पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in पाककृती
11 May 2014 - 1:42 pm

शीर्षकावरून समजले असेलच की हि पाकृ केवळ आणि केवळ जेवण बनवण्याच्या कौशल्यात निपुण नसलेल्यांसाठी आणि काहीही पचवण्याच्या कौशल्यात पारंगत असलेल्यांसाठीच आहे.

एकेकाळी, म्हणजे बारावी नापास होत असताना घरी होतो तेव्हा बरेचदा हा प्रकार करून झाला आहे. मात्र कैक वर्षांनी आज लग्नानंतर, जेव्हा बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला, तेव्हा पुन्हा एकदा किचन ओट्यावर हात साफ करायची संधी मिळाली. तिचा पुरेपूर वापर करत आज हि डिश तुमच्यासमोर पेश करत आहे. ज्यांना जेवण फक्त गरमच काय ते करता येते आणि तरीही बाहेरचे न खाता घरचेच आवडते अश्यांना फायद्याचे ठरू शकेल हि यामागची सद्भावना आणि जाणकारांकडून चार टिपा मलाही मिळतील हा यामागचा सदहेतू.

तर,
एका माणसासाठी रावडाचिवडा बनवायला लागणारे साहित्य आहे,
खालीलप्रमाणे :-

तयार भात - प्रमाण आपल्या पोटाच्या अंदाजाने

कोणत्याही प्रकारची तयार डाळ, आमटी, कालवण वगैरे - प्रमाण भात कोलसवण्याइतपत (गोडे वा आंबट वरणापेक्षा तिखट डाळ वा आमटीला जास्त पसंती.)

तयार भाज्या - घरात, फ्रिजमध्ये, आजच्या, कालच्या, परवाच्या, असतील नसतील तेवढ्या सर्व! शेजार्‍यांकडे फक्त तेवढे मागायला जाऊ नका.

अंडे - ज्यांना चालते त्यांच्यासाठी तर मस्ट’च. (अंड्याला या प्रकारात सोन्याची किंमत. कारण सोन्याचे जसे ठोकून पत्रा करणे, खेचून तार करणे, (ज्याला सायंटिफिक भाषेत तन्यता-वर्धनीयता असेही म्हणतात) तसे काहीही करता येते, त्याचप्रमाणे इथेही अंड्याचे आपल्या आवडी आणि मर्जीनुसार भुर्जी ऑमलेट बॉईल’एग वगैरे काहीही करता येते.)

शेव, फरसाण, चिवडा, बाकरवडी - उपलब्धतेनुसार

मीठ - चवीनुसार

सॉस, ठेचा, लालतिखट चटण्या - आवडीनुसार

लोणचे - हे मात्र हवेच ! प्रकार कुठलाही चालेल.

पापड, रायता, पकोडे ईत्यादी ईत्यादी - मूळ पदार्थाला असल्या कुबड्यांची गरज लागत नाही.

शीतपेय - थंडगार ताक किंवा लिंबू-कोकम सरबत.

----------------------------------------------------------------------------------------

तर,
आता काय करायचे हे दरवेळी बदलत असल्याने आज मी काय केले हेच सांगतो.

कृती :-

१) सर्वप्रथम एक पसरट भांडे घेतले. (पसरट टोप वा कढई काहीही चालते, फक्त जे काही आई-बायकोने स्वच्छ धुतलेले असेल आणि आपल्याला धुवायची गरज लागणार नाही असे एखादे घ्यावे. कारण असल्या धुण्यापुसण्यातच अर्धी शक्ती खल्लास झाली तर पुढचा पदार्थ बनवायचा उत्साह मावळायची भिती असते.)

२) त्यानंतर एका अंड्याला जेवढे तेल लागते त्याच्या दुप्पट तेल त्या टोपात ओतून घेतले. चमच्याने छानपैकी टोपभर पसरवले. गॅस चालू करून तापायला ठेवले. पहिला तडतड आवाज येताच लागलीच घाबरून गॅस बंद केला. स्वयंपाक करणे आपल्या रोजच्या सवयीचे नसल्यास उकळत्या तेलाशी जास्त खेळू नये.

