नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे.
झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला. तर, फार वेळ न दवडता सामुग्री येणेप्रमाणे:
दोन मध्यम आकाराच्या वाट्या थालीपीट भाजणी
ड्राय यीस्ट एक चमचा
कोमट पाणी
साखर चमचाभर
तेल चमचाभर
मीठ चवीपुरतं
सारणासाठी:
दोन मध्यम आकाराचे टॉमेटो
दोन मध्यम आकाराचे कांदे (उभे चिरुन)
मटार अर्धी वाटी किंवा फ्रीजमध्ये असतील तेवढे यांपैकी जे कमी असेल ते!!
चीज स्लाईस
दोन हिरव्या मिरच्या (उभ्या चिरुन)
लाल तिखट दीड टिस्पून
हळद अंदाजे
जीरे एक टीस्पून
मोहरी एक टिस्पून
लिंबाचा रस चमचाभर
हिंग चिमूटभर (सैंपाकघरात असेल तर, माझ्याकडचा संपला होता)
साखर चमचाभर
मीठ चवीनुसार
साजूक तूप
सर्वात आधी चमचाभर ड्राय यीस्ट थोडं कोमट पाणी घेऊन त्यात विरघळून घ्यावं. (हे मी केलं नव्हतं, त्यामुळे पीठ नीट आलं नाही असं मला वाटत होतं). आता थालीपीट भाजणी, पाण्यात कालवलेलं यीस्ट, साखर, मीठ, तेल असं सर्व एकत्र करुन कोमट पाण्याने घट्टसर मळून घ्यावं आणि अर्धा ते पाऊण तास झाकून उबदार जागी ठेवावं. आधीच घट्ट अशासाठी मळायचं की एकदा पीठ आलं की बर्यापैकी सैलसर होतं.
आता सारणाची तयारी. कढईत साजूक तूप घेऊन ते तापलं की त्यात मोहरी टाकावी, ती नीट तडतडली की मग जिरं घालावं. त्यानंतर मिरच्या घालून परतावं. हिंग घालणार असाल तर आता घालून मग कांदा घालावा. कांदा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतावा, त्यानंतर हळद व तिखट घालून नीट परतून घावं. मग मटार आणि चिरलेले टॉमेटो घालून परतावं आणि झाकण ठेवावं. त्यात वेगळं पाणी घालायची गरज नाही टॉमेटोला पाणी सुटून ते व्यवस्थित शिजतात. मटार शिजले की लिंबाचा रस घालावा. साखर व मीठ घालून एकदा परतावं आणि गॅस बंद करावा. सारण तयार आहे.
आता थालीपीटाच्या भाजणीचं जे मिश्रण आपंण मळून ठेवलं होतं त्याचे दोन भाग करुन ते भाकरीसारखे हातावर थापून घ्यावे. त्यातला एक भाग एका ताटात ठेवून त्यावर केलेलं सारण पसरावं.
आता त्यावर एक चीज स्लाईस ठेवावा.
आता थालीपीटाचा दुसरा भाकरीसारखा थापलेला भाग आहे तो त्यावर ठेवून कडा बंद कराव्यात.
आता एका खोलगट तव्यात (नॉनस्टिक असेल तर उत्तम) चमचाभर तूप घालून ते सगळीकडे सारखं पसरुन घ्यावं. तूप जरा उजव्याच हाताने घालावं जास्त झालं चालेल कमी पडता कामा नये. खोलगट तवा अशासाठी घ्यायचा कारण कडा पण शेकल्या गेल्या पाहिजेत. सारण भरुन कडा बंद केल्यामुळे याचा आकार बर्यापैकी फुगीर होतो, त्यामुळे नेहमीच्या पोळ्या शेकवायच्या पसरट तव्यावर हा पदार्थ केल्यास कडा कच्च्या राहू शकतात.
आता तूप बर्यापैकी तापलं की हे थालीपीट कालथ्याच्या मदतीने अलगद तव्यात सोडावं. तूप कमी वाटल्यास कडेने आणखी थोडं तूप सोडावं. आच मंद करुन झाकण ठेवावं. दोनेक मिनीटांनी झाकण उघडावं. एक बाजू नीट शेकली असेल तर उलटून दुसर्या बाजूनेही नीट शेकून घ्यावं.
तव्यातून काढल्यानंतर थालीपीट काहीसं असं दिसेल.
आता फडशा पाडावा. हे एक थालीपीट दुपारच्या जेवणाला अगदी पोटभर होतं. हे दुपारच्या जेवणाला खाल्लं की माझ्यासारखी खादाड माणसं संध्याकाळच्या स्नॅक्सपर्यंत आरामात तग धरु शकतात.
टीपा:
१) फोटो मोबाईलच्या क्यामेर्याने काढल्यामुळे यथातथाच आलेत त्यामुळे फोटोवर केलेल्या कमेंटी योग्य त्या ठिकाणी मारणेत येतील.
२) बाकी पाकृ माझ्या बाळबुद्धीला ऐनवेळी सुचेल तशी केलेली आहे त्यामु़ळे जाणकारांच्या कमेंट्स मोस्ट वेलकम.
