पुन्हा एकदा नळीची वाट - उत्तरार्ध

सह्यमित्र's picture
सह्यमित्र in भटकंती
27 Nov 2014 - 6:05 pm

आतापर्यंत निम्म्या पेक्षा जास्त अंतर पार झाले होते. सलग साधारण ६०-७० अंशातील खडी चढण गेले ३-४ तास चढत होतो. काही वेळात मी आणि प्रशांत नळीच्या वाटेतील प्रसिद्ध अशा उंबराच्या झाडाच्या patch पाशी आलो. अतिशय चिंचोळी होते गेलेली घसाऱ्या ची वाट, समोर आलेला dead end आणि उजवी कडे साधारण २० फुटांचा काहीसा कठीण rock patch आणि त्याच्या वरती ते बाहेर डोकावणारे छोटेसे उंबराचे झाड. ह्या खुणा बघून माझ्या आणि प्रशांत च्या २००६ मधील ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा ह्याच patch ने आमचा सगळ्यात जास्त वेळ घेतला होता. अर्थात आता आम्ही इथे सकाळी ९:३०-१० ला उभे होतो आणि तेव्हा रात्री १० वाजता हा मोठा फरक होता. तितक्यात आदित्यही तिथे आला त्याने मात्र हा तो patch नसून अजून पुढे चढत जायचे असल्याचे सांगितले. पण पुढे dead end होता आणि प्रशांतच्या आणि माझ्या ह्या ठिकाणच्या आठवणी अगदी पक्क्या असल्याने आम्ही हाच तो patch ह्या मतावर ठाम होतो. पण आदित्यही त्याच्या मतावर ठाम होता. मग तिघेही मामा तिथे यायची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात मागून मामा आणि इतर भिडू आले.

मामांनी हाच तो patch असल्याचे जाहीर केले आणि बघता बघता सरसरत ते तो २० फुटांचा patch चढून वर झाडा पाशी गेले आणि लगेचच दोर झाडाला बांधून खाली सोडला. तोपर्यंत मी आणि प्रशांत नैसर्गिक holds वर हा patch चढून जाता येईल का ह्याचा अंदाज घेत होतो. आम्ही उभे होतो तिथून एकदम ९० अंशातील चढण होती. मात्र थोडे खालच्या बाजूस सरकल्यास काही holds दिसत होते ज्याचा वापर करून चढता आले असते. पण मागे तीव्र उताराची आणि घसारा असलेली नळीची वाट होती त्यामुळे अतिशय जपून चढावे लागणार होते. तेवढ्यात वरून मामांनी तिकडून चढू नका आणि सरळ झाडाखाली येऊन दोराचा आधार घेत वर या असे सांगितले. backpacks घेऊन वर चढणे अजून अवघड होते होते त्यामुळे त्या काढून खालीच ठेवून चढायला सुरुवात केली.

major patch

नळीच्या वाटेतील सर्वात अवघड patch - फोटो सौजन्य जॉन

सुरवातीला १-२ holds मिळाले. निम्मे अंतर गेल्यावर मात्र पक्के holds शोधणे जिकीरीचे झाले. प्रस्तरारोहणाचे काही मुलभूत नियम आहेत त्यातला एक म्हणजे दोन हात आणि दोन पाय ह्या एकूण ४ holds पैकी कायम ३ holds तरी हे पक्के असलेच पाहिजेत. शिवाय आपल्या शरीराचा गुरुत्वमध्य हा कातळभिंतीच्या शक्य तेवढा जवळ असला पाहिजे. इथे तसे holds सापडत नसल्याने दोराचा होल्ड सारखा वापर करत उरलेला निम्मा टप्पा पार करून वर पोहचलो. पाठीमागून प्रशांत, आदित्य, श्रीनिधी आणि भूषण हे पण आले. जॉन आणि केतन ह्यांनी वर सांगितलेली जराशी खालच्या बाजूची वाट नैसर्गिक holds चा वापर करून कौशल्याने पार केली आणि वर आले. मग कमळू मामा दोरावरून पुन्हा सरसरत खाली गेले आणि त्यांनी एक एक करत आमच्या backpacks वाहून वर आणून दिल्या. आम्ही वरून त्या ओढून घेतल्या आणि त्यांचे आभार मानून परत bottleneck नको म्हणून पुढे चालायला लागलो.

