काही आवाज.. हरवलेले....

विक्रान्त कुलकर्णी's picture
विक्रान्त कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Oct 2014 - 12:41 pm

वैज्ञानिक संकल्पनेनुसार आवाज म्हणजे कंपनलहरी असतात व आपल्या कर्णपटलावर आदळल्यावर मेंदू त्याचा अर्थ लावतो व आपल्याला नादाचा बोध होतो. मात्र काही आवाज हे आपल्या मन:पटलावर नाद म्हणून टेपरेकॉर्डरच्या टेप सारखे कायमचे कोरलेले असतात, जे आपण केव्हाही रीवैंड करून ऐकू शकतो. त्यालाच आपण आठवणी म्हणतो. अशाच कांही हरवलेल्या आवाजाच्या आठवणी.
माझे लहानपण मुंबईतील विक्रोळी या कामगार बहुल उपनगरात गेले. दिवसाच्या ठराविक वेळी ठराविक येणारे आवाज ऐकतच आमचा दिवस उजाडत असे व संपत असे. ते आवाज व ती ठरलेली वेळ इतकी मनात पक्की बसली आहे कि आजही तसा एकादा आवाज ऐकला कि बरोब्बर ती वेळ डोळ्यासमोर उभी राहते. किंबहुना ती वेळ सोडून जर आवाज ऐकू आला तर आजही मनावर ओरखडा उमटल्यासारखे वाटते. आमच्या आजूबाजूला सर्वसाधारण पणे मध्यमवर्गीयांची वस्ती होती. आजूबाजूच्या बिल्डींगमधील जवळपास सर्व जणांचा दिनक्रम व आयुष्यक्रम हा सारखाच होता. सगळ्यांचे आयुष्य हे चाकोरीबद्ध होते. आयुष्य हे साधेसुधे, सरळ व सोपे होते. आयुष्यात फार काही वेगळे घडत नव्हते आणि वेगळे घडण्याची काही शक्यताही नव्हती. त्या चाकोरीबद्ध आयुष्यातील टिपिकल मध्यमवर्गीय आवाजाच्या आठवणीचा हा कोलाज आजही समोर उभा राहतो.
आमचा दिवस पहाटे दुधाच्या गाड्यांचा आवाज, पाव-अंडी विकणाऱ्याचे हाकारे, पहिल्या पाळीवर जाणाऱ्या कामगारांच्या चपलांचा किंवा आपापसातील बोलण्याचा आवाज यांनी सुरु व्हायचा. सगळ्यात पहिल्यांदा दुधाच्या गाडीचा आवाज आसमंतात दुमदुमत असे. त्यावेळी दुध हे फक्त आरेच्या दुध केंद्रावर मिळत असे. खासगी डेअऱ्याचे दुध मुंबईत मिळत नव्हते. दुधासाठी लायसेन्स असे व दुध अर्धा लिटरच्या बाटल्यांमधून मिळे. दुध गाडी आल्यावर एकच गलका उडत असे. दुधाच्या बाटल्यांनी भरलेले मोठ मोठे ट्रे उतरविण्याची लगबग व खरेदी करणार्यांची एकच धांदल उडे. कारण दुध नेहमी मागणी पेक्षा कमीच यायचे. हाजीर तो वजीर या न्यायाने दुध वाटप होत असे. काही लोक घरपोच दुध देण्याची सेवाही द्यायचे. त्यासाठी बाटल्या ठेवायचे स्टँड असायचे. ते स्टँड एका ढकलगाडीवर लादलेले असायचे व त्या ढकलगाडीचा खडखड- खडखड असा आवाज यायचा .मला आठवते आमच्याकडे सुध्द्धा एक, दोन बाटल्या ठेवायचा स्टँड होता आणि अॅल्युमीनियमच्या पत्र्याचे दुधाचे लायसेन्स सुद्धा होते. हे घरपोच विक्रेते दुध वाटताना दारावरची कडी किंवा बेल वाजवून मोठ मोठ्याने “दूध दुध” असे ओरडायचे. दुध केंद्रापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या परिचयाचा हा पहिला आवाज. दुधाची लगबग संपल्यावर एक पाववाला यायचा. त्याच्याकडे नरम, ताजे बेकरीतील पाव असायचे व अंडी सुद्धा असायची. तो बिचारा एकसुरी साद द्यायचा “पाववाला”, “पाववाला”. साधारण पणे याचवेळी घरोघरी पहिल्या पाळीवर जाणाऱ्या कामगारांच्या अंघोळीची व इतर तयारीची घाई सुरु व्हावयाची. पहिल्या पाळीचे कामगार कधी एकेकटे किंवा गटागटाने कामावर जायला बाहेर पडत. पहाटेची शांतता त्यांच्या आपापसातील बोलण्याने व चपलांच्या आवाजाने अधिकच गडद होत असे. हा कामगारवर्ग बाहेर पडला कि मग घरोघरीच्या शाळा-कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुला-मुलींची लगबग सुरु होई. मुला-मुलींचे एकमेकांना घातलेले हाकारे, आपापसातील थट्टा-मस्करी, घोळक्याने गप्पा मारत जाणे यांनी सकाळ मोठी प्रसन्न वाटत असे. यानंतर घरोघरी पेपर टाकणारी मुले येत. पेपर कडीला अडकवून कडी किंवा बेल जोरात वाजवायची त्यांची पद्धत होती. त्यांच्या आवाजाने घरोघरी बऱ्यापैकी जाग यायची.
