(हिवाळ्यातील रात्रीभोजनासाठी ) ओल्या हळदीची लज्जतदार भाजी

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
20 Feb 2014 - 12:03 am

रात्री ८ -९ च्या दरम्यानची वेळ असावी छान भूक असावी पंजाबी डिशेस खूप खाऊन कंटाळा आला आहे आणि मराठी जेवणही खूप दिवसात केल नाही (मीस केलयं) आणि त्यात पंजाबी कुटूंबा सोबत गरमा गरम भाता सोबत पंजाबी कढी मिळावी. ते कढी म्हणत असले तरी थोड्याशा फरकान असतं ते आपल्या कडच पिठलच पण त्याच वेगळेपण म्हणजे त्यातली कांदाभजी. पिठल भात एकत्र करतोय आणि त्यात कांदाभजींचा आस्वाद सहाजपणे मिसळतोय आहा !

जसा मी बाकी पंजाबी भाज्यांचा फारसा चाहता नाही; तसेच राजस्थानी दालबाटी रुचकर असली तरी माझ त्या डिशशी नातं बेताचच पण योगा योगाने दोनवर्षां पुर्वी शोध लागला तो एका वेगळ्या राजस्थानी पक्वान्नाचा ती म्हणजे ओल्या हळदीची भाजी. पंजाब आणि उत्तरेतल्या सर्व भाज्या एकी कडे आणि ही राजस्थानी ओल्या हळदीची भाजी एकीकडे.

आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात हिवाळा सुरू होतो आणि भाजी बाजारात ओली हळद मिळू लागते. कॅलरी कॉशस वगैरे असालतर हव तर नंतर दुसर्‍या दिवशी उपवास करावा पण हिवाळ्यात दोन संध्याकाळच्या जेवणात तरी होऊन जावीच अशी लज्जतदार !

दोन बाय दोनच्या कुटूंबाला साधारणतः २०० ग्रॅम ओली हळद पुरेल; खवा १०० ग्रॅम; ताज दही अर्धा लिटर; साजुक तुप सव्वा वाटी (मध्यम आकाराची)
**मसाला: आल्याचा छोटा तुकडा; दोन तमाल पत्र; चार लवंगा; चमचा भर शहाजीरे; सात आठ मिरे; कलमी दालचिनी; मीठ; आवडत असल्यास दोन चमचे लाल मिर्ची पावडर + आवडत असल्यास एक चमचा साखर
** भाज्या: मटार अर्धी वाटी बाकी इच्छा आवड आणि मूडनुसार ग्रेव्हीत तुम्हाला आवडणार्‍या कोणत्याही भाज्या जसे की फ्लॉवर; बीन्स; सिमला मिर्च; गाजर किंवा पनिरही चालेल.

तयारीत प्रथम भाज्यांचे इंचभर लांबीचे लांब काप करून ठेवा. आल्याचा तुकडा आणि सोबत कलमी दालचिनी; चार मिरे; दोन लवंगा; एक तमालपत्र आणि शहाजिरे एकत्र वाटून घ्या. ओली हळद खिसून घ्या. अर्धा लिटर दही घुसळून ठेवा.

खिसलेली ओली हळद दुरून अगदी खिसलेल्या गाजरां सारखी दिसते ती सव्वा वाटी तुपातल्या अर्ध्या तुपात खरपूस परतून घ्या (घमघमाट मस्त येतो). चमचा भर तुपात आधी वाटलेला मसाला मग उरलेला सबंध मसाला म्हणजे चार मिरे दोन लवंगा एक तमालपत्र टाकून भाज्या परतून ठेवा. आता उरलेल्या तुपात खवा परतून घ्या. प्रथम खाणार्‍यांना हळदीची भाजी उग्र वाटू शकते म्हणून पहिल्या वेळी खवा आणि दही वरील प्रमाणापेक्षा जरासे जास्त वापरणे चांगले. खवा परतून झाला की त्यात परतलेला मसाला भाज्या असतील तर भाज्यांसहीत टाका मग परतलेली हळद आणि शेवटी घुसळलेले दही.

