साल्हेर वाडी मध्ये एका टपरी वजा दुकानात चहा मारला आणि त्याच्याच दारात गाडी लावली. साल्हेरवर गुहेत मुक्काम करायचा असल्याने त्या दृष्टीने लागणारी सामुग्री बरोबर घेतली आणि वाटेला लगलो. साल्हेरच्या बाजूला आल्यावर एक गोष्ट जाणविली ती म्हणजे वातावरणातील बदल. मुल्हेर च्या इथले दमट, वारा नसलेले दमाविणारे हवामान इथे नव्ह्ते. मस्त गार वारा वाहत होता. उन्हाचा कडाकाही विशेष नव्हता. गावातून साल्हेर चा सर्वोच्च माथा ढगात लपल्या मुळे दिसत नव्ह्ता. परत एकदा अनुप च्या मार्गदर्शन खाली वाटचाल सुरु केली. ही वाट चुकण्या सारखी मुळीच नसल्याने अनुपने GPS आत ठेवून दिले. पहिल्या दांडावरून चढाई करत २०`-२५ मिनिटात पायऱ्यांची वाट सुरु होते तिथपर्यंत आलो. वातावरण आल्हाददायक असल्याने थकवा जाणवत नव्हता. तसेच पुढे चालत राहून साधारण तासाभरात साल्हेर माचीवरील पहिला दरवाजा गाठला. इथून गडाचा प्रचंड विस्तार लक्षात येत होता. माचीवर मस्त गार वारा सुटला होता. पाऊस नव्हता. साल्हेर च्या पार्श्वभूमी वर निळे आकाश आणि पांढरे ढग उठून दिसत होते. तेथेच एक छोटेसे तळे पण होते. तिथे मग आपोआपच एक 'फोटोग्राफिक ब्रेक' झाला. प्रशांत ने इतक्या वर वाहून आणलेल्या ट्रायपॉडचा उपयोग करत काही 'long exposure shots' घेतले.
इथून एक आडवा 'traverse' मारत गडाला वळसा घालून वाट वर चढते. साल्हेर चा सर्वोच्च माथा गाठायची उत्सुकता आणि वातावरणाची अनुकुलता ह्यामुळे पावले आपोआपच झपाझप पडू लागली. अर्ध्या तासाच्या traverse नंतर वाट वरती चढायला लागली ह्या वाटेने चढत पुढे आल्यावर थोड्याच वेळात साल्हेरच्या मुख्य अंगाला लागून असणाऱ्या कातळातील अजस्त्र पायऱ्या लागल्या. थोड्या अंतरात बरीच उंची गाठली जाणार होती. असे २-३ टप्पे आणि प्रवेशद्वारे पार करत मुख्य प्रवेशद्वारातून माथ्यावर दाखल झालो. वातावरणातील बदल गाठलेली उंची दाखवत होते. इथून साधारण अर्ध्या तासावर मुक्कामाची गुहा आहे अशी माहिती अनुप ने दिली. वर पोहचल्या पोहचल्यावर अनुप, प्रशांत आणि आनंद डावी कडे एका गवताळ कुरणात घुसले. तेथे आनंद ला एक छोटे सापाचे पिल्लू दिसले. आधी ते मेले आहे असे वाटून वाटून तो जरा जवळ गेला पण त्याने हालचाल करून आपण जिवंत असल्याचा पुरावा देताच सगळेच गवतातून बाहेर आले. तिथे मग ते पिल्लू म्हणजे 'Russel Viper' आहे ही माहिती आनंद ने पुरविली. त्यावरून मग 'Russell Viper' म्हणजे घोणस की फुरसे ह्या वरून जरा मतभेद झाले. शेवटी मग घोणस असो वा फुरसे दोन्ही जाती विषारी असल्याने अशा गवतात जाताना (आणि एकूणच ट्रेक मध्ये ) पायात shoes असणे गरजेचे आहे ह्यावर अनुप सोडून सगळ्यांचे एकमत झाले. त्याचा 'action floaters' वर दृढ विश्वास आहे!