या नंतर थोडी शांतता पसरे. दरम्यान रेडियोवर मराठी प्रादेशिक बातम्या लागत. चाकरमानी चहाचा आस्वाद घेताना या बातम्या चवीने ऐकत. मग एकदम सकाळी आठच्या सुमारास एक केळीवाला व केव्हातरी एक मिठवाला येत असे. केळीवाला काहीसा हेल काढून ‘केल्येऽऽ“ असे ओरडायचा. त्याच्याकडे केळी मला आठवतेय त्याप्रमाणे एक ते सव्वा रुपये डझन या भावाने मिळत आणि डझनात घासाघीस करून दोन केळी वाढविली जायची. मिठवाला “मीऽऽठवाला-मीऽठ” असे ओरडत हातगाडीवर किंवा डोक्यावर मीठ घेऊन विकत असे. याच्याकडे शक्यतो खडे मीठ असायचे व हा भाईंदर वरून येत असे. घरोघरी गृहिणी एव्हाना स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. कुकरच्या शिट्ट्या, फोडण्याचे आवाज, लहान मुलांच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज, रेडियोवरील जाहिराती – गाणी यांनी घरोघरीचे वातावरण भरलेले असायचे. जाहिरातींमध्ये लाईफबॉय, चारमिनार सिमेंटचे पत्रे, फोरहँन्स टूथपेस्ट, फिनोलेक्स पाईप्स या अगदी सुपर-डुपर हिट होत्या. केळीवाला व मिठवाला पाठोपाठ मुंबईचा डबेवाला यायचा. पहिल्या पाळीवर गेलेले कामगार आणि ऑफिसात जाणारे चाकरमानी यांची कारभारीण आपल्या धन्यासाठी निगुतीने बनविलेला स्वयंपाक डब्यात भरून डबेवाल्याकडे सुपूर्द करताना डबा नीट नेण्याची सूचना आवर्जून करीत असे. हे डबेवाले एका लांबलचक हातगाडीवर तितक्याच लांब असलेल्या ट्रे मध्ये डबे लादून नेत असत. त्या हातागाडीचा एक विशिष्ट असा खुडखुड आवाज यायचा. त्या आवाजाच्या अंदाजाने घरोघरी डबे तयार ठेवले जायचे.
आता दिवसाला वेग यायचा. वेगवेगळ्या आवाजांचा कोलाहल वाढायचा. बरोबर नऊ वाजता भोंगा वाजायचा. भोंगा वाजला कि निम्मी सकाळ उलटल्याची वर्दी मिळायची. ऑफिसेसना जाणारे चाकरमानी घराघरातून बाहेर पडत व एकेकटे किंवा घोळक्याने स्टेशनच्या दिशेने चालू पडत. या सुमारास आमच्या समोरच्या बिल्डींगमधील एक टेम्पोवाला त्याचा टेम्पो सुरु करत असे. त्याच्या टेम्पोचा घरघराट सगळा परिसर दणाणून टाकत असे. डबेवाल्यापाठोपाठ कोळीणी यायच्या. त्यावेळी मासे विक्री कोळीणी घरोघर जाऊन करायच्या. भय्या लोकं मासेविक्रीत अवतीर्ण व्ह्यायची होती. तर या कोळीणी मस्त एका लयीत, सुरात “म्हावरेवाली” अशी साद घालायच्या. कोणी वरून विचारले कि काय काय आहे ? तर हि खालून ओरडायची ,” सुरमई बांगडा कोळमी” केव्हा त्यात पापलेट, मांदेली, रावसाची सुद्धा भर पडायची. घेणाऱ्या गिऱ्हाइकाला माल पसंत पडला तर मग पुढची घासाघीस सुरु व्हावयाची. कोळणीच्या वेळेच्या आसपास एक म्हातारा भाजीवाला यायचा. ह्या म्हाताऱ्याकडे मात्र शक्यतो पालेभाजी असावयाची. हि पालेभाजी तो टोपलीतून विकत असे. हा म्हातारा क्वचित केव्हा तरी “भाजीऽऽऽयेऽऽ“ असे ओरडायचा. पण याची ठरलेली गिऱ्हाइके असल्यामुळे घरोघरी जाऊन भाजी विकत असे. त्याच्याकडे आंबट-चुका, चाकवत, करडई, चंदन बटवा यासारख्या आजकाल बघायला सुद्धा न मिळणाऱ्या भाज्या असत. एक कांदे-बटाटेवाला सुद्धा यावेळी यायचा. तो आपला साधी सुधी “कांदे बटाटे” अशी आरोळी ठोकायचा. हातगाडीवर कांदे बटाट्यानी भरलेले पोते असायचे. त्यातून कांदे बटाटे निवडून घ्यावयाचा शिरस्ता होता.