भाजी पहिली पाच मिनीटे मोठ्या आचेवर उकळी आली की नंतर पंधरा ते वीस मिनीट लहान आचेवर शिजू द्या. घुसळूनही दही खूप घट्ट असेलतर दिडवाटी पाणी अ‍ॅड करण्यास हरकत नाही शिजण्याच्या प्रोसेस मध्ये साधारणतः दिडवाटी लिक्वीड आटले पाहिजे. शिजत आल्या नंतर ग्रेव्हीस हळदीचा छान हलका तांबूस रंग येतो आणि परतताना वापरलेल्या तुपाचा तवंग भाजीच्या वर दिसावयास लागतो. चुली(गॅस)वरून काढल्या नंतर पाच मिनीटे वाफ दबू द्या. मटार आणि पनीर वापरत असाल तर साधारणतः भाजी पहिले दहा मिनीटे शिजल्या नंतर टाका. आणि तुम्ही ओल्या हळदीची लज्जतदार भाजी सर्व्ह करण्यास तय्यार. भाजी सोबत पोळी रोटी अथवा भाकरी मस्त जमते सोबतीला सॅलड मध्ये इतर कच्च्या भाज्यांबरोबर मुळा आणि शक्य झाल्यास पातीचा कांदा मसाला किंवा भाजलेले पापड आणि जेवण झाल्या नंतर मसाला ताक असेल तर अती उत्तम.

चिक्कार ओली हळद आणि कॅलरीज असल्यामुळे आरोग्य विषयक प्लस बाजू कफाचा त्रास असलेल्यांना खासकरून हवामान बदलाच्या वेळी त्रास होत असल्यास हिवाळ्याच्या सुरवातीस आणि हिवाळा संपताना भाजीचा बेत अवश्य करून पहा फरक जाणवेल. या भाजीच्या रेसिपीच क्रेडीट राजस्थानातन आलेल्या माझ्या भाजी वाल्याचं. मी अद्याप करून पाहील नसल तरी नारळ प्रेमी अथवा नॉनव्हेज प्रेमी रेसिपीत स्वयंप्रेरणेने काही बदल करून पाहण्यास संधी आहे अस वाटतं.

ओल्या हळदीची  लज्जतदार भाजी

Bhakri

Salad

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

20 Feb 2014 - 12:20 am | आयुर्हित

छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. लवकर करून पाहतो!
तूपाचा थर जबरा आहे. तूप जिरवायला मॅरॅथॉनची सवय लावावी लागेल.

माहितगार's picture

20 Feb 2014 - 12:29 am | माहितगार

जरूर; अवश्य करून पहावीच अशी !

तूपाचा थर जबरा आहे. तूप जिरवायला मॅरॅथॉनची सवय लावावी लागेल.

हिवाळ्यात जॉगींग जमले नाहीतर किमान वॉक तसाही घेतला पाहीजे. हि भाजी खाल्याच्या निमीत्ताने २०० मीटर अधिक चालावे. ( प्रती वाटी नाही तर मॅरॅथॉनची सवय निश्चित लावावी लागेल :) ) . कुटूंबात मुलं असतील तर त्यांना चवीकरता भारी आवडेल आणि हिवाळ्यात त्यांच्या तब्येतीलाही मस्त.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2014 - 1:17 am | प्रभाकर पेठकर

हम्म्म! हळदीचा स्वाद आणि खवा-दह्याचे कालवण हा प्रयोग करून पाहिला पाहिजे.
छायाचित्र, प्रयोगासाठी प्रोत्साहित कर॑णारं आहे.

माहितगार's picture

20 Feb 2014 - 9:18 am | माहितगार

पहील्यांदा ऐकल तेव्हा खवा-दह्याचे कालवण मलाही वेगळच काहीतरी वाटल पण हळदीचा स्वाद आणि सोबतीला अल्प मसाले चांगला समतोल साधतात मस्त रंगत आणतात. यावर्षी भारतात हिवाळा जरा लांबला आहे हवेत अजूनही गारवा आहे त्यामुळे काल भाजीने जेवणात चांगली रंगत भरली (तसा हा ओल्या हल्दीचा केशरी घाट तुमच्यासर्वांच्याही जेवणाची पंगत रंगत भरवणारा ठरो अशी शुभेच्छा) म्हणून म्हटले पाकृ मिपावर शेअर करावी.

प्रतिसादा करता धन्यवाद

मराठीप्रेमी's picture

20 Feb 2014 - 3:07 am | मराठीप्रेमी

मला आंबेहळदीचे लोणचे खुप आवडते पण अशी भाजी प्रथमच बघतो आहे.

स्पंदना's picture

20 Feb 2014 - 4:13 am | स्पंदना

वेगळच काही!
अपर्णा ट्राय करणार? पाहू..