ह्या अवघड patch वरून वर आल्यावर खाली बघून आपण किती अंतर आणि उंची पार केली आहे ह्याचा अंदाज घेत्ल. जवळपास ७०-८०% अंतर पार झाले होते. इथून एक छोटासा अर्धवर्तुळाकार traverse मारून नळीच्या पलीकडच्या एका दुसऱ्या नळीत आपण शिरतो. इथून परत १५-२० मिनिटांची चढण चढून आलो आणि नळी संपत आलेली दिसली. त्यामुळे उत्साहाने झपाझप पावले टाकत वर गेलो आणि नळी सिम्प्ते तिथे एक छोटीशी खिंड आहे तिथे जाऊन थांबलो. थुन उजवीकडे नेहमीची पायवाट सुरु होते. इथूनच एक वाट खाली साधले घाटाच्या माथ्यावरील पठारावर उतरते. काही लोक नळीतून चढून इथूनच साधले घाटाकडे जाऊन तिथून परत खाली बेलपाड्यात उतरतात. साधले घाटाने उतरणे हा आमच्या योजनेचा भाग होतच. पण आम्ही आज गडावर चढून तिथे मुक्काम करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी आधी बैलघाटाने साधले घाटाच्या माथ्यावरील पठारावर उतरून तिथून साधले घात उतरून बेलपाड्यात परतणार होतो. कमळूमामांनी आम्हाला ह्या वाटेने नेण्याचे मान्य केले होते. हरिश्चंद्रगडावर येणाऱ्या वाटेत ही पण अजून एक वाट आहे. ह्या वाटेने देखील गडावर यायला ६-७ तास लागतात.

topview

खिंडीतून दिसणारा साधले घाटाच्या माथ्याचा परिसर

एक एक करून सगळे खिंडीत आले तिथून मग लगेच उजवीकडील वाटेने वर चढू लागलो. ही वाट झाडीतून वर चढत असल्याने उन्हाचा त्रास होत नव्हता काहीच वेळात वाट कोकणकड्याच्या अलीकडच्या पठारावर आली. आता इथून काहीच वेळात आम्ही कोकणकड्यावर पोहोचणार होतो. बेलपाड्यापासून इथवर आम्ही साधारण ५ तासात आलो होतो. पहाटे चढायला सुरुवात केल्यामुळे अपेक्षेपेक्षा बरेच लवकर आम्ही नळीची वाट पार केली होती. इथून समोर न्हापता, उजवी कडे कलाडगड, त्याच्या मागे लांबवर कात्राबाई, घनचक्कर, भैरवगड असा सह्याद्रीचा पसारा दिसत होता. सह्याद्रीतील डोंगरांची पारंपारिक नावे फार मजेशीर आहेत काही वेळा डोंगराच्या वैशिष्ट्यावरून घनचक्कर, खुटा, बुधला, नागफणी, नानाचा अंगठा अशी नावे तर काही ठिकाणी एकदम डोंगराशी जवळकीचे जोडणारी कात्राबाई, आजोबा, नवरा-नवरी, रवळ्या-जवळ्या अशी. बाकी सह्याद्रीत काही नावे ही एका पेक्षा जास्त डोंगरांना आहेत. भैरवगड हे त्यातलेच. इथून लांबवर दिसणारा हा शिरपुंजेचा, माळशेज उतरून गेल्यावर डावीकडे दिसणारा मोरोशीचा आणि खाली चांदोली अभयारण्यातला असे तीन वेगवेगळे भैरवगड आहेत.

