमा माधव }

मी हा फोटो रेल्वेच्या बोगीतुन काढला आहे, त्यामुळे हवा तेव्हढा कंट्रोल मिळवता आला नाही.

होय, ते जाणवलं. म्हणूनच म्हटलंय की अवघड परिस्थितीत हा फोटो घेतला गेला आहे. छानच! :-)

विशाल कुलकर्णी's picture

19 Jan 2015 - 11:00 am | विशाल कुलकर्णी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
स्वॅप्स यांचे मनापासुन आभार

शिद's picture

19 Jan 2015 - 9:42 pm | शिद

+१

स्वॅप्स यांचे आभार सर्व फटुंचे विश्लेषन केल्याबद्द्ल!! सुचना लक्षात घेउन सुधारना करण्यात येईल.

रेवती's picture

20 Jan 2015 - 1:03 am | रेवती

विजेत्यांचे अभिनंदन व विश्लेषणाबद्दल आभार.

सौरभ उप्स's picture

20 Jan 2015 - 11:07 am | सौरभ उप्स

धन्यवाद स्वॅप्स, खूप छान विश्लेषण आणि जस्टिफ़िकेशन….

सविता००१'s picture

20 Jan 2015 - 11:14 am | सविता००१

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
स्वॅप्स यांचे मनापासुन आभार

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
स्वॅप्स यांचे आभार आणि अभिनंदन ! अभिनंदन याबद्दल की ही स्पर्धेची जबाबदारी त्यांनी अतिशय मन लावून आणि समर्थपणे नुसती पार पाडली असेच नव्हे, तर आमच्यासारख्या फोटोग्राफी-अडाण्याना चार धडेही दिले !
आणखी एक, स्वॅप्स यांना विनंती !
स्वॅप्स यांनी त्यांना स्पर्धेत भाग घेता न आल्याबद्दल त्यांचे एक, त्यांच्या मते अत्युत्तम चित्र इथे द्यावे !

चिगो's picture

20 Jan 2015 - 1:59 pm | चिगो

विश्लेषणामागे प्रचंड मेहनत आणि छायाचित्रण कलेबद्दलचा अभ्यास आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतोय, स्वॅप्सराव.. व्यावसायिक परिक्षण करण्यासाठी किती अभ्यास असावा लागतो, हेपण जाणवतंय. थोडक्यात, "क्रिटीकल" म्हणजे काय हे सांगणारे परिक्षण आणि विश्लेषण.. त्यासाठी आभार..

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. लगे रहो..

मला या स्पर्धेसंदर्भात एक प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर हे प्रतिमासंस्करण आणि प्रतिमासंकलन यातील फरक समजून घेण्याच्या दृष्टीने सर्वांसाठीच उपयोगी पडेल म्हणून त्यातला काही भाग इथे देत आहे.

------------------------
प्रश्न-

प्रथम क्रमांकाच्या वधूच्या फोटोवर इफेक्ट आणण्यासाठी फोटोशॉप केल्याचे सरळ सरळ कळत आहे. तर तसे फोटो अलाऊड होते का?

उत्तर-

प्रतिमासंस्करण (पोस्टप्रोसेसिंग) आणि प्रतिमासंकलन (इमेज एडिटिंग किंवा इमेज मॅनिप्युलेशन) यात काही लक्ष्मणरेषा अशी नाही किंवा त्यांच्या ठळक अशा व्याख्याही नाहीत. परंतु मला विचाराल तर दोन्हींमध्ये एक फरक नक्कीच आहे, तो म्हणजे प्रतिमासंस्करण हे प्रतिमेचा दर्जा अजून खुलवण्यासाठी कुठलाही 'ड्रॅस्टिक' बदल न करता किंवा प्रतिमेतील प्रमुख व दुय्यम विषयवस्तू (सब्जेक्ट मॅटर) यांना मुद्दाम न बदलता केले जाते. उदा. ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट वाढवणे, व्हाइट बॅलन्स बदलून प्रतिमेतील मूळ प्रकाशाचे गुणधर्म बदलणे, शार्पनेस वाढवणे वा कमी करणे इत्यादी. काही प्रमाणात क्लोनिंग/पॅचिंग/हीलिंग सुद्धा समजू शकतो. याचे उदाहरण म्हणजे पक्षिछायाचित्रणात पक्ष्याचा संपूर्ण फोटो येईलच असे नाही. मध्ये कुठेतरी एखादी आउट-ऑफ-फोकस झालेली छोटीशी डहाळी येऊ शकते. मग फक्त तेवढाच भाग काढून टाकणे हे प्रतिमेचा एकूण दृश्यपरिणाम आपल्या मनासारखा प्रभावी ठेवण्यासाठी आवश्यक आणि योग्यही ठरते.

