मित्रा

तुषार जोशी's picture
तुषार जोशी in जे न देखे रवी...
23 Oct 2014 - 1:16 pm

मित्रा मी पहिला श्वास घेतला
तेच महानगरात
आणि.. तू पहिला श्वास घेतलास
गावात... शेतात.
मग मी कधीतरी शब्दांच्या प्रेमात पडलो
तसाच तू ही या शब्दांच्या प्रेमात पडलास
आता मी माझ्या शब्दांमधे
महानगर ओततोय
आणि तू गाव ओढे आणि शेते.
मी कधीतरी एखादी
रानाची, पानाची शेताची कविता लिहेनही
पण तिच्यात तितका दम नसेल
तो उत्कटपणा नसेल जो तुझ्या कवितेत सापडेल
तू ही कधी शहर लिहिलेस
तर तितके खोल उतरणार नाही.
पण मला तुझ्या रानातल्या कविता हव्या आहेत
मला कदाचित कधीच न मिळणारे काही अनुभव
मी तुझ्या शब्दांच्या सफारीत अनुभवेन
तुलाही महानगराची सहल माझे शब्द घडवतीलच
मी लिहित राहतो माझे महानगर
आणि त्यातले गुंते कवितांमधे
एक सांगू .. आपली विश्वे वेगळी असली ना
तरीही आपल्यातले विकार तेच आहेत रे
तुला संघर्ष आहेत.. ताण आहेत
तसेच मला वेगळ्या पद्धतीने .. पण आहेतच रे
आपले भाव वेगळ्या शब्दात उतरतील
पण उत्कटता तीच असेल
तू गावराणी शब्द घेऊन ये
जे मला माहित नसतील.. पण मी समजून घेईल
मी महानगरी शब्द आणतो..
पण आपल्यात जो
जिंवंतपणाचा अंश आहे ना तो
अजिबात वेगळा नाही.. तोच आहे
जो उत्कटतेची परिसीमा गाठायला लावतो.
तू लिही गावचे अनुभव
मला तुझ्या शब्दात बसून
ते जगता येतील
मी कधीच गावात जाऊन राहणार नाही
मी कधीच शेतातले चांदण्यात न्हाणार नाही
जसा देह मिळतो
तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला
मी माझे महानगर स्वीकारले आहे
पण मला तुझे शेत तुझे रान पण हवे आहे
तुझ्या शब्दातून.. तुझ्या अनुभवातून.. विकसित होण्यासाठी
मी महानगराचा इतिहास लिहितो
माझ्या अनुभवातून..
मित्रा..
तू तुझ्या गावच्या शब्दातच लिहिणे थांबवू नकोस..
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १० ऑक्टोबर २०१४, २२:३०

कविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 2:07 pm | पाषाणभेद

सालं आज दिवाळी सण असूनही कामाला जुंपलेलो असल्याने,

अन ठिक हाय गावाकल्ड्या भाशेमदीच लिवीन म्हंतो पुन्यांदा, क्काय?

बहुगुणी's picture

24 Oct 2014 - 9:16 am | बहुगुणी

मी या लिखाणाला काव्य न म्हणता कदाचित मुक्तक म्हणेन, पण भावना ज्या सहजतेने मांडल्या आहेत ती सहजता खूप आवडली.

जसा देह मिळतो तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला हे खासच!

विवेकपटाईत's picture

24 Oct 2014 - 10:09 am | विवेकपटाईत

भावना आवडल्या.

अब मै राशन की कतारो मे खडा नजर आता हु
अपने खेतो से बिछडने की सजा पाता हु.

एस's picture

24 Oct 2014 - 4:23 pm | एस

कविता आवडली!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Oct 2014 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

छान!

सस्नेह's picture

25 Oct 2014 - 7:51 pm | सस्नेह

भावना पोचल्या.