कठीण समय येता कोणही कामास येतो

बुडबुडा's picture
बुडबुडा in जनातलं, मनातलं
13 Jul 2014 - 12:26 am

आपण ज्याला जमेतही धरत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला नेमक्या वेळी कामास येतात आणि मजा येते जगण्याला..आपलचं आपल्याला हसू येत राहतं..
आज सकाळचीच मजा..९.३०चं ऑफिस..घरातच ९.२०वाजलेले..आता अशा घाई गडबडीच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकायला नको म्हणून आवरायची गडबड.. आणि अशावेळी माझं नेहमीप्रमाणे स्वगत चालू. “नशीब आज विकेंड आहे..फोर्मल घालायची गरज नाही..” जीन्स चढवली..बेल्ट लावायला लागलो..आणि ‘कट्ट्’ असा आवाज झाला आणि बेल्टच्या बक्कलची स्प्रिंग तुटून खाली पडली.. “आईचा घो याच्या”. आता आली का पंचाईत.. दुसरी जीन्स धुतलीच नव्हती..आणि आज फोर्मल घालायची इच्छा नव्हती.
काय करावं असा विचार करत असताना भावाच्या बेल्टचं बक्कल कुठतरी पाहिलं असल्यासारखं आठवलं..बरीच शोधाशोध केली.. पण च्यामारी नाहीच सापडलं. आता काय करायचं?? गेल्या काही दिवसात बारीक झाल्यामुळे जीन्स पण घसरत होती. एवढ्यात.. सुतळीनं जीन्स बांधावी आणि वरून नुसताच बेल्ट लावल्यासारखं करावं असा विचार आला.. सुतळी हुडकली, ती पण बिचारी कुठही सापडली नाही.
घड्याळ तर ऑलिम्पिक मध्ये पळत असल्यासारखं वाटत होतं, “अरे आवरा रे त्याला कुणीतरी”. आणि आज उशिरा पोहोचून बॉसचं ऐकून घ्यायचं नव्हतं. “सगळा विकेंड खराब करतो स्साला” असं काहीतरी डोक्यात चालू असतानाच अचानक “युरेका..युरेका”.
समोर दोन रबरं दिसली आणि डोक्यात ट्यूब पेटली.. कुठल्यातरी पुडीला बांधून आलेली नाहीतर आईनं दिलेल्या लाडवाच्या बॉक्सची असणार, पण वेळेवर दिसली हे महत्वाचं.. त्यांची अवस्था पण माझ्यासारखीच दयनीय झालेली दिसत होती. पहिलं घेतलं..बेल्टला दोन वेढे मारून बसवलं, बेल्ट फिट करायला लागलो आणि ते रबर पण तुटलं.. “दुष्काळात तेरावा महिना” दुसरं काय?? आता मात्र आणीबाणीचा प्रसंग होता..“जर दुसरं रबर पण तुटलं तर मात्र फोर्मल शिवाय पर्याय नाही”..सावकाश दुसऱ्या रबरचा वेढा बेल्टला मारला.. आणि तेवढ्याच सावकाशपणे बेल्ट हलकाच लावला. हुश्श..निम्मी लढाई तर जिंकली होती..पण निदान दुकानापर्यंत पोहोचून नवीन बक्कल घेईपर्यंत तरी खिंड लढवायची होती. त्यात पुण्याचे सगळे दुकानदार पेशवेच जणू. अकरा वाजायच्या आधी दुकान उघडतील तर शपथ..“एवढा पैसा कमावून काय अंबानी व्हायचं कि काय राव” असा यांचा तोरा, त्यामुळ अजून तासभरतरी श्वाससुधा जोरात घेऊन चालणार नव्हतं. पण बाकीच उरकून ऑफिसमध्ये पोहोचलो. एरवी, “चार मजले चढायला लिफ्ट कशाला??” असं म्हणणारा मी आज मात्र लिफ्टची वाट बघत थांबलेला पाहून एक दोघांनी विचारलं पण, “इकडं कुठ आज??”. आता काय सांगायचं त्यांना?? “काही नाही असचं..लिफ्ट नीट चालते का ते चेक करतोय..हेहेहे” असं काहीतरी फालतू बोलून सटकलो. कामाला सुरुवात झाल्यावर मात्र एक वाजेपर्यंत काही डोक्यातच आलं नाही पण जेव्हा लक्षात आल तेव्हा मात्र, “अरे..बच्चन सावकाश, फजिती व्हायला वेळ लागणार नाही.. खिशात हात घालूनच चालाव लागेल नाहीतर..” हे जाणवलं. लंचब्रेक मध्ये जेवायच्या आधी दुकानात घुसलो आणि बक्कल घेतलं, तिथच लावलं आणि एकदाची जीन्स घसरती का काय अशी भावना थांबली. आणि नंतर ऑफिसमध्ये शेजारच्या मुलीच्या डोक्यात रबर बांधलेलं बघून माझं मलाचं हसू येत होतं.

