कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला - माझा मिपावरील श्री गणेशा

दिप्स's picture
दिप्स in भटकंती
23 Nov 2014 - 6:38 pm

नमस्कार मंडळी,
आज मिपावर माझा पहिला लेख टाकताना खूप आनंद होत आहे. खर तर काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा जुन्या जाणत्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन करावे हि विनंती.

गेली जवळपास दिढ वर्ष मी मिपाचा नियमित वाचक आहे. तेव्हा वेगवेगळ्या विषयावरचे एक से बढकर एक लेख वाचताना वाटायचं आपण हि प्रयत्न करून बघावा. आता तो योग जुळून आला आहे, परवा माझा वाढदिवस झाला त्यावेळी केलाला एक संकल्प कि - बाकी काही नाही तरी प्रवासवर्णन लिहावे. तर मग करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया!

गेल्या दिढ वर्ष्यात मिपावर बरीच प्रवासवर्णन वाचली (मी इस्पिकचा एक्का सरांचा खूप मोठा पंखा आहे), ट्रेकिंग च्या मोहिमा बघितल्या पण कर्नाल्याविषयी वाचनात आल नाही तेव्हा जरा वेगळ्या ठिकाणाविषयी लिहिताना बर वाटतंय.

मी आणि माझा मित्र राहुल जो कि सदा न कदा कुठ न कुठ फिरत असतो याने राजमाचीला नाईट ट्रेकिंग चा प्लान बनवला होतो पण बाकीचे कुणी तयार होईनात तेव्हा ठरलं कि दोघच जाऊ कुठ तरी जवळ वन डे ट्रेक ला आणि कर्नाळ्याचा प्लान फिक्स केला. कर्नाळा हे मुंबई - गोवा हायवे वर पनवेल पासून १३ किलोमीटरवर आहे.

आम्ही ऐरोली, नवी मुंबईकर. त्यामुळे ऐरोलीहून सकाळी ६.२८ ची लोकल पकडून पनवेलला गेलो. पनवेल रेल्वे स्थानकापासून पायी १० मिनिटावर पनवेलच बस स्थानक आहे. तिथून अलिबाग किंवा पेनकडे जाणार्या बस कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेट वर सोडतात.

1

ट्रिपला सुरुवात करण्यापूर्वी काही उपयुक्त माहिती जाणून घेवूया –
तेथील मुख्य आकर्षण १) अर्थातच पक्षी अभयारण्य २) घनदाट जंगल ३) थम्ब्स अप च्या आकाराचा डोंगर आणि त्यावरील छोटासा किल्ला.
पक्षी अभयारण्य दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत सुरु असते. ऑक्टोबर ते एप्रिल हा चांगला काळ आहे भेट देण्यासाठी. पक्षी निराक्षणासाठी आभाळ निरभ्र असलेल चांगल.

कर्नाळा किल्ल्याचा थोडा इतिहास –

2

सकाळी १० च्या सुमारास आम्ही गेटवर पोहचलो. तेथे प्रत्येकी तीस रुपयाच तिकीट काढावे लागते, जर तुमच्या बरोबर प्रोफेशनल क्यामेरे असतील तर त्याची सेप्रेट फी द्यावी लागते आणि हो जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेऊन आला असाल तर तुम्हाला ओळखपत्र दाखवाव लागत.

गेटवरच अभयारण्याचा मोठा नकाशा लावला आहे तो बघून आम्ही सुरुवात केली.

3

उजवीकडून आत मध्ये गेल्यावर पक्ष्यांचा आवाज ऐकू येवू लागला पण एकही पक्षी दिसेना. बरीच हौशी मंडळी मोठमोठ्या दुर्बीण, क्यामेरे घेऊन आले होते, त्यांच्याकडील फोटो पहिले. पण आमच्या मोबाईल क्यामेर्यावर काही दिसेना तेव्हा म्हणल कमीत कमी आवाज तरी रेकॉर्ड करावा. त्याचा हा एक प्रयत्न –

पक्ष्यांचे आवाज

आम्ही पायवाटेने जसजस आतमध्ये गेलो तशी वाट गायब होत गेली. थोड पुढ गेल्यावर आम्हाला एक गाईड भेटले, त्यांनी सांगितली कि हा रस्ता किल्ल्यावर जात नसून न्यचरल ट्रेलचा भाग आहे जो कि खास पक्षी निरक्षणासाठी आहे.
न्यचरल ट्रेल-१,

4

न्यचरल ट्रेल-२,

5
न्यचरल ट्रेल-३,

6

न्यचरल ट्रेल-४,

7

तसं पण ह्या उंचच उंच झाडांवरती दुर्बिनाविना आम्हाला काही दिसत नव्हते म्हणून आम्ही माघारी फिरून डावीकडून किल्ल्याची वाट धरली. गेटपासून किल्ल्याचं अंतर जवळपास २.५ किलोमीटर आहे, तास-दीड तास लागतो किल्ल्यावर जायला. निम्म्यापर्यंत चढण जराशी अवघड आहे पण नंतर पुढे रस्ता सरळ आहे.