सुट्टीच्या दिवशी या वेळेपावेतो मुलांचा क्रिकेटचा गेम रंगात यायचा. त्यांचा तो आऊट, क्लीन-बोल्ड वगैरे वगैरे आवाज रस्तोरस्ती ऐकू यायचा. मैदाने लांब असल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे सगळे खेळ हे रस्त्यावरच खेळले जायचे. रस्त्यावर फारशी वाहने सुद्धा नसत. याच सुट्टीच्या दिवशी एक रद्दी पेपरवाला यायचा. त्याच्या हातात एक ‘भोपू’ असायचा. त्यातून तो “पो-पो” असा आवाज काढायचा. बाजारात त्याचे रद्दी पेपरचे दुकान होते. त्या दुकानाचे नाव पण मजेशीर होते, “पो-पो रद्दीपेपरवाला”. टी.व्ही.च्या उदयानंतर रविवारी सकाळी ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, मॅजीक लँप यासारख्या बोअर करणाऱ्या कार्यक्रमानंतर एक जबरदस्त कार्यक्रम लागायचा. ”साप्ताहिकी”. बहुतेक वेळा भक्ती बर्वे सादर करायची. या कार्यक्रमासाठी रस्ते, बाजार ओस पडायचे.मुलांचे खेळ तात्पुरते बंद पडायचे. कार्यक्रम काय असायचा तर पुढील आठवड्यात टी.व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती. पण सर्व आबालवृद्ध अगदी डोळ्यात तेल घालून व कानात प्राण आणून हा कार्यक्रम पहात व ऐकत असत. सुट्टीच्या दिवशी विशेषत: रविवारी घरातील इतर सर्व व्यवहार मात्र संथ व सुशेगात असायचे.
एक ‘बुढ्ढीके बाल’ म्हणजे ‘म्हातारीचे केस’ विकणारा भय्या यायचा. काचेची चौकोनी पेटी असायची. त्यात हे म्हातारीचे केस ठेवलेले असायचे. हा भय्या ओरडायचा वगैरे नाही. मात्र त्याच्या हातात एक घंटा असायाची. ती घंटा तो एका तालात वाजवत जायचा. लहानपणी हे म्हातारीचे केस खाऊन बघायची इच्छा खूप व्हायची. पण ते चांगले नसते असे आपले उगाच केलेले संस्कार आडवे यायचे. असो. साधारण यावेळेस एक पिंजारी त्याच्या खांद्यावरील साधनाचा टणात्कार करीत यायचा. हा पिंजारी घरातील गाद्यांमधील कापूस पिंजून नीट-नेटक्या करून देत असे. पुढे मागे केव्हातरी पौराणिक-ऐतिहासिक कादंबऱ्यातील ‘धनुष्याचा टणात्कार’ हा शब्द वाचला कि पिंजाऱ्याच्या त्या आयुधाचा टणात्कार आठवायचा. केव्हातरी याचवेळी एक फिनाईल-साबण विकणारा एक फिरता विक्रेता यायचा. पांढरे शुभ्र कपडे असायचे. लेंगा-सदरा असा वेश असायचा. दोन हातात दोन मोठ्या पिशव्या घेऊन तीन तीन माळे चढून हा साबण, फिनाईल, पावडर वगैरे विकायचा. हा सुध्द्धा ओरडायचा वगैरे काही नाही. पण घरोघरी जाऊन काय हवे ते प्रसन्नपणे व हसतमुखाने विचारायचा. बहुधा गुजराती असावा. पण मराठी मात्र सुरेख बोलायचा.
यावेळेपर्यंत घरोघरची बायकांची कामे उरकलेली असायची. थोडासा निवांतपणा आलेला असायचा. सकाळी अकरा वाजता रेडियोवर “कामगार सभा” लागायची. त्यात मराठी गाणी लागायची. त्यानंतर “आजचे बाजारभाव” हा एक भन्नाट प्रकार असायचा. मला त्यातील अमका माल इतका आला हे सांगताना वापरल्या जाणाऱ्या ‘आवक’ या शब्दाची मोठी गंमत वाटायची. त्यानंतर घरोघरी वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लागायचा. त्याचे शीर्ष संगीत अजूनही आठवते. या निवांतपणाचा फायदा घेण्यासाठी याचवेळेस बोहारणी यायच्या. “भांडीवाली” म्हणून साद घालायच्या. मला आठवते कि त्यावेळी बोहारणीकडे स्टीलच्या भांड्यापेक्षा हिंडालियमची जास्त असत. हिंडालियम म्हणजे बिर्लाची हिंदुस्थान अॅल्युमिनीयम असावी असा माझा कयास आहे. बोहारणी बरोबर घासाधीस करण्यात पण बायकांचा मस्त टाईमपास होत असावा. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास एक आईसफ्रूटवाला यायचा. त्याच्या पेटीसारख्या हातगाडीवर मस्त लाल पिवळ्या रंगाची आईसफ्रूट मिळायची. दुपारच्या उन्हात विशेषत: उन्हाळ्यात ती आईसफ्रूट खायला खूप मजा यायची. हा सुद्धा ओरडायचा वगैरे नाही. घंटा वाजवत यायचा. यानंतर मात्र अगदी शांतता पसरत असे. घरोघरी बायका-मुले वामकुक्षी घेत. या शांततेचा भंग परत दुधाची गाडी करीत असे. दुपारी दुधाची गाडी यायची. ज्यांना सकाळी दुध मिळाले नाही किंवा जे सकाळी दुध घेत नसत ते दुपारी दुध घ्यायचे. जशी पहाटे धांदल असायची तेवढी जरी नसली तरी बऱ्यापैकी असायची. दुपारी सुद्धा काहीजण घरपोच दुध द्यायचे. त्या आवाजाने काहीजणांची झोप चाळविली जायची.
दुपार कलती झाली कि घरोघरी चहाची तयारी सुरु व्हायची. नुकतेच आलेले किंवा सकाळी आलेले दुध तापायला ठेवले जायचे. त्यावेळी बऱ्याच घरात दुधासाठी कुकर असायचे. त्याच्या शिट्यांचा आवाज जोरात येत असे. पहिल्या पाळीतील कामगारही एव्हाना घरी परतलेले असायचे. संध्याकाळच्या सुरुवातीला एक गजरेवाला यायचा. “गजरे वास्वाले” “मोगरे वास्वाले” असे तो ओरडायचा. त्याच्या टोपलीत मोगरा, बकुळी, अबोली असे गजरे असायचे. याच सुमारास एक चणेवाला यायचा. मोठ पोते पाठुंगळी मारलेले असायचे. त्यात चणे, कुरमुरे, खारे शेंगदाणे वगैरे असायचे. चनाऽऽऽ सिंगदानाऽऽऽ असे काहीसे तो ओरडत असे. लहान मुले चणे, सुकी भेळ वगैरे घ्यायची. एव्हाना शाळा सुटायची वेळ झालेली असायची. संध्याकाळी सहाच्या सुमारास एक स्कूल बस यायची. त्याचा तो घराघराट आणि क्लीनरने बस थांबविण्यासाठी किंवा सुरु करण्यासाठी बसच्या पत्र्यावर मारलेली “ठक-ठक” अशी थाप शाळेतून मुले परतल्याची वर्दी द्यायची. आता आवाजामध्ये खेळणाऱ्या मुलांचा आवाज वाढू लागतो. क्रिकेट, लगोरी, आट्या-पाट्या यांचे डाव बिल्डींगसमोरील मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर रंगायचे. यात केव्हातरी आबाधुबी, डब्बा-ऐस-पैस, दगड का माती, काठी उडी, शिगरूपी असे अस्सल बम्बय्या देशी खेळ रंगायचे. खेळ जसा रंगायचा तसा आवाज टिपेला जायचा. मुली दोरीच्या उड्या, काचापाणी असले काही तरी खेळायच्या. खेळताना मधूनच चीत्कारल्या सारख्या किंचाळायच्या. लगोरी खेळताना मधूनच ‘लगोरी-लगोरी’ची ललकारी, लपंडाव खेळताना ‘डब्बा-ऐस-पैस’ची आरोळी, दगड का मातीच्या वेळी ‘आम्ही तुमच्या दगडावर किंवा मातीवर’ असे आव्हान जोरजोराने दिले जायचे. सगळ्या आवाजांचा मिळून एक नाद्गुच्छ तयार होई. या नाद्गुच्च्छात आनंदी, रडके, भित्रे, धाडसी, भसाडे, चीरके, सुरेल, बेसूर, अशा विविध आवाजांची नाद गुंफण असे. हा नाद गुच्छ एका ‘निरागस बालपणाच्या’ घाग्याने घट्ट बांधला होता. हळू हळू दिवे लागणी होई.
घरोघरी रात्रीच्या जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होई. कुकर शिट्ट्या मारू लागे. खेळणाऱ्या मुलांना बोलावले जाऊ लागायचे. ज्यांच्या घरी, अर्थात अशी घरे फार थोडीच होती, टी.