चिकन चिली

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
29 Jan 2014 - 5:36 pm

साहित्य-
५०० ग्राम बोनलेस चिकन,
२ ते ३ हिरव्या मिरच्या मध्ये फोडून लांब चिरुन (पोपटी मिरच्या कमी तिखट असतात, गडद हिरव्या मिरच्या घ्या. तरीही जास्त तिखट हवे असल्यास एखादी मिरची वाढवा..)
१ मोठी किवा दोन लहान भोपळी मिरच्या लांब तुकडे करुन त्यातील बिया राहू द्यात.
१ मध्यम कांदा- खेकडा भज्यांना चिरतो तसा.
२ ते ३ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर,
२ ते ३ टेबलस्पून सोया सॉस, १ चमचा चिली सॉस, १ चमचा मिरपूड, १ चमचा विनेगर किवा लिंबाचा रस
१ अंडे
७-८ लसूण पाकळ्या बारीक चिरुन (मोठ्या पाकळ्या असतील तर ३ ते ४)
२ चिमटी अजिनोमोटो (ऑप्शनल)
तेल, मीठ, पाणी

कृती-
चिकनचे बोटाच्या आकारचे लांब तुकडे करा.
त्यात २ चमचे कॉर्न फ्लोअर,चमचाभर मिरपूड,१/२ चमचा मीठ घाला.१ अंडे फोडून घाला,१ टेबलस्पून सोया सॉस घाला व कालवा. मॅरिनेशनसाठी फ्रिजमध्ये साधारण अर्धा तास ठेवा.

चिकन मॅरिनेट होईपर्यंत बाकीचे इतर लागणारे जिन्नस समोर काढून ठेवा व भाज्या चिरुन ठेवा.

चिनी जेवण मोठ्या आचेवर आणि पटापट करावे लागते म्हणून सग़ळे जिन्नस हाताशी ठेवा.

एका पसरट पॅन मध्ये/ चिनीवोक मध्ये साधारण ३ टेबलस्पून तेल गरम करुन घ्या व त्यात हे मॅरिनेटेड चिकनचे तुकडे लालसर रंगावर शॅलो फ्राय करा व बाजूला काढून ठेवा. जास्त शिजवू नका कारण नंतर परत शिजवायचे आहे.
खरं म्हणजे चिकनचे तुकडे तेलात तळतात पण मी थोड्या कॅलरी वाचवायला शॅलो फ्राय करते.

आता आच मोठी ठेवा व त्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलात लसणीचे तुकडे घाला व परता.
हिरव्या मिरच्या मध्ये फोडून लांब कापून त्यात घाला व परता.
कांदा घाला व परता. नंतर भोपळी मिरच्यांचे तुकडे घालून परता.

त्यात १ ते १.५ टेबल स्पून सोया सॉस व १ टेबलस्पून चिली सॉस घाला व परता.
१/२ ते पाऊण कप चिकन स्टॉक किवा पाण्यामध्ये १ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर घालून ढवळा व हे मिश्रण पॅन मध्ये घाला, एक उकळी येऊ द्या.
(चिकन स्टॉक नसेल तर पाणी वापरा.)
एक उकळी आली की चिकनचे तुकडे त्यात घाला व टॉस करा.

मीठ घाला, मीठ घालताना लक्षात असू द्या की चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेले आहे शिवाय सोयासॉस व चिली सॉसमध्येही मीठ असते.
२ चिमटी अजिनोमोटो हवे असल्यास घाला.
१ टी स्पून व्हिनेगर घाला.व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस चमचाभर घाला व ढवळा.
स्टार्टर चिकन चिली तयार आहे.

.

ग्रेव्ही हवी असेल तर अजून अर्धा कप पाण्यात चमचाभर कॉर्न फ्लोअर व किंचित मीठ घालून ते मिश्रण ह्यात घाला व उकळी येऊ द्या.चिकन चिली तयार आहे.फ्राईड राइस बरोबर सर्व्ह करा.

.

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

29 Jan 2014 - 6:12 pm | सुहास..

झक्कास !!

कपिलमुनी's picture

29 Jan 2014 - 6:19 pm | कपिलमुनी

पाकृ आवडली आहे .

सुहास झेले's picture

29 Jan 2014 - 6:21 pm | सुहास झेले

मस्तच... :)

कातील दिसताहेत फोटो...मस्त चखना...!!!

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2014 - 6:40 pm | दिपक.कुवेत

फोटो बघुन चीकनसारखेच हाल हाल झाले.

यशोधरा's picture

29 Jan 2014 - 6:44 pm | यशोधरा

सह्ही! :)

मस्त दिसतेय.
पनीर चिली आठवली.

सौंदाळा's picture

29 Jan 2014 - 7:20 pm | सौंदाळा

मस्त. आवडती डिश
कळकट्ट चायनिज टपरीवर मात्र याची चव खुलुन येते एकदम ;)

गणपा's picture

29 Jan 2014 - 9:15 pm | गणपा

टोंपासु. :)

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2014 - 10:01 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ :)

जेपी's picture

30 Jan 2014 - 5:31 pm | जेपी

एकदम भारी .

पैसा's picture

31 Jan 2014 - 8:13 pm | पैसा

मस्त पाकृ आणि फोटो!

अनन्त अवधुत's picture

5 Feb 2014 - 2:27 am | अनन्त अवधुत

अजिनोमोटो म्हणजे?

बहुगुणी's picture

5 Feb 2014 - 3:50 am | बहुगुणी

अजिनो मोटो हे खरं तर विख्यात जपानी कंपनीचं नाव आहे, ज्यांचं मोनोसोडियम ग्लुटामेट हे 'सिझनिंग' (एक प्रकारचा मसाला म्हणून वापरला जाणारं) एक प्रमुख उत्पादन आहे (याच कंपनीचं aspartame हे दुसरं प्रसिद्ध उत्पादन.)

आपल्या गोड, तिखट, खारट आणि आंबट या भारतीय चवींपेक्षा वेगळी अशी, अजिनो मोटोची 'उमामी' ही चव (savory) ही पाचवी चव समजली जाते.

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2014 - 8:56 am | प्रभाकर पेठकर

'aspartame' हे साखरेला पर्याय (स्वीटनर) म्हणून वापरलं जातं. पण ह्याने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराला आमंत्रण दिलं जातं असही म्हणतात. म्हणून मधूमेह्यांनी, वजन काबूत ठेवणार्‍यांनी बिनसाखरेचे बेचव पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यावी पण कृत्रीम साखरेचे पदार्थ (मिठाई वगैरे) आणि चहासाठीही, स्वीटनर्स टाळावेत.

अनन्त अवधुत's picture

7 Feb 2014 - 3:08 am | अनन्त अवधुत

बहुगुणी आणि प्रभाकर पेठकर, दिलेल्या माहिति बद्दल धन्यवाद.

उपाशी बोका's picture

5 Feb 2014 - 5:07 am | उपाशी बोका

बघून तोंडाला पाणी सुटले.