मिक्स व्हेज सूप (सध्या उपलब्ध भाज्यांचे)

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
7 Jan 2015 - 7:32 pm

मेथी कोथींबीर इत्यादी काही भाज्यांचे बाजारभाव उत्पादन खर्चा पेक्षा खाली पडताहेत हि बातमी दै सकाळमध्ये वाचली. अशा बातम्या सहसा वाचून सोडून द्यावयाच्या असतात तशी मी वाचून सोडून दिली होती, कारण शेतकर्‍याला किंमत कोसळते पण शहरातील ग्राहकाला त्याचा लाभ होतो असे नाही. पण काल जवळच्या भाजीमंडईतील एक भाजीवाला पावला आणि बातमीतल्या भाज्या अपेक्षेपेक्षा बकळ रिझनेबल मिळाल्या. आज या भाज्यांचे मिक्स व्हेज सूप बनवले. या पुर्वी मी केवळ फळ भाज्यांचे मिक्सव्हेज सूप बनविले होते. या वेळी पालाभाजी + फळभाजी असा मिक्सव्हेज सूप प्रयोग मला स्वतःलाही नवा होता.

सूपाचे साहित्य येणे प्रमाणे झाले (अर्थात साहित्याची निवड करताना समोर उपलब्ध होते ते एवढा एकच विचार केला होता. साहित्याचे घटक पाहून मुलींनी सकाळी बहिष्कार टाकला होता पण सायंकाळी मिटक्या मारत सूप पिले आणि सूपची छायाचित्रे व्हाट्सअ‍ॅप केली यात सारे आले)

* पालक : १० - १२ पाने
* मेथी पाने : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* कोथींबीर : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* पुदीना पाने : पालकाच्या एक चतूर्थांश क्वांटिटी अंदाजे
* बिटरूट मोठा: १
* टोमॅटॉ मोठे २ ( मध्यम चार असावेत)
* फ्लॉवर अंदाजे १०० ग्राम
* भेंडी अंदाजे ५० ग्राम
* बीन्स अंदाजे ५० ग्राम
* मूळा (पांढरे मूळ) अंदाजे ५० ग्रामचा तुकडा
* आले खिसून चवी पुरते
* साखर, जीरे पावडर १-१ चमचा
* मीठ तीखट चवी पुरते
* १ चिमूट हळद

* कृती खालील प्रमाणे केली:

फ्लॉवर, भेंडी, बीन्स, मूळा आवडीच्या आकाराचे तुकडे बारीक चिरून एकीकडे चुलीवर उकळत ठेवले. दुसरीकडे पालक, मेथी कोथींबीर पुदीना पाने ५ मिनीटे मायक्रोव्हेव केली. बीटरूट कूकरला शिजून आधीपासून रेडी होता बीटरूट आणि टोमॅटोचे बारीक काप करून फळ भाज्यांसोबत आणि मायक्रोव्हेव करावयाच्या पालेभाजी गटात समसमान टाकले होते. आले दोन्ही कडे खिसून टाकले होते. मीठ तीखट हे पदार्थ चवी नुसार मी प्रत्येक गटात प्रत्येक स्टेजवर चवीनुसार टाकत अ‍ॅड्जस्ट करत जातो तसे ते केले. मायक्रोव्हेव केलेला पालेभाजी गट मिक्सरवर बारीक करून घेतला आणि मोठ्या पातेल्यात गॅसवर ठेवला त्यात उकळत आलेल्या फळभाज्या घातल्या साखर जीरे पावडर आणि चिमूटभर हळद टाकली. १५ मिनीटे सूपाला उकळी आणली आणि ...........सूप ओरपले :)

भात, साधेवरण, सूप, पापड आणि सोबतीला अंब्याचे लोणचे प्रयोग स्वतःवर केला आणि मला स्वतःस आवडला !

इति सूप आख्यान सफल संपूर्ण . वाचणारे अतृप्त होवोत, खाणारे तृप्त होवोत आणि करून खाऊ घालणार्‍यांवर देवी लक्ष्मीचा आशिर्वाद असो !

mix veg soup

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

7 Jan 2015 - 7:51 pm | दिपक.कुवेत

टेम्टींग दिसतय. फक्त एक सुचना....बीटाचा अगदि लहानसा तुकडा घ्यावा किंवा पुर्णच वगळावे कारण त्याचा कलर ईतका पावरफुल असतो कि दुसर्‍या कोणत्याच भाजीचा कलर त्यास तारक ठरु शकत नाहि. बीट वगळून वरील भाज्यांचं कलरफुल सुप मस्त दिसेल...हळदिचा हलका कलर येईल. तिखट एवजी काळी मीरी पावडरचा स्वादहि छान लागेल. अर्थात आवड आपली आपली.

माहितगार's picture

7 Jan 2015 - 7:59 pm | माहितगार

तिखट एवजी काळी मीरी पावडरचा स्वादहि छान लागेल.

सहमत मलाही काळी मीरी पावडरच आवडली असती अथवा हिरवी मिरचीसुद्धा परंतु करण्याच्या मूड होण्याच्या वेळी ते उपलब्ध नव्हते म्हणून लाल तिखटाचा प्रयोग केला. बिटरूटाबद्दल ही तुमच्याशी सहमत आहे. बिटरूट न टाक्ल्यास पालकाचा हिरवारंग अधिक जाणवेल असे वाटते. गोष्ट एवढीच की कालच्या पावलेल्या भाजीवाल्याने दहा रूपयात आठवडाभर पुरतील एवढी बीटरूटे दिलेली होती आणि मी आलेल्या भाज्या संपवणे या उद्दीष्टाच्या मागे होतो.