३) आता फ्रिजमधले थंडगार अंडे एका चमच्याने टकटकवून त्या तेलात सावकाश सोडले आणि टरफले बोटाने साफ पुसून फेकून दिल्यावर गॅस पुन्हा चालू केला. (सेफ गेम, याचे दोन फायदे - एक तर तडतडत्या तेलात अंडे सोडायची रिस्क नाही. दुसरे म्हणजे टरफले पुसून, फेकून, हात धुवुन, होईपर्यंत तेलातले अंडे करपायची भिती नाही.)

४) आता त्याच चमच्याने टोपातले अंडे परतायला घेतले. त्याआधी त्यात मीठ टाकायला मात्र विसरलो नाही. मसाला टाकायचे टाळले कारण त्याने अंड्याची मूळ चव लोप पावते जे या डिशमध्ये मला नको होते.

५) अंड्याचा कच्चेपणा जाऊ लागला तसे ते लालसर व्हायच्या आधीच गॅस पुन्हा एकदा बंद केला. पनीर असो वा अंडे, जास्त तळले गेले की रबरासारखे चिवट होते आणि त्याच्यातील फ्रेशनेसपणा जातो. (वैयक्तिक मत)

६) आता मूळ डिशला थोडावेळ विश्राम देत शीतपेय बनवायला घेतले. ताकाचा बेत होता. आपली नेहमीचीच पद्धत. तांब्यात दही, मीठ, थंड पाणी आणि रवीने घुसळणे. मॅगी नूडल्सनंतर मला परफेक्ट जमणारा हा दुसरा पदार्थ. तसे यात काही कठीण नसते, पण माझ्या रवी घुसळायच्या हाताला गुण आहे असे घरचे म्हणतात. (माझ्या मॅगीबद्दलही असेच म्हणतात, कदाचित मला जे जमतेय ते काम तरी माझ्याकडून काढून घ्यावे या हेतूनेही चढवत असतील.)

७) आता वेळ होती कूकरमधील भात काढून (जो आईने सकाळीच केला होता) त्या टोपातल्या तळलेल्या अंड्याबरोबर मिसळून घ्यायची. मगाशी वर अंड्यास तळताना गरजेपेक्षा जास्त तेल घ्या असे सांगितले होते ते याचसाठी जेणेकरून आताचा भातही त्या तेलात थोडाफार तळला जाईल. सोबतीला आवडीनुसार कोणताही लालतिखट मसाला टाकू शकतो. माझा पावभाजीचा मसालाही वापरून झालाय. पण आज मात्र घरात शोध घेता "लाल ठेचा" गवसला. ज्यात लाल मिरची आणि सुके खोबरे असल्याने एकंदरीत भाताला फ्लेवर छानच येणार होता. छानपैकी अर्धी मूठ भुरभुरला आणि चमच्याने पुन्हा परतायला घेतले.

............बस्स हाच तो क्षण जेव्हा भाताचे बदलणारे रंग पाहता मला आठवले की या डिशचे फोटो काढून काय कसे बनवले हे व्हॉट्सपवर बायकोशी शेअर करावे. मला मॅगी बनवणे आणि जेवण गरम करणे याव्यतिरीक्त आणखीही बरेच(?) काही करता येते यावर ती दाखवत असलेला अविश्वास मला आज तोडायचा होता.
इथे एक नम्रपणे नमूद करू इच्छितो - फोटो मोबाईलने काढल्याने आणि मोबाईलची सेटींग गंडल्याने फार काही सुरेख आले नाहीत, म्हणून फोटोंची क्वालिटी बघून पदार्थांची चव ठरवू नका. फिशटॅंक मधील मासे कितीही रंगीबेरंगी आणि छानछान दिसत असले तरी ते खायला तितकेच चवदार लागतील असे नसते, तिथे चारचौघांसारखा दिसणारा बांगडाच हवा.

.
तर हा पहिला फोटो टोपात परतलेल्या भाताचा ज्याला "एग फ्राईड राईस विथ महाराष्ट्रीयन तडका" असेही बोलू शकतो.
.

1

८) टोपातला भात काढून ताटात घेतला आणि त्यावर घरात सापडलेली बारीक तिखट शेव पसरवली. सोबतीला चितळे बंधू बाकरवडी देखील होती, तर ती सुद्धा दाताने कचाकचा कुरतडून त्यावर सोडली. इथे हा भात मी स्वताच आणि एकटाच खात असल्याने बाकरवडी दाताने तोडली कारण मला स्वताच्या उष्ट्याचे चालते.

