गरुडघरटे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
11 Jul 2014 - 12:16 am

(मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..)

ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी.. त्या बंकर्सचे आता ओबेरसाल्झबुर्ग डॉक्युमेंटेशन म्युझिअम केल्यामुळे दुसर्‍या महायुध्दाच्या काळातल्या अनेक खुणा तेथे जपल्या आहेत.आत गेल्यागेल्या समोर लावलेल्या 'त्याच्या'भव्य फोटोमुळे आपण त्या काळातच पोहोचतो जणू..

.

जुनी वर्तमानपत्रे, फोटो,चित्रफिती ह्या सार्‍यातून तो इतिहास सामोरा येतो. खुद्द बंकर्स पाहताना तर थक्क व्हायला होते. बंकर म्हणजे लपण्यासाठी,आसर्‍यासाठी केलेली सोय ,त्यामुळे मला उगाचच लहानसे जमिनीखाली केलेले बांधकाम असे काहीतरी चित्रं डोळ्यासमोर होते. पण येथे आपल्याला दिसते डोंगराच्या पोटात वसवलेले छोटेसे गावच जणू! जमिनीखाली जवळजवळ सहा मजले उतरुन गेले की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश!काय नव्हतं तिथे?
हे तर मोठ्ठे बंकर्सकाँप्लेक्सच दिसते.यात वेगवेगळी आठ युनिट्स असून त्यातील पाच युनिट्स आतून जोडली आहेत.आतमध्ये सुसज्ज दिवाणखाने, शयनगृहे,भटारखाने,भोजनकक्ष, हमामखाने,कचेरीदालने,वैद्यकियसेवाकक्ष तर आहेतच पण एक कारागृह सुध्दा आहे. टेलिफोनचे जाळे असून ८०० एक्स्टेनशन्स आहेत.वीज,पाणी एवढेच नव्हे तर एअरकंडिशनिंगचीही व्यवस्था केलेली दिसून येते. हवा खेळती रहावी म्हणून मोठमोठ्या पाइप्समधून हवा खेळवली होती त्यातील काही पाइपलाइन्सचे अवशेष त्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.बंकर्सच्या तोंडाशी मशिनगन्स बसवून संरक्षक तटबंदी तयार केलेली आढळते. इटालिअन मार्बल वापरुन तयार केलेला शाही जिना आणि शाही रस्ता पाहताना थक्क व्हायला होते.अर्थात बाँबहल्ल्यात तेथील मार्बल उखडून टाकले गेले आहेत.

. . .

तेथेच आहे कलेक्टिव एअर रेड सेंटर! जर हवाई हल्ले झाले तर सैन्याला एकत्रित आसरा घेता येईल अशी मोठी दालने आहेत.तेथून बेर्गहोफ, गेस्ट हाउस,एस एस गॅलरी इ . ला जोडणारे चोररस्ते आहेत.ती भव्य कल्पकता पाहून थक्क व्हायला होते खरेच!

. .

ह्या डॉक्युमेंटेशनच्या परिसरात गाड्या पार्क करुन त्यांच्या बसनेच वर जावे लागते.जवळ जवळ साडेसहा किमीचा हा डोंगरातल्या वळणावळणाचा हा घाटरस्ता आहे.बस वर जात असताना आपण मात्र इतिहासात रमायला लागतो.मार्टिन बोहरमानने फ्युररच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ह्या अशाअतिशय सुंदर ठिकाणी , उंच,अनवट जागी बांधलेला हा प्रासाद आणि तेथे जाण्याचा डोंगरातून खोदलेला वळणावळणाचा रस्ता अवघ्या १३ महिन्यात बांधून काढला गेला.ह्या सुंदर प्रासादात हिटलर स्वतः फक्त तीन वेळा राहिला. एक तर अतिशय उंचावर बांधलेला हा प्रासाद आकाशातून सहज लक्ष्य करता येईल अशी त्याला भीती वाटे.इव्हा मात्र त्या सुंदरतेची भुरळ पडून तेथे अनेकदा जात असे व राहत असे.एका बाजूला खाली खोल खोल जाणार्‍या दर्‍या तर दुसर्‍या बाजूला डोंगराची उंच उंच शिखरे अशी रौद्र सुंदरता पाहत,अनुभवत थक्क होत आपण भानावर येतो तेव्हा बस पार्क होत असते. अतिशय कठिण चढण आणि टोकावर पार्किंगसाठी केलेली खास जागा हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना समजला जातो.बसमधून उतरत असतानाच आपल्याला परतीच्या बसचे बुकिंग टीहाउसला जायच्या आधीच करुन घ्या अशी सूचना मिळते. अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची खातिरदारी ज्या टीहाउस मध्ये केली जाई.तेथेच आता आपण जाणार आहोत ,एकदम भारी,रोमांचक वगैरे वाटायला लागते.