याउलट प्रतिमासंकलनात प्रतिमेत अशा स्वरूपाचे बदल केले जातात की त्यामुळे प्रतिमेचा मूळ गाभाच बदलतो. उदा. अविनाश गोवारीकरांनी एका अभिनेत्रीचा एक फोटो स्टुडिओ सेटअपमध्ये घेतला होता. त्या निर्मात्याने नंतर फोटोतली पार्श्वभूमी बदलून मागे चक्क समुद्र टाकला आणि तसा फोटो प्रसिद्धीच्या वेळेस वापरला. हे कळल्यावर गोवारीकर गारच झाले! हे बदल अशा स्वरूपाचे असतात की त्यामुळे मूळ विषयवस्तू पूर्णपणे बदलून जातात. त्यात मुळात नसलेले काही घटक दुसर्‍या प्रतिमेतून आणून टाकले जातात, किंवा पूर्णपणे 'डिस्टॉर्ट' केले जातात. मॉडेल मुळात जाड असताना थोडी बारीक करणे, दोन पक्षी (उदा. फ्लेमिंगोज्) प्रत्यक्षात एकमेकांपासून दूर असताना फोटो एडिट करताना ते ओव्हरलॅप करून त्यातून 'हार्ट' चा आकार तयार करणे ही काही उदाहरणे देता येतील. इमेज मॅनिप्युलेट केली तर अशी इमेज आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देता येत नाही. तसे सांगावे लागते.

प्रथम क्रमांकाच्या वधूच्या फोटोबद्दल - मला यात फारसे इमेज एडिटिंग केल्यासारखे जाणवले नाही. पोस्टप्रोसेसिंग नक्कीच आहे. पण कुठेही कृत्रिम काटछाट केलीय असे वाटले नाही. आउट-ऑफ-फोकस परिणाम थोडा वाढवला असावा. पण मुळातच तो नव्हता असे नाही. आणि धाग्यात म्हटल्याप्रमाणे तांत्रिकतेपेक्षा तुमच्यातील छायाचित्रणाच्या कौशल्याला, दृष्टिकोनाला, त्या प्रतिमेच्या पाहणार्‍यावर पडणार्‍या इम्प्रेशनला जास्त महत्त्व दिले जाणार होते. या सर्व निकषांवर मला ही प्रवेशिका प्रथम क्रमांकासाठी योग्य वाटली. त्यासंबंधीचे अधिक भाष्य तिथे दिले आहे. त्यात जमेच्या बाजूबरोबरच अजून काय असायला हवे होते हेही दाखवलं आहे.

मॉडेलच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्या चेहर्‍यावरील भावना अचूक टिपणे हे फार खुबीने दाखवले आहे. प्रेक्षकांची नजर पहिल्याच फटक्यात मॉडेलच्या डोळ्यांवर स्थिरावते आणि पूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्या वधूचे आभासी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनःपटलावर कोरले जाते हे ह्या फोटोचे यश आहे. अतिशय वेगळा आणि कल्पक शॉट. थोडे डोळे शार्प आले असते तर अजून खुलून दिसले असते.

एकूणच छायाचित्रण ही मी म्हटल्याप्रमाणे 'सब्जेक्टिव आर्ट' आहे. त्यामुळे त्यात सर्वांची मते वेगवेगळी असू शकतात. आपल्या मताचेही स्वागत आहे!
------------------------

अजूनही कुणाला काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. :-)

सौरभ उप्स's picture

21 Jan 2015 - 10:50 am | सौरभ उप्स

स्वॅप्स, खूप सुंदर निरीक्षण आणि परीक्षण।
मुळातच तो फोटो असा आला आहे कि त्याला एडीट करायची गरज च नाही लागली.
झूम लेन्स ५५-२०० असल्याने मेन ऑब्जेक्ट फोकस आणि इतर पत्धत्शीर पणे डीफोकस झाल आहे.
हार्डली २% एडीट केल तेही छोटी प्रतिमा दिसेल म्हणून।
तरी रेफरन्स साठी कम्प्यारिसन टाकत आहे…
1

सस्नेह's picture

21 Jan 2015 - 11:28 am | सस्नेह

ओरिजिनलच भारी आहे.