इन्दुसुता's picture

20 Feb 2014 - 6:55 am | इन्दुसुता

वेगळी पाकृ आवडली... नक्की करून पाहणार.

मुक्त विहारि's picture

20 Feb 2014 - 8:28 am | मुक्त विहारि

नक्की करून बघणार.

प्रचेतस's picture

20 Feb 2014 - 8:41 am | प्रचेतस

मस्त पाककृती.
ट्रान्सपोर्टनगरातल्या रामदेव ढाब्यावर ही भाजी खाल्लेली आहेच.

माहितगार's picture

20 Feb 2014 - 9:33 am | माहितगार

वल्लींनी दुजोरा दिला आहे म्हटल्यावर मिपाकर भाजी नक्कीच ट्राय करतील असे वाटते.

@वल्ली; बाकी आपण म्हणता ते ट्रान्सपोर्टनगर कुठेशीक (कोणत्या शहरातल; आंतरजालावर उत्तरेतल्या दोनचार शहरांचे शोध आले) आहे ?

वल्ली; मुक्त विहारि; इन्दुसुता; aparna akshay; मराठीप्रेमी प्रतिसादांकरता धन्यवाद

प्रचेतस's picture

20 Feb 2014 - 10:30 am | प्रचेतस

ते पिंपरी चिंचवड महापालिकाक्षेत्रातील निगडी नामक विभागात भक्ती शक्ती उद्यानाच्या मागील बाजूस अप्पूघरानजीक आहे. पिंपरी चिंचवड एमायडीशीत मालवाहतूक करणारे बरेचसे ट्रक विश्रांती तेथे घेत असतात म्हणून त्यास ट्रान्सपोर्टनगर म्हटल्या जाते. :)

बाकी तिथेही ही भाजी हिवाळ्याच्या तीन/चार महिन्यांतच मिळते.

अरे व्वा !! रामदेव ढाबा पुण्याच्या मंडळींना जवळ आहे तर; म्हणजे आधी अप्पूघर आणि नंतर रामदेव ढाबा असही जमवता येऊ शकेल.

पिंपरी आणि चालू विषयामुळे आठवलं

पिंपरीच्या Dr. D.Y. Patil College of Engineering कॉलेज जवळ एक पंजाबी खाणावळ (मेस) होती अस आठवतय (अजून आहे का माहीत नाही माझ्या भेटीला बरीच वर्ष झाली). बाहेर गावच्या बर्‍याच मुलांचा तिथे राबता असायचा. त्या ठिकाणी या लेखाच्या सुरवातीस मी वर्णन केलेला पंजाबी कढी पहिल्यांदा ट्राय केली अगदी हटके आणि झकास होती. योगा योगाने परदेशातील वास्तव्यात एक पंजाबी कुटूंब शेजारी होत. जेव्हा त्यांची कढी आवडते असं सांगीतल तेव्हा संध्याकाळच्या पंगतीला अधून मधून आवर्जून बोलावत असतं. :)

स्वाती दिनेश's picture

20 Feb 2014 - 1:04 pm | स्वाती दिनेश

हा प्रकार वेगळाच दिसतो आहे, फोटो टेम्टिंग दिसतोय.
(फोटोतही तूप जाणवते आहे..)
स्वाती

सूड's picture

20 Feb 2014 - 2:07 pm | सूड

हटके आहे पाकृ!!

सानिकास्वप्निल's picture

20 Feb 2014 - 2:39 pm | सानिकास्वप्निल

नवीन प्रकार आहे...पाकृ आवडली
फोटो पण मस्स्स्त्त्त्तं

हि भाजी नक्की करून पहिली पाहिजे.
बाजारात ओली हळद बरेच वेळा दिसते. तिचे लोणचे करतात हे माहित होते आणि करतोही, पण अशी भाजी मात्र माहित नव्हती, नवीन माहिती मिळाली. कफ प्रधान प्रकृती ला उत्तम आहे.

अवांतर,
कासाळू नावाची अळूची एक जात आहे त्याचा सांडगा केला आणि खाल्ला आहे पण वा. ग. देसाई यांच्या पुस्तकात "बंगालात याच्या कंदाची भाजी करतात" असा उल्लेख आहे कोणी बंगाली बाबू संपर्कात आला तर विचारीन म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Feb 2014 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

मी अगदी अश्शीच बाबा रामदेव ढाब्यात खाल्लीवती. येकदम हेल्दी प्रकार.