हळूहळू वर जाताना मला सारखं माथेरानमध्ये फिरत असल्यासारखे वाटत होत पण एक फरक होता कि इतर ठिकाणापेक्षा हे पर्यटनासाठी वेल म्यानेजड वाटलं (ठिकठिकाणी पक्षी निराक्षणासाठी मचाण उभारली आहेत, प्रसाधनगृहे आहेत) आणि माथेरान मध्ये एखाद्या बागेतून फिरल्यासारख वाटत पण इथे एक प्रकारचा वाईल्ड फील येतो. इथे झाडांवर मोठमोठी कोळ्यांची जाळी आहेत (ती पण आमच्या क्यामेर्यात आली नाहीत).

वाळवीची /मुंगळ्याची घरटी,

8

वारूळ,

9

जंगली मशरुम,

10

झाडावरील बांडगुळची नक्षी,

11

दगडांवरील शेवाळाची रांगोळी,

12

झाडांच्या मुळांचा गुंतावळा

13

आणि हो हा झोका

15

अजून काही फोटोज –
फुलपाखरू १,

16

फुलपाखरू २,

14

पाथ टू हेवन,

17

आमचा फराळ,

18

ह्याने आम्हाला नाष्टा नाही करून दिला,

19

डोंगरावरील देवीच देऊळ,

20

पनोरमा,

21

किल्ला १,

22

किल्ला २,

23

किल्ला ३,

24

किल्ला ४,

25

कर्नाळा माची,

26

कर्नाळ्याची स्फिंक्स,

27

आमची आवडती जागा.

28

बर्याच वेळा आपण फोटो काढायच्या नादात मूळगोष्ट विसरतो कि फोटो हे दुसर्यांना दाखवण्यासाठी असतात, जे काही आहे ते आपण आपल्या डोळ्यात साठवून घ्यावं. इथं आम्ही २-३ तास बसलो होतो, मस्त गार वारा सुरु होता. तिथं असलेल्या शांततेचा आणि समोरच्या निसर्गाचा आम्ही मनमुराद आस्वाद घेतला. त्यावेळी एकदमच मनात आल कि फोटोप्रमाणे हे क्षण पण साठवता आले तर किती बर होईल. पण शेवटी ३.१९ ची लोकल पकडायची होती म्हणून नाईलाजाने उठून याव लागल.

खाली एक गेस्ट हाउस आहे तिथे जखमी पक्षी उपचारासाठी ठेवले आहेत आणि सर्व प्रकारची (फुलझाड, फळझाड आणि शोभेची झाड) छोटी रोपटी विक्रीस ठेवली आहेत. तेथेच महिला बचत गटाचे एक छान कॅन्टीन आहे, तिथ आम्ही हातपाय धुवून पुन्हा एकदा ताजतवान झालो परतीच्या प्रवासासाठी आणि मुंबईतल्या कलकलाटासाठी.

तर असं हे मुंबईकरांसाठी जवळ असलेले एक वेगळे, शांत आणि वेल ३ इन १ ठिकाण. नक्की भेट द्या आणि हो लेखनाविषयी मार्गदर्शन करावे हि विनंती.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

23 Nov 2014 - 6:42 pm | दिपक.कुवेत

मिपावर स्वागत. कर्नाळा अभय अरण्यात एकदाच लहानपणी शाळेची ट्रिप गेली होती त्यानंतर काय जाणं झालं नाहि. छान लिहिलं आहेस. असाच लिहिता रहा. पण ते तेवढं फोटो मात्र दिसत नाहियेत.

दिप्स's picture

23 Nov 2014 - 6:48 pm | दिप्स

मी गूगल ड्रेववरून फोटोची लिंक दिली आहे. कृपया मदत करा.

सुहास झेले's picture

23 Nov 2014 - 7:02 pm | सुहास झेले

फोटो अपलोडसाठी हा धागा वाचा - मदत -मिपावर फोटो चिकटवणे

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2014 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही पेस्ट केलेल्या लिंक्स चुकीच्या पद्धतीने टाकल्या आहेत.

उदा. पहिल्या चित्राची लिंक...