व्ही. असायचा त्यांच्या घरी ‘आमची माती आमची माणसे’, कामगार विश्व’, ज्ञानदीप यासारख्या कार्याक्रमांची शीर्षक गीते वाजू लागायची. घरातील उपस्थित मंडळी त्या कार्यक्रमातील ‘मनोरंजनाचा’ आस्वाद घ्यायची. काही घरात संध्याकाळचा परवचा, शुभं करोती, पाढे याचा आवाज यायचा. आम्ही रहायचो त्याशेजारील इमारतीमधून एका लयीत वाजत असणाऱ्या झांजांचा ‘छन-छन-छ’ - ‘छन-छन-छ’ असा खूप छान आवाज येऊ लागे. हळूहळू रस्त्यावर सामसूम व्हायची. कामावरून परतलेले घरातील कर्ते पुरुष हात-पाय धुऊन फ्रेश होऊन घरातील मुलांना अभ्यासावरून, परीक्षेतील मार्कावरून व इतर कोणत्याही शिस्तभंगाच्या कारणावरून फैलावर घेत. वेळप्रसंगी धोपटण्याचा, रडण्या-ओरडण्याचा आवाजही आसमंतात विहरत असे. टी.व्ही. च्या आगमनानंतर मात्र रविवार संध्याकाळ टी.व्ही. वरील हिंदी चित्रपट पहाण्यात जायची.
साधारणपणे याचवेळी एक भेळवाला भय्या त्याची हातगाडी घेऊन घंटा वाजवत यायचा. पांढरे शुभ्र धोतर, सदरा, तोंडात पानाचा तोबरा त्यामुळे बोलणे कमी व हातवारेच जास्त. त्याच्या गाडीवर उजेडासाठी एक पेट्रोमॅक्सची बत्ती असायची. मधून मधून तिला पंप मारुन उजेड वाढवावा लागायचा. त्या पेट्रोमॅक्सचा पण एक प्रकारचा “सू-सू” असा आवाज यायचा. बाकी गाडीवर आवाज म्हणजे डबे, पातेली यांच्या झाकणांचा आवाज, ओळी-सुकी भेळ कालवण्याचा ढवळण्याचा आवाज बस्स बाकी काही नाही. कोणताही आवाज नसताना भेळवाला भय्या आलेला आहे हे लोकांना कळते कसे हे मला कित्येक वर्षे न उलगडलेले कोडे होते.
इकडे घरोघरी जेवणाची वेळ होत आलेली असायची. टी.व्ही. नामक ब्रह्मराक्षस घरोघरी नसल्यामुळे पाट-पाणी घेऊन घरातल्यांची अंगत-पंगत बसायची. दिवसभरातील घडामोडी, इतर फुटकळ घटनांवर-बातम्यांवर चर्चा होऊन जेवणे उरकली जायची. जेवण संपायच्या सुमारास काही भिकारी यायचे. “भाकर वाढाहो मायेऽऽऽ“ अशी आर्त साद ते घालायचे. घरोघरी शिल्लक राहिलेल्या अन्नावर ते बिचारे अवलंबून असत. ते अन्न जमा कधी करीत असतील आणि जेवत कधी असतील ? असा प्रश्न मला पडे. भोजनोत्तर घरोघरी एक ठरलेला कार्यक्रम असे. रेडियोवरील ‘आपली आवड’ हा गाण्यांचा कार्यक्रम किंवा ‘पुन्हा प्रपंच’ सारख्या श्रुतिका यामाध्ये कुटुंब रंगून जात असे. यानंतर जवळपास सगळ्या घरी झोपायची तयारी सुरु होई. लहान मुले तर केव्हाच झोपी गेलेली असायची. याचेवेळी “कुल्पीयेऽऽऽ“ अशी आरोळी ऐकू येई. हे कुल्फीवाले लाल डगले, खाली पांढरे धोतर, करकर वाजणाऱ्या चामडी वहाणा, डोक्यावर पांढरी टोपी व त्यावर कुल्फीचे टोपले अशा थाटात येत असत. हे सर्व कुल्फीवाले पुण्याजवळील भोर परिसरातील असायचे. त्यांच्या कडची कुल्फी काडीला टोचून किंवा स्वच्छ हिरव्या पानांवर कापून मिळे. विशेषत: उन्हाळ्यात या कुल्फीवाल्यांच्या “कुल्पीयेऽऽऽ“ या आरोळीतच एक प्रकारचा थंडावा मनाला मिळायचा.
आमच्या बिल्डींगच्या मागे हायवे होता. दिवसा-रात्री केव्हाही मोटारी-ट्रकचे टायर फुटत असत. विशेषत: रात्री टायर फुटण्याचा आवाज भयानक आणि भीतीदायक वाटे. तो स्फोटासारखा आवाज रात्रीची शांतता चिरत जात असे. एरवी हायवे वरील वाहनांचा घुरघुर असा आवाज येत असे. याच दरम्यान दुसऱ्या पाळीचे कामगार गटागटाने घरी परतत असत. तोच तो त्यांचा चिरपरिचित चपलांचा आवाज व आपापसातील बोलण्याचा आवाज घेऊन मावळलेला दिवस काळाच्या पोतडीत गडप व्हायचा.
काळ बदलला, मुंबई बदलली. मला असे नेहेमी वाटते कि प्रत्येक काळाला स्वत:चा असा एक आवाज असतो. काल बदलला कि आवाजही बदलतो, आवाजाचा पोत बदलतो. काळाबरोबर आवाजही संपतात, हरवतात. काळ आपल्या पोटात माणसांबरोबर त्यांचे आवाजही सामावून घेतो. आपल्या हातात उरतात त्या फक्त काळाच्या आणि काळाबरोबर हरवलेल्या आवाजाच्या आठवणी.

