नाशिककर असल्यामुळे तसे बरेचदा त्र्यंबकेश्वर, गंगाद्वार, अंजनेरी, वणी येथे जाणे झाले होते. खरेतर यावेळी आमचे खासे मित्र नयनीश अमेरिकेतुन आल्यावर रतनगडाची मागील वेळी फसलेली मोहीम पार पाडायचे ठरले होते. पण संदीप ने अगदी वेळेवर टांग मारल्यामुळे दोघे जाऊ शकतील व जवळ असेल असे एखादे ठिकाण हवे होते..
रामशेज, अंजनेरी यापेक्शा आम्ही मग ब्रम्हगिरीला पसंती दिली.
ज्योतिर्लिंग असलेल्या या क्षेत्राला शिवाजी महाराजांचेही पाय लागले होते. सुरत लूटी वेळी महाराजांचा येथे मुक्काम होता. तसेच त्यावेळी ही लुट काही दिवस सुरक्षित ठेवण्याचे काम याच दुर्ग भांडार - ब्रम्हगिरी जोड्गोळीने चोख पार पाडलेले होते.
सकाळी लवकरच आम्ही चढाईला सुरुवात केली. वातावरणातील गारवा जाणवत होता. जवळ्पास साडेआठ वाजल्यावर सुद्धा सगळे त्र्यंबकेश्वर अजुन धुक्यातच आळोखे पिळोखे देत होते.
झपझप पावले टाकत लवकरच आम्ही गंगाद्वार येथे पोहोचलो. येथुनच एक आपणास रस्ता ब्रम्हगिरी पर्वतावर घेऊन जातो.
वाटेत एक सुंदर परंतु वापरात नसलेली वास्तु द्रुष्टीस पडली.
गंगाद्वार वाटेपासुन साधारण अर्ध्या तासात आपण विशाल पसरलेल्या कातळापाशी येऊन पोहोचतो. समोर आणि ऊजवीकडे लांबवर पसरलेला कातळ, त्याशेजारील दुसर्या डोंगरांचे कडे जमिनीपासुन थोडे ऊंच आल्याची जाणीव करुन देत होते. आता आमची भर कातळात खोदलेल्या पायर्यांशी गाठ होती. पहिला टप्पा पार करुन आम्ही मारुतीरायापाशी पोहोचलो.
येथेच मारुतीरायाचे दूत अर्थात वानरे असंख्य होती. पुर्वानुभवाने त्याना घाबरविण्यासाठी जरी आम्ही काठी घेतलेली होती तरी खरेतर त्यांचेच पारडे जड होते. ऊंच पायर्यांना एके बाजुने तोंड देऊन वर चढ्तांना त्यानी खिंडीतली अचूक सामरिक जागा निवडली होती. यास्तव ब्रम्हगिरीला जाणारे भाविक वानरांच्या या प्रदेशातून जातांना, त्यांचा आदर राखुन समूहानेच जाणे पसंत करीत होते.
हा थोडे थकविणारा पायर्यांचा मार्ग संपवून आम्ही ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहोचते झालो. आख्यायिकेनुसार गोहत्येच्या पातकातुन मुक्त होण्यासाठी गौतम ऋषिंनी तप करुन शंकराला प्रसन्न केले. तेव्हा शंकराने जटा आपटल्या व दक्षिण गंगा अर्थात गोदावरी नदीचा ऊगम झाला.
शंकराच्या जटा: (कदाचित या लाव्हा रसाच्या खुणा असाव्यात)
ऊगम मंदीरातील गोमुख - गोदावरीचा ऊगम
ब्रम्हगिरी वर जरी भाविकांची बाराही महिने गर्दी असली तरी दुर्गम असल्यामुळे सहसा दुर्ग भांडारच्या वाटेला फारसे कुणी जात नसावे. जटांच्या मंदीरा जवळून जाणारी वाट आम्ही आपलीशी केली. आता भाविकांची गर्दी मागे पडली होती. खोल दरीच्या बाजुबाजूने, वाळलेल्या व अतिशय घसरड्या झालेल्या गवतावरुन जाणारी अरुंद वाट आमचे लक्ष वेधुन घेत होती.