शाळेत कागदाचे बोळे, रिफील मारण्यासाठी, बेंचमध्ये अडकवून आवाज काढण्यासाठी; फार तर फार पिशवी, पुडी बांधण्यासाठी वापरलेलं रबर आज माझ्या एवढं कामी येईल, कि अगदी माझी घसरणारी सुद्धा सावरायला उपयोगी पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. कधी, कुठ, कसं आणि कोण आपल्याला सावरेल काही सांगता येत नाही.
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. ;)

मुक्तक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 12:31 am | मुक्त विहारि

आवडले..

खटपट्या's picture

13 Jul 2014 - 12:55 am | खटपट्या

हा हा मस्त !!

स्रुजा's picture

13 Jul 2014 - 1:01 am | स्रुजा

:) :) आवडलं ...

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2014 - 1:11 am | प्रभाकर पेठकर

>>>>कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन.

हे बाकी खासंच, बर का!छ

वाडीचे सावंत's picture

13 Jul 2014 - 11:54 am | वाडीचे सावंत

*mosking*

रेवती's picture

13 Jul 2014 - 3:01 am | रेवती

हा हा हा.

नंदन's picture

13 Jul 2014 - 4:30 am | नंदन

मस्त!

मात्र -

कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. Wink

अमेरिकन विंग्रजीत हे विधान वेगळ्या संदर्भात खरं ठरू शकेल म्हणा :).
(आता या विनोदी निरीक्षणास 'बिलो द बेल्ट' म्हणावं तरी पंचाईत ;))

अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयाचा संदर्भ

रेवती's picture

13 Jul 2014 - 7:13 am | रेवती

अमेरिकन विंग्रजीत हे विधान
अगदी हेच म्हणते! माझ्या प्रतिसादामुळे विषय निघू नये म्हणून फक्त हसत बसले होते. ;)

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2014 - 11:15 am | प्रभाकर पेठकर

हात्तेरे की! म्हणजे माझ्या प्रतिसादातील ठळक वाक्याचा निर्देश कोणाच्या लक्षातच आला नाही म्हणायचा.

बुडबुडा's picture

13 Jul 2014 - 10:23 pm | बुडबुडा

आता काय करणार ??
तुम्ही काढाल तो अर्थ निघणार.. :P शेवटी ज्याच्या त्याच्या मनात काय चालत हे ज्यानं त्यानं बघावं :D

समिर१२३'s picture

15 Jul 2014 - 4:29 am | समिर१२३

मि तर तोच अर्थ धरला होता. म्ह्टले बरे झाले भारताला याच रबर्चि जास्त गरज आहे. न्नतर वाचल्यावर वेगळा अर्थ समजला.

रब्बर ताणून हसवलंत .पुढच्या चांद्रयानात नंबर लावून टाकला तुमचा .एक शंका ,प्रथम पुरुषी एकवचनी लिहिलंत ,प्रथम स्त्रि एकवचनी का नाही ?

मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर ह्या वेगळ्या आयडी आहेत.

रेवती's picture

15 Jul 2014 - 1:16 am | रेवती

हैला! मेले! मी मकी समजून प्रतिसाद दिला होता. तरी म्हटलं बाईसाहेबांना चेष्टा करायची लहर का आलिये!
देवा!

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2014 - 1:20 am | प्रभाकर पेठकर

>>>>मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर ह्या वेगळ्या आयडी आहेत.

अशा साधर्म्य असणारी सदस्य नांवे संपादक मंडळ किंवा जी कांही सक्षम व्यवस्था असेल ती, का बरे स्विकारतात? ह्यातून सामान्य सदस्यांचा गोंधळ होण्याचीच शक्यता जास्त.

कंजूस's picture

15 Jul 2014 - 1:03 pm | कंजूस

आता यापुढे आईडीला ओळखत असलोतरी ओळख ठेवून प्रतिसाद देणार नाही .लेखाच्या मजकुरास योग्य इतकाच प्रतिसाद देणार .