समाज

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

22 Oct 2014 - 12:52 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच.......

पुलंच्या " काही हरवलेले वास " ची आठवण करुन दिलीत म्हाराज.

एस's picture

22 Oct 2014 - 1:47 pm | एस

अगदी अगदी! भन्नाट उतरलाय लेख. सगळे तसे आवाज कानात घुमायला लागले. त्यातला सगळ्यात आवडता आवाज असायचा 'ए ग्गारेऽऽऽग्गार वाला...'! :-)

विक्रान्त कुलकर्णी's picture

22 Oct 2014 - 1:50 pm | विक्रान्त कुलकर्णी

जयन्त कुलकर्णी, विजुभाउ धन्यवाद.. मिपा वर लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता..

प्रदीप's picture

22 Oct 2014 - 9:24 pm | प्रदीप

अत्यंत सुंदर जमून आलेला आहे. छान, चित्रदर्शी लिखाणातून तुम्ही एके काळच्या मुंबईच्या उपनगरातील दिवसमान, त्यातील तपशीलांसकट आवाजांच्या धाग्यांतून सहज उभे केलेले आहे.

असेच लिहीत रहावे.

अमोल केळकर's picture

22 Oct 2014 - 2:23 pm | अमोल केळकर

सुंदर लेख

अमोल केळकर

अावडला लेख! अावाजांचं जगही हुरहुर लावुन जातं.

कविता१९७८'s picture

22 Oct 2014 - 2:29 pm | कविता१९७८

मस्त

लेखन आवडलं. त्यानिमित्ताने लहानपणी ऐकू येणारे आवाज आठवले. एक जुना लेखही आठवला प्राजुचा!

मस्त लिहिलं आहे! खूप आवडलं.

बोबो's picture

22 Oct 2014 - 8:39 pm | बोबो

लेख आवडला.
माझी आधीची चुकून पडलेली comment काढून टाकल्याबद्दल admin ना धन्यवाद.

vikramaditya's picture

22 Oct 2014 - 9:03 pm | vikramaditya

छान लिहिलेत. अप्रतिम वर्णन.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2014 - 9:18 pm | बोका-ए-आझम

सुंदर! पु.लं.नी पण अशाच स्वरूपाचा ' आवाज आवाज 'असं शीर्षक असलेला एक लेख लिहिला आहे - त्याचं आधुनिक रुप वाटलं! त्याचा शेवट अजून आठवतो - शेवटी आयुष्य म्हणजे आवाज. तोच थांबला तर मग पुढे काय? शांतताच शांतता! काय करायची आहे ती?

इनिगोय's picture

22 Oct 2014 - 9:26 pm | इनिगोय

मस्त गुंफला आहे नादगुच्छ!

यावरून लहानपणी पांढ-या कांद्यांच्या माळा घेऊन एक मराठी गृहस्थ येत असे ते आठवलं. अमाप वजनाचे ते कांदे तो श्रावणबाळाप्रमाणे खांद्यावर लादून घेऊन येत असे. 'कांदेईssssss' असं त्याचं निमंत्रण यायचं..

तसाच अजून एक भय्याजी 'sssइsssक' अशी आरोळी देत येत असे. म्हणजे खरवसाचा चीक. ;-)

मुक्त विहारि's picture

22 Oct 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

आवडला...