अशी आहे... https://drive.google.com/file/d/0B9ru4b6Ik-9eenpPbW4tMzdqMVU/view?usp=sh...

त्याऐवजी ती पुर्ण डिस्प्ले केलेल्या चित्रावर राईट क्लिक करून "कॉपी लिंक अ‍ॅड्रेस" करून पेस्ट करा. तसे केल्यास ती अशी असेल... https://lh4.googleusercontent.com/5lpA4zKt0-dDCQr_XTLm8Q61ZxvAOESUG2IiqI...

आणि ते चित्र असे दिसेल...

दिप्स's picture

23 Nov 2014 - 11:10 pm | दिप्स

तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे पेस्ट केल्यावर फोटोज दिसू लागलेत.धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2014 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मला अजूनही फोटो दिसत नाहीत. तुमच्या गुगलफोटोतल्या अल्बमचे अ‍ॅक्सेस पर्मिशन "पब्लिक" करा.

दोन चार फोटोंच्या लिंक मला व्यनी करा बघतो जमतं का

कर्नाळ्याचे भटकंतीचे लेख नाहीत -कारण माहीत नाही. प्रवेशासंबंधीची माहिती उपयुक्त आहे तिची तारीख टाका. इकडे नियम सारखे बदलत असतात.

पैसा's picture

23 Nov 2014 - 8:31 pm | पैसा

मिपावर स्वागत! लिहायला मार्गदर्शन वगैरे काही नकोय, चांगलं लिहिताय. फोटो पण आवडले. थोडे दुरुस्त केलेत. बाकीचे हळूहळू करते. फोटो जास्त चांगले कसे काढावेत याबद्दल इथले लोक सांगतीलच!

गुगलपेक्षा फोटेबकेटची लिंक बरी पडते. अर्धा ओळीची असते जेमतेम. अकाउंट फ्री आहे.

कंजूस's picture

23 Nov 2014 - 11:17 pm | कंजूस

नाही दिसत फोटो अजून.

संजय क्षीरसागर's picture

24 Nov 2014 - 12:31 am | संजय क्षीरसागर

करा कुणी तरी मदत.

खटपट्या's picture

24 Nov 2014 - 12:32 am | खटपट्या

माझा अजूनही गणेशाच आहे.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2014 - 12:40 am | मुक्त विहारि

मिपावर लिहीते झालात, ह्या बद्दल अभिनंदन.

आणि

फोटो टाकायला पण जमेल.बिंधास्त रहा....

मुक्त विहारि's picture

24 Nov 2014 - 8:05 am | मुक्त विहारि

तसेही "श्री गणेशाचे" नांव घेतल्याने, तो पण प्रसन्न झाला आणि आमचा "गणेशा" झाला.

पण

संपादकांनी त्यांचे काम केलेले दिसत आहे.

फाईल नेम चा प्रोब्लेम होता.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 6:44 am | मुक्त विहारि

होता हय...

हमकू वही काम करनेके लिये बहूत वेळ लगा था...

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2014 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

छाण!

प्रमोद देर्देकर's picture

24 Nov 2014 - 11:09 am | प्रमोद देर्देकर

दिप्स तुमचे मिपावर स्वागत. आणि वाढदिवसाच्या दिवशी खुप छान संकल्प केलात. चांगलं लिहित आहात. येवुद्या अजुन.

दिप्स's picture

24 Nov 2014 - 11:37 am | दिप्स

पूर्ण वीकेंड खर्ची पडला फोटो अपलोड करण्याच्या नादात. सर्वांचे आभार.

प्रचेतस's picture

24 Nov 2014 - 11:41 am | प्रचेतस

छान लिहिलंय.
डोंगरावरील देवीच्या देवळात दुर्गा आणि महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती दिसताहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2014 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

आत फोटो छान दिसत आहेत.

सुंदर निसर्गसहल झाली तुमची. कर्नाळ्याच्या बाजूने अनेकदा प्रवास झाला आहे पण अभयारण्यात जाण्याचा इच्छा असूनही योग आलेला नाही. तुमच्या लेख आणि फोटोंच्यामुळे त्याचे दर्शन झाले. धन्यवाद !

दिप्स's picture

24 Nov 2014 - 5:08 pm | दिप्स

धन्य झालो.

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2014 - 12:47 pm | प्रसाद गोडबोले

कर्नाळा माझा एक अत्यंत आवडता किल्ला ! ( तुम्ही सोप्प्या वाटेने गेलात असे दिसत आहे , दुसरी वाट जास्त चढावाची अन जंगलतुन जाणारी आहे १ )
बाकी कर्नाळ्याचे नाव काढले की आजही जैत रे जैत अन गोनिदांची आठवण आल्याशिवाय रहत नाही !