थोड्याच वेळात उजवीकडे थोडी उंचावर गुहा दिसली समोरील तलावाच्या काठावरून जात गुहेपाशी आलो. गुहेत गावतील ३-४ गुराखी बांधव राहत होते. दर वर्षी बैल पोळ्याच्या सुमारास ३०-४० गुरांना घेऊन हे लोक गावातून गडावर येतात आणि दिवाळीला खाली उतरून जातात. तोपर्यंत त्यांचा मुक्काम गडावरील गुहे मधेच असतो. गडावर उपलब्ध असलेला मुबलक चारा हे वर येउन राहण्या मागचे प्रमुख कारण. ह्यांच्यातील एक जण रोज गड उतरून खाली गावात जातो आणि सर्वांसाठी भाकरी घेऊन येतो. ते पाहून अजूनही सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ह्या लोकांचे जीवन कसे खडतर आहे ह्याची जाणीव झाली. सूर्यास्ताच्या आत परशुराम टोक गाठायचे असल्याने bags आणि इतर नको असलेले समान गुहेत ठेवून आणि फक्त कॅमरा bags बरोबर घेऊन सड्याने वरती निघालो.
महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर जायला सगळेच खूप उत्सुक होते. माथ्यावरील ढगांमुळे परशुराम टोक दिसत नव्हते. सोप्या वाटेने चढत २०-२५ मिनिटात माथा गाठला आणि वरती भन्नाट वाऱ्याने आमचे स्वागत केले. इथून गडाचा खालचा माथा, माची, पाय्थायचे गाव, घाटमाथा आणि दूरवर कोकण असा मोठा परिसर दिसतो पण सर्वत्र ढगांची दुलई पसरली असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. तुफान वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. इथे परशुरामाचे एक छोटेखानी मंदिर आहे, त्यात परशुरामाच्या पादुका आणि तुळजाभवानीची मूर्ती पण आहे. त्याचे दर्शन घेऊन खाली असलेला ढगांचा पडदा बाजूला होऊन निसर्गाचा रंगमंच खुला होण्याची वाट पाहत बसलो. ह्या अनोख्या प्रेक्षागृहात आम्ही चौघेच प्रेक्षक होतो पण निसर्गाची तिसरी घंटा व्हायला अजून अवकाश होता.
पोरं एवढ्या लांबून आलीयेत म्हणून की काय पण निसर्गदेवतेने फार काळ थांबायला लावले नाही. वाऱ्याच्या एका झोताने ढगांची चादर क्षणात बाजूला केली आणि हिरवाईने नटलेला रंगमंच काही क्षणच खुला केला. पण लगेच दुसऱ्या क्षणी ढगांचा पडदा परत टाकला गेला. पण त्या निमिषार्धात दिसलेल्या अप्रतिम दृश्याने आज निसर्गाचे काय काय चमत्कार ह्या नाट्यातून अनुभवायला मिळणार आहेत ह्याची प्रचीती आली. आज सूर्यास्ता पर्यंत चालणाऱ्या नाट्याची ही एक झलक होती.
निसर्गदेवता आज आपल्यावर प्रसन्न झाल्याची जाणीव आम्हाला झाली आणि सगळेच जण पुढील चमत्कार अनुभवायला अधीर झालो. आता निसर्गाने आपल्या नाट्याचा पहिला अंक सुरु केला होता. तुफानी वाऱ्या बरोबर वाहत येणार ढग मधूनच समोरच्या दरीला झाकून घेत होते आणि क्षणात बाजूला होऊन समोरील निसर्गचित्र उलगडत होते. वरील आकाशात सुद्धा सूर्यासमोरील ढगांचे आच्छादन कमी होऊन त्यातून येणारा सोनसळी प्रकाश दरीतील ढगांवर फाकत होता. एकाहून एक अप्रतिम अशा निसर्गाच्या frames समोरील रंगमंचावरून सरकत होत्या. स्वर्ग जर कुठे असेल तर तो ह्याहून फार वेगळा नसावा. जीव ओवाळून टाकावा अशा निसर्गाच्या लीला समोर सुरु होत्या. पहिले काही क्षण तर त्या दृश्याने मंत्रमुग्ध होऊन कॅमेरा काढायचे पण लक्षात आले नाही. कितीही डोळ्यात साठविला तरी समाधान न व्हावे असाच समोरचा नजारा होता. तरी त्यातून आपल्या परीने ते दृश्य कॅमेऱ्यात बंद करायचा प्रयत्न केला. समोरील frames इतक्या पटापट बदलत होत्या कि त्या पुढे आमचा click करायचा स्पीड कमी पडत होता. पुढील बराच वेळ आम्ही सगळेच वेड्या सारखे फोटो काढत होतो. अनुप तर गमतीने म्हणाला कि इथे आपण wildlife पेक्षाही फास्ट click करत आहोत.