दोन डोंगरांना जोडणारी अरुंद खाच अतिशय चित्तथरारक दिसत होती. हि निरुंद वाट पार करुन पुढील डोंगराची शेवटची बाजू (बुरुज) गाठ्णे हे आमचे ध्येय होते. आता डोंगराचा विस्तार कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा जाणवत होता. या अति ऊत्कंठेमुळेच की काय, आमची भराभर पडणारी पावले नेह्मीची वाट सोडुन एका भलत्याच आडवाटेला लागली. हि वाट आम्हास ब्रम्हगिरी कातळाच्या थेट माथ्यावरच घेऊन गेली. ईथुन आमच्या लक्ष्याकडे जाणारी वाटेने जाण्यासाठी आमच्या ठायी असलेल्या थोडयाफार कि फारचथोडया क्षमतेची कसोटीच बघणारी होती. परंतु दोन्ही बाजुला असलेली खोल दरी व मित्राची दोनच दिवसानंतर्ची अमेरिका वारी बघुन आम्ही माघारी येऊन चुकलेली वाट शोधायचे ठरविले.
चुकीच्या वाटेवरुन माथा गाठल्यावर दिसणारे विहंगम दृश्य
थोड्याच वेळाच्या चाली नंतर डोंगराच्या अगदी पोटातुन निघणारी वाट आम्हाला मिळाली. येथे पोहोचल्याचा अनुभव फारच छान होता.
ऊभ्या डोंगराच्या कातळात खोदलेल्या पायर्या
पायर्या संपल्या तरी हा अनुभव वा थरार संपणार नव्हताच मुळी. या पायर्यांच्या भुयारातून थेट अरुंद खाचे पाशी येण्याआधी
अगदी सरपटत बाहेर यावे लागते अशी ही वाट
दोन डोंगरांच्या अरुंद खाचेमध्ये:
दुर्ग भांडार कडे जातांना परत खाचेच्या दुस्रर्या बाजुला असलेल्या भुयाराला परत साष्टांग दंडवत घालुन आम्ही पायर्या चढुन ब्रम्ह पर्वताच्या दुसर्या बाजूस आलो. येथुन सोपी वाट आम्हास या डोंगराच्या शेवटच्या टोकास घेऊन गेली. येथे एक नैसर्गिक बुरुज आहे. त्यावरुन सभोवतालचा खोल कडा, श्री गहिनीनाथांचे मंदीर दिसत होते. ब्रम्हगिरीच्या मागील बाजुस असलेल्या मेट्घर गावाची दुरवरुन येणारी वळणदार घाटाची वाट, घाट संपल्यावर परंतु गावकुसाबाहेरील छोटेखानी मंदीर एखाद्या चित्राप्रमाणे भासत होते.
दुर्ग भांडार वरून दिसणारे ब्रम्हगिरी:
उजवीकडील पांढरे - श्री गहिनीनाथांचे मंदिर तर डावीकडील मंदिर गंगाद्वार आहे
आता पोटातले कावळे अंतर कापलेल्या जवळ्पास ६०० पायर्या आणि अदमासे ५ किमी ची चढउतार यांची जाणीव करुन देत होती. आणलेला थोडा शिधा (सफरचंद आणि बिस्किट्स) ऊघडायचा विचार केला न केला तेवढ्यात एका कपारीतुन ऊठलेले मध्मश्यांचे तुलनेने छोटे मोहोळ जोराने आमच्या दिशेने येतांना दिसले.
अचानक येणार्या या संकटाची आम्ही कधीच अपेक्षा केलेली नव्ह्ती. सेकंदात ऊड्या मारुन आम्ही बुरुजाच्या भिंतीलगतच्या खड्ड्यात ऊडी मारुन तोंड जमिनीच्या दिशेस करुन व स्वेटर मध्ये लपवून बसलो, तोवर हे पोळे वेगाने आमच्या डोक्यावर आले आहे याची जाणीव झाली. एकमेकांचे जोरात चालणारे श्वास संकटाच्या गंभीरतेची साक्ष देत होते. दोन चार माश्या आमच्या जवळ देखील खाली आल्या. याच अवस्थेत साधारण मिनिट्भर गेल्यावर ते पोळे मार्गस्थ झाले.