मस्त लिहिले आहे, आणि फोटो पण मस्त आलेत.

बाकी आमचीही ऐरोली - कर्नाळा ट्रीप आठवली. पाण त्यावेळेस खाले पक्षी अभयारण्यात पक्षी नाहीत , ते तेथुन काही कारणाने हलविले आहेत अशी पाटी होती.. बरेच दिवस झाले त्याला.

सुधांशुनूलकर's picture

24 Nov 2014 - 3:43 pm | सुधांशुनूलकर

मिपावर स्वागत. लिहीत राहा.

कर्नाळा हे फार सुंदर, आवडतं अभयारण्य. अगदी लहानपणापासून तिथे जातोय. आता मिपा संपादक किसन शिंदे यांच्या खास आग्रहावरून डिसेंबरमध्ये जायचा विचार आहे, बघू या जमतंय का...

माझ्या अनुभवानुसार, तिथे डिसेंबर-जानेवारीमध्ये जायचं. भल्या पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास चढायला सुरुवात करायची. आपण थोडे वर जाईपर्यंत पक्षी हळूहळू जागे होत असतात. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख असते, ते काळजीपूर्वक ऐकून, identify करून त्यांचा माग काढता येतो. डिसें.-जाने. या काळात तीन-चार तासांच्या भटकंतीत आम्ही ४०-४५ जाती बघितल्या आहेत. कारण, स्थलांतर करणार्‍या अनेक जाती थंडीमध्ये इथे दिसतात. त्याशिवाय अनेक कीटक, साप आणि मुंगूस वगैरे सस्तन प्राणीही दिसतात. मात्र, महत्त्वाचं एक पथ्य म्हणजे, आपण आपलं तोंड बंद ठेवायचं.

पुलेशु.

निखळानंद's picture

24 Nov 2014 - 6:13 pm | निखळानंद

तुमचा कर्नाळ्याचा कार्यक्रम ठरला की इथे लगेच कळवा.. तुमच्या बरोबर यायला आवडेल !

सुधांशुनूलकर's picture

25 Nov 2014 - 4:37 pm | सुधांशुनूलकर

जायचं ठरलं, तर नक्कीच कळवीन.

@किसन शिंदे - २५ तारखेचं आताच सांगता येत नाही, दोन-तीन दिवसात सांगतो.

सर्वांचाच
सुधांशुनूलकर

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 6:43 am | मुक्त विहारि

नक्की तारीख ठरली की सांगा.

आमच्या मध्यवर्ती डोंबोलीतील मिपाकर तयारच आहेत.

आणि

जमल्यास फेब्रुवारीत पण एखादी ट्रिप आखू या....

कृपया तारीख ठरली की कळवा.

च्या मारी माचा परम मित्र किस्ना मिपा संपादक कधी झालाय माहितीच नाही मला.

किसन शिंदे's picture

25 Nov 2014 - 9:49 am | किसन शिंदे

नुलकर काका २५ ला जमतंय का पहा.

कर्नाळा भटकंती ठरल्यास मलाही कळवा.

रुस्तम's picture

12 Dec 2014 - 1:06 pm | रुस्तम

कर्नाळ्याच काही ठरलं का ?

बाळ सप्रे's picture

24 Nov 2014 - 4:10 pm | बाळ सप्रे

छान फोटो.. खूप वर्षापूर्वी पाहिलाय कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य .. हे पाहून परत एकदा जावसं वाटतयं !!

दिप्स's picture

24 Nov 2014 - 5:09 pm | दिप्स

सगळ्यांचे खूप खूप आभार.

निखळानंद's picture

24 Nov 2014 - 5:45 pm | निखळानंद

पहिला प्रयत्न छानच !
लिहित रहा. आपले अनुभव share करत रहा.. शुभेछा ..

किसन शिंदे's picture

25 Nov 2014 - 9:48 am | किसन शिंदे

छान केलीये भटकंती! तुम्ही आता दिड वर्षापासून वाचताय, त्यामुळे २०११ चा हा लेख तुमच्या वाचनात आला नसावा. :)

बहुगुणी's picture

26 Nov 2014 - 1:41 am | बहुगुणी

कर्नाळ्यावर दोन चांगले धागे पहायला मिळाले. (दोन्ही धाग्यांत बर्‍याच दृश्यांमध्ये एकत्व जाणवलं...)