३) पदार्थ घरात असलेल्या वस्तू वापरुन ऐनवेळी सुचेल तसा केला आहे, यात आपल्या आवडीनुसार पदार्थ कमीजास्त करु शकता.
प्रतिक्रिया
17 May 2014 - 3:38 pm | अजया
मस्त दिसतोय थालपिझ्झा !!
17 May 2014 - 10:48 pm | सस्नेह
हेच म्हणते.
काय सूडभौ, थालपिठाचा पिझ्झा बनवून आम्हाला फशिवता काय ? *boredom*
17 May 2014 - 3:45 pm | कवितानागेश
अय्या, तुम्हाला पोळ्या येत नाहीत? :P
मी याच साहित्यात कान्द्याचे थालिपीठ आणि टोमॅटोची कोशिम्बीर केली असती.
आणि चीजचे वेगळे सॅन्ड्विच केले असते, परत थोड्यावेळानी भूक लागल्यावर खायला.
किंवा धिरडं- फ्रॅन्की केली असती, म्हनजे दोन्ही बाजूनी भाजलेला पदार्थ मिळेल.
हे थालिपीठ आतल्या बाजूनी नीट शिजलं का, शंका आहे.
17 May 2014 - 3:54 pm | तुमचा अभिषेक
भारी दिसतय की, घरगुती फास्टफूड सारखे..
पण ब्याचलरस बोलून गंडवलेत हो, त्रास दिसतोय बरेपैकी..
17 May 2014 - 5:07 pm | रेवती
तुमच्याकडे ना हव्वी तशी भाजणी हव्वी तेंव्हा मिळतेय ना लेको, म्हणून असे प्रयोग करण्याचे सुचते. आमच्याकडे सध्या भाजणी मिळत नैय्ये तर असलेली जपून वापरावी लागतेय. अशात केलेला प्रयोग फसला तर वैट वाट्टे.
17 May 2014 - 5:07 pm | स्पंदना
थापता येतं
कापता येतं
भाजता येतं
आणि काय हवे म्हणते मी सुग्रणपणाला?
17 May 2014 - 6:19 pm | प्रचेतस
जबरी झालंय. कधी येउ खायला?
17 May 2014 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा
17 May 2014 - 10:56 pm | प्यारे१
सूड मोड ऑन
>>> त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या.
मोड ऑफ
छान रे सूड! :)
18 May 2014 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
@सूड मोड ऑन
>>>त्या थालिपीठाची दुसरी बाजू फारशी भाजलेली दिसत नाही. थोडं तेल सोडून व्यवस्थित परतून घ्यायला हवी होती. आणि थालिपीठाला आतून तेल जायला नि भाजायला उलथण्यानं चिरा किंवा बोटांनी भोकं पाडायला हव्या होत्या.
...मोड ऑफ >>> चूक चूक!!! *biggrin*
ते असं पाहिजे...
तेल कमी वापरता का...हल्ली? =))
खला...स! =))
18 May 2014 - 9:27 am | दिपक.कुवेत
अरे तसं केलं तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार.....अगदि नॉनस्टिक पॅन असला तरी. अर्थात ह्या पेक्षा वेगळं कारण असल्यास सुड सांगेलच. बाकि खाली सानिका म्हणते त्या प्रमाणे भाजणीत यीस्ट घालायचे प्रयोजन समजले नाहि.
18 May 2014 - 9:27 am | दिपक.कुवेत
दिसतेय मात्र एकदम टेम्टिंग!
19 May 2014 - 2:54 pm | सूड
>>तर थालिपीठ भाजताना आत घातलेलं चीज वितळुन बाहेर येउन थालिपीठाचा पार लगदा होईल व व्यवस्थीत उलटताहि नाहि येणार
एकदम बरोबर. थालीपीट तव्यातून काढेस्तवर तीच धास्ती होती. सुदैवाने उलटताना वैगरे नीट उलटलं गेलं.
सूड मोडसाठी प्यारेकाकांना दहापैकी पाच आणि बुवांना दहापैकी आठ गुण !! ;)
17 May 2014 - 11:38 pm | पैसा
मस्त लागत असणार!
18 May 2014 - 12:49 am | सानिकास्वप्निल
इनोव्हेशन आवडले :)
थालीपिठ पिझ्झामध्ये यीस्ट घातले नाही तरी चालेल असे वाटतेय.
पाकृसाठी धन्यवाद.
18 May 2014 - 9:37 am | मुक्त विहारि
टेस्टी
दिसतेय..
18 May 2014 - 10:11 am | ज्ञानोबाचे पैजार
भावा,
ही पा. कृ. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी बनव. कार्यक्रम नक्की यशस्वी होईल.
बाकी सध्या आमचाही बॅचलर मोड ऑन असल्याने घरी हा प्रयोग नक्की करण्यात येईल.
18 May 2014 - 1:51 pm | Prajakta२१
यीस्टची गरज नाहीये असे वाटते
आणि थालीपीठ करताना ओवा पण घालतात ना ?