ह्या पठारावर थोडी विश्रांती घेतली. पोटपूजा केली आणि पुढे निघालो. इथून थोडीशीच चढण बाकी होती. परत एकदा झाडीतील नागमोडी वाटेने जात एका छोट्या कातळटप्प्या पाशी आलो. हा टप्पा पार केला की आपण थेट कोकण कड्याच्या पठारावर पोहोचतो. इथे उजव्या बाजूला एक अरुंद सापटी आहे त्यातून चढणे सोपे असल्याने त्यातून अंग चोरत वर चढून गेलो. पाठोपाठ प्रशांत, भूषण आणि श्रीनिधी आले. आदित्य मात्र दुसरी कडून natural holds वर चढून आला. मग जॉन आणि केतनने पण त्याचाच कित्ता गिरवला. इथून कोकणकड्याचा माथा साधारण अर्धा किमी वर आहे. पण अर्धवर्तुळाकार पसरल्याने इथूनही त्याचे दर्शन होते होते. मग उजवीकडे धारेवर जाऊन कोकण कड्याचा विस्तार पहिला. त्याच्या माथ्यावर काही लोक दिसत होते. त्यामुळे त्याची भव्यता अजूनच अधोरेखित होत होती. खरोखरच अद्वितीय म्हणावा असाच हा निसर्गाचा अविष्कार आहे. सुमारे अर्धा किमी परिघाचा अर्धवर्तुळाकार आडवा विस्तार आणि उभा सरळ ४०० meter तुटलेला रौद्रभीषण असा हा कोकणकडा. ह्यावर चढण्याचे धाडस करावे ते वाघाचे काळीज असणाऱ्यांनीच!

John

कोकणकड्याच्या माथ्यावर आलो. इथे भास्करने आमचे दिलखुलास स्वागत केले. भास्कर हा सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला असाच एक गडी. गडावर लोकांचा राबता वाढल्याने त्याने येथे एक छोटेखानी झोपडी बांधली आहे. तेथे तो आणि त्याचे साथीदार पाचनईतून वर येतात आणि गडावर येणाऱ्या लोकांना जेवण, चहा इ. पुरवतात. मुक्काम करायला तंबूची सोय देखील करतात. सुट्टीच्या दिवशी गडावर बरीच मंडळी येत असल्याने त्यांचा चांगला व्यवसाय होतो. कोकणकडा आणि एकूणच ह्या परिसरात होणाऱ्या बऱ्याचशा साहसी climbing / rappelling च्या मोहिमांत भास्कर आणि कमळूमामा ह्यांचा सहभाग असतो. ह्या परिसरातील वाटांची त्यांना अगदी खडा न खडा माहिती आहे. नेहमीच इकडे येत असल्याने भास्करची आणि आमच्या अनुपची चांगलीच मैत्री आहे.

बोलत बोलतच भास्कर च्या झोपड्या पाशी आलो आणि backpacks खाली पाठीवरून सोडवून मस्त झाडाखाली आडवे झालो. लगेचच २-२ ग्लास लिंबू पाणी पिऊन तरतरी आली. मग तिथेच जरा गप्पा गोष्टी करत बसलो. नंतर भास्करकडील पिठले भाकरी, कांदा, झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि प्रशांतने आणलेले पराठे ह्यावर ताव मारला. जेवण झाल्यावर साहजिकच मंडळी आडवे होण्यासाठी जागा शोधू लागली तेव्हा भास्करनेच मागील बाजूला असलेल्या जांभळी खाली जाऊन निवांत पडा असे सांगितले. मग एक-एक करत सगळे जांभळी खाली जाऊन पहुडलो. झाडीतून कुठूनतरी एक तिरीप बरोबर माझ्या डोळ्यावर येत होती. त्यामुळे टोपी तोंडावर ठेवून पडलो. जरा डोळा लागत असतानाच मागील बाजूला कोकणकड्यावर काही मंडळींनी फोटो काढण्याचा उच्छाद मांडला होता. उच्छाद ह्यासाठी कारण फोटो बरोबर त्यांचा जोरदार हल्लागुल्ला सुरु होता. २०-२५ मिनिटे झाली तरी त्यांचा हा उद्योग सुरूच होता. मग सरळ उठलो. बाकीची मंडळी ह्या सगळ्यापासून अलिप्त राहून छान झोपली होती. चालत कोकण कड्यावर गेलो. दुपारचे ऊन जाणवत होते. तिथे मग पूर्ण आडवे झोपून खाली बघत त्याचे रौद्र रूप अनुभवले. तिथून उठून मग तसाच फिरत कोकण कड्याच्या बाजूने जी वाट तारामती कडे जाते त्या वाटेने पुढे जाऊन फिरून आलो. मग परतून भास्कर च्या दारात येऊन बसलो. आत अजून भाकरी थापण्याचे चालूच होते. मग कॅमेरा काढला आणि काही frames घ्यायचा प्रयत्न केला. तास दीड तासाने परत जांभळी खाली गेलो. मंडळी अजून झोपेतच होती. थोडावेळ तसाच सकाळपासून काढलेले फोटो बघत बसलो. एव्हाना ४ वाजत आले होते. एक एक करून मंडळी जागी होऊ लागली.