प्रतिसादासाठी आभार

जेपी's picture

7 Jan 2015 - 8:10 pm | जेपी

ऑं..धक्का बसला .
*biggrin*
विकिपेडीया वर आहे का ही रेसिपी =))
असो.सध्या रोज तिन टैम मेथी खातोय.
सकाळी सुप ,दुपारी पराठे,
सांच्याला,
मेथी-पालक,मेथी आलु,मेथी पनीर,मेथी मटर मलाई ..अजुन बरच काही.
तस्मात चालु द्या

सस्नेह's picture

8 Jan 2015 - 10:49 am | सस्नेह

तुम्हाला एवढी व्हरायटी मिळते ?
आम्हाला दोन्ही वेळा भाजीत भाजी मेथीची ! *biggrin*

आख्या खान-दानात एकटाच मिपाकर असल्यामुळे बाकीचे लोक काम करतात,त्यामुळे जेवणात व्हरायटी मिळते आणी मला काय काम उरत नसल्यामुळे इकडे येऊन दंगा करतो.

माहितगार's picture

7 Jan 2015 - 8:13 pm | माहितगार

विकिपेडीया वर आहे का ही रेसिपी

:) विकिपीडियावर नाहीए पण छायाचित्र सवयिनुरूप मिडियाविकि कॉमन्सवर आधी टाकून मग येथे झळकवले आहे.

जेपी's picture

7 Jan 2015 - 8:27 pm | जेपी

@माहितगार-साहेब,
प्रतिसाद हलकेच घ्या लिवायच राहिल. :-)

माहितगार's picture

8 Jan 2015 - 10:44 am | माहितगार

प्रतिसाद हलकेच घ्या लिवायच राहिल.

कै हरकत नै मास्टर शेफ ना माहित र्‍हातयच ते .

मदनबाण's picture

8 Jan 2015 - 7:04 am | मदनबाण

मस्तच... :)
सूप तिखट असलं तरी मी स्वतः पिताना त्यात वरुन मिरी पावडर टाकतोच, मस्त चव लागते. :)

(सूप प्रेमी} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar

पियुशा's picture

8 Jan 2015 - 10:36 am | पियुशा

मला फोटु दिसत नाहीये :(

माहितगार's picture

8 Jan 2015 - 10:49 am | माहितगार

का बरे ? .jpg फॉर्मॅट आहे. विकिमीडिया कॉमन्सवर चढवलेली मूळ इमेज येथे आहे.

सविता००१'s picture

8 Jan 2015 - 10:47 am | सविता००१

आता करून पाहिलंच पाहिजे.
बीट थोडं कमी घालेन मी.
पण फ्लॉवर आणि मुळा दोन्ही आहे तर उग्र नाही ना होत चवीला?

माहितगार's picture

8 Jan 2015 - 10:54 am | माहितगार

म्हणूनच मुळा खूप कमी घातला होता आणि मूळा प्रत्येक वेळी उग्र होत नाही तसा या सूपात तो जाणवलाही नाही कदाचित माझ्या सूपात आले थोडे अधीक होते त्या च्वीखाली मूळ्याचे तुकडे अलगद खपले असावेत. फ्लॉवर पण उग्र लागला नाही. पण फ्लॉवर पिसेस खाताना उगाचच चिकन सूपची आठवण येऊ लागली होती. गंमत म्हणजे भेंडीचे तुकडे लिबलिबीत होतील का असे वाटत होते पण समहाऊ सर्वच फळभाजी तुकड्यांचा व्यवस्थीत शिजूनही करकरीत पणा कायम होता असे अनुभवले.

सस्नेह's picture

8 Jan 2015 - 10:50 am | सस्नेह

भेंडी उकळून घातल्यावर तार येत नै का ?

भेंडी उकळून घातल्यावर तार येत नै का ?

हो मलाही तशी शंका वाटली होती समहाऊ तसे झाले नाही याचेच मलाही आश्चर्य वाटले. भेंडी खूपच कोवळी मात्र होती.

सविता००१'s picture

8 Jan 2015 - 11:17 am | सविता००१

पण टोमॅटो मुळे (म्हणजे त्याच्य आंबट पणा मुळे तार नसेल आली. आपण भाजी चिकट होऊ नये म्हणून चिंच, आमचूर पावडर घालतो ना, तसा इफेक्ट असेल बहुतेक.

माहितगार's picture

8 Jan 2015 - 1:07 pm | माहितगार

ओक्के हे माहित नव्हते.

मुक्त विहारि's picture

8 Jan 2015 - 2:12 pm | मुक्त विहारि

नक्कीच करून बघीन..

श्रीरंग_जोशी's picture

9 Jan 2015 - 3:34 am | श्रीरंग_जोशी

रोचक दिसत आहे पाकृ.

पदम's picture

9 Jan 2015 - 1:43 pm | पदम

नक्कि करुन पाहिन.

पैसा's picture

9 Jan 2015 - 11:05 pm | पैसा

मस्त प्रयोग!