तेवढयात अनुप हळूच सटकला आणि पूर्वे कडील दरीत सालोट्याचे दर्शन होते का ते बघू लागला. त्याचा अंदाज अचूक होता. इकडे पश्चिमेला जे सुरु होते त्याचाच एक भाग मागील दरीत पण सुरु होता. ढगातून डोके वर काढणाऱ्या सालोट्याचे त्याने काही shots काढले आणि थोड्याच वेळात 'इंद्रवज्र, इंद्रवज्र' असे तो आनंदातिशयाने ओरडला. लगेच आम्ही त्या दिशेने धावलो. तोवर सालोटा परत ढगात गेला होता, पण समोरील दरीत असलेल्या ढगांवर मावळतीच्या किरणांमुळे पडणारी आपलीच सावली आणि त्याच्या बाजूचे संपूर्ण गोल सप्तरंगी इंद्रवज्र ह्याचे दर्शन घडले. ह्या दृश्यासाठी वेळेत बोलाविल्या बद्द्ल अनुपचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. निसर्गाचा हा चमत्कार तसा खूप दुर्मिळ. त्यातून तो हरिश्चंद्रगडावर कोकणकड्याच्या बाजूला पश्चिमेला पावसाळ्यात कधी कधी दिसतो हे माहित होते पण हे पूर्वे कडचे इंद्रवज्र आम्ही सगळेच प्रथमच पाहत होतो. अनुपला त्याच्या १-२ frames देखील मिळाल्या. सूर्य अस्ताला जाऊ लागला तसे ढगांचे आच्छादन दाट होऊ लागले आणि आजच्या नाट्यावर पडदा पडत असल्याची जाणीव झाली. तशा भारावलेल्या अवस्थेत खाली उतरून गुहेत आलो.
गुराखी बांधवांनी तोपर्यंत गुरे आडोशाला बांधून आत स्वैपाकाची तयारी सुरू केली होती. आतील मुख्य गुहेच्या बाहेर एक मोठी गुहा होती त्यातूनच आत येण्याचा रस्ता होता. फारच पाऊस असेल तेव्हा ह्या बाहेरील भागात ते गुरे बांधतात नाहीतर एरवी रात्रीची गुरे बाहेर आडोशालाच असतात. गुहेचे मुख्य तोंड त्यांनी आडवे बांबू आणि पोती लावून बंद केले होते(गुरे आत येऊ नयेत म्हणून). त्यामुळे मग एक खिडकी वजा छोट्या प्रवेशद्वारातून गुहेत आलो. एक कोपरा बघून पथारी मांडली. आज जेवणात मस्त स्वीट कॉर्न सूप, पालक खिचडी आणि जिलेबी असा बेत होता. प्रशांत चे पाक-कौशल्य वादातीत असल्याने (लग्नाआधी पासूनच) आजही स्वैपाकाची धुरा त्याच्यावरच होती. मस्त गरमागरम खिचडी, सूप आणि जिलेबी असे पदार्थ पोटात गेल्यावर आवरा आवर करून झोपेच्या दृष्टीने वळकट्या बाहेर काढल्या. तेवढ्यात आनंद च्या बाजूने कोपऱ्यातून मांजरा सारखा बारीक आवाज येऊ लागला त्यामुळे हा मुल्हेरमाची वरचे मांजर इकडे घेऊन आला कि काय अशी शंका येउन सगळे त्याच्या कडे बघू लागले तेव्हा तो आवाज मांजराचा नसून त्याने आणलेल्या Quechua च्या dynamo वाल्या torch चा आहे हे समजले. झाले मग एकेकाने आपल्या कडील Quechua ची सामुग्री बाहेर काढून त्याची महती सांगायला सुरुवात केली. एकूण ३ ultralight sleeping bags, कंदील, raincover, raincut, हलके सामान ठेवायचा पिट्टू आणि आनंद चा dynamo वाला torch एवढी Quechua ची सामुग्री एकाच ट्रेक मध्ये पाहून ह्या कंपनी ने trekkers करता बरेच चांगले products आणल्याची खात्री पटली.