दुर्ग भांडारचे शेवटच्या टोकाकडील बुरुज
खाण्याचा बेत रहीत करुन आम्ही लगबगीने मुळ ब्रह्मगिरी च्या दिशेने परतीला निघालो. पायर्या, भुयारे एका दमात पार करून साधारण अर्ध्या तासात जटा मंदीरापाशी पोहोचलो. येथे अनेक टपरीवजा होटेल्स असली तरी सगळेच जण फक्त लिंबु पाणी व फारतर चहा - बिस्कीट्स विकणारेच होते. त्यामुळे पोटातल्या कावळ्यांना तसेच ओरडत ठेऊन भराभर पायर्या ऊतरण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. पुढे गंगाद्वार येथील विक्रेते सुद्धा तिच री ओढत होते.
हा ट्रेक ऊभ्या डोंगरात खोदलेल्या प्रेक्षणीय पायर्या, पूर्वजांनी केलेले अपार परिश्रम, सुरतेची लुट ठेवण्याकरीता झालेला वापर, नयनीश बरोबरच्या ज्ञान वाढ्विणार्या गप्पा, मधमाश्यांचे अचानक ऊभे राहीलेले संकट यामु़ळॅ नक्कीच खास आठवणीतला झाला.
ता.क.
बरेचदा ट्रेकला जाऊन आल्यावर हा अनुभव लिहुन शेअर करावा असे नेह्मी वाटते पण लिहिणे होत नाही.
यावेळी मात्र ईच्छा आणि लेखन यातील अंतर कमी झाले याचा आनंद आहे.
आता प्रतीक्षा आहे ती चोखंदळ मिपा करांच्या प्रतिसादाची. (शुद्धलेखनासाठी चुकभूल माफ असावी.)
प्रतिक्रिया
3 Jan 2014 - 6:35 pm | परिंदा
इथे शंकरांनी जटा आपटल्या होत्या, ब्रम्ह्देवाने नव्हे.
ती गहिनीनाथांची गुंफा आहे. तिथेच निवृत्तीनाथांना अनुग्रह झाला होता. गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - ज्ञानेश्वर ही गुरुपरंपरा असल्याने वारकरी संप्रदायासाठीदेखील ते एक पूज्य ठिकाण आहे.
बाकी ते मधमाश्यांचे आक्रमण खुपच भयानक होते. त्या अवघड जागी हल्ला जोराचा झाला असता तर. बापरे! काळ आला होता पण वेळ नव्हती आली.
सांभाळून ट्रेक करा.
3 Jan 2014 - 6:56 pm | Hrushikesh
योग्य माहितीप्रमाणे व्रुत्तांत योग्य ते बदल करीत आहे.
धन्यवाद
3 Jan 2014 - 7:06 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
3 Jan 2014 - 6:43 pm | बॅटमॅन
अगदी खतरनाक झालेला दिस्तोय ट्रेक. मजा आ गया!!
3 Jan 2014 - 7:02 pm | कवितानागेश
मस्तच झालाय ट्रेक.
पुढच्या ट्रेकसाठी आणि वृत्तांन्त लिहिण्यासाठी शुभेच्छा.
3 Jan 2014 - 7:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
श्रावण महीन्यात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतात त्याबद्दल काही माहीती द्याल का ? म्हणजे कुठुन सुरुवात करावी? कीती वेळ लागतो? वगैरे
3 Jan 2014 - 8:30 pm | भटक्य आणि उनाड
श्रावणामधे दर रविवारी रात्रि कुशावर्तापासुन बारा नअन्तर फेरीचि सुरुवात होते.एवधी गर्दी असते कि विचारण्याची गरज पड्त नाही.तिथे वीस किमी आणी चाळीस किमी अश्या दोन प्रदक्षिणा आहेत.अनुभवी लोक मोठी प्रदक्षिणा करतात.बाकी छोटी करतात. त्यासाठी बारा तास लागतात.ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते कारण बूट घालुन काही फायदा होत नाही.पण मजा येते, लोक भो$$ले!!! बम बम करत करत प्रदक्षिणा पूर्ण करतात.
3 Jan 2014 - 8:13 pm | पैसा
शुद्धलेखनाकडे संपूर्ण दुर्लक्ष झालंच! वर्णन आणि फोटो अप्रतिम! बघूनच भीती वाटली!!
3 Jan 2014 - 8:15 pm | प्रचेतस
मस्त रे.
