तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
20 Jul 2014 - 4:02 pm

तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर शाकाहारींसाठी अगदी कमी पर्याय उपलब्ध असतात. फलाफल किंवा व्हेज डोनर हे नेहमीचेच प्रकार. हा काय वेगळा प्रकार दिसतोय म्हणून मागवला आणि फार आवडला. आपल्या वांग्याच्या भरताचाच भाऊबंद. दह्यातले भरीत म्हणू शकतो. घरी करायला अगदीच सोप्पा वाटला. हा पदार्थ स्टार्टर्स मध्ये मोडणारा आहे. सोबत पिटा ब्रेड किंवा तत्सम प्रकार असतात. पण आपल्या भारतीय जेवणात पोळी भाजी किंवा खिचडी, भात यासोबत साईड डिश म्हणूनही चालतो.

साहित्य:
२ मध्यम आकाराची भरताची वांगी
६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून
थोडासा लिंबाचा रस
अर्धी वाटी घट्ट दही (मूळ पदार्थात ग्रीक योगर्ट वापरले जाते. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको)
चवीपुंरते मीठ
ऑलिव्ह ऑइल
सजावटी साठी कोथिंबीर

https://lh3.googleusercontent.com/-5YJWg5kueao/U8uWiOv7BeI/AAAAAAAADSI/5PM9WE7KLQM/w866-h577-no/DSC_0662.JPG

कृती:
वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा.

थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.

https://lh5.googleusercontent.com/-2-ni7zkHl70/U8uWiH81IvI/AAAAAAAADSE/MPM5jZ0zSXA/w866-h577-no/DSC_0666.JPG

तळटीपा:
१. फोडणीची स्टेप पर्यायी आहे.
२. वाळवलेली पुदिन्याची पाने, कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

20 Jul 2014 - 4:07 pm | स्पंदना

अब मै पयली!!

स्पंदना's picture

20 Jul 2014 - 4:09 pm | स्पंदना

ए! आपल्या भरीता सारखच दिसतय नाही?
करुन पहाते. ऑलीव्ह ऑइल नाही वापरल कधी या आधी. सुंदर फोटोज.

अमेरिकन त्रिशंकू's picture

20 Jul 2014 - 5:28 pm | अमेरिकन त्रिशंकू

याला बाबा घनूज असं पण म्हणतात.

मदनबाण's picture

20 Jul 2014 - 5:38 pm | मदनबाण

आहाहा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- En Uchimandai... :- Vettaikaran

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा हे तर अरेबियन "बाबा गनूश" सारखे दिसतेय... फक्त यात दोन चमचे ताहिनी (बारीक वाटलेले पांढरे तीळ), चिमूटभर धणेपावडर आणि दह्याऐवजी लिंबाचा रस घातला की झाले !

अरेबियन खुबुस (गव्हाची जाड भाकरी) बरोबर बाबा गनूश आणि हुम्मुस म्हणजे जेवणाची युssम्मी सुरुवात !

ओह्हो! भारी दिसतेय. गण्यानं अतिप्राचीन काळी असाच पदार्थ मिपावर सांगितला होता त्याची आठवण झाली.

यशोधरा's picture

20 Jul 2014 - 7:58 pm | यशोधरा

मस्त फोटो! :)

बरचसं बाबा गनुश!! अरबी पार्टीला गेल्यावरचा खाण्यासारखा कधी कधी हाच बरा वेज ऑप्शन असतो !!

मला ही चित्र बघून आधी बाबा गनूश च वाटलं. मला हा प्रकार फार आवडतो आणि याची रेसिपी हवीच होती . मनापासून धन्यवाद :)

मागच्या वेळेला इकडच्या शेगडी वर मागच्या वेळी भरताचे वांगे भाजले आणि एकूण जो काही पसारा झाला त्याचा हरे राम ! ओव्हन मध्ये कसं भाजायचं वांगं ? सरळ मेश वर ठेवलं तर तोच गोंधळ होईल न परत? बेकिंग ट्रे मध्ये ठेवून होईल का ?

स्पंदना's picture

20 Jul 2014 - 10:45 pm | स्पंदना

ग्रील कर ओव्हन मध्ये.
मी एका डीशमध्ये ठेवुन ग्रील करते. एकदा परतते. झाल.

सानिकास्वप्निल's picture

20 Jul 2014 - 9:59 pm | सानिकास्वप्निल

तुर्किश वांग्याचं भरीत आवडलं बरं का :)

मधुरा देशपांडे's picture

20 Jul 2014 - 9:59 pm | मधुरा देशपांडे

पाकृ आवडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. हा पदार्थ बाबा गनुश सारखाच आहे. मूळ पदार्थाचे नाव तुर्किश मध्ये Yoğurtlu Patlican Salatasi असे आहे.
स्रुजा, मी ओव्हन मध्ये भाजताना असे करते. वांग्याला थोडे तेल लावून सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्यायचे. ओव्हन २००-२२० डिग्री वर प्रीहीट करायचा. बेकिंग ट्रे मध्ये वांगी ठेवून ५०-६० मिनिटे ठेवायचे. बेकिंग ट्रे च्या ऐवजी केकचे एखादे पसरट पॅन असेल तर तेही चालेल.