एस's picture

21 Jan 2015 - 11:58 am | एस

मूळ प्रतिमेतील एक उबदार वर्णछटा आहे ती जास्त चांगली वाटतेय. हल्ली ट्रेंड असा आहे की प्रकाशछटा ही प्लेन न ठेवता त्यात काहीतरी प्रयोग करायचे. किंचित पिवळसर-हिरवट अथवा गुलाबी छटेकडे झुकणारा व्हाइट बॅलन्स मुद्दामहून निवडला जातो. असेही करून पाहता येईल.

स्पा's picture

21 Jan 2015 - 11:17 am | स्पा

उत्तम प्रतिसाद.
बर्याच लोकांना असे वाटते कि फोटो हे एडीट केल्यानेच सुंदर दिसतात
बरेच लोक मिसळपाव वर असेही पाहिलेत कि ते स्पेशल तळटीप लिहितात कि कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही, भले तो फोटो दिसायला सर्वसाधारण असला तरी, त्यातच त्यांना अभिमान असतो

मुळात फोटो एन्हांस करणे आणि फोटो म्यान्यूप्युलेट करणे यातला फरक त्यांना समजत नाही
उलट फोटो एडीट करायला सोप्पे जावेत म्हणून सर्व फोटोग्राफर ते RAW format टिपतात.

मुद्दा हा आहे कि, ज्या गोष्टी फोतोशोप मध्ये होतात त्याच क्यामेरात पण होतात,
उदाहरणार्थ योग्य ISO, F numbar etc
म्यान्युअल मोड मध्ये हे सगळे setting करेस्तोवर समोरचा क्षण केंव्हाच निघून गेलेला, त्यामुळे त्याच गोष्टी नंतर सेट होतात,
जेंव्हा तुम्ही क्यामेरात ह्या गोष्टी सेट करत असता ,म्हणजे तुम्ही एका अर्थाने प्रोसेसिंग करताच असता णा , मग त्या कयाम मध्ये केल्या काय आणि नंतर PS वर केल्या काय,
मुद्दा हा आहे कि फोटो सुंदर दिसणे, तुम्ही कसंही करा , ओवर एडीट करणारे महाभाग आहेतच ते लगेच समजूनही येतं, कालांतराने त्यातल्या खाचा खोचा समजतात

चौकटराजा's picture

21 Jan 2015 - 5:04 pm | चौकटराजा

कॅमेरा हा ही तंत्राचाच वापर करतो व फोटोशॉपही.मग एक शिरोधार्य व दुसरा त्याज्य काय म्हणून ?

मोहन's picture

21 Jan 2015 - 12:45 pm | मोहन

सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचेही अभिनंदन. अशा प्रकारची स्पर्धा घेवून वेगवेगळे विचार देवून स्पर्धा यशस्वी केल्या बद्द्ल सं.मं. अभिनंदनास पात्र आहेच.

स्वॅप्सचे मात्र कौतुक करावे तेवढे थोडे आहे. प्रचंड मेहेनत घेवून अत्यंत इमानदारीने आपली जबाबदारी पार पडलेली दिसते आहेच. पण छायाचित्रणकले बद्दलची त्यांची आत्मीयता वाखाणण्या सारखी आहे.
जिओ स्वॅप्स !

संपादक मंडळ's picture

21 Jan 2015 - 3:28 pm | संपादक मंडळ

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आभार !
स्वॅप्स यांनी स्पर्धेचे संयोजक व परीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि स्पर्धा उत्तमरीत्या पार पाडली याबद्दल त्यांचे विशेष आभार !

चौकटराजा's picture

24 Jan 2015 - 8:56 pm | चौकटराजा

.

आंतरजालावरून साभार

चौकटराजा's picture

24 Jan 2015 - 9:06 pm | चौकटराजा

फेस बुक वर Watercolour Artist Rajkumar sthabathy असा शोध द्या व एकसोएक व्यक्तिचित्रे वाटरकलर मधे पहा !