18 May 2014 - 3:05 pm | मुक्त विहारि
ओवाच काय पण
आवळ-जावळ कुटलेले मिरे, जिरे, धनेपूड पण चालते.
आमच्या घरी ह्यात कधी-कधी भात पण घालतात.(उरलेला नाही, मुद्दाम...)कधी-कधी पोहे पण घालतात.
पण थालीपीठाची खरी चव लागते ती कोलंबी बरोबर.
कोलंबी-थालीपीठ आणि तांबडा रस्सा, नवर्याच्या मानसीक आरोग्याला उत्तम असल्याने, आजकाल ही डिश जास्त प्रमाणांत होत नाही.
18 May 2014 - 7:11 pm | शुचि
एकदम भारी दिसतंय!!!
18 May 2014 - 7:23 pm | यशोधरा
थालपिझ्झा भारी दिसतोय!
18 May 2014 - 7:34 pm | जेपी
थालपीठा सोबत शिंगोळे नसल्यामुळे आपला पास.
बाकी पाक्रु चांगली
18 May 2014 - 7:44 pm | मुक्त विहारि
काय साहेब असे काय करता?
एकदा थालीपीठ-लोणी,
थालीपीठ आणि तिखट घातलेले ताक
किंवा
थालीपीठ आणि आंब्याचे लोणचे ट्राय करून बघा.
बाकी, थालीपीठ ह्या पदार्थाची रंगत, माणसांच्या संख्येप्रमाणे वाढत जाते.
18 May 2014 - 8:08 pm | आदूबाळ
जबरी! बराच झांगडगुत्ता आहे पण.
बादवे, अंडे न घालता ही पाकृ...;)
18 May 2014 - 8:56 pm | त्रिवेणी
बाब्बो ब्याचलर माणसाच्या किचन मध्ये ईतक्या वस्तु.
19 May 2014 - 11:35 am | मृत्युन्जय
मस्त रे. पण थालीपीठ आतल्या बाजुने कच्चे नाही का राहिले? त्याला आच नसेल ना मिळाली?
19 May 2014 - 1:06 pm | पिंगू
आता कधी पुन्हा बनवतोयेस. खायला आणि फोटो काढायला वल्ली, बुवांसोबत हजेरी लावेन..
19 May 2014 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा
@ खायला आणि फोटो काढायला वल्ली, बुवांसोबत हजेरी लावेन..>>> +++१११ नक्कीच..नक्कीच! ;)
19 May 2014 - 2:49 pm | सूड
ह्म्म्म!! वर बरेच जण म्हणतायेत तसं मला काही कच्चं वैगरे वाटलं नाही थालीपीट. कदाचित झाकण ठेवल्यामुळे किंवा काय,कच्चेपणा जाणवला नाही. आणि राह्यलंच एखादवेळेस कच्चं तर भाजणीत तसंही सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून दळलेले असतात, त्यामुळे बाधणार नाही इतकं नक्की!!
यीस्टचं म्हणाल तर प्रयोजन असं काहीही नाही, प्रयोग म्हणून करुन बघितलं. मळून ठेवल्यानंतर वाटत होतं की चूक केली का काय, पण खाताना पश्चाताप झाला नाही. ;)
सानिकातै म्हणतात तसं यीस्ट वगळून पण करता येईल.
बाकी धाग्यावर हजेरी लावणार्या सर्वांचे आभार!! :)
19 May 2014 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त दिसतंय...!
-दिलीप बिरुटे
21 May 2014 - 7:53 pm | बाबा पाटील
आयला सुडमहाराज ,पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ? का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ? ? ? ?
22 May 2014 - 2:36 pm | सूड
>>पण एव्हडा कांदा कसाकाय कापला बुवा.च्यामारी एक कांदा कापायचा म्हटल की आमच्या ड्याळे पाणवतात राव. नक्की तुम्हीच इतका बारिक कांदा कापला नव्ह ?>>
व्हय जी म्याच कापलाय. आता कसाकाय कापला म्हनशीला तं सरावानं जमतंय आपलं वाईच कसंबसं. :)
>> का एखादी बॅचलरीन होती सोबतीला ?>>
आता यकांदी ब्याचलरीन आसती संगं तं कांदा कशापायी कापत बसलो असतो. न्हाय म्हंजी हाटिलातच ग्येलो नस्तो का? ;)
22 May 2014 - 2:40 pm | स्पा
चला आता लगीन लौकरात लौकर जमेल,..... असा सुगरण नवरा असताना कुठली मुलगी नकार देईल.
तयारीला लागायला हवे, नाय फोटोंचे contract आमच्याकडेच लागलेय णा.. लेन्स घेतो आता नवीन ;)
अवांतर : पक्रु भरि दिस्तेय.. पुधिल विकन्तल ब्द्लपुरत अल्यवर खिल्व
25 May 2014 - 3:54 pm | drsunilahirrao
बरा दिसतोय हा प्रकार एकंदरीत.
26 May 2014 - 12:06 am | सुहास झेले
भारी... :)