.
हा दुसरा फोटो त्या भाताला ताटात घेतल्यावरचा प्लस तिखट शेव आणि बाकरवडीचा.
(जाणकार व्यक्ती फोटो झूम करून चेक करू शकता की खरोखर चितळेंचीच बाकरवडी होती, टीआरपीसाठी त्यांचे नाव घेतलेले नाहीये)
.

2
.
लगे हात मगाशी घुसळून ठेवलेल्या ताकाचाही एक फोटो काढून घेतला.
.

3

९) ग्रेवी बनवण्यासाठी आता त्याच रिकाम्या टोपात डाळ घेतली आणि भाजीचा शोध घेता फ्रीजमध्ये कालची शेंगाबटाट्याची एकच काय ती माझ्या आवडीची भाजी सापडली. काही हरकत नाही, भारंभार सतरा पदार्थ असण्यापेक्षा मोजकेच पण आवडीचे पदार्थ या प्रकारासाठी केव्हाही चांगलेच. आता इथे काही विशेष करायचे नव्हते. डाळ आणि भाजी एकत्र करून छानपैकी एक कढ घ्यायचा होता. पण तरीही थोडीफार वेगळी चव म्हणून अर्धा चमचा दही त्यात टाकले. (कधी मूड आला तर टोमेटो सॉसही टाकायचो) अर्थात आमची डाळ आणि भाजी तिखट असल्याने त्यात दही टाकले पण कोणाकडे तिखट डाळ-भाजी नसल्यास प्लीजच हं मग नको त्यात दही.

.
हा पुढचा फोटो त्या तयार ग्रेवीचा - दोन बटाटे आणि तीन शेंगा एवढे मोजकेच माझ्यापुरतेच घेतले. या प्रकारात पोटाचा अंदाज घेऊन अन्नाची नाशाडी होऊ नये हे बघणे खूप महत्वाचे असते.
.

4
.
हा फोटो आता पर्यंत तयार झालेल्या एकंदरीत सर्वच जेवणाचा.
यात ताटात अ‍ॅड झालेली लोणच्याची फोड विशेष महत्व राखते. इतरवेळी मला लोणचे हवेच असा आग्रह नसला, अगदी हॉटेलमध्ये मिळणारे फुकटचेही खात नसलो, तरी या डिशबरोबर ते आवर्जून लागतेच.
.

5

१०) फोटोग्राफीच्या नादात ग्रेवी थंड झाली असे जाणवल्याने पुन्हा एकदा गॅसवर ठेऊन एक कढ काढून घेतला.

.
पण फोटो काढायची एव्हाना चटक लागल्याने खायला सुरुवात करायच्या अगदी आधी हा खालचा फोटो काढायचा मोह काही बाई आवरला नाही.
.

6

एक सांगावेसे वाटणारे - अंडे फोडण्यापासून, भात परतवायला, डाळ-भाजी घेऊन ती ढवळायला वापरला जाणारा तो एकच एक चमचा जेवायच्या वेळी मात्र ताटातून अल्लद बाहेर काढून बोटांना गरम चटके देत खायची मजा काही औरच !

तळटीप - सारे फोटो मुद्दामहूनच खालच्या फरशीवर काढले आहेत. किचनमधील पसारा एकाही फोटोत दिसून बायकोच्या शिव्या खायला लागू नये यासाठी घेतलेली हि काळजी. तरी यावरून हे मीच कश्यावरून बनवले असा अविश्वास कोणी माझ्यावर दाखवू नये. खुद्द माझ्या बायकोने यावर विश्वास ठेऊन मला "मिस्टरशेफ"चे प्रशस्तीपत्रक दिले आहे :)

- तुमचा अभिषेक

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 2:23 pm | तुमचा अभिषेक

इथे कोणाला (इथेच काय कुठेच कोणाला) पाकृ सांगायची पात्रता नाही.
तरीही धागा जनातले मनातले मध्ये न टाकता या विभागात टाकायची हिंमत दाखवतोय. ;)

पैसा's picture

11 May 2014 - 2:29 pm | पैसा

पण फोटो दिसत नाहीयेत. जीमेलवरचे फोटो दिसत नाहीत. ते गुगल फोटो/पिकासावरून टाकायला हवे होते. आता गुगल फोटो मधे अपलोड करून पब्लिक अ‍ॅक्सेस दे आणि मला कळव. मी लिंक दुरुस्त करते नंतर.