अलार्म ने पहाटे ५:१५ ला जाग आली. सूर्योदयाला परत परशुराम टोकावर जाऊन सालोटा बाजूकडील फोटो घ्यायचे होते पण प्रशांत ने बाहेर जाऊन अंधारात torch मारून बघितला आणि धुक्या शिवाय काही न दिसल्याने सरळ आत येउन झोपला. सगळे तसे मग निवांतच ७ ला उठलो. धुके काही हटायला तयार नव्हते. 'धुकटी काय आता १० च्या आत जात नाय', असे एका गुराखी बांधवाने सांगितले. मग काय करावे ह्यावर चर्चा झाली. पण काल क्षणार्धात बदलणारा निसर्गाचा चमत्कार बघितला असल्याने आजचा मुक्काम गडावरच करू असे ठरले.
आवरून १० वाजता बाहेर पडलो. आज साल्हेर आणि सालोटा ह्यांच्या मधील खिंडी च्या बाजूला जायचे होते. धुक्यातून वाट काढत त्या बाजूला उतरणाऱ्या वाटेने चालू लागलो. साधारण अर्ध्या तासात कड्याच्या पोटातून उतरणारी वाट लागली ह्या वाटेच्या उजव्या बाजूला सलग खोदलेल्या गुहा आहेत तर डाव्या बाजूला दरी आहे. अजूनही धुके काही हटले नव्हते. मग तिथेच वाट पाहत बसलो. चांगले landscpae photo काढायचे तर फोटोग्रफिक कौशल्या बरोबरच हवामानाचा अंदाज आणि अनुकूल हवामान मिळेपर्यंत थांबून राहण्याचा patience ही कौशल्ये पण आवश्यक आहेत. तास दीड तास थांबून पण वातावरणात काही फार फरक पडेना. तेव्हा मग अजून थोडे पुढे उतरून खिंडी पर्यंत जावे असे ठरले. खिंडीच्या दिशेने उतरू लागताच वातावरणात अनुकूल बदल होत असल्याचे लक्षात आले. खिंडीत उतरणाऱ्या पायऱ्यांच्या पाशी आलो तेव्हा समोरील धुक्याचे cover हटायला लागले होते आणि सालोटा आणि आजूबाजूचा परिसर मोकळा होत होता. थोड्याच वेळात येथे मग ढगांचा ऊन-सावल्यांचा खेळ सुरु झाला आणि इकडे आमचा कॅमेऱ्यांचा क्लिकक्लीकाट सुरु झाला. बराच वेळ फोटो काढून झाल्यावर भुकेच्या जाणीवेने गुहेकडे परतायला सुरुवात केली.
गुहेत येउन मस्त कांदे पोहे बनवून (Courtesy: अर्थातच प्रशांत ) त्यावर ताव मारला. थोड्या वेळेच्या विश्रांती नंतर सूर्यास्तासाठी पश्चिमे कडील टोकाकडे जायला सुरुवात केली. येथील बुरुजापाशी पोहचताच भन्नाट वारा लागला. वाऱ्याचा जोर कालच्या पेक्षा अधिकच वाटत होता. पण दरीत ढगांचे cover कायम होते. काल पासून निसर्गाने बरीच साथ दिली असल्याने ते cover हटण्याची वाट पाहत तिथेच थांबलो. येथून गड, खालील माची, पायथ्याचे गाव, घाटमाथा आणि लांब गुजरातचा सपाटीवरचा प्रदेश असा मस्त ३-४ टप्प्यात उतरणारा सह्याद्री दिसणार होता. त्यासाठी वाट बघणे क्रमप्राप्त होते. वारा मात्र पिसाटल्या सारखा वाहत होता. साल्हेर घाटमाथ्या पासून जवळच असल्याने असा वारा असणे साहजिक होते. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जरी असले तरी ते घाटमाथ्या पासून बरेच आत आहे त्यामुळे तिथे एवढा height difference नाही. साल्हेरचे हे वेगळेच वैशिष्ट्य असल्याचे ध्यानात आले.