Sarbat

आता आमच्या खाण्यापिण्याची पूर्ण जबाबदारी भास्कर ने घेतलेली मग दुपारचा चहा तर हवाच! चहा घेतला आणि परत भास्करशी गप्पा गोष्टी करत बसलो. सूर्य कलायला लागला तसे मग सगळे उठून कोकणकड्यावर गेलो. कोकणकड्यावरून सूर्यास्त हा एक अनोखा नजारा आहे. भास्कर चे झोपडे मात्र अगदी मोक्यावर आहे. इथून कोकणकडा समोरच अंगणात असल्या सारखा आहे!

चांगली landscapes मिळवायला golden hour फार महत्वाचा आहे. golden hour म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यांचा अलीकडील आणि पलीकडील काही काळ. ह्या वेळेत सूर्य किरणे तिरपी पडत असल्याने दिवसा सारखी प्रखर नसतात. त्यामुळे उत्तम landscapes ला आवश्यक असा soft light ह्याच काळात मिळतो. landscapes च काय पण कुठल्याही उत्तम छायाचित्राचा प्रकाश हा प्राण आहे. म्हणून तर काहीजण ह्या कलेचा उल्लेख छायाचित्रण असा न करता प्रकाशचित्रण असा करतात. पण वातावरणात haze बरीच असल्याने फोटो काढायला फार काही वाव मिळेल असे वाटत नव्हते. तरी गळ्यातला कॅमेरा स्वस्थ बसू देणार नव्हताच!

हा नजारा पाहायला अपेक्षे प्रमाणे बरीच गर्दी तिथे जमा झाली होती. अगदी महाबळेश्वरच्या ‘sun-set point’ एवढी नसली तरी बरीच गर्दी होती. श्रीनिधी, प्रशांत, भूषण, केतन आणि आदित्य कड्या जवळ गप्पा मारत बसले होते. जॉन त्याचा कॅमेरा घेऊन कुठेतरी अज्ञातात गेला होता. मी कड्या पासून जरा मागे एकटाच थांबलो होतो. सूर्य अस्ताला जाऊ लागला तसे वातावरण वेगळेच भासू लागले. समोर गर्दी असूनही आता त्या गर्दीचा त्रास जाणवत नव्हता. कुठेतरी स्वतःचाच स्वतःशी संवाद घडत होता. कित्येक वेळेला ऐकलेले पूरीयाधनाश्रीचे सूर कानात गुंजत होते आणि मन त्या श्रेष्ठतम निसर्गापुढे नतमस्तक होत होते. अशा काही निवडक क्षणांचे जगणे हेच तर जगण्याला खरा अर्थ देते.

shrini

Light ची अपेक्षित साथ नसल्याने मग समोर कड्यावर गप्पा मारत बसलेल्या मंडळींची silhouette घेत होतो. तेवढ्यात श्रीनिधी ने कड्याच्या टोकावर बसून दोन हात पसरून ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ ह्या style मधली pose दिली. अंधार पडला तसे सगळे बसले होते तिथे जाऊन बसलो. भास्करही आमच्या इथे येऊन बसला. मग गप्पा गोष्टीतून त्याने त्याचे अनुभव उलगडले. भास्करचे समोरच्याशी संवाद साधायचे कौशल्य अगदी त्याच्या व्यवसायाला पूरक आहे. त्याच्याशी बोलून इथले जनजीवन, येथील प्राणी, दुर्गम वाटा, इथे झालेल्या साहसी मोहिमा ह्याबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यातच ह्यावर्षी पावसाळ्याच्या आधी कोकणकड्यावरून एका राजस्थानच्या तरुणाने मारलेल्या para-jump ची माहिती मिळाली आणि कमळू मामांनी त्याचा थरारक video पण दाखविला. कोकणकड्याशी निगडीत अशा बऱ्याच साहस कथा आहेत.