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 2:44 pm | तुमचा अभिषेक

ओह्ह.. फोटो मला दिसत होते.. श्या.. फोटो तर खूप महत्वाचे आहेत..
मागे फेसबूकवरचे फोटो टाकलेले ते दिसले होते इथे.. मी फोटो फेसबूकवर टाकतोय आता आणि त्याची लिंक देतो तुम्हाला .. थांबा हा ताई जाऊ नका कुठे ..

साती's picture

11 May 2014 - 2:32 pm | साती

मस्तं
मी बर्यापैकी पाककला निपूण वैगेरे असले तरी हा मला जमणारा पर्फेक्ट आणि आवडता पदार्थं आहे.
तुझ्या लिहिण्याच्या पद्धतीने त्यावर चार चांद लागलेत.
फोटू दिसत नाहीत.

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे.

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 3:22 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा, फ्रेशनेसपणा हा शब्द आधी तसा नव्हता मात्र प्रूफरीडींग करताना तसा वाचला गेल्याने बदलण्यात आला होता. आपला आतला आवाज नेहमी ऐकावा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2014 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

फ्रेशनेसपणा हा शब्दं अतीव आवडला आहे. होना ! जसा विकनेसपणा तसा फ्रेशनेसपणा ;)

पाकृ आणि सांगण्याची पद्धत मात्र भन्नाट आहे !

साती's picture

11 May 2014 - 10:17 pm | साती

ही पाकृ खाल्ल्यावर आतला आवाज बाहेरही ऐकू येऊ शकतो.
;)

पैसा's picture

11 May 2014 - 10:25 pm | पैसा

भयंकर परिणामकारक दिसते आहे पाकृ! *secret*

टवाळ कार्टा's picture

11 May 2014 - 2:42 pm | टवाळ कार्टा

गणेशा झालाय माझा :(

सानिकास्वप्निल's picture

11 May 2014 - 2:45 pm | सानिकास्वप्निल

पाकृचे फोटो दिसत नाहीये :(
पण लिहिण्याची शैली क्या बात है +११

प्यारे१'s picture

11 May 2014 - 2:57 pm | प्यारे१

फोटो दिसल्यावर चावतो आपलं वाचतो :)

प्यारे१'s picture

11 May 2014 - 3:40 pm | प्यारे१

फटु दिसले. जमतंय.
आता हळूहळू नवीन पदार्थ करण्याची माणशिक तयारी ठेवा. ;)

आदूबाळ's picture

11 May 2014 - 2:58 pm | आदूबाळ

नाना फटु दिसंना.

हां प्रकार दिसतो कसा आननी हे बघायची घनदाट उत्सुकता आहे

सुहास झेले's picture

11 May 2014 - 3:14 pm | सुहास झेले

सहीच... इंटरेस्टिंग पाककृती. फोटो बघायला उत्सुक :)

मुक्त विहारि's picture

11 May 2014 - 3:14 pm | मुक्त विहारि

कारण फार मनापासून लिहीलेली आहे....

सध्या फक्त पोच.

फोटू दिसले, की सविस्तर प्रतिसाद देतो.

स्पंदना's picture

11 May 2014 - 4:10 pm | स्पंदना

घरात एकट असलं की मन कस साहसी होतं नी?
ताकाला तांब्या, ग्रेव्हीला पातेलं बाब्बो!! मग तो भातच का ताटात म्हणते मी? तो सुद्धा त्या कढईतच चालला असता ना भावा!
मस्त रेशीपी. अन मस्ताड वर्णन.

पैसा's picture

11 May 2014 - 5:20 pm | पैसा

खरंच मस्त लिहिलंय!