दिपक.कुवेत's picture

21 Jul 2014 - 10:43 am | दिपक.कुवेत

आर यु शुअर?? कारण बहुतेक गॅसवर तेवढा वेळ लागत नाहि....

मधुरा देशपांडे's picture

21 Jul 2014 - 11:58 am | मधुरा देशपांडे

हो. गॅसवर नाही लागत एवढा वेळ पण इथे गॅस नाही ना. :( त्यामुळे ओव्हनला पर्याय नाही. आणि त्यात किमान ४५ मिनिटे लागतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

भरीत अथवा बाबा गनूशसाठी वांगे शिजवायची सोपी (आणि भाजताना होणारा पसारा टाळणारी) पद्धतः

कुकरमध्ये वांगे ठेवून (वांगे पाण्यात तरंगते) अर्धा कुकर भरेल इतके पाणी भरून तीन चार शिट्ट्या घ्याव्या. नंतर कुकर विस्तवावरून बाजूला ठेवून थंड झाल्यावर उघडावा.

कमी वेळ लागतो, पसारा होत नाही, वांग्याची साले सहज निघतात आणि भरीत अथवा बाबा गनूशची चव वांगे भाजून केल्यासारखीच लागते.

वांगी भाजायच्या सगळ्यांच्या टीप साठी धन्यवाद :)

वांगी कुकर मध्ये तुम्ही म्हणता तशी शिजवली तर खरपूस चव येणार नाही ना पण?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2014 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

फटू बगून आनी येकंदर चवीचा अंदाज आल्याव..गरम भाकरी संगाट हानाव,असं वाटाया लागलय.

प्यारे१'s picture

21 Jul 2014 - 1:45 am | प्यारे१

परवा 'रमादान' निमित्त 'रोजा खोलने के वक्त' एकानं स्थानिक पदार्थ आणले होते.
आम्ही गोश्त न खाने वाले. तेव्हा चव चाखायला मिळाली. आवडलं प्रकरण. खुसखुस की रोटी/डंडावाला ब्रेड के साथ. (हल्लीच्या 'शुक्रीटी'वाल्याकडं काठी असते तेवढ्या जाडी, उंचीचा डंडा ब्रेड)

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2014 - 10:03 am | स्वाती दिनेश

चवीला छानच लागते, बाबा गनुशचाच भाउबंद..
छान रेसिपी.
स्वाती

बाबा गनुशात तीळ घालतात.

दिपक.कुवेत's picture

21 Jul 2014 - 10:45 am | दिपक.कुवेत

आणि फोटो. हे अरेबीक भरीत एवढं आवडत नाहि. काहि ठिकाणी त्यात व्हिनेगर घालतात का? कारण खाताना चरचरीत लागतं म्हणुन....

वांगं आणि तेही आंबट वगैरे. काय माहिती! आपल्याला वांगं झणझणीत खायची सवय आहे. ;-)

पण पाकृ मस्त. आणि ते फोटो छानच आले आहेत. विशेषतः काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या प्लेटचा वापर. प्रपेंना दीपक कुवेत यांनी केलेली सूचना तुम्ही अंमलात आणलीय याचा आनंद वाटला...! :-)

पाकृबद्दल धन्यवाद!

छान दिसतय टर्किश भरीत. करुन बघायला पाहिजे.

Maharani's picture

22 Jul 2014 - 9:31 am | Maharani

वा मस्तच .......
मावेमधे full वर ७/८ मिनीटात वांगे भाजले जाते.तेल लावून टोचे मारून ४ मि.१ बाजू.....३/४मि. दूसरी ......तयार..

सुहास झेले's picture

22 Jul 2014 - 1:49 pm | सुहास झेले

जबरदस्त... वांग कुठल्याही फॉर्ममध्ये खायला आवडेल. हे पण ट्राय करायला हवे. मस्त पाककृती :)

यथावकाश करुन पाहणेत येईल.

त्रिवेणी's picture

23 Jul 2014 - 8:25 am | त्रिवेणी

करून बघणार.

अपर्णासारखंच ऑलीव्ह ऑइल नाही वापरलं नाही, करुन बघेण एकदा, फोटो मस्त आलाय.

मधुरा देशपांडे's picture

24 Jul 2014 - 10:33 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे पुनश्च आभार्स. :)