ढोकळा

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Jan 2014 - 9:29 pm

ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी-
साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा,
पाऊण ते १ चमचा खायचा सोडा,
१/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्,
साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर

कृती-
अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या.
त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते.
त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला. चव बघून वाटल्यास थोडे मीठ घाला.
एका पसरट पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. एका थाळीला तेलाचा हात लावून घ्या.
पाणी चांगले उकळले की ढोकळ्याच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व फेटून घ्या. मिश्रण फसफसताना दिसले की थाळीत ओता आणि पॅन मध्ये वाफवायला ठेवा.
वर घट्ट झाकण ठेवा.ह्या झाकणाला पंचाने घट्ट बांधा म्हणजे वाफेचे पाणी त्यात शोषून घेतले जाईल व ढोकळ्यावर पडणार नाही- (ही चकलीची सुचवणी)
साधारण १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवा, नंतर आच बंद करा व २ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थाळी बाहेर काढा. गार झाला की वड्या पाडा.
ढोकळा वाफवत ठेवला की एकीकडे २ टेबल स्पून तेल तापवा, त्यात चमचाभर मोहरी,घाला. ती तडतडली की हिंग घाला. फोडणी गार झाली की त्यात एक चमचा साखर + १ चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण घाला.
ढोकळ्यावर ही फोडणी ओता, ओले खोबरे व कोथिंबिरीने सजवा.

.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 9:44 pm | मुक्त विहारि

ढोकळा अजिबात कर्रून बघणार नाही.

आमच्या ढोकळ्याच्या नेहमी पाटवड्याच होतात.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2014 - 10:21 pm | स्वाती दिनेश

खायचा सोडा/इनो योग्य प्रमाणात घाला,जुना सोडा घालू नका. सोडा मिश्रणात घातल्यावर लगेचच फेसून अर्ध्या मिनिटात मिश्रण फसफसले की लगेचच थाळीत ओतून वाफवत ठेवा.वाफवायचे पाणी चांगले उकळलेले हवे,
आणि एवढेही करुन पाटवड्याच झाल्या तर अमिरी खमण करा.. :)
स्वाती

शिद's picture

27 Jan 2014 - 9:44 pm | शिद

काय जबरा दिसतोय ढोकळा... पटकन उचलुन खावासा वाटतोय...(आता खाऊ शकत नाही म्हणुन :( )

यशोधरा's picture

27 Jan 2014 - 9:45 pm | यशोधरा

तू भारतात कधी येणार, सांग ;)

सानिकास्वप्निल's picture

27 Jan 2014 - 9:56 pm | सानिकास्वप्निल

ढोकळ्याची वेगळी पाककृती आवडली, ह्या विकांताला बनवणारचं...कनफर्म :)
धन्यवाद.

संध्याकाळी पोटात कावळे ओरडत असताना का टाकतेस असलं काही? :(

जरा क्लोSSजप फटू टाकायला हवा होता, म्हणजे उचलून तोंडात टाकला असता !

हा पदार्थ मला कध्धी जमणार नाही याची खात्री आहे तरी वरील पाकृ वाचून थोडा उत्साह आलाय. जमल्यास ढोकळा नैतर अमीरी खमण आहेच!

कवितानागेश's picture

27 Jan 2014 - 11:18 pm | कवितानागेश

वेगळी आहे ही कृती. छान लागतील असे ढोकळे.

जेनी...'s picture

28 Jan 2014 - 12:04 am | जेनी...

वॉव्व .. इ लोवे योउ धोकला

पाकॄ आवडली. पण हे खमण आहे ना? ढोकळा म्हणजे बहुतेक ते चण्याची डाळ आणि तांदुळ भिजवुन वाटुन करतात तो ना? मी हे खमण आणि ढोकळ्या मधे नेहमी गफलत करते. फक्त एवढच नक्की आहे की खमण आणि ढोकळा वेगवेगेळे असतात.

दिपक.कुवेत's picture

28 Jan 2014 - 1:14 pm | दिपक.कुवेत

पण हा प्रकार सहसा आवडत नसल्याने आपला पास.....

अजया's picture

28 Jan 2014 - 10:03 pm | अजया

करुन पाहाते.

पैसा's picture

28 Jan 2014 - 10:21 pm | पैसा

करून बघेन.

इशा१२३'s picture

30 Jan 2014 - 12:33 pm | इशा१२३

करुन बघते..

मदनबाण's picture

31 Jan 2014 - 5:59 am | मदनबाण

यम्म...यम्म्म्म. :)

(सुरळीची वडी हादणारा) ;)

सुहास झेले's picture

31 Jan 2014 - 11:16 am | सुहास झेले

सहीच.. :-)

निवेदिता-ताई's picture

31 Jan 2014 - 12:18 pm | निवेदिता-ताई

मलाही कध्धी जमत नाही ढोकळा....आता असा करुन पाहिन

अमृत's picture

3 Feb 2014 - 11:27 am | अमृत

अगदी छायचित्रात दाखविल्याप्रमाणेच झाला होता.. ढोकळा सोपा केल्याबद्दल धन्यवाद!

सुहास..'s picture

3 Feb 2014 - 8:09 pm | सुहास..

स्वाती झिंदाबाद !!

त्रिवेणी's picture

5 Feb 2014 - 10:43 am | त्रिवेणी

स्वातीताईंच्या रेसीपीने आज ढोकळा करून बघितला.
ढोकळा
ढोकळा