हरकाम्या's picture

22 Oct 2014 - 11:25 pm | हरकाम्या

यात एका हरवलेल्या आवाजाचा उल्लेख झाला नाही. " येउन येउन येणार कोण काँग्रेस शिवाय आहे कोण ?"

लेख खूप आवडला. कधीकाळच्या आवाजांबरोबर कित्येक आठवणी रुतून बसलेल्या असतात. मिपावरच आलेल्या evergreen "झिंग थिंग !!" या धाग्यातही अशा काही आवाजांचा आढावा घेतला गेला होता ते आठवलं. आणि मी स्वतः कानसेन कोण या स्पर्धेच्या सुरूवातीला लिहिलेल्या लेखात अशा associative memory विषयी लिहिलं होतं तेही आठवलं.

विक्रान्त कुलकर्णी's picture

23 Oct 2014 - 12:11 pm | विक्रान्त कुलकर्णी

सर्व प्रतिक्रिया दात्यांना त्यांच्या प्रतिक्रियांबाबत धन्यवाद...

पेट थेरपी's picture

23 Oct 2014 - 12:53 pm | पेट थेरपी

सुरेख लिहीले आहे. फार दिवसांनी नेटवर छान वाचायला मिळाले आहे. पलिकडच्या वायफळ चर्चांचा अगदी उबग आला आहे.

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 3:07 pm | पाषाणभेद

कधी कधी हे रस्त्यावरील विक्रेते त्यांच्या भसड्या आवाजाने आपली शांतता, खाजगीपणा यांत अडथळा आणतात.
तुम्ही कधी शिफ्ट ड्युटी केली आहे काय? केली असल्यास मी म्हणतो त्यात किती सत्य आहे ते समजेल.

(आता "गरीब ते विक्रेते, त्यांनी काय घोडे मारलेय, ते कमाई करतात त्यांच्या कष्टाने" असले बोलू नका. दुसर्‍यांना त्रास होतो त्याचे परिमाण बघा.)

आमच्याकडे दुधवाले सकाळी साडेपाचसहापासून त्यांच्या मो.सा. ला प्रेशर हॉर्न लावून त्यांच्या बंदीच्या घरांजवळ आले की जोरात वाजवतात.
आजूबाजूला शाळेच्या मुलांना घेण्यासाठी येणारे रिक्षा काका जोराजोरात मुलांना हाका मारतात.
एक रिक्षावाला तर एफ एम जोरात लावून पुर्ण गल्लीला ऐकवत जातो.
त्यानंतर एक भाजीवाला.
एक कुकर रिपेअर करणारा तर इतक्या घाण आवाजात ओरडतो की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही त्याकडून.
एक भाजीवाली बाई एकदम किनर्‍या आवाजात ओरडते, मेथीये, पालके, शेपूये, गवारे, कोथंबीरेssssss.
सकाळी ६ वाजता एक मटकीवाली बोलते, ए उस्स्स्स्स्स्ये......
एक पाववाला म्हणजे अगदी आपण साखरझोपेत असतांना 'ए पावे..' 'ए पावे..' असे ओरडत जातो. आवाज खुप मोठा अन त्यात अंतरही नाही. आवाज तर इतका मोठा की तो येण्याच्या दोन गल्ल्या अन गेल्यानंतर दोन गल्या आवाज येत राहतो.

असे बरेच उदाहरणे देवू शकेल.

असल्या आवाजांवर कायद्याने बंदी आणली पाहीजे हे नक्की.

माझे म्हणणे इतकेच आहे की त्यांनी विक्री करू नये असे नाही पण ओरडण्यावर काहीतरी तारतम्य हवे हे नक्की.

की चांगला माणूस कुकर रिपेअर कधीच करणार नाही
हा हा हा. काय रे बाबा!
पूर्वी मलाही असेच वाटत असे, जेंव्हा खूप रात्री किंवा सकाळी लवकर हे आवाज ऐकू यायचे तेंव्हा!
भारतातल्या आमच्या बिल्डिंगीखाली (त्यातला एकच फ्ल्याट आमचा आहे, आख्खी बिल्डींग नाही, गैरसमज नसावा) रोज सकाळी एक कॉलेजकुमार त्याची मो. सा. घेऊन येत असे व मित्राला जोरात हाक मारत असे. रोज "ए र्‍हौल (राहूल), .............र्‍हावल्या, हॉर्न हॉर्न......" असे चालू असे.
नंतर एका मुलीची आई आमच्या इमारतीतून दुसर्या इमारतीत राहणार्या आपल्या मुलीच्या मैत्रिणीला हाक मारत असे. "ए प्रेर्णा, ए प्रेर्णा, " असे झाल्यावर प्रेरणाची आई प्रेरणाची अर्धी घातलेली वेणी हातात धरून ब्याल्कनीत येत. बरेच दिवस आईचे नाव प्रेरणा आहे असे मला वाटायचे. "ए, बघ ना हिने पाचवे गणित कसे अर्धे सोडवलेय, आता शाळेची रिक्षा येईल आणि मला आत्ता कळले.............." अशा तक्रारी रोज न चुकता असत.

