काल गेले होते हॉटेल पर्णकुटीला. सोबत बहिणी अन भाचरांची ग्यांग. एकजात सगळे अट्टल मटनखाऊ. पण बहिण म्हणाली 'मी डाएटवर. !'
‘मग बटाट्याची भाजी सांगू ?’ मला जोडी मिळाली म्हणून मी खुश.
‘हुं ?’ बहिणाबाईने हे कुठलं वडगाव बुद्रुक पेश्शल अशा काहीशा नजरेनं माझ्याकडे कटाक्ष टाकला.
‘मी बाई फीssश खाणार ! त्यात कोलेस्टेरोल नसते ना ?’ बहिण.
मी गार. ‘अगं कोलेस्टेरॉल मासा किंवा बकऱ्यात थोडीच असते ? ते आपल्या रक्तात असते.’
‘होय, होय माहितेय बरं, विदुषीबै ! तुमी खा बटाट्याची भाजी !’
यावर मी उठून तरातरा पर्णकुटीच्या शेफकडे गेले, जो माझा मावसभाऊ आहे.
अन तिथली तयारी बघून जे डायरेक्ट फोटू घ्यायला लागले, ते फीssश फ्राय प्लेटीत विराजमान झाल्यावरच थांबले.
म्हणजे आधी शेफसाहेबांनी आलेलसूण पेस्ट, दोन चमचे तिखट, दोन चिमटी मीठ अन धणेजिरे पूड हे सगळं कोकमच्या आगळमध्ये कालवून त्या फीशच्या पाकळ्या मस्त मॅरीनेट करून ठेवलेल्या.
मग रवा अन ज्वारीचे पीठ एका ताटात घेऊन त्यात खालवर घोळून घेतले.
इकडे तेल पॅनमध्ये तापत ठेवले होते, त्यात फीश पाकळ्या सुमारे दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून काढल्या.
झाले फीश फ्राय तयार ! आहे ना झटपट डायेट पाकृ ?
चला , मटणखाऊ लोक्सहो, डायेट कार्याला सुरुवात करा पाहू ?
प्रतिक्रिया
10 Feb 2014 - 10:37 pm | किसन शिंदे
अरारा.. डोळे बंद करून घ्या ब्वाॅ! मी म्हटलं दुसरं कायतर असावं.
10 Feb 2014 - 10:39 pm | मुक्त विहारि
तोंपासू.
लाळ गळायला लागली आहे.
असो...
10 Feb 2014 - 10:47 pm | सुहास..
हे तेल जर कोकोनट असेल तर ते कोच्ची स्पेश्शल आणि जर ऑलीव्ह असेल तर .......ओळख ..
10 Feb 2014 - 10:51 pm | सस्नेह
प्रबुद्ध मानवा, हे तेल मॅरिनेशन मुळे ईस्टमन कलर दिसत आहे...
10 Feb 2014 - 11:27 pm | आदूबाळ
व्हाट/व्हेयर इज पर्णकुटी?
11 Feb 2014 - 10:21 pm | सस्नेह
या की राव आमच्या गावाला ! पर्णकुटी दावते तुम्हाला.
12 Feb 2014 - 9:08 pm | आदूबाळ
व्हाट/व्हेयर इज युवर गाव?
11 Feb 2014 - 7:26 am | स्पंदना
माश्यान खुळावल मन. आता खाल्लाच पाहिजे.
रच्याकने डायट बहिणीच अन पाकृ भावाची अस काहीस गोंधळात टाकणार समिकरण दिसतय.
तरीही शेवटी मासा पोटात जाण्याशी मतलब नाही का?
मलासुद्धा बेसना/तांदळाच्या पिठा ऐवजी ज्वारीच्या पिठाचीच चव आवडते माश्याला.
11 Feb 2014 - 8:25 am | पैसा
चक्क तळलेले मासे खाऊन डाएट? भारी आहे!! =))
11 Feb 2014 - 8:48 am | मुक्त विहारि
आरोग्यवर्धक खाद्य = मिंग्लीश डायट
त्यामुळे कुणाचे आरोग्य कुठल्या खाद्द्य पदार्थांनी राखले जाईल, ह्याची खात्री देता येत नाही.
मटन, अंडी.मासे आणि कोंबडी खावून पण आरोग्य राखल्या जाते.
11 Feb 2014 - 8:54 am | पैसा
पण ते असे तेलात बुडबुड तळून नव्हे! तेलकट न करता नुसते शिजवून/तव्यावर तेलाशिवाय पानात भाजून आणि प्रमाणात खाल्लंत तर हे सगळे पदार्थ डाएटसाठी चांगलेच आहेत!