वाऱ्याच्या जोरा पुढे धड उभे ही राहता येत नव्हते. नाका तोंडात वारे जात होते पण पुढील दृश्य आधी नजरेत आणि मग कॅमेऱ्यात साठवायचा दुर्दम्य उत्साह मागे हटू देत नव्हता. काहीच वेळात दरीतून वर येणाऱ्या तुफान वाऱ्या बरोबर ढग रंग उधळल्या सारखे वर फेकले जाऊ लागले आणि कालच्याच नाट्याचा पुढील अंक सुरु झाला.. जणू रंगलेल्या मैफिलीवर भैरवी ने चढविलेला कळसच!! दूरवर दिसणारा सह्याद्रीचा राकट प्रदेश आणि त्यावर उधळलेल्या रंगा सारखे ढगाचे पुंजके!! समोरील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडत होते. सह्याद्री काय चीज आहे ह्याची मनोमन खात्री पटत होती. नजरेत आणि कॅमेऱ्यात कितीही साठविले तरी समाधान होणार नव्हते. निसर्गाच्या सर्जनशीलते पुढे आपण किती तोकडे आहोत ह्याची जाणीव झाली तेव्हा कॅमेरे बंद केले आणि काही क्षण मुक्त अनुभूती घेतली.
गुहेकडे परतताना एखाद्या रंगलेल्या मैफिलिहून परतताना मनाची जशी अवस्था होते तशी झाली. गुहेत परतल्यावर संध्याकाळी गुहेतील गुराखी बांधवांचे काही candid फोटो घेतले. रात्रीचे जेवण करून विश्रांती साठी पडलो. उद्याचे हवामान बघून उद्या परत निघावे कि अजून थांबावे हा निर्णय घेण्याचे ठरले. सकाळी उठलो आणि बाहेर बघितले तर हवामान अजूनच खराब झाले होते. आज धुक्या बरोबर बारीक पाऊस पण सुरु झाला होता. त्यामुळे pack-up करून तडक उतरायला लागलो. अर्थात बेत ठरत होते ते पुढच्या ट्रेकचे!!
खाली उतरून आलो तो पर्यंत cloud cover चांगलेच dense झाले होते आणि पाऊस पण जोर धरू लागला होता. कपडे change करून गाडीत बसलो, मुल्हेर मध्ये मिसळ पोटात टाकली आणि नाशिक च्या दिशेने प्रयाण केले तिथे अनुपला नाशिक रोडला सोडले आणि नाशिक highway चा उद्धार करत गाडी पुण्याच्या दिशेला लागली.
ह्या ट्रेक ने आम्हाला काय दिले? एका trekker च्या दृष्टीकोनातून ४ दिवसात २ किल्ले, जे कि ठरविलेल्या plan च्या निम्मेच. फोटोग्राफीच्या दृष्टीने भरपूर वाट पाहून मिळालेले काही निवडक चांगले फोटो. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मिळाले ते एक अलौकिक समाधान आणि जगण्याला अर्थ देईल अशी उर्जा !!
Mountains are lovely, high and steep
But I have promises to keep
And many to climb, before I sleep
Many to climb before I sleep !!
(Based on original lines from famous poet Robert Frost)
प्रतिक्रिया
7 May 2014 - 12:15 am | जयंत कुलकर्णी
अतिसुंदर फोटो काढले आहेत...........कुठला कॅमेरा आहे ? व्हाईट बॅलन्स ऑटो वर का प्रत्येकवेळी अॅडजस्ट केला ?
7 May 2014 - 11:20 am | सह्यमित्र
धन्यवाद जयन्त. कॅमेरा निकॉन डी-३१०० आहे. व्हाईट बॅलन्स ऑटो वर ठेवला आहे. नन्तर फोटो एडिट करताना गरजे नुसार बदलला आहे.
7 May 2014 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
वॉ.......व! तिसरा फोटू अमेझिंग आहे. *clapping* जब्बरदस्त!
7 May 2014 - 12:53 am | लॉरी टांगटूंगकर
अप्रतिम जमलंय!
7 May 2014 - 9:19 am | प्रचेतस
छान लिहिलंय एकदम.
7 May 2014 - 11:22 am | सह्यमित्र
लेख वाचून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद!!
7 May 2014 - 11:25 am | स्पंदना
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
सुरेख! सुरेख!!
7 May 2014 - 12:04 pm | शरभ
मस्त. फोटो अमळ कमी टाकलेत असं वाटुन गेलं, पण मस्त लिहीलय.
7 May 2014 - 1:04 pm | यशोधरा
वा! सुरेख!
7 May 2014 - 5:10 pm | पिलीयन रायडर
हे ही फोटो दिसत नाहीत... *bad*
7 May 2014 - 6:09 pm | सह्यमित्र
आपण कोणता वेब ब्राऊजर वापरत आहात? IE 9 किन्वा पुढील version वापरुन बघा.