माझी तक्रार घरगूती आवाजाविषयी नाहीचे. हे जे व्यावसायीक 'मोठे' आवाज आहेत त्या विषयी आहेत.
माझ्याबद्दल गैरसमज नसावा.
लेख छानच आह्रे. आजच पुलंचे पुस्तक काढले पुन्हा वाचायला हा लेख पाहून यातच सर्व काही आले.

पाषाणभेद's picture

23 Oct 2014 - 3:20 pm | पाषाणभेद

त्यात आणखी म्हणजे अगदी पहाटे पाच वाजताच एक पेपरवाला पेपर (दुसर्‍यांकडे) टाकतो अन 'पेपर' ओरडतो.
रात्री गुरखा शीटी तर मारतो त्याचे काही नाही, पण आजकाल ते लोक पाईप वापरतात काठी ऐवजी. अन तो पाईप रस्त्याने घासत चालतात. तो गुरखा तो पाईप रस्त्यावरच्या विजेच्या खांबावर आदळतो. किती मोठा आवाज होत असेल तुम्हीच विचार करा. बरे तो एवढ्यावरच थांबत नाही तर तो महाभाग तो ज्यांच्याकडून जास्त पैसे घेतो त्यांच्या घरांच्या लोखंडी गेटवर तो पाईप आदळतो. मी एकदोन वेळेस त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मै डूटी कर रहा हूं'

अरे या गुरख्यांना कोण सांगतो की तुम्ही आमची काळजी करा म्हणून. बरे व्ह्यायच्या त्या चोर्‍या होतातच. मी एकदा असे पाहीले होते की झालेल्या घरफोडीत गुरखाच सामील होता. अन हे गुरखे म्हणजे नेपाळी नसतात तर ते बिहारी भैटे असतात.

चारचाकी गाड्यांचे रिव्हर्स हॉर्नदेखील त्रास देतात. ते हॉर्न कायदेशीरही नाहीत.

पाळलेले कुत्र्यांचे आवाज शेजार्‍यांना विनाकारण त्रास देतात.

या आवाजांबद्दल बोलले की लोक आपल्यालाच दुषणं देतात. (येथेही कदाचीत तेच होईल.)

असे किस्से आपल्याकडेही होत असतील. आपल्यालाही कदाचीत हा त्रास होत असावा.

एक नॉस्टॅल्जीया म्हणून लेख चांगलाच आहे पण असल्या रस्त्यावरच्या आवाजाचे समर्थन करता येणार नाही.

पाषाणभेद, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. असा आवाज करणाऱ्यां गुरख्याला मी सुद्धा विचारले त्याने त्याची खालील कारणे सांगितली
१. मी आवाज नाही केला तर लोक म्हणतात "कल रात तुमने दांडी मारा. आवाज नही आया तुम्हारा"
२. मै भी आदमी है मुजको भी डर लगता है, अगर कोई चोरी करनेके लिये किधर आया होगा तो वो भाग जाता है. (म्हणजे थोडक्यात चोरांशी मुकाबला करण्याऐवजी ते पळाले तर बरे)
३. रात को साप और चुहे घुमते रहते है. जमीन पार दंडा रगडनेसे वो भाग जाते है.

पाषाणभेद's picture

26 Oct 2014 - 5:59 pm | पाषाणभेद

त्याच्या पहिल्या बोलण्यात तत्थ आहे. लोकच इतके चावट झाले आहेत की तो तरी काय करणार?
'कल दांडी मारा था' असे बोलणारा त्या गुरख्याच्या आवाजाने झोपमोड झाली हा विचार का करत नाही?
बाकी मुद्दे बाद. पोलिस गस्त् घालतात तेव्हा एका ठराविक घराच्या बाहेर डायरी ठेवतात व त्यात नोंद करतात.
ह्या गुरख्यांचे काहीच काम नाही हेच् खरे. दारू पिलेले असतात रात्री ते. मी खुप अभ्यास केला आहे या म्ंडळींचा.

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 1:27 am | तुमचा अभिषेक

आवडला लेख :)

प्रतिसाद म्हणून एक लेखच डकवतो -
हरवलेले आवाज - http://misalpav.com/node/24910

आमच्याकडे दोन-अडीचच्या सुमारास खारी-बिस्कीट, नानकटाईवाला यायचा. दुपारी तीन-साडेतीनच्या च्याबरोबर तसली नानकटाई परत खाल्ली नाही.