आपल्या ब्रह्मगिरीच्या भटकंतीची आठवण झाली. माकडांनी लै छळले होते तेव्हा.
बाकी हे बांधकाम सातवाहनकालीन दिसतेय. कातळ पोटातून फोडून निर्मिती करायची कला त्यांचीच.
नंतर मग अंजनेरीची भग्न मंदिरे बघून आलास का नाही?
4 Jan 2014 - 2:50 am | अर्धवटराव
साला तुला वर्षभरासाठी बुक करुन, गरज पडल्यास किड्नॅप करुन, तुझ्यासोबत महाराष्ट्रभर भटकंती करावी अशी तीव्र इच्छा आहे.
4 Jan 2014 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै जंक्शन आयड्या ! कंदी किड्नॅप कराचं ब्वोला. म्हंजे तसं घोड्याला तेलपानी करुन ठ्येवतो. :)
5 Jan 2014 - 7:26 pm | प्रचेतस
त्यासाठी किडनॅप कशाला करायला पाहिजे, जस्ट एक कॉल करा. बंदा हाजिर होगा. :)
3 Jan 2014 - 8:45 pm | मिलिंद
मस्तच...

एकदम कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली...
3 Jan 2014 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो बघून तेथे जायची इछा झाली...
3 Jan 2014 - 10:43 pm | मुक्त विहारि
और आने दो...
4 Jan 2014 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
खत्तरनाक ट्रेक... काही फोटू बघून भ्या वाटलं
4 Jan 2014 - 10:35 am | जेपी
खत्तरनाक ट्रेक... काही फोटू बघून भ्या वाटलं
+१इथे बघुनच डोळे फिरले.
4 Jan 2014 - 12:49 pm | प्यारे१
सांभाळून रे पोरांनो!
-काकाप्यारे
वृत्तांत नि फोटो भारी
4 Jan 2014 - 1:38 pm | सुहास..
मिलींदसारखेच म्हणेन !!
पण आता काही जाणे झाले नाही या दिशेला ..
या बाजुन आहे अवघड हे खर !!
4 Jan 2014 - 2:25 pm | वेल्लाभट
ऐला हे जबरदस्त आहे....................
मी ऐकलंय याबद्दल खूप. आज बघितलंही.
जबर ट्रेक झालाय यार तुमचा........... मझा आला !
अजेंड्यावरची पोजिशन वर घेतली पाहिजे या डेस्टनेशन ची.
यो मॅन. वृत्तांताबद्दल आणि खलास फोटोज बद्दल लई थेंक्स
12 Jan 2014 - 7:13 pm | वात्रट मेले
लै भारी......म्या बी ४ येळा गेलोय..... पावसाळ्यात लै मजा येतिया वर.....
एकदा प्लान कराच.
21 Jan 2014 - 12:22 pm | सागर
सुंदर वर्णन. मी नाशिकला सुमारे दोनेक वर्षे वास्तव्याला असताना ब्रह्मगिरीवर २-३ वेळा गेलो होतो. पण 'डोंगराची शेवटची बाजू (बुरुज)' पाहूनही कधी तेथे गेलो नाही. ब्रह्मगिरीच्या जंगलात मात्र आतून फिरलो आहे. शेवटच्या भेटीत एक अजगर दिसला होता तेव्हापासून ब्रम्हगिरी आतून फिरणे बंद केले. आता वेळ मिळाला तर नाशिकला डोंगराची शेवटची बाजू (बुरुज) नक्की सर करणार. सुंदर फोटो आणि थरारक अनुभवांनी लेख छानच झालाय. मधमाशांच्या हल्ल्याला नेमके कसे तोंड द्यायचे याबद्दल तुमच्या अनुभवावरुन येथील अनेक हौशी गिर्यारोहकांना मदत झाली असेल.
21 Jan 2014 - 11:25 pm | एस
एकदा भेट द्यायलाच हवी. धन्यवाद.
22 Jan 2014 - 9:12 am | सुहास झेले
मस्त... ह्या किल्ल्याच्या ट्रेकिंगचे खूप थरारक अनुभव वाचनात आलेत. कधी मुहूर्त निघतोय बघूया :)
23 Jan 2014 - 3:43 pm | देवेन
सुरेख चीत्रकथा