मात्र सगळे नवरे मंडळी २ चमचे ग्रेव्हीसाठी एवढी मोठी पातेली का घेतात देवजाणे! *scratch_one-s_head*

भाते's picture

11 May 2014 - 8:12 pm | भाते

कधीतरी आम्ही स्वयंपाकघरात शिरून काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि तुमच्या अशा प्रतिसादाने आम्हाला नाउमेद व्हायला होते.
आपल्याला काहीतरी खायला करून गिळायला मिळते इतकाच सोपा आणि साधा विचार आम्ही करतो. तेव्हा भांडयांचे लहानमोठे आकार पाहायला आम्हाला वेळ नसतो. स्वयंपाकघरात शिरून फसलेला प्रयत्नसुध्दा मुकाटयाने खावा लागतो हा स्वानुभव. :)

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 10:43 pm | तुमचा अभिषेक

अहो ती मोठी पातेली धुवायचा त्रास परत त्यांनाच होतो म्हणून ते तसे म्हणत असावेत, मात्र जर ती तुम्ही स्वताहून धुतली तर मग त्यांची काही हरकत नसावी .. एक अंदाज !

पैसा's picture

11 May 2014 - 10:52 pm | पैसा

पण नवर्‍याने केलेली एक पाकृ = बेसिन भरून घासायची भांडी हा अनुभव नेहमीचाच असल्याने मतामधे बदल होणार नाही! धन्यवाद! *nea*

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 7:00 pm | तुमचा अभिषेक

झालीय की वापरून कढाई भाताला, अगदी पहिल्यांदा. त्यातच बनवलेला आणि त्यातच खाल्लेला,
त्यावर जेवण बनवायच्या भांड्यातच खाल्ले म्हणून आईचा शाब्दिक धपाटाही मिळालेला.

मुक्त विहारि's picture

11 May 2014 - 9:50 pm | मुक्त विहारि

झक्कास...

बोबो's picture

11 May 2014 - 10:19 pm | बोबो

नापाककृती आवडली. आवडली म्हणजे फक्त बघण्यापुरती, खायची अर्थातच हिम्मत होणार नाही.

काही सूचना -
१. फोटोवर तुम्ही तुमचे नाव टाकले नाही. पुढे मागे कुणी ही पाक्रु फोटोसकट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला तर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही तरी पुरावा असावा.
खरं तर तुम्हीच कशावरून इतर कुणाची पाक्रु ढापून येथे टाकलेली नाही कशावरून?

२. शेगडीचा फोटो टाकायला विसरलात.

३. पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते.

आणखी काही सुचलं तर टंकेनच. सध्या एवढेच पुरे.

आपल्याच तोडीचा पाककलातज्ञ, मॉन्सस्टर शेफ,

तुमचा बोबो

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 10:53 pm | तुमचा अभिषेक

पाकृचा मुख्य फायदा मला जाणवला तो असा म्हणजे दर वेळेला तुम्हाला नवं काही तरी खाल्ल्याचं समाधान देण्याची ताकद या पाकृमध्ये मलातरी जाणवते.

अगदी अगदी +७८६

चाणक्य's picture

12 May 2014 - 6:50 am | चाणक्य

धमाल लिहिलय. नापाककृती आवडली.

वेल्लाभट's picture

12 May 2014 - 9:54 am | वेल्लाभट

आकर्षक आहे... करायला हवा....

इशा१२३'s picture

12 May 2014 - 11:23 am | इशा१२३

सोप्पी पाककृती आणि महत्वाचे म्हणजे मला फोटो दिसतायत....मस्तच!

दिपक.कुवेत's picture

12 May 2014 - 2:40 pm | दिपक.कुवेत

कधीतरी हा प्रयत्न करुन बघायला हरकत नाहि. लिखाणाच्या शैलीसाठि +११११

तुमचा अभिषेक's picture

12 May 2014 - 11:53 pm | तुमचा अभिषेक

क्या बात है, तुमच्यासारख्या दिग्गजांनी हे करून बघायचा विचार केलात इथेच जिंकली माझी पाकृ ;)

सस्नेह's picture

12 May 2014 - 2:57 pm | सस्नेह

पाकृ अन फोटो भन्नाट आहेत..
चवीची कल्पना करण्यास असमर्थ ठरले आहे...

लिवलंय झ्याक, पर फोटु दिसंना झाल्यात!!