  .

आता एक मोठ्या बोगद्यातून चालत लिफ्ट पर्यंत जायचे असते. खाड खाड बूट वाजवत फ्यूररची आर्मी एके काळी जेथून गेली त्याच ग्रानाइट लावलेल्या रस्त्याने,त्याच बोगद्यातून चालत आपण लिफ्टपाशी पोहोचतो.चकचकीत ब्रास,हिरवे लेदर आणि व्हेनेटियन आरशांनी सजलेली देखणी ,प्रशस्त लिफ्ट आहे ही..अशा ह्या देखण्या लिफ्टने १२ कामगारांचे बळी घेतले आहेत हे ऐकून उदास व्हायला होतं.. कोणत्याही देखण्या कामगिरीला ह्या अशा हाराकिरीचा शाप असतो की काय?
लिफ्टने वर आले की सुप्रसिध्द केहलष्टाइनहाउस आहे. ग्रेटीचा,इव्हा ब्राउनच्या बहिणीच्या लग्नाचा स्वागतसमारंभ मोठ्या थाटाने तेथे झाला. जेथे अतिमत्त्त्वाचे शाही पाहुणे आदरातिथ्याचा लाभ घेत तेथे आज उपाहारगृह आहे.
ह्याच उपाहारगृहात मुसोलिनीने भेट दिलेली ईतालियन रेड मार्बलमध्ये घडवलेली दिमाखदार फायरप्लेस आहे.
महायुध्दानंतर त्यातील तुकडे सोविनियर म्हणून नेण्यासाठी तिची मोडतोड केली.. पण अजूनही तिचा दिमाख कमी झालेला नाही. तेथे असलेली हिटलरची अभ्यासिका आता रेस्तराँची स्टोअररुम झाली आहे आणि इतर काही दालनांचे संग्रहालय!

आम्हीही त्या शाही रेस्तराँमध्ये आपली आपणच खातिरदारी करुन घेतली.

.

तेथील संग्रहालयातून हिटलरकालीन इतिहासाचे अनेक तुकडे फोटो,लॅमिनेटेड कागद,चित्रफितींच्या रुपात आहेत. बंकर्स पाहताना आणि बसमधून वर येतानाच त्या काळात पोहोचलो होतोच, आता येथील फोटो आणि माहिती पाह्त त्यातच किती वेळ रमलो.बाहेरील अंगणातून परत परत डोंगराच्या कुशीतले बेरेष्टेसगार्टन पाहत होतो. नभ उतरु आलं होतं, मन झिम्माडं झालं होतंच..

. .

बर्‍याच वेळाने भानावर आलो. बस चुकेल म्हणून नाइलाजाने परत लिफ्टकडे वळलो.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

11 Jul 2014 - 1:03 am | खटपट्या

फोटो आणि वर्णन अतिशय सुरेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2014 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

फोटो इतके लहान का टाकले ? लहान फोटोत बारकावे दिसत नाहीत आणि भव्य गोष्टीही तितक्या प्रभावी वाटत नाही. त्यामुळे मोठे फोटो असते तर जागेचे अजून चांगले दर्शन झाले असते.

प्यारे१'s picture

11 Jul 2014 - 1:56 am | प्यारे१

खरंच. मला तर फोटोंबरोबरच लेखही लहान वाटला!

अपेक्षाभंगाचं दु:ख झालं.

मधुरा देशपांडे's picture

11 Jul 2014 - 1:13 am | मधुरा देशपांडे

हे ठिकाण भेट देण्याच्या यादीत आहेच. बघूया कधी जमतंय. ही अशी ठिकाणे पाहताना उदास व्हायला होतं खरं. पण तेवढाच अविस्मरणीय अनुभव असतो.