11 Feb 2014 - 8:34 am | अजया
=))
11 Feb 2014 - 8:54 am | सुनील
अहो स्नेहांकितातै. तुमची ती पर्णकुटी म्हणजे बकिंहॅम पॅलेस आहे की राष्ट्रपती भवन? आँ. जरा नाव, गाव, पत्ता द्या की!! :)
बाकी तळलेला मासा खाऊन डाएट करायची ऐइय्या आवडली. आपण आता रोजच डाएटवर!!
11 Feb 2014 - 8:55 am | पैसा
जोंधळ्याचं पीठ लावून तळलेले मासे पहिल्यांदा बघितले. नवर्यावर प्रयोग करण्यात येईल.
11 Feb 2014 - 10:25 am | इरसाल
वाचव रे पैताईच्या नवर्याला........त्या म्हणे त्यांना जोंधळ्याच्या पीठात घोळवुन तळणार आहेत :ऑ
11 Feb 2014 - 10:37 am | पैसा
पाकृचे नवे प्रयोग सहन करण्यापेक्षा ते परवडलं म्हणेल तो!!
11 Feb 2014 - 10:35 am | आतिवास
फसवणूक करणारा धागा ;-)
स्नेहांकिताचा धागा म्हणजे काहीतरी खुसखुशीत असणार, हा अंदाज खरा ठरला!
लोक डाएट करतात म्हणजे नक्की काय(काय) खातात याचं कुतूहल वाटतं. ही पाकृ वाचून थोडा अंदाज आला.
11 Feb 2014 - 11:20 am | दिपक.कुवेत
पाहुन प्रचंड जळजळ होतेय. असो ह्याचे उट्टे येत्या भारतवारीत भरुन काढण्यात येईल. मंडळि येत्या मार्च मधे कुठे कोकण फेस्टिवल वगैरे आहे काय?? मनसोक्त मासे खायचे आहेत त्यातल्या त्यात असे तळलेले डाएट मासे!
11 Feb 2014 - 1:54 pm | Mrunalini
असं डाएट फुड असेल तर मी आजन्म डाएट करायला तयार आहे.
11 Feb 2014 - 2:38 pm | सानिकास्वप्निल
=)) भारी डाएट पाकृ
तळलेले मासे बघून तोंडात तळे साठले आहे ;)
बाकी ज्वारीच्या पिठात मासे तळले तर ते मस्तं चुरचुरीत लागतात (स्वानुभव)
11 Feb 2014 - 2:44 pm | कवितानागेश
कित्ती कित्ती अपेक्षेनी धागा उघडला होता.
असो. मॅरिनेशन सोपे आणि छान आहे. तसे बटाट्याला करुन बघू. :)
11 Feb 2014 - 10:01 pm | सस्नेह
माऊ, माऊ, माझ्याकडून भलत्या अपेक्षा नको गं ठेवू...
11 Feb 2014 - 3:33 pm | शिद
फोटो पाहुन भुक चाळवली...पण तुकडे कसले आहेत, पापलेट की सुरमई?
11 Feb 2014 - 7:34 pm | सस्नेह
सुरमई आहेत पण पापलेट त्यापेक्षा छान लागतात (म्हणे)
11 Feb 2014 - 8:00 pm | मुक्त विहारि
चवी मुळे आणि ते बनवणार्याच्या हातात असलेल्या कौशल्यामुळे....
आज्जीच्या हातच्या बांगड्याच्या भुजण्याची चव बायकोच्या तर सोडाच, आईच्या हातच्या बांगड्याला पण येत नाही...
असो....
(अट्टल नसलो तरी मासे चापण्यात पटाईत) मुवि
11 Feb 2014 - 9:54 pm | शिद
सुरमई बेस्ट की पापलेट हे खाण्यार्यावर अवलंबून आहे पण मला तरी सुरमई जास्त आवडते...पण भरलेला पापलेट फ्राय असेल तर मग क्या कहने...सगळ्यात सरस.
असो...उगाच आठवणी काढुन लाळ जमा झाली आणि हे मासे ईथे मिळत देखील नाहीत... :(
12 Feb 2014 - 8:56 pm | पिंगू
आर्र, तळलेले माश्याचे तुकडे म्हणजे डायट फूड.. कैच्याकै..
पात्रानी माशाचा प्रकार जो असतो, त्यालाच खरी माशाची डाएट पाककृती म्हणता येईल..