त्रिवेणी's picture

12 May 2014 - 4:12 pm | त्रिवेणी

अंडे न घालता करता येते का ही रेसिपी *sad*

अंडे घालण्यावेळचे कष्ट वाचल्याने अंडी न घालता फार उत्साहात करता येत असावी ही पाकृ. अर्थात अनुभवशून्य असल्याने अंडी घालून पाकृ करणारे यावर प्रकाश टाकू शकतील.

मदनबाण's picture

12 May 2014 - 4:25 pm | मदनबाण

ह्म्म... रावडाचिवडा या नामाभिधाना वरुन मला रावण पिठले आठवले.

फोटो दिसत नाहीत पण पाकृ लिहीण्याची स्टाईल एकदम झक्कास्स...

तुमचा अभिषेक's picture

12 May 2014 - 7:26 pm | तुमचा अभिषेक

अजूनही कोणाला फोटो दिसत नसल्यास प्लीज खालील लिंक चेका पण नक्की बघाच. काहीतरी मेहनत घेऊन केलेय मी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.

http://asmiabhi.wordpress.com/2014/05/11/rawdachivda/

माझ्या ब्लॉगवरची लिंक आहे, इथे तरी नक्की दिसतील.

प्यारे१'s picture

12 May 2014 - 8:47 pm | प्यारे१

अरे वा, ब्लॉग ले आऊट 'डायरी'च आहे की!

तुमचा अभिषेक's picture

12 May 2014 - 11:48 pm | तुमचा अभिषेक

हो, मी बरेच मान्यवरांचे ब्लॉग ढुंढाळले, कोणी काय थीम वापरलीय आणि कशी दिसते त्यानुसार हि बरी वाटली तर सिलेक्ट केली. (कोण वाचते की नाही माहीत नाही) पण अजूनपर्यंत कोणी वाचायला अडचणीचे होते अशी कंम्प्लेंट नाही केलीय.

सूड's picture

12 May 2014 - 10:02 pm | सूड

ह्म्म आता दिसले फोटो. रच्याकने...टोप की पातेलं हो?

स्वगतः नारायण नारायण !!..

तुमचा अभिषेक's picture

12 May 2014 - 11:49 pm | तुमचा अभिषेक

टोप आणि पातेले मध्ये काय फरक असतो मला माहीत नाही खरेच, किंबहुना आपण हा प्रश्न विचारताय म्हणून अन्यथा माझ्यासाठी दोन्ही एकच होते, जो शब्द तोंडात आधी येईल तो :)

आहो अभिषेक भाऊ "बायको माहेरी आणि आईवडील नातेवाईकांकडे, असा दुहेरी सुवर्णयोग आला" ह्यात कसला हो सुवर्ण्योग??? असो ज्याचा त्याचा अनन्द!!! *nea*
पदार्थ मस्तच... *good* लिखान तर अतिउत्तम.... शेवटी जे काय mix केल आहे ते तर भारीच... घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

घरात काही खायला नसेल तर पर्याय उत्तम....

घरात उरलेला भात, भाजी/आमटी, शेव-चिवडा-बाकरवडी वगैरे वापरूनच केलीय ही पाकृ ... *blum3* नायतर काय जमणारेय आमच्यासारख्यांना!

बादवे तुअची पाकृ आवडण्यात आलेली आहे, असा दुहेरी 'सुवर्ण्योग' आमच्याही भाळी कदी आल्यास करूच करू. ;-)

तुमचा अभिषेक's picture

15 May 2014 - 12:22 am | तुमचा अभिषेक

सुवर्णयोग नाही तर काय, लग्नाआधी आईवडील घरात नसले की मित्रांबरोबर अड्डा जमवायला मिळायचा. पण आता लग्नानंतर बायको माहेरी गेली तरी निवृत्ती घेतलेले आईवडील घरी असतात. आणि ते कुठे नातेवाईकांकडे गेले तर, व्वाह आता घरात आपण दोघेच राजाराणी म्हणत मानगुटीवर बसायला बायको रेडी असतेच.. बॅचलर लाईफ काय असते ते पुन्यांदा अनुभवायला मिळण्याचा हा योग दुर्मिळच नाही का .. त्याचाच फायदा उचलत आनंदाने काहीतरी केले, आनंदाने खाल्ले, म्हणून त्या आनंदा आनंदातच मिळालेल्या आनंदाची आठवण जपायला लेखही लिहिला गेला ..