दुकानदाराकडून अपमान..

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
9 Dec 2014 - 12:42 pm
गाभा: 

गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले..

प्रसंग एक :
हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले.

खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही.

प्रसंग दोन:
वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला).

वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय?

तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल.
यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

लोक्स, किती ते अपमाण! गपा की जरा. ;)

ग्रेटथिंकर's picture

20 Dec 2014 - 1:58 pm | ग्रेटथिंकर

छान लेखन आवडले.

खबो जाप's picture

9 Jan 2015 - 7:39 am | खबो जाप

एक लक्षात ठेवा.
कुणाच्या वाट्याला जायच नाही , कुणी उचकवले तर सोडायचं नाही
नडला कि फोडला ……
अस नाही केल तर कोनपण येवून टपली मारून जायील

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2015 - 8:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सेंट परसेंट सहमत

शि बि आय's picture

27 Oct 2015 - 5:02 pm | शि बि आय

फारच अपमान झाला बुआ !!!

अशा वेळी तुमच्या सौभाग्यवती कुठे होत्या ? कि कोणती तरी खुन्नस म्हणून गप्प होत्या?
आता सौभाग्यवतीस सांगा ह्यापुढे जेव्हा खरेदीला जाशील तेव्हा दुकानदाराला एवढा त्रास दे की त्याने भिक नको पण कुत्रं आवर ग बाई... असे नक्की म्हणले पाहिजे.
खर तर गोची अशी झाली आहे कि पश्चिम उपनगरमध्ये गुजराथी आणि मारवाडी समाजाचे प्रमाण हे लक्षणीय आहे. या समाजातील टवळ्या ह्या नुसता कंटाळा आला तरी शॉपिंग करायला जातात. जर असे गलेलठ्ठ ग्राहक सहज दुकान येउन सहज खरेदी करून बाहेर पडणार असेल तर आपल्यासारख्या चोखंदळ ग्राहकांसाठी त्याला करावी लागणारी मेहनत हि जास्त असल्यामुळे त्याचा हा त्रागा होता…. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. ह्याचा अनुभव मलाही आला होता पण पुणेकरांचे संस्कार माझ्यावर झाले असल्यामुळे दुकानदाराचे सगळे वार परतवून लावत वर तुझ्याच दुकान लेटेस्ट वरायटी नाही म्हणून निवडीसाठी एवढा वेळ लागत आहे हे बोलून दाखवलं..

शि बि आय's picture

27 Oct 2015 - 5:02 pm | शि बि आय

फारच अपमान झाला बुआ !!!

अशा वेळी तुमच्या सौभाग्यवती कुठे होत्या ? कि कोणती तरी खुन्नस म्हणून गप्प होत्या?
आता सौभाग्यवतीस सांगा ह्यापुढे जेव्हा खरेदीला जाशील तेव्हा दुकानदाराला एवढा त्रास दे की त्याने भिक नको पण कुत्रं आवर ग बाई... असे नक्की म्हणले पाहिजे.
खर तर गोची अशी झाली आहे कि पश्चिम उपनगरमध्ये गुजराथी आणि मारवाडी समाजाचे प्रमाण हे लक्षणीय आहे. या समाजातील टवळ्या ह्या नुसता कंटाळा आला तरी शॉपिंग करायला जातात. जर असे गलेलठ्ठ ग्राहक सहज दुकान येउन सहज खरेदी करून बाहेर पडणार असेल तर आपल्यासारख्या चोखंदळ ग्राहकांसाठी त्याला करावी लागणारी मेहनत हि जास्त असल्यामुळे त्याचा हा त्रागा होता…. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. ह्याचा अनुभव मलाही आला होता पण पुणेकरांचे संस्कार माझ्यावर झाले असल्यामुळे दुकानदाराचे सगळे वार परतवून लावत वर तुझ्याच दुकान लेटेस्ट वरायटी नाही म्हणून निवडीसाठी एवढा वेळ लागत आहे हे बोलून दाखवलं..