माहितगार's picture

21 Feb 2014 - 4:26 pm | माहितगार

स्वाती दिनेश; सूड; सानिकास्वप्निल; अत्रुप्त आत्मा आपणा सर्वांना प्रतिसादांकरीता धन्यवाद आणि शुभेच्छा

पैसा's picture

23 Feb 2014 - 3:43 pm | पैसा

एकदम वेगळीच पाकृ!

सुहास झेले's picture

23 Feb 2014 - 3:45 pm | सुहास झेले

सहीच... एकदम हटके पाककृती खूप खूप आवडली :)

झकासराव's picture

24 Feb 2014 - 2:15 pm | झकासराव

रामदेव धाब्यात ही भाजी, गव्हाच्या रोटल्यासोबत हाणावी.
पोटात जागा शिल्लक ठेवुनच.
मग रबडी आणि गुलाबजामुनचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
तिथुन लोकमान्यसमोरच्या पानवाल्याकडे जावे आणि आपल्या आवडीचे पान घ्यावे.
लैच सुख.. :)

ओली हळद दिसते कशी याचा फोटो देता येईल का?
म्हणजे भाजीमार्केट मधे ती मिळते का ते बघता येईल.

माहितगार's picture

24 Feb 2014 - 2:59 pm | माहितगार

धागा अजूनही वर तरंगतो आहे पाहून आनंद झाला. पैसा; सुहास झेले; झकासराव; मनीषा यांना प्रतिसादा करता धन्यवाद.

@मनीषा खरतर हळकुंड या स्वरूपात वाळण्या आधीच शेतातून आलेल्या फ्रेश हळदीच रुप यालाच आंबेहळद म्हणतात का ते मलाही माहीत नाही जाणकारांनी सांगांवे. आले आणि हळद दोन्हीही Zingiberaceae कुळातले त्यामुळे दिसण्यात लक्षणीय साधर्म्य भाजीच्या दुकानात नजर सरावल्या शिवाय ही ओली हळद म्हणून वेगळे सांगणे कठीण जाईल पण हिवाळ्याच्या सिझन मध्ये भाजीच्या दुकानात आल्या पेक्षा हळदीची क्वांटिटी जास्त असल्यामुळेही सहज नजरेस भरते. बाकी छायाचित्रे खाली दिलीतच.

"commons"

हल्दी२

*हळदीची अधीक माहिती १
* हळदीची अधिक माहिती २

या धाग्यांवरही ओल्या हळदीची छायाचित्रे उपलब्ध आहेत.

मनीषा's picture

24 Feb 2014 - 5:58 pm | मनीषा

धन्यवाद !

चाणक्य's picture

20 Dec 2014 - 11:11 pm | चाणक्य

करून बघितली ही पाकृ. मस्त झाली. मला नुकताच मुलगा झालाय...त्यामुळे बायकोसाठी आवर्जून केली हळदीची भाजी. घरातल्या सगळ्यांना आवडली.....धन्यवाद माहितगार एका नवीन पाकृबद्दल.

माहितगार's picture

21 Dec 2014 - 5:28 pm | माहितगार

मोस्ट वेलकम. एवढ्या आठवणीने भाजी केलीत आणि प्रतिसाद पण नोंदवलात. हळद मार्केटमध्ये आली आहे पण या सिझन मध्ये माझेही हळद आणणे अद्याप झाले नाही. आठ दहा दिवसात जमले तर पहातो.

माहितगार's picture

21 Dec 2014 - 5:32 pm | माहितगार

मला नुकताच मुलगा झालाय...

आपल्या परिवरातील नवीन सभासदास आणि आपणा उभयतास या निमीत्ताने शुभेच्छा .

पैसा's picture

4 Jan 2015 - 2:15 pm | पैसा

1

मी केलेले बदलः मसाल्याबरोबर तुपावर कांदा परतला. मसाल्यात एक हिरवी मिरची टाकली. (भाजीत कुठे तिखट वस्तूचा उल्लेख दिसला नव्हता.) हळदीबरोबर गाजर, मटार आणि टोमॅटो घातले. खवा असल्यामुळे दीड वाटी तूप घालायची हिंमत झाली नाही. नेहमी घालतो तेवढे घातले.

ओल्या हलदिच्या लोण्च्याची पाक्रु मिलेल का?