भास्कर उठून त्याच्या कामाला गेला. इकडे आमच्या गप्पा सुरूच होत्या. ८ च्या सुमारास तो परत आला ते जेवायला यायचे आमंत्रण घेऊनच. आम्ही पण मग गर्दी व्हायच्या आत जावे म्हणून त्याच्या बरोबरच निघालो. मस्त भाजी भाकरी आणि भात आणि जोडीला कांदा, ठेचा होताच. बाहेर भास्कर चे साथीदार तंबू जोडत होते. कोकणकड्यावर मुक्कामी ४०-५० तरी लोक असावेत. जेवण झाल्यावर परत कोकणकड्यावर गप्पांचा फड जमविला. जेवण झाल्याने हवेत गारवा जाणवत होता. गप्पात मग उद्याचा plan नक्की केला. ७:३० ला आवरून निघायचे आणि बैलघाट-साधलेघाट मार्गे दुपार पर्यंत बेलपाड्यात पोहोचायचे असे ठरले. कमळू मामा सोबत असणारच होते. रात्र चढत होती तसा गारवा पण वाढत होता. तंबूत आलो आणि sleeping bag उलगडून आत शिरलो. पडल्या पडल्या लगेच झोप लागली.

सकाळी जाग आली तेव्हा केतन बाहेरून सगळ्यांना उठवत होता. उठून बाहेर आलो तोपर्यंत ७ वाजले होते. तोपर्यंत आदित्य चहा घेऊन आला. आता आवरून निघायचे होते. पण त्या आधी मुख्य प्रश्न होता तो म्हजे एवढ्या गर्दीत गडावर आडोसा शोधणे !! आदित्यने कोकण कड्याच्या बाजूने पुढे चालत जाऊन मस्त निर्मनुष्य जागेचा शोध लावला आणि हा प्रश्न सोडवला. आवरून निघे पर्यंत ८:३० वाजलेच. भास्करकडे भरपेट नाष्टा झालाच होता पण तरीही त्याने वाटेत खायला म्हणून बरोबर पोळ्या आणि ठेचा बांधून दिला. त्याचा निरोप घेऊन कमळू मामांबरोबर निघालो.

बैलघाटाची वाट ही गडाच्या साधारण उत्तरे कडून खाली उतरते. चालताना समोर कलाडगड, घनचक्कर, कात्राबाई दिसत होतेच. मामांनी एकदम मळलेली वाट सोडून झाडीत घुसून कुठून तरी short-cut ने आम्हाला थेट बैलघाटाच्या तोंडाशी आणले. ह्यामुळे २०-२५ मिनिटे तरी वाचली असावीत. बैलघाटाची वाट मोठ मोठ्या खडकांवरून खाली उतरते. पण नळीच्या वाटे सारखे अवघड patches इथे नाहीत. पण मोठ्या खडकांतून उतरताना गुडघ्यांचा कस लागत होता. ही वाट खरोखरच फक्त बैलांसाठीच योग्य आहे असेही क्षणभर वाटून गेले. पूर्वीच्या काही ट्रेक्स मधील अनुभवावरून डाव्या गुडघ्याला support साठी knee-cap सकाळीच चढवलेली होती. तरीही गुडघ्याने हळू हळू आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. ह्या वाटेने उतरताना तटबंदीचे काही अवशेषही पाहायला मिळाले. साधारण १.५ तासात बैलघाटाची वाट संपवून साधले घाटाच्या पठारावर आलो. येथे वस्ती फारशी नाही. पठारावर आल्यावर एका झाडाखाली बसून भास्करने दिलेली शिदोरी आणि आमच्या बरोबर असलेले काही खाद्यपदार्थ ह्यांचा फडशा पाडला आणि साधले घाटाच्या दिशेने चालू लागलो. इथून साधारण वायव्येला २ किमी वर साधले घाट सुरु होतो.