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2014 - 1:51 am | प्रभाकर पेठकर

ठरवा एखादा कट्टा. इस्पिकचा एक्का साहेब आहेतच, मीही येईन, निनाद, दिव्यश्री, स्वाती दिनेशही पुन्हा येतील (आपल्याला गाईड लागेलच) अजून कोणी येणार असेल तर उत्तमच. एक मस्त कट्टा करू.

मधुरा देशपांडे's picture

11 Jul 2014 - 1:30 pm | मधुरा देशपांडे

कट्ट्याची कल्पना मस्तच. जर्मनीतले मिपाकर येतील आणि तुम्ही आणि इए काका, वाह. तुम्ही फक्त कधी येताय सांगा. इथल्या सगळ्यांना जमविण्याची आणि कट्टा नियोजनाची जबाबदारी माझी. :)

वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे.
आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला!

सखी's picture

14 Jul 2014 - 5:51 pm | सखी

वृत्तांत व फोटू आवडले. हिटलर आवडत नसल्याने तो सोडून बाकी सगळे चांगले आहे.
आता प्रव लिहिणे थांबवू नकोस स्वातीताई. छान वाटते वाचायला!
+१ अगदी रेवतीसारखेच म्हणते.

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2014 - 9:56 pm | स्वाती दिनेश

हिटलर बद्दल बोलायला सर्वसामान्य जर्मन नाखूष असतो. एकंदरीतच दुसर्‍या महायुध्दाचा विषय त्यामध्ये होरपळलेल्या जुन्या पिढीला नको असतो.. आणि तरुणांना त्यात फारसा रस नसतो..त्याचे छायाचित्र कोठेही दिसत नाही, लाइपझिशच्या एका टूअर मध्ये त्याचा आणि महायुध्दाचा नुसता पुसटसा विषय आला तरी तिथे असलेल्या लोकांची पांगापांग झाली.. बर्लिन मध्ये ज्या बंकरमध्ये त्याने स्वतःला संपवले तेथे त्या बंकर्सची एक ऐतिहासिक वास्तू म्हणून कसलीही नामोनिषाणी नाही तर तेथे चक्क एक हाउसिंग कॉप्लेक्स आहे..
अशा पार्श्वभूमीवर येथील बंकर्स, त्याचे मोठ्ठे छायाचित्र अशा दचकवून गेले आणि त्या खूणांचा हात धरुन आपोआपच त्या काळात मन पोहोचले.
स्वाती

मिसळपाव's picture

28 Sep 2017 - 5:40 pm | मिसळपाव

आताच्या परिस्थितीत (मर्केल पुन्हा निवडून आल्येय पण त्याचबरोबर कडव्या उजव्यांच्या पाठीराख्यातपण चांगलीच भर पडल्येय) यात काही बदल तुम्हाला जाणवतो का? होपफूली, उजवे लोकं हिटलरचे पाठीराखे नसून दुसर्‍या युद्धातल्या जर्मनांच्या विजिगिषू वृत्तीचे पाठीराखे असतील.

मदनबाण's picture

11 Jul 2014 - 7:25 am | मदनबाण

लिहत राहा... फोटोत डीडींना पाहुन बरे वाटले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

मुक्त विहारि's picture

11 Jul 2014 - 9:48 am | मुक्त विहारि

अजून थोडी माहिती दिली असती तर जास्त उत्तम झाले असते.

दिपक.कुवेत's picture

12 Jul 2014 - 3:20 pm | दिपक.कुवेत

पण वर म्हटल्याप्रमाणे अजुन जरा मोठे आणि आणखीन असते तर मजा आली असती.

पैसा's picture

1 Aug 2014 - 10:40 pm | पैसा

किती छान लिहिले आहेस ग! आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

छान लिहिले आहे. कुठल्याही गोष्टीचे वर्णन करायची स्वातीताईची शैली मस्तच... वाचणार्‍याला स्वतः तिथे असल्याचाच अनुभव येतो अगदी!

या लेखाच्या दुव्यासाठी पद्मावतिला धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

28 Sep 2017 - 11:09 am | अनन्त्_यात्री

या वास्तूला "गिधाडघरटे"म्हणत असावेत असं उगाचच वाटलं