हुकुमीएक्का's picture

28 Nov 2014 - 10:26 pm | हुकुमीएक्का

छानच आहेत फोटो. वृतांत देखील आवडला. कर्नाळा मधील फोटो प्रथमच पाहिले. फोटोग्राफीसाठी छान ठिकाण आहे. माझी एक ट्रिप नक्की होणार कर्नाळ्याला. आपण काढलेला Panorama खुपच आवडला. फोटो एकदम मस्त आलाय. *smile*

दिप्स's picture

30 Nov 2014 - 12:18 pm | दिप्स

धन्यवाद.

मी आज आपटा मार्गे कर्नाळयाला चढून नंतर नेहमीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडच्या वाटेने उतरलो मार्ग:रेल्वेने-आपटा स्टेशन-चालत गुळसुंदा-अकलुडवाडी-ठाकरवाडी-किल्ला-परत-अभयारण्य प्रवेशातून बाहेर-बसने-पनवेल-.
आणखी एक सोपीवाट रसायनीकडूनही आहे.आज प्रचंड उकडत होते .
फोटो काढले उत्सुकता असेल तर लिहितो.

मुक्त विहारि's picture

4 Dec 2014 - 1:51 am | मुक्त विहारि

लिहाच...

नक्की लिहा आणि सगळे फोटो टाका

ओ काका,रसायनीकडून कर्नाळ्याला वाट जाते? डोळे पांढरे केलेली स्मायली!!!मला सतरा वर्षात माहिती नाही.आपटा,गुळसुंदा,अकुळवाडी,किल्ला माहिती आहे.परत आलात आमच्या भागात की दाखवा वाट!

काल मी वरच्या खिंडीत होतो तेव्हाच चार तरूण(गाववाले) खालून वर आले आणि पलीकडे माझ्याबरोबरच उतरले त्यांना तारा गावात जायचे होते त्यांनी सांगितले रसायनी रे स्टेशन कडून पोसरीची वाडीतून चांगली वाट आहे.एक तास लागतो.
मी आपट्याकडून वर गेलो आणि खर्च रू पंधरा :):) आला. रसायनी कडून परत आलो असतो तर सवापाचची रोहा दिवा पुन्हा मिळाली असती आणि पनवेल-डोंबिवली बस ने ट्राफिकचे अडीच तासांचा त्रास झाला नसता.
चांगली थंडी पडल्याशिवाय जाऊ नका.

अच्छा,रसायनी रेल्वे स्टेशन!त्याचा रसायनीशी काही संबंध नाही!!जुनी पोसरी भाग तो.पुढे जाऊन आपट्याच्या वाटेलाच लागेल बहुतेक रस्ता.एकाच मार्गावर आहेत.मला वाटलं गावातुन उजव्या बाजूला सतत कर्नाळा दिसतो,तिथे मागुन वाट आहे की काय.

आज सकाळपासून माझे फोटोबकेट अकाउंट गंडतय खटपट करतोय तोपर्यँत वर्णनच लिहून टाकतो अगोदर.

मॅक's picture

5 Dec 2014 - 5:59 pm | मॅक

खुपच छान.....

बॅटमॅन's picture

12 Dec 2014 - 5:15 pm | बॅटमॅन

एकच नंबर!!!! कर्नाळा पाहणे आले आता.

तदुपरि- अर्नाळा नामक किल्लादेखील आहे ना? की त्या नावाचे गाव आहे?

किसन शिंदे's picture

12 Dec 2014 - 5:40 pm | किसन शिंदे

अर्नाळा वसईमधले एक गाव आहे.

बॅटमॅन's picture

12 Dec 2014 - 5:40 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद.

विरारच्या पूर्वेला डोंगरावर जिवतानी देवी ,पश्चिमेला (१०किमी)अर्नाळा गाव ,समुद्र किनारा आणि पाण्यात थोडे आत अर्नाळा किल्ला आहे इकडे जाऊ नका कारण शहर

अच्छा, म्हणजे नुसते गावच नाही तर त्या नावाचा किल्लादेखील आहे तर. धन्यवाद.

कारण शहरातले लोक जिथे बघायला जातात तिथे गावातले लोक XXयला जातात.

श्रीगुरुजी's picture

14 Dec 2014 - 1:09 pm | श्रीगुरुजी

कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे असे म्हणतात. वरील सगळ्या प्रकाशचित्रात एकही पक्षी दिसत नाही. मी काही वर्षांपूर्वी कर्नाळा अभयारण्यात गेलो होतो. २-३ तासात पक्षी तर सोडाच एकाही पक्ष्याचा साधा आवाज सुद्धा आला नाही.

रानपक्षी हे काही बगळे नाहीत गाइबैलांच्या मागे फिरणारे. ते मनुष्याचा वावर टाळतात. कावळा चिमणी सारखे वस्तीकडेही येत नाहीत. ही खरी पाखरे.