गुजराथी आणि मारवाडी समाजातील "टवळ्या" म्हणजे काय?

नितिन५८८'s picture

27 Oct 2015 - 6:06 pm | नितिन५८८

एकदा रिक्षाने बाणेर ते औंधला गेलो होतो तेव्हा ४० रुपये भाडे झाले, मी त्याला १०० ची नोट दिली तर त्याने मला फक्त ५० परत केले आणी म्हणतोय कि सुट्टे नाहीत माझ्याकडे. मी त्याच्याकडून १०० ची नोट परत घेतली व त्याच्या हातावर १० रुपये टेकवले आणी बोललो जा आता माझ्याकडे सुट्टे नाहीत. तेव्हा गपचुप उतरून सुट्टे पैसे घेऊन आला.

हेमंत लाटकर's picture

27 Oct 2015 - 7:32 pm | हेमंत लाटकर

दुकादारांचा माज उतरविण्यासाठी सर्वांनी आॅनलाईन खरेदी करावी. वेळ, ट्रॅफिक, अपमान या सर्व गोष्टीचा त्रास वाचेल.

शि बि आय's picture

29 Oct 2015 - 3:43 pm | शि बि आय

मोदक भाऊ "टवाळ्या" म्हणजे रिकामटेकड्या बायका….

ज्या दिवसभर फक्त चरत आणि बडबड करत हिंडत राहतात आणि उरलेल्या वेळात घरातील थोडी(शी) काम करतात. काही वर्षापूर्वी हा समाज कंजूसपणासाठी आणि कामसूपणासाठी प्रसिद्ध होता पण आता खरेदी, खादाडी आणि खत्रूडगिरीसाठी प्रसिद्ध आहे.

शि बि आय's picture

29 Oct 2015 - 3:45 pm | शि बि आय

"टवळ्या" असे म्हणायचे होते

PIYUSHPUNE's picture

29 Oct 2015 - 7:21 pm | PIYUSHPUNE

कस्ट'मर'

नितीनचंद्र's picture

4 Nov 2015 - 4:42 pm | नितीनचंद्र

मी चिंचवडला रहातो. माझ्या पत्नीने माझ्या वाढदिवसानिमित्त एक स्वेटर कम जॅकेट खरेदी केला. त्याला रेनकोट ला जशी टोपी असते तशी होती. माझ्या पत्नीने दुकानदाराला विचारुन आवडला नाही तर परत देऊन दुसरा घ्यायची बोली केली होती.

दुसर्‍याच दिवशी, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तो परत करुन कॉलर असलेला स्वेटर्/जॅकेट घ्यायला मी दुकानात गेलो तेव्हा भोवनी व्हायची होती. मला डायरेक्ट काही न बोलता मालकिण बाईंनी कुचकटे शेरे मारले.

मी मला हवा तसा जॅकेट घेतलाच वर आधिच्या किंमती पेक्क्षा ५० रुपये जास्त दिले. म्हणजे भोवनीला गल्यातले पैसे न जाता रुपये ५० का होईना आले असे मालकीण बाईंना सांगीतले मग तुम्ही कुचकट शेरे का मारलेत असे विचारले.
आज माझा वाढदिवस आहे. मी किती दुखावला गेलो आहे . आता मी तुमच्या दुकानात परत का यावे असा प्रश्न विचारला. यावर मालकीण बाईंनी रडु काढले. दुकान नीट चालत नाही म्हणुन एकाने बदलिचे गिर्‍हाईक भोवनीला न करण्याचा सल्ला दिला असे साम्गीतले.

दुसर्‍या प्रसंगात एक वडा पाव वाले कॅरी बॅग साठी १ रुपया जास्त पडेल असा बोर्ड लावतात. एक रुपया मी देऊन काहिवेळा नाईलाजास्तव असे करतो पण त्यांचे आपापसातले कुचके शेरे ऐकुन बहुतेक जगातुन कॅरी बॅग हद्दपार झाल्या आहेत आणि हा एकच शहाणा ती मागतो आहे असा भास होतो.