कोणी 'प्रभाकरन पेठकर' नाव घेतलेला बंदूक घेऊन माझ्यामागे लागला तर काय करणार ?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 7:34 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही..ह्ही..ह्ही..! :D

मदनबाण's picture

13 Jul 2014 - 10:01 am | मदनबाण

हा.हा.हा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child

वाडीचे सावंत's picture

13 Jul 2014 - 11:59 am | वाडीचे सावंत

कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन

श्लेष अलंकार चांगला साधलाय :)

लिहायला सुरुवात केलीय हल्लीच..पण तुम्हा सगळ्यांना आवडतंय मी लिहिलेलं..बरं वाटतंय :)
काही चुकत असेल तर नक्की सांगा :)

तुमचं काही चुकलं नाही माझंच चुकलं. तुम्हाला मकी समजले. तरी तुम्ही लिहित रहा. :)

समिर१२३'s picture

15 Jul 2014 - 4:49 am | समिर१२३

रबर-
१. रबर ब्यान्ड= वस्तु एकत्र बान्धण्यासाठि वापरतात तो रबर
२. खोड रबर= पेन्सिल/ पेन नि लिहिलेल खोडण्यासाठि वापरतात तो रबर
३. रबर= लोकसनख्या नियन्त्रणासाठि वापरतात तो रबर - स्ल्य्न्ग / इन्फोर्मल भाषेमध्ये
वाचकान्च्या विचार परिघावर नियन्त्रण नसेल तेथे एक्सप्लिसिट भाषा वापरणे बरे.

संजय क्षीरसागर's picture

15 Jul 2014 - 11:39 am | संजय क्षीरसागर

....सायकलची ट्यूब कापून करतात ते *smile*

तुमच्या आयडीतला अर्धा न बघून कंफ्युजन दूर झालं. मुक्तक जमलंय!!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2014 - 8:41 pm | अत्रुप्त आत्मा

@अर्धा न बघून>>> *mosking* अस्स आहे होय! *mosking*
आता हा न'कार लक्षातच ठेवला पाहिजे. ;)

सविता००१'s picture

14 Jul 2014 - 11:54 am | सविता००१

आवडेश

हा हा हा, लेख तर मस्तच झालाय, शिवाय रबरी कमेंटीही तशाच. ;)

सुनील's picture

14 Jul 2014 - 1:16 pm | सुनील

आवडला!

मागे एकदा बटनाने दगा दिला होता तेव्हा बेल्टने तगवले होते, त्याची आठवण झाली!

गणपा's picture

14 Jul 2014 - 1:26 pm | गणपा

हलकं फुलकं आवडलं

vikramaditya's picture

14 Jul 2014 - 8:10 pm | vikramaditya

वाल्या प्यांटीची इतर बटणे तुटल्यावर उरलेल्या बटणावर येते ती "जबाबदारी"

अनुभव छान लिहिलात.

मराठे's picture

14 Jul 2014 - 9:54 pm | मराठे

लेख चांगला जमलाय... बाकी पुण्यातील पेशवे-दुकानदार वगैरे वाचून धाग्याचं पानिपत नाही झालं म्हणजे मिळवली.

विजुभाऊ's picture

15 Jul 2014 - 5:50 pm | विजुभाऊ

मी पण अगोदर मकीने हा लेख लिहीलाय असेच समजलो होतो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2014 - 9:13 pm | प्रभाकर पेठकर

आता निदान 'मस्त कलंदर' उर्फ मकी ह्यांनी आपले सदस्य नांव बदलावे, अशी विनंती करतो.

ही समस्या आहे खरी, मीही बराच वेळ मकी स्टाईल का वाटत नाही याचा विचार करत होते, वर काहींनी सांगितल्यावर खुलासा झाला. पण नाव बदलुन बदलुन किती बदलता येणार असा प्रश्नही आला, माझ्याच नावाच्या जवळ जाणारे (आणि सखाराम (गटणेचे)) इतके पर्याय आले बघा.
*

बुडबुडा's picture

15 Jul 2014 - 9:50 pm | बुडबुडा

मागच्या वेळी पण हाच लोच्या झाला होता..ज्या कुणाला आयडी बदलण्याचे अधिकार असतील त्यांनी कृपया माझा आयडी बदलावा..लोकांचे गैरसमज तरी होणार नाहीत..आणि मला माझ्या खर्डेघाशीवरचे खरे प्रतिसाद कळतील.

प्लीज नीलकांताला व्य नि करुन तुम्हांला हवा असलेला नवा आयडी कळवून बदलायला सांगावे.

योगविवेक's picture

16 Jul 2014 - 1:15 pm | योगविवेक

अहो मला ही असेच एकदा फिरताना झिपच्या रनरनी दगा दिला ऐनवेळी. करंगळी वरकरून रांगेने उभे रागाने पहायला लागले इतका वेळ का लागतोय म्हणून....
कठिण समयाला वाढवलेले नख कामी आले व वेळ निभावली झालं.