bailghat

बैलघाटाच्या वाटेतील तटबंदी

पठारावरून चालत जाऊन झाडीतून छोटीशी चढण चढून साधले घाटाच्या तोंडाशी आलो. थोडेसे उतरून पुढे गेलो तर अप्रतिम दृश्य दिसले दोन डोंगरांच्या मधून उतरणारी अरुंद तीव्र उताराची वाट आणि समोर लांबवर पसरलेला कोकणचा परिसर.

sadhaleghat

साधले घाटाची सुरुवात

इथे वाराही मस्त होता. आज जवळपास १००० मीटर्स उंची आम्ही उतरणार होतो. त्यातील अजून २/३ उतरण बाकी होती. त्यामुळे सगळे पटपट उतरत होते. सगळ्यात पुढे केतन होता. गुडघ्याची कुरकुर आता पावलागणिक वाढत होती. डाव्या गुडघ्यावर फार ताण येणार नाही ह्या बेताने उतरणे सुरु होते. थोडे पुढे जाऊन सगळे जण वाटेत एका ओढ्यापाशी थांबले. तिथे विश्रांती साठी जरा टेकलो. तिथे फुलपाखरे बरीच होती. त्यांचे फोटो काढण्याचे काही निष्फळ प्रयत्न झाले. थोड्या विश्रांती नंतर निघालो. गुडघ्याने आता पूर्ण असहकार पुकारला होता. पण निरुपाय होता. अजून ३०-३५% अंतर बाकी होते. कधी एकदा उतार संपून सपाट प्रदेश लागेल असे झाले होते. अशावेळी एकवेळ डोंगर चढणे परवडले पण उतरणे नको असे वाटते. शेवटी एकदाचा सपाटीवर आलो. मग निवांत पणे चालत बेलपाड्याकडे निघालो. इथून बेलपाडा साधारण २ किमी वर आहे. गावात प्रवेशतानाच भात सडणीची कामे सुरु असलेली दिसली. मग मी आणि जॉन त्याचे फोटो काढावेत म्हणून जरा थांबलो. प्रशांत ने लगेच ‘एवढ्या ‘harsh light’ मध्ये portraits काढताय?’ अशी encouraging (!) टिप्पणी केली.

bhatsadani

मामांच्या घरी पोहचलो तर पुढे आलेली मंडळीं नदीवर डुंबायला निघाली होती. ट्रेक वरून दमून भागून आल्यावर गार पाण्यात मस्त डुंबायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. नदीवरून डुंबून येऊन मामांकडे भाजी-भाकरी खाल्ली आणि पुण्याकडे निघालो.

गाडीतून परताना डावीकडे परत कोकणकडा दिसत होता दोन्ही हात पसरून जणू तो 'पुन्हा या बर का' असे अगत्याने म्हणत होता. त्याच्या कडे बघून मनात एक परिपूर्तीची भावना उमटली आणि वाटले इतका अट्टाहास करायचा तो ह्यासाठीच !!

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Nov 2014 - 6:48 pm | प्रचेतस

अप्रतिम.
फोटो अजून हवे होते.

बाकी तो साधले घाट नसून सादडे घाट आहे. घाटात अर्जुनसादड्याची झाडे भरपूर असल्याने त्याला सादडे घाट हे नाव पडले. त्याचाच कधीतरी 'साधले' असा अपभ्रंश झाला.

सह्यमित्र's picture

28 Nov 2014 - 11:01 am | सह्यमित्र

धन्यवाद. फोटो कमी टाकले आहेत खरे. माझा ह्या मागचा दृष्टीकोन फोटोमुळे वर्णनाचे महत्व कमी होऊ नये हा होता. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन. बाकी सादडे हे मूळ नाव आहे हे परिचित आहे. पण लिहिताना साधले जर बरे वाटले म्हणून लिहिले.

चौकटराजा's picture

27 Nov 2014 - 6:56 pm | चौकटराजा

खरे तर सर्वच फोटो मस्त आहेत. सरबताचे दुकानाचा फटू छान पण खास म्हणजे खळ्याचा. अगदी आपल्या समोर घडते आहे असा ! बाकी वर्णन ही चांगले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2014 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त थरार!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2014 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्स्स्स्स्त्त्त्त्त्त !

यसवायजी's picture

27 Nov 2014 - 8:11 pm | यसवायजी

भारी. डेंजर हाय एकदम..

कंजूस's picture

27 Nov 2014 - 8:27 pm | कंजूस

फारच आवडले.

बॅटमॅन's picture

27 Nov 2014 - 11:05 pm | बॅटमॅन

बाब्बौ!!!! एक नंबर जबराट अण्भव.

आमचा काश्मीर ट्रेक आठवला. कुठेतरी भटकले पाहिजे आता.

मुक्त विहारि's picture

28 Nov 2014 - 12:16 am | मुक्त विहारि

उत्तम लिहीले आहे...वाक्या-वाक्याला ट्रेकिंगचा अनुभव घेत होतो....

बाद्वे,

आमचा पण डावा गुडघा ऐन वेळी वाटी सरकवतो आणि मग त्यामुळे आमची पण कवटी थोडी सरकते.असो तसे आपण दोघेही ह्याबबतीत समदू:खीच आहोत, म्हणाना...

सह्यमित्र's picture

28 Nov 2014 - 11:04 am | सह्यमित्र

अगदी बरोबर बोललात :-)

वेल्लाभट's picture

28 Nov 2014 - 10:37 am | वेल्लाभट

खलास वर्णन ! फोटो टाकण्यात कंजूषी का केली हो? असो.
सुरेख. वाचत वाचत ट्रेक झाला. थर्रारक.

सह्यमित्र's picture

28 Nov 2014 - 11:02 am | सह्यमित्र

माझा ह्या मागचा दृष्टीकोन फोटोमुळे वर्णनाचे महत्व कमी होऊ नये हा होता. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन.

किसन शिंदे's picture

28 Nov 2014 - 12:01 pm | किसन शिंदे

जबरदस्त झालाय हा ट्रेक, दोन्ही भाग आत्ता एकत्रच वाचून काढले.

चाणक्य's picture

28 Nov 2014 - 5:50 pm | चाणक्य

झकासच. मजा आली

या जन्मी काही असा थरारक ट्रेक करणे शक्य नाही,अशा अामच्यासारख्यांना तुम्ही घर बसल्या सुरेख वर्णन आणि फोटो टाकून तो थरार अनुभवायला दिलात.मजा अाली वाचायला!

मोहनराव's picture

28 Nov 2014 - 10:10 pm | मोहनराव

थरारक अनुभव!! _/\_

एस's picture

28 Nov 2014 - 10:26 pm | एस

मस्त लेख आणि वर्णन.

आनंदराव's picture

29 Nov 2014 - 6:56 pm | आनंदराव

शब्दातीत
क्यामेरा आणिलेन्स कोणते जरा सांगाल का

सह्यमित्र's picture

1 Dec 2014 - 6:21 pm | सह्यमित्र

Camera : Nikon D3100

Lenses: Nikkor f/3.5-5.6 18-55mm VR
Nikkor F/4-5.6 55-200mm VR
Nikkor f/1.8 50mm

बरं मग सादडे घाटाने मी जाऊ शकतो का ?

सह्यमित्र's picture

1 Dec 2014 - 6:18 pm | सह्यमित्र

अवश्य जाऊ शकता.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2014 - 7:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

जाम भारी वाटले राव..फेब्रुवारीच्या आत १-२ ट्रेक करायलाच हवेत.

शेखर बी.'s picture

4 Dec 2014 - 12:29 pm | शेखर बी.

फार सुन्दर लिह्ले आहे...

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2014 - 9:36 pm | चौथा कोनाडा

एक नंबर ! वाचताना स्वतः ट्रेकिंग करतोय असा छान फील येत होता.

सखी's picture

7 Dec 2014 - 4:40 am | सखी

वर्णन आणि फोटो मस्त!

मनिमौ's picture

7 Dec 2014 - 7:25 pm | मनिमौ

